Skip to main content

प्रेयर्स फॉर बॉबी

लेखक प्रसाद प्रसाद यांनी बुधवार, 29/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती. हाच प्रकार दिवसेंदिवस वाढून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. रोजच्या रोज जिमला जाणारा हसतमुख, उत्साही मित्राचे असे कसे व्हावे आणि घरचे नेमके असे कसे वागले? इतर मित्र मंडळीना भेटलो त्यांना या प्रकाराची कुणकुण लागली होती पण काही विषय अगदी वैयक्तिक असतात, आपण त्यात पडायचे नसते. त्याच्या ‘त्या’ मित्रालाही भेटलो, त्याची अवस्था तर अधिकच वाईट, मित्राला हॉस्पिटलमध्ये जावून भेटता येत नाही, त्याच्याशी बोलता येत नाही, त्याच्या जीवाची घालमेल तर अधिक वाईट. डोळ्यात सतत पाणी, इतरांना सांगायची चोरी अशी त्याची अवस्था. पण त्याही अवस्थेत मला तो इतर मुलांपेक्षा वेगळा (वाईट अर्थाने) वाटला नाही तर जास्ती प्रेमळ आणि चांगली शैक्षणिक अर्हता असलेला. दोघेही मराठी. आम्हा सर्व मित्रांना ह्या बाबतीत हे काही वाईट आहे असे वाटत नव्हते. कितीतरी लोक असतील की ज्यांना असे प्रश्न असतील आणि मी तसा नाही म्हणून आपण त्याकडे डोळेझाक करतो आणि असे नाहीच असे मानतो. इतरापेक्षा वेगळे वाटणे आणि ते ही अगदी वैयक्तिक पातळीवर, हा काही गुन्हा असतो का असा मित्राच्या मित्राचा प्रश्न होता! मी काय उत्तर देणार? त्याने दिलेला आणि बघच म्हणून सांगितलेला एक हटके चित्रपट आवर्जून पाहिला. खरोखरच चांगला आहे, विचार करायला लावणारा, त्याचा संक्षिप्त गोषवारा – ---------------------------------------------------------------------------------------------------- प्रेयर्स फॉर बॉबी बॉबी नावाचा २०-२१ वर्षाचा तरुण. कर्मठ घरातला (Presbyterian Church शी निगडीत), याला दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ असतो. बॉबी इतर चार मुलांसारखाच! पण जास्ती प्रेमळ, नात्यांचा विचार करणारा. इतर सर्व वागणेही “नॉर्मल”. वयात आल्यापासून त्याला जाणवत असते की इतर मुलांप्रमाणे आपल्याला मुलींची फारशी आवड नाही म्हणजे डेटिंग, सेक्स वगैरे. मनात होणारी घुसमट वाढत असते आणि एका (बेसावध) क्षणी तो आपल्या मोठ्या भावाला आपल्याला काय वाटते ते सांगून टाकतो आणि भावाकडून असेही वचन घेतो की ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही विशेषत: आईला. पण मोठा भाऊ बॉबीच्या खरोखर काळजीने आईला सांगतो (चित्रपटातील आईचे नाव मेरी, मुले मातृभक्त आहे), बॉबी भावावर संतापतो आणि आता आईचे उपाय सुरु होतात. (चित्रपटकथा काळ साधारणत: १९७८ ते १९८२ पर्यंतचा असल्याने त्याकाळात अमेरिकेत अशा लोकांना मानसिक रुग्ण समजले जाई आणि मानसोपचार तज्ञ अगदी शॉक ट्रीटमेंट देऊन “रोगी” बरा केल्याचा दावा करत, खरे तर १९७३ साली अमेरिकेत मानसोपचार तज्ञांनी होमोसेक्युअलिटी हा मानसिक रोग नसल्याचे मान्य केलेले आहे) होमोसेक्युअलिटी म्हणजे