✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दर्शनेच्छा बलियसि!

ह
हरिकथा यांनी
Fri, 12/23/2011 - 17:11  ·  लेख
लेख
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं. संध्याकाळचे ते वृन्दावनातल्या राधा-गोविन्दजींच्या मंदिरात जावून रडत रडत त्यांना निवेदन करायचे आणि तिथून येता येता गावात केवळ चार घरची माधुकरी मागून जे मिळेल त्यात समाधान मानायचे. येता-जाता, खाता-पिता कुठल्याही वेळी त्यांचं अश्रुविसर्जन काही थांबायचं नाही. मदनटेरवाल्या बाबाजींनी अशाप्रकारे चाळीस वर्ष राधा-कृष्णांच्या विरहात रडत रडत, अश्रुपात करत काढली. सततच्या अश्रुपाताने त्यांची दृष्टी क्षीण होत गेली आणि पुढे ते पूर्णपणे आंधळे झाले. तरीही दृष्टीहीनतेबद्दल कुणी त्यांना कधीच चिडलेलं, क्षुब्ध झालेलं पाहिलं नाही. बाबाजींच्या मते, डोळ्यांची सार्थकता राधा-कृष्णांच्या दर्शनामध्ये होती आणि ते दर्शन जर त्यांचे चर्मचक्षु करून देऊ शकत नसतील तर त्यांना अशा डोळ्यांच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडणार नव्हता किंबहुना असे डोळे नसलेलेच बरे, असा त्यांचा विचार होता. आता मात्र इतक्या वर्षांनी बाबाजींना आयुष्याच्या संध्याछायांची जाणीव होऊ लागली होती आणि त्यांच्या युगल दर्शन मिळवण्यासाठी राखलेल्या धैर्याचा बांध ढळू लागला होता. त्यांची राधा-कृष्णांच्या संबंधातली विरहावस्था टिपेला पोहोचलेली. त्या विरहवेदना त्यांना असह्य होऊ लागल्या होत्या. तासन्तास मदनटेरवरच्या झाडींमध्ये या वेदनांमुळे मुर्च्छित होऊन ते पडून राहत पण अशा निर्जन स्थानी त्यांची विचारपूस करायला तरी कोण येणार? तिथे असणारे मोर, कोकिळ आणि शुकादि पक्षीच आपल्या कलरवाने त्यांची सोबत करायचे. असेच एक दिवस राधा-कृष्णांच्या विरह-वेदनेने व्याकुळ होऊन बाबाजी मुर्च्छित पडले. आडरस्त्याच्या जागेत असल्याने कुणालाच त्यांच्याबद्दल काही कळलं नाही आणि ते अगदी रात्रभर तिथेच पडून राहिले. कर्मधर्म संयोगाने दुसर्‍या दिवशी सकाळी कुणा परिक्रमा करणार्‍या यात्रेकरूंच्या गटाला त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी बाबाजींना ओळखले. त्याच अवस्थेत उचलून त्या गटाने बाबाजींना राधा-मदनमोहन मंदिरात आणले. त्यांची अवस्था बघून मंदिराच्या सेवाईत गोस्वामींनी ताडले की बाबाजींना काही विशेष अनुभव आलेला आहे. त्यांनी तात्काळ बाबाजींच्या भोवती भजनी-मंडळाला पाचारण करून हरि-कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनाचे सूर कानी पडू लागताच बाबाजींची शुद्ध परत आली. बाबाजी यथायोग्य शुद्धीवर आल्याबरोबर सेवेकरी गोस्वामीजी त्यांना घेऊन मंदिरात आतल्या बाजूच्या खोलीत गेले. तिथे त्यांच्या अणि बाबाजींच्या शिवाय आणखी कुणीच नव्हतं. अजूनही अश्रु विसर्जन करणार्‍या बाबाजींना