दु:खाचा महाकवी हरपला
लेखनविषय (Tags)
अत्यंत दुर्बोध कविता अशी टीका पचवून पुढे दु:खाचा महाकवी या रसिकांनी दिलेल्या बिरूदाला शेवटपर्यंत जागलेले श्री माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे आपल्यात राहीले नाहीत या बातमीवर विश्वास बसत नाही. मर्ढेकरांनतरच्या पिढीतले ते एक महत्वाचे आणि प्रमुख कवी होत.
१० मे १९३७ रोजी ग्रेसजींचा जन्म नागपुरात झाला. त्यांचं बालपण विलक्षण गेलं. त्याबद्दल त्यांनी मौन पाळणं पसंत केलं. पण मनात खदखदणारं दु:खं प्रतिमांची सोबत घेऊन आलं. एखाद्या पदार्थाची चव जशी मोजता येत नाही तशीच भावनेची तीव्रताही. ती तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिमांचा वापर केवळ ग्रेसजींसारखे कवीच करू शकतात. या कविता वाचताना जाणवतं कि काहीच कळलं नाही तरी काहीतरी अभिजात असं आपण वाचतो आहोत. दृश्यरूप प्रतिमांमधून पहिल्याच वाचनात एखाद्याला अनुभूति येते आणि मग तो या कोलाज कवितांचा वेडा व्हायचा. हे वेड हळूहळू पसरत गेलं आणि या अॅब्स्ट्रॅक्ट कवीला अनेक प्रतिभावंत शरण गेलं.
त्यांच्या रचनांप्रमाणेच त्याचं व्यक्तिमत्वही गूढ राहीलं. कदाचित या गूढ वागण्यामुळेच काव्यही गुढ झालं असावं. व्यक्त होण्याची प्रत्येकाची आपली एक पद्धत असते. ग्रेसजींची पद्धत ही सर्वस्वी निराळी होती. त्यांच्यावर उर्दू रचनांचा आणि रोमांचवादी इंग्रजी साहीत्याचा प्रभाव होता.
साहीत्य अकादमीचा त्यांना मिळालेला पुरस्कार ही त्यांच्या साहीत्यसेवेला मिळालेली पावती होय. १९६७ ला प्रकाशित झालेल्या संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहाने ग्रेस जगाला माहीत झाले. त्यांची कविता संध्याकाळच्या धूसर प्रकाशात खुलते. आरती प्रभूंप्रमाणेच कातरवेळेचं आकर्षण ग्रेसजींना दिसून येतं. पं हृदयनाथ मंगेशकर ग्रेसजींच्या प्रेमात असे पडले कि शेवटपर्यंत ही मैत्री टिकून राहीली. ग्रेसजी कॅन्सरशी झुंज देत असताना पंडितजींनी त्यांचा उपचार दीनानाथ मंगेशकर मधे केला. या कॅन्सरवरही त्यांनी मार्मिक लेख लिहीला. पद्य लेखन जितकं सुंदर तितकंच गद्य लेखनही शब्दसौंदर्य उधळण करणारं ठरलं.
लताबाईंच्या वाढदिवसाला सकाळमधे आलेला ग्रेसजींचा लेख हा जपून ठेवावा या सदरातला आहे. चर्चबेल हा ललितसंग्रह वाचनीय आहे. चंद्रमाधवीचे प्रदेश, सांजभयाच्या साजणी आणि सांध्यपर्वातील वैष्णवी हे कवितासंग्रह विशेष गाजले.
सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचले ते भय इथले संपत नाही या गीतातून. ती गेली तेव्हां रिमझिम आणि घर थकलेले संन्यासी या गीतांनी लोकांना वेड लावलं. पंडितजींना घर थकलेले संन्यासी साठी सर्वोकृष्ट संगीतकार म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
आज हा महाकवी आपल्यात नाही हे वास्तव पचवणं कठीण जातंय. लक्षात राहतात ती त्यांची स्वतःच्या कवितेबद्दलची वाक्यं..
" माझे शब्द तुम्हाला कुठल्याही शब्दकोशात सापडणार नाही " किंवा " मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही. मी तिचे समर्थन का करू ?"
आणि मग या ओळी आठवतात..
घर थकलेले सन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते
पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झर्याचे पाणी
मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई
या आवडत्या कवीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग यावा हे रसिकांचं दु:ख शब्दातीत आहे. अशा वेळी ग्रेसजींच्याच शब्दांचा आधार घेऊन म्हणावं लागतं..
अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले,
स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले
दु:खाच्या या महाकवीला माझी विनयपूर्वक आदरांजली !
- संध्या
प्रतिक्रिया
http://www.aathavanitli-gani.
:-(
लहानपणीच घरी "साजणवेळा" ऐकलं
त्यांच्या ह्या ओळी मला फार
१+
:(
फारच चटका लावणारा मृत्यूलेख
बातमी वाचुन अतिशय वाईट
ग्रेस !!
भावपुर्ण श्रद्धांजली...
श्रद्धांजली
ही बातमी वाचून मन एकदम
मराठी मायबोलीच्या
सांजसंध्याजी , लेख वाचुन डोळे पाणावले.
हम्म्म्म
+१
+/- १
........
लिंकबद्दल थँक्यू सर! ||| मी
मितवा चला गया...
ग्रेस
वाचन कमी...
प्रतिभावंत महाकवीला विनम्र आदरांजली
सांजसंध्या परिपुर्ण लेख अन
ग्रेस माझ्या रक्तात भिनत