✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

स
सोत्रि यांनी
गुरुवार, 03/08/2012 - 01:49  ·  लेख
लेख
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता. पण यथावकाश सर्व आळ्या, वाडे बिल्डरलॉबीने सिमेंटच्या जंगलात रूपांतरित करून टाकले. अनोळखी लोकांची संख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे शिव्या घालत फिरणे, बोंबाबोंब करणे हे बंद होऊन होळी ही फक्त रात्री दारू चढवून आपापसात गप्पा मारणे इतपतच उरली. एकदा डिप्लोमाला असताना माझा एक मित्र, शेखर देशमुख, थेट बदलापुराहून माझ्याकडे होळी साजरी करण्यासाठी आला होता. त्याला मी लहानपणीच्या होळीच्या खूप गप्पा हाणल्या असल्यामुळे त्यालाही जरा उत्सुकता होतीच आमच्या पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची. रात्री मग माझे आगाशीतले काही मित्र आणि शेखर असे मिळून व्हिस्कीचा खंबा घेऊन बसलो. त्यावेळी शिकाऊ उमेदवार असल्यामुळे भरपूर भ्रष्ट पद्धतीचेच पिणे होते ते. खंबा संपत आल्यावर सगळेच जण जरा मोकळे होऊन आपापला खरा रंग दाखवून पुड्या सोडू लागले. गप्पांच्या ओघात भांगेचा विषय निघाला. आमच्यापैकी कोणीच भांग घेतली नव्हती त्याआधी. शेखरला भांग ट्राय करायची इच्छा झाली. मला म्हणाला,"भोXXX, मी तुझा अतिथी आहे आणि अतिथी देवो भवं ह्या न्यायाने मला भांग हवीय, सोय कर." च्यायची त्याच्या, आधीच मर्कट तशात मद्य प्याले, तो एकटाच नाही हो, आम्ही सगळेच. मग रात्री त्या तसल्या अवस्थेत भांगेची व्यवस्था करायला आम्ही सगळेच 'हलेडुले' होऊन निघालो. माझा एक मारवाडी मित्र होता, त्यांच्या एरियात त्याचा मामा भांगेची सोय करतो अशी ऐकीव माहिती होती. मध्य रात्री त्याला गाठले. तो त्याच्या मामाकडे घेऊन गेला आणि खरोखरचं तिथे भांग घोटण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या मारवाडी मित्राने त्याच्या मामाला मला भांग हवी असे सांगितले. त्यानेही लगेच चान्स मारून घेतला, "सरचां मुलगा ना रे तू, तू पण हेतलाच काय? जय जलाराम बाप्पा". माझे वडील शाळेत सर होते आणि त्याने बहुदा माझ्या वडिलांच्या हातचा प्रसाद भरपूर खाल्ला असवा कारण त्या प्रसादाची परतफेड तो होळीचा प्रसाद, भांग, देऊन करीन म्हणाला. "शक्काळला येऊन घेऊन जा", असे म्हणून त्याने आम्हाला आश्वस्त केले. मीही लगेच जरा कॉलर टाईट करून शेखरकडे बघितले (पुढे कंडिशन कशी टाईट होणार आहे ह्याची अजिबात कल्पना त्यावेळी नव्हती). तो 'अतिथी देव' तृप्त चेहेर्‍याने माझ्याकडे बघत होता. ह्या शेखरचा माझ्या घरी खूप वट होता. PLCNA हा एक विषय मला समजावून सांगण्यासाठी ह्याआधी त्याचे माझ्या घरी बर्‍याच वेळा येणे झाले होते. थेट बदलापुरावरून आपल्या मुलाला अभ्यासात मदत करायला येतो म्हणून आईला त्याचे फार कौतुक होते. पण ते कार्ट कसलं बेणं आहे ह्याची तिला तोपर्यंत कल्पना नसल्यामुळे चक्क धूळवडीला घरी मटण वगैरे आणून खास त्याच्यासाठी पेश्शल तिखट मेनू बनवला होता. त्या जेवणाच्या तयारीची सोय करून आम्ही आमच्या पहिल्यावहिल्या भांगेच्या अनुभूतीसाठी कुच केले. मारवाडी मित्राच्या मामाकडे गेलो. तो आमची वाटच बघत होता. "ये ये साला लै टाइम लावला, मला वाटला येते का नाय", असे म्हणत त्याने आमचे स्वागत केले. मग हिरवट मेंदी रंगाचे, ओलसर लगद्याचे 2-3 छोटे-छोटे गोळे माझ्या हातात ठेवून