Skip to main content

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/12/2010 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी कोणी म्हणेल, "आ गाय मुझे मार" असा हा उद्योग आहे. पण रोज मरे त्याला कोण रडे? मेलेले कोंबडे आगीला भीत नसते. तेव्हा मी प्रथम आगीत उडी घेतो! १) तोंडात तीळ न भिजणे. सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही. फोनवर नुसता निरोप कधीच सांगणार नाहीत. एकदा फोन हातात घेतला, की दोन तासांची निच्छिती! २) उड उड ग चिउ. कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच. ३) सासरच्या वाटे कुचुकुचु काटे. ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच! ४) विचारावे जनात, लपवावे मनात. आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही. एकदा मी पद्धतशीर प्रयोगच करून पाहिला होता. * "अग ती चंदेरी नेस ना" - "छे ती नको, तशीच साडी, ती अमकी दोन महिन्यांपुर्वी तमक्याकडे घालून आली होती." * "साडी नको, ड्रेसच घाल" - "तुम्हाला काय, पारंपारीक कार्यक्रमात अशी गेले, तर लोक नावे मला ठेवतील!" * "तूच ठरव." - "तुम्हाला माझ्यात इंटरेस्टच उरला नाहीये." ५) पडले तरी नाक वर. आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत? ६) वड्याचे तेल वांग्यावर. कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात. ७) काय माझ्या मनात? ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात. ८) आरशा सांग कशी दिसते मी? कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच. ९) एक आणि एक साडेअकरा. स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....? १०) दुरीतांचे तिमीर जावो. स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा. तुमच्या मते, तुमच्या डोक्यात सर्वाधीक तिडीक उठवणाऱ्या अशा कोणत्या दहा सवयी बायकांना असतात? हा धागा फ़क्त पुरुषांसाठी नाही. बायकांनी देखील जरूर सांगावे- त्यांच्या मते अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या नवऱ्यांना सर्वाधिक छळण्यात यशस्वी होतात? (खरं तर बायकांकडून ही माहिती मिळाली तर हवीच आहे.)

वाचने 27767
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

In reply to by योगप्रभू

आपण प्रभू आहात हे सिध्द आणि योगीही आहात हे देखील सिध्द करता आहात. :) >>यानंतर मग 'थांबला तो संपला' या वाक्याची नक्की प्रचिती येते. आयच्च्यान्! लै जोरात आवडलं हे! शप्पथ.
यांची एखादी जुनी मैत्रिण वाटेत भेटली, की कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उगाळत बसायच्या आणि रस्त्यात तासभर गप्पा मारायच्या. नवरे आपले इकडे तिकडे बघत उभे
रोखून बघत रहायचं...मैत्रिणीकडं. न्याहाळायचं..बायकोला समजेल असं. आणि नंतर "ही ती तीच ना गं? बरीच वेगळी दिसतेय ह्यावेळी.." वगैरे काहीतरी फडतूस बोलायचं. सख्ख्या बायकोला तिच्या नवर्‍यानं जरी आज तू वेगळी दिसतेयस असं म्हणलं तरी लग्गेच विश्वास बसतो, तिथं परक्या स्त्रीबद्दल काय अविश्वास दाखवणार? ;)
पण तेच नवरा त्याच्या मित्राशी गप्पा मारत उभा राहिला, की पाच मिनिटातच पोरं हात खेचायला लागतात. 'बाबा! चल ना घरी लवकर. मला घाईची लागलीय.' बहुतेक बाबा लोकांना या प्रकाराचा कधीच संशय येत नाही. पण ही बायकांच्या जातीची खूप जुनी युक्ती आहे.
"एऽऽ..ह्याला/हिला/ह्यांना घेऊन तू घरी जा गं. मी ह्याच्यासोबत जरा जाऊन येतो.".."चल रे" असं म्हणून डायरेक्ट चालू लागायचं ;) नंतर घरी गेल्यावर काय होईल तो होईल हंगामा! अरे....मेलेलं कोंबडं काय अगीला भितं का? :D >>किमान शब्दात कमाल पाणऊतारा करण्याची कला यांना जन्मजात साध्य असते. ह्याला पर्याय नाय बा. आपण सोईस्कर बहिरे होणं हेच बरं.

In reply to by धमाल मुलगा

बायकोने पुन्हा कधीही आपल्याला तिच्या मैत्रिणीसमोर ताटकळत उभे करु नये म्हणून मला एक उपाय सुचतोय. आपण बिनधास्त आजच्या तरुणाईच्या भाषेत बायकोला म्हणायचे,' तुझी मैत्रिण म्हणजे अगदी रापचिक आयटम/चिकणा बिण्डा/कंडा पीस/ जबरी माल आहे नाही?' (सर्व देवींनी ह. घ्यावे. कोपू नये.) खूप शिव्या खाव्या लागतील, पण काहीतरी परिणाम नक्की दिसून येईल.

In reply to by योगप्रभू

हे त्या मत्रिणीने ऐकायला पाहीजे अशा रितीने म्हणा. बायको रागावेल, पण मैत्रीण पटण्याचे चान्सेस खूप आहेत!

In reply to by योगप्रभू

हे म्हणजे 'एक दाम मे दो काम' झालं की. लेट'स ट्राय ;) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नायतर मोडून खाल्ली (लाथा/फटके जे असेल ते.) श्री.श्री.श्री. योगप्रभू महाराज ( ;) ), फारच सुंदर कल्पना आहे. (टीपः माझ्या बायकोच्या कोणत्याही मैत्रिणीचं नाव कल्पना नाही.) नक्कीच फायदा होईलसं दिसते. यत्न करणे आपुल्या हाती..यश देणे न देणे त्या जगनियंत्याची मर्जी! पण तो व्योमाधिपती मोठा दयाळू आहे. काही ना काही कृपा करेलच. ;)

In reply to by धमाल मुलगा

श्री धमाल मुलगा ; तुमच्या या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट तुमच्या शनीवारातील घरी पाठवण्यात येत आहे. सबब आज घरी जाताना अंगभर झंडू बाम लावून जायची व्यवस्था करा. ( सध्या झंडू बामचा स्टॉक लवकर संपतो असे कळतय )

In reply to by विजुभाऊ

;) आपल्याच मित्रांनी असं वागायला लागल्यावर ह्या जगात दुष्मनाची गरजच काय? >>( सध्या झंडू बामचा स्टॉक लवकर संपतो असे कळतय ) आँ? म्हणजे? तुम्हीही प्रयत्न करुन पाहिलेला की काय? ;)

मजा येणार. अरुणकाका, नुकताच मी नविन प्रकार शिकलोय. ह्या दहा सवयींवर बर्‍याचदा लागू पडतोय. (अर्थात नविन आहे म्हणून असेल..एक्दा सवय झाली की परत नवं शोधावंच लागेल..काय करता गरज ही शोधाची जननी आहे.) हां, तर नविन प्रकार हा, की बायकुनं असं काही विचारलं की आपण सरऽळ आध्यात्मिक व्हायचं ;) शॉल्लेड मजा येते. (पण चेहर्‍यावरचा गंभीरपणा मुळीच हटू द्यायचा नाही. फिस्सकन हसु येतं ते आवरायचं.) उदाहरण द्यायचं झालं तरः
सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही.
मांडी घालून ताठ बसा. अशा अवस्थेत छान डुलकी काढायची सवय करुन घ्या. एकदा प्रवचन सुरु झालं की सरळ माडी घालून बसायचं आणि मस्त झोप काढायची. नियमाप्रमाणं, "इतका वेळ मी काय बडबतेय? भिंतीशी बोलतेय का?" वगैरे समारोपाचे शब्द आपल्याला गदागदा हलवत आदळतातच. डोळे उघडून प्रसन्न हसायचं आणि म्हणायचं, "अरे, अचानक समाधीच लागली." ;)
कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.
सहमत! ह्यावर उपाय नाही. आपण फक्त मान डोलवायची असते.
ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!
आध्यात्मिक पोपटपंची फेकायची हो. "जे नजरेला दिसतं तेच सत्य मानणं हे नेहमीच सत्य आचरण नसतं. ..." वगैरे वगैरे...फुल्ल ब्याटिंग करायची.
आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही.
उत्तरः "देह झाकायला जे जे योग्य ते ते सारेच उत्तम! आता आस लागली आहे ती मनाची कवाडं उघडण्याची! " पाऽऽर भिंगरी करुन टाकायची राव समोरच्याची.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?
उत्तरः "सच्चिदानंद! सच्चिदानंद!! तुझ्या तोंडूनही साक्षात भगवंतच वदतो आहे, माझ्याही तोंडून तोच वदतो आहे. सारा त्याचाच खेळ! अश्रुपात करु नकोस, त्यापेक्षा शक्तीपाताची दिक्षा का घेत नाहीस तू?"
कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.
पर्याय नाही! :( जमलंच तर पुन्हा मांडी, पाठीचा कणा ताठ आणि झकास डुलकी..हे आपलं..समाधी! ;)
ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.
उत्तरः "भगवंता, तुझ्या अजाण लेकराची अशी परिक्षा घेतोस होय? तू अनादी, तू अनंत!! मी पामर काय ओळखणार? हे सद्गुरू, तूच आता त्राता. तूच मार्ग दाखव. " ;)
कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.
उत्तरः "माई, हे साऽरं सापेक्ष नाही का? तुझ्या मनःशांतीसाठी मी रोज प्रत्येक गोष्टीला 'छान' हे उत्तर देईनही.. तूच सांग, काय करु? मला तर आजकाल सारं जगच सुंदर दिसू लाग्लं आहे." ('माई' शब्द महत्वाचा. बायको चरकलीच पाहिजे. ;) )
स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?
'हा हा हा! तो जिवंत राहिल का? ;)
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.
थोडे दिवस जास्त समान का? पुर्णाधिकार देऊन टाका. काहीही विचारलंच तर एकदा 'सच्चिदानंद सच्चिदानंद!'असा (किंवा तत्सम) पुकारा करुन "तूच काय ते ठरव. मला हल्ली ह्या ऐहिक जगात काहीच राम दिसत नाही की काही सुचत नाही." असं टेचदार उत्तर उत्तर द्यायचं. थोडक्यात काय, तर "आपला नवरा आता हातात राहतो, की जातो सगळं सोडून हिमालयात" अशी भिती वाटायला लागली पाहिजे. ;) टीपःभुमिकेला वजन येण्यासाठी आधी साधारण महिनाभर आध्यात्मिक विषयांवरचे निरनिराळे ठोकळे पुस्तकं घरी आणून ठेवावी. रोज त्यातलं थोडं का होईना वाचन करावं. त्याने ऐनवेळी फेकायला चांगल्या भरदार पल्लेदार वाक्य-शब्दांची बेगमी होते. तीन महिन्यांनी पुन्हा या कन्सल्टेशनसाठी. आत्ताची फी बाहेर द्या. फक्त $३०००/- ;)

