Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सूड on Sat, 09/17/2011 - 11:26
श्रोतेहो ही कथा ऐकावी । जी विक्रमा वेताळ ऐकवी। मी मूढ कीं कवि । यथामतिं वर्णिलीसे॥१॥ कथेचा राया विक्रमादित्य नायक। फिरें स्मशाने अनेकानेक। पकडूनि चेडेचेटूक। दंड त्यांसि करितसे॥२॥ उगवली अवसेचि रात। विक्रम झाला मार्गस्थ। मार्गी सापडले एक प्रेत। अग्नी द्यावया निघांला॥३॥ तंव तेथे झाला चमत्कार। प्रेती वेताळ करीं संचार। म्हणे मी आता करितो तुज ठार। आलास येथे कासयासीं॥४॥ विक्रम म्हणे तें सोपें नसे। गाठ तुझी मजसंगे पडलीसें। बघ आता तुझे हाल कैसे। करितो आता मी॥५॥ तंव वेताळ झाला सावध। भलत्या प्राण्याची पारध। करावया आलो मी मंद। समजले त्यालागी॥६॥ तो चतुरपणे बोले। यावरी एक उत्तर सापडलें। तें ऐक ऐक वहिलें। मग खुशाल दंड देईं॥७॥ मी सांगतो एक कथा। ऐक ती सावध चित्तां। कथा सांगूनि सरता। प्रश्न विचारेंन तुजलागीं॥८॥ जर न देसिं उत्तर । होउनिं शतशकलें तुझें शिर । लोळेल गडबडा धरणीवर। क्षणार्ध ही न लागें॥९॥ जर चुकिंचे उत्तर देसिं। सोडूनिं या प्रेतासिं । त्वरें पळेन आकाशी। ध्यानीं ठेव राजोत्तमा॥१०॥ विक्रमासिं पटलें मत। आता वेताळ कथा सांगत। ती ऐका होऊनिं एकचित्त। विनंतिसें श्रोतयांसि॥११॥ ऐसि एक शांत नगरी। राजा सुलक्षणी सुविचारी। दंडिले अनेक अत्याचारी। हा हा म्हणतां तयाने॥१२॥ काय वर्णावा राजाचा दरबार। लेखक विचारवंत कविवर। अन्नपूर्णा बल्लवाचार्य चित्रकार। यांचि असें मांदियाळी॥१३॥ परि एक असे विवंचना। एवढ्या विस्तीर्ण पत्तना। साधने विशेष दळणवळणा। काहीच नसतीं॥१४॥ तेही सापडले उत्तर। नाना नेमिले कारागीर। जावया नगराबाहेर। वाहने घडविलीं॥१५॥ संदेशांचि ने-आण करावया। शोधू लागलें उपाया। तोहिं सापडलां एकें ठायां। हरकारे नेमिलें॥१६॥ ऐसे जाहले सुमंगळ। चालें सर्व स्वच्छ निर्मळ। राज्याची जोडली गेली नाळ। बाहेरील नगरांसि॥१७॥ पण गोष्ट नसें इतुकीं सहज। पुण्य तेथे पापयांची गाज। उडविती राज्याची निज। कैसी ते ऐका॥१८॥ नेमिले जे हरकारे। त्यांतील निष्ठेने वागती सारे। ऐसिं कीर्ती नगरे। पसरलीसे॥१९॥ परि त्यातील हरकारे दोन । महाठक असती जाण । त्यांचे असे काय लक्षण। ऐक आता ॥२०॥ एक हरकारा अतिविक्षिप्त। संदेश द्यावया जात। तया नगरजनाच्या घरात । ठाण मांडितसे॥२१॥ जर जायी रामप्रहरासी। करावया बसे न्याहारीसी। जाता कोठे माध्यान्हीसी। भोजना बसे नि:शंक ॥२२॥ या हरकार्‍याने केला कहर। राजबंद्याचा पत्रव्यवहार। दाखवी बोलून तिसर्‍यासमोर। निंदा करी तयाची॥२३॥ राजबंदी दु:खी मनी। माझे क्षमापत्र नगरजनीं। दाविले याने वाचोनि। काय सुख मिळालें?॥२४॥ राजाच्या दरबारा जाता। बंदी झाला सांगता। हरकार्‍याची विक्षिप्तता। सांगितली तयाने॥२५॥ परी तो कैदी राज्याचा। कोण पाड ठेवी तयाचा। शेवटीं कडेलोट केला त्याचा। शिक्षा नाहीं चुकलीं॥२६॥ इकडे हरकार्‍यासि रायाने। बोलाविले दरबाराकारणें। म्हणें ऐशा कार्यानें। उद्या लावशील वाट॥२७॥ तुज समज देतों ये वेळें। ऐसे पुन्हा न करी वहिलें। अन्यथा तुजहीं बंदिशाळें। धाडवया लागेलं॥२८॥ जडली जी खोड एकदा। ती न जाई कदा। हरकारें चालूं ठेविला आपुला धंदा। निंदा किंवा वंदा॥२९॥ परी जो पकडला जाय। तोच चोर जगीं होय। ऐसा जगाचा न्याय। उफराटा॥३०॥ या हरकार्‍याच्या कर्मांची कथा। नाही कोणा आली पकडता। सुटला मोकाट आता। बंधन नसे तयासि॥३१॥ आता दुसरा ऐक भूपाळा। ज्याने हात घातला अहिंचे बिळा। इंगळींही न सोडिं त्याला। ऐसा हरकारा॥३२॥ त्याने करावे काय । प्रधानाच्या पत्रींचा आयव्यय। वाचता त्यासिं नाहीं भय। ऐसे केलेसें॥३३॥ अमात्याचि भार्या माहेराहूनि। पत्रे धाडे भर्तारालागूनि। ती ही वाचिल्यावाचूनिं । न राहिला हा॥३४॥ प्रधानासि संशय आला। त्याने उपाय एक पाहिला। तो पुढे अमलात आणीला। ऐक तो काय॥३५॥ प्रधाने लिहीले राजालागुनि। काल केलिसें पाहणीं। वाड्यामागल्या विहीरीमधूनि। कनकाचें हंडे असतिं॥ ३६॥ आता याने वाचिला व्यवहार। कसले सुवर्णहंडे सुसरी मगर। असती त्या कूपीं साचार। उतरता झाला॥३७॥ उतरल्या पश्चात कळली चूक। दूषण देत तो मूर्ख। मगरी-सूसरी अनेक। लागले पाठी॥३८॥ मग बाहेरी पळू लागला। प्राणी कसले सोडितीं त्याला। बोटांचा लचका तोडिला। केलासे घायाळ॥३९॥ जे जीवावरी आलें। ते पायाच्या बोटांवर भागले। पण गुण नाही गेलें । ऐक कैसे ते॥४०॥ पाय बांधी वस्त्राने। कसबसा चाले घराकारणे। पत्र लिहीले जे अमात्यभार्येने। काढू लागला पोतडीतूनिं॥४१॥ तिलाही संशय आलेला। चतूरपणा दाविला। ज्यादिशी निघाली सासुराला। तेव्हाच पत्र लिहीलें॥४२॥ पत्री घातली खाजकोयली। पत्र उघडता अंगी लागली। अंगांगाचि काहिली। झाली हरकार्‍याच्या॥४३॥ पायी घाव अंगी खाज। अविवेकाचा उतरला माज। केल्या अकृत्याची समज । उशिरा मिळाली॥४४॥ खरी मजा घडली दुसरे दिशी। प्रधान आला राजवाड्याशी। अमात्यही स्वभार्येशि। घेउनि येई॥४५॥ राजाशी म्हणती राजेश्वरा। बोलवा तो हरकारा। पातकांच्या केले कहरा। बोलवा आधिं तयासिं॥४६॥ राजाने सेवक धाडले सत्त्वर। शोधा रे हरकार्‍याचे घर। सांगा बोलाविती राजेश्वर॥ त्वरें येई॥४७॥ कैसा येतो हरकारा। सेवक आले घरा। तो हा शयनघरा। पडलासे निपचित॥४८॥ सर्वांगे बहुत सुजला। पायी जखम वाहे घळघळा। सेवक म्हणति रे चांडाळा। उचलोनि नेतो आता॥४९॥ आणिते झालें दरबाराशी। पाणी आले जनांच्या नयनासिं। पण आता क्षमा कैसि। अपराध असे केला॥५०॥ अपराध केला मान्य । राजा जाहला खिन्न। म्हणें तुजवरिं विसंबून। ठरलो मूर्ख॥५१॥ राजा क्रोधे पेटला। म्हणे तो सेवकांला। उचला रे या चांडाळा। टाका नगराबाहेरी॥५२॥ परराज्यां पसरलीं वार्ता। ते म्हणती अहा समर्था । इतुके अघटित होता। होतास कोठे राया॥५३॥ जे घडलें अघटित। परराज्यीं चर्चेचा विषय होत। जणू कां तोंडीलावणे सेवित। भोजनासंगे॥५४॥ आता वेताळ म्हणे विक्रमासिं। सांग राया मजसि़। कोण निर्दोष कोणी दोषी। असे कथेमाजी॥५५॥ राया म्हणे वेताळा। हरकारेचि दोषी वाटती मजला। विश्वासघात असे केला। तयांनी राजाचा॥५६॥ येथेच चुकलासि तूं राजा। राजाही दोषी असे दुजा। कैसे ते ऐक मनुजा। म्हणे वेताळ॥५७॥ रायाची चूक फक्त एक। न ठेविली काही देखरेख। कार्ये नेमिले महाठक। याची जाण न झाली॥५८॥ एकाच अपराधासि। शिक्षा विविध कैसि। एका देई समजेसि। एका केले हद्दपार॥५९॥ राजकैदी तक्रार करित। तंव हरकार्‍यासि समज देत। प्रधानामात्य दरबारी येत। तो कठोर केले शासन॥६०॥ हे असते वेळिंच केलें । तर परराज्यीं नसतें हसें जालें। चूक तें कळो आलें । ठकावरीं विसंबला॥६१॥ असो नगरजनांही आता कळलें। विश्वासूं नयें कोणा वहिलें। पदतळीं सापांसरड्यांची बिळें। असतील कीं॥६२॥ वरीवरी जरी दिसलें शांत। नगरजन हादरलें मनांत। ज्याची शंका होतो घेत। तेच घडलेसे॥६३॥ ऐसे वदोनि वेताळ। सोडी ते प्रेत तात्काळ। चुकीच्या उत्तराचे फळ। तेंच कीं होतें॥६४॥जर असे लिहीले अधिकउणे। विनंती असे श्रोतयांकारणें। मानुनि बाळकाचे बोलणें। पदरी घेईंजें॥६५॥ मज ना छंदवृत्तांचे भान। सुचलें ते काढिलें लिहोन। जनांनि ऐकोन वाचोन । मानावे गोड ही विनंति ॥६६॥ हा हरकारियाचा दृष्टांत। लिहोनिया पूर्ण होत। वाचकश्रोतयांस नमन करित। सुफळसंपूर्ण केलासे॥६७॥

Submitted by वपाडाव on Mon, 09/19/2011 - 15:21

In reply to +१ by मी-सौरभ

Permalink

प्र.का.टा.आ.

प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 09/19/2011 - 17:17

In reply to प्र.का.टा.आ. by वपाडाव

Permalink

प्र.का.टा.आ

प्र.का.टा.आ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 09/19/2011 - 17:34

In reply to प्र.का.टा.आ by किसन शिंदे

Permalink

सुधांशु महाराज की जय

सुधांशु महाराज, वाढदिवस झाला, वाढदिवसाच्या शुभेच्छाही मिळाल्या, आता बड्डे प्यार्टी कधी मिळणार?
  • Log in or register to post comments

Submitted by ढब्बू पैसा on Sun, 09/18/2011 - 04:43

Permalink

कहर

जबराट लिहिले आहे. वाचताना टिपीकल पोथीच्या लयीत वाचल्याने अजून मजा आली :). शैली भन्नाटच! मजकूर समजला :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 09/18/2011 - 17:24

In reply to कहर by ढब्बू पैसा

Permalink

+१

जबराट लिहिले आहे. वाचताना टिपीकल पोथीच्या लयीत वाचल्याने अजून मजा आली . शैली भन्नाटच!
अगदी! +१
मजकूर समजला
ज्यांना समजायला हवा त्यांना समजत नाही; समजत नाही म्हणून असे साहित्य मिपावर टिकते आणि यापेक्षा अधिक स्पष्ट लिहिले तर शिक्षा होते. ;) सदर लेखकाची शैली आवडली किंबहुना त्याचा वापर इतरांनीही करावा अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sun, 09/18/2011 - 21:54

In reply to +१ by प्रियाली

Permalink

सुरेख

सुधांशुजींची पाठ थोपटा रे कोणीतरी. पोथी छान लिहीली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 09/19/2011 - 00:10

In reply to सुरेख by चित्रा

Permalink

खरोखर वेगळीच अनुभुती आली पोथी

खरोखर वेगळीच अनुभुती आली पोथी वाचून
  • Log in or register to post comments

Submitted by संपत on Sun, 09/18/2011 - 23:42

Permalink

पोथी छान पण

रुपक डोक्यावरून गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेमर on Mon, 09/19/2011 - 00:51

Permalink

उत्तम

सुंदर टोला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 09/19/2011 - 10:21

Permalink

अर्धशतका बद्दल अभिनंदन

नंदन काका आणि श्रामो काका यांच्या सुरेख भागीदारी मुळे संघाचे अर्धशतक फलकावर झळकले अभिनंदन . आजच्या दिवसात शतक पूर्ण होवो , हीच वेताळा चरणी प्रार्थना ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 09/19/2011 - 10:31

In reply to अर्धशतका बद्दल अभिनंदन by स्पा

Permalink

खातंय मार आता

नंदन काका आणि श्रामो काका यांच्या सुरेख भागीदारी मुळे संघाचे अर्धशतक फलकावर झळकले
खातंय मार आता. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 09/19/2011 - 11:30

In reply to खातंय मार आता by श्रावण मोडक

Permalink

काकाईझम

काकाईझम नावाचा एक धार्मिक पंथ आहे. 'ब्रदरहूड' ह्या अर्थी. (जिज्ञासूंनी ह्या पानावर जाऊन Kakaism शोधून पहावे) श्री. स्पा ह्यांचा प्रतिसाद त्या दृष्टिकोनातून स्वीकारण्यात येत आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 09/19/2011 - 12:17

In reply to काकाईझम by नंदन

Permalink

हाहाहाहा

स्पा म्हणेल, "मी माझे शब्द मागे घेतो, तुझी स्वीकृती नको; पण त्या लिंका आवर." च्यायला, कुठं पाठवशील एखाद्याला सांगता येणार नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 09/19/2011 - 12:21

In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक

Permalink

+१

मी माझे शब्द मागे घेतो, तुझी स्वीकृती नको; पण त्या लिंका आवर श्रीयुत नंदन लिंकाळे आजकाल लैच लिंका पाडाय लागले हैत :D
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 09/19/2011 - 10:32

Permalink

=)) =))

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Mon, 09/19/2011 - 11:25

Permalink

काहीच कल्ला नाय. अभ्यास वाढव

काहीच कल्ला नाय. अभ्यास वाढव भावश्या अभ्यास. बाकी हुशार लोकांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Mon, 09/19/2011 - 11:53

Permalink

क्या

क्या बात!! क्या बात!!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 09/19/2011 - 13:52

Permalink

ठसन द्या.... ठसन घ्या.... आता

ठसन द्या.... ठसन घ्या.... आता होउन जाउ द्या..... वाह रे मेरे शेर.... तु बहुत आगे जायेगा....
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 09/19/2011 - 14:00

Permalink

मस्त मस्त मस्त

एकदम भारी माल. एक लंबर. मि. पा. वरच्या एका मॄत आयडीची आठवण झाली. बाबारे तुझ्या पोतडी मधे अजुन काय काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 09/19/2011 - 14:51

Permalink

आमच्याकडुन साष्टांग

आमच्याकडुन साष्टांग स्वीकारावा सुधांशु महाराज.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 09/19/2011 - 16:47

Permalink

साष्टांग दंडवत! अध्याय वाचला,

साष्टांग दंडवत! अध्याय वाचला, मजकूर समजला! हा एवढा मोठा मजकूर पोथीरूपात लिहायचा म्हणजे भन्नाटच!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 09/19/2011 - 17:29

In reply to साष्टांग दंडवत! अध्याय वाचला, by बिपिन कार्यकर्ते

Permalink

बिका, तुमास्नी असं मनायचंय

बिका, तुमास्नी असं मनायचंय का? (मी बी, मी बी ) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 09/19/2011 - 18:21

In reply to बिका, तुमास्नी असं मनायचंय by वपाडाव

Permalink

सहनत आहे! (शेंडी / टक्कल

सहनत आहे! ;) (शेंडी / टक्कल वगळता! ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 09/19/2011 - 20:00

Permalink

प्रतिसाद वाचुन काय तो अंदाज

प्रतिसाद वाचुन काय तो अंदाज लागला असं मला वाटतंय. बाकी छान ल्हिलंय. शैली का काय म्हणतात ती छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Wed, 09/21/2011 - 12:48

Permalink

मस्त मस्त!

सर्वप्रथम इतके चांगले साहित्य नजरेतुन सुटले याबद्दल खेद व्यक्त करतो. मस्त लिहिलयस रे सुड. एकदम आवडेश.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on Wed, 09/21/2011 - 15:41

Permalink

लई भारी लिहीलंय...!!

लई भारी लिहीलंय...!!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 13456 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com