बोलला, "लैच कडक माल हाय, कोण कोण घेते?". मग आमच्याकडे सगळ्यांकडे त्याने नीट बघून घेतले. "तुम्हीच घ्या, लहान पोरान्ला अजिबात द्यायचा नाय", असे बजावून आम्हाला जायला सांगितले. ते गोळे घेऊन निघालो तेव्हा सकाळचे दहा - साडे दहा झाले होते. जेवायला साधारण अजून दोनेक तास होते. भरपूर वेळ होता. एक चहाच्या टपरीवर जाऊन दुधाचे ग्लास मागवून ते गोळे दुधात मिक्स करून ते दूध आम्ही सर्वांनी संपवले. भांगेवर गोड खाल्ल्यावर आनंद आणखीन द्विगुणित होतो अशी ऐकीव माहिती होती. त्या माहितीचा हवाला धरून मग गोड खायचा सपाटा लावला. सर्वांत आधी अर्धा किलो जिलबी हाणली. मग कुल्फीवाल्याला पकडून 2-2 कुल्फ्या चापल्या. मग रस्त्यावर रंग उधळत फिरायला सुरुवात केली. मध्येच मिठाईच्या दुकानातून मसाला दूध,पेढे असला गोड माराही चालू होता. शेवटी एका पान टपरीवर मसालापान डब्बल गुलकंद घालून आणि ईक्लेयर चॉकलेट कातरून त्यात घालून खाल्ले. परत रंगांची उधळण करत रस्त्यावर निघालो. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा जोर जाणवू लागला होता. आता घरी जायचे मटण हाणून मस्त ताणून द्यायची असा विचार करतंच होतो.... अचानक मला सर्व आवाज एकदम हळू हळू ऐकू येऊ लागले. पायाला जरा मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले. पायाला काय झाले वाटते न वाटते तोच एकदम हलकं हलकं वाटायला लागले. "च्यायला चढली की काय रे", असे शेखरला म्हणालो. तर तो म्हणाला "चल लवकर जाऊन अंघोळ करून जेवूयात. मी जातो, मला बदलापुराला पोहोचायला उशीर होईल." मग लगेच आम्ही घरी गेलो. मी अंघोळ करून कपडे बदलेपर्यंत मला सहजावस्था आली. शेखर अंघोळ करून बाहेर आला तोच लालबुंद होऊन. त्याला बरीच चढली होती. "मित्रा, माझी लागली आहे, मला काहीच कळत नाहीयेय काय करायचे ते. काकूंना तोंड दाखवायची सोय राहिली नाही. मला खूप काहीतरी होतेय. मला डॉक्टरांकडे घेऊन चल." हे ऐकून माझ्या एकदम कपाळातच गेल्या. हे काय त्रांगडं होऊन बसलं. मी त्याला म्हणालो, "जेवून घेऊया रे, जेवल्यावर जरा बरं वाटेल." पण तो पार ऐकण्याच्या पलीकडे पोहोचला होता. तो पर्यंत आईला संशय आलाच काहीतरी गडबड झाल्याचा. लगेच मग भावाला सांगून शेखरला बाहेर काढले आणि सायकलवर डबल सीट घेऊन त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आमच्याकडे बघूनच त्याला काय झाले असावे ते कळले. त्याने शेखरला टेबलवर झोपवून चेक केले आणि विचारले "काय घेतले?" "भांग, डॉक्टर.", मी. "नक्की का? त्यात काय मिक्स केले होते?", डॉक्टर. "नाही डॉक्टर, भांगच होती", मी. "कुठून आणली होती", डॉक्टरने संशयितपणे. मग मी डॉक्टर आणि वकिलापासून काहीही लपवू नये म्हणून त्या मारवाड्याचे नाव आणि त्या एरियाचे नाव सांगून मोकळा झालो. "रात्री काय घेतले होते", डॉक्टर. "व्हिस्की", मी. "किती घेतली होती", डॉक्टर. आता माझी फाटली, मी काहीच बोलत नाही हे पाहून त्याने काय ओळखायचे ते ओळखलं. "भोसडीच्यांनो, झेपत नाहीतर हे असले पालथे धंदे कशाला करता रे. त्या भांगेत अफू मिक्स असणार. डी हायड्रेशन झाले आहे. लवकर घरी जाऊन भरपूर जेवा. ग्लूकोज नाहीयेय शरीरात. असच राहिले तर सलाईन चढवावे लागेल. आणि ह्याला (शेखरला) काय झाले आहे, असा का डिप्रेस झालाय हा. ह्याला आधी जेवायला घाला", डॉक्टर. ते ऐकून मलाही अचानक भयंकर असे काहीतरी वाटू लागले,एकदम आजारी पडल्यासारखे झाले. त्या डॉक्टरला पैसे देऊन बाहेर आलो. तर शेखर एकदम चालू झाला, "मी नालायक आहे, तुझी आई एवढी माउली, माझ्यासाठी मटणाचे जेवण बनवले आणि मी भिकारचोट काय करून बसलो. आता कसे तोंड दाखवू त्या माउलीला". ते 'माउली' तो असे काही म्हणत होता की मला त्याही अवस्थेत खो खो हसायला येत होते. आता ते हसू त्या अफूमिश्रित भांगेचा परिणाम होता की काय ते त्या आळंदीच्या खरोखरीच्या माउलीलाच ठाऊक. "ए, मला घरी जेवायला यायचे नाही. मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल, सलाईन लावा मला नाहीतर मी मरीन",शेखर. त्याचा तो अवतार बघून मी आणि माझा भाऊही घाबरलो. शेखर तर काहीही ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हता. मग आमची वरात निघाली जवळच्या हॉस्पिटलमध्ये... हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर धूळवड करायला निघून गेले होते. नर्स आतमध्ये जेवत होत्या. एका नर्सला बोलावून मघाच्या डॉक्टरांचा रेफरंस देऊन सांगितले की शेखरला सलाईन लावायचे आहे. ती भडकलीच, असे कोणालाही उगाच सलाईन लावत नाही असे म्हणाली. आता आली का पंचाईत. मग तिला त्या डॉक्टरांशी फोनवर बोलायला सांगितले. शेखरने "मी नालायक आहे, माउली मला माफ कर" असा लावलेला घोष पाहून तिलाही काय झाले असावे ह्याचा अंदाज आला. तिने डॉक्टरांना फोन केला. मग आम्हाला बसायला सांगून ती जेवायला परत गेली. इकडे शेखरचे, "मी नालायक आहे, खाशील भांग परत" हे स्वगत चालूच होते. तेवढ्यात त्याच्या कानामागून एक घामाची धार एकदम आली आणि माझे अवसानच गळाले.भयंकर घाबरलो मी. "नssssर्स", असे खच्चून ओरडलो मी. 2-3 नर्स एकदम पळत आल्या. त्यांनी लगेच शेखरला एक बेडवर झोपवून सलाईन चालू केले. मी बाहेरच थांबलो. आता मलाही ताण असह्य झाला होता. मी कॉरिडॉरमध्ये येरझारा घालू लागलो. एक नर्स मला खेकसून म्हणाली, "बस तिकडे बाकड्यावर". मी हो म्हणालो आणि परत येरझारा घालू लागलो. असे 2-3 वेळा झाल्यावर माझी पण शेखरच्या बाजूच्या खाटेवर रवानगी झाली आणि दंडावर सलाईन चढले. (हे सगळे मला नंतर भावाने सांगितलं, अदरवाइज माझ्या लक्षात राहण्याचे काहीच कारण नव्हते ;) ) सलाईन संपल्यावर आम्ही दोघेही जरा ताळ्यावर आलो. "मला डायरेक्ट स्टेशनवर सोड, काकूंच्या समोर जायची माझी हिंमत नाही", शेखर. 'माउली'वरून पुन्हा 'काकू' वर आल्याने शेखरही आता बराच हुशार झाला हे माझ्या लगेच लक्षात आले (तसा हुशार आहेच मी, लहानपणापासून). पण आईची सक्त ताकित होती,"घरी येऊन जेवायचे". मग नाईलाज असल्याने शेखरला घरी यावेच लागले. घरी पोहोचल्यावर त्याने मानही वर केली नाही. जे काही पानात वाढले ते गुपचूप खाल्ले."आता नीट घरी जाऊ शकशील का की उद्या जातोस?",आई. त्याच्या पोटात गोळाच आला. मान खाली तशीच ठेवून तो म्हणाला, "नाही आता बरे आहे, घरी जाईन." "ठीक आहे, घरी पोहोचल्यावर फोन कर.", आई. लगेच त्याचे पाऊल घराबाहेर पडले. माझा भाऊ त्याला स्टेशनवर सोडायला गेला. मला आई आणि बाबांच्या तावडीत सोडून. ते गेल्यावर माझे काय झाले त्याच्यावर एक नवीनं लेख पुन्हा केव्हातरी :) त्यानंतर पुन्हा कधी भांग खायची छाती झाली नाही. आत्ताही हे सर्व लिहिताना अंगावर काटा आला आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6165 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