In reply to by धमाल मुलगा

हा हा हा काय चावटपणा लावलाय? धमु तू बायकांच्या भोळेपणाचा फार गैरफायदा घेतो आहेस बरं का :) ......... हा एक तर डबल बार झाला. बायको मुद्दाम लाडीक वागणार, सेवा करणार , आपलसं करून संसारात ओढायला बघणार. नवर्‍याची मजा न काय :)

In reply to by अरुण मनोहर

अहो गेले दोन महिने तोच इश्वर, जगदंबा, सद्गुरू, सच्चिदानंद वगैरे सगळी मंडळी माझं रक्षण करतायत. :D 'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या मागच्या पानावरचा श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचा सिगारेट घेऊन असलेला फोटो दाखवून मीही टेचात सिगारेट ओढतोय...अगदी बिन्धास्त ;) वर आक्षेप आला की पुस्तकातलंच त्यांचंच वाक्य फेकतो.."शरीराचे भोग आहेत हे..भोगु दे त्याला. आपण आतुन शुचिर्भूत आहो हेच पुरेसं" वगैरे. ;)

In reply to by धमाल मुलगा

हा हा हा! लै भारी! ह. भ. प. धमुमहाराज बारामतीकर की जय! महाराज, तुमची दीक्षा घ्यायची इच्छा आहे. तुमचा रेट काय?

In reply to by नगरीनिरंजन

आम्ही आयकले की बायकास्नी वेगळा, बाप्यांस्नी वेगळा. आता तुमच्या नावाने योग्य खुलासा होतो म्हना! त्यामुळे तो पीरॉब्लेम नाही. पण उत्तर आलेच तर ते वाचून इतरांनी गैरसमज करून घेऊ नाये म्हूनशान धमुबाबांच्या तर्फे खुलासा!

In reply to by अरुण मनोहर

@निर्‍या: अंय...असल्या हलकट सवयी न्हाईत मला. :D @अरुणकाका: ओ गपा की राव. का मला खिडकीत बशिवताय? ;)

In reply to by नगरीनिरंजन

आणि तिकडं खोटं सांगतायत अंगठा 'भगवा' पडलाय म्हणून. =)) >>आयला मी आपलं सरळ विचारलं राव असं 'रेट' वगैरे म्हणू नये रे. फारच थर्डरेट वाटतं ;) कन्सल्टेशन फी म्हणावं, दक्षिणा म्हणावं, गेलाबाजार 'हे ज्ञान क्येवड्याला देनार?' असंतरी विचारावं..डायरेक्ट रेट? आँ? काय माझ्यावर लोकप्रभेत लेख छापून आणायचा डाव आहे काय? ;)

In reply to by धमाल मुलगा

>>आणि तिकडं खोटं सांगतायत अंगठा 'भगवा' पडलाय म्हणून. =)) इकडचे तिकडे असे करू नाही धमु बाळा! >>असं 'रेट' वगैरे म्हणू नये रे. फारच थर्डरेट वाटत ह्या लीडींग वर्डमुळेच मी मिसगाईड झालो होतो. रेट लीड्स टू ....

In reply to by अरुण मनोहर

>>इकडचे तिकडे असे करू नाही धमु बाळा! करावं. नायतर मग ह्या लेखात पडलेत तसे प्रश्न पडतात. :P >ह्या लीडींग वर्डमुळेच मी मिसगाईड झालो होतो. रेट लीड्स टू .... हौ ना राव.

In reply to by धमाल मुलगा

>>करावं. नायतर मग ह्या लेखात पडलेत तसे प्रश्न पडता>> उपदेश वरवर ठीक आहे. पण डेंजरस आहे. काहीही होउ शकते. तुम्हाला काही चांगला अनुभव आहे का? (इकडचे तिकडे करून)

In reply to by धमाल मुलगा

'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या मागच्या पानावरचा श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचा सिगारेट घेऊन असलेला फोटो दाखवून मीही टेचात सिगारेट ओढतोय... धम्या तुला एक आयडिया देतो. बायकोला सातारा रस्त्यावरच्या शंकर महाराज मठात ने........ तेथे उदबत्यां ऐवजी सिगारेटी लावलेल्या असतात. ( एक काळजी घे पोराला नेऊ नकोसंआयतर तुझा पाकिटातल्या सिगरेटी तुला देवघरात सापडतील )

In reply to by अरुण मनोहर

समाजातील एका प्रबळ संख्येच्या, परंतु शोषित आणि हतबल अशा एका मुख्य वर्गाला जर ह्यातून आधार मिळणार असेल, होणार्‍या अन्यायाविरुध्द दृढ उभे राहणे होणार असेल तर मी लेखक ह्या नात्याने रॉयल्टी घेणेचे नाकारत आहे. पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरणदेखील पारंपारिक साखळीतून न व्हावे ह्याबाबत आग्रही असेन. जेणेकरुन इतर पुस्तकांना जेव्हढा 'डिस्काउंट' मिळतो तेव्हढ्या किमतीत हे पुस्तक सर्वस्तरीय वाचकांपर्यंत पोहोचावे. कोणासही केवळ आर्थिक कारणाने वंचित रहावे लागू नये हीच इच्छा! @नरेशकुमारः ते 'बायकोला जाग्यावर आणण्याचे.' वगैरे टायटल जास्तच प्रक्षोभक होईल असं वाटत नाही का? की अशा नावाने हुल्लड व्हावी अन 'एनी पब्लिशिट्टी इज गुड पब्लिशिट्टी' ह्या न्यायाने असे शिर्षक योजले आहे? कळावे, आपला अविश्वासू धम्या बारामतकर. (व्ह.फा. फेल)

In reply to by नरेशकुमार

>>बायकोला जागेवर आनन्याचे 'धम्याचे' १०१ उपाय 'दुर्बलांचा लढा' 'हू मूव्ह्ड माय पनीर?' 'येस! यु कॅन विन' 'यशाचे सोपान' 'द मॅन हू टर्न्ड इन टू मॉन्क' 'हे भलते अवघड नसते...' 'नवरेहितवादी ह्यांची निवडक पत्रे' ह्यातलं कोन्तं ठीक वाटतं? टीपः अर्पणपत्रिकेत २ नावं हवीत. आदरणीय श्री.युयुत्सु आणि ज्यांची विचारचक्रासाठी मोलाची मदत घडाली ते श्री. अरुणकाका मनोहर.

In reply to by धमाल मुलगा

'दुर्बलांचा लढा' हे कसं एकदम आतुन आल्यावानि वाटतं. नाव वाचुन लढ्यात जिव झोकुन देन्याचि खुमारि येते.

शुचि वगळता आतापर्यंत एकाही बाईने आपली ट्रेड शिक्रेट सांगितली नाहियेत! इतक्या सहज ती तुमच्या हाती कशी लागतील हो? उलट नवर्‍यांच्या वाईट सवयींबद्दल मी ५० मुद्दे सांगू शकेन. पण ते माझ्या नवर्‍याने वाचलं तर मी त्यांचा वापर नंतर आताच्याएवढ्या यशस्वीपणे करू शकणार नाही, तस्मात "मौनं सर्वार्थसाधनं|"

In reply to by पैसा

हो हे मात्र खरे! बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै! सिक्रेट एजंट म्हणून बायकांनाच नेमावे! राष्ट्राची गुपीते कधीच बाहेर फुटणार नाहीत!

In reply to by अरुण मनोहर

>>>>>> बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै! हे वाक्य.. बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही या वाक्याशी विरोधाभास प्रूव्ह करणारे आहे!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै & बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही
यावाक्यांत काहीही विरोधाभास नाही... कारण जी काही बडबड करतात ती अगदीच वायफळ प्रकारची असते... अन गुपीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्प्पीत हो ते कसं बरं फुटणार एखादीकडून... असं आहे तर अन तुम्हाला वाटते मजाक ऐ...

वक्रोक्तीबद्दल >>>> =)) ज्यो तुला या शब्दाबद्दल आपल्या " मिपा शब्द ऑफ द इयर " असा माझ्यातर्फे अवार्ड देतो आहे ..कृपया खवतुन स्विकार करावा

सुट्टीच्या दिवशी आपण जरा तंगड्या पसरुन आरामात बसलो तर बायकोला त्या दिवशी घर स्वच्छ करायची लहर येते मग काय आपल्याला कामाला जुंपले जाते

In reply to by उल्हास

सुट्टीच्या दिवशी जरा घर आवरावे...म्हटलं तर तंगड्या पसरून बसायची हौस येते!

१. कुथल्याही फाल्तु विशयाव्र बडब्ड करने. दुसर्याने ति षान्त ऐकुन घेने, अस आगरह करने. ०२. थोडा काइ वाद झाल्यास दिवसभर मला बरपुर काम असते. माज्यावर जलु नका असे सान्गते. ०३. सविस्त्र नन्तर.

हजारो वर्षांपासुन आगतिक पुरुषवर्गावर होणार्‍या र्निघ्रुण निर्दय अत्याचारांना वाचा फोडणारा लेख आणि त्यावरील तितक्याच उत्कट प्रतिक्रिया, पहिल्या पाना वरुन वाहुन जाउ नये म्हणुन

लग्न झालेल्या पुरुषांची गाथा, आणि अनुभवधारी मिपा सदस्यांच्या प्रतिक्रीया पाहुन ड्वाळे पाणावले.Smiley

आमच्या येथील केस पूर्णपणे लिहायची तर बी आर चोप्राना इहलोकात बोलावून म्हा भा.............रत अशी सीरीज काढावी लागेल. तो विषय विस्ताराने इथे दिला तर मेमरी चा इशू होईल यास्तव मालकानी समज दिली आहे.

हा विषय " चार दिवस सासूचे " या मालिकेलाही मागे टाकेल या बाबतीत मी बेटींग लावायला तयार आहे !

In reply to by चौकटराजा

म्हणूनच आंम्ही नवीन पुरुष सिरिअल्स काढण्याचे योजले आहेत. आमच्या नव्या सिरिअल्सची नावे=>
१> चार दिवस नवर्‍याचे, (सासर्‍याचे जुने आहे, नवर्‍याचे लेटेस्ट!) २> नव'वरु', (नवीन लग्न झालेल्या पतीची कथा) ३> कुल 'वरु', (पतीजात रुढीने जगणार्‍या पतींची गाथा) ४> सांभाळ रे, ('मरशील नाहीतर' हे सबटायटल!) ५> आल्या घरी तु निट रहा, (पुरुषाला उद्देशून ;) ) ६> बे-ताल, (धर पाय न्हायतर सोस हाल) ७> हा भास हा! (नव मुलीं पाहण्याचा) ८> ह्या गोजिरवाण्या गुत्त्यात, (रमणीय क्षण) ८> दोन चपट्या दोघे आपण, (रमणीय क्षण पार्ट-२) ९> एकाच या जन्मी टळू, (भांडणकल्लोळ/ वास्तवदर्शी मालिका) १०> पिंजरा (फॉर मेन) ११> सासरा पण कधी जावई होता. (नवीन मराठी आवृत्ती) १२> एका लग्नाची तिसरी बायको (डॉक्टरसाहेब स्पेशल सुखांत सिरिअल)=> (न स्थिरावलेला सुखी पुरुष!) १३> पुढच पाऊल (मागे जाताना) १४> बांध बायकोचे (पतीमर्यादा) १५> मुक्तीबंधन (एक केविलवाणा ध्यास) १६> होम मिनिस्टर (पती स्पेशल= सुत्रधार होम मिनिस्टर 'राखी सावंत') (सुचना:- राखी सावंत चालणार नसेल तर तसे आमच्या चॅनलला व्यनी करुन कळवा. आंम्ही तात्काळ तिच्या जागी नवीन स्वस्तातली होम मिनिस्टर निवडू! ;) )
सध्या एक चित्रपट काढायचाही विचार आहे. त्याचे नाव "कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे. तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी! (लोहे को लोहाच काटता है म्हणून चॅनेलचा मुहुर्त आमावस्येलाच ठेवण्यात आला आहे. सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. घरुन पोट भरुन जेऊन या येथे जेवणाची अपेक्षा करु नका.)

In reply to by अन्नू

कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे. तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी! ह्यी आडीशान घेयाची म्हंजी त्येची लाईन क्व्यवढी लागंल ? वरळी पासून सुरू हून शान पार चांदोबा वरील sea of tranquility पातुर वाडंल . आनी त्येना सम्द्याना घरचा धाक लइ . तवा येकत्र तारका कया म्यीळनार ?

सगळ्यात भयाण संवय म्हणे " आज माझं डोकं दुखतंय ....चा बहाणा !! ( इथे डोळा मिचकावलेली स्माईली आहे असे समजावे)

गेले अनेक महिने माझ्या मनात 'पुरुष अधिकार समिती ' स्थापन करावी असा विचार आहे.एकंदरीत बघितलं तर पुरुषांची स्थिती सध्या अतिशय दयनीय आहे.आपल्यावर वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायाची पुरुषांना जाणीव नाही.जर असेल तर त्याविरुध्द आवाज उठवण्याची त्यांची ताकद नाही.घरी-दारी,जळी-स्थळी,बस- ट्रेन-रस्ता सगळीकडे स्त्रियांकडून पुरुषांचा मानसिक छळ होत असतो.कधी गोड बोलून, कधी आवाज चढवून , कधी डोळ्यातून अश्रूंची टाकी रिकामी करून,तर कधी जगातल्या सर्वात गरीब आपणच अस दाखवून त्या पुरुषांचे मानसिक संतुलन बिघडवतात.समस्त पुरुषांना ह्या अन्यायाच्या दलदलीतून बाहेर काढायचे असेल तर समिती स्थापन करणे गरजेचे आहे. मी स्त्री आहे मग मी पुरुषांच्या बाजूने का आहे.असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित आला असेल.तर समस्त पुरुष वर्गाचे एका बाबतीत स्त्रियांवर अनेक उपकार आहेत.ती म्हण्जे शिक्षण...अगदी स्वामी विवेकानंद ते फुले,कर्वे सगळ्यांनीच आम्हाला साक्षर करण्याच जे काम केल आहे त्याची परतफेड म्हणून मी सर्व पुरुषांचे मन:पूर्वक आभार मनात आहे.

In reply to by अन्नू

लपु नका.अस लपुन चालणार नहि. तुम्हाला पुढे यायलाच हव.सध्या नवर्यावर होणाऱ्या अत्याचारांची मी साक्षीदार आहे.बायको, आई आणि काम यांमध्ये होणार त्याच ३ इन १ sanadwich बघवत नाही रे. घरोघरी मातीच्या चुली हि म्हण काही उगीच आली नाही.मी ह्या समितीसाठी मेंबर गोळा करतीये.पण लोकलज्जेस्तव कोणी पुढे येण्यास तयार नाही.पण हळूहळू जनजागृती होत आहे.दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.

In reply to by किचेन

दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.
या भावना व्यक्त होण्यासाठीच तर आंम्ही वर नमुद केलेल्या नवीन सिरिअल्य काढण्याचे योजले आहे. Smiley

In reply to by किचेन

दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.
असं काही तरी लिहित जाऊ नका हो... ;)

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या बर्‍याच सवयी आहेत. प्रेषक शुचि Fri, 24/12/2010 - 10:03 यांच्या प्रतिक्रियेशी मी एकदम सहमत आहे. रघू सावंत