Skip to main content

पाणी, नळातलं आणि डोळ्यातलं!

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 27/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच (बहुधा २२ मार्च) जागतिक जलदिन होऊन गेला असे वाचनात आले. बाकी हे असले दिन (जलदिन, एड्स दिन, पर्यावरण दिन, वगैरे) दुर्दैवाने फक्त वाचनातच येतात. महिला दिनाला बाजारपेठ आहे; रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, वगैरे नाजूक दिवसांनादेखील भरभक्कम (पण ज्वलनशील) बाजारपेठ आहे. थोडंफार असं नशीब मातृदिनाला पण लाभलेलं आहे. दागिन्यांच्या पानभर जाहिराती देऊन "सेलिब्रेट द वुमन इन युअर लाईफ" किंवा "मेक युअर वाईफ फील लाईक अ क्वीन" सारख्या भावनिक आव्हान करणार्‍या जाहिराती बघून या दिवसांचं महत्व दागिन्यांच्या, हॉटेल्सच्या, गिफ्टसच्या कंपन्यांनी किती खुबीने वाढवलंय हे लक्षात येतं. बाकी बायकोला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जाहिरातींची गणनाच नाही. याच मार्केटिंगच्या आधुनिक तंत्रांनी बहुधा वाईफला इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द 'बॉल अँड चेन' असा आहे हे लोकांना विसरायला भाग पाडलं आहे. किती समर्पक शब्द आहे! असो. मूळ मुद्दा पाण्याचा आहे. आणि जलदिनाला ग्लॅमर नाही. त्यामुळे जाहिराती नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये जागृती नाही. मग हेच पाणी कसं डोळ्यातून पाणी काढतं याचा अनुभव आम्ही सध्या घेत आहोत. वाट्टेल तेव्हा शॉवरची कळ फिरवून भर्रकन येणार्‍या गरम-थंड पाण्यात मनसोक्त भिजून स्नानानंद मिळवणार्‍या आमच्या सोसायटीतल्या महाभागांना गेल्या दोन आठवड्यांपासून नाही नाही ती स्वप्ने पडत आहेत. नैसर्गिक विधीसाठी विधीवत बसल्यानंतर नळाला, बादलीत, किंवा एखाद्या पिटुकल्या मगात पाण्याचा थेंबही नसणं हे त्यातलं सगळ्यात भयंकर स्वप्न आहे. हातातल्या 'पुणे टाईम्स'मधील सुंदर सुंदर ललनांचे फोटो बघत बघत अगदी समाधानकारकरीत्या 'कार्यभाग' साधल्यानंतर नळ फिरवावा आणि त्याने कुत्सितपणे थुंकल्यासारखा एकच थेंब बादलीत टाकावा अशा स्वप्नांनी सगळ्यांची झोप उडवलेली आहे. काल संध्याकाळी (नेहमीप्रमाणे) ऑफिसात पाट्या टाकून मी स्वतःला ओढत ओढत घरी येत होतो. असह्य उकाड्याने जीव हैराण झाला होता. कपाळावर, शर्टाच्या कॉलरमागे, पाठीवर घामाच्या असंख्य आणि अजस्त्र धारा वाहत होत्या. केव्हा एकदा घरी जाऊन गार पाण्याने आंघोळ करतो असे झाले होते. घरी आलो; बाथरूममध्ये शिरलो. नळ फिरवला. जड डोळ्यांनी माझ्याकडे बघत नळाने एक-दोन आसवे गाळली आणि सरकारी कर्मचार्‍यांचा ज्याप्रमाणे 'उद्या या' म्हणतांना चेहरा असतो त्यासारख्याच मख्ख चेहर्‍याने तो तोंड उघडेच ठेवून खाली बघत राहिला. मी चरफडतच बाहेर आलो. आयपीएल खेळणार्‍याला एकदम जय हनुमान सहकारी सोसायटी विरुद्ध गुरुदत्त आवास योजना या पाच-पाच षटकांच्या क्रिकेट सामन्यात खेळायला लागावे तशी माझी अवस्था झाली. मला एकदम रात्रीच्या 'संधिसुधा' (की संधीसाधू?) तेलाच्या जाहिरातीत अर्धा तास रटाळ बडबड करणार्‍या जॅकी श्रॉफसारखे वाटले. शेवटी एक मगभर पाण्यात मी कसाबसा चेहरा आणि हात धुतले आणि तडजोड केली. शनिवारी संध्याकाळी साठवलेले पाणी संपत आले होते. एक क्षण असा आला की सगळे पाणी संपले. फक्त पिण्यापुरते पाणी थोडे शिल्लक होते. साधारण साडेसातची वेळ! नऊ वाजता पाणी येणार म्हणून घरातले सगळेच अधीर चित्ताने वाट बघत बसले होते. आणि एवढ्यात...