हा हा हा खत्रा अनुभव आहे. हे

पाषाणभेद
गुरुवार, 03/08/2012 - 02:16 नवीन
हा हा हा खत्रा अनुभव आहे. हे जे लिहीले आहे ते केवळ ऐकीव किंवा अंधूक आठवते ते लिहीले आहे असे जाणवते. प्रत्यक्षात वारू अजून उधळलेले असावेत असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

=))

सोत्रि
गुरुवार, 03/08/2012 - 09:18 नवीन
प्रत्यक्षात वारू अजून उधळलेले असावेत असा अंदाज आहे.
पाभे, हो तुमचा अंदाज खरा आहे ! :D अ‍ॅक्चुली हा प्रसंग कायमचा विसरून जाण्यासाठी खुप प्रयत्न केले. :) पण थोड्या आठवणी काही विसरल्या जात नाही. त्याच जशा आठवल्या तशा लिहील्या. - (भांग म्हटले की 'भाग'णारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

काहीतरी काय

निशदे
Sat, 03/10/2012 - 00:05 नवीन
<<अ‍ॅक्चुली हा प्रसंग कायमचा विसरून जाण्यासाठी खुप प्रयत्न केले >> अहो सोत्रि, असला वेडेपणा करू नका........ असे प्रसंग प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायचे असतात.......विसरू नका आजिबात..... बाकी भन्नाट लिहिले आहे. मुख्य म्हणजे लक्षात बरेच राहिले आहे. आमचा आधी मेंदू गारद होत असल्यामुळे आमच्या लक्षात राहिले नाही कधी काही.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मग काय उद्या मिपावर भांगेचा

पिंगू
गुरुवार, 03/08/2012 - 04:07 नवीन
मग काय उद्या मिपावर भांगेचा रंग चढणार... ;) - पिंगू
  • Log in or register to post comments

बापरे. हा प्रकार भयानक

रेवती
गुरुवार, 03/08/2012 - 04:42 नवीन
बापरे. हा प्रकार भयानक दिसतोय. फक्त भांगेमुळे काय होते ते समजले नाहीच तुम्हाला. अफूमुळे तंतरली.
  • Log in or register to post comments

