Skip to main content

शाईचा पेन

लेखक सुधांशू
Published on बुधवार, 21/03/2012
'चला दीपक सरकार, जायच का घरी?', एक तासाच्या कंटाळवाण्या मिटिंग मधून बाहेर आल्यावर मी दीपक ला विचारल. दीपक काहीतरी काम सांगून तो मिटिंग ला आला नव्हता, लकी साला. सगळ्यांचे पुढच्या महिन्याचे टार्गेटस ठरवता ठरवता आमच्या बॉस ने आमच्या डोक्याला झिणझिण्या आणल्या होत्या. खूप बिझी दिवस होता आज. कस्टमरना पटवता पटवता नाकी नऊ येत होते, तरी पण आज मी १० कॉम्पुटर विकले होते. संध्याकाळी ५ वाजता कोणी टार्गेट मिटिंगस घेत का? पण या बॉस लोकांना सांगणार कोण? 'नाही रे थांब जरा, अजून वेळ आहे', दीपक म्हणाला. 'ए अरे चल कि, नाहीतर बराच वेळ होईल एकतर या मिटिंग मुळे मला निखील ला आणायला जायला जमले नाही आणि आता तू उशीर करतो आहेस'. मला त्याच्यासाठी थांबण भाग होत, एकतर कंपनी ची बस निघून गेली होती आणि आता फक्त त्याच्याकडेच गाडी होती. मी विचारले 'किती वेळ लागेल तुला?', दीपक म्हणाला 'थांब जरा, अर्धा तास तरी लागेल, हे पेमेंट रिपोर्ट्स बनवायचे आहेत. पूर्ण महिन्याचा सेल्स चा रिपोर्ट तयार करतोय, उद्याच्या आत दिला नाही तर बॉस मला घरी बसायला सांगेल. तुला माहित आहे ना २५ तारखेच्या आत त्याला रिपोर्ट त्याच्या टेबलावर हजर लागतो नाहीतर बिन पाण्याची झालीच म्हणून समज', 'हो राजे माहित आहे, हे सगळ बोलण्यात कृपया वेळ घालवू नका, नाहीतर आम्हाला आमच्या महाली जाण्यास विलंब होईल, त्यामुळे कृपया लवकर लवकर आपण काम आटोपले तर बर होईल', असे म्हणून मी कॉम्पुटर वर गेम खेळायला लागलो. बरोबर अर्ध्या तासात दीपक ने काम आवरल, फायील बॉस च्या टेबलावर आपटली आणि आम्ही घरी जाण्यास सज्ज झालो. संध्याकाळचे ७ वाजले होते, निघायच्या आधी कंपनी बाहेरच्या टपरी वर चहा साठी थांबलो. दीपक ने विचारले, 'काय रे अमित, आज इतकी गडबड का? नाही मान्य कि आज जरा उशीर झालाय, पण एवढी गडबड का?', मी 'अरे लेका आज मी निखील ला आणायला गेलो नाही आणि नेहाला वाकडी वाट करून त्याच्या शाळेत जावून त्याला घेवून याव लागल. मिटिंग मध्ये असताना तिचे बरेच फोन येवून गेले पण मला घेता आले नाहीत, आणि आता मी तिला फोन करतोय तर ती उचलत नाही माहित नाही काय झाल ते, म्हणून चल, चल लवकर.' आम्ही चहा संपवला, दीपक ने गाडी ला किक मारली आणि आम्ही घराकडे निघालो. घरी पोचेपर्यंत रात्रीचे ८ वाजले होते. घरातल वातावरण जरा तंग दिसत होत. निखील आईपाशी चुपचाप बसून tv बघत होता. कदाचित मी वेळाने घरी आलो म्हणून सगळे चिडले आहेत अस मला वाटल. नेहमी सारखा निखील पळत बाहेर आला नाही. कदाचित शाळेतून येवून आणि नंतर खेळून तो दमला असेल अस मला वाटल. मी त्याच्याजवळ गेलो, त्याचा गोड पापा घेतला आणि विचारल 'काय झाल निक्कू?', निखील, चोरून नेहा कडे बघत 'काही नाही' म्हणून परत tv बघायला लागला. मी नेहाला विचाराल 'काय झाल याला? कंटाळलाय का, कि आत्ता खेळून आलाय?', नेहा म्हणाली 'तू आधी आवरून घे, तुला काही खायला पाहिजे आहे का? का आता जेवूया? ८ वाजले आहेत.' मी, 'ठीक आहे वाढ जेवायला, मी हात पाय धुवून येतो. काय झाल रे निक्कू, दमला का बाळा, सॉरी रे तुला न्यायला आलो नाही, पण आई आली होती ना, मग आईने आईस्क्रीम दिले कि नाही?'. निखील ने परत आईकडे पाहिले आणि खाली पाहिले. मी नेहाला, 'काय झाल याला, आज मी आल्यावर बाहेर पण आला नाही'. 'काही नाही रे, मार खाल्ला आहे माझा', नेहा. 'का, आज काय केल, शाळेत दंगा केला का?' मी कपडे बदलता बदलता विचारल. नेहा 'सांगते, कपडे बदलून ये, जेवून घेवू आणि मग बोलू'. मी कपडे बदलले, हात पाय धुवून आलो तोपर्यंत नेहाने जेवायला वाढले होते. 'सा रे ग म प' बघत जेवायला बसलो. जेवायला आज भाकरी, शेपूची छान भाजी आणि ताक केल होत, जेवणाची चव वाढवायला लोणच आणि कांद्याचा घोलाना होताच. शेपूची भाजी म्हणजे निखिलची सगळ्यात न आवडती भाजी, आणि त्यातून भाकरी. हे दोन्ही असले कि निखीलचा दंगा ठरलेला. पण आज तो शांतपणे जेवत होता. नक्कीच आज काही तरी झाल होत. मी जरा चिडूनच निखील ला विचारल 'निखील, काय झाल, बोलत का नाहीस'. निखील खाली मान घालून म्हणाला, 'माझा सहामाही चा निकाल लागला आणि आज प्रगती पुस्तक मिळाल'. निखील दहावीत होता. मी विचारल 'मग काय किती टक्के मार्क पडले', 'जरा खडसावून विचार त्याला, बोर्डाच्या परीक्षेत काय रंग उधळणार आहे कोणास ठावूक' नेहा रागाने म्हणाली, आणि मोहन जोशींनी 'सा रे ग म प' मध्ये 'रंग बरसे' गाणे म्हणायला सुरुवात झाली. काय टायमिंग होत वा. मी, 'मग काय बाळ राजे, किती मार्क पडले?', माझा प्रश्न ऐकून गालातल्या गालात हसत निखील म्हणाला 'बाबा खूप कमी मार्क पडले'. मी नेहाकडे पाहून म्हणालो, 'अरे ठीक आहे किती मार्क पडले'? 'साठ टक्के' निखील. 'इतके कमी? शाळेत लक्ष देत नाहीस का?' खरोखर हा मुलगा बोर्डाच्या परीक्षेत काय करणार असेच मला वाटले. मी निखीलवर थोडा रागावलो होतो तेवढ्यात नेहा म्हणाली 'मार्क कमी ते कमी, त्यातून अक्षर इतक गचाळ कि पोरग काय लिहीतय ते पण समजत नाही. आज देशपांडे बाईनी मला त्याचा मराठीचा पेपर दाखवला आणि मला तो वाचता पण आला नाही. घरी येताना वर तोंड करून म्हणतो कसा आई लस्सी पिवूया, एवढा राग आला मला कि दिली एक ठेवून, तेव्हापासून हिरमुसले आहेत तुमचे राजे. सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे. इतके दिवस मी अभ्यास घेवून काही परिणाम झाला नाही, बघ आता तूच जरा त्याचा अभ्यास घेता येतो का, पोरग ऐंशी टक्क्यापर्यंत, जरा अवघडच वाटतंय मला पण तरीपण तो गेला तर त्याला सायन्स साईडला तरी घालता येईल.' नेहा खूप चिडून बोलत होती. निखील चुपचाप खाली मान घालून जेवत होता आणि अधूनमधून नेहाकडे आणि माझ्याकडे चोरट्या नजरेने बघत होता. तीच म्हणण एकदम बरोबर होत. आता एवढे कमी मार्क, तर बोर्डाच्या परीक्षेला काय? त्याने जरा सिरीयस होणे महत्वाचे होते आणि माझ्यावर आता त्याचा अभ्यास घ्यायची पाळी आली होती. निखिलची दहावी