एवढ्यात घात झाला! अस्मादिकांना पावणेआठाच्या सुमारास पोटाकडून गुदगुल्या करणारे निरोप यायला लागले. अण्णा हजारेंच्या निरोपांना जसे सरकार कधी कधी उडवून लावते तसे मी ही त्या निरोपांना उडवून देऊ लागलो. पण किती काळ उडवणार? उडणार्‍या प्रत्येक गोष्टीला कधीतरी जमिनीवर यावेच लागते. पतंग असो, विमान असो, पक्षी असो किंवा अफवा असो; नीचे तो आना ही पडता हैं! आणि या केसमध्ये गोष्ट जरा अवघड होती. दुपारच्या जेवणात अस्मादिकांनी कांदा भजी दाबून हाणली होती. तळलेले बेसन खाताना बेष्ट लागते पण नंतर माझ्यासारख्यांना अतिशय कष्टदायक अवस्थेत नेऊन ठेवते. आता पोटाकडून येणारे निरोप उडवून लावणे शक्य नव्हते आणि नकोसे सुगंध उडविण्यात अस्मादिकांना इंटरेस्ट नव्हता. मी बेभान झालो आणि धावत सुटलो. समोरच्या टेबलावर नुकतेच आणलेले कोरे पंचांग पडले होते. क्षणाचाही विचार न करता मी पंचांग उचलले आणि धूम ठोकली. पंचांगातील वर्षभराचे भविष्य, मुहुर्तांच्या तारखा, सूतक पडल्यास पाळावे लागणारे नियम, वृद्धी पडल्यास करावे लागणारे खटाटोप इत्यादी उपयुक्त माहिती वाचून झाल्यावर मी समाधानाची आणि तृप्तीची शीळ वाजवली. मजा आ गया म्हणत असतांनाच नळाचे केविलवाणे रूप बघून मी नखशिखान्त हादरलो. इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षातल्या पहिल्या सहामाहीमधला एक चिवट विषय मी तिसरे वर्ष बिनबोभाट उत्तीर्ण होऊनदेखील सुटला नव्हता; तेव्हा मी हादरलो नव्हतो इतका मी यावेळेस हादरलो. अब क्या करें? मी आधी हळूच बायकोला हाक मारली. लग्नाआधीदेखील मी बायकोला कधी इतक्या प्रेमाने हाक मारली नसावी. लग्नानंतर कुणी इतक्या प्रेमाने बायकोला हाक मारत असल्यास मला त्याचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक द्यावा. मी त्या नरोत्तमाला योग्य पडताळणी केल्यानंतर जंगी पार्टी द्यायला तयार आहे. असो. बायको बर्‍याच वेळानंतर आली. माझ्या गहन प्रश्नापेक्षा तिला 'ससुराल गेंदा फूल' किंवा 'बडे अच्छे लगते हैं' सारख्या भिकारड्या सीरीयल्समध्ये जास्त रस होता. अनिच्छेने ती आवाजाच्या दिशेने आली. मी आतूनच ओरडलो: "पाणी नाहीये" "हो, मला माहितीये. त्यात नवीन काय सांगताय? आणि बाथरूममध्ये बसून काय सांगताय हे? बाहेर या." "अगं, तुला कळत नाहीये का? मी अवघडलेलो आहे." "काय्य? बाई अवघडलेली असते हे ऐकले होते. पुरुष कसा काय अवघडतो? काय वाट्टेल ते बरळू नका, बाहेर या. आई-बाबांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी" "अगं मठाधिपती (हे पण प्रेमानेच; 'तू मठ्ठ आहेस' हे सांगण्याची ही प्रेमळ पद्धत), मला घाई होती म्हणून मी तसाच आत घुसलो आणि आता अजिबात पाणी नाहीये आत..." "ओ...अस्स आहे होय? कसे हो तुम्ही बावळट? (खिंकाळत, खिदळत) बघून घ्यायचं ना आधी." "होय गं बाई, प्रवचन बाहेर आल्यावर दे पण आत्ता काहीतरी सोय करण्याचं वचन दे...." "आई, अहो आई, पाणी आहे का थोडं कुठे? हे आत आहेत..." आईने एखाद्या शिंपल्यातून अनमोल मोती काढावा तशी किचनओट्याखाली लपवलेली एक कळशी काढली. मी दार किलकिले करून ती घेतली. पाणी तसं थोडंच होतं पण लाखमोलाचं होतं. एकदाचा हुश्श करून मी बाहेर आलो. सकाळी आठ वाजताच पाणी पसार होते आणि तोंडचे पाणी पळवते. मग अर्ध्या बादलीत आंघोळ, अर्धापाव बादलीत अर्धवट विधी असे प्रकार चालले आहेत. शेतीला पाणी वळवल्याने म्हणा किंवा पुण्यातल्या लोकांना भरमसाठ पाणी वापरण्याची सवय आहे म्हणा, पाणी पुरत नाहीये हे खरंय; आणि या सगळ्या प्रकारात कुठेच पाणी मुरत नाहीये यावर विश्वास ठेवणं अवघड जातंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा वापर काटकसरीने केलेला चांगला. शहरांचं नियोजन, शहरांमधून सतत वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं वगैरे गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत; पण पाणी जपून वापरणं तर नक्कीच आपल्या हातात आहे. कदाचित पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे डोळ्यातून पाणी आल्यावरच जलदिनाचं महत्व पटत असावं! मला ते आता नक्कीच पटलं आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4625
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ. थेंबे थेंबे तळे (म्हणजे पाव बादली) साठवुन परवा मी अशीच एकदा माझी लाज वाचवली होती ते आठवले. कपडे भिजवण्यासाठी म्हणुन बारीक धार (बाथरुम मधल्या नळाची) करुन बादली भरायला लावली होती. तिचा उपेग अखेर अर्ध्या तासाने आदल्या रात्रीच्या भज्यांना दूर लोटण्यात झाला होता ;)

नेहमीप्रमाणेच छान! हल्ली बरेच दिवस कुठे गायब होतात का?

In reply to by पैसा

धन्यवाद. होय, काही कारणांमुळे जरा गायब झालो होतो खरा. :-)

छान. आवडले

अहो तुम्ही इन-मीन ४/५ मते दिली तर देणार, तर इतर लोक एकावेळीस टॅन्कभर मते देणार सांगा बरे कोण कुणाची काळजी घेणार? एक तर जास्त शिकलात..वर परत सुसंस्कृत का कायसेसे झालात...परत झोपडपट्टीत राहायचे सोडून अपार्टमेंट मध्ये गेलात...ह्या एव्हढ्या अघोर चुका केल्यात त्या केल्यात... शिवाय आपल्या हुशारीचा फायदा आपल्या भारताला व्हावा अशी इच्छा धरता...अहो इथे खूप हुशार मंडळी आहेत त्यामुळे ह्या देशाला आपली गरज नाही आहे...हे वेळीच ओळखा आणि स्थलांतर करा...

In reply to by मुक्त विहारि

थोडासा चुक्याच, नही क्या? अहो, पण या फजितीत पण एक गंमत आहे बरं का! अर्थात कधीतरीच बरी वाटते ही गंमत..नेहमी नेहमी व्हायला लागली तर गमतीची शिक्षा व्हायला वेळ नाही लागत... :-)

ज ब र्‍या च ! आयुष्यात कधी अभ्यासाला देखील पहाटे उठल्याचे आठवत नाही, पण आजकाल परमपुज्य व राजमाता पहाटे ६ वाजता उठवून पाणी भरायला लावतात. ह्या सोसायटी मिटिंगमध्ये, सोसायटी पुरते धरण बांधता येईल का ह्याची चाचपणी करावी म्हणतोय.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धरणाचं काही जमत असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही ही करून बघू प्रयत्न... ;-) बाकी आजकाल घराघरात छोटी छोटी धरणे आहेतच; रविवारी आमच्या सोसायटीत राहणार्‍या एका मित्राने ६५०० रुपये खर्च करून एक टाकी बसवून घेतली आहे. मुख्य लाईनलाच ती जोडली आहे असे काहीतरी तो अभिमानाने सांगत होता. म्हणजे ज्यांच्याकडे टाकी नाही त्यांनी रोजची ३-४ वर्तमानपत्रे घ्यावीत की काय? :-)

टिश्यु पेपरचा रोल फारसा महाग नसतो, पण आगाव कार्ट्यांपासून फार जपावे लागते. एका धडपडणार्‍या बालकाने आमच्या स्वच्छतागृहात बसल्या बसल्या निम्मा रोल उलगडून ठेवला होता. दु:शासनाचा वंशज असावा लेकाचा. असो. हताश होऊ नका. 'भिंतीवरी कालनिर्णय असावे'च्या चालीवर 'खिशात पेपरचे पान असावे' हे लक्षात ठेवावे. वाचाल तर वाचाल.

In reply to by समीरसूर

टिश्यू पेपरवरुन आम्हाला एक इंग्लिश माणूस कोल्हापूरात जेवतो आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळी त्याला भारतीय पाणी का वापरतात त्याचा उलगडा होतो तो किस्सा आठवला. ;)

मस्त जमलय लिखाण.

ललितलेख या स्वरूपात खूप आवडले. असेच नवे काहीतरी परत लिहा ! शुभेच्छा !

जल दिनासंबंधी माहिती व पाण्याचे महत्व सांगतांना नर्मविनोदी शैलीत मस्त लेख झाला आहे. पुढचे जागतिक युद्ध हे पाण्यामुळे होणार असे अनेक जाणकार म्हणत आहेत. भारताचा चीन व पाकिस्तान सोबत सीमेहून जास्त गहन असा पाण्याचा आयमिन नदीतील पाण्याचा तंटा आहे. दोन्ही बाजूने धरणे बांधून पाणी अडवणे सुरु आहे तेव्हा पाण्यावरून जसे चाळीच्या नळावर रणकंदन माजते तसे आपल्या सीमेवर होऊ शकते. पाणी अडवा, पाणी जिरवा.त्यासाठी झाडे लावा हाच एकमेव उपाय आहे. पाण्याचे रिसायकलिंग चेन्नई येथे वाजवी दरात होत असल्याचे वाचून आहे बाथरूम मधील प्रसंग आमच्याकडे बरेच वेळा घडतो. मात्र पाण्याची जागा टिशू पेपराने घेतलेली असते. टिशू पेपर वरून ऑउत सोर्स सिनेमातील किस्सा आठवला. त्या विदेशी माणसाला प्रसाद देतांना वृद्ध बाई त्याला डाव्या हातात घेऊ नको तो धुण्याच्या हात असतो असे सांगते. तेव्हा धुण्याच्या हात ही संकल्पना त्याला समजावून सांगतांना त्याच्या भारतीय मित्राची भंबेरी उडते.

लेख आवडला.. पण यातला विनोदाचा भाग सोडला तर सोसायटी स्तरावर म्हणजे अगदी २०-३० घर असली तरी करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. * सोसायटीतल्या गच्चीवरुन वाहणारे पावसाळी पाणी व सोसायटीच्या जमीनीवर पडणारे पाणी, उताराने एकत्र करायचे.. ते बोअरवेलच्या ठिकाणी पाईपने सोडायचे.. उन्हाळ्यातही चांगल्या दर्जाचे बोअरचे पाणी मिळते. * गच्चीवरती सिंटेक्सच्या एक-दोन मोठ्या टाक्या खास टॉयलेट फ्लशसाठी बांधायच्या, फ्लशची लाईन वेगळी करुन त्या टाक्यांतुन द्यायची. त्या टाक्यांत फक्त बोअरचेच पाणी वापरायचे.. शक्य असेल तर सोसायटीतल्या सगळ्या वॉशिंग मशिनच्या एक्सॉस्ट्ची एक लाईन वेगळी फिरवायची, ते पाणी खाली वेगळ्या टाकीत जमा करुन या टाक्यांमधे सोडायचे... संडासचे भांडेही साफ होइल आणी खुप पाणी वाचेल

पाण्याची टाकी हा तात्पुरता उपाय आहेच. पण केव्हाही पाण्यचा अपव्यय टाळावा हे बेष्ट. आपण तर विकांताला आंगोळीची गोळी घेतो आणि एरवी बीन-पाण्याची* करतो. ;) *दाढी.

खरं आहे. बाकीच्यांना "थांबा" म्हणून सांगता येतं, पण निसर्गाच्या हाकेला "ओ" दिलंच पाहिजे. :)

एकदम समिरसूर ष्टाईल लिखाण. जाम भारी लिहिलेय. :-) बाकी हे पाणी कधी कधी आपले पाणी दाखवतेच. जपून वापरणे आणि गैरवापर टाळणे आपल्या हातात आहेच.
क्षणाचाही विचार न करता मी पंचांग उचलले आणि धूम ठोकली
हे वाचताना ते पंचांग तुमच्या अंगाशी येणार की काय अशी भिती वाटली होती. ;-)

शीर्षक वाचून काहीतरी रडकथा असावी असे वाटले होते. पण हे तर चांगलंच इनोदी प्रकर्ण निघालं की ! खास अन क्लास लेखन ! येत रहावे..

In reply to by सस्नेह

हेच वाटले होते मलापण. लेख एकदम खुशखुशीत झालाय आणी एका महत्वाच्या प्रश्नाला चांगल मांडलय. --टुकुल

एकदम समिरसूर ष्टाईल लिखाण
+१ मस्तच! देर आये दुरुस्त आये. बर्‍याच दिवसांनी तुमचं नविन लिखाण वाचून मझा आला. - (पाणी नसले तर टिश्यू चालवून घेणारा) सोकाजी