देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता
नमस्कार मंडळी-
१४२ वर्षापूर्वी संगीताताल चमत्कार गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लेख लॉस एन्जेलिस येथील साहित्यिक श्री. शशिकांत पानट ह्यांनी लिहिला तो आपल्याला वाचायला आवडेल असे वाटले म्हणून पाठवित आहे. त्यांची पूर्व-परवानगी घेउन हा लेख "मिसळपाव" वर प्रकाशित करीत आहे.
कळावे,
धन्यवाद,
आकाश
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री
भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता
जन्म दिन: १७ आक्टोबर, १८६९
आज १७ आक्टोबर २०११ ह्या दिवशी भास्करबुवांच्या जन्मतिथीला बरोबर १४२ वर्षे होत आहेत. भारतीय संगीताच्या ईतिहासांत आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनीच लिहोन ठेवायला हवा! शतकां शतकांमधून असा एखादाच कलाकार निर्माण होतो.
प्रत्येक कलाकाराचं कांहेतरी वैशिष्ठ असतं. स्वरांचा जीवंतपणा, रागाच्याच अंगाने त्याला सच्चेपणाने ऊठाव देणारी अप्रतिम गायकी, आणि तालाचे लालित्य हे तीनही गुण सारख्याच ऊत्कर्षाला पोहोचलेले भारतीय संगीतांतले अतिशय महत्वाचे गायक असं त्यांचं वर्णन केलं जातं ते "केवळ ह्या सम हा" अशाच विश्वासामुळे!
भास्करबुवांबद्दल तशा अनेक गोष्टी सांगता येतील. ज्या काळाच्या वातावरणांत ते वाढले त्यावेळेच्या रितीनुसार इतर गायक फक्त गुरुने शिकविलेल्या घराण्याचच गाणं गात असत. मात्र भास्करबुवांचं सगळच निराळं होतं. आजकालच्या American Corporate च नविन तंत्र, की ज्याला Out of Box Thinking म्हणून जगाच्या कानाकोप-यांत ओळखलं जातं, ते त्यांनी त्याकाळी आत्मसात केलेलं होतं हे आज सांगुनही विश्वास न ठेवण्यासारखच आहे. केवळ आपल्या घराण्याचच नव्हे तर ईतर संगीत प्रकारही त्यांनी शिताफीने हाताळलेले आहेत, ख्याल गायकी पासुन, ठुमरी, भजने, नाट्यगीते ईतकेच नव्हे तर लावणी पर्यंतचा देखील त्यांचा अभ्यास होता. बुवांनी दिलेल्या नाट्यगीतांच्या चाली म्हणूनच आज १०० वर्षांनंतरही बागेतल्या एखाद्या सुगंधी आणि ताज्या फुलाप्रमाणे दरवळत आहेत.
चौफेर व्यक्तिमत्व, आणि निरिक्षणात्मक अभ्यासु वृत्ती ह्या बरोबरच अखादी नविन गोष्ट दिसली की त्याबाबतीत लहान मुलाला जशी एक प्रकारची जिज्ञासा असते आणि निरागसपणे तो ती पाहायचा आणि हाताळायचा प्रयत्न करतो, तशा खुल्या मनाने ते ती नविन गोष्टी शिकायचा प्रयत्न करायचे. केवळ आपल्याच घराण्याची गायकी गाणा-या त्यावेळेच्या कलाकारांना हा प्रकार नविन वाटला नाही तरच नवल!
भास्करबुवा ज्या वेळी गंधर्व नाटक कंपनीत काम करायचे त्यावेळेची ही एक गोष्ट आहे. संगीत स्वयंवर ह्या नाटकांतील पदांना भास्करबुवांनी चाली दिल्या म्हणून अल्लादियाखांसाहेब खूप नाराज झाले. भास्करबुवा त्यांना म्हणाले " आपण रागावू नका, पण नाटकाला या आणि आपलं मत जरूर सांगा" ठरल्याप्रमाणे अल्लादियाखांसाहेब नाटकाला आले. ’स्वकुल तारकसुता’ सुरू झाल्यावर बसल्या जागेवरून "वा, क्या बात है! शाब्बास " असं ऒरडले. बुवांचा केव्हढा हा आत्मविश्वास!
श्री. बाळकृष्णबुवा ईचकरंजीकर, त्यांचे शिष्य श्री. विष्णु दिगंबर पलुस्कर आणि भास्करबुवांचे समकालीन गायक कलाकार गायनाचार्य वझेबुवा ह्या सर्वांनी त्यांची मन:पूर्वक स्तुती केली. "बहुढंगी गायकी आणि गायकीतील सौंदर्यमुल्यांचा जोपासक" अशा प्रकारे स्तुतीसुमनांचा त्यांच्यावर वर्षाव पाडला! आणि बुवांनी देखील जाणीवपूर्वक कधी ठुमरीचा ख्याल होवू दिला नाही!
भास्करबुवांनी "पुणे भारत गायन समाजाची" स्थापना १९११ साली केली. त्यावेळी सतारीचे शिक्षक म्हणून एकनाथ पंडीतांना त्यांनी गायन समाजांत घेतलं होतं. त्या दोघांचं खूप जमायचं. सवड मिळाली की अस्ताई-अंतरे बरोबर आहेत की नाहीत ह्याची खात्री बुवा त्यांचेकडून करून घेत.
त्याकाळी बहुतेक कलाकार मुस्लीम असत आणि त्यांच्याकडे शागिर्दी करुन शिकणे ही कांही सोपी गोष्ट नसायची! बडोद्यांत असतांना भास्करबुवा ऊस्ताद फैजमहंमद ह्यांचेकडे शिकायला आले. बुवांना त्यांची सेवा करावी लागे. केरवारा करावा लागे. सांगतील ती कामे निमूटपणे करायची आणि ऊस्ताद शिकवितील तेव्हढे प्रश्न न विचारता शिकून घ्यायचे हाच त्यावेळेचा रितीरिवाज आणि शिस्त असायची! एकदां खांसाहेब बुवांना म्हणाले" आज गायीचं मांस बाजारांतून तू घेवून ये, ते मी शिजविणार आणि खाणार" बुवा म्हणाले ठीक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी बाजारांतून ते आणलं. खांसाहेबांना काय वाटलं कुणास ठावूक! ते बुवांना म्हणाले" तू हिंदू आहेस ना!" त्यावर बुवांनी ऊत्तर दिलं: "ह्या क्षणी मी फक्त आपला शिष्य आहे, आणखी कुणीही नाही" खांसाहेब गहिवरले! आणि डोळ्यांतले अश्रु पुसत पुसतच तालमीला सुरुवात केली! बुवांचा गायनकलेवरचा आणि शिकण्याचा विश्वास तसच एकाग्रता ही अशी अलौकिक होती!
मराठी नाटकांतील पदांना संगीतबद्ध करण्यांत बुवांचं वैशिष्ठ काय? त्याबद्दल मधुसुदन कालेलकर म्हणतात: " मराठी नाट्यसंगीतांत क्रांती घडली ती केवळ गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांच्यामुळेच. कारण भास्करबुवा नुसते चाली देणारे नव्हते, ते संगीत दिग्दर्शक होते, कंपोजर होते. त्यामुळे पदांतील वजनदारपणा, पीळ, मूळ भारदस्तपणाला धक्का न लागू देतां संगीतानुकुलता जपणं आणि नट गायकाला त्या रचनेच्या बर्तावांतील बारकावे नाट्यांगाच्या द्रुष्टीने समजावून सांगणं ह्या सर्व प्रक्रिया बुवांनी साक्षेपपूर्वक सांभाळल्या. म्हणूनच की काय बुवांच्या एकंदर संगीतामध्ये एक सार्वत्रिक एकजिनसीपणा, आणि नेमकेपणा आहे."
भास्करबुवा बखलेंनी खानदानी चीजांना नाट्यसंगीताची डूब दिली, स्वर, लय, ऊच्चार आणि गती ह्यांचं आपण एखाद्या प्रयोग शाळेत करतो तसं अप्रतिम आणि नेमकं मिश्रण केलं आणि ते ’औषध’ संगीतप्रेमी जनतेच्या मनाला, ह्रुदयाला बरोबर लागू पडलं! दाणेदार तान, शब्दांचा रसानुरूप आणि स्वच्छ आवाज, लयबद्ध आणि भावानुकूल गायन हा सर्व गुणसमुच्चय भास्करबुवांनी आपल्या शिष्यांना शिकविला.
आज त्यांच्या जन्मदिनी "संशोयकल्लोळ" ह्या नाटकांतील "धन्य आनंद दिन" हे गाणे आठवले नाही तरच नवल!
गायनाचार्य भास्करबुवा बखले, आज जगांतले सारे संगीतप्रेमी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत ती आपण स्वीकारावी हीच विनंती!
संदर्भ: "देव-गंधर्व-" शैला दातार
शशिकांत पानट
१७ आक्टोबर, २०११
प्रतिक्रिया
चांगली माहिती! बखलेबुवा
खुप छान लेख इथे दिल्याबद्दल
चांगली माहिती.