अब्बाब्बाबा..! काय खत्री

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/10/2012 - 01:33 नवीन
अब्बाब्बाबा..! काय खत्री अणुभव म्हणायचा हो ह्यो...! आमचा या भांगेशी येकदाच -पाला-पडलावता...प्रसंग आमच्या एका पाठशाळेतला (आम्च्यात भांग हे अजुनही धार्मिक व्यसन समजतात...बम..भोले.. ;-) ) मी नेहमी प्रमाणे अध्ययन संपल्यावर व्यायामासाठी म्हणुन गच्चीवर जाण्यास निघालो,तर मला गच्चीवर असलेल्या अडगळीच्या खोलित काहीतरी पातेल्यात उकळत असलेले दिसले.मला तर काहीच अंदाज आला नव्हता.आमच्यतल्या तिनचार तयार/मातब्बर इद्यार्थांनी मला, ''ते'' खोकल्याचे औषध बनवत आहेत असे सांगितले.व्यायाम झाल्यावर,''अरे घे थोडेस्से,खोकला वर्षभर होणार नाही...आज पिलास तर'' असे सांगुन ते हिरवट द्रव्य चांगले ग्लासभर प्यायला दिले.नंतर मी खालच्या मजल्यावर गेलो असता.अर्ध्या तासानी तेच तिघे/चौघेजण पिस्ता आईसक्रीम+आटीव दूध+ उरलेला वाटलेला पाला असं एकत्र करुन पित होते.मी हे अता काय..? असं विचारल्यावर,,,या औषधानी जास्त फायदा होतो असे सांगुन तेही मला दिड ग्लास पाजले...आणी का कोण जाणे तो पर्यंत मला ते गोड असल्यामुळे अजुन हवेहवेसे वाटू लागलेवते. नंतर मी जेवण झाल्यावर गच्चीवर झोपायला जाईपर्यंत सगळे जण माझ्याकडे पाहात ''कित्ती बावळट आहे हा'' अश्या नजरेनी पहात होते.तो पर्यंत त्या भांगाबाईचा असर पण सुरु झालावता.मला सतरंजी घालताना ती बरीच लांब असल्याचे दिसले.खालच्या बाजुने जाऊन ओढली तर,वरुन लांब वाटायची. मी भयंकर भंजाळलो.तेवढ्यात मला गच्चीच्या जिन्याशी कुजबुज ऐकू आली,,''आज गच्चीवर कुणी झोपायला लवकर जाऊ नका रे,दिवट्याला(दिवेकरला) भांग पाजलिये...मग मात्र मी पुरता हदरलो.आणी तात्काळ झोपी गेलो..पण नंतर मला ,गच्चीच्या भिंती जवळ/जवळ येताहेत,जिन्याचा खांब ऊंच होतोय असे भास व्हायला लागले. मी डोक्यावरुन पांघरुण घेऊन झोपायचा प्रयत्न केला.पण कोणीतरी माझ्या कानाशी दबक्या आवाजात...''ए....पराग...'' अशी हाक मारल्याचा भास होऊ लागला,पांघरुण काढुन बघितलं..तर आजुबाजुला कोणीच नाही असं अर्धा तास होत होतं.मग शेवटी मी पटकन जिन्याजवळ गेलो...तिथे तर कुणीही नव्हतं.मग माझी साफ तंतरली.मी डोक्यावर उशी घेऊन झोप लागेपर्यंत राम-रक्षा म्हणत होतो...साधारण तिसर्‍या आवर्तनाला मी कसाबसा झोपेला टेकलो. सकाळी आम्च्या अध्यापक-गुरुजींना या दुष्कृत्याची खबर लागलीच होती...त्यांनी या तिघाचौघांना महिनाभर माझे कपडे धुवायची शिक्षा दिली...त्यामुळे मी काहिसा सुखावलो ही... अता त्या तिघांपैकी एक जण पुण्यातच आमच्या धंद्यात आहे.५वर्षापुर्वी त्याच्या लग्नाच्या पहिल्या रातीला मी त्याला चांगली कडक गोळी पिस्ता मस्तानीतुन एका दुसर्‍याच्या हातुन खिलवली...आणी त्याही गाढवाने तशीच अजुन एक मस्तानी मागुन घेतली,आणी आंम्ही अजुन १गोळी टाकुन तीही पुरवली...पण नंतर दुसर्‍या दिवशी तो ज्याच्याकडुन मस्तानी आणली त्या दुकानाचा पत्ता काय..? असं चिडुन विचारत होता...मी मात्र मनातल्या मनात गडाबडा लोळुन हसत होतो.... त्याला म्हणे भांगेच्या नशेत रिपिटेशनचा परिणाम आधी येतो... काय झालं असेल त्या रात्री त्या शयनगृहाचं ते तो भोलेनाथच जाणे ;-) बंम बोले....भांगा बाई की जय हो... Image removed.
  • Log in or register to post comments

छानच लिहिले आहे.

तर्री
गुरुवार, 03/08/2012 - 09:31 नवीन
सोत्री भावना समजल्या आपल्या !पण समजले नाही ते असे की "भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम "... ...म्हणजे भांग जगातून गायब झाली की काय ? आफतच आली म्हणा की ही !
  • Log in or register to post comments

खतरनाक!

