Skip to main content

भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!

लेखक प्रियाली यांनी रविवार, 25/09/2011 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
सौ.अ.जि. पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा: पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे. सदर व्यक्तीचा लोकांनी या लेखात जाहीर निषेध करावा अशी मी विनंती करते. सर्वपित्री जवळ येत असताना काहीच चमत्कारिक आणि भयंकर घडू नये अशी माझी इच्छा नव्हती पण हिंदू क्यालेंडरानुसार यावर्षी सर्वपित्रीने आमच्या लाडक्या हॅलोविनला कल्टी दिली, त्यातून नव्या प्रोजेक्टचे भूत मानेवर बसलेले त्यामुळे सर्वपित्री गुळमुळीत निघून जाते असेच वाटले होते पण पैसाताईंमुळे काहीतरी भयंकर धागा टाकण्याचा योग आला आहे. त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान बनवले आहे. अवांतरः सहज आठवलं म्हणून आमच्या एका आयटमला आम्ही फ्यांटम म्हणत असू, दुसर्‍याला वेताळ तर तिसर्‍याला मुंजा.
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी भुते बनतात. बाहेरची बाधा होणे, माणूस झपाटला जाणे असे प्रकार घडतात. इच्छा अतृप्त राहिलेला किंवा अनैसर्गिक मृत्यू आलेला मनुष्य भूत बनतो असे समजले जाते. माणसाचे भूत बनून त्याने त्रास देऊ नये म्हणून श्राद्ध करणे, दिवस करणे, शांती करणे इ. प्रकार केले जातात. हे सर्व ठीक पण ही चर्चा भूत कसे काढावे त्यावर नसून भूत कसे बनते त्यावर आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही “मग तो व्यक्ती भूत बनला....” अशा टैपाच्या गोष्टी ऐकल्या असतील त्या इथे सांगा बघू. भूत नेमके कसे बनते? त्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात? भूत कोणत्याही तिथीला बनता येते का? इतर कोणाला बनवता येत नसल्यास स्वतःच स्वतःला भूत बनता येते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांचेही भूत बनते का? कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या गोष्टी थोडक्यात इथे सांगाव्या आणि मिपाकरांना उपकृत करावे. बिगर कोकणी लोकांनाही हे आवाहन लागू आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रतिसाद देताना तो भयंकर आणि चमत्कारिक आहे याची दखल घ्यावी. सुरुवात माझ्यापासून करते: आमची आजी (बाबांची आई) पक्की कोकणातली. लहानपणापासून तिने मला भुतांच्या गोष्टींचेच बाळकडू देऊन वाढवले. आमच्या आईला हा प्रकार पसंत नसे पण तिची काय बिशाद होती आजीसमोर शब्द काढण्याची. आजीने तिला तिथेच माणसांतून उठवली असती अर्थातच, तसं कधी घडले नाही. आजीच्या गावी एक कोळी होता. त्याचं नाव पाकुल्या. पाकुल्या तसा वयानुसार कमरेतून वाकला होता. मच्छीमारी सोडून किनार्‍यावर सुकवायला टाकलेल्या खारवलेल्या माशांची रखवाली करत असे. अशाच एका रात्री पौर्णिमा अली. त्या पुनवेच्या रात्री चंद्र आकाशात वर आला होता. समुद्राचं पाणी चांदीसारखं चमचमत होतं. रुपेरी वाळूने चंद्राला स्वत:त सामावून घेतल्याचा भास होत होता. किनार्‍यावर मंद वारा सुटला होता आणि त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला. अजूनही कधीतरी पौर्णिमेच्या शांत रात्री समुद्रावर भटकायला गेलेल्या लोकांना पाकुल्या दिसतो. खारवायला टाकलेल्या माशांची रखवाली करत असतो. फक्त पाकुल्याचं अंग तो मेला त्या रात्री समुद्र आणि वाळू चमकत होती तसंच चांदीसारखं चमचमत असतं. लोक त्याला आता “पाकुल्या चकचक” म्हणतात. तात्पर्यः पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जाऊ नये. गेलात तर चकचक हे उपनाम मानगुटीवर बसायची शक्यता आहे. तसेही पौर्णिमेला काय करावे याचा सल्ला युयुत्सुंकडून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे. आता येऊ द्या – खवीस, हडळे, गिरे, हाकामारी, चकवा यांच्या कहाण्या ऐकण्यास उत्सुक. सर्वांना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा!! (हडळ नं. १) प्रियाली.
१ अ. जि. = अद्याप जिवंत २ हे विडंबन नाही. सदर लेखाचा प्रेरणा म्हणून वापर केला आहे.

वाचने 58721
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

तरी मी म्हणतच होतो यंदा मागल्या वर्षीसारखं सर्वपित्री पेश्शल काही दिसत कसं नाही?! निषेध व्यक्त करायच्या विचारानेच आलो तर समोर हा धागा! मस्तच हो हडळीण्बै! वडखळच्या भुताप्रमाणेच संगमेश्वरजवळ धामणीच्या घाटातली कथासुद्धा लै फ्येमस हां! रत्नांग्रीच्या दिवट्या परबाची तिथंल्या हडळीन घेतलेली विकेट लै गाजली होती.. अगदी रत्नांग्री टैम्सात बातमी होती! दिवट्या भुताखेतांवर विश्वास न ठेवणारा एक साधासरळ रिक्षाचालक. नुस्ता विश्वास नाही असं नव्हे तर तो भुताखेतांच्या नावानं बोंबा मारी! आपल्या बहिणीकडे सावर्ड्याला गेला होता तिथून तो परतत असताना धामणीच्या घाटात एका बाईनं त्याच्या रिक्षाला हात दाखवला. अपरात्रीची वेळ, तशात घाटात ती बाई एकटी.. काही आक्रीत नको घडायला म्हणून मदत करण्याच्या हेतून त्यानं त्या बाईला रिक्षात बसवलं. "एवढ्या अपरात्री तुम्ही या निर्मनुष्य ठिकाणी एकट्या कशा?" अशी चौकशी त्यानं केल्यावर "भूक लागली, घराकडे खायला काही नाही, जवळपास काही सोय नाही, पुढे घाट उतरल्या उतरल्या उजवीकडे एक ढाबावजा हॉटेल आहे तिथं काहीतरी खावं म्हणून बाहेर पडले" हे तिनं दिलेलं विक्षिप्त उत्तर त्याला पटलं नाही. त्याला शंका आलीच की काहीतरी गडबड नक्की दिसते म्हणून त्यानं आणखी चौकशी करण्यास सुरूवात केली. तेंव्हा त्याला कळलं की त्या बाईचा नवरा या जगात नसून आणि एकुलता एक मुलगा होता त्याला वेडाचे झटके येत असल्याने ती त्याला घरातच डांबून ठेवते. हे उत्तर ऐकून दिवट्या आणखीच भंजाळला. त्यानं विचारलं "बाई तुमचा नवरा गेला आहे तर तुम्ही हे कुंकू, मंगळसूत्र वगैरे का घातलंय?" तर त्यावर त्याला उत्तर मिळालं. "अरे मी फार नशिबवान रे बाबा, गंगा भागीरथी होण्यापूर्वीच मृत्यू लाभला मला! मघाशी तुझ्या रिक्षेत बसले ना त्या तिथंच घाटमाथ्यावर त्या रिक्षावाल्यानं माझ्यावर बलात्कार करून माझा गळा चिरला होता!" हे ऐकून दिवट्या ताडकन उडालाच. भुताखेतांवर विश्वास नसला असं म्हणत असला तरी लहानपणापासून त्यानं ऐकलेल्या सार्‍याच्या सार्‍या भुतांच्या गोष्टींची त्याला एकदम आठवण आली.. मागं वळून पाहण्याचं धाडस होत नव्हतं.. गाडी थांबवायला म्हणून ब्रेकवर पाय देतो तर ब्रेक लागेल तर शप्पथ.. मागून जोरदार हसण्याचा आवाज आला आणि "ब्रेक लागणार नाही!" असे शब्द ऐकू आले! दिवट्याला घाम फुटला.. मागं वळून बघतो तर काय! मघाशी व्यवस्थित दिसणार्‍या त्या बाईचे केस वार्‍यावर उडत होते, कुंकू लल्लाटभर पसरलं होतं, तोंडातून रक्त येत होतं आणि गळ्यावर एक मोठीच्या मोठी चीर होती.. आणि ती जोरजोरात हसत होती.. तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली. पुरूषाच्या पाकिटात मिळालेल्या लायसन्सवरून त्याचा पत्ता लागला पण त्याच्यासोबत ती विवाहित बाई कोण होती ते आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही..! "दिवट्याचं सावर्ड्याला काहीतरी लफडं होतं, उगाच नाही बहिणीच्या घरी सारखा फेर्‍या मारायचा" अशी वावडी उठली.. अलिकडे धामणीच्या घाटात एक सावळासा उंचपुरा तरूण रात्री बेरात्री एकटाच हिंडत असतो म्हणे..

In reply to by मेघवेडा

तू अवतीर्ण कसा झाला नाहीस याचीच काळजी लागली होती. आलास भूत पावले! आता पुढली कथा ऐक. आमच्या नातेवाईकांपैकी एकजण फ्रान्सला असे. तो एका मित्राकडे पार्टीला गेला होता. परतताना रात्र झाली. पेयपान झाले असले तरी साहेब चांगले शुद्धीत होते. रात्री ते गाडीतून आपल्या गावी यायला निघाले. रस्त्यात त्यांना अचानक काहीसं वेगळं वाटायला लागलं. रस्ता हळूहळू अरुंद होतो आहे असे वाटायला लागलं. दिवसा ते याच रस्त्यावरून मित्राकडे गेले होते आणि रस्ता व्यवस्थित होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चांगली वाढलेली झुडपं होती. ती हळूहळू गाडीच्या जवळ यायला लागली. इतकी जवळ की गाडीलाच खेटली आहेत. तेव्हा यांना काहीतरी वेगळं आहे असा भास झाला. त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला तसा रस्ता आणखीच अरुंद व्हायला लागला. आता झुडपं गाडीवर घासायला लागली होती. यांची जाम गाळण उडाली होती. पण ते गाडी हाकत राहिले. अचानक एके ठिकाणी त्यांना जाणवलं की ते अपेक्षित वळणं, रस्ते न ओलांडता अचानक स्वतःच्या एरियात पोहोचले आहेत. त्यांनी सरळ घरात धाव घेतली. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना रात्री झालेल्या प्रकारावर विश्वास बसेना. पण त्यांनी बाहेर जाऊन गाडी पाहिली तर तिच्यावर चर्रे उमटले होते. मग मित्राला फोन लावला आणि झालेला प्रकार सांगितला. मित्राने शांतपणे उत्तर दिले,"अरे! असे पूर्वीही काही लोकांना अनुभव आले आहेत." हा होता चकवा.

In reply to by मेघवेडा

तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली. प्रेतं? मग झाला प्रकार गावकर्‍यांना कुणी सांगीतला? त्या मेलेल्या तरूणाच्या भूतानं?

In reply to by प्रीत-मोहर

आज सर्वात आधी आठवण झाली ती पणजी आणि पर्वरीतल्या २ फेमस भुतांची. (इथे मिपाकरांनी पैसा आणि प्रीतमोहर यांची आठवण काढू नये.)
इति पैसा. तुला वाचता येत नाही, म्हणून दिलं इथं. पैसानं हा सन्मान केला तेव्हा तू बहुदा इकडं-तिकडं वटवटत फिरत असावीस. माणसाच्या जन्मातही असंच केलंस. तो ब्रह्मदेव अक्कल वाटत होता तेव्हाही बोंबलत फिरत बसलीस. आताही तेच. जित्याच्या खोडी... असं उगाचच म्हणतात हे सिद्ध केलंस. ;)

In reply to by श्रावण मोडक

श्रामोअण्णा.. पैसा मावशी तशी माका विसराची नाय ह्या माका ठाउकच होता. माझ्या डोळ्यावर काकडीची कापा असलेल्यान तो प्रतिसाद माका दिसाक नाय तर तुमी तेचो एवढो मोठो पर्वत केलो? अता पैसाताय आनी मी एकाच जमातीत असल्या कारणान आमी समजान घेतो म्हणान सांगा.. आगलावे खयच्याकडले.. आणि माका टोमणे मारुची, घालुन्-पाडुन बोलुची एक्कय संधी सोडशात तर श्रामोवेताळ पुणेकर कस्ले तुमी? हेच्यासाठी वेगळां बिल वसुल करतलंय .. बिल मगे व्यनि करतंय ... फुडल्या फाउटी मी तुमच्ज्याफ्य्ड्यात टपाकलंय की बिल देवची तयारी ठेवा.. क्काय?

ही सुध्दा फेमस गोष्ट आहे मुंबैतील. एका शेअर रिक्षात एक स्री आणि दोन पुरुष बसले. ईच्छित स्थळी पोचल्यावर त्या स्रीने प्रथम पैसे दिले सुटे पैसे देताना पैसे रिक्षावाल्याच्या पायापाशी पडले. तो ते उचलायला गेल्यावर त्याला त्या स्रीचे पाय उलटे असल्याचे दिसले. वर बघेस्तोवर ती बाई गायब झाली. दोघा प्रवाशांना हे सांगितल्यावर त्यांनी मान उडवली आणि म्हटल की "त्यात काय एवढ आमचे पण पाय उलटे आहेत की हे बघ". ते बघताच तो रिक्षावाला कार्डियक अरेस्टने मृत्यू पावला.

@---भूत कसे बनते? भूत बनविण्याची पाक-क्रुती:- साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते) क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...थोडक्यात ---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडत,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं की त्याच्यातलं भूत तय्यार ... टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा तयार का झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते...

In reply to by अत्रुप्त आत्मा

पराग दिवेकरजी यांच्याशी सहमत. भूत हे मानण्यार्‍याच्या मनात असतं.. मी तर कोकणातला (मालवण/कट्टा) असुन सुद्धा भुतांच्या कथा केवळ ऐकल्या आहेत. गावची आजी.. आजोबा यांनी लहानपणी मी गावी जात असे तेव्हा मी टळटळत्या दुपारी घराबहेर जाऊन दंगा करु नये / रात्री लवकर झोपावे / जेवण (विशेषतः न आवडण्यार्‍या भाज्या गपचुप गिळ्याव्यात) यासाठी काही भुतांच्या गोष्टी सांगुन पाहिल्या. मात्र मी त्यांना क्रॉस एक्झामिन केल्यावर, सत्य बाहेर पडत असे की, त्यांनी देखील कधी ही भुतं प्रत्यक्षात पाहिलेली नाहीत; त्यांनाही या आधीच्या पिढीतील मंडळींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत या. मला भुतांचा कधीच अनुभव नाही आला.

In reply to by इंटरनेटस्नेही

मला भुतांचा कधीच अनुभव नाही आला.
पन तु जन्माला आल्यावर हा अनुभव तुझ्या घरच्या मंडळीना आला असेलच अशी खात्री आहे.........

In reply to by वपाडाव

वपाडाव तुमच्या या वाक्यावरुन भूतांनी तुमच्या घरासमोर धरणं का धरु नये ?? हे विधान भूतांचा अपमान करणारं आहे. उद्या खळ्ळ फट्याक झाल्यास जबाबदारी तुमची राहील हे लक्षात घ्या. :D स्वाक्षरीतलं वाक्य खरोखरीच म्हणावं लागेल, बघा ब्वॉ.

In reply to by सूड

हे विधान भूतांचा अपमान करणारं आहे.
वपाडाव यांचे विधान नक्की कोणाचा अपमान करणारे नाही असे तुम्हाला वाटते? (काही उदा. माणसांचा, प्राण्यांचा, भुतांचा वगैरे)

In reply to by प्रियाली

तेही खरंच म्हणा !! भूतांचा उल्लेख आला म्हणून मी बोल्लो. बाकी माणूस, प्राणी वैगरेंना प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तसं सांगावं ब्वॉ काय ते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा काही लोकांना स्वत:ला उपेक्षेने मारायची सवय असते. मी भारी, माझा देशा भारी, संस्कृती तर लै भारी आणी बाकी सगळे छाटछूट या वेडाने पछाडलेले काही लोक असतात आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्‍या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. याच धाग्यावर निम्म्या कथा परदेशातल्या दिसतील. एवढ्या प्रसिद्ध की विकीवर त्याची नोंद व्हावी. अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतातील लोक ग्रासलेले असतील तर जगभरातले लोक अगदी स्वर्गभूमी अमेरिकेतले लोकदेखील अंधश्रद्धेने ग्रासलेले आढळतील. १३ तारखेबद्दल एवढे असंख्य गैरसमज आढळतील की त्या विषयावर पी एच डी करता येइल. फारेनातल्या ९९% हाटेलांमध्ये १३ नंबरचा मजला आढळणार नाही. त्याच बड्या हॉटेल चेन्स ने भारतात देखील ही प्रथा रुजवली. घरात कुर्‍हाड ठेवु नये, १३ तारखेला मोठी खरेदी करु नये, टचवूड, गळाला लागलेला पहिला मासा फेकुन देणे असली हजार उदाहरणे फारिनर्स बद्दल देता येतील. भारतात पण याच प्रकारातली उदाहरणे सापडतील. थोडक्यात सांगायचे तर अंधश्रद्धाना देश आणि धर्माचे वावडे नसते. सगळ्याच देशांत, सगळ्याच धर्मात अंधश्रद्धा सापडतात. त्या दूर करणे इष्टच पण केवळ स्वकीयच अंधश्रद्ध आहेत असा फुकाचा समज करुन घेणे कधीही अयोग्यच.

In reply to by मृत्युन्जय

आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्‍या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. अगदी बरोबर. (अवांतर: एक बरे की ते लोक शक्यतो (येन केन प्रकारेन) हरीत पत्रे मिळवुन तिकडेच (लांब, ) रहातात. )

In reply to by मृत्युन्जय

आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्‍या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. गैरसमज...गैरसमज...गैरसमज ...मृत्युन्जय भौ ... आंम्ही भारतराष्ट्र-वादी आहोत... त्यामुळे आंम्हाला आमच्या देशाची चिंता पहिली आहे...''सगळ्या जगातल्याच अंधःश्रद्धा काढत बसा,,,मग त्यातच भारताच्याही निघुन जातील'' अश्या स्वरुपाचं तुंम्ही मनाशी मांडलेलं फसवं ग्रुहीतक आंम्हाला अजिबात उपयोगी पडणारं नाही... शिवाय प्रत्येक भारतीय नागरीकाला विज्ञाननिष्ठ द्रुष्टीकोन बाळंगणं हे भारतीय घटनेनी दिलेलं कर्तव्य आहे... ते आपण समाजमनात वावरत असताना तर पहिल्यांदा बाजावायला हवं ना..? मग पहिल्यांदा केला आपल्याच घराच्या सफाइचा प्रयत्न तर त्यात न्यून-गंड येण्यासारखं काय आहे बर? शेजाय्रांच्या घरातला कचरा काढण्याचं व्रत मिळण्यासाठी,मला माझ्या घराच्या सफाइचा कार्यक्रम पहिल्यांदा हाती घ्यायला हवा ना? नाहीतर जागाचा काढायला जातो कचरा,आणी माझ्याच उंबरठ्यात पाचोरा... असं व्हायच नै का?... आणी आंम्ही हे असं लिहितो हा नैराश्याचा आजार वगैरे नसुन ''वस्तुस्थितीची खडखडीत जाणीव'' आहे...हे समजुन घ्या... या उप्परही तुमच म्हणण ''फक्त भारतालाच टार्गेट करायचं नाही'' असं असेल..तर तुमचा माझा रस्ता वेगळा आहे,इतकच मी म्हणेन... पुढील प्रवासासाठी तुंम्हाला शुभेच्छा... अलविदा... अवांतर-@-आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते... या वाक्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही... जे लोक स्वतःच्याच जगात जगतात,त्यांना भारतात रहायला यायची सवड कशी काय होणार?...मला न्यूनगंड आहे की नाही ते नंतर पहाता येइल, पण आपण जी भारतीय जनमानस आधुनीक मनाचं झाल्याची पडद्या आडुन तरफदारी करताय ती पाहुन आपल्याला संस्क्रुतीचा अतिगंड आहे असं मला निश्चित पणानी वाटतं,,,आणी हल्ली तर अंधारयुगाचा उदोउदो करणाय्रा निरनिराळ्या धार्मिक संस्था/संघटना निघालेल्या असताना... या सद्यःकालीन परिस्थितीकडे संपूर्ण डोळेझाक करुन जगणं आंम्हाला तरी शक्य नाही...

In reply to by अत्रुप्त आत्मा

मला आपल्या संस्कृतीचे ढोलही बडवायला आवडत नाही आणि तिच्या नावाने गळेदेखील काढायला आवडत नाहीत. इतर कुठल्याही देशाप्रमाणे भारतात आणि भारतीय संस्कृतीत काही कमतरता असतील. त्या दूरही केल्या पाहिजेत पण प्रत्येकवेळेस त्याबद्दल गळे काढण्यात मला इंटरेस्ट नाही. माझा देश जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी मी माझ्यापरीने योगदान देत राहिल. "भारतासारखा देश" असा हेटाळणीपुर्वक उल्लेख करण्यापेक्षा जास्त चांगले काम आपल्याला नक्कीच करता येइल याची मला जाणीव आहे. आता हा अतिगंड असेल तर मला त्याचा अभिमान आहे.

In reply to by मृत्युन्जय

आता हा अतिगंड असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आपल्या अभिमानास आमच्या शुभेच्छा... राम राम...

In reply to by पुष्करिणी

एक तर बरेच दिवसांनी दिसतियेस मिपावर्....तीही या वेषात/रुपात! नक्की काय समजायचं आम्ही!;) की दिसतियेस यावरच समाधान मानायचं?;)

भुताखेताचा धागा आवडला. सर्व भुतखेतमंड्ळीना या नवीन भुताचा प्रणाम!! आमचे काही अनुभव (ऐकलेले) १) आमच्या गावाकडे अश्या भरपुर कथा एकायला मिळतात. गावाकड्चा ओढा, पड्की विहीर, मळा हि भुतांची रहायची आवडीची ठिकाणे. माझा दादा एकदा पावसाळ्यात त्याच्या मित्रांसोबत रात्री शेतांमधे खेकडे पकडायला गेला होता आणी त्यांच्याबरोबर तो चकवा का काय तो प्रकार घडला. रात्रभर ही मंडळी घरी न आल्याने काही घरातले लोक शोधायला म्हणुन बाहेर पड्ले. प्रत्येकजण कुठेतरी मुर्छीत होउन पड्ला होता. पायातल्या चपला इकडेतीकडे पडुन हरवल्या होत्या. त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते. पड्की विहीरीच्या तर खुप कथा आहेत. २) माझे आजोबा ट्रक ड्रायवर होते. रात्री एकदा ट्रक चालवत असताना त्यांना एक उंचापुरा म्हातारा लिफ्ट मागताना दिसला. त्यांनी गाडी थांबवली नाही. थोड्या वेळाने बघतात तर काय.... तो म्हातारा गाडीच्या वेगाने धावत येत होता. वेग वाढवला तरीही तो गाडीच्या बरोबर पळ्त होता. दुसर्या दिवशी गावात विचारले असता कळाले कि काही वर्षापुर्वी तिथे एका म्हातार्याचा ट्रकखाली येउन मोठा अपघात झाला होता. अजुन आठवेल तशी भर घालुच!!! :)

In reply to by मोहनराव

>>रात्रभर ही मंडळी घरी न आल्याने काही घरातले लोक शोधायला म्हणुन बाहेर पड्ले. प्रत्येकजण कुठेतरी मुर्छीत होउन पड्ला होता. पायातल्या चपला इकडेतीकडे पडुन हरवल्या होत्या. त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते. आमच्या ओळखीतल्या काही 'तारुण्यात पदार्पण केलेल्या' मुलांबद्दल अशा कथा ऐकू येत तेव्हा आमचे वडील अर्थपूर्ण हसत असत असे आठवते. ;)

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चांचाच्या तारुण्य पदार्पणाच्यावेळी घडलेली कथा वाचायला आवडेल.

Sarva Pitri Amavsya --धन्यवाद

In reply to by स्पा

मृत्युन्जय ;)

आमच्या गावाला एक शेत आहे. त्या शेतात रात्री पाणी वगैरे द्यायची पाळी आली तरी कोणी सहसा एकटे जात नाही. आणि गेले तरी तिथे मुक्काम करत नाहीत. एकदा असेच ३-४ जण गेले पाणी द्यायला. खूपच उशिर झाला म्हणून तिथेच गप्पा मारत बसले. गार वार्‍यात त्यांना झोपा लागल्या. थोड्यावेळाने त्यातल्या एकाला जाग आली तर त्याला असे आढळून आले की ते जिथे झोपले होते तिथपासून शेताच्या अगदी दुसर्‍या टोकाला ते होते. आणि शेतात कुठेही त्यांच्या पावलांचे ठसे नव्हते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चर्चा येऊन २ दिवस झाले आणि हा बिका आता हळूच पिल्लू सोडतोय. आधी घाबरला होतास कारे अंनिसला वगैरे. या धाग्यावर भुताहडळींचे राज्य आहे. तू घाबरू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. ;) बाकी श्टोरी मस्त!

In reply to by प्रियाली

छ्या: घाबरायचे काय त्यात? बाकीचे लोक काय फुसकुल्या सोडतायेत ते बघत होतो! ;) मूड लागल्यास (पक्षी: आठवल्यास) अजून लिहीन!

या आधी माझा भुतावर विश्वास नव्हता,पण आता आहे,मी स्वत: पाहिले आणी त्याने मला हलवले पण,हे सत्य आहे पण अजुनही मन मानत नाही.साधारण ५ वर्षापूर्वी मी एका शहरात नोकरीच्या निमीत्ताने गेले.खुप शोधले पण म्हणावा तसा फ्लॅट मिळत नव्ह्ता अचानक तो शोधा संपला आणि एक चांगला फ्लॅट मिळाला आणी मी पण फारशी चौकशी न करता घेतला.त्यावेळी मी कशाला घाबरत नव्हते,सगळयना खूप कौतुक वाटायचे ही एकटी मुलगी कशी राहाते,आणि ते पण त्या घरात,तो फ्लॅट २ मजल्यावर होता खाली एक ज्वेलर्सचे दुकान होते,पहिल्या मजल्यावर चाटे क्लास,आणि सर्वात वर मी एकटी म्हणजे त्या पूर्ण बिल्डिंग मधे रात्री मी एकटीच असायचे आणि रात्री मी मेन गेट ला लॉक करायचे. आजूबाजूचे माझ्याकडे खूप विचित्र पाहायचे पण का ते मला काही कळायचे नाही,खाली एक वॉचमन असायचा. करमणूक म्हणून संध्याकाळी कंप्यूटर क्लास लावला होत.एक महिना पण झाला नाही तोच एका रात्री,मी क्लास वरुन घरी आले, घरी आल्यावर आईशी मोबाइल्वर गप्पा मारल्या,तितक्यात कोणतरी माझा ड्रेस मागुन ओढत आहे असे वाटले,परत वळून पहिले तर कोणीच नाही.विचार केला अडकला असेल कशाततरी.परत झोपले,साधारण रात्री १ वाजता अचानक अंगावर काहीतरी चढत असल्याचा भास झाला,पाहीले तर एक हात लटकतोय व एक मुलगा त्याने मुस्लिम लोकांमधे घालतात ती टोपी घातली होती पांढरा शर्ट,मला विश्वासच बसत नव्ह्ता,मी स्वप्नात आहे का ते पाह्ण्यसाठी स्वताला चीमटा पण घेतला,मग मात्र खुप घाबरले कि हार्ट फेल झाला असता,तशिच ओरडले व पळ्त खाली आले,परत ईतका त्रास झाला कि बेशुद्ध झाले दवाखान्यात भरती करावे लागले.त्या वॉचमननेच मला शुद्धीवर आल्यावर सांगितले कि तिथे मुन्जा आहे त्यामुंळ तेथे कोणी रहात नाही,मी परत सामान आणायला॑ पण त्या घरात गेले नाही.

म्हणून उघडलं तर दारात बिका! मी आश्चर्याने थक्क झालो. "अरे ये ये ये, बिपिन ये!!" (हे अशोक सराफ स्टाईलने म्हणावे..;) ) त्याला घरात घेतले (कोण म्हणालं रे कोकणस्थ असूनही? ;) ) "कधी आलास? कसा आहेस? असा अचानक कसा काय?" "चल जेवायला बस." "नको नको, गडबड आहे! चटकन काहीतरी तोंडात टाकायला दे आणि मी निघतो. हां आणि आलो होतो अशाकरता की सर्वपित्री पेश्शलच्या धाग्यावर तू काही लिहिलं कसं नाहीयेस?" "अरे तुमच्यासारखे सगळे भूतप्रीय आणि भूतप्रियाली जमलेले असताना मी बापडा काय लिहिणार? आणि हा घे लाडू!" लाडू तोंडात टाकून त्याने एका क्षणात संपवला, मला जरा चमत्कारिक वाटले! पाणी द्यायला ग्लास पुढे केला तर त्याने एका दमात संपवला आणि ग्लासवर बोटांचे ठसेही नव्हते मग मात्र मला जरा भीती वाटायला लागली. कधी नव्हे ते बिकाने बेलबॉटम पँट घातल्याने त्याची पावलेही दिसत नव्हती. मलाच वेड्यासारखं झालंय असं वाटून मी तो विचार झटकला. बिका जायला निघायचं म्हणून वळला आणि त्याच्या बेलबॉटम खालून त्याची पावलं माझ्याकडे वळली! खल्लास एका क्षणात थरकापून मी उडालोच्....दचकून उठलो तर स्वप्न होतं.................मग विसरायच्या आत लिहायला बसलो. नाहीतरी बिका सांगून गेलाच होता ना लिही म्हणून! (बिलेटेड सर्वपित्री पेश्शल) रंगा (घटस्थापनेच्या दिवशी लिहिलं, उगाच मनात शंका नकोत, तसा मी अंधश्रद्ध आहे! ;) )

In reply to by चतुरंग

एका क्षणात बिका भारत ते अमेरिका दारावर टकटक करायला टकाटक पोहोचला तेव्हाच सर्व संशय दूर व्हायला हवे होते. ;) धाग्याचे शंभर अपराध भरले आहेत.

In reply to by प्रियाली

सर्वपित्री मस्त साजरी झाली! सगळ्या उलट्या पायाच्या लोकांसाठी एक उलट्या पिसांची कोंबडी आणा रे कोणीतरी!

In reply to by प्रियाली

च्यायला! रंगोपंतांना मीच भेटलो! =)) खुद के साथ बातां: पुढच्या वर्षी सर्वपित्रीला खरंच जायला पाहिजे रंगोपंतांकडे! ;)

मस्त भुतमय धागा. आमच्या काकांच्या मुलांना नेहमी भुते दिसायची. ते नेहमी वर्णन करायचे. लोणावळ्याला त्यांचा बंगला होता त्यात म्हणे रोज भांडी वाजायची. लाईच ऑन ऑफ व्हायची. नंतर ते मुंबईत रहायला आले. तिथे एका चुलत भावाला घरातच मुंडके कापलेली, साडी नेसलेली बाई दिसायची. भिंतीवर टांगलेला कपड्याचा हँगर मंद गतीने खाली पडताना दिसायचा. माझी चुलत बहीण नर्स आहे. ती तर लहानपणी सतत भुतांच्या गोष्टी सांगायची. ती नाईट शिप्टला टोपी घालून कधी डूलकी लागलीच की तिची टोपी सकाळी दुसर्‍या ठिकाणीच सापडायची. कसले कसले आवाज वगैरे. भरपुर किस्से आहेत. लिहेन सावकाश.

आमचं मास्तर भूताला हितकं घाबरायचं की म्हराटिचं व्याक्रण शिकीवताना भवीश्यकाळ, वर्तमाण काळ आनं पास्ट टेन्स असंच म्हनायचं..

आमच्यावर धागा... ?? http://www.sherv.net/cm/emo/angry/angry-skull-face-smiley-emoticon.gif थांबा..आता जनम कथाच द्येतो ठेऊन दोन!

---------------------------------॥दैनिक टनाटन प्रसन्न॥------------------------------ १)भूत कसे बनते??? ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................त!!! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif तर अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार.... स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घरे हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक चटकन येते! ) काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... http://www.sherv.net/cm/emoticons/bugs/hairy-spider-smiley-emoticon.gif ह्ही:ह्हा...! चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला? स्वारी... त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्वभूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात... स्त्री १-काय गं झोप लागत्ये? स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय? स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते? स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात? स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे... स्त्री२-होय की काय? आणी गं म ? स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो... एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो.. स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला? पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो.... स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली? स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे..... --------------------------------------- देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?--- "खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात!" http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० २)भूत बनविण्याची पाक-क्रुती:- साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते) क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...परंतू---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडतं,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं, की त्याच्यातलं भूत तय्यार ... http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-mask-smiley-emoticon.gif टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा का तयार झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते... ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०

In reply to by अत्रुप्त आत्मा

इच्या मारी ! (भिस्कूटे ! ) भयावह प्रतिभावंत लोकं हैत हित मनायची. काय जबरी स्टोरी लीव्लीय. एकदम मनापासून आणि अशरीरापासून अबिनंदन !!! शिंच्या अत्रूत्पा, तृप्त केल्यानं रे तू माका !!

पण बुवाजी तुमचा भुतांवर विश्वास का नाही? मला अशा दुष्ट शक्तींचे काही अनुभव आलेत. अशा दुष्ट शक्ती जगात आहेत! अनुभव हाच शिक्षक. मग कोणी काही म्हणो!!!

In reply to by जडभरत

@ अनुभव हाच शिक्षक. मग कोणी काही म्हणो!!!>> रैट्ट! माझ्यासाठिहि. कळत नव्हत या विक्षयातलं तेंव्हा. ;-)

वरील सर्व अनुभव वाचुन श्री. व्यंकटेश माडगुळकर यांच्या 'करुणाष्टक' या आत्मकथनपर पुस्तकातील एक प्रसंग आठवला . - लेखक लहान असताना त्यांच्या वडीलांची औंध प्रांतातील एका खेडेगावी बदली झाली . या गावात महिलांना भल्या पहाटे उठुन एका दुरवरील विहीरिपर्यंत जाउन पाणी आणावे लागत असे . माडगुळकर यांच्या आईसुद्धा त्याप्रमाणे पहाटे उठुन विहीरीतुन पाणी आणत असत . एकदा त्यांना झोपेत कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू आला . नेहमीप्रमाणे पहाट झाली असे समजुन त्या उठ्ल्या व घागर घेउन पाणी आणायला घराबाहेर आल्या . तर बाहेर अजुन पुर्ण अंधारच होता . त्यांना बाहेर अंगणात एक हिरवी साडी नेसलेली , कपाळाला मळवट भरलेली स्त्री उभी असलेली दिसली . ती स्त्री त्यांना जरबेने म्हणाली 'एवढ्या लवकर का उठलीस ? जाउन झोप' . त्या आवाजातील जरबेने भारुन माडगुळकर यांच्या आई परत घरात आल्या व झोपी गेल्या . दुसरया दिवशी सकाळी जेव्हा त्यांना हा रात्री घडलेला हा प्रसंग आठवला , तेव्हा त्यांना दरदरुन घामच फुटला व ताप आला .

लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग धागा . पण एवढुसेच प्रतिसाद होय . राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .

लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग धागा . पण एवढुसेच प्रतिसाद होय . राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .

तूम्ही NatGeo/Discovery वरची मालीका पाहीली आहे का. America's Most Hunted Paranomal Activity खरच मस्त असते. रात्री बघायला. ;)

मुंबई ते महाबळेश्वरच्या रस्त्यावर माझ्या ओफिस मधील काही सहकारी प्रवास करताना घडलेली हि घटना. लवकर मुंबईला पोचायच्या नादात रात्रीचा प्रवास करण्याचे ठरवून मंडळीनी प्रवास सुरु केला. ड्रायव्हर पट्टीचा चालवणारा असल्यामुळे चिंता नव्हती तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वाधिक बडबड करण्याऱ्या नम्रताला त्याच्या शेजारी बसवून सगळे पेंगायला लागले. नम्रताची अखंड बडबड सुरूच होती. अचानक समोरून पांढऱ्या साडीतील बाई गाडीसमोर येउन लिफ्ट मागू लागली. ड्रायव्हर कसलेला असल्यामुळे त्याला ह्या प्रकारची कल्पना आली पण तिला बघून नम्रताने नेमकी काच खाली केली आणि समोर दिसणारी बाई बाजूने मात्र अदृश्य झाली. तोपर्यंत वेग वाढवला असल्यामुळे काही झाले नाही पण त्यानंतर नम्रताला मात्र चांगलाच ताप भरला, जवळ जवळ महिनाभर "ती आली.... ती आली" करत झोपेत देखील ती ओरड होती. अजून एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे, २ वर्षापूर्वी हैद्राबादला जाण्याचा योग आला. "स्नो वर्ल्ड" पाहिल्यानंतर दुसर्या मजल्यावर असणारा हॉरर शो देखील बघायला मिळाला. आत शिरल्यावर खरच एखाद्या अति भव्य वाड्यात शिरल्याचा फील येत होता. जुनाट वास्तुत येणारा कुबट वास सगळीकडे भरून राहिला होता. जोडीला भीतीदायक संगीत आणि विचित्र आवाज. अपुर्या प्रकाशामुळे आपण कुठे चाललो आहोत काहीही कळत नव्हते. काही ठिकाणी तर एवढा अंधार होता कि सरळ वाट हि सापडेनाशी होत होती. पायाखाली हलणाऱ्या लाद्या, डोक्यावर खुपश्या झाडांच्या फांद्या होत्या. मधूनच एखादा रबरी पण हुबेहूब खरा वाटणारा साप अंगावर येई तर कधी पुढचे पाउल टाकल्यावर ती फारशी फुटभर खाली पाण्यात जाई. आपण खाली बघून चालावे तर अंधारात कुठूनतरी कानावर हलकीच फुंकर येई किंवा डोक्यावरून आवाज करत खोटे घुबड नाचे मधेच अर्धवट कापलेला आणि ओले रक्त (रंग) अंगाला लावणारा हात गळ्याभोवती येई . एवढे असूनही भूलभुलैया पण होताच. त्यात मनात नसतानाही लपाछुपी चा खेळ खेळावा लागला. ग्रुपमधील मेंबर त्यात यथेच्च आरडा-ओरडा करत बागडत होते. थोड्या वेळात भीती कमी झाल्यावर सगळ्या प्रकाराचा थोडा कंटाळा कम वैताग येऊ लागला कारण हे सगळे वाकून अनुभवायचे होते न!! अजून बाहेर कसे पडत नाही असा विचारही यायला लागला. तेवढ्यात एक भयानक भूत जवळ अंगावर आदळले. आधीच वैताग आल्यामुळेआणि त्यातून ते अंगावर खुपच जोरात आदळल्यामुळे त्याच्या पोटात जोरदार गुद्दा लगावला. ते भूत बिचारे तिथेच पोट धरून बसले हो!! तोपर्यंत आम्ही पुढे गेलो होतो. आपण ज्याला बदकले तो माणूस होता हे कळल्यावर अगणित वेळा सॉरी म्हणत त्याच्या पावलावर पाऊल टाकून बाहेर आले. कारण जर तसे केले नसते तर कपाळमोक्ष अटळ होता कारण मध्येच सरकणारी फरशी आणि त्याला समांतर ढकलणारी भिंत असे काहीबाही पण होते. परत एकदा सॉरीचा प्रोग्राम झाला आणि तिथून काढता पाय घेतला.

शरद उपाध्येंनी त्या दावूदवर एक मंत्र मारून त्याला संपवायला हवा>>> शरद उपाध्ये ती विद्या वापरात नाहीत . नुसती शिकून घेतलीये कुतूहल म्हणून. भुतं नेहमी पांढरेच कपडे का घालतात ? दुसरा रंग आवडत नाही का त्यांना ?

राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .
--- ताई हा विषय फार गहन आणि वादग्रस्त आहे. यावर इथे चर्चा शक्य नाही दिसत. स्वतंत्र धागाच काढायला हवा.