आणि त्याचा अभ्यास या तणावाखालीच जेवण संपवलं. Tv बंद करून निखील ला अभ्यासाला बसायला लावल, त्याची टेबलावर ठेवलेली मराठीची वही माझ्या नजरेस पडली. नेहा म्हणत होती ते अगदी खर होत, त्याच अक्षर खूपच गचाळ होत, कदाचित त्यांच्या शाळेमध्ये मुलांच्या अक्षराकडे कोणी कधी लक्षच दिले नव्हते. मी त्याला विचारले कि शाळेत कोणी शिक्षक तुमच्या अक्षराबद्दल विचारत नाही का रे. तो म्हणाला 'नाही, शाळेत आम्हाला कधी कोणी अक्षराबद्दल बोलत नाही, कोणी लक्ष पण देत नाहीत, पण तुम्ही मला आज का विचारताय? माझ अक्षर कायमच अस आहे, आणि मला आजपर्यंत कोणी बोलल नाही याबद्दल. आई पण मला अक्षरावरून खूप बोलत होती, बाबा, खरच माझ अक्षर इतक वाईट आहे का?'. मी त्याला विचारल कि तो लिहायला कुठला पेन वापरतो किंवा त्याच्या शाळेत कुठला पेन वापरायला लावतात? तो म्हणाला कि तो आणि बाकी मुले बॉलपेन वापरतात आणि त्याबद्दल त्यांना कोणी काहीहि बोलत नाही. ते ऐकून मी जरा चकित झालो, माझा हात माझ्या पाठीकडे गेला, उगाचच पाठीतून छोटी कळ आल्यासारखी वाटल आणि 'धाप' असा आवाज माझ्या कानात घुमू लागला. मंगळवार होता आणि सातवीच्या वर्गाचा सातवा तास ऑफ होता. सकाळी प्रार्थनेच्या वेळीच आम्हा सगळ्यांना ऑफ तासाबद्दल समजल होत, पण त्या ऑफ तासावर कोण येणार हे माहित नव्हत. आम्ही प्रार्थना करत होतो कि वर्गावर तास घ्यायला कोणीही याव पण जोशी सरांनी येवू नये. कोणी खडूने एकमेकांना मारत होते, कोणी कागदाचे बोळे करून फेकत होते, कोणी भरपूर आरडाओरडा करत होते, कोणी मुलींबरोबर भांडत होते, कोणी चाचा चौधरीची कॉमिक्स अगदी परीक्षेचा अभ्यास केल्यासारखे वाचत होते आणि सेक्रेटरी फळ्यावर दंगा करणाऱ्यांची नावे लिहित होता, एक ना धड बाराभर उद्योग. पलीकडच्या वर्गातले सर एक दोनदा येवून आम्हाला ओरडून गेले. पण त्यांची पाठ फिरल्यावर परत ये रे माझ्या मागल्या. नुसता दंगा चालू होता वर्गात, आणि त्याचवेळी जोशी सर वर्गात आले. अर्ध्या सेकंदात सगळे चिडीचूप. टाचणी पडली तरी तिचा आवाज येईल इतकी शांतता, जोशी सरांचा दराराच होता तसा. 'चला मराठीच्या वह्या काढा, आज आपण 'स्मशानातील सोने' धड्याचा सारांश लिहिणार आहोत' जोशी सर त्यांच्या करारी आवाजात म्हणाले. सर खेळायला जातो म्हणायची कोणाची हिम्मत नव्हती. आम्ही वह्या बाहेर काढल्या आणि सर सांगतील ते लिहायला सुरुवात केली. सरांना लिहायला सांगताना वर्गातून फिरायची सवय होती आणि त्याचवेळी ते सगळ्यांची अक्षरे तपासत असत. सर आमच्या ओळीतून फिरत होते, मी खाली मान घालून लिहित होतो, सर माझ्या मागे थांबले आणि जोरात मार बसला. काय होतय हे मला समजल हि नव्हत पण 'धाप' असा आवाज पूर्ण वर्गात घुमला होता आणि माझ्या पाठीतून जोरात कळ आली होती. मी जागेवर उभा राहिलो, सरांनी माझा बॉलपेन हातात घेवून फेकून दिला, आणि चिडून म्हणाले 'अमित, मी किती वेळा सांगितलं आहे कि शाई चा पेन वापरायचा, शाई च्या पेनाने हाताला चांगल वळण लागत, मग बॉलपेन का वापरतोस. हजार वेळा सांगून समजत नाही का, का अंगठे धरून उभारायच आहे?', मी दीनवाण्या सुरात म्हणालो, 'सर सॉरी सर, आज तुमचा तास नव्हता म्हणून शाई चा पेन आणला नाही'. 'अरे तास असू दे नाहीतर नसूदे, मी अनेकवेळा सांगितलं आहे ना कि कायम शाई चा पेन वापरायचा, मग डोक्यात शिरत नाही का? चल समोर जावून अंगठे धरून उभा रहा' सरांनी मला शिक्षा सुनावली होती. सगळा वर्ग माझ्याकडे बघत होता. मुली गालातल्या गालात हसत होत्या, मी परत सरांना दीनवाण्या सुरात म्हणालो 'सर सॉरी सर, परत अशी चूक नाही होणार'. 'पुढच्या वेळी अशी चूक झाली तर तू माझा मार खाशील, आता फक्त मी तुला अंगठे धरायला सांगतोय, जा पुढे जावून अंगठे धरून उभा रहा'. मी पुढे जावून अंगठे धरून उभारलो. सरांनी पुढे सांगायला सुरुवात केली आणि सगळी मुले चुपचाप सर सांगतील ते लिहून घेत होती. अर्धा तास मी अंगठे धरून उभा होतो, सगळ्या शरीराला मुंग्या आल्या होत्या. सर मला म्हणाले 'चल जा अमित, जागेवर जावून बस' आणि सगळ्या वर्गाला उद्धेशून म्हणाले 'आणि उद्यापासून रोज सगळ्यांच्या दप्तरात शाईचा पेन असलाच पाहिजे, नाहीतर पुढच्या वेळेपासून हातावर उभ्या पट्टीच्या १० छड्या बसतील. अमित, तू कुणाच्यातरी वहीतून आजचा अभ्यास उतरून काढ आणि पुढच्या वेळेपासून शाई चा पेन असलाच पाहिजे, समजल?' सर पुढे सांगायला लागले तोच तासाची घंटा वाजली. वाटलो सुटलो एकदाचा. खर तर माझा शाई चा पेन मी खेळत असताना तुटला होता. हे मी घरी सांगितले नव्हते आणि पूर्ण आठवडा जोशी सरांचा तास नाही म्हणून मला आनंद होता तर अचानक आज त्यांनी आमच्या वर्गावर हजेरी लावली होती. शाळा सुटल्यावर बाबा मला घरी न्यायला आले होते, आणि त्याचवेळी जोशी सर घरी जाता जाता बाबांना भेटले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर बाबांनी सरांना विचारले 'सर, काय म्हणतो तुमचा विद्यार्थी? वर्गात लक्ष देतो कि नाही?', सर म्हणाले, 'विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे, पण त्याच अक्षर जरा खराब आहे, त्याच्या अक्षराकडे तुम्ही जरा लक्ष दिले पाहिजे, अक्षर सुधरायच असेल तर तुम्ही त्याला शाई च्या पेनाने लिहायला भाग पाडले पाहिजे.' सरांनी ज्यावेळी अक्षराचा विषय काढला त्याचवेळी माझी पाचावर धारण बसली होती. सर आता बाबांना आजच्या शिक्षेबद्दल सांगणार आणि घरी गेल्यावर मला मार बसणार. आली का आता पंचाईत, 'हो सर, अक्षर सुधरायचा मी खूप प्रयत्न करेन, बाबा जावूया, खूप उशीर होईल, मला अजून घरी जावून उद्याचा अभ्यास करायचा आहे', बाबांचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरांनी विषय संपवण्यासाठी मी सरांना आणि बाबांना म्हणालो, तर बाबांनी मला दरडावून सांगितले कि दोन मोठे लोक बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये. मग काय मी एकदम चिडीचूप. मी खाली मान घालून उभा राहिलो, आणि जोशी सरांनी संध्याकाळचे सगळे रामायण बाबांना कथन केले. सरांनी बोलणे थांबवल्यावर मी सहज वर बघितले तर बाबा माझ्याकडे रागाने पाहत होते. त्यांची ती नजर पाहून मी परत खाली पाहणेच पसंद केले. बाबांनी सरांना सांगितले 'कि मी तर याला शाईचा पेन परवाच घेवून दिला आहे आणि तो त्याच्या दप्तरातच असतो'. बाबांनी मला याबद्दल सरांसमोर विचाराल आणि मला घाबरत घाबरत पेन मोडल आहे हे सांगाव लागल. बाबा चिडले होते आणि त्यांनी मी याच्या अक्षरावर लक्ष देतो असे सांगून सरांचा निरोप घेतला. बाबा माझ्यावर चिडले होते आणि मला वाटले कि घरी गेल्यावर मी खूप मार खाणार. पण झाले उलटेच, बाबा चिडले होते हे नक्की, पण त्यांनी मला मारले नाही. बाबांना मी वर्गात खोट बोलण्याचा आणि माझ्या हलगर्जीपणाचा खूप राग आला होता. घरी गेल्यावर ते माझ्याशी काही बोलले नाहीत, दुसर्या दिवशी आईने मला एक नवीन शाईचे पेन दिले, आणि सांगितले कि बाबा चिडले आहेत आणि जोपर्यंत त्यांचा राग शांत होत नाही तोपर्यंत ते तुझ्याबरोबर बोलणार नाहीत. पुढचे २-३ दिवस ते माझ्याबरोबर बोलले नाहीत. मी बऱ्याचदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ते कायम आईच्या मार्फत मला उत्तरे द्यायचे. चवथ्या दिवशी बाबा माझ्याबरोबर बोलले आणि मला म्हणाले 'पुढच्या महिन्याच्या हस्ताक्षर स्पर्धेत जर तुझा पहिल्या ३ मध्ये नंबर आला तर तुला मी 'हिरो' चा शाईचा पेन बक्षीस म्हणून देईन आणि माझा राग जाईल'. 'हिरो' चा पेन हे माझ स्वप्न होत, आणि बाबांनी माझ्यासमोर एक कठीण लक्ष्य ठेवले होते. माझ अक्षर खराब होत हे नक्की आणि ते एका महिन्यात सुधरायच म्हणजे खरोखर एक कठीण लक्ष्य होत, पण 'हिरो' चा पेन मिळवणे आणि बाबांचा राग घालवणे हे महत्वाचे होते. मी ठरवलं कि स्पर्धेत पहिल्या ३ मध्ये यायच. स्पर्धेमध्ये फक्त शाईच्या पेनचाच उपयोग करायचा होता. म्हणून शाईचा पेन वापरून मी रोज १५ मिनिटे हस्ताक्षरासाठी मराठी च्या पुस्तकातले उतारे लिहू लागलो. स्पर्धेचा दिवस जवळ येत होता आणि माझ शाईचा पेन वापरून अक्षर थोड थोड सुधारत होत. हस्ताक्षर स्पर्धेच्या दिवशी आम्हाला मराठीचे ३ लांब लांब उतारे दिले होते आणि १५ मिनिटात सगळ लिहायचं होत. जवळपास ५० मुलांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा झाली आणि स्पर्धेचे निकाल स्नेहसंमेलनावेळी जाहीर होणार होते पण त्याला अजून एक महिना अवकाश होता. दरम्यानच्या काळात मी स्नेहसंमेलनाच्या वेगवेळ्या कार्यक्रमांची तालीम करत होतो आणि हस्ताक्षर स्पर्धा थोडीफार विस्मृतीत जात होती आणि बाबा देखील मला थोडेफार आरामात दिसत होते, पण जसजसा स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येत होता तशी ती स्पर्धा माझ्या स्मृतीत परत येत होती आणि मला थोडी भीती वाटत होती. स्नेहसंमेलनाचा दिवस खूपच बिझी होता, मी एकंदरीत ४ कार्यक्रमात भाग घेतला होता. सगळे कार्यकम छान झाले होते, लोकांच्या भरपूर टाळ्या पडल्या होत्या. आई बाबा पण माझे कार्यक्रम बघायला आले होते आणि त्यांना ते आवडले होते, ते मुलाच काम बघून खुश दिसत होते. आणि तो क्षण आला. आता वेगवेगळ्या बऱ्याच स्पर्धांचे निकाल जाहीर होणार होते आणि त्यात एक होता हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल होता. ४-५ स्पर्धांचे निकाल जाहीर झाल्यावर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर होत होता. पहिला नंबर माझ्या वर्गातल्याच एका मुलीचा आला, मला वाटल दुसरा माझा असेल, तर दुसरा नंबर दहावीतल्या एका मुलाचा आला होता. आता मात्र मी देवाचा धावा करायला सुरुवात केली कि तिसरा नंबर माझा असावा म्हणून, तर तिसरा नंबर पण माझ्याच वर्गातल्या आणि एका मुलाचा आला. मी बाबांकडे पाहू शकत नव्हतो पण बाबा माझ्याकडे रागाने पाहत होते आणि मी खाली मान घालून गप्प बसलो होतो. डोक्यात बरेच विचार घोळत होते आणि आता परत बाबा चिडणार या विचाराने भीती वाटली. अचानक खांद्यावर बाबांचा हात पडला, मी त्यांच्याकडे पाहिले तर ते मला स्टेज वर जायला सांगत होते. मला काही समजलेच नाही आणि मी गोंधळलेल्या स्थितीतच स्टेजवर गेलो. हेड सरांनी हातात certificate दिले. मी certificate पाहिले तर मला हस्ताक्षरात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. खर सांगतो जरी पहिला, दुसरा किवा तिसरा नंबर मिळाला नसला तरी मला खूप आनंद झाला होता, पण तरीही बाबांनी सांगितल्याप्रमाणे माझा पहिल्या ३ मध्ये नंबर आला नव्हता, त्यामुळे मी जरा हिरमुसून बाबांकडे गेलो. आई आणि बाबा दोघेही टाळ्या वाजवून माझे अभिनंदन करत होते, पण 'हिरो' च पेन मला मिळणार नव्हत हे मात्र नक्की होत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या उशीपाशी मला काही तरी जाणवलं, तो एक छोटा बॉक्स होता. आई बाबा बाहेरच्या खोलीत चहा पीत होते, मी तो बॉक्स उघडून पाहिला तर त्या बॉक्स मध्ये नवीन 'हिरो' च पेन होत, आणि खाली एक चिट्टी होती. त्यात लिहील होत 'तुझ्या मेहनतीसाठी हे पेन तुला बक्षीस. नंबर नाही आला तर नाही पण हे पेन तुला नेहमी तुझ्या मेहनतीची आठवण करून देईल, बाबा'. मी उड्या मारत बाहेर गेलो, दोघे माझी वाट पाहत होते, मी कडकडून बाबांना मिठी मारली. एकदम झकास सकाळ होती ती. बाबा, बाबा तुम्ही लहानपणी कोणता पेन वापरायचा, बाबा, बाबा....निखील मला विचारत होता. मन किती वेगाने प्रवास करत, एका सेकंदात शाळेतली आठवण डोळ्यासमोरून गेली होती. मी निखील ला जरा थांब म्हणालो, उठलो, कपाट उघडल, बॉक्स समोरच होता आणि त्यात तो 'हिरो' चा पेन आणि पत्र अजूनही तसेच होते. तो पेन मी निखिलला दाखवला आणि त्याला ती आठवण सांगितली. सहज म्हणून मराठी एक दोन ओळी त्या पेनाने लिहिल्या, माझ मराठी अक्षर त्या स्पर्धेनंतर सुधारलेल आहे हे मला माहित होत पण सध्याची परकीय भाषा गिरवता गिरवता स्वकीय अक्षर तग धरून होत याचाच आनंद मला अधिक होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4788
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

सुंदर लिखाण. प्रसंग खुलवून सांगण्याची हातोटी आवडली आहे.

आयला... जर वेळीच आमच्या हस्ताक्षराकडे असं लक्ष देण्यात आलं असतं तर... जाउ दे, जर तर च्या गोष्टी आता काय कामाच्या... मित्रा, छान लिहीलस रे. अर्धवटराव

बाबा छान रंगवलाय, दोन पिढितल्या बापांमध्ये हे असं प्रसंग रिपिट होणं होत नाही, तोपर्यंत आपल्या बापाची किंमत कळत नाही, त्यामुळं जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोवरच त्याला प्रेम, माया, सगळं द्या, जेंव्हा तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत कदाचित वेळ निघुन गेलेली असेल.

लिखाण आवडले,... पण.मुलगा दहावी एवजी सहावीत हवा होता मग त्याला घ्यायला जाने, आइस्क्रीम वगॆरे चालुन गेले असते.

In reply to by जोशी 'ले'

धन्यवाद, आपला मुद्दा एकदम बरोबर आहे आणि मी तसे बदलही केले आहेत, परंतु एकदा पब्लिश केलेला लेख परत एडीट कसा करायचा याचा शोध मी लावत आहे. मी या संकेत्स्तलावर नवीन असल्याने मला माहित नाही त्याबद्दल क्षमस्व!!!!

अतिशय अतिशय सुंदर!! लेखनशैलीही आणि.... प्रसंगही आणि आठवणही. शेवट फार आवडला. एकदम नॉस्टॅल्जिक केलंत. मलाही हिरो चं पेन फार आवडायचं. माझ्याही बाबांनी मला बक्षिस म्हणून आणलं होतं ते.. फक्त ती वक्तृत्व स्पर्धा होती. :)

सुंदर... आणि या निमित्ताने स्मशानातील सोने या धड्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. एकदम नॉस्टॅल्जिक केलंत.

मस्त कथा, दोन्ही प्रसंग छान शैलीत सांगितलेत!! :)

मला ही टोपी आणि ३०/४० ला मिळणारे डिजिटल घड्याळ मिळाले होते.

सुंदर लिहिलय. माझ्याकडेपण शाईच्या पेनाची आठवण आहे. पण जरा वेगळी. माझ्या बाबांनी माझा संपूर्ण शाळेत पहिला नं. आला म्हणून एक पार्कर चं सुंदर पेन मला दिलं होतं. मी ते पहिल्या दिवशी चौथीचा वर्गात मोठ्या रुबाबात लिहिण्यासाठी बाहेर काढले आणि काय, हजेरी घेणार्या आमच्या सरांनी ते सरळ स्वतःसाठी घेउन टाकले. वर मला हे ही सांगितले की लहान मुलांनी इतकी भारी पेन्स वापरु नयेत. त्यावर मी म्हणालेले मला अजुन आठवतय की सर, हे माझं बक्षीस आहे. ते मला द्या. हव तर असंच दुसरं पेन माझ्या बाबांना मी तुम्हाला द्यायला सांगते. तेव्हा ते चक्क म्हणाले की मग तूच बाबांकडून दुसरे पेन घे. हे मला राहुदेत. :( आई गं ! अजुन विसरतच नाही मी ते. अर्थात हे खूपच अवांतर झालंय. पण शाईचा पेन असे वाचल्यावाचल्या हेच आठवले. :(

In reply to by सविता००१

कसले 'बाद' सर आहेत हे???? काही भावनांचा विचार वगैरे? टु बॅड. लेखाबद्दल बोलायचं तर खूपच छान लिहीलंय. शाळा सकाळी असल्यानं दुपारी आराम असायचा. आई ची आवराआवर झाल्यावर वामकुक्षी च्या आधी वर्तमानपत्र/ मासिक/ वाचनालयातलं पुस्तक काही तरी वाच 'च' असा आग्रह करायची. सॉलिड वैताग यायचा. पण आज कळतंय तेव्हा वाचायची सवय लागली आणि भस्म्या रोग लागल्यासारखं वाचायला लागलो. अक्कल आली असं नाही म्हणत पण आपल्याला काय कळत नाही हे तरी नक्कीच कळायला लागलंय. :)

मी तर अभियांतत्रीकीचे 'जर्नलस' पण शाईच्या (हिरो) पेननी लिहीलेत.मित्र हसायचेत पण माझ 'हीरो'प्रेम जरा जास्तच होतं. पण तरी आमचे अक्षर मात्र अपवादच राहीले. :-( असो विचार करतो आहे की दररोज १ पान मराठीचा कुठलाही उतारा लिहून काढावा. अमृत

लेख मनापासुन आवडला.... .दहाविच्या पेपरची आठवण झालि.

लेख खुपच छान ! एकदम खरे चित्रण वाटले. डोळ्यासमोर सर्व चित्र उभे राहिले.. खरेच मस्त. लिहित रहा... वाचत आहे...

मस्त लिहिलंय.. बाकी अक्षराबद्दल काही न बोललेलंच बरं.. सध्याचं माझं अक्षर जर गिजरेसरांनी बघितलं तर धरणीकंप होईल माझ्या पायांखाली!! (नॉस्टेल्जिक) राघव

माझा आय डी वाचून तो या गोष्टीशी रिलेटेड वाटेलं :) पण खरचं शाईपेन चे फारचं प्रस्थ होतं आणि अक्षर हि आणि छान यायचे शाईपेनाने. माझ्या या गोष्टीत मी उल्लेख हि केलाय तसा. http://www.misalpav.com/node/4348 -निखिल

अक्षर आणि शाईपेन यावरुन मलाही लहानपणीची आठवण झाली. दामलेबाई नावाच्या कडक शिस्तीच्या हेडमास्तरीण बाईंनी शाईचे पेन वापरुन सुद्धा माझे दिव्य अक्षर सुधारत नाही हे पाहिल्यानंतर त्यावेळी मिळणार्‍या सुलेखन स्लेट वर रोज शंभर वेळा अक्षरे गिरविण्याची शिक्षा दिली होती महिनाभर... तेव्हा भयंकर वाटलेल्या या शिक्षेमुळे माझे हस्ताक्षर कमालीचे सुधारले.

लिखाण उगाच लांबवल्या सारखे वाटले. कथा किंवा घटना सुरु व्हायला इतका उशीर आहे की तोवर वाचनाचा रस गेलेला असतो. दहावीत असलेल्या मुलाचा वडिल गोग्गोड पापा घेतात, तर आई खाडकन मुसकाडात मारते हे प्रसंग वाचताना जरा विचित्र वाटले. बाकी आमच्या ए.व्ही. काळेंच्या पेनासमोर हिरो पासून पार्करपर्यंत सगळे झक मारतात असे माझे मत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपला अभिप्राय एकदम बरोबर आहे आणि पुढील वेळेपासून मी जरूर खबरदारी घेईन. आपण अभिप्राय लिहिल्याबद्दल धन्यवाद

हे वाचून माझी सातवीतली एक आठवण जागी झाली... एकदा एका ऑफ तासाला आमचे राऊत सर (जमदग्नी) आमच्या वर्गावर आले आणि सर्वांना मराठीच्या वह्या उघडायला सांगून रागांमधून वह्या चेक करत फिरू लागले. फिरता फिरता काही मुलांना बाकावर उभे करत गेले. आम्हाला काही कळेचना काय चालले आहेत ते. पण बाकावर उभी असलेली सगळी मुळे हुषार आणि वर्गातील प्रस्थापित असल्यामुळे एक सुप्त आनंदही होत होता. पण जमदग्नी असा सुखासुखी आनंद मिळू देण्यार्‍यातले सर नव्हते. सर्वांच्या वह्या चेक अरून झाल्यावर बाकावर उभ्या असलेल्या मुलांना म्हणाले "तुम्हाला लाज वाटत नाही का?" च्यायला, कोणाला काहीच कळेना. "आपल्या ह्या खाली बसलेल्या वर्गबंधूंमध्ये फक्त आपलेच असे सुवाच्या अक्षर असल्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे." मग सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. बाकावर उभे असलेले खरे हिरो होते. आम्ही बसलेले सगळे नालायक होतो अक्षराच्या बाबतीत. मग सरांनी एक सुवाच्य अक्षराबद्दल एक लेक्चर देउन बाकावर उभ्या असलेला एकेकाला शुद्धलेखन लाईन मॉनेटर नेमले आणि आम्हा नालायकांना शुद्धलेखनासाठी वही करायला सांगून रोज एक परिच्छेद लिहायची सक्ती केली. 'च्यायची कटकट' असे वाटले होते त्यावेळी. पण महिन्याभरात त्याचा चांगला परिणाम दिसल्यावर सरांना मनोमन साष्टांग दंडवत घातला. (बघा ना, हा प्रतिसादही किती सुचाच्च आला आहे ;) ) - (अक्षर चांगले असणारा) सोकाजी

आपला अभिप्राय एकदम बरोबर आहे आणि पुढील वेळेपासून मी जरूर खबरदारी घेईन. आपण अभिप्राय लिहिल्याबद्दल धन्यवाद