गोस्वामीजींनी त्यांच्या इतक्या प्रदीर्घ मूर्च्छेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी रडत रडत त्यांचा वृत्तांत कथन केला. बाबाजी म्हणाले, "नेहमी प्रमाणे काल स्नानादि प्रातर्विधी आटोपून मी पाण्याने भरलेलं एक वाडगं घेऊन मदनटेरवरच्या दाट झाडीत जाऊन बसलो. नित्याप्रमाणे लीला-स्मरण करत असताना तेव्हा मला युगल सरकारांचा विरह अधिकच जाणवू लागला आणि मी दु:खातिरेकाने तिथल्या मातीतच तळमळू लागलो. मला आतून आतून प्रचंड दु:खाचे कढ येत होते आणि अगदी सहन होईना तेव्हा मी हंबरडा फोडून रडू लागलो. नाही तरी त्या रानात माझं रडं कोणा माणसाला ऐकू जाणार होतं? आणि कुणाला त्याचा त्रास होणार होता? म्हणून पार निलाजरेपणाने मी युगलमूर्तीला आठवून आठवून लहान मुलासारखा रडत होतो. इतक्यात मला कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी जवळपास उभं होतं. या ग्रीष्माच्या दिवसात हेमन्तातल्या सारखी थंड वार्‍याची झुळुक येत होती, जवळपास कुठेतरी शरदामध्ये फुलतो तसा सप्तपर्ण फुलल्यासारखं वाटायला लागलेलं, बहुदा त्याच्या फुलांचाच असावा असा वाटणारा गंध येऊ लागलेला. बाजूला ती दोघं आपापसात बोलत होती. एक मुलगा नि एक मुलगी." ती मुलगी त्या मुलाला म्हणाली, "अरे बघ ना हा बाबा किती रडतोय! जरा हसव की त्याला." मुलीने असं म्हणताच तो मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "बाबा, अरे का रडतोयस तू? तुला कुणी मारलं का? कुणी तुझं काही चोरून नेलंय का?" मी त्याला काय उत्तर देणार होतो? माझी वेदना त्याला काय सांगणार होतो? आधीच माझ्या दु:खाच्या उमाळ्यांनी मी अस्वस्थ होतो त्यात त्या मुलाचे प्रश्न ऐकून मला थोडं वैतागायलाच झालं. मी त्याला म्हणालो, "काही नाही, तुला समजायचं नाही. मुला! तू इथून जाच कसा?” त्यावर तो मला म्हणाला, "अरे बाबा, तुला काय हवंय, या उकाड्याच्या दिवसात इथे उन्हातान्हात बसलायस तर तुला थंड ताक आणून देऊ का? भाकरी आणून देऊ का? तुला काय हवंय ते सांग, आणून देतो पण तू असा रडू नकोस रे!" त्या मुलाचे प्रश्नावर प्रश्न ऐकून मला आणखीनच तिरसटायला झालं. मी तोंड फिरवून त्याला म्हणालो, "अरे गवळ्या! तुझा काय संबंध माझ्याशी? तू आपला तुझ्या गायी चारायला जा ना! सांगतोय मगापासून तुला काही कळणार नाही तरी का प्रश्न विचारून सतावतोयस?" मी असं म्हण्टल्यावर तो मुलगा त्या मुलीकडे जाऊन तिला म्हणाला, "बाबा तर काही ऐकतच नाहीये. रडतोच आहे, रडतोच आहे. काय करावं?” त्यावर ती मुलगी त्याला म्हणाली, "प्रियतम, तुला नाही जमायचं त्याला हसवणं! मीच बघ त्याला कशी हसवते ते." ती मुलगी माझ्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात मला म्हणाली, "बाबा, तू का रडतोयस? तुझी बायको मेली का रे?" मी विरह वेदनेने तळमळत असतानाही तिच्या त्या प्रश्नाने मला हसू आलं. मी तिला म्हणालो, "लाली, मला बायको वगैरे कुणीच नाही." त्यावर ती मला म्हणाली, "म्हणजे तू ज्याच्यासाठी रडतोयस ते तुझे कुणीच नाहीत तर!" मी उत्तरलो, "लाली, मी असाच कुणासाठी रडत नाहीये पण जे मला अगदी विसरून गेलेत त्यांच्यासाठी रडतोय." आमचं हे संभाषण चाललेलं तेव्हढ्यात तो मुलगाही त्या मुलीशेजारी येऊन थांबल्याचं मला जाणवलं. माझ्याजवळ बसून तिने विचारलं, "अरे, ते आहेत तरी कोण?" मी तिला म्हणालो, "तुला कळणार नाही, लाली! हा ब्रजचा छलिया, ज्याचं आयुष्यभर भजन करत करत मी आता म्हातारा झालोय, एक झलकही अजून दाखवली नाहिये त्याने! आणि तुला काय सांगू लाली, त्या बाँके-बिहारीच्या सान्निध्यात आमची राधाराणीही अगदी निष्ठूर बनून गेलीय." "मी? मी निष्ठूर बनलेय?" अचानक ती मुलगी म्हणाली, मग सावरून पुढे बोलली, "म्हणजे अरे बाबा, माझं नावही राधाराणीच आहे ना! पण मला सांग आता तुला काय हवंय?" "आता काय हवं असणार?," मी म्हणालो, "आता आयुष्याच्या सायंकाळी त्यांची एक झलक जरी बघायला मिळाली तरी खूप आहे." मी असं म्हणताच खुदकन हसून ती मला म्हणाली, "बाबा, अरे तू तर एकदम भोळाच आहेस रे, तुला डोळेच नाहीत तर तू बघणार कसा?" तिने असं म्हणताच मी बोललो, "लाली, भोळी तर तूच आहेस, जेव्हा राधाकृष्ण माझ्या जवळ येतील आणि आपल्या हाताने स्पर्श करतील तेव्हा माझ्या नेत्रज्योती तात्काळ परत नाही का येणार?" मी असं म्हणतोय तोच त्या मुलीने माझ्या एका डोळ्याला स्पर्श केला आणि दुसर्‍या डोळ्याला त्या मुलाने स्पर्श केला. त्या दोघांच्या स्पर्शाबरोबरच मला एक झगमगता प्रकाश दिसला. मला दिसायला लागलं होतं. माझ्यासमोर एका मुलाचे आणि मुलीचे चरणकमल होते. ते बघून समोर कोण आहेत हे बघण्यासाठी मी नजर उचलली तर मला माझ्यासमोर उभ्या असलेल्या राधाकृष्णांच दर्शन झालं. मी अगदी भावविह्वल झालो, तोंडातून शब्द फुटेना, हर्षातिरेकाने माझं उर भरून जातंय की काय असं वाटायल लागलं. युगलसरकारांच दर्शन होताच मी मोठमोठ्याने त्यांचा जयजयकार करू लागलो. आनंदाची भावना जणू माझं हृदय फोडून बाहेर पडू बघत होती. मी राधाकृष्णांना वंदन करण्यासाठी त्यांच्या चरणकमळाशी दण्डवत करतच होतो की आनंदातिशयाने मी तिथेच मूर्च्छित होऊन पडलो." मदनटेरवाल्या बाबाजींनी ज्याची कामना केलेली त्याची प्राप्तीही त्यांना झाली. पण तरीही त्यांचं रडणं काही थांबलं नाही तर अधिकच वाढलं. राधाकृष्णाच्या एकवेळच्या दर्शनाच्या सुखापेक्षा त्यांच्या त्यानंतरच्या अदर्शनाचं दु:ख त्यांना अधिक असह्य होत होतं. त्या दु:खातच बाबाजी आपला जडदेह सोडून सिद्धदेहाद्वारे राधाकृष्णांच्या परिकरगणांमध्ये सामिल झाले. युगल सरकार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
9373 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

त्यातून काहीच होत नाही. वह्या

अन्या दातार
Mon, 12/26/2011 - 10:22 नवीन
त्यातून काहीच होत नाही. वह्या भरतात आणि पेनाच्या रीफीली संपतात. एवढेच.
कित्ती विरोधाभास आहे तुमच्या वाक्यात. वह्या भरतात व रिफिली संपतात असे म्हणताच, वर काहीच होत नाही असे म्हणता?? वह्या आणि रिफिलिंचा खप काय वाढतो, आर्थिक प्रगतीस हातभारही लागतो कि साहेब ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

असेच शिर्डीच्या

मराठी_माणूस
Mon, 12/26/2011 - 10:36 नवीन
असेच शिर्डीच्या पदयात्रेबद्दल म्हणता येईल . जागोजागी केलेली घाण, रहदारीस अडथळा , मानवी शक्तीचा अपव्यय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कथा जम्माडी गंमत आहे हे

मृत्युन्जय
Mon, 12/26/2011 - 10:49 नवीन
कथा जम्माडी गंमत आहे हे सांगण्यासाठी इतिहास संशोधकाची गरज नाही. कथेतुन काहीतरी बोध घ्यायचा आहे आणि तो धागाप्रवर्तकाने म्हटल्याप्रमाणे ज्याचा त्याने घेणे जास्त उचित ठरेल. मी तरी एवढाच बोध घेतला की: १. देवाच्या दर्शनाची सच्ची आस असेल तर देवदर्शन नक्की होते २. देवदर्शनाची भूक कधीही न संपणारी असते. जर एकदा दर्शन झाले तर ते परत परत व्हावेसे वाटत राहते. जर एखादा माणूस झपाटल्यासारखे देवदर्शनासाठी आतुर झाला तर त्यालाच केवळ त्या विरहाची आर्तता कळेल. अन्यथा इतरांनी ती कळणे अशक्य आहे. आता या बोधकथेत राधा खरी होती की नव्हती, राधा कृष्णापेक्षा मोठी होती की लहान. कृष्णाचे आणि राधेचे शरीरसंबंध होते की नव्हते किंवा तश्या काही इच्छा होत्या की नव्हत्या (वरती कोणीतरी इन्सेस्ट शब्दाचा वापर केला आहे म्हणुन लिहितो), राधेच्या नवर्‍यावर अन्य्याय झाला की नाही हे सर्व मुद्दे गौण ठरतात. हे सर्व मुद्दे जेव्हा महाभारताचा इतिहास म्हणुन अभ्यास कराल तेव्हा जरुर चर्चावे पण या गोष्टीसाठी ते मुद्दे गौण ठरावेत. राधा कृष्णाच्या नात्यावर ज्याला कोणाला इन्सेस्ट सुचु शकते त्याला शतश: प्रणाम. (हे मास्तरांना सुचले याचे खरोखर वाईट वाटले. )
  • Log in or register to post comments

बरोबर

विनायक प्रभू
Mon, 12/26/2011 - 11:15 नवीन
काही जणाना वाईट वाटायची शक्यता मनात आल्याबरोबर प्रतिसाद काढुन टाकला.(३ वर्षात पहील्यांदा) असो.
  • Log in or register to post comments

हे

मन१
Mon, 12/26/2011 - 17:14 नवीन
हे वाचून वाइट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

चांगली कथा. माहित नव्हती.

राघव
Mon, 12/26/2011 - 16:40 नवीन
चांगली कथा. माहित नव्हती. सांगीतल्याबद्दल धन्यवाद. मनोभाव तसा देव. बाकी सत्यासत्यतेच्या वादापासून लांबच राहिलेले बरे. ज्याला जे हवे ते तो घेतो. काशीला जाऊन आल्यावर घाण आठवायची, पंड्यांचे प्रताप आठवायचे की श्रीविश्वेश्वराचे रूप आठवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यावर वाद घालण्यात काय हशील, नाही? राघव
  • Log in or register to post comments

सुरेख कथा... ही कथा वाचुन ही

मदनबाण
Mon, 12/26/2011 - 19:36 नवीन
सुरेख कथा... :) ही कथा वाचुन ही ओळ आठवली... मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई। आपल्या कथा वाचत आहे... :) (भगवंताचा दास)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा