Skip to main content

सामान्य !

सोमवार, 19/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी, उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी । सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'? चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती (मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती ! ) पाय पाहुनी निवडुन घेतो अंथरूण माझ्यापुरते बायकोस मी गजरा घेतो, सुख नाही मज यापरते । बिचकत जातो मी रस्त्याने, जिवात नसतो जीव कधी कधी स्वतःवर हसतो, रडतो, आणिक करतो कीव कधी । तरी उद्याची थोडी आशा माझ्या हृदयी मिणमिणते आणि देवळामधली घंटा माझ्या कानी किणकिणते । सामान्याला, जगण्या-मरण्यामधले अंतर- आयुष्य... उरते कोठे सामान्याच्या मरणानंतर आयुष्य? - चैतन्य
लेखनविषय:

वाचने 1356
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच फार छान!

वाह !! खूपच छान. कविता जमून आली आहे. केशवसुतांचे अश्याच भावार्थाचे हे कडवे आठवले. ' आम्ही नव्हतो अमुचे बाप, उगाच का मग पश्चाताप, आसवे न आणू नयनी , मरून जाऊ एक दिनी ' -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाह चैतन्य....... झकासच......... एकदम "मी मोर्चा नेला नाही" ची आठवण झाली........ :)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद हारुन, केशवसुतांच्या ओळी काय भन्नाट आहेत. इथे दिल्याबद्दल धन्यवाद :)

आवडली कविता असा सामान्य प्रतिसाद देऊन मोकळा होणार नाही. प्रत्येक ओळीमागील विचार सुरेख आहे. :)