पावसाचा दरोडा
पावसाचा दरोडा
आला सोसाट्याचा वारा
उठलं धुळीचं रिंगण
झाडझाडोरे हालता
गेल सारं रान पिंजून ||
बांधावर आम्ही उभे
आधार एकमेकांना दोघे
तवाच ढग आले दाटून
गेलं आभाळ फाटून ||
थेंब पावसाचे मोठे द्वाड
अंगावर बसे वादीचा चाबूक
जवा पाहिजे तवा नाही
जवा नको तवा यायची खोड ||
विजा चमकून भिती घालती
काही आगाव भुईला टेकती
वंगाळ भिती मनाला खायी
जिवासाठी आसरा शोधू पाही ||
उघडा सारा रानमाळ
नव्हतं कुणाचं छप्पर
ठिपक्यावानी झाड लिंबांच
सावली देत उभं र्हातं ||
तेवढा तोच आधार
तेचा आडोसा घेतला
त्याखाली वल्ले होतो
थेंब जोराचे चुकवत ||
एकाएकी आक्रीत झालं
सन्नकन आला जाळं
डरकाळीच्या आवाजानं
सारं रान हादरलं ||
मघापासून जणू चाटीत होती
जिभल्या तू तुझ्या विजबाई
माझ्यावर आभाळ कोसळलं
कुणाकडे मी पाहू बाई ||
मोठी उलथापालथ झाली
नजरंसमोर घरधनी पडला
एकाएकी प्राण त्याचे गेले
कोळशावानी काळाठिक्कर झाला ||
कारे आवचिंदी पावसा
तू ग भवाने विजबाई
दोघं आले दरोड्याला
नशीब माझं लुटून जाई ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३१/०८/२०११
वाचने
2050
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
प्रतिक्रिया
ही कविता खूप छान आहे.
>> कारे आवचिंदी पावसा
तू ग भवाने विजबाई
दोघं आले दरोड्याला
नशीब माझं लुटून जाई || >>
भवाने शब्दाने कडव्याला आगळे वजन आले आहे.
आवचिंदी शब्ददेखील नवा आहे.
शेवट फारच भिडणारा आहे...
पण कविता चांगली बांधलेली नाही.
कडव्यांची लांबी कमी जास्त होत जाते आहे.
कविता जरा पिकायला हवी होती का अजून?
मुक्तक असेल तर ठीक.
लिंबारा अर्थात लिंबाच झाड विज प्रवाही मानतात. घराजवळचा लिंबारा घरावर विज आकर्षित करतो.
पाभे चित्र दर्शक काव्य. अगदी डोळ्यासमोर उभ राहिल धुंवाधार पावसात उभ असलेल शेतकरी जोडप. वाडाच्या बरोबरीन आहे ही कविता.
खूप चित्रदर्शी कविता!
In reply to खूप चित्रदर्शी कविता! by नगरीनिरंजन
चित्रदर्शी कविता, असेच म्हणते.
पण शेवट नाही आवडला. अंगावर आला.
जरा धक्कादायकच झाला. अर्थात तीच अपेक्षा असली तर पूर्ण झाली.
झक्कास कविता... चित्र नजरेसमोर उभं राहीलं...
कारे आवचिंदी पावसा
तू ग भवाने विजबाई
दोघं आले दरोड्याला
नशीब माझं लुटून जाई
हा क्लायमॅक्स तर भारीच...
शेवट आवडला नाही. :(
पण कविता छान आहे.
अरे काय झोल आहे ? प्रतिसाद होलसेल मधे पडले आहेत ! संपादक मंडळींपैकी कोणी तरी हे डिलिटवा.
छान आहे. आवडली.
किती सुंदर कविता सचिन जी,
एकदम बेस्ट
खुप खुप आवडली.. पुन्हा पुन्हा वाचावी अशी ...
मागे एकदा तुम्ही शेतकर्याची एक कविता लिहिली होती.. त्यांनी म्हणलेलीच ही कविता वाटत आहे..
---
अवांतर : मदनबाणाच्या भात्यातील सगळे बाण एकदमच सुटले वाटते...
तुंम्ही म्हणजे प्रसंग जसाच्या तसा उभा केलात.... पढने के बाद, आँखे नम हो गई,और दील खामोश हो गया...
ही कविता खूप छान आहे. >> कारे