✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!

प
प्रियाली यांनी
Sun, 09/25/2011 - 23:49  ·  लेख
लेख
सौ.अ.जि.१ पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा: पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे. सदर व्यक्तीचा लोकांनी या लेखात जाहीर निषेध करावा अशी मी विनंती करते. सर्वपित्री जवळ येत असताना काहीच चमत्कारिक आणि भयंकर घडू नये अशी माझी इच्छा नव्हती पण हिंदू क्यालेंडरानुसार यावर्षी सर्वपित्रीने आमच्या लाडक्या हॅलोविनला कल्टी दिली, त्यातून नव्या प्रोजेक्टचे भूत मानेवर बसलेले त्यामुळे सर्वपित्री गुळमुळीत निघून जाते असेच वाटले होते पण पैसाताईंमुळे काहीतरी भयंकर धागा टाकण्याचा योग आला आहे. त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान२ बनवले आहे. अवांतरः सहज आठवलं म्हणून आमच्या एका आयटमला आम्ही फ्यांटम म्हणत असू, दुसर्‍याला वेताळ तर तिसर्‍याला मुंजा.
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी भुते बनतात. बाहेरची बाधा होणे, माणूस झपाटला जाणे असे प्रकार घडतात. इच्छा अतृप्त राहिलेला किंवा अनैसर्गिक मृत्यू आलेला मनुष्य भूत बनतो असे समजले जाते. माणसाचे भूत बनून त्याने त्रास देऊ नये म्हणून श्राद्ध करणे, दिवस करणे, शांती करणे इ. प्रकार केले जातात. हे सर्व ठीक पण ही चर्चा भूत कसे काढावे त्यावर नसून भूत कसे बनते त्यावर आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही “मग तो व्यक्ती भूत बनला....” अशा टैपाच्या गोष्टी ऐकल्या असतील त्या इथे सांगा बघू. भूत नेमके कसे बनते? त्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात? भूत कोणत्याही तिथीला बनता येते का? इतर कोणाला बनवता येत नसल्यास स्वतःच स्वतःला भूत बनता येते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांचेही भूत बनते का? कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या गोष्टी थोडक्यात इथे सांगाव्या आणि मिपाकरांना उपकृत करावे. बिगर कोकणी लोकांनाही हे आवाहन लागू आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रतिसाद देताना तो भयंकर आणि चमत्कारिक आहे याची दखल घ्यावी. सुरुवात माझ्यापासून करते: आमची आजी (बाबांची आई) पक्की कोकणातली. लहानपणापासून तिने मला भुतांच्या गोष्टींचेच बाळकडू देऊन वाढवले. आमच्या आईला हा प्रकार पसंत नसे पण तिची काय बिशाद होती आजीसमोर शब्द काढण्याची. आजीने तिला तिथेच माणसांतून उठवली असती अर्थातच, तसं कधी घडले नाही. आजीच्या गावी एक कोळी होता. त्याचं नाव पाकुल्या. पाकुल्या तसा वयानुसार कमरेतून वाकला होता. मच्छीमारी सोडून किनार्‍यावर सुकवायला टाकलेल्या खारवलेल्या माशांची रखवाली करत असे. अशाच एका रात्री पौर्णिमा अली. त्या पुनवेच्या रात्री चंद्र आकाशात वर आला होता. समुद्राचं पाणी चांदीसारखं चमचमत होतं. रुपेरी वाळूने चंद्राला स्वत:त सामावून घेतल्याचा भास होत होता. किनार्‍यावर मंद वारा सुटला होता आणि त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला. अजूनही कधीतरी पौर्णिमेच्या शांत रात्री समुद्रावर भटकायला गेलेल्या लोकांना पाकुल्या दिसतो. खारवायला टाकलेल्या माशांची रखवाली करत असतो. फक्त पाकुल्याचं अंग तो मेला त्या रात्री समुद्र आणि वाळू चमकत होती तसंच चांदीसारखं चमचमत असतं. लोक त्याला आता “पाकुल्या चकचक” म्हणतात. तात्पर्यः पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जाऊ नये. गेलात तर चकचक हे उपनाम मानगुटीवर बसायची शक्यता आहे. तसेही पौर्णिमेला काय करावे याचा सल्ला युयुत्सुंकडून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे. आता येऊ द्या – खवीस, हडळे, गिरे, हाकामारी, चकवा यांच्या कहाण्या ऐकण्यास उत्सुक. सर्वांना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा!! (हडळ नं. १) प्रियाली.
१ अ. जि. = अद्याप जिवंत २ हे विडंबन नाही. सदर लेखाचा प्रेरणा म्हणून वापर केला आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
58579 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

दारुकाम झाल्यावर रिकाम्या

अविनाशकुलकर्णी
Sun, 09/25/2011 - 23:59 नवीन
दारुकाम झाल्यावर रिकाम्या बाटलीतुन भूत काढायच्या पुसट आठव्णी आहेत.. भुते **भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का? **भुताचे पाय उलटे असतात का? **उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का? **भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो} **हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का? **आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या.. कोण आहेत? **एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार माहिति देवु शकतिल का???????? ** आरश्यात भुताचे प्रतिबिंब दिसत नाहि हे ऎकलेले खरे आहे का??? एक ना अनेक प्रश्णांचे मोहळ उठले आहे..
  • Log in or register to post comments

हेहेहे

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 00:21 नवीन
हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
मिपावरचे सर्व लग्न झालेले पुरुष या प्रश्नाचे उत्तर हो असे देतील असा अंदाज आहे.
भुताचे पाय उलटे असतात का?
गेल्यावेळी माझे पाय कोणीतरी तपासले होते पण असे काहीतरी होईल अशी अटकळ असल्याने मी पाय सुलट फिरवून ठेवले होते.
भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
हा घ्या माझ्या घरातला भुताचा फोटो: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

@अकुकाका..

नरेश_
Mon, 09/26/2011 - 14:45 नवीन
आणि इतका मोठा प्रतिसाद? एवढ्या मटेरियलमध्ये दोनचार धागे सहज (मिपाकर सहजजी नव्हेत)प्रसूत करता आले असते,(शब्दसौजन्य:पाभे) :) हा प्रतिसाद (साक्षात) तुम्ही नव्हे तर तुमच्या भूताने लिहीला असल्याची साधार शंका मनाला चाटून गेली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

'भुताचा जन्म'

गणपा
Mon, 09/26/2011 - 00:34 नवीन
धाग्याच शिर्षक वाचून मिरासदारांच्या 'भुताचा जन्म' ह्या विनोदी कथेची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments

आरक्षण

शहराजाद
Mon, 09/26/2011 - 01:20 नवीन
सविस्तर प्रतिसादासाठी जागा आरक्षित करून ठेवत आहे.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Mon, 09/26/2011 - 05:28 नवीन
या लेखाला प्रत्यक्षपणे कारणी "भूत" झाल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेते. (लोगोसकट) पुष्पगुच्छाबदल भूत महामंडळ आभारी आहे! भुतांच्या निरागस जगातून माणसांच्या जगात येणे हे कठीण गोष्ट आहे ,पण प्रियालीने ती सहजसाध्य केली आहे. तिच्या घरातला (जॉन अब्राहमपेक्षा) देखणा भुताचा फोटो पाहून फार आनंद झाला. पाकल्याची गोष्ट आवडली. रात्री बेरात्री बाहेर भटकणार्‍या आत्म्यानी त्यापासून योग्य तो बोध घ्यावा ही विनंती! रत्नागिरीच्या भुतांबद्दल नंतर सवडीने लिहीन. आज सर्वात आधी आठवण झाली ती पणजी आणि पर्वरीतल्या २ फेमस भुतांची. (इथे मिपाकरांनी पैसा आणि प्रीतमोहर यांची आठवण काढू नये.) पणजी भर शहरात 'फिदाल्गो' नावाचं मोठं हॉटेल आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तिथल्या स्विमिंग पुलात एक माणूस अपघाती बुडून मेला होता. त्यानंतर चांगलं चालणारं ते हॉटेल अचानकच 'बसलं.' कितीतरी मालक बदलले, पण ते काहीकेल्या चालेना. अजूनही 'तो' स्विमिंग पुलाजवळ दिसतो असं म्हणतात. कोणी फिदाल्गो हॉटेलात गेल्यास स्विमिंग पुलाजवळ दिसणारी व्यक्ति कोण आहे याच्या चौकश्या करू नयेत. पर्वरी इथल्या पेट्रोलपंपाजवळ मोटारसायकल अ‍ॅक्सिडेंट होऊन दोघेजण गेले होते. त्यानंतर अनेक मोटारसायकल चालकांना मोटारसायलीपुढे अचानक कोणीतरी आडवे गेल्याचे अनुभव आले आहेत. सरळ लांबपर्यंत दिसणार्‍या रस्त्यावर हवेतून अचानक कोणीतरी दिसावं ही गोष्ट भयनकच! आमच्या ऑफिसातल्या एकाला संध्याकाळी ७ च्या सुमाराला त्या जागी असंच कोणीतरी आडवं आलं आणि त्याची मोटारसायकल घसरून त्याचा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्या पाठीमागे बसलेला दुसरा माणूस मात्र रस्त्यावर कोणी नव्हतं असं छातीठोकपणे सांगत होता. त्याचाही पाय फ्रॅक्चर झालाच! माहितगार लोकांनी मात्र संध्याकाळच्या वेळी तिथून परत जाऊ नको अशाच सल्ला दिला. आणखी गोष्टी आठवतील तशा देईनच. तोपर्यंत सर्वांना सर्वपित्री आणि हॅलोविनच्या आगाऊ शुभेच्छा! -हडळ क्र. २
  • Log in or register to post comments

फिडाल्गो

नितिन थत्ते
Mon, 09/26/2011 - 10:20 नवीन
>>पणजी भर शहरात 'फिदाल्गो' नावाचं मोठं हॉटेल आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तिथल्या स्विमिंग पुलात एक माणूस अपघाती बुडून मेला होता. त्यानंतर चांगलं चालणारं ते हॉटेल अचानकच 'बसलं.' मागच्या दिवाळीत जागा मिळण्यासाठी क्यू लावावं लागतो असं जोरदार चालणारं फिडाल्गो हाटेल बहुधा वरिजनल फिडाल्गो हाटेलाचं भूत असावं. ;) (खवीस नं १) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हात्तेच्या!

पैसा
Mon, 09/26/2011 - 18:29 नवीन
दिवाळीत ना? दिवाळीपासून ३१ डिसेंबरपर्यंत गोव्यात इतकी गर्दी असते की लोक म्युन्सिपल गार्डनमधे झाडाखाली झोपायला तयार असतात, बिचार्‍या भुतांबरोबर काय, कोणीही रहायला तयार होईल! तुम्ही त्या स्विमिंग पूलमधे जाऊन आलात की काय? तुमच्या खवचीसुद्धा शांत करून घ्या हो, नाहीतर 'ते' तिथे पण येतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

खवीस?

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 18:31 नवीन
चिच्चा, धर्मांतर कधी केलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चला! मला घाबरवणारा धागा

रेवती
Mon, 09/26/2011 - 07:50 नवीन
चला! मला घाबरवणारा धागा आला! मी लहाणपनापासूणच भूतांना घाबरते......म्हणजे 'भूत' या शब्दाला घाबरते. आमच्याकडे दहा वर्षे कामाला असलेल्या आजीबाई आजारी पडल्या. स्वभावाने फारच सालस, मायाळू होत्या. विशेषत: माझ्या बाबांवर मुलासारखे प्रेम करीत. ट्रीटमेंटसाठी पैसे देऊ केले होते पण त्या शेवटच्या घटका मोजायला लागल्या. जाण्याआधी आईची गैरसोय होवू नये म्हणून नव्या मोलकरणीची व्यवस्था लावून दिली. रोज बाबा नव्या बाईंना आजींच्या तब्येतीविषयी विचारत असत. शेवटी 'ती' बातमी आलीच! बाबा दिवसभर जेवले नाहीत. नव्या कामवाल्या बाई चांगल्या रूळल्या होत्या आणि एक दिवस दारावरची बेल वाजली. डोळाछिद्रातून पाहिल्यास कोणीच दिसले नाही. बाबांच्या सांगण्यावरून दार उघडताच त त प प करायला लागले. पाय उलटे आहेत का ते पाहिले. स्वयंपाकघरात गेल्यावर माझ्याकडे पाहून आईने "कोण आलय?" म्हणून विचारलं. "असा काय भूत पाहिल्यासारखा चेहेरा केलायस?" म्हटल्यावर तर मी मटकन खालीच बसले. नंतर समजलेल्या ष्टोरीवरून आजीबाई मरता मरता वाचल्या. तिरडी बांधायचे कष्ट वाया गेले. नंतर वर्षभर हट्टाने कामाला येत होत्या. मग मात्र 'खरच' गेल्या. नंतरचे वर्षभर त्या आल्या की मला भूतच येऊन घरकाम करतय असं वाटायचं. बाकी पैसाताईचे अभिनंदन! सर्वांना सुरक्षित सर्वपित्री आमोशा!;)
  • Log in or register to post comments

चला तुमच्यासाठी म्हणून दोन कथा सांगतो :P

ऋषिकेश
Mon, 09/26/2011 - 09:04 नवीन
माझ्या आजीने सांगितलेली कथा: ती व तिची बहिण एकदा पहाटे नेहमीप्रमाणे फुलं वेचायला गेल्या होत्या. काहितरी विषेश असेल म्हणून अधिकची फुले हवी होती, त्यासाठी त्या नदीशेजारी असणार्‍या झाडांवरची फुलं खुडत होत्या. अचानच त्यांना मागुन कोणीतरी चाललंय असं वाटलं.. आणि मागे वळून पाहिलं तर जवळ जवळ 'विजेच्या तारांइतकी उंच' अगदी माणसासारखी नाही पण माणसासदृश आकृती तेथून तरंगत/चालत जाताना दोघींनीही पाहिली. कथा क्र. दोनः पनवेलला एका परिचितांच्या वाड्यात एक विहिर होती. वर्षातील एका विषिष्ट दिवशी (दिवस विसरलो) जर तुम्ही त्याच्या काठावर गेलात तर आतून हाका ऐकू येत असत, आणि त्या तुमच्या नावाने नसून कोणत्या तरी वेगळ्याच नावाने येतात, गंमत म्हणजे त्या नावाची व्यक्ती तुम्ही ऐकलेली नसते. त्याहुन गंमत म्हणजे पुढील वर्षाच्या आत त्या नावाची व्यक्ती तुमच्या वाड्यात येऊन त्या विहिरीत जीव द्यायची. आता ती विहिर बुजवून बोअरवेलने पाणि खेचले जाते. 'त्या' नेमक्या दिवशी नेमकी मोटार का नादुरुस्त होते हा भाग सगळे नजरेआड करतात :) (हिच ती विहिर ज्यात मला पोहायला शिकवायचा प्रयत्न केला गेला होता :) . कारण वर्षातल्या अन्य दिवशी तेथे धोका नसे)
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद आधी एका धाग्यावर

हंस
Mon, 09/26/2011 - 09:29 नवीन
हा प्रतिसाद आधी एका धाग्यावर दिला होता, इथे पुन्हा देत आहे- हा माझा अनुभव आहे, मी साधारण सातवीत असेन त्यावेळेस घडलेली घटना आहे ही, एके दिवशी मी, आई आणि वडिल आमच्या गावाकडे चालत निघालो होतो, साधारण रात्री १२ ची वेळ असावी, गावाच्या बाहेर वळणावर एक वड आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे एक भुताचे वास्तव्य आहे, त्या वळणावरुन जात असताना अचानक वडील तिथेच खाली बसले आणि त्यांच्या एका पायात असह्य वेदना सुरु झाल्या, काही केल्या त्यांना चालता येईना. कसेबसे मी आणि आईने त्यांना उभे केले, तेवढ्यात समोरुन दोघेजण M80 वरुन आमच्या जवळ आले आणि अचानक गाडी घसरुन पडले, हे बघताच वडीलांनी पळत जाऊन त्यांना उठ्वले, आई आणि मी हे बघतच बसलो, ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी चालताही येत नव्हते त्याने पळत जाऊन त्या दोन माणसांन उठवले. पुढे आम्हि घरी आलो काही वेळ जाताच वडिलांची दातखिळी बसली, बरेच उपाय करुन त्यांना normal केले. अचानक ते जोरात ओरड्त त्या वडाच्या दिशेने पळत सुट्ले, ३-४ लोकांनांही आवरेनासे झाले, त्या रात्री ही घटना अनेक वेळा घड्ली, शेवटी त्यांना दोरीने बांधून ठेवावे लागले, पण दुसर्या दिवशी त्यांना यातले काहिही आठ्वत नव्हते. ही घटना घडली त्यावेळी ते पिलेले होते, पण हे रोजचे होते आणि असा त्रास कधीही झाल नाही. मी पण त्या झाडाखालून बर्याच वेळा रात्रीच्या सगळ्यावेळी गेलो आहे, पण मला कधीही वेगळे जाणवले नाही. माझा भुतांवर विश्वास नाही पण ह्या घटनेची उकल मी अजुणही करु शकलो नाही.
  • Log in or register to post comments

पार्सिंग एरर्स

राजेश घासकडवी
Mon, 09/26/2011 - 09:52 नवीन
त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान२ बनवले आहे.
<पंगा मोड ऑन> हे वाक्य पार्स करताना इतके कष्ट पडले की आमचेच भूत होण्याची वेळ आली. गेली वर्ष दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून (मग) बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या.... गेली वर्ष दोन वर्ष घासुगुर्जींच्या मानगुटीवर चढून बसण्याच्या माझ्या प्रयत्नातून औत्सुक्यापायी "दृष्ट कशी काढावी" हा लेख लिहिला गेला आहे... असंही एकदा वाटलं. नंतर घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे असा समज झाल्याने प्रेरणास्थान...??!!?? (तो लेख घासुगुर्जींनी लिहिलेला नाही हे आपण जाणत असालच हे गृहित धरतो) इतरही अनेक क्लिष्ट पर्याय मनात आले, पण ते सर्वच लिहून काढणे शक्य होईल असे वाटत नसल्याने येथेच थांबतो. पण मुळातच आधी १० वेळा वाचून मगच प्रसिद्ध केल्यास माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या वाचकांना असे त्रास कमी होतील अशी आशा वाटते, हे म्हणणे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा. <पंगा मोड ऑफ> बाकी मराठी संस्थळांवर काही मृत आयडींची भुतं एकमेकांना खरडी लिहिताना मी स्वतः पाहिली आहेत. काही वेळाने पहावं तो खरडवह्या पूर्ववत ऍक्सेस डिनाइड झालेल्या असतात. खरंखोटं बापडा सर्व्हरच जाणो. पण असलं काही झालं की तोही थोडा वेळ भूतबाधा झाल्याप्रमाणे गपगार पडलेला असतो.
  • Log in or register to post comments

कायद्याचं बोला

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 14:21 नवीन
या धाग्याला काय द्याचं ते बोला गुर्जी. ;) वाक्य पार्स करताना तुम्हाला त्रास व्हावे म्हणूनच ते टाकले आहेत हे प्लीज लक्षात घ्या! तुम्ही सोडून इतरांना तेथे अदृश्य विरामचिन्हे दिसत आहेत म्हणूनच त्यांना त्रास झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

खुडुक

पिवळा डांबिस
Mon, 09/26/2011 - 10:59 नवीन
त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला. मराठीत 'खुडुक होणे' म्हणजे पुनरुत्पादनासाठी निकामी ठरणॅ.... हा शब्दप्रयोग मुख्यत्वेकरून कोंबडीसाठी करतात. जर नियमित अंडे देणारी कोंबडी जर एकाएकी अंडे देईनाशी झाली तर ती कोंबडी "खुडुक झाली" असं म्हणतात.... वरील लेखात पाकुल्या खुडुक झाला म्हणजे नक्की काय झालं? :)
  • Log in or register to post comments

खुडुक होणे

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 14:22 नवीन
मुंबईकरांच्या बोली भाषेत खुडुक होणे म्हणजे खपणे. तुम्ही बी कोकणी ना मग बाकी गजाल्या कसल्या करता? गोष्ट सांगा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नाय गो बाये, नाय!!!

पिवळा डांबिस
Mon, 09/26/2011 - 22:24 नवीन
गोष्ट सांगा बघू. आमी भुतां आपल्याच प्रजातीतल्या लोकांक एक्स्पोज करणोंव नाय!!!! आय इन्व्होक द फिफ्थ अमेंडमँट!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

उपलपांचा बंगला

विसुनाना
Mon, 09/26/2011 - 11:13 नवीन
माझ्या वडिलांच्या कळत्या बालपणीची गोष्ट आहे.माझे आजोबा (त्याकाळचे ;)) डॉक्टर असल्याने त्यांचा भूताखेतांवर (आणि देवादिकांवरसुद्धा) विश्वास नव्हता. "डॉक्टरसाहेब, त्या बंगल्यात राहू नका. तिथे खून झालेत." असे सांगूनही त्यांनी त्या 'उपलपांचा बंगला' नामक रिकाम्या पडलेल्या वास्तूत बिर्‍हाड केले. तिथल्या वास्तव्यात अचानक घरातले दिवे जाणे, रात्री कोणी घरात फिरत आहे असे आभास होणे इ.इ. प्रकार नेमाने होत होते. (तपशील लिहिले तर भयकथा होईल.) एके रात्री आमचे मोठे काका (त्यावेळी वय १२-१३ वर्षे) अचानक झोपेतून उठून अंगणात येऊन गरागरा लाठी फिरवू लागले. त्यांना खरेतर लाठी फिरवता येत नसे. घरातल्या मोठ्या व्यक्तींनी थांबवायचा प्रयत्न केला तर, "जवळ येऊ नका, एकेकाचे डोस्के फोडीन" असे ओरडू लागले.काही वेळाने बेशुद्ध झाले. नंतर लोकांच्या सांगण्यानुसार सदर जागेच्या मूळ मालकाचा (कै.? उपलप) काही वर्षांपूर्वी खून झाला त्यावेळी तोही अंगावर आलेल्या मारेकर्‍यांवर लाठी घेऊन तुटून पडला होता असे कळाले. घरातील स्त्रीसदस्यांच्या आग्रहावरून माझ्या आजोबांनी तो बंगला सोडला. हा प्रकार कोकणात घडलेला नसून सांगली जिल्ह्यातील एका दुष्काळी गावात घडलेला आहे. उपलपांच्या भूत-पाक-क्रियेबद्दल माहिती नाही.पण यत्र, तत्र, सर्वत्र भुतांची निर्मिती होत असते याचा हा सबळ पुरावा आहे. ती केवळ कोकणाची मक्तेदारी नाही याची कृपया नोंद घ्यावी.. ;)
  • Log in or register to post comments

विसुनानांशी सहमत आहे. मला तर

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/26/2011 - 11:19 नवीन
विसुनानांशी सहमत आहे. मला तर साक्षात पुण्यातच भूताचा अनुभव आला. झाले काय की एकदा माझी एक मैत्रिण आली पुण्यात. तिला घेऊन आम्ही बाहेर जेवायला गेलो. काव्यशास्त्रविनोदात वेळ अगदी छान गेला... मग आम्ही त्या मैत्रिणीला परत घरी सोडायला गेलो. जशी गाडी तिथे पोचली, तसे लक्षात आले की गाडीत कोणीच नव्हते... मैत्रिण गायबच झाली एकदम! अस्सा घाबरलोय म्हणून सांगू! जी गाडी पळवली ती एकदम घरी येऊनच श्वास घेतला! बाप रे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

पुणे...

विसुनाना
Mon, 09/26/2011 - 11:36 नवीन
पुण्यात काय? तिथे काहीही घडू शकते. आणि पुणे कोकणात नाही तर अख्खे कोकणच पुण्यात आहे! ;) त्यामुळे विशेष काही वाटले नाही. नवल वाटले ते या गोष्टीचे की एक पुणेकर असूनही आपण आपल्या पाहुण्यांना हाटेलात जेवायला घेऊन गेलात. कदाचित बिल द्यावे लागेल या भितीने मैत्रिणीने कलटी मारली असावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मी पुणेकर? लाहौलबिलाकुवत!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/26/2011 - 11:51 नवीन
मी पुणेकर? लाहौलबिलाकुवत! तोबा तोबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/26/2011 - 12:20 नवीन
आम्ही हेच लिहायला आलो होतो, की बिकांना असा असा अनुभव आला म्हणून. असो.. आम्हाला त्या काव्यशास्त्रविनोदातील 'सायकलवरती डबलसीट हिंडणार्‍या भूताची' गोष्ट आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेहेहे!

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 14:23 नवीन
... मैत्रिण गायबच झाली एकदम!
बिकाशेट गाडी इतकी हळू हाकतात की सदैव हवेतून संचार करणार्‍या मैत्रिणीला ते रुचले नसावे. ;) तरी बरं पाय उल्टे आहेत का हे चेक केले होते आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

@बिकाभौ..

नरेश_
Mon, 09/26/2011 - 15:11 नवीन
तुमच्याबाबत घडलेला वरील किस्सा घरी ठाऊक आहे का? नाही म्हणजे मैत्रिणीला घेऊन हॉटेलात जाणं वगैरे वगैरे ;) त्यानंतर तुम्हाला आलेले भूताटकीचे अनुभव वाचण्यास युयुत्सुक, माफ करा उत्सुक आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

निषेध

श्रावण मोडक
Mon, 09/26/2011 - 12:27 नवीन
प्रियालीला 'अगं हडळे माणसांत ये' असं म्हणून 'घरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोडं' अशी स्थिती आणणाऱ्याचा जाहीर निषेध. तर, भूत कसे बनते? याविषयी प्रियालीने एकदा आत्मसंवाद करावा, त्यात जे संचित हाती लागेल ते या धाग्यावर लिहावे, अशी आग्रहाची विनंती. मंडळ आपले आभारी राहील. ;)
  • Log in or register to post comments

थांकु

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 14:33 नवीन
प्रियालीला 'अगं हडळे माणसांत ये' असं म्हणून 'घरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोडं' अशी स्थिती आणणाऱ्याचा जाहीर निषेध
थांकु! एक तुम्हीच काय तो निषेध प्रस्ताव शिरिअसली घेतलात. आत्मसंवादासाठी जागा राखून ठेवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मी पण मी पण...

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/26/2011 - 15:16 नवीन
थांकु! एक तुम्हीच काय तो निषेध प्रस्ताव शिरिअसली घेतलात.
काही दिवसांपूर्वी एके रात्री सलग ३/४ तास पावले सरळ करून बसायला लागल्याने अशाच एका पाशवी शक्तीला जो त्रास झाला त्या बद्दल मी पण दु:ख व्यक्त केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

संचित!?

विसुनाना
Mon, 09/26/2011 - 15:36 नवीन
एक प्रामाणिक शंका : भुतांना संचित (+प्रारब्ध+क्रियामाण) असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

रास्त, पण

श्रावण मोडक
Mon, 09/26/2011 - 16:24 नवीन
शंका अगदी रास्त. पण, सांप्रतजन्मी भूत असले तरी मूळचा जन्म माणसाचा असल्याने कर्मविपाक झालेला नसतो व ती कर्मे आठवतात, त्यांची परिणती आठवते, असे आमचे जुलाबराव महाराज चाळेकुन्द्रीकार (ब्रम्हीभूत) सांगायचे. त्यानुसार, भुतांनाही पूर्वजन्मीच्या आठवणी या होत असतात, व त्याचे सांप्रत जन्मी संचित होत असते, असे विवेचनही त्यांनी केले होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

चला

नरेश_
Mon, 09/26/2011 - 14:27 नवीन
आता दिनांतास भूत/ते, हडळ/ळी शोधणं आलं. ;)
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Mon, 09/26/2011 - 13:54 नवीन
मस्त आहेत एकेक किस्से!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 14:37 नवीन
पैसा, विसुनाना, ऋषीकेश, हंस यांचे किस्से भारी आहेत. आजचा दिवस चांगला जाणार. रेवती धीर कर. शिकागोला एक सेमेट्री आहे. रेजरेक्शन मेरी म्हणून तिचा किस्सा अखील अमेरिकेत सु की कुप्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments

लिंक वाचली. नकोच तो विषय!

रेवती
Mon, 09/26/2011 - 19:11 नवीन
लिंक वाचली. नकोच तो विषय!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

गेल्या काही महिन्यांपासून

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/28/2011 - 14:33 नवीन
गेल्या काही महिन्यांपासून शिकागोत असाच प्रकार अजून एका ठिकाणी घडतो असे ऐकले आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कळ्ळं बरं! एवढं काही बोलायला

रेवती
Wed, 09/28/2011 - 19:28 नवीन
कळ्ळं बरं! एवढं काही बोलायला नकोय! आणि तसंही मी तुझ्याशी बोलणं बंद केलय. राजकारणातच हवा होतास रे! दलबदलू कुठचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

एकभूत आवाहन

निरन्जनदास
Wed, 07/08/2015 - 16:50 नवीन
मिपावरल्या समस्त (स "मस्त")... हडळ/ डाखीण, आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या.. हे खविसांनो , - एक भूत आवाहन करीतो की मी आताच अत्यंत उच्च दर्ज्याच्या सेमेट्रीयोत्तम रेजरेक्शन मेरी वाचून काढली. तेथून कसाबसा उलट्या पायांनी टिंब टिंब ... पाय लावून पळून येथे येवून स्वतःला वाचवून आव्हान देतो आहे की ,- विंग्रजी येणाऱ्यांसाठी या लेखाचे मराठी भाषांतर करावे आणि मराठी येणाऱ्यांसाठी इंग्लिश भाषांतर करावे, ही सुलट्या पायांनी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

जियो..!

विसोबा खेचर
Mon, 09/26/2011 - 14:38 नवीन
जियो..! :)
  • Log in or register to post comments

काय आणि कसे

विनायक प्रभू
Mon, 09/26/2011 - 15:52 नवीन
नुसते काय वर न थांबता कसे ह्यावर मार्गदर्शन करावे अशी मी पुरवणी जोडतो.
  • Log in or register to post comments

माझ्या आजीकडुन ऐकलेली ही

श्यामल
Mon, 09/26/2011 - 15:57 नवीन
माझ्या आजीकडुन ऐकलेली ही गोष्ट :- कोकणातल्या एका गावात एक शाळामास्तर आपल्या कुटुंबासहीत शाळेच्या गावी रहायला आला. गावकर्‍यांनी बर्‍याच वर्षांपासुन रिकाम्या असलेल्या एका घरात त्याची रहाण्याची सोय केली. वारंवार बदली होणार्‍या नोकरीमुळे अगदी मोजक्या असलेल्या सामानाची लावालाव करुन झाल्यावर मास्तरांच्या सुगरण बायकोने छानसे जेवण रांधले. रात्री दोघे जेवायला बसल्यावर "माका पन दी" असे शब्द ऐकु आले. मास्तराने ह्या शब्दांच्या रोखाने पाहिले असता स्वयंपाकघराच्या खिडकीच्या गजातुन एका बाईचा हात दृष्टिस पडला. मास्तरांना वाटले, बायकोने बनवलेल्या रुचकर जेवणाच्या खमंग वासाने कुणी शेजारची गरीब बाई जेवण मागायला आली असेल. मास्तर बायकोला म्हणाले, "दे तिला पण जेवण." बायकोने जेवण वाढुन ती त्या बाईला बोलवायला खिडकीजवळ गेली. पण तिथे तर कोणीच नव्हते ! ........त्या उभयतांना वाटले की संकोचामुळे ती बाई तिथुन निघुन गेली असावी. पण नंतर सलग तीन रात्री असा प्रकार घडु लागला. मास्तराला काही राहवेना, म्हणुन त्याने एका गावकर्‍याकडे हा विषय काढला. गावकर्‍याने दिलेल्या माहितीनुसार ते घर झपाटलेले होते. खुप वर्षांपुर्वी तिथे एक जोडपे रहात होते. बर्‍यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या त्या घरात पाककला निपुण आणि पट्टीची खव्वयी असलेली बायको तर्‍हेतर्‍हेची पक्वान्न बनवुन खिलवत होती आणि खात होती. तरुणपणात अचानक तिच्या नवर्‍याचा अपमृत्यु झाला. घरचा कर्ता, कमावता पुरुष गेल्यावर तिला रोजचे दोन घास मिळणे कठीण झाले. मोलमजुरी करुन ती पोट भरु लागली. पण गतायुष्यात खाल्लेले चारीठाव भोजन आणि पक्वान्ने तिला विसरता येईनात. अशाच एका दिवशी साप चावल्याचे निमित्त होऊन ती सुद्धा परलोकवासी झाली. मुलबाळ नसल्यामुळे बरीच वर्षे ते घर रिकामेच राहिले. त्या घरात कुणी रहायला आले की प्रत्येक रात्री घरातले लोक जेवायला बसल्यावर ती अशीच जेवणाची मागणी करते !........... जाहीर आहे पुढचे ऐकायला मास्तर तिथे थांबलेच नाही................................................................
  • Log in or register to post comments

आमच्या गावातला किस्सा

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 17:12 नवीन
फारा वर्षांपूर्वी आमच्या गावात एक अनाथालय आणि शाळा होते. थंडीच्या रात्री एके दिवशी त्या अनाथालयाला आग लागली आणि काही लहान मुले होरपळून त्यात मृत्यूमुखी पडली. हे अनाथालय जिथे होते तो रस्ता सपाट नाही. अचानक एके ठिकाणी तो थोडा खाली उतरतो आणि नंतर पुन्हा वर चढावे लागते. या खोलगट भागाला हेडी हॉलो असे म्हणतात काराण ती शाळा/अनाथालय हेडी नावाचे एक कुटुंब चालवत असे. अजूनही एखाद्या रात्री जेव्हा दाट धुके पडलेले असते तेव्हा वाहन चालकांना रस्त्यावर लहान मुले लिफ्ट मागताना दिसतात. त्यांच्याजवळ जाऊन गाडी थांबवावी तोपर्यंत ती अदृश्य होतात. :) अधिक माहिती येथे वाचा. हा अ‍ॅलीसनविल आणि १२६ वा रस्त्याचे जंक्शन माझ्या सद्य घरापासून ५ मैल असून पूर्वीच्या घरापासून मैलभरावर होते. रोजच्या येण्याजाण्याचा रस्ता. ;)
  • Log in or register to post comments

भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव

शुचि
Mon, 09/26/2011 - 19:07 नवीन
भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव कशी गेली नाही? हाकामारी ची वावदूक पुण्यात मध्यंतरी उठली होती ना ;) रात्री दारावर थाप पडून आपल्या नावची हाक ऐकू यायची म्हणे आणि जर ओ दिली तर खेळ खतम!!! चकवा एक असतो. माणूस एकाच रस्त्यावर फिर फिर फिरत राहतो. खवीस , मुंजा वगैरेची माहीती पूर्वी एकदा "श्री" नावाच्या भन्नाट वर्तमानपत्रात वाचली होती. राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.
  • Log in or register to post comments

आयला...

चिगो
Fri, 09/30/2011 - 14:09 नवीन
>>राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे. आता बोंबला... मी सध्या मेघालयात आहे. इथे दुर्गापुजेच्या वेळी "देईल तो प्रसाद खाऊ नकोस. काली जादू करतात." असा सल्ला काही जेष्ठ लोकांनी दिला होता. मानावा की काय ? बादवे, दुर्गेच्या पुजेच्या प्रसादावर काळ्या जादुचा प्रभाव पडत असेल काय !?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

स्वच्छ भूत

चेतन सुभाष गुगळे
Fri, 10/07/2011 - 14:30 नवीन
<< भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव कशी गेली नाही? >> नाही कशी? आम्हाला एका स्वच्छ भूताचा प्रकार ठाऊक आहे. बहुसंख्य मंडळी सकाळी स्नानादी संस्कार आटोपून बाहेर पडतात तेव्हा याच भूताचा अवतार धारण करतात. शुचिर्भूत विनोदाचा भाग सोडून द्या. अर्थात काही जण या अवस्थेतही (विशेषत: मेक अप उतरविलेल्या नट्या) खरोखरच भूतासारखे दिसत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आमचा एक जुना अनुभव आठवला

आदिजोशी
Mon, 09/26/2011 - 19:34 नवीन
भय इथले संपत नाही गोष्ट एका रात्रीची आहे. एका भयाण, अंधार्‍या रात्री मी, धम्या आणि अभ्या, बंगलोर मिपा कट्ट्यांच्या जन्मस्थानी, माझ्या घरी, चिंतन बैठकीसाठी जमलो होतो. चिंतनाचा मूड व्हावा म्हणून आम्ही दिवे न लावता मेणबत्त्या पेटवल्या होत्या (वि.सू. - ह्याच मेणबत्त्या सिगारेट पेटवायच्या कामी पण येतात) विषय होता आजकाल सर्वत्र सहजसंचार करणारी भुतं. तिघेही कॉटला रेलून जगातून दारूचा शेवटचा थेंब नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यासारखे ढकलत होतो. चेहर्‍यावरचा करारीपणा उतू जात होता, इतका की कुणी नुसतं हसण्यासाठी जरी गाल हलवले तरी काच फुटल्यासारखा 'खळ्ळ्ळ्ळ्' आवाज येत होता. इतक्यात ते घडलं. मी पुढचा घोट घेण्यासाठी माझा ग्लास उचलला तर तो रिकामा होता. मी डावीकडे बसलेल्या धम्याकडे पाहिलं, तर त्यावेळी तो त्याच्या डावीकडे अभ्याच्या ग्लासातली गुपचूप संपवत होता. अभ्या आकाशात बघून प्रदुषण करत होता. होतं असं कधी, संपवला असेल मीच अशी माझिया मनाची समजूत घालून देऊन मी पुन्हा ग्लास भरला. तितक्यात धम्या ओरडला "काय बे आद्या, माझी दारू काऊन संपवून र्‍हायला बे?" मला कळलंच नाही एक मिनीट "अबे मी काऊन तुझी पिऊ, माझा ग्लासातूनच पितोय मी... तूच अभ्याची पिताना पाह्यलं मी..." त्यावर मला गप्प बस अशी खूण करून त्याने स्वतःचा ग्लास उचलला. तितक्यात अभ्या ओरडला "का बे साल्यान्नो... तुम्ही दोघे प्लॅन करून माझी दारू काऊन संपवून र्‍हायलात लेकांनो?" आम्ही दोघेही त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो की हे हि&हि कॄत्य आमचे नाही... तरी त्याचा विश्वास बसेना. पण हळू हळू हे प्रकार वाढू लागले. तिघांचेही ग्लास आपोआप संपू लागले. ग्लास खाली ठेऊन दुसर्‍या सेकंदाला जरी परत उचलला तरी संपलेला असे. तीच गत सिगारेटची. अ‍ॅश ट्रे वर ठेवली की अर्धी आपोआप संपत असे. आमची जाम तंतरली. भूत असेल ह्या भावनेने नाही. ह्या स्पीडने दारू लवकर संपेल ह्या भीतीने. शेवटी आम्हा तिघांचीही इथे भूत आहे ह्याची खात्री पटली आणि त्याने आपली संपवण्यापेक्षा आपण आता थोडावेळ झोपू. लवकरच पहाट होईल, पहाटे उजेडाच्या भितीने भूत आपल्या घरी गेलं की मग निश्चींतपणे पुन्हा बसू असा विचार करून आम्ही थांबलो. आम्ही तिघेही पैलवान असल्याने एकाच कॉटवर झोपलो. सगळ्यात डावीकडे भिंतीच्या बाजूला अभ्या, मधे धम्या आणि मग मी असे झोपलो. डोळे जड झाले होते. झोपेमुळे की दारूमुळे माहिती नाही. इतक्यात कसलासा आवाज झाला. माझी पाचावर धारण बसली. घामाने डबडबलो. जीभ जड झाली. मी अभ्या नी धम्याला हाका मारायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द फुटेना. कसे बसे मी डोळे किलकिले करून बघण्याच्या प्रयत्न केला तर मला जे दिसले त्याने मी पार स्तिमीत झालो - डाण्या कॉट खालून हळूच बाहेर येऊन आपली झुल्फं सावरत सावरत गुपचूप घराबाहेर पडत होता...
  • Log in or register to post comments

हेहेहे!

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 19:38 नवीन
:) :) @ शुचि, भुतांची सविस्तर गोष्ट हवी. वरच्या प्रतिसादातून बोध घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

खी: खी:

शुचि
Mon, 09/26/2011 - 19:56 नवीन
=)) =)) =)) फुटले!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

खी: खी: खी:

नंदन
Mon, 09/26/2011 - 23:50 नवीन
बेश्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

लई भारी!!!

मोहनराव
Tue, 09/27/2011 - 13:45 नवीन
लई भारी!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या

जाई.
Mon, 09/26/2011 - 20:03 नवीन
या आवाहनास अनुसरुन काहि अनुभव मुंबईहून कोकणात जाताना वडखळ नाका नावाचे एक (कु)प्रसिध ठिकाण आहे.माझ्या गावापासुन ते ३०० किमी अंतरावर आहे.तीथे गाडी चालवताना फार भीतीदायक अनूभव येतात्. त्या ठिकाणी गाडी थांबवू नये असे स्पष्ट्पणे सांगितले जाते.गाडी थांबवल्यास पांढरी साडी नेसलेली बाई दिसणे, एकदम चित्रविचीत्र आवाज येणे असे अनुभव येतात. माझ्या काकांनी एकदा ही चूक केली होती. लग्णाच्या बिर्हाडाला वाट देण्यासाठि गाडी थांबवली असाताना ते बीर्हाड अचानक गायब झाले. व काकाना वरील अनुभव आले. तसच कोणीतरी गाडी खेचू लागले.काकानी प्रसंगावधान राखून गाडी एकदम जोरात स्टाट्र्र केली ते गाव आल्यावरच थांबवली.
  • Log in or register to post comments

याच वडखळच्या नाक्यापाशी

अप्पा जोगळेकर
Mon, 09/26/2011 - 20:21 नवीन
याच वडखळच्या नाक्यापाशी अंतुले नावाच्या एका भूताने ' ***,माझी गाडी चेक करतो ' असे म्हणत तिरीमिरीत कोणत्याशा इन्स्पेक्टरचा दिवसाढवळ्या मुडदा पाडला होता असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा