Skip to main content

अंबरात फिरुनिया उगवतो....

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/03/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.

अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा
परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ ||

बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा
हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा
पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ ||

स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी
निळ्या बोलक्या.. डोळ्यांमधली, लाजलाजरी गाणी
छेडुनि गे_ला, केस मोकळे, कुठुनी रानचा वारा ..............|| २ ||

काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई
तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई
विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा ......................|| ३ ||

अंगण माझे फुलले हसले, तृप्तीने गं न्हाले
हिरवाईचा त्यागुन शालू, मन निळोसे झाले
चाफ्याच्या गंधाने महकला, देहाचा देव्हारा .................... || ४ ||

- संध्या

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2100
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई
तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई
विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा

हे कडवे फारच छान..!!
आवडली ..


In reply to by यकु

@विडंबकांनी तलवारी म्यान केल्यात जणू..>>>
लयबद्ध...गेय्य...आणी सुंदर... रचना आहे ही..!,हीचं विडंबन मी पाडत नै ज्जा.. ;-)


In reply to by अत्रुप्त आत्मा

मी पाडत नै ज्जा.

हे थेट https://www.hasyakallol.com/tillujoker.htm इथल्या मी नै म्हणत ज्जा सारखं ऐकू आलं..
नक्की ऐका..