नुकताच (बहुधा २२ मार्च) जागतिक जलदिन होऊन गेला असे वाचनात आले. बाकी हे असले दिन (जलदिन, एड्स दिन, पर्यावरण दिन, वगैरे) दुर्दैवाने फक्त वाचनातच येतात. महिला दिनाला बाजारपेठ आहे; रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, वगैरे नाजूक दिवसांनादेखील भरभक्कम (पण ज्वलनशील) बाजारपेठ आहे. थोडंफार असं नशीब मातृदिनाला पण लाभलेलं आहे. दागिन्यांच्या पानभर जाहिराती देऊन "सेलिब्रेट द वुमन इन युअर लाईफ" किंवा "मेक युअर वाईफ फील लाईक अ क्वीन" सारख्या भावनिक आव्हान करणार्या जाहिराती बघून या दिवसांचं महत्व दागिन्यांच्या, हॉटेल्सच्या, गिफ्टसच्या कंपन्यांनी किती खुबीने वाढवलंय हे लक्षात येतं. बाकी बायकोला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जाहिरातींची गणनाच नाही. याच मार्केटिंगच्या आधुनिक तंत्रांनी बहुधा वाईफला इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द 'बॉल अँड चेन' असा आहे हे लोकांना विसरायला भाग पाडलं आहे. किती समर्पक शब्द आहे! असो. मूळ मुद्दा पाण्याचा आहे. आणि जलदिनाला ग्लॅमर नाही. त्यामुळे जाहिराती नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये जागृती नाही. मग हेच पाणी कसं डोळ्यातून पाणी काढतं याचा अनुभव आम्ही सध्या घेत आहोत.
वाट्टेल तेव्हा शॉवरची कळ फिरवून भर्रकन येणार्या गरम-थंड पाण्यात मनसोक्त भिजून स्नानानंद मिळवणार्या आमच्या सोसायटीतल्या महाभागांना गेल्या दोन आठवड्यांपासून नाही नाही ती स्वप्ने पडत आहेत. नैसर्गिक विधीसाठी विधीवत बसल्यानंतर नळाला, बादलीत, किंवा एखाद्या पिटुकल्या मगात पाण्याचा थेंबही नसणं हे त्यातलं सगळ्यात भयंकर स्वप्न आहे. हातातल्या 'पुणे टाईम्स'मधील सुंदर सुंदर ललनांचे फोटो बघत बघत अगदी समाधानकारकरीत्या 'कार्यभाग' साधल्यानंतर नळ फिरवावा आणि त्याने कुत्सितपणे थुंकल्यासारखा एकच थेंब बादलीत टाकावा अशा स्वप्नांनी सगळ्यांची झोप उडवलेली आहे.
काल संध्याकाळी (नेहमीप्रमाणे) ऑफिसात पाट्या टाकून मी स्वतःला ओढत ओढत घरी येत होतो. असह्य उकाड्याने जीव हैराण झाला होता. कपाळावर, शर्टाच्या कॉलरमागे, पाठीवर घामाच्या असंख्य आणि अजस्त्र धारा वाहत होत्या. केव्हा एकदा घरी जाऊन गार पाण्याने आंघोळ करतो असे झाले होते. घरी आलो; बाथरूममध्ये शिरलो. नळ फिरवला. जड डोळ्यांनी माझ्याकडे बघत नळाने एक-दोन आसवे गाळली आणि सरकारी कर्मचार्यांचा ज्याप्रमाणे 'उद्या या' म्हणतांना चेहरा असतो त्यासारख्याच मख्ख चेहर्याने तो तोंड उघडेच ठेवून खाली बघत राहिला. मी चरफडतच बाहेर आलो. आयपीएल खेळणार्याला एकदम जय हनुमान सहकारी सोसायटी विरुद्ध गुरुदत्त आवास योजना या पाच-पाच षटकांच्या क्रिकेट सामन्यात खेळायला लागावे तशी माझी अवस्था झाली. मला एकदम रात्रीच्या 'संधिसुधा' (की संधीसाधू?) तेलाच्या जाहिरातीत अर्धा तास रटाळ बडबड करणार्या जॅकी श्रॉफसारखे वाटले. शेवटी एक मगभर पाण्यात मी कसाबसा चेहरा आणि हात धुतले आणि तडजोड केली.
शनिवारी संध्याकाळी साठवलेले पाणी संपत आले होते. एक क्षण असा आला की सगळे पाणी संपले. फक्त पिण्यापुरते पाणी थोडे शिल्लक होते. साधारण साडेसातची वेळ! नऊ वाजता पाणी येणार म्हणून घरातले सगळेच अधीर चित्ताने वाट बघत बसले होते. आणि एवढ्यात...एवढ्यात घात झाला! अस्मादिकांना पावणेआठाच्या सुमारास पोटाकडून गुदगुल्या करणारे निरोप यायला लागले. अण्णा हजारेंच्या निरोपांना जसे सरकार कधी कधी उडवून लावते तसे मी ही त्या निरोपांना उडवून देऊ लागलो. पण किती काळ उडवणार? उडणार्या प्रत्येक गोष्टीला कधीतरी जमिनीवर यावेच लागते. पतंग असो, विमान असो, पक्षी असो किंवा अफवा असो; नीचे तो आना ही पडता हैं! आणि या केसमध्ये गोष्ट जरा अवघड होती. दुपारच्या जेवणात अस्मादिकांनी कांदा भजी दाबून हाणली होती. तळलेले बेसन खाताना बेष्ट लागते पण नंतर माझ्यासारख्यांना अतिशय कष्टदायक अवस्थेत नेऊन ठेवते. आता पोटाकडून येणारे निरोप उडवून लावणे शक्य नव्हते आणि नकोसे सुगंध उडविण्यात अस्मादिकांना इंटरेस्ट नव्हता. मी बेभान झालो आणि धावत सुटलो. समोरच्या टेबलावर नुकतेच आणलेले कोरे पंचांग पडले होते. क्षणाचाही विचार न करता मी पंचांग उचलले आणि धूम ठोकली. पंचांगातील वर्षभराचे भविष्य, मुहुर्तांच्या तारखा, सूतक पडल्यास पाळावे लागणारे नियम, वृद्धी पडल्यास करावे लागणारे खटाटोप इत्यादी उपयुक्त माहिती वाचून झाल्यावर मी समाधानाची आणि तृप्तीची शीळ वाजवली. मजा आ गया म्हणत असतांनाच नळाचे केविलवाणे रूप बघून मी नखशिखान्त हादरलो. इंजिनीयरिंगच्या दुसर्या वर्षातल्या पहिल्या सहामाहीमधला एक चिवट विषय मी तिसरे वर्ष बिनबोभाट उत्तीर्ण होऊनदेखील सुटला नव्हता; तेव्हा मी हादरलो नव्हतो इतका मी यावेळेस हादरलो. अब क्या करें? मी आधी हळूच बायकोला हाक मारली. लग्नाआधीदेखील मी बायकोला कधी इतक्या प्रेमाने हाक मारली नसावी. लग्नानंतर कुणी इतक्या प्रेमाने बायकोला हाक मारत असल्यास मला त्याचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक द्यावा. मी त्या नरोत्तमाला योग्य पडताळणी केल्यानंतर जंगी पार्टी द्यायला तयार आहे. असो. बायको बर्याच वेळानंतर आली. माझ्या गहन प्रश्नापेक्षा तिला 'ससुराल गेंदा फूल' किंवा 'बडे अच्छे लगते हैं' सारख्या भिकारड्या सीरीयल्समध्ये जास्त रस होता. अनिच्छेने ती आवाजाच्या दिशेने आली. मी आतूनच ओरडलो:
"पाणी नाहीये"
"हो, मला माहितीये. त्यात नवीन काय सांगताय? आणि बाथरूममध्ये बसून काय सांगताय हे? बाहेर या."
"अगं, तुला कळत नाहीये का? मी अवघडलेलो आहे."
"काय्य? बाई अवघडलेली असते हे ऐकले होते. पुरुष कसा काय अवघडतो? काय वाट्टेल ते बरळू नका, बाहेर या. आई-बाबांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी"
"अगं मठाधिपती (हे पण प्रेमानेच; 'तू मठ्ठ आहेस' हे सांगण्याची ही प्रेमळ पद्धत), मला घाई होती म्हणून मी तसाच आत घुसलो आणि आता अजिबात पाणी नाहीये आत..."
"ओ...अस्स आहे होय? कसे हो तुम्ही बावळट? (खिंकाळत, खिदळत) बघून घ्यायचं ना आधी."
"होय गं बाई, प्रवचन बाहेर आल्यावर दे पण आत्ता काहीतरी सोय करण्याचं वचन दे...."
"आई, अहो आई, पाणी आहे का थोडं कुठे? हे आत आहेत..."
आईने एखाद्या शिंपल्यातून अनमोल मोती काढावा तशी किचनओट्याखाली लपवलेली एक कळशी काढली. मी दार किलकिले करून ती घेतली. पाणी तसं थोडंच होतं पण लाखमोलाचं होतं. एकदाचा हुश्श करून मी बाहेर आलो.
सकाळी आठ वाजताच पाणी पसार होते आणि तोंडचे पाणी पळवते. मग अर्ध्या बादलीत आंघोळ, अर्धापाव बादलीत अर्धवट विधी असे प्रकार चालले आहेत. शेतीला पाणी वळवल्याने म्हणा किंवा पुण्यातल्या लोकांना भरमसाठ पाणी वापरण्याची सवय आहे म्हणा, पाणी पुरत नाहीये हे खरंय; आणि या सगळ्या प्रकारात कुठेच पाणी मुरत नाहीये यावर विश्वास ठेवणं अवघड जातंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा वापर काटकसरीने केलेला चांगला. शहरांचं नियोजन, शहरांमधून सतत वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं वगैरे गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत; पण पाणी जपून वापरणं तर नक्कीच आपल्या हातात आहे. कदाचित पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे डोळ्यातून पाणी आल्यावरच जलदिनाचं महत्व पटत असावं! मला ते आता नक्कीच पटलं आहे.
वाचने
4625
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ. थेंबे थेंबे तळे
भारीच लिहीलय
मस्त!
गायब
In reply to मस्त! by पैसा
समिरसुर तुस्सी ग्रेट हो क्या
मस्त
अरेरे काय ही दशा....
हम्म
In reply to अरेरे काय ही दशा.... by मुक्त विहारि
खीक्क!!
हा हा हा हा
आम्हालाही सांगा
In reply to हा हा हा हा by परिकथेतील राजकुमार
गरज ही शोधांची जननी...
टिश्यू
In reply to गरज ही शोधांची जननी... by योगप्रभू
हा हा ह अ
In reply to टिश्यू by समीरसूर
दगडी बांधकाम करण्याची सवय
प्रकाटाआ.
मस्त!
धन्यवाद
In reply to मस्त! by रुमानी
लेखन आवडले
मस्त !
चार पाच दिवसातून एकदा पाणी
सही लिहिलंय.
हॅ हॅ हॅ
जल दिनासंबंधी माहिती व
लेख आवडला.. पण यातला
लेख फक्कड झालाय. :)
हा हा. मजा आली.
वाह!
शीर्षक वाचून काहीतरी रडकथा
हेच वाटले होते मलापण. लेख
In reply to शीर्षक वाचून काहीतरी रडकथा by सस्नेह
एकदम समिरसूर ष्टाईल
मस्त खुसखुशीत लेखन.