एड्सच अशीच तिची समजूत असते (आणि काही प्रमाणात ती खरी आहे), बायबलमधल्या ओळी काढून त्या एका कागदावर लिहून ती घरभर चिकटवते अगदी बॉबीच्या बाथरूमच्या काचेवरही, जेणेकरून देवाचे शब्द बॉबी वाचेल आणि त्याचा ‘रोग’ लवकर बरा होईल (होमोसेक्युअलिटी म्हणजे भयानक रोग अशी मेरीची समजूत). त्यामुळे जास्तीत जास्त देवाची प्रार्थना करून ह्या ‘आजारातून’ बॉबीने बाहेर पडावे असे आईला वाटत असते. बॉबीला मानसोपचार तज्ञाकडे आई घेऊन जाते. तेथे त्याचे सेशन सुरु होतात इकडे त्याची “असा” असण्याची बातमी जवळच्या मित्रात नातेवाईकात फुटते. बॉबी आईला अधेमध्ये सतत सांगयचाही प्रयत्न करतो की गे म्हणजे फक्त पॉर्न नाही, आणि गे असणे कोणी मागून घेत नाही पण आईचे समाधान होत नाही. वास्तविक बॉबीच्या घरच्यांची, आई सोडून सगळ्यांची तो जसा आहे तसा स्वीकारण्याची तयारी झालेली असते. त्याचदरम्यान बॉबीची बहिण (कझिन) सहज भेटायला येते, जेवायला बसलेले असताना ह्याच विषयावरून आई आणि बॉबीत आलेला तणाव स्पष्ट दिसतो आणि बॉबीला होणारा मानसिक त्रास, आईचा त्रागा, तिचे बॉबीला अशा रोगातून वाचवण्याचे प्रयत्न हे पाहून तिला कसेसेच वाटते आणि ती बॉबीला सांगते की लहानपणापासून तिला हे कुटुंब आदर्श वाटत असते पण तसे नाही आहे. बॉबी आईला अनेकदा समजावतो की प्रार्थना आणि मानासोपचारांचा काही उपयोग होत नाही आहे. वारंवार येणाऱ्या अपराधीपणातून आणि आईला जसं हवं तसा बदल न झाल्याने बॉबी आपल्या (कझिन) बहिणीकडे राहायला जातो तिथे त्याला बारमध्ये त्याला त्याचा बॉयफ्रेंड डेव्हिड (डेविड?) भेटतो, ह्या बॉयफ्रेंडच्या घरच्यांना त्यांच्या मुलाची मानसिकता माहित असते, त्यांनी त्याला आहे तसा स्वीकारलेलं असतं. थोडे दिवसाने बॉबी परत आपल्या घरी एक दोन दिवसासाठी जाणार असतो त्यावेळी डेव्हिड त्याला सांगतो की आईला तू जसा आहेस तसाच स्वीकारण्याविषयी सांग. घरी परत आल्यावर बॉबी आई ला सांगण्याचा प्रयत्न करतो पण आईची मानसिक तयारीच नसते की आपल्या मुलाला गे म्हणून स्वीकारण्याची. तो परत आपल्या बहिणीकडे (ओरेगॉनला) परत जातो. पण आईच्या स्वभावात झालेला बदल त्याला प्रचंड अस्वस्थ करत असतो. त्यात एके दिवशी गे बार मध्ये डेव्हिडशी त्याचा एक जुना मित्र सलगी करण्याचा प्रयत्न करतो, डेव्हीड न्युट्रल असतो पण असे दृश्य पाहून बॉबी जास्तच अस्वस्थ होतो. शेवटी बॉबी आपण आईचा पहिल्याप्रमाणे लाडका मुलगा नाही किंवा तिला जसा मुलगा हवा आहे तसे आपण नाही आणि प्रयत्न करून होऊही शकत नाही असे वाटून फ्री वे च्या पुलावर उभा राहून, १८ चाकी ट्रक खाली उडी मारतो आणि आत्महत्या करतो (मला खरे तर वाटत होते की बॉबी कसातरी जगणार आणि आईच्या वागण्यात बदल होणार, पण चित्रपट ‘सत्य घटना’ पे आधारित असल्याने असे काही सुखद वळण नव्हते). मेरीला वाईट वाटते पण त्यानंतर ती परत बायबल मध्ये आत्महत्या करणे हे पाप आहे असे सांगितल्यामुळे बॉबी नक्कीच नरकात गेला असेल अशा विचाराने चिंतीत होते (इथे एक गोष्ट महत्वाची - सत्य घटनेत तसेच चित्रपटात मेरी (पात्र) वाईट नाही आहे तर तत्कालीन धर्मविचाराने आणि समाजभयाने ती अशी वागते). डेव्हिड फ्युनरलला येतो जेंव्हा मेरीला कळते की हाच तो डेव्हिड तेंव्हा ती त्याची खाण्याची प्लेट सरळ डस्टबिन मध्ये टाकून देते (इतरांच्या प्लेट्स ती धुवून व्यवस्थित ठेवत असते). त्यानंतर लगेचच एकदा कधीतरी ती बॉबी त्यांच्या घरात ज्या खोलीत राहत असतो तेथे जाते, तिथे तिला बॉबीने पाठविलेले काही पाकिटे मिळतात त्यात एकत् तिला एका चर्चचा पत्ता मिळतो, तो पत्ता शोधत मेरी जाते आणि तिथे तिला एक पाद्री होमोसेक्स्युअल लोकांसाठी मानसिक आधार केंद्र म्हणता येईल असा उपक्रम चालवत असतो, ते पाहून मेरी भडकते आणि धर्माविरुद्ध वागण्याविषयी त्याला काही ऐकवू लागते की बायबल मध्ये होमोसेक्युअलिटीवर मृत्युदंड अशी शिक्षा आहे तेंव्हा तो पाद्री तिला सांगतो की आत्ता काही बोलू नका माझ्याशी काही बोलायचे असेल तर मला ‘ह्या ह्या’ ठिकाणी भेटा. मेरी परत आपल्या घरी येते आणि बायबल मध्य होमोसेक्स्युअल लोकांना काय शिक्षा सांगितलेत (सोडोम आणि गोमोर्राची बायबल मधली गोष्ट) ह्याच्या नोंदी करून घेऊन परत त्या पाद्रीला नंतर भेटायला जाते त्यात पाद्री तिला थोडक्यात पुराणातली वांगी पुराणात असे एक लेक्चर ऐकवतो आणि उदाहरणेही देतो की लग्नानंतर जर नवऱ्याला असे कळले की नवीन नवरी कुमारिका (VIRGIN) नसेल तर तिला परत माहेर पाठवून दगडाने ठेचून मारावे असे सांगितले आहे (ह्याविषयी मला स्वत:ला काही ज्ञान नाही चित्रपटात जसे आहे तसे लिहिले चू.भू.द्या.घ्या.)तसेच लहान मुलांना करावयाच्या शिक्षा ही फार कठोर सांगितल्या आहेत आपण तसे आत्ता वागतो का? मग हा अन्याय फक्त होमोसेक्स्युअल लोकांवरच का? इतके होवूनही मेरी संभ्रमात असते. पण तिला लवकरच सत्य परीस्थितीची जाणीव होते आणि ती माझ्या मुलाचा मीच खून केला म्हणून मानसिक दृष्ट्या कोसळते, अशावेळी घरचे तसेच हा पाद्री तिला मानसिक आधार देतात. शेवटच्या दृश्यात बॉबीचे संपूर्ण कुटुंबीय (मेरीसकट) गे परेड मध्ये सहभागी होते असे दाखवले आहे आणि सगळ्यात शेवटी खरा बॉबी आणि त्याच्या आईचा फोटोपण दाखवला आहे. पूर्ण चित्रपटात एकच बॉबी आणि त्याच्या मित्राचा किसिंग सीन आहे (पॉर्न वगैरे काही नाही). -------------------------------------------------------------------------------------------------- माझा मित्र वाचला, उच्चाभ्यासाचे तणाव वगैरे सांगून त्याच्या आई वडिलांनी वेळ मारून नेली. पण प्रश्न खरेच सुटला का? आणि भारत सरकारचे असे धोरण - फक्त बाहेर कळत नाही म्हणून असे काही नाही किंवा मी तसा नाही म्हणजे असे काही असणे शक्य नाही हे बरोबर आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4167
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

>>आणि भारत सरकारचे असे धोरण असे धोरण म्हणजे कसे धोरण? चित्रपट परिचय वगैरे ठिक आहे. पण या समस्येसाठी भारत सरकार काय (काय!) करु शकणार आहे? परवाच इथल्या (इंदूरच्या) हायकोर्टानं दोन समलैंगिक युवतींना समाजाकडून त्रास झाल्यास त्या कधीही हायकोर्टाची शरण घेऊ शकतात असा निर्णय दिला आहे. त्या दोघी समलैंगिक आहेत आणि समाज (दोन्हीकडचे नातेवाईक वगैरे) आपल्याला वेगळे पाडू शकतात अशी त्यांना भीती होती म्हणून त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मला वाटतं यात गे लोकांच्या दोन अडचणी आहेत. 1. आपण जसे आहोत तसे समाजाने स्वीकारणे 2. आपण जसे आहोत त्याला समाज मान्यता मिळून जसे आहोत त्याबद्दल ढोल बडवणे. जसे आहात तसे असा की, पण फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका काढू नका.

In reply to by यकु

+१०० याला , यशवंता. मला वाटतं यात गे लोकांच्या दोन अडचणी आहेत. 1. आपण जसे आहोत तसे समाजाने स्वीकारणे 2. आपण जसे आहोत त्याला समाज मान्यता मिळून जसे आहोत त्याबद्दल ढोल बडवणे. जसे आहात तसे असा की, पण फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका काढू नका.

In reply to by यकु

सरकारचे असे धोरण म्हणजे कधी अनैसर्गिक आहे असे म्हणणे नंतर परत फिरणे. ठामपणे कोणतीही भूमिका न घेणे. आणि समस्या नाहीत का? परत इथे समस्या म्हणजे नेमकी कोणती? अनेक असू शकतात कायद्याची, समाजमान्यता नसल्याची आणि राजमान्यतेशिवाय विशेषत: ह्या गोष्टीला समाजमान्यता कठीण आहे असे वैयक्तिक मला वाटते आणि जर अशा समस्या आहेत तर त्या का मांडू नयेत? फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका काढू नका. म्हणजे काय?

In reply to by प्रसाद प्रसाद

फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका काढू नका. म्हणजे काय?
म्हणजे
शेवटच्या दृश्यात बॉबीचे संपूर्ण कुटुंबीय (मेरीसकट) गे परेड मध्ये सहभागी होते असे दाखवले आहे
हे! हे चित्रपटात, आणि त्यातल्या त्यात सातासमुद्रापारच्या चित्रपटातच शक्य असेल.

In reply to by यकु

प्रत्येक गोष्ट चित्रपटाप्रमाणे असावी/व्हावी, असे कुठे म्हटले आहे? आपल्याकडे जरी ह्या बाबतीत कायदा झाला तरी आपल्याकडे परेड वगैरे निघतीलच आणि त्यात आईवडील सामील होतील असे वाटत नाही. एखादी गोष्ट जर खरेच आहे तर ती नाकारण्यापेक्षा योग्य तो कायदा करणे (पूर्वी कायद्याने ‘अशा’ वर्तनावर शिक्षा होती). निदान काहीतरी ठाम भूमिका सरकारने घ्यावी एवढेच म्हणणे आहे.

गे किंवा लेस्बियन ही "समस्या" कशी? जे काही पतीपत्नींमधे होतं ते असंही पब्लिकमधे होतच नाही. जे काही पब्लिकमधे होतं (सोशल ग्यादरिंग, प्रॉपर्टीनिर्माण, वाटप इ इ) त्यात जेंडर स्पेसिफिक (मराठी शब्द विचित्र उच्चारामुळे टाळला) असं काही नसतं. गे / लेस्बियन्सच्या मुलं जन्मास घालण्याच्या अभावाविषयी : "गे" "लेस्बियन" हा काही संसर्गजन्य "रोग" नव्हे की एकदा परवानगी (?) दिली की एकाचं पाहून दुसरा अशा रितीने सगळेच ते अनुसरतील आणि नवीन मुलं जन्माला येणं बंद होईल... त्या प्रकारे जगणार्‍यांचं प्रमाण एकूण लोकसंख्येशी स्थिरच राहणार. नैसर्गिक / अनैसर्गिक असा मुद्दा असेल तर तो फक्त मानण्याचा आहे. उदा. मनुष्यप्राण्यांमधे १ टक्का लोक निसर्गतः समलैंगिक असतात. आईवडील (ज्यांच्या स्वप्नांप्रमाणे त्यांचे मूल मोठं होऊन विरुद्धलिंगी सून / जावई घरी आणेल) मात्र दुखावले जाणार हे खरं. त्याला इलाज नाही. त्याचं ओझं त्या मुला/मुलीवर टाकू नये. आईवडिलांनी पण त्या दुखावलं जाण्यामागे जणू पोर वाया गेलं असा भाव नसावा.. केवळ एक एव्हरग्रीन गरमागरम चर्चा होऊ शकणारा विषय म्हणून अनेक टीव्ही चॅनेल्स आणि मीडिया हा विषय अधूनमधून बासनातून काढून चावतात. ... आता लेखाविषयी : लेख उत्तम. :)

In reply to by गवि

>>>गे किंवा लेस्बियन ही "समस्या" कशी? --- ते जे कुणी त्यांच्या घरात आहेत तोपर्यंत ते ''समस्या'' नाहीतच. त्यांना जेव्हा लोकांकडून त्रास होतो तेव्हा ''ती समस्या'' घेऊन ते कोर्टाकडे जातात. काहीही त्रास झाला की आपण कोर्टाकडे जाऊ शकतो तसेच. जास्तीत जास्त ''या लोकांना त्रास देऊ नये.. दिला जात असेल तर योग्य त्या एजन्सीजनी तो दूर करावा'' एवढेच कोर्ट म्हणू शकेल. पण हे एवढ्यावरच थांबत नाही ना. त्या लोकांची मनिषा असते ते जसे आहेत त्या स्थितीला ''सनदी'' (स्पेशल ट्रिटमेंट?.. अल्पसंख्‍यांकाना हवी असते तशी? ) करावे. हे होणे शक्य आहे? एरव्ही नॉर्मल जोडप्यांनी कुठे कोर्टाकडून ते तसे असण्‍यावर शिक्कामोर्तब म्हणून ''सनद'' मिळवलेली असते? नॉर्मल जोडप्यांची लग्ने ‍रजिस्टर होतात ते वेगळे कारण त्यातून प्रजोत्पत्ती होते आणि त्यातुन उद्भवणार्‍या इतर गोष्‍टी ‍लिगलाइज असाव्या लागतात म्हणून. ढोल बडवणे यातून मला हेच सांगायचे होते.

In reply to by यकु

फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका काढू नका. ह्याविषयी आपले म्हणणे कळाले. आपल्या मताशी काहीसा असहमत आहे. कोर्ट कायदे करत नाही. एखादा कायदा हवा असेल तर सरकारकडून तसे ठाम प्रयत्न किंवा खंडण व्हावे एव्हढेच म्हणणे. फक्त कायद्याची मान्यता असणे ह्याला सनदी करणे असे मानणे असेल तर सनदी का असू नये? कारण ह्याआधी ‘तसे’ वर्तन कायदाबाह्य होते.

In reply to by प्रसाद प्रसाद

एखादा कायदा हवा असेल तर सरकारकडून तसे ठाम प्रयत्न किंवा खंडण व्हावे एव्हढेच म्हणणे
होतंय.. तेही होतंय.. आजच कोर्टानं सरकारला काय ते स्पष्‍ट आणि ठामपणे सांगा अशी तंबी दिलीय.
फक्त कायद्याची मान्यता असणे ह्याला सनदी करणे असे मानणे असेल तर सनदी का असू नये?
1. कायद्याची मान्यता नव्हे (हाच मुद्दा आहे) , 'क्ष' लोक विशिष्‍ट प्रकारे वागतात आणि 'अ' लोकांना ते आवडत नाही म्हणून तो 'क्ष' लोकांना वेगवेगळ्या प्रकारे नाडतात, ती नडवणूक होऊ नये यासाठी कायद्यात 'क्ष' च्या वर्तनास फक्त ''मुभा'', मान्यता नव्हे! 2. 'क्ष' जसा आहे तसे असणे(ही) नैसर्गिक आहे, मग त्याला संरक्षण देण्‍यासाठी कायदा करा, अर्थात तसे असण्‍याच्या स्थितीस कायद्याने ''सनदी'' करा. ते कायद्याने करु नये. कारण (मला वाटते) कायदे गोष्‍टी कशा नसाव्यात हे हाताळतात, विशिष्‍ट लोकांना त्या जशा हव्यात तशा करुन घेण्‍यासाठी कायद्याला आणि कायदे करणार्‍या सरकारला वेठीस धरु नये.
कारण ह्याआधी ‘तसे’ वर्तन कायदाबाह्य होते.
ह्याआधी 'व्यक्तीला' समाजाचा अविभाज्य भाग मानले जात असावे. समाजाचे सगळे भाग सारखेच वर्तन करीत असतील आणि एक भाग मात्र वेगळे वर्तन करीत असेल तर त्याला इतर भागांप्रमाणेच वर्तन करण्‍यास भाग पाडण्‍यासाठी तसे वर्तन कदाचित कायदाबाह्य म्हटले गेले असेल. नंतर असल्या गोष्‍टी कायदाबाह्य करणार्‍या व्यक्तीही गेल्या आणि ते कायदेही गेले. (काही व्यक्तींना मात्र त्या गयागुजर्‍या गोष्‍टींच्या अगदी अंतरंगात शिरुन 'असं होत होतं- असं करावं लागायचं' असं चवीचवीने बोलत रहाण्‍यात इंटरेस्‍ट असतो. ते मजेशीर आहे.) नंतर पुढे चालून 'व्यक्ती स्वतंत्र'* झाली वगैरे वगैरे *(म्हणजे नेमकं काय तोही एक प्रश्नच आहे)

In reply to by यकु

सध्या जो विषय गाजतो आहे तो ‘मुभा’ ह्या सदरात मोडतो, हे ही नसे थोडके.......(हे सरकारबाबत). पण तुम्ही उदाहरण देता त्याप्रमाणे जर खरच नडवणूक होत असेल तर कायदा करून नडवणूक होऊ नये असे वाटते. ह्याबाबतीत कायद्याच्या मान्यतेशिवाय मुभा मिळेल असे वाटत नाही. तसे असण्याणच्या स्थितीस कायद्याने ''सनदी'' करा. माझ्या माहितीप्रमाणे तसे असण्याच्या स्थितीस सनदी करा असा मुद्दा नसून “तसे आहे हे न नाकारता, असेही संबध (Adult & Mutual) समाजात असू शकतात त्यांना कायद्याने शिक्षा होऊ नये किंवा अशा व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने अपराधी नसावेत हा आहे.”

In reply to by प्रसाद प्रसाद

ह्याबाबतीत कायद्याच्या मान्यतेशिवाय मुभा मिळेल असे वाटत नाही.
मान्यता मिळाली की मुभाही मिळेल आणि बाजार उठेल म्हणून सरकार कांकू करीत असेल
माझ्या माहितीप्रमाणे तसे असण्याच्या स्थितीस सनदी करा असा मुद्दा नसून “तसे आहे हे न नाकारता, असेही संबध (Adult & Mutual) समाजात असू शकतात त्यांना कायद्याने शिक्षा होऊ नये किंवा अशा व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने अपराधी नसावेत हा आहे.”
जे काही होईल ते ऐतिहासिक ठरेल. महाराष्‍ट्रात जसे पाटीवर छोट्या अक्षरात 'सरकारमान्य' असे लिहून

दारुचे दुकान

मोठ्या अक्षरात लिहिलेले असते त्याच्या अगदी उलट म. प्र. मध्‍ये

शासकिय मदिरालय

लिहीलेले असते आणि ते लोकांनी दारु प्यावी असे शासनाला वाटत असून त्यासाठीच शासकिय दुकान उघडले आहे असे वाटते. अशीच काहीशी या मुद्याचीही मजा होईल.

होमोसेक्युअलिटी म्हणजे एड्सच अशीच तिची समजूत असते (आणि काही प्रमाणात ती खरी आहे) ....हे वाक्य तुमचं आहे का चित्रपटाशी संदर्भित आहे? तुमचं असेल तर खटकलं; कारण एकुणातच सर्वच शारीरिक सबंधामध्ये एच आय व्ही चा धोका असतोच. होमो मधेच असतो असं काही नाही. यशवंतराव आणि गविंच्या मुद्द्यांशी सहमत.

वरच्या काही प्रश्नांना थोडेसे सुसंदर्भ असा प्रतिसाद मी मागे लिहिला होता. "ढोल-ताशे" असे नेमके नसले, तरी एका मित्राने मला विचारले होते : (मूळ संदर्भातील दुवा) यात "जाहीर करणे कशाकरिता, आणि "सर्वांपेक्षा स्पेशल रेकग्निशन का?" हे प्रश्न अगदी मित्रत्वाने विचारलेले दिसतात. शिवाय प्रसाद प्रसाद यांचा लेख कौटुंबिक परिस्थितीबद्दल आहे, मित्रमंडळातला आहे, त्यामुळे "मित्रांत-घरात जाहीर करण्याबाबत" हे पूर्णपणे सुसंदर्भ आहे. मित्राने विचारले होते :
हे उघड ... कशासाठी केलं असावंस? त्याला काही सबळ कारण आहे काय? (एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!)
त्याला उत्तरे येणेप्रमाणे : ..हे उघड ... कशासाठी केलं असावंस? त्याला काही सबळ कारण आहे काय? याचे सोपे उत्तर आहे, माझा सामान्य व्यवहार [जमेल तितका] प्रामाणिक आहे. हे त्याचेच अंग. येथे अधोरेखित करतो - हा असामान्य प्रामाणिकपणा नाही, बाकीचे लोक जितपत प्रामाणिक असतात तितकाच प्रामाणिकपणा आहे. प्रसिद्धीसाठी उघड केले नाही, हे तर आधीच पटलेले आहे, त्यामुळे तो विचार पुढे चालवत नाही. (एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!) अत्यंत योग्य दिशेने विचार आहे. पण हा विचार इंटरनेटच्या पूर्वीच्या काळी निष्फळ ठरला असता. शरिराच्या आकारामुळे, वरच्या पट्टीतल्या आवाजामुळे, ऐकून-बघूनच स्त्री कोण आणि पुरुष कोण हे कळते. "भद्र"नावे (ऑफिशियल नावे) ही कित्येक भाषांत मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी असतात. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या/लेखाच्या संदर्भात लेखक/लेखिका पुरुष/स्त्री लगेच कळून येते. मिसळपावाच्या टोपणनांवात मात्र कोण पुरुष, कोण स्त्री हे कधीकधी कळून येत नाही. तरी कित्येकदा कोणाला उपप्रतिसादांत कोणी "अमुक-तमुक-दादा" म्हणते तर उप-उपप्रतिसाद येतो - "नाही, मी अमुक-तमुक-ताई आहे". स्त्रियांची नावे ("स्वाती, माधवी" वगैरे स्पष्ट, "सुहास, शिरीष" सारखी संदिग्ध नव्हे) घेऊन काही पुरुष मागे मिसळपावावर वावरत होते, त्याबाबत लेखा-प्रतिसादी झाली होती. असे दिसले की अनेक लोकांना हे ठीक वाटले नाही. पण कोणी पुरुषाने पुलंनी लिहिलेले पुरुष नाव "लखू रिसबूड" घेतले, किंवा कोणी स्त्रीने "सरला पित्रे" नाव घेतले, तर अशा प्रकारे चुकचुक होताना दिसत नाही. त्यामुळे मिसळपावाच्या सदस्यांनी नामनिर्देशाने शक्यतोवर आपण पुरुष की स्त्री आहोत असे सांगावे, असे मिसळपावाच्या अनेक सदस्यांना वाटते. असे दिसते, की बहुतेक लोक "आपण स्त्री की पुरुष" असे कुठल्यातरी पद्धतीने आपणहून सांगतात. नावाने नव्हे, तर "मला दादा नका म्हणू, ताई म्हणा" असे लिहून. ... माझ्या प्रकट (आभासी नव्हे) आयुष्यात ही बाब सांगून-न-सांगून उघड आहे. माझ्या प्रियकरासोबत मी घराबाहेर वावरत असतो, तेव्हा दोन प्रियकर एकमेकांशी ज्या प्रकारे वागतील त्याच प्रकारे मी वागतो. ऑफिसातल्या कोणी विचारले की तुझे लग्न झाले आहे का, किंवा तसे काही ठरले आहे का? तर जे आहे तेच उत्तर देतो. मागे माझ्या प्रियकराच्या गाडीला अपघात झाला होता, आणि मला ऑफिसहून सुटी घेणे भाग होते. तडकाफडकी सुटी मी कोण्या ऐर्‍यागैर्‍यासाठी घेत नव्हतो, आप्त माणसासाठी घेत होतो, हे ऑफिसातल्या वरिष्ठाना कळले नसते तर ते कोड्यात पडले असते. असे लहानसहान प्रसंग रोजच्या आयुष्यात दिवसाला दोनतीन येतात. उदाहरणार्थ कोणी विचारते "आज डब्यात आणलेल्या पदार्थाची पाककृती काय?" "मला माहीत नाही, उद्या त्याला विचारून सांगतो..." प्रश्न असा येऊ शकेल की जर माझ्या रोजच्या आयुष्यात मी इतका "सामान्य"पणे प्रामाणिक आहे (पुन्हा लिहितो, यात असामान्य असे काहीच सांगणे नाही), तर ... (येथे पुढे मिसळपावावर का सांगितले त्याची कारणे आहेत. सार्वजनिक चौकातल्या गे परेडमध्ये मी भाग घेतलेला आहे, तो का घेतला आणि त्यातून काय साध्य झाले/होऊ शकते याबाबत काहीसा याच दिशेने जाऊ शकतो...)

लोकं गे असणं नैसर्गिक नाही किंवा नॉर्मल नाही असं म्हणतात. पण जर निसर्गतःच जर त्यांचा ओढा समलैंगिकतेकडे असेल तर ते अनैसर्गिक कसं? बाकी गे लोकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी कायदा हवाच. नाहीतर कायदे करुनही "समानता" मिळते असं कुठाय!!