('उड जायेगा हंस अकेला' ही बहूधा कबीराची रचना अनेकदा कुमार गंधर्वांच्या आवाजात ऐकली होती. आज असेच सूचल्यावर पुन्हा ऐकली. तेव्हा सूचलेले काही विचार.)
मी हंस एकटाच काय टोळक्यात/नेही उडतांना पाहिलेला नाही. त/नेवरून आठवले. टोळक्याने की टोळक्यात? म्हणजे या दोन शब्दांत नेमका काय फरक असावा? 'टोळक्याने' म्हणजे 'रस्त्याच्या कडेने' किंवा 'धीराने तोंड दिले' किंवा 'साल्याने नाहीच दिले' सारखे असावे. टोळके - एक शस्त्र किंवा ढाल किंवा उगाचचपणा. 'टोळक्यात'म्हणजे 'जगात काहीच नाही', 'पावसाळ्यात चिखल', 'टेम्पोत बसवला' किंवा 'रिक्षात चिंतन' वगैरे. थोडक्यात छोटा, मर्यादीत. कशाततरी बसणारा. टोळक्यात मावणारा - त्याला पकडून राहणारा - त्याच्या पकडीत सापडलेला. किंवा अनेक. पण भजनातला हंस एकटाच आहे. जे मला अनेकदा जाणवते. एकटेपणा आणि साहस. साहस म्हणजेच एकटेपणा काय? काहीही असो. कबीर म्हणतो तसे 'हंस अकेला'च उडून जातो. म्हणजे शेवटी. अगदी शेवटी.
जग बघतच बसते - 'जग दर्शनका मेला'. बघते ते ठीकच पण फक्त बघतच बसते असे काही ओळीतून जाणवते. पण तसे नाही. जग इतरांच्या जाण्याला बघते तेव्हा तुम्ही बघणारे (केवळ बघणारेच) असता. तुम्ही इतर बघणार्यांना बघता. मग एकटेच उडतांना त्या सगळ्या बघणार्या डोळ्यांतले बघितलेपण नैसर्गिकपणेच कल्पनेचे रिकामपण भरून टाकते. तुम्ही ठरवता आत्ता उडतो - निरपेक्षपणे? कदाचित नाही कदाचित होपण. जग बघतेच हे मात्र खरे. पण बघतच बसते असे नाही. बघते - हो. आणखी बरेच बघते. बघत बसत नाही. बसले तर इतर बघ्यांना काहीच काम-धंदा उरणार नाही.
'जैसे पात गिरे तरूवरके, मिलना बहूत दुहेरा'. पात म्हणजे झाडाची पाने असावीत. जी शेजारी-शेजारी अनेक शेजारांत टिकून असतात. वारा येतो. त्याच्या दिशेप्रमाणे कुठे-कुठे पडतात. शेजार्यांना पुन्हा भेटतीलच असे नाही. पुन्हा भेटणे दुरापास्तच. 'ना जानू किधर गिरेगा, लग गया (लग्ग्या) पवनका रेला'. वार्याचे काय सांगावे? न जाणो कुठल्या दिशेने जाईल?
'जब होवे उमर पुरी, जब झूटेगा हूकुम हूजुरी'. वय जास्त होईल तेव्हा किंवा 'मालकां'च्या मनात येईल तेव्हा. का बरे या लोकांना (कबीराला) कुठला हुकूम सूटत असेल असे वाटते? मला तर वाटत नाही. पण माझ्या ठरवण्याला मर्यादा आहे. मी ठरवू शकतो. किंवा नाही. माझे कर्तेपण नष्ट होणे म्हणजे कोणाच्या कर्तेपणाची पावती आहे काय? माहीत नाही. पण मी ठरवल्याशिवायही साहसी अनुभव आपसूकच येऊन गेला आहे. मी आणि साहस हे समीकरण (की एकपण) माझ्या मनात आता आपासुकतेमुळे (की रँडमपणामुळे) घट्ट होऊ लागले आहे.
'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला'. तुला आवडले नसल्यास तुझ्या सामर्थ्याला एकवटून उभा रहा आणि विचार, काय विचारशील? का? का? सामर्थ्य - अस्तित्त्व की अस्तित्त्वाच्या जाणीवेचा हँगओवर? विचार रे. होऊन जाऊ दे राडा - तुझ्यापुरता.
'दास कबीर हरके गूण गावे, वा हरको परम पावे' 'गुरूकी करणी गुरू जायेगा, चेले की करणी चेला'. कसल्याच निश्चयापासून (निश्चितीकरण) मुक्ती नाही. शेवटपर्यंत. तुमची पारर्शिकता तुमच्याही कधी ध्यानी आली आहे का? तुम्ही कोण आहात? तुमच्या ज्ञानाचे शिष्य की तुमच्या ज्ञानाचे विश्लेषक (गुरू (गुरू विश्लेषकच असल्यास तुम्ही शिष्य आहात))?
(कविता काय आहे? याचा अनेकदा विचार केल्यावर कविता 'नेमकेपण नसणे' किंवा 'अनिश्चितपण' असे मला जाणवले. मग जुन्या अनेकांना हे कसे भासले असावे आणि त्यांनी ते कसे मांडले असावे असा विचार मनात आला. या भजनात मला उत्तर मिळाले. आम्ही वाचक 'पाहणारे' आहोत. साहस म्हणजेच कविता, असे वाटत राहीले.)
वाचने
2994
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कबीर आणि कुमार - एक डेडली रसायन
छान मुक्तक.. आवडल
माझे अत्यंत आवडते भजन आहे
संज्ञाप्रवाही शैली आवडली.
हो...
In reply to संज्ञाप्रवाही शैली आवडली. by राजेश घासकडवी
छान
क्रेमर + घासु = _/\_
वाचून छान वाटलं....
तुकोबारायांनी ज्या मरणाबद्दल
In reply to वाचून छान वाटलं.... by मन१
अर्धवटरावांची प्रतिक्रिया फार
धन्यवाद
एकदा वाचलं, समजलं नाही म्हणून
दुजे के संग नही जाऊंगी
केमर...अप्रतिम रस