हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्याचे दार उघडावे..
या पुर्वीचे भाग.
हवेतल्या गोष्टी - १
हवेतल्या गोष्टी - २ : ती
पावसाळा सुरू झालाय. अजुन तिन चार महिने तरी धडधडत यावं जावं लागणार. एरवी काहीवेळेला विमानप्रवास अगदीच एकसूरी आणि कंटाळवाणा होतो. थकलेलो असेन आणि एकही पुस्तक हातात नसेल तर बसल्याक्षणी डोळे मिटून घेण्याची कला आताशा अवगत झालेली आहे. पण अशा दिवसातली गोष्टच काही और आहे.
खूप पाउस असेल किंवा 'नभ मेघांनी आक्रमिले' असेल तर त्या विमानाच्या नेहेमीच्या प्रवासपातळीवरून खालच्या पातळीवर जाण्यासाठी 'सेफ' फट शोधावी लागते. त्यासाठी किती घिरट्या घालाव्या लागतील कोण जाणे. सारखे धक्के बसत असतात, हादरे बसत असतात. ह्या सगळ्या तारांबळीत हळुच सहप्रवाशांच्या चेहेर्यावरचे भाव टिपणं यासारखी मौज नाही. अशावेळेस प्राथमीक भितीवर नियंत्रण ठेवून जरा आजूबाजूला पाहिले तर अनेक नजारे दिसतात.
प्रवास: पुणे बंगळूरू, वेळ साधारणत: नऊ साडेनऊची. माझी नेहेमीची आयल सीट. माझ्या मागच्याच सीटवर एक तरूणी, बहुतेक नवविवाहीत, हातात इंग्रजी पुस्तक घेउन वाचल्याचा बहाणा करत इकडेतिकडे बघत होती.
बंगलूरू जवळ आल्यावर डीसेंट चालू झाल्याची घोषणा पायलटनी केली. खराब हवामानाची घोषणा ऐकल्यावर प्रवाशांचे साधारणतः दोन ठळक प्रकार होतात. चेहेर्यावर चिंतेचं जाळं विणलं गेलेले आणि हि घोषणा ऐकून उगाचच बेफिकीर चेहेरा करून भुवई उडवणारे.
विमान ढगात शिरल्यावर हळूहळू धक्के वाढत गेले. सगळ्यांच्याच चेहेर्यावर चिंतेची भावना दिसू लागली. काही सेकंदानंतर धक्के अजूनच वाढले, विमान जोरानं थरथरू लागलं. दाट ढगात शिरल्यावर हा नेहेमीचा भाग. साधारणत: या वेळेपर्यंत लोक नकली बेफिकीरीची भावना सोडून हँडरेस्ट घट्ट पकडून बसलेले असतात. काही जण आपल्या पुढच्या सीटची पाठ घट्ट धरून ठेवतात. काही जण गळ्यातलं लॉकेट वगैरे मुठीत धरून ठेवतात. काही जण डोळे मिटून काहितरी पुटपुटायला सुरूवात करतात. प्रत्येकजण खिडकीतून बाहेर बघायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही स्वतःची भिती जेवढी लवकर बाजूला कराल तेवढं तुम्हाला हे सगळं एंजॉय करायला जास्त वेळ मिळतो.
हादरे वाढल्यानंतर माझ्या मागच्या बाईनं माझ्या सीटची पाठ घट्ट धरून ठेवली होती, माझ्या दोन्ही कानापाशी तिच्या आवळलेल्या मुठी मला जाणवत होत्या, त्यामुळे मी जरासा आक्रसूनच बसलो होतो. धक्केविरहीत असे ५-७ सेकंद गेले, सगळं सुरळीत झालं असं समजून तिनं हाताची पकड सोडली त्याच क्षणी एक जोरदार हादरा बसला. तिनं घाबरून जोरात हाताचा कवळा घातला माझ्या बेकरेस्टला. आणी क्षणभर माझे डोळेच पांढरे झाले. त्या जोरदार हादर्यामुळं तिनं साक्षात माझा गळा आवळला होता पाठीमागून.
मला ह्या अनपेक्षीत हल्ल्यानं काही सुचेना. ओरडायलाही जमेना, शेवटी कसंबसं मी तिचा हात बाजूला केला तेव्हा श्वास घेता आला. नंतर ती भयंकर ओशाळ्या चेहेर्यानं दोनतीन वेळेला सॉरी म्हणाली. माझ्या शेजारचा एक गुज्जूभाइ माझ्याकडे बघून मिश्कीलपणे हसत होता. मी पण त्याच्याकडे पाहून हसलो, पण त्याला खरं कारण कळलंच नाही. कारण मी त्याला मघाशीच कुठल्यातरी देवाचा फोटो शर्टाच्या खिशातुन काढून हातात घट्ट पकडताना बघितलं होतं.
__________________________________________________________________________________
मला अशाप्रसंगी विमानात भिती वाटायची कधी बंद झाली? किंवा खरंच बंद झाली का? की केवळ सवयीचा भाग म्हणून आता भिती वाटत नाही. नेहेमीच्या धक्क्यांपेक्षा काही वेगळ्या पद्धतीनं विमान हलू लागलं तर मला भिती वाटेल का? कदाचित विमान काहिवेळ फ्रीफॉल मधे गेलं तर मीही तसाच हॅंडरेस्ट घट्ट पकडून ठेवेन का?
अगदी सुरवातीला पहिल्या काही विमानप्रवासात अशा वेळी मला काय वाटलं होतं. भीती की ‘आता शेवटचाच प्रवास’ म्हणून येणारी निराशा, हतबलता. की आप्तजनांचे चेहेरे परत दिसणार नाहीत म्हणून व्याकुळ झालो असेन. काय माहित.. नक्की आठवत नाही आता.. देवाचा धावा नक्की केला नसेन असं म्हणता येईल.
एखाद्या घटनेमधे मृत्यूची भिती नक्की केव्हा मिसळते, आणि नक्की केव्हा नाहीशी होते.
भिती नक्की मृत्यूची की अज्ञाताची... मृत्यूची भीती अथवा आयुष्य नसण्याची भिती.. आयुष्य नसण्याची भिती की आयुष्यात फक्त प्रेयस गोष्टीच मिळवण्याची वेडी हाव... मृत्यू म्हणजे तरी काय...
मृत्यूला विरोध करण्याची प्रक्रिया स्वाभावीकच असेल का. कुठल्याही मानवी जागृत प्रयत्नाविना स्वयंस्फूर्तपणे चालणार्या हृदयाच्या धडधडीसारखीच ती धडधड अखंड चालू ठेवण्याची धडपड नैसर्गीक असेल? की अशी धडपड त्या धडधडीचाच एक अविभाज्य भाग आहे?
कुठलाही अप्रतीम, उत्कट क्षण उलटून जातो म्हणजे काळ पुढे सरकतो... खरंतर आपण त्या क्षणातून पुढे सरकतो.... म्हणजे प्रत्येक क्षणी आपलं अस्तित्व त्या क्षणात मृत होउन पुढल्या क्षणाकडे सरकतं. ही प्रक्रिया सतत पुढे चालू, पुढचा क्षण जगायचा, मग त्यापुढचा, मग त्याहीपुढचा... पुढचा क्षण कसा असेल माहित नाही.. पण ‘हा’ सरला म्हणजे ‘तो’ असणार हे नक्की..
मृत्यू म्हणजे असा कुठलातरी एक क्षण आपल्यासाठी कायमचा थांबणं... म्हणजे त्या नेमक्या क्षणात आपण थांबायचं... काळ पुढे चालू... फक्त आपल्यापुरता तो क्षण फ्रीझ झालेला असं काहीसं.
हा क्षण नेहेमीच आपल्याला निवडता न येणारा का असावा... आपल्याला हवा तोच उत्कट जिवंत क्षण आपण पकडून का ठेवू नये.. कायमचा..
______________________________________________________________________________
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंज-याचे दार उघडावे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे
वाळल्या ओठां दे निरोपाचे फुल
भूलीतली भूल शेवटली
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
कवी : बा भ बोरकर
Book traversal links for हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्याचे दार उघडावे..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम.. __/\__
असे अनुभव आले आहेत चिक्कार!
एरवी माज दाखवणारा माझा बॉस
ओळख! ओळख!! देवाजीचं नाव
वाटलच होतं पण जरा खात्री करुन
मला का कोण जाणे या प्रकाराची
झकास
मस्त.. वेगळ्या बॅकड्रॉपवरचे
मस्त!
सुरेख
छान लिहिलेय
छान लिहिलयस रे. विमान
अर्धवट,
सुंदर
आवडले. मी आर्मरेस्ट घट्ट
आवडला लेख.
सुंदर कविता. लिखाणदेखील खूप
+१० टु जातिवंत भटका,
छान लेख
छान अनुभव. या निमित्ताने
जे काय व्हायचे आहे
लेखन आवडले पण प्रसंग नावडता
लेखन आवडले मुंबई दिल्ली
लेख अन प्रतिक्रिया दोन्ही
मस्त लेखमालिका.
कथा आवडली, आता मला भीती वाटत
अप्रतिम अनुभवकथन! या flight
मृत्यूला सामोरं जाण्याचा विषय निघाला आहे हे पाहून आठवलं