Skip to main content

व्हॉट वीमेन वाँट

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मेल गिबसन या नटाची प्रमुख भूमिका असलेला आणि त्याच्या सदाबहार अभिनयाने तारून नेलेला सिनेमा - "What Women Want" मी काल डीव्हीडी वरती पाहीला. "अगं बाई अरेच्च्या" हा सिनेमा ज्या सिनेमापासून प्रेरणा घेऊन बनविला आहे, तो पहण्याची इच्छा बर्‍याच दिवसापासून मनात घोळत होती.
From
सिनेमाकडून माझ्या बर्‍याच अपेक्षा होत्या त्या मानाने मग तो ठीकठाकच वाटला. सिनेमाभर पाश्चात्य जगतातील प्रातिनिधिक स्त्रिया आणि त्यांचे मनोव्यापार उथळ आणि लॅकलस्टर रीतीने सामोरे येत राहतात. निक (मेल गिबसन) हा कथानायक "MCP + Womanizer" आहे. आकर्षक व्यक्तीमत्वाच्या, देखण्या, मार्केटींग फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह असणार्‍या या पुरषाचा आपल्या पहील्या पत्नीबरोबर घटस्फोट झालेला असून, त्याला १५ वर्षाची मुलगी आहे. या मार्केटींग फर्ममध्ये एका मोठ्या पदावर नियुक्ती होता होता ते पद त्याच्या हातातून निसटते आणि डार्सी (हेलेन हंट) या महत्त्वाकांक्षी स्त्रीला देऊ केले जाते. पुढे थोड्याच काळात एका अपघातात निक ला स्त्रियांच्या मनातील विचार ऐकू येऊ लागतात. प्रथम तो चक्रावून जातो आणि एका मानसोपचारतज्ञ स्त्री ची मदत घेतो. पण तिच्या सल्ल्याने तो या विचित्र गोष्टीचा वैयक्तिक लाभ करून घेण्याचे ठरवितो. डार्सी शी स्पर्धा करता करता, तिचे अंतरंग जाणून घेत तो तिच्या प्रेमात पडतो का? हे विचित्र वरदान किती काळ त्याला लाभते आदि उत्तरे सिनेमा पाहील्यास मिळतील. दिग्दर्शिकेने विविध स्तरातील स्त्रियांचे विचार मांडण्याचा प्रयत्न तर केला आहे पण माझ्या मते तो बराचसा अयशस्वी ठरला आहे. कारण स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते, हळूवारता असते ती क्वचितच पकडीत आली आहे. काही मनोव्यापार विनोदी आहेत , काहींना करुणेची झालर आहे, काही रोखठोक जाब विचारणारे आहेत तर काहींना असुरक्षिततेची बोच आहे. पण अधिक वैविध्य आणता आले असते, अधिक खोली देता आली असती. मला सिनेमातील संगीत आवडले. एका तुकड्यावर मेल गिबसनच्या ग्रेसफुल डान्सींग स्टेप्स आहेत. त्या अफलातून आहेत. एकंदर मी १० च्या पट्टीवर ६ म्हणेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5369
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

छान! आणखी थोडं लिहीलं असतं तर छान झालं असतं आता पुढच्या वेळी 'कायद्याचं बोला' चा जनक "माय कझिन व्हिनी" पहा.. त्यानंतर 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' चा जनक "यू, मी अ‍ॅण्ड डप्री" बघून घ्या

In reply to by यकु

मालक, एक महत्वाचा शिनुमा लिश्टमदी नैय्ये तुमच्या... लिटल मिस सनशाइन = दे धक्का !! ह्या वरिजनल शिनुमात नसणारं एक कॅरॅक्टर 'सिद्धार्थ' प्रसवलं गेलं आहे अन त्यानेच जाम भाव खाल्लाय !!

In reply to by वपाडाव

ह्या वरिजनल शिनुमात नसणारं एक कॅरॅक्टर 'सिद्धार्थ' प्रसवलं गेलं आहे अन त्यानेच जाम भाव खाल्लाय !!
काय राव? काही तरी ओरिगीनॅलीटी नको का? ;)

अधिक खोली देता आली असती : सहमत. स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो : फारच जनरल विधान म्हणून प्रचंड असहमत.