पैसा
गुरुवार, 03/08/2012 - 10:18 नवीन
बहुधा तुमच्या घरच्यानीही नक्की काय काय झालं हे तुम्हाला सांगितलं नसावं!
  • Log in or register to post comments

मिश्रण

तिमा
गुरुवार, 03/08/2012 - 10:35 नवीन
भांगेत अफू, तांब्याचा पैसा उगाळणे हे घातक प्रकार आहेत. पण जर नुसती भांग प्रमाणात घेतली तर त्याची नशा काही औरच असते. हे प्रमाण अर्थातच प्रत्येकाच्या बॉडी वेट वर अवलंबून असते. भांग चढल्यावर माणूस एकच गोष्ट परत परत करत रहातो.
  • Log in or register to post comments

अफुच्या शेतात होळी खेळाविशी

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 03/08/2012 - 14:04 नवीन
अफुच्या शेतात होळी खेळाविशी वाटते
  • Log in or register to post comments

पान टपरीवर मसालापान डब्बल

विजुभाऊ
गुरुवार, 03/08/2012 - 14:05 नवीन
पान टपरीवर मसालापान डब्बल गुलकंद घालून आणि ईक्लेयर चॉकलेट कातरून त्यात घालून खाल्ले. अरेअरेअरेअरेअरे....काय वेळ आली ही..................
  • Log in or register to post comments

धन्य आहात सोत्रि.. अहो आधी

गवि
गुरुवार, 03/08/2012 - 14:11 नवीन
धन्य आहात सोत्रि.. अहो आधी सौम्य तरी ट्रायवायचेत.. एकावर एक कायकाय घेतलेत रे बाबा.. असो... बादवे भांगेची गोळी पानशॉपमधे मिळते असे म्हणतात. त्याविषयी काही शंका.. - ही गोळी सौम्य असते की तीव्र? - तिला काय म्हणतात ? बरणीकडे बोट दाखवून लहानपणी दूधगोळी किंवा लाल गोळी (पाच पैशास तीन) मागितल्याची लास्ट आठवण आहे.. तदनंतर पानवाल्या गादीकडे नुसते पाहिले आहे बाकी खरेदीसाठी विशेष संबंध नाही.. - मनुक्का म्हणजेच ती गोळी का? मी अशा वर्णनाच्या गोळ्या पाहिल्या आहेत.. मला आधी मनुका ऊर्फ ड्रायफ्रुट वाटले होते.. पण कोणीतरी तिच्यातही भांग असते म्हणून पूर्वी सांगितलं होतं. -अडाणी गवि
  • Log in or register to post comments

भांगेचा गोळा साधारण खूप

किचेन
गुरुवार, 03/08/2012 - 23:38 नवीन
भांगेचा गोळा साधारण खूप घट्ट पुदिन्याच्या चटणीसारखा दिसतो.साधारण २ इंच लांबी आणि १ इंच डाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कधी घेतली नाही भांगेची गोळी,

सुहास झेले
Fri, 03/09/2012 - 00:10 नवीन
कधी घेतली नाही भांगेची गोळी, पण २ रुपयाला एक गोळी मिळायची, हल्ली भाव ५ रुपये झाला आहे असे कळते. ती गोळी एकदम लाईट असते, आणि दोन-तीन गोळ्या घेतल्यावर नशा चढते. ही सगळी माहिती ऐकीव आहे, कृपया खात्री केल्याशिवाय गोळ्या घेऊ नका.... ;) बाकी सोत्रि अनुभव एकदम जबरा... कल्पना करू शकतो त्यावेळी तुमची काय अवस्था झाली असेल ते :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अफु मिश्रीत भांग + व्हिस्की

गणपा
गुरुवार, 03/08/2012 - 14:42 नवीन
अफु मिश्रीत भांग + व्हिस्की बरीच रिस्की दिसते. :) तळीरामाची आठवण झाल्या वाचुन राहिली नाही.
  • Log in or register to post comments

