हरकारियाचा दृष्टांत
श्रोतेहो ही कथा ऐकावी । जी विक्रमा वेताळ ऐकवी। मी मूढ कीं कवि । यथामतिं वर्णिलीसे॥१॥ कथेचा राया विक्रमादित्य नायक। फिरें स्मशाने अनेकानेक। पकडूनि चेडेचेटूक। दंड त्यांसि करितसे॥२॥ उगवली अवसेचि रात। विक्रम झाला मार्गस्थ। मार्गी सापडले एक प्रेत। अग्नी द्यावया निघांला॥३॥ तंव तेथे झाला चमत्कार। प्रेती वेताळ करीं संचार। म्हणे मी आता करितो तुज ठार। आलास येथे कासयासीं॥४॥ विक्रम म्हणे तें सोपें नसे। गाठ तुझी मजसंगे पडलीसें। बघ आता तुझे हाल कैसे। करितो आता मी॥५॥ तंव वेताळ झाला सावध। भलत्या प्राण्याची पारध। करावया आलो मी मंद। समजले त्यालागी॥६॥ तो चतुरपणे बोले। यावरी एक उत्तर सापडलें। तें ऐक ऐक वहिलें। मग खुशाल दंड देईं॥७॥ मी सांगतो एक कथा। ऐक ती सावध चित्तां। कथा सांगूनि सरता। प्रश्न विचारेंन तुजलागीं॥८॥ जर न देसिं उत्तर । होउनिं शतशकलें तुझें शिर । लोळेल गडबडा धरणीवर। क्षणार्ध ही न लागें॥९॥ जर चुकिंचे उत्तर देसिं। सोडूनिं या प्रेतासिं । त्वरें पळेन आकाशी। ध्यानीं ठेव राजोत्तमा॥१०॥ विक्रमासिं पटलें मत। आता वेताळ कथा सांगत। ती ऐका होऊनिं एकचित्त। विनंतिसें श्रोतयांसि॥११॥ ऐसि एक शांत नगरी। राजा सुलक्षणी सुविचारी। दंडिले अनेक अत्याचारी। हा हा म्हणतां तयाने॥१२॥ काय वर्णावा राजाचा दरबार। लेखक विचारवंत कविवर। अन्नपूर्णा बल्लवाचार्य चित्रकार। यांचि असें मांदियाळी॥१३॥ परि एक असे विवंचना। एवढ्या विस्तीर्ण पत्तना। साधने विशेष दळणवळणा। काहीच नसतीं॥१४॥ तेही सापडले उत्तर। नाना नेमिले कारागीर। जावया नगराबाहेर। वाहने घडविलीं॥१५॥ संदेशांचि ने-आण करावया। शोधू लागलें उपाया। तोहिं सापडलां एकें ठायां। हरकारे नेमिलें॥१६॥ ऐसे जाहले सुमंगळ। चालें सर्व स्वच्छ निर्मळ। राज्याची जोडली गेली नाळ। बाहेरील नगरांसि॥१७॥ पण गोष्ट नसें इतुकीं सहज। पुण्य तेथे पापयांची गाज। उडविती राज्याची निज। कैसी ते ऐका॥१८॥ नेमिले जे हरकारे। त्यांतील निष्ठेने वागती सारे। ऐसिं कीर्ती नगरे। पसरलीसे॥१९॥ परि त्यातील हरकारे दोन । महाठक असती जाण । त्यांचे असे काय लक्षण। ऐक आता ॥२०॥ एक हरकारा अतिविक्षिप्त। संदेश द्यावया जात। तया नगरजनाच्या घरात । ठाण मांडितसे॥२१॥ जर जायी रामप्रहरासी। करावया बसे न्याहारीसी। जाता कोठे माध्यान्हीसी। भोजना बसे नि:शंक ॥२२॥ या हरकार्याने केला कहर। राजबंद्याचा पत्रव्यवहार। दाखवी बोलून तिसर्यासमोर। निंदा करी तयाची॥२३॥ राजबंदी दु:खी मनी। माझे क्षमापत्र नगरजनीं। दाविले याने वाचोनि। काय सुख मिळालें?॥२४॥ राजाच्या दरबारा जाता। बंदी झाला सांगता। हरकार्याची विक्षिप्तता। सांगितली तयाने॥२५॥ परी तो कैदी राज्याचा। कोण पाड ठेवी तयाचा। शेवटीं कडेलोट केला त्याचा। शिक्षा नाहीं चुकलीं॥२६॥ इकडे हरकार्यासि रायाने। बोलाविले दरबाराकारणें। म्हणें ऐशा कार्यानें। उद्या लावशील वाट॥२७॥ तुज समज देतों ये वेळें। ऐसे पुन्हा न करी वहिलें। अन्यथा तुजहीं बंदिशाळें। धाडवया लागेलं॥२८॥ जडली जी खोड एकदा। ती न जाई कदा। हरकारें चालूं ठेविला आपुला धंदा। निंदा किंवा वंदा॥२९॥ परी जो पकडला जाय। तोच चोर जगीं होय। ऐसा जगाचा न्याय। उफराटा॥३०॥ या हरकार्याच्या कर्मांची कथा। नाही कोणा आली पकडता। सुटला मोकाट आता। बंधन नसे तयासि॥३१॥ आता दुसरा ऐक भूपाळा। ज्याने हात घातला अहिंचे बिळा। इंगळींही न सोडिं त्याला। ऐसा हरकारा॥३२॥ त्याने करावे काय । प्रधानाच्या पत्रींचा आयव्यय। वाचता त्यासिं नाहीं भय। ऐसे केलेसें॥३३॥ अमात्याचि भार्या माहेराहूनि। पत्रे धाडे भर्तारालागूनि। ती ही वाचिल्यावाचूनिं । न राहिला हा॥३४॥ प्रधानासि संशय आला। त्याने उपाय एक पाहिला। तो पुढे अमलात आणीला। ऐक तो काय॥३५॥ प्रधाने लिहीले राजालागुनि। काल केलिसें पाहणीं। वाड्यामागल्या विहीरीमधूनि। कनकाचें हंडे असतिं॥ ३६॥ आता याने वाचिला व्यवहार। कसले सुवर्णहंडे सुसरी मगर। असती त्या कूपीं साचार। उतरता झाला॥३७॥ उतरल्या पश्चात कळली चूक। दूषण देत तो मूर्ख। मगरी-सूसरी अनेक। लागले पाठी॥३८॥ मग बाहेरी पळू लागला। प्राणी कसले सोडितीं त्याला। बोटांचा लचका तोडिला। केलासे घायाळ॥३९॥ जे जीवावरी आलें। ते पायाच्या बोटांवर भागले। पण गुण नाही गेलें । ऐक कैसे ते॥४०॥ पाय बांधी वस्त्राने। कसबसा चाले घराकारणे। पत्र लिहीले जे अमात्यभार्येने। काढू लागला पोतडीतूनिं॥४१॥ तिलाही संशय आलेला। चतूरपणा दाविला। ज्यादिशी निघाली सासुराला। तेव्हाच पत्र लिहीलें॥४२॥ पत्री घातली खाजकोयली। पत्र उघडता अंगी लागली। अंगांगाचि काहिली। झाली हरकार्याच्या॥४३॥ पायी घाव अंगी खाज। अविवेकाचा उतरला माज। केल्या अकृत्याची समज । उशिरा मिळाली॥४४॥ खरी मजा घडली दुसरे दिशी। प्रधान आला राजवाड्याशी। अमात्यही स्वभार्येशि। घेउनि येई॥४५॥ राजाशी म्हणती राजेश्वरा। बोलवा तो हरकारा। पातकांच्या केले कहरा। बोलवा आधिं तयासिं॥४६॥ राजाने सेवक धाडले सत्त्वर। शोधा रे हरकार्याचे घर। सांगा बोलाविती राजेश्वर॥ त्वरें येई॥४७॥ कैसा येतो हरकारा। सेवक आले घरा। तो हा शयनघरा। पडलासे निपचित॥४८॥ सर्वांगे बहुत सुजला। पायी जखम वाहे घळघळा। सेवक म्हणति रे चांडाळा। उचलोनि नेतो आता॥४९॥ आणिते झालें दरबाराशी। पाणी आले जनांच्या नयनासिं। पण आता क्षमा कैसि। अपराध असे केला॥५०॥ अपराध केला मान्य । राजा जाहला खिन्न। म्हणें तुजवरिं विसंबून। ठरलो मूर्ख॥५१॥ राजा क्रोधे पेटला। म्हणे तो सेवकांला। उचला रे या चांडाळा। टाका नगराबाहेरी॥५२॥ परराज्यां पसरलीं वार्ता। ते म्हणती अहा समर्था । इतुके अघटित होता। होतास कोठे राया॥५३॥ जे घडलें अघटित। परराज्यीं चर्चेचा विषय होत। जणू कां तोंडीलावणे सेवित। भोजनासंगे॥५४॥ आता वेताळ म्हणे विक्रमासिं। सांग राया मजसि़। कोण निर्दोष कोणी दोषी। असे कथेमाजी॥५५॥ राया म्हणे वेताळा। हरकारेचि दोषी वाटती मजला। विश्वासघात असे केला। तयांनी राजाचा॥५६॥ येथेच चुकलासि तूं राजा। राजाही दोषी असे दुजा। कैसे ते ऐक मनुजा। म्हणे वेताळ॥५७॥ रायाची चूक फक्त एक। न ठेविली काही देखरेख। कार्ये नेमिले महाठक। याची जाण न झाली॥५८॥ एकाच अपराधासि। शिक्षा विविध कैसि। एका देई समजेसि। एका केले हद्दपार॥५९॥ राजकैदी तक्रार करित। तंव हरकार्यासि समज देत। प्रधानामात्य दरबारी येत। तो कठोर केले शासन॥६०॥ हे असते वेळिंच केलें । तर परराज्यीं नसतें हसें जालें। चूक तें कळो आलें । ठकावरीं विसंबला॥६१॥ असो नगरजनांही आता कळलें। विश्वासूं नयें कोणा वहिलें। पदतळीं सापांसरड्यांची बिळें। असतील कीं॥६२॥ वरीवरी जरी दिसलें शांत। नगरजन हादरलें मनांत। ज्याची शंका होतो घेत। तेच घडलेसे॥६३॥ ऐसे वदोनि वेताळ। सोडी ते प्रेत तात्काळ। चुकीच्या उत्तराचे फळ। तेंच कीं होतें॥६४॥जर असे लिहीले अधिकउणे। विनंती असे श्रोतयांकारणें। मानुनि बाळकाचे बोलणें। पदरी घेईंजें॥६५॥ मज ना छंदवृत्तांचे भान। सुचलें ते काढिलें लिहोन। जनांनि ऐकोन वाचोन । मानावे गोड ही विनंति ॥६६॥ हा हरकारियाचा दृष्टांत। लिहोनिया पूर्ण होत। वाचकश्रोतयांस नमन करित। सुफळसंपूर्ण केलासे॥६७॥
प्र.का.टा.आ.
प्र.का.टा.आ
सुधांशु महाराज की जय
कहर
+१
सुरेख
खरोखर वेगळीच अनुभुती आली पोथी
पोथी छान पण
उत्तम
अर्धशतका बद्दल अभिनंदन
खातंय मार आता
काकाईझम
हाहाहाहा
+१
=)) =))
काहीच कल्ला नाय. अभ्यास वाढव
क्या
ठसन द्या.... ठसन घ्या.... आता
मस्त मस्त मस्त
आमच्याकडुन साष्टांग
साष्टांग दंडवत! अध्याय वाचला,
बिका, तुमास्नी असं मनायचंय
सहनत आहे! (शेंडी / टक्कल
प्रतिसाद वाचुन काय तो अंदाज
मस्त मस्त!
लई भारी लिहीलंय...!!