अगं बाई अरेच्चा चे प्रेरणास्थान 'व्हॉट......... हे होते माहिती नव्हते. धन्स. दिग्दर्शिकेने विविध स्तरातील स्त्रियांचे विचार मांडण्याचा प्रयत्न तर केला आहे पण माझ्या मते तो बराचसा अयशस्वी ठरला आहे. कारण स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते, हळूवारता असते ती क्वचितच पकडीत आली आहे. दिग्दर्शिकेला स्त्रियांचे विचार मांडणे अवघडच गेले असेल कारण स्त्रियांच्या मनाची खोली, व्याप्ती आणि श्रीमंती याबद्दल विचार करणे आणि समजून घेणे तस्संही अवघडच काम आहे. (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिग्दर्शिकेला स्त्रियांचे विचार मांडणे अवघडच गेले असेल कारण स्त्रियांच्या मनाची खोली, व्याप्ती आणि श्रीमंती याबद्दल विचार करणे आणि समजून घेणे एका स्त्रीला तस्संही अवघडच काम आहे. (ह.घ्या)

मुळ कलाकृती कळवलीत...थेंकू... अता पाहायला हवा...कारण मेल गिब्सन आपण चुकवत नाय @स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते, हळूवारता असते>>> बाप रे...! हे मला माहितीच नव्हतं ;-)

तरी म्हटलं, हल्लीच्या मराठी सिनेमात अशा वेगळ्या विषयाची कल्पना कोणी केली म्हणून! आत्ता कळलं! हम्म... तरीही एका स्त्री दिग्दर्शिकेला स्त्रियांचं भावविश्व नीट दाखवता आलं नाही हे काहीसं अपेक्षितच. कारण स्त्रियांच्या मनाचा थांग साक्षात परमेश्वराला लागायचा नाही!

बर्‍याच दिवसांपूर्वी पाहिलाय म्हणून थोडंफारच आठवतय तरी एक गोष्ट नक्की, स्रीच्या भावना पकडता नाही आल्या. कितीदा छ्या! असं वाटून गेलं होतं.

पहावा म्हणतोय.... बादवे, गोविंदाचा"क्योंकी मै झूठ नही बोलता" आणि सलमानचा "पार्टनर" ह्याचे मूळही इंग्रजी चित्रपट आहेत म्हणे. आणि ते मात्र तुलनेने चांगले आहेत (म्हणे).

सिनेमाभर पाश्चात्य जगतातील प्रातिनिधिक स्त्रिया आणि त्यांचे मनोव्यापार उथळ आणि लॅकलस्टर रीतीने सामोरे येत राहतात.
यात उथळपणा काय आहे ? का भारतीय स्त्रियांच्या द्रुश्टीने उथळ असं म्हणायचं आहे ? जी सहज प्रवृत्ति आहे ती मांडली आहे. मला वाटत नाही धर्माच्या/परीणामी तशा समाजमनाच्या दडपणाच्या नावावर उठसुट मनाची कुचंबणा करत गोश्टी अनावश्यक क्लिश्ट करणे/जगणे पाश्चात्य स्त्रियांना आवडतं ते. अर्थात स्वातंत्र्याच्या फाजिल कल्पनांमुळे बालवयात निर्माण होणारा हेकेखोरपणा अनुभवासोबत प्रगल्भ होत जाउनही या स्त्रिया फार विक्षीप्त वागतात यावर विश्वास ठेवता येणे कठीण आहे. आपण कोणतीही पाश्चात्य स्त्रि समोर आणा त्याच प्रवृत्तिच्या स्त्रिया इथेही आढळुन येतील.
कारण स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते,
क्षमा करा पण जेनेरीक विधान करताना ति थाप वाटणार नाही याची काळजी घ्याल काय ? स्त्रि मन हे अनाकलनीय आहे यात फार शंका नाही म्हणुन त्याला श्रीमंत पोत, अनाकलनीय खोली, व्याप्ती वा पातळी वगैरे मुलामे देणे कमालीचे धोकादायक होय.

In reply to by आत्मशून्य

खरंतर हा सिनेमा अगं बाई अरेच्या च्या नंतर पाहू नये. मला वाटतं मराठी version मध्ये महिलांच्या बाबतीत खूप गोष्टी गृहीत धरल्या आहेत. याउलट व्हाट विमेन वांट मध्ये काही गोष्टी सरळ सरळ मांडल्या आहेत. सिनेमाची सुरुवातच होते नायक नालायक आहे हे सांगण्यापासून. त्यांचं म्हणणं आहेच नं कि तो बायकांना कसा 'manipulate' करता येवू शकतं याचा ज्ञाता आहे ! कारण तो ज्या परिस्थितीत वाढला आहे, ज्या परिस्थितीमध्ये त्याच्या आईला त्याला वाढवावं लागलं त्यातून तो जे शिकला तेच निम्मा चित्रपट कव्हर करतो. गम्मत आहे ती उत्तरार्ध पाहण्यात, त्याच्या कन्सेप्ट बदलताना पटकथा ज्या डीटेल्स घेत जाते त्याला तोड नाही. त्या उत्तरार्धात नायक आणि नायिका दोघेही नव्या गोष्टी एकमेकांबद्दलच्या शिकत जातात. त्यात नायक जास्तीत जास्त प्रभावित होत जातो कारण त्याच्या ज्या आत्तापर्यंत स्त्रियांबद्दल धारणा असतात त्या बदलायला लागलेल्या असतात (कारण त्याला direct मनातलं ऐकायचा मार्ग मिळालेला असतो). होता होता चित्रपटाचा शेवट यातच होतो कि ज्यामध्ये स्त्रीचं मन नायकाला कोणत्याही अतींद्रिय शक्तीशिवाय समजणे शक्य होत जाते. असो, अगं बाई अरेच्या या चित्रपटाच्या खूप आधी हा सिनेमा बनलेला आहे आणि तरीही पटकथाकाराच्या पेनातून हे प्रसंग असे लिहिले गेले आहेत कि य्याव रे य्याव :) याला कोणीही स्त्रीच्या भावनिकतेचा आणि श्रीमंत पोत वगैरे च्या वर्गवारीत अडकवू नये. शेवटी हा पोत, हि खोली आणि व्याप्ती वगैरे हि वर्गाची द्योतक नसून प्रातिनिधिक म्हणवणाऱ्या विचारवंत लोकांची मक्तेदारी आहे असे वाटते. हा सिनेमा नारीमुक्ती मंच वाल्या महिलांनाही तितकाच मनोरंजक आहे जितका आम्हा पामरांना :) शेवटी, भावना को समझो, समझदारी मै क्या सुहाना है :)

In reply to by इष्टुर फाकडा

खरंतर हा सिनेमा अगं बाई अरेच्या च्या नंतर पाहू नये. मला वाटतं मराठी version मध्ये महिलांच्या बाबतीत खूप गोष्टी गृहीत धरल्या आहेत.
हे सोडल्यास शब्दाशब्दाशी सहमत. कालच बघितला मी. शेवटी नायकाच्या विचारांत झालेला बदल सुखद आहे, अन तो प्रवासही खुप सुंदर रित्या दाखवला आहे.

व्हॉट विमेन वाँट याचे उत्तर कळून चुकले असल्याने हा चित्रपट पाहण्याचे कष्ट घेतले नव्हते. असाच कधी योग आलाच चुकून माकून तर पाहिन कदाचित. परीक्षण आवडले.
स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते, हळूवारता असते ती क्वचितच पकडीत आली आहे.
या वाक्यात काहीतरी राहून गेलंय असं वाटतंय. "स्त्रियांच्या, आजूबाजूच्या व नात्यातल्या स्त्रियांव्यतिरिक्त इतरांबद्दलच्या, भावनांना" असं असतं तर मी सहमत झालो असतो.

In reply to by नगरीनिरंजन

व्हॉट विमेन वाँट याचे उत्तर कळून चुकले असल्याने बाब्बौ. इथेही सांगा की उत्तर. जाहिर धाग्यावर सांगायचे नसेल तर व्यनि तरी करा.लै उपकार होतील. निदान काही विशिष्ट व्यक्ती नाही त्या वेळेस अचानक चिडचिड का करतात ह्याचे कुतूहल तरी शमेल. आणि अनपेक्षितरित्या एकाएकी खुशाल कशावरही खुश कशा होतात ते हेही समजेल. स्त्रियांच्या, आजूबाजूच्या व नात्यातल्या स्त्रियांव्यतिरिक्त इतरांबद्दलच्या, भावनांना" असं असतं तर मी सहमत झालो असतो. हे पुन्हा प्पुन्हा वाचूनही बाउन्सर गेलं. काही धड समजलं नाही. बाकी काही टिपिकल इद्धरणे आठवली ती इथे देतोयः- To make a man happy you've to understand him a lot, love him a little. To make a woman happy you've love her a lot, never try to understand her at all. A woman expects everything from the same man, man expects same thing from every woman.

In reply to by मन१

उत्तर सोपे आहे. एव्हरीथिंग. :-)
काही विशिष्ट व्यक्ती नाही त्या वेळेस अचानक चिडचिड का करतात
याचे कारण भावनिक असेलच असे नाही.
स्त्रियांच्या, आजूबाजूच्या व नात्यातल्या स्त्रियांव्यतिरिक्त इतरांबद्दलच्या, भावनांना" असं असतं तर मी सहमत झालो असतो. हे पुन्हा प्पुन्हा वाचूनही बाउन्सर गेलं. काही धड समजलं नाही.
स्त्रियांच्या भावनांना श्रीमंत पोत असतो वगैरे खरं असलं तरी त्यांच्या नात्यातल्या काही स्त्रिया किंवा आजूबाजूच्या काही स्त्रिया यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावनांना असलेला पोत फारच वेगळा असतो असं मला म्हणायचं होतं.

परीक्षण आवडले, चित्रपटही बघायला आवडेल. बाकी 'व्हॉट विमेन वाँट' याचे उत्तर साक्षात तो जगन्नियंता वगैरेही देऊ शकणार नाही असे वाटते. मेन विल बी मेन म्हणणे सोपे आहे. तसे काही स्त्रियांच्या बाबतीत म्हटले तर हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है!

In reply to by सन्जोप राव

क्रमांक एकची जाहिरात एकदम क्लास आहे. पुन्हा पुन्हा पाहावीशी अशी. खूपच सुंदर. दुव्याबद्दल धन्स. >>> तसे काही स्त्रियांच्या बाबतीत म्हटले तर हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है! नै नै तुम्ही बोला. स्त्रियांच्या बाबतीतल्या आपल्या विचारांची खोली, व्याप्ति आणि श्रीमंती समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

सर्व सभासदांना नम्र विनंती आहे की हे परिक्षण वाचून चित्रपट 'न बघायचा निर्णय घेऊ नका'. एका सुंदर सिनेमाला मुकाल. शुचि ताईंनी चित्रपटाची कथा ४ ओळीत गुंडाळून टाकली आहे. स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते, हळूवारता पकडली नाही असं म्हणताना सिनेमाचा पोत, त्यातील व्यक्तिरेखांची खोली, नायकाच्या जीवनातले स्थित्यंतर, मुलीशी असणारे आणि सुधारत जाणारे संबंध, जाहिरात कंपनीत ह्या शक्तीचा उपयोग करून केलेल्या गमती जमती ह्या सगळ्यांना आपल्या परिक्षणात फाटा दिलेला आहे. त्यामुळे परिक्षण अत्यंच चुकीचे आणी वरवरचे झाले आहे. अवांतरः स्त्रीयांच्या भावनांना श्रीमंत पोत आणी विचारांची खोली वगरे असते ह्या जेनरीक विधानाशी असहमत आहे. विचारवंत आणि अत्यंत उठवळ अशा दोन्ही प्रकारचे स्त्री/पुरुष आपल्याला बक्कळ प्रमाणात सापडतात.

In reply to by आदिजोशी

शुचि ताईंनी चित्रपटाची कथा ४ ओळीत गुंडाळून टाकली आहे.
अशमत आहे. डायरीच्या एका पानात काय काय आणि किती लिहिणार ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाटलच म्हटल शुचितैंचा धागा आणि हे महाशय अजुन प्रकटले कसे नाहीत. =)) अ‍ॅड्या, जवळ जवळ न बघण्याचं ठरवलच होतं, पण आता बघावा म्हणतो.

मला वाटले होते, डॉक्टर साहेबांसारखे एखादे लिखाण असेल. ;)