सोत्रि!! माऊली!!! आपण धन्य

यकु
Fri, 03/09/2012 - 13:20 नवीन
सोत्रि!! माऊली!!! आपण धन्य आहात! ;-) धमाल किस्सा. बादवे भांगेची गोळी पानशॉपमधे मिळते असे म्हणतात. त्याविषयी काही शंका..
- ही गोळी सौम्य असते की तीव्र?
ही गो़ळी सौम्यच असते पण औट करायला एक पुरेशी होते. निंबू, सेंधा नमक, बडी इलायची युक्त आणि क्षुधावर्धक, बैध की सलाह से खायें वगैरे गुणावगुणांचे वर्णन असते रॅपरवर.
- तिला काय म्हणतात ? बरणीकडे बोट दाखवून लहानपणी दूधगोळी किंवा लाल गोळी (पाच पैशास तीन) मागितल्याची लास्ट आठवण आहे.. तदनंतर पानवाल्या गादीकडे नुसते पाहिले आहे बाकी खरेदीसाठी विशेष संबंध नाही..
- तिला मन्नुकाच म्हणतात. पहलीबार खा रहे हो तो सावधानी से लेना वगैरे प्रेमळ सल्ल्यासह मी घेतली होती तेव्हा सहज दिली गेली होती. बाकी कच्ची भांग मिक्सरमधून काढून ती उकळली जात असताना ओंकारेश्वरी पाहिली होती. उकळून थंड झाली की घोटून तिच्या गोळ्या करतात. या गोळ्या प्रभावाच्या दृष्टीनं तीव्र असाव्यात. त्यांचा मात्र अनुभव नाही.
मनुक्का म्हणजेच ती गोळी का? मी अशा वर्णनाच्या गोळ्या पाहिल्या आहेत.. मला आधी मनुका ऊर्फ ड्रायफ्रुट वाटले होते.. पण कोणीतरी तिच्यातही भांग असते म्हणून पूर्वी सांगितलं होतं.
तीच ती मनुका.
  • Log in or register to post comments

सोत्रि साहेब, लेख उत्तम पण शक्यतो शिव्या लिहु नये लेखात.

निश
Fri, 03/09/2012 - 17:02 नवीन
सोत्रि साहेब, लेख उत्तम पण शक्यतो शिव्या लिहु नये लेखात. माफ करा मि अस म्हणालो म्हणुन पण ह्य लेखात अवाचनिय शब्द आला आहे म्हणुन म्हटल. चांगल्या लेखकाच पहिल भान हे असाव कि आपण जे काहि लिहित असतो ते इतर लोक वाचणार असतात. त्यात लहान मुलांपासुन म्हातार्‍या लोकांपर्यत सगळे असतात . म्हणुन लेखकाला हे भान असाव कि तो काय लिहित आहे. मि तुमचे लेख आवडिने वाचतो. म्हणुन लिहिले आहे. लिहिताना शब्ब्द निवड अचुक असावि.
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रचेतस
Fri, 03/09/2012 - 17:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

निश, तुमच्या मताचा आणि

सोत्रि
Fri, 03/09/2012 - 23:16 नवीन
निश, तुमच्या मताचा आणि मनापासून दिलेल्या प्रतिसादाचा पूर्ण आदर ठेवून... लेख जर नीट वाचला तर असे लक्षात येईल की भांग़ेच्या अमलाखाली येण्याआधि अवाचनिय शब्दासाठी XXX असे मस्किंग आहे पण पुढे भांगेचा अंमल चढला आणि जीभ लडखळली :) असो जोक्स अपार्ट, माझा पिंड सुशिच्या वाचनावर पोसलेला आहे, म्हणजे वाचायची गोडी मला सुशिमुळे लागली. तो माझे गुरू, दैवत आहे. आपल्या संदीप चित्रेंच्या दुनियादारी ह्या लेखातला एक परिच्छेद देउन माझे मत मांडायचा प्रयत्न करतो.
कॉलेजच्या भाषेचा एक छान लहेजा कादंबरीला आहे, योग्य तिथे आणि योग्य त्या शब्दांसकट !! दुर्दैवानं आता सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत पण त्यांचा वाचक-चाहता म्हणून मी अकरावीत असताना त्यांना पाठवलेल्या पहिल्याच पत्राच्या उत्तरात त्यांचं वाक्य होतं ,”दुनियादारी मात्र जरूर वाच.” त्यानंतर वयाचं अंतर पार करून, त्यांच्याशी छान स्नेह जुळला होता. मला आठवतंय एकदा त्यांच्या घरीच त्यांना विचारलं होतं की ‘दुनियादारी’त इतक्या सहजपणे शिव्या वगैरे का? ते म्हणाले होते, “एक तर कॉलेजमधली तुझ्याच आसपासची भाषा बघ, तुला वाक्यांगणिक सहज शिव्या सापडतील. दुसरं म्हणजे मारामारीचा वगैरे प्रसंग वाचताना,” अरे नालायका, मूर्खा ! थांब जरा तुझ्याकडे बघून घेईन” कसं वाटेल? तिथे शिव्यांशिवाय intensity येणारच नाही !! तसंच कॉलेजची पोरं, “काय वेडा किंवा काय बावळट आहेस का तू?” वगैरे म्हणतात का? नाही! सरळ “काय xx झाला काय?”, असंच म्हणतात ना?” येस बॉस, मानलं !
ह्याउप्पर अधिक चर्चा व्यनितून करुयात. - (सुशिप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

मिहि सुशि प्रेमि व पुल प्रेमि अथवा पंखा आहे दोघांचाहि.

निश
Sat, 03/10/2012 - 10:55 नवीन
मिहि सुशि प्रेमि व पुल प्रेमि अथवा पंखा आहे दोघांचाहि प्रत्येक पुस्तक अन पुस्तक वाचल आहे. दोघांचहि. पण जास्त वाचन हे पु लं च झाल असल्यामुळे तस मला कदाचित वाटल असेल. समस्त युवा पिढिला व त्या आधिच्या पिढिलाहि सुशिंचि मोहिनि आहेच. पण तरिहि एक नक्कि कि त्यांच्या लिहिण्याच्या बेदधडक पणा मुळे ते समस्त जना पर्यंत पोहोचु शकले नाहित. दुनियादारि चि मि पारायणे मि कॉलेज मधे असताना केलि आहेत. पण ते पुस्तक मि मला जेव्हा मुल होइल तेव्हा त्याला लहान वयात नक्कि नाहि देउ शकत. तो जेव्हा कॉलेजला जाइल तेव्हाच ते त्याला देउ शकिन. आज हि आपण टिव्हि वर एखादा शिव्या असलेला सिनेमा लागला असेल तर तो आईवडील व मुलां बरोबर नाहि बघु शकत. तसच काहिस हे. अजुन एक, भालचंद्र नेमाडे साहेबांचि कोसला हि कादंबरि हि जरुर वाचा. सध्या मि ति वाचतो आहे. मला आवडलि म्हणुन म्हटल सागांव. अजुन तुमच्या काहि आवडिची पुस्तक असतिल तर जरुर सांगा. नक्कि वाचिन मी. सुशि व पुल प्रेमि निशांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

निश.. तुमचे म्हणणे पटते

गवि
Sat, 03/10/2012 - 12:39 नवीन
निश.. तुमचे म्हणणे पटते हो.. पण इथे सदस्य होण्यासाठी १८ वर्षे वय असणे अर्थात प्रौढ असणे आवश्यक असावे. चुभूदेघे. ऐला. अशा दृष्टीने विचार केला नाही.. तसं तर माझ्या ब्राऊ बीपीओ वगैरे कथा भकारांनी भरलेल्याच म्हणायला हव्या. हे राम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

गवि साहेब बरोबर आहे तुमच

निश
Sat, 03/10/2012 - 16:43 नवीन
गवि साहेब बरोबर आहे मग इतर काहि लेखकांच्या लेखाना विरोध का केला जातो एथे ते हि प्रौढ लोकांकरताच लिहितात ना. इथे सदस्य होण्यासाठी १८ वर्षे वय असणे अर्थात प्रौढ असणे आवश्यक असावे. चुभूदेघे. चुभूदेघे. निश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

निश साहेब नमस्कार! माहिति

किचेन
Sun, 03/11/2012 - 19:07 नवीन
निश साहेब नमस्कार! जपा निरागसता सप्ताहात आप्ले स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

झिंगाट आहे एकदम

फास्ट पुणेकर
Sat, 03/10/2012 - 14:31 नवीन
असेच नवे नवे प्रयोग करण्यात जी मजा आहे त्यालाच जीवन असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा