मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हद्दपार झालेली चिमणी

सस्नेह · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
परवा माझ्या ३ वर्षाच्या भाचीला सियाला गोष्ट सांगत होते 'एक होती चिमणी अन एक होता कावळा..' सिया म्हणाली 'आत्या मला चिमणी दाखव ना कशी असते ?' पाहिलं तर खरच कि एकाही झाडावर चिमणी दिसेना. आमच्या लहानपणी चिमण्या अन कावळे भरपूर असत झाडांवरून. त्यांची भांडणे पाहणे हा मस्त टाइम पास असायचा. बागेत पाणी सोडले असताना त्या फवाऱ्यात चिवचिव करत अंघोळ करण्याऱ्या चिमण्या पहायला खूप मजा येई. त्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर भुर्रकन उडताना माना वळवून वळवून दुखेपर्यंत पाहत राहायचो. मुठभर तांदूळ टाकले कि सगळा थवा भुर्रकन खाली येताना पाहण्यासाठी आईआजीच्या पाठी लागून सारखे तांदूळ आणत असू. चिमण्यांची घरटी शोधून काढून त्यातली अंडी हळूच डोकावून पाहण्यातले थ्रील वेगळेच ! क़्वचित कधी घरट्यातून खाली पडलेले चिमणीचे पिलू कापसात गुंडाळून पुन्हा घरट्यात नेऊन ठेवण्यासाठी मारामारीसुद्धा व्हायची. त्याला कावळ्याने टोचू नये याची खबरदारी बाहुलीच्या बाळापेक्षा दक्षतेने घेतली जाई. संध्याकाळ झाली हे सूर्य बुडण्याआधी चिमण्यांच्या कर्कश चिवचिवाटाने समजत असे. चिमणी हे मित्रराष्ट्र आणि कावळा शत्रूराष्ट्र . कावळा नेहमी दुष्टच असे. आणि चिमणी गरीब बिचारी. कावळ्याच्या पिलाला कोणी पडले तरी हात लावत नसे. एकदा तर मी चिमण्यांच्या एका गटाला, एका कावळ्याला टोचून टोचून, आपल्या घरट्यापासून हाकलताना पाहिले होते. तेव्हापासून तर चिमणी गरीब बिचारी आणि कावळा दुष्ट हि कल्पना डोक्यात एकदम घट्ट बसली. गोष्टीमधून तर कावळे अन चिमण्याच असत . ‘हा घास चिऊचा..’ पासून बालपणाची, तर ‘चिऊताई दार उघड’ या गोष्टीने कथांची सुरुवात होई. चिमणीची गोष्ट म्हणजे कुणातरी जीवाभावाच्या मैत्रिणीची गोष्ट वाटे. चिमणी हे टोपण नाव गल्लीतील एक तरी मुलीचे असे. एकुणात आमचे बालपण मजेत पार पडण्यात चिमणीचा महत्वाचा वाटा आहे. पण अलीकडे बालकांना चिमणी दाखवण्यापुरती सुद्धा शिल्लक असू नये ? काय हे दुर्दैव ! चिमणीच्या गोष्टीतली मजा या मुलांना अनुभवताच येत नाही. कावळा-चिमणीची गोष्ट म्हणजे त्याना दूरवरच्या अनोळखी प्राण्यांची गोष्ट वाटते.. जिवंत चिमण्यांचे भांडण आणि त्यातले नाट्य यातली मजा त्यांना कुठून समजणार? अलीकडे आमच्या झाडावर काळे तुरा अन दाढीवाले बुलबुल पक्षि येतात. मुठीएवढे रंगीत पक्षि येतात. क़्वचित पोपटांचा थवा दिसतो. थंडीच्या दिवसात मोरपंखी पिसाचा खंड्यासुद्धा दिसतो. पण चिमण्या दिसतच नाहीत. कुठे बरे गेल्या या 'गरीब बिचाऱ्या' चिमण्या ? कुणीतरी आमच्या बालपणीची आठवण म्हणून त्यांना जतन करा हो....

वाचने 6093 वाचनखूण प्रतिक्रिया 25
कुणीतरी आमच्या बालपणीची आठवण म्हणून त्यांना जतन करा हो....
कुणीतरी का? तुम्हीच करु शकता.. ठाण्यात असं करुन खूप चिमण्यांना गोळा केलेली व्यक्ती पाहिली आहे. लाकडी बर्ड बॉक्स बनवून घ्या सुताराकडून. किंवा लाकडी खोके विकत आणून झाडांवर ठोका. चिमण्यांसाठी दाणे आणि पाण्याचे फीडर, अगदी साधे उथळ वाडगे भरुन ठेवा.. पण रोज करायला लागेल. आपोआप चिमण्या जमा व्हायला लागतील. अर्थात मुंबईच्या अनेक भागांत बेसुमार वाढलेल्या कबुतरांमुळे चिमण्या मागे पडतील आणि तेच दाणे फस्त करतील ही शक्यताही आहेच..

In reply to by गवि

यकु 21/02/2012 - 16:56
औरंगाबाद मध्‍ये मागे एका नवागत पेपरने पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची भांडी मोफत वाटली होती.. त्याची आठवण झाली हे पाहून..

गणेशा 21/02/2012 - 16:58
चिमण्यांची संख्या कमी झाली आहे, हे नक्की. चिमण्या येव्हड्या लवकर लोप पावायला लागतील असे लहानपणे वाटत ही नव्हते ... लिखान छान आहे. कावळे/कबुतरे मात्र तितकेसे कमी झाले नाहित जेव्हडे चिमण्यांच्या बाबतीत आहे. वाढते प्रदुषण आणि इतर काही घटकांमुळे चिमणीची प्रतिरोध क्षमता कमी होउन ती नामशेष होत आहे का ?

In reply to by गणेशा

वपाडाव 21/02/2012 - 18:54
चिमण्या येव्हड्या लवकर लोप पावायला लागतील असे लहानपणे वाटत ही नव्हते
मग इस्टिमेट काय होतं तुमचं? कधीपर्यंत नामशेष होतील असं वाटत होतं? अवांतर : मला तर लहानपणी चिमण्याच काय पण एकंदरीत कुणीही ''लोप पावतील का?'' हे कळतही नव्हतं...

चौकटराजा 21/02/2012 - 17:17
@ लिनाजी, बहारदार लेखन . होत्या त्यावेळी चिमण्या म्हणजे मला एक डोकेदुखी होती. आता नाहीत तर घरा भोवती स्मशानशांतता ! या चिमण्यानो परत फिरा ग घराकडे माझ्या ...असं म्हणायची वेळ आली. सयानो..... तुम्ही उंदराएवढ्या उपद्रवी नव्हतात ग बायानो .......

जयंत कुलकर्णी 21/02/2012 - 20:02
फोटो घ्या ! जतन करा. पहायच्या असतील तर एकदा घरी या !

In reply to by जयंत कुलकर्णी

सस्नेह 22/02/2012 - 10:21
मस्तच आलाय फोटो ! आम॑न्त्रणाबद्दल आभार ! एकदा अवश्य येइन छोट्या॑साठी पहायला..

तिमा 21/02/2012 - 20:38
मलापण मध्यंतरीच्या काळात चिमण्या नाहीशा झाल्यात असे वाटत होते. पण आता परत आमच्या सोसायटीत आणि कामाच्या जागीसुद्धा चिमण्या दिसू लागल्या आहेत आणि ते सुद्धा मुंबईत!

सर्वसाक्षी 21/02/2012 - 22:57
सकाळी त्यांना तांदुळ दिल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. मस्त घरभर फिरतात. फक्त त्यांना जर दाणे बाहेर छ्ज्जावर टाकले तर कबुतरांना हाकलायचा उद्योग करावा लागतो. अलिकडे हातभर अंतरावर असलेल्या केबलवर अधुन मधुन पोपटही डोलुन जातात. केबलला लटकत मधेच घरात डोकावतात. लगेच उडुन जातात. रोज सकाळचा त्यांचा लाल तुर्‍यांच्या फुलांचा नाश्ता ठरलेला. खाली पाहिल्यावर लाल धागे सर्वत्र पसरलेले दिसले की समजायचे की पोपट येऊन गेलेले दिसतात.

In reply to by सर्वसाक्षी

नितिन थत्ते 23/02/2012 - 22:31
सहमत आहे. आमच्याही घराच्या आसपास भरपूर चिमण्या आहेत. शिवाय चिमणीपेक्षा छोटा काळा पक्षी आणि पोपटही अलिकडे दिसू लागले आहेत.

५० फक्त 22/02/2012 - 08:30
आमच्या घरी या, रोज सकाळी माझ्या पोराबरोबर दुध प्यायला, मग मी, आई आणि बायको बरोबर नाष्टा करायला हक्कानं येतात, काही दिलं नाही तर कट्टयावरची कणिक खातात, दुधाच्या भांड्यावरचं झाकण पाडायचा प्रयत्न करतात, गेल्या सहा महिन्यात चहाचा चोथा ही त्यांची ' अपमार्केट' डिश आहे. माझ्या मागच्या वर्षीच्या संक्रांतीच्या धाग्यात फोटो आहेत त्यांचे. मागचा उन्हाळा बिन पंख्याचा काढला होता कारण त्यांची घरटी, घरातल्या प्रत्येक पंख्यावर त्यांनी घरटी केलेली होती. थोडक्यात या शहरीकरणाच्या धबडग्यात आम्ही भाग्यवान आहोत,

In reply to by ५० फक्त

सस्नेह 22/02/2012 - 10:19
५० जी आणि सर्वसाक्षी, वाचुन खूप छान वाटल॑..कुठेतरी आहेत म्हणायच्या चिमण्या ! शहरीकरणामुळे खाणे मिळत नसावे म्हणून इतक्या धीट झाल्या आहेत. नाहीतर ती बुजरी जात.. Anyway, सा॑भाळा त्या॑ना. पुढच्या पिढीसाठी !

In reply to by सस्नेह

शैलेन्द्र 22/02/2012 - 21:08
"शहरीकरणामुळे खाणे मिळत नसावे म्हणून इतक्या धीट झाल्या आहेत. नाहीतर ती बुजरी जात.." चीमण्या आणी बुजर्‍या? चिमणी/ कावळा/ कबुतर/ साळुंक्या हे पक्षी मानवी वस्तीच्या आसपासच असतात..

प्रभाकर पेठकर 22/02/2012 - 16:34
चिमण्या नामशेष झाल्या आहेत असे वाटत नाही. दररोज दिसतात, घरात डोकावतात. २-२, ३-३ उड्यांच्या साहाय्याने थांबत थांबत, रोजच्याच ओळखीच्या माणसांच्या प्रत्येक हालचालीत, 'आपल्याला धोका तर नाही नं?' ह्याचा अंदाज बांधत घरात शिरतातही. गळ्यावर काळा डाग म्हणजे 'चिमणा' आणि डाग नसेल तर 'चिमणी' हे गणित लहानपणी कोणीतरी शिकविलं होतं. खरंखोटं माहित नाही पण माझा अजून त्यावर विश्वास आहे. कौलारू घरं जशजशी कमी होत गेली तशी त्यांची संख्या रोडावली असावी. आमचं मुंबईतलं घर अजून ही कौलारु आहे त्यामुळे चिमण्यांचा वावर बर्‍यापैकी आहे. भिंत आणि कौलं ह्यांच्या सापटीत गवत, कापुस इत्यादी वस्तूंनी चिमण्या आपली घरटी शाकारतात. चिमणी सहसा हाती लागत नाही. फार चपळ आणि सावध पक्षी. पण पिल्लांसाठी घरट्यात शिरलेली एखादी चिमणी क्षणभराकरीता बेसावध होते आणि हाती गवसते. पण, नंतर तिला सोडून दिल्यावर इतर चिमण्या तिला टोचा मारून मारून ठार करतात, हे पाहिलं आहे. माणसाच्या अंगाचा वास आल्यास अशा चिमणीला इतर शांत,सोज्वळ चिमण्या आक्रमक होऊन मारून टाकतात असे लहानपणी कोणीतरी सांगितले. त्या नंतर चिमण्या पकडण्याचे आमचे उद्योग आम्ही बंद केले. चिमणीची विष्ठा मेंदीमध्ये मिसळल्यास (अत्यल्प प्रमाणार) मेंदी छान रंगते असे म्हणतात. चिमण्या सतत घरात शिरून चिवचिवाटाने उच्छाद मांडत असतील तर त्यांच्या येण्या-जाण्याची खिडकी काही दिवस (५-६ दिवस) बंद ठेवावी. नंतर उघडी केली तरी त्यांचा रोजचा राबता कमी होतो. चिमण्यांना घरटे असते. त्या घरात त्या दिवस रात्र राहतात पण प्रणयक्रिडा मात्र दिवसाढवळ्या, स्वच्छ प्रकाशात सर्वांसमक्ष उघड्यावर का करतात अजून कोडे आहे. असो. मर्जी त्यांची.

In reply to by प्रभाकर पेठकर

हंस 22/02/2012 - 21:29
चिमणीची विष्ठा मेंदीमध्ये मिसळल्यास (अत्यल्प प्रमाणार) मेंदी छान रंगते असे म्हणतात. हे प्रयोग आम्ही लहानपणी केलेले आहेत. ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

सुहास.. 23/02/2012 - 14:55
पेठकर कांकाशी सहमत !! चिमण्या दिसत नाहीत ? अश्या कुठल्या जगात रहात हो ताई ? माझ्या ईथे तर ' कोल्हे ' पण दिसतात, काल-परवा , महाशिवरात्रीच्या दिवशी खोपेश्वर ला गेलो होतो तर ईंद्रायणीकाठी मोर-लांडोर पण दिसले !!
आमच्या हॉलच्या खिडकीत होतं घरटं. मि. & मिसेस चिमणी सहकुटुंब उडून गेल्यावर ते काढून टाकलं. तुम्हाला त्या नाहीत म्हणून वाईट वाटतंय आणि आम्हाला त्या आहेत म्हणून !! असो.

पैसा 23/02/2012 - 21:59
हल्ली चिमण्या कमी दिसतात हे खरं, पण त्याचं कारण बहुतेक हे असावं की चिमण्या खूप दिसायच्या तेव्हा मी खेड्यात रहात होते, आणि आता शहरात रहाते. शहरातले एका खास वर्गातले लोक कबुतरांना दाणे घालतात, पण तिथे चिमण्या कधी दिसत नाहीत. कावळे मात्र सगळीकडेच दिसतात.