Skip to main content

विकासाची फळं

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 29/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एक अगदी मनाला भिडणारा लेख नुकताच वाचनात आला. त्या लेखाची 'लोकप्रभा' साप्ताहिकातली लिंक येथे देत आहे. अवश्य वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20110902/andolan.htm पुण्याजवळच्या अत्यंत सुपीक आणि सुंदर अशा मावळ खोर्‍याची विकासाच्या नावाखाली सुरु असलेली लूट, राजकारण्यांची अधू दृष्टी, तिथल्या साध्या माणसांची होणारी परवड आणि पैशाच्या मोहात उडून जाणारी अस्सल मावळ संस्कृती याचा खूप चांगला ऊहापोह लेखक श्रीरंग गायकवाड यांनी या लेखात केलेला आहे. विकासचा राक्षस या सुपीक मावळाला गिळंकृत करणार अशी भीती या लेखातून व्यक्त होतेय. चाकण एमाआयडीसी, तळेगाव एमाआयडीसी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर, विविध टाऊनशिप्स, लवासा सिटी, नटनट्या, राजकारणी, उद्योजक यांचे अवाढव्य फार्महाऊसेस, मोठ-मोठी हॉटेले, ढाबे, इत्यादी विकासाची अक्राळ-विक्राळ भुते मावळाचा उत्तुंग इतिहास पायदळी तुडविणार असे चित्र सध्या दिसतेय. नुकतेच झालेले आंदोलन, पोलिसांनी केलेला गोळीबार, त्यात मारले गेलेले निष्पाप जीव, या आंदोलनाचे आणि शेतकर्‍यांच्या संतापाचे कारण, केवळ भाजपला पाठिंबा देणारा भाग म्हणून पुणे जिल्ह्यात शक्तीशाली असूनदेखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी पराकोटीची उपेक्षा, गलिच्छ राजकारण या सगळ्यांचा लेखकमहाशयांनी खूप चांगला वेध घेतलेला आहे. जमिनीचा चतकोर तुकडा विकूनही कधीही न पाहिलेल्या रकमा हातात पडल्यावर इथली संस्कृती पार बदलून गेलेली आहे. महागड्या बाईक्स, स्कॉर्पिओ (हा तर त्यांचा ब्रँडच आहे), रंगीबेरंगी गॉगल मिरवणार्‍या मस्तवाल पोरांच्या झुंडीच्या झुंडी या भागात तयार झाल्या आहेत. दिवसभर उंडरणे, अरेरावी करणे, दारू ढोसणे, नोटांची पुडकी फेकून दौलतजादा करणे आणि एक दिवस हातातला पैसा संपला की बापुडवाणा चेहरा करून कोपर्‍यात पडून राहणे ही या भागातली नित्याची गोष्ट झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मनगटातल्या अफाट ताकदीचा भक्कम आधार देणारे मावळे आता स्वतःचा तोल सावरत लपून-छपून चालणार्‍या डान्स बारमधल्या छछोर बारबालांच्या केसांमध्ये इश्काचा आणि अय्याशीचा आधार शोधत आहेत. याला विकास म्हणायचे का? म्हणूनच हा अस्सल मर्‍हाटी मुलूख आता अमराठी लोकांच्या हातात चालला आहे. लेखक म्हणतात आता फक्त ३०% जमीन शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष ताब्यात राहिलेली आहे; बाकी ७०% जमिनीचा 'विकास' झालेला आहे. ज्या वेगाने हजारो एकरातले इतके महत्वाकांक्षी प्रकल्प या भागात तयार होत आहेत त्यावरून पुढच्या काही वर्षात 'मावळ' फक्त इतिहासातच शिल्लक राहील अशी सार्थ भीती लेखकाने व्यक्त केलेली आहे. काळासोबत बदलणे, विकासाच्या संधी निर्माण करणे ठीकच आहे पण विकासाची पावले इतकी खोलवर जाऊ नयेत ज्यामुळे एखाद्या भागातली निसर्गनिर्मित व्यवस्थाच कंगाल होऊन जावी. पुण्याच्या आस-पास हेच घडत आहे. अफाट गर्दी, वखवखलेली माणसे, अतिस्वार्थी राजकारणी, गुंडांच्या मदतीने बळकावल्या जाणार्‍या सुपीक जमिनी, वाहनांनी खचाखच भरलेले रस्ते आणि गल्ल्या...कुठे जाणार आहोत आपण? काल कर्वे रस्त्यावरून येतांना नळ स्टॉपच्या सिग्नलला थांबलो होतो. गुरगुरणारर्‍या कुत्र्यांप्रमाणे सगळी वाहने अधाशी नजरेने सिग्नलकडे बघत होती. केव्हा एकदाचा सिग्नल हिरवा होतो आणि केव्हा आम्ही आमच्या गाड्या सुसाट सोडतो अशी एक विचित्र अधीरता त्या सगळ्या भागात पसरलेली होती. एक आजोबा हळू-हळू रस्ता ओलांडत होते. सिग्नलचे घड्याळ पुढे सरकत होते. १०, ९, ८, ७...माझ्या छातीत अकारण धस्स होत होते. आजोबा जर सिग्नल सुटण्याआधी रस्ता क्रॉस नाही करू शकले तर? वाहनांची ही बेदरकार फौज अचानक पिसाळलेल्या कुत्र्यांच्या झुंडीप्रमाणे त्यांच्या अंगावर धावून गेली तर? गडबडून त्यांचा तोल गेला तर? गाडीमधल्या किंवा दुचाकीवरच्या एखाद्या 'सुशिक्षिता'ने त्यांच्या या असहायतेला उद्देशून सणसणीत शिवी हासडली तर? त्यांच्या सन्माननीय वृद्ध आणि हळव्या संवेदनेला "ये थेरड्या..." किंवा "ये म्हातार्‍या, दिसत नाही का?" असे विखारी शब्द टोचले तर? मला कसेसेच होऊ लागले. आपण सुशिक्षित म्हणवतो खरे स्वतःला पण त्याला काही अर्थ नाही. ही उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत म्हणून माझी भीती अधिकाधिक वाढत जात होती. शेवटी सगळे आकडे संपल्यावर वाहने रानटी कुत्र्यांसारखी पुढे झेपावली. आजोबा जेमतेम पदपथापर्यंत पोहोचतच होते. थोडं भांबावणं, थोडं चिडणं अशा मिश्र भावनांचा अनुभव घेत आजोबा एकदाचे पदपथावर पोहोचले आणि माझा जीव भांड्यात पडला... कसली आहे ही घाई? कुठे जायचंय? ऑफीसला? पिक्चरला? मॉलमध्ये? हॉस्पिटलमध्ये? शाळेत? कॉलेजला? पार्टी करायला? दारू ढोसायला? घरी? नक्की जायचंय कुठे? एवढी घाई कसली आहे? सरासरी सगळे सिग्नल मिळून आणि रस्त्यांमधला एकूण वेळ मिळून आपण १० मिनिटे जास्त नाही देऊ शकत? सतत हॉर्न वाजवून रस्त्यांची वाट लावणार्‍यांना काय राष्ट्रपतींना भेटायचे असते की बराक ओबामांना? त्या आजोबांसारखं थोडं हळू चाललं तर काय आभाळ कोसळणार आहे? विकासाचा वेग जीवघेणाच का असायला हवा? हळू-हळू, थोडं बेतानं, थोडं इथे, थोडं तिथं, थोडं सबुरीनं असं नाही का चालणार? एकापाठोपाठ एक अवाढव्य प्रकल्प लगेच, आत्ताच, इथेच का? एक इथे, दुसरा नागपूरात, तिसरा नाशकात, चौथा सोलापूरात, पाचवा नगरमध्ये, सहावा जळगावला, सातवा कोल्हापूरात, आठवा सांगलीत, नववा बीडमध्ये, दहावा रत्नागिरीत, अकरावा वर्ध्याला...काय हरकत आहे? पुण्यात जागा आहे, पाणी आहे, मुंबईशी कनेक्टीविटी आहे, वीज आहे म्हणून पुण्याचाच जीव घ्यायचा का? मुंबई आर्थिक राजधानी आहे म्हणून मुंबईलाच कधीही स्फोट होऊ शकणारा एक अत्यंत धोकादायक बाँब बनवायचं का? टिचभर जागेत दीड कोटी लोकं राहतात हो त्या मुंबईत! लोकलमधून अक्षरशः मेंढरासारखी कोंबलेली माणसं बघितली की कीव येते मुंबईची. अस्ताव्यस्त पसरलेल्या गलिच्छ झोपडपट्ट्या बघून मुंबईच्या भविष्याचं काय असा प्रश्न पडत नाही राजकारण्यांना? 'मुंबई स्पिरीट' म्हणून गोंडस नाव देऊन मुंबईवर होणारे अत्याचार विसरले जाणार थोडेच आहेत. कसलं स्पिरीट? काही दुसरा ऑप्शन आहे का? कुठल्या शहराला दुसरा ऑप्शन असतो? कुठलं शहर बाँबस्फोटांनंतर थांबलंय? तुम्ही-आम्ही आपण थांबू शकतो का? यात कसलं आलंय स्पिरीट? ही आपल्या नेत्यांनी केलेली साखरपेरणी आहे. स्तुतीचे चार शुष्क शब्द फेकले की आपल्याला खुश व्हायला होतं आणि यातच या लोकांचं फावतं. पुढील १५ वर्षात काय चित्र असेल काहीच सांगता येत नाही. पुण्यात दरवर्षी जवळपास सव्वादोन लाख वाहने रस्त्यावर येतात. पार्किंगला कुठेच जागा मिळत नाही. विचार करा, १५ वर्षांनी काय अवस्था होईल. रस्ते रुंद करायला जागा नाही, नवनवीन प्रकल्प येतच आहेत, राजकारणी आपली तुंबडी भरतच आहेत. आत्ताच अठरा लाखाच्या घरात आहे पुण्यातल्या वाहनांची संख्या! ज्या अंतराला पूर्वी २० मिनिटे लागायची त्या अंतराला आता १-१.५ तास लागतो. जीवन जास्त जटिल होत चाललंय, निष्पाप मरतोय..हीच का विकासाची फळं? विषारी आहेत खरी....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6893
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

एक इथे, दुसरा नागपूरात, तिसरा नाशकात, चौथा सोलापूरात, पाचवा नगरमध्ये, सहावा जळगावला, सातवा कोल्हापूरात, आठवा सांगलीत, नववा बीडमध्ये, दहावा रत्नागिरीत, अकरावा वर्ध्याला...काय हरकत आहे? १०००% बरोबर. . मुंबई पूणे द्रुत गती मार्ग आता अजुन रुंद होणार आहे म्हणे . एकाच ठीकाणी एव्हढी सुधारणा का? बाकीच्यानी काय पाप केले आहे. अशानीच मुंबईत लोंढे वाढतात. असमतोल सुधारणा हेच प्रमुख कारण आहे. स्वतःच्या एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च करायचा आणि बाकीच्याना(तेव्हढीच कुवत असताना) शिकवायचे नाही आणि वर त्याना अडाणी / मागासलेले म्हणायचे अशा बापा सारखा सरकारचा खाक्या आहे..

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही खूप तळमळीने लिहीता. पण दुर्दैवाने हे अरण्यरुदन आहे अशी आजची परिस्थिती आहे. हेच शब्द मनात आले होते.. धन्यवाद न नि उत्तम लेख

नळ स्टॉपच्या चौक ओलांडायचा म्हणजे म्हातार्‍या लोकांसाठी सापळाच लावला आहे अशी परिस्थिती वाटते. ही घाई कसली हे खरच कळत नाही. :-(

In reply to by सहज

>>ही घाई कसली हे खरच कळत नाही. याची दोन कारणे असावीत. ०. माझ्याकडे बाईक/गाडी आहे म्हणजे मी चालणार्‍यांपेक्षा "वरचा" आहे. त्यामुळे मी माझ्यापेक्षा खालच्या पातळीच्या माणसासाठी थांबणे अपेक्षित नाही. १. एखादे अंतर जायला किती वेळ लागतो याचे अत्यंत चुकीचे जजमेंट. उदा. डेक्कनवरून पुणे स्टेशनला जायला किती वेळ लागतो असे विचारले तर बहुधा १० मिनिटे असे उत्तर येईल. (पुण्याहून मुंबईला जायला किती वेळ लागतो याचे उत्तर दोन-अडीच तास असे येईल). त्या १० मिनिटांच्या हिशेबाने माणसे निघतात. काही वेळातच लक्षात येते की उशीर होत आहे. मग गाडी दामटण्याची प्रवृत्ती होते.

In reply to by नितिन थत्ते

डेक्कनवरून पुणे स्टेशनला जायला किती वेळ लागतो असे विचारले तर बहुधा १० मिनिटे असे उत्तर येईल.
डेक्कनवरून पुणे स्टेशनला जायला फक्त दहा मिनिटे? कधीपासून??? (आपल्याला 'शिवाजीनगर स्टेशन' असे तर म्हणायचे नव्हते ना?)

In reply to by पंगा

पुणे स्टेशनच म्हणायचे होते. नाना पेठ ते कमिन्स १५ मिनिटे असं माझ्या कानांनी ऐकलं आहे.

In reply to by नितिन थत्ते

नारायण पेठ ते पुणे स्टेशन माझ्या अंदाजाने वाहतूक अजिबात नसतानासुद्धा अर्ध्या तासाहून कमी लागू नये. डेक्कन त्यापलीकडे. दहा ते पंधरा मिनिटांचा अंदाज पटला नाही. असो.

In reply to by पंगा

डेक्कन> जंम रस्ता > सीओईपी > संगम ब्रिज > राजाबहादुर टेक्निकली १० मिनिटात शक्य आहे (रात्री अडीचच्या सुमारास) ;)

In reply to by नितिन थत्ते

डेक्कन वर जे एम कसं जाता येइल? तो वन् वे आहे. डेक्कन -मनपा- आंबेडकर भवन स्टेशन किंवा डेक्कन्-मनपा-जुने कोर्ट स्टेशन हा रस्ता शक्य आहे. सीओईपी नेच जायचे तर डेक्कन- एफ सी-शिवाजीनगर-सीओईपी-स्टेशन असे जावे लागेल. आणि हो.... ह्यातल्या कुठल्याही रस्त्याने १० मिनिटातच जाता येइल रात्री. माझी शंका:- रात्री अडीचला वन् वे चे नियम लागु होत नाहित का? लागु होत नसल्यास प्रतिसाद परत घेतोय.

In reply to by मन१

ह्यातल्या कुठल्याही रस्त्याने १० मिनिटातच जाता येइल रात्री.
रस्ता ससूनमार्गे जातो काय हो, बायेनीचान्स? ;)

In reply to by पंगा

डेक्कन> जंगली महाराज रस्ता > सीओईपी > संगम ब्रिज > राजाबहादुर मिल टेक्निकली १० मिनिटात शक्य आहे (रात्री अडीचच्या सुमारास) ;)

In reply to by नितिन थत्ते

एम जी रोड कँप ते सेनापती बापट रोड साधारण २० वर्षापूर्वी १३ मिनिटात भर संध्याकाळी गेलो आहे. पण आता ते शक्य नसावे.

In reply to by सहज

२० वर्षे??? अहो आता २० दिवसात ट्रॅफिक दुप्पट होतं! ;) मी २० वर्षांपूर्वी डेक्कन ते कर्वे दशभुजा १५ मिनिटात निवांत सायकलीवर जायचो. आता परिस्थिती बघवत नाही. लहान लहान मुले सायकलवरुन निघालेली बघितली की छातीत धस्स होते आणि वाटून जाते ही चिल्लीपिल्ली इच्छित स्थळी नीट पोचतील ना? -चतुरंग सायकलवाला

सगळं भयानक आहे खरं पण सुरुवात कोठून करणार. पुणे आणि परीसरातून लाखाच्या हिषोबाने पदवीदर होणार्‍याना नोकर्‍या कुठं देणार. इंडस्ट्रीबेस्ड इकॉनॉमी अजून फार काळ आहे त्या स्वरूपात तगेल असे मला वाटत नाही. अ‍ॅग्रीकल्चर बेस्ड इकॉनॉमी हाच पर्याय जास्तीत जास्तं लोकांना चांगलं काम देणारा होऊ शकतो. मग इतक्या सार्‍या अपेक्षांची पूर्ती कशी करणार? परत पदवीधर म्हणजे काही अंगमेहनतीचं काम करणार नाहीत. आमच्यासारखा अडाणी माणूस वेळ पडली तर वाढप्याचं काम पण करेल. पण असे आळशी सुशिक्षित लोक काय करतील? राहीला प्रश्न अमराठी लोकांच्या ताब्यात मावळ जाण्याचा. तर हे अमराठी लोक मराठी राजकारण्यांच्या पाठींब्याशिवाय तेथे आले का? नाही मुळीच नाही. असो लोक पेटत नाहीत नाहीत तोवर सगळे चालते जनशक्तीच्या रेट्यासमोर मी मी म्हणणारे भुईसपाट होतात. अशा एखाद्या वेळेला जनशक्तीने विवेकाचा बळी देऊन जर उतमात घडवला तर त्या बद्द्ल फक्त त्यांनाच दोष देऊ नये कारण आत्ताच्या या सगळ्या अमराठी विकासकांचाही त्या दोष आहेच हे लक्षात घ्यावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सगळ्या अराजकाचं मुख्य कारण आहे दिवसेंदिवस फुगत जाणारी लोकसंख्या!! १२० कोटी माणसं????? अरे ही काय लोकसंख्या म्हणायची का? लाज वाटली पाहिजे भारताला की एकही असा कार्यक्रम आपण राबवू नाही शकलो ज्याच्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहील. सगळे पक्ष आणि राजकारणी लोकसंख्येवर सोयीस्कर भूमिका घेतात कारण त्या प्रश्नाशी मतकारण जुळलेले आहे. भावनिक मुद्द्यांवर जनतेच्या विरोधात जायचे नाही. त्यांना दोन वेळेचं जेवण नशिबी नसलं तरी चालेल पण त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावू द्यायच्या नाहीत. गलिच्छ वस्तीत, गटाराशेजारी राहणार्‍या लोकांना त्याचं दारिद्र्य चालतं; उपासमार चालते पण भावना दुखावलेल्या चालत नाहीत. हा दोष आपल्या जनतेचा देखील आहे. किती धर्मांध होत चाललो आहोत आपण!!!! थोडं काही कुठे खुट्ट झालं की भडकल्या धार्मिक भावना!! धर्माशिवाय दुसरं वेगळं काही जीवनच असू शकत नाही का? मी जानवं घालून मटण खातो; सगळ्यांच्या देखत खातो; श्रावण पाळत नाही; पण मंदीरात गेल्यावर माझे हात आपोआप जुळले जातात. एखाद्या म्हातारबाबांना रस्त्यात मदत करायला मी थांबतो, या धर्मभावना नाहीत का? का आपण धर्म, देव, उपास-तापास यांचं एवढं स्तोम माजवतो? हिंदूच धर्म असं नाही; सगळेच धर्म आपापल्या धार्मिकतेचं, कर्मकांडांचं इतकं पराकोटीचं स्तोम माजवतात की या माथेफिरूपणामुळेच जगात अशांतता नांदते आहे हे वारंवार सिद्ध होतं. अजूनही आपण धर्माच्या आणि देवाच्या इतक्या खुळचट भावनांना इतक्या निगुतीने पोसत आहोत की भारत महासत्ता तर सोडाच पण पुन्हा पारतंत्र्यात तर जाणार नाही ना अशी भीती वाटण्यास वाव आहे. मतांचं स्वार्थी राजकारण करायला भारतीयांपेक्षा मूर्ख माणसं कदाचित फक्त पाकिस्तानात सापडू शकतील. तिथलीही जनता अशीच आहे; भुकेले राहू, पोरा-बाळांना बॉम्बस्फोटात मरतांना पाहू पण धर्मांधतेचं विषारी फळ आवडीने खातच राहू. बरं तिथे ही लोकसंख्या अफाटच! म्हणजे जिथे जाणार तिथं किड्या-मुंग्यांसारखी माणसंच माणसं!!! गर्दी, गोंगाट, रोजगार नाही म्हणून बेरोजगारी, दारिद्र्य, गुन्हे...झोपडपट्ट्या, गुंडगिरी...हे असंच चालू राहणार जोपर्यंत लोकसंख्या कमी होत नाही.

In reply to by समीरसूर

किती धर्मांध होत चाललो आहोत आपण!!!! थोडं काही कुठे खुट्ट झालं की भडकल्या धार्मिक भावना!! असहमत. गल्ली चुकता आहात आपण. सदर प्रकरणाशी धर्माचा काहीही संबंध आहे असे वाटत नाही. धर्माशिवाय दुसरं वेगळं काही जीवनच असू शकत नाही का? माझ्या मते नाही. धर्माशिवाय दुसरं वेगळं काही असूच शकत नाही. जमलंच तर एकदा मनुस्मृती वाचून बघा. धर्म किती खोलवर विचार करतो कोणत्या कोणत्या बाबींना स्पर्ष करतो ते कळेल. म्हणूनच ज्या मावळाचा उल्लेख करता आहात ते अवघं मावळ अफझलखानाच्या हल्ल्याच्या वेळेला शिवरायांकडे एकवटलं. मी जानवं घालून मटण खातो; सगळ्यांच्या देखत खातो; श्रावण पाळत नाही; त्यात आम्हाला काही पराक्रम वाटत नाही. २ गोष्टी यातून दिसतात १ म्हणजे तुमचा तुमच्या जिभेवर कंट्रोल नाही. २.तुम्हाला हे माहीत आहे की ब्राम्हण शक्यतो शाकाहारी असतात कमीत कमी तशी परंपरा आहे. मग तुम्ही हुषारी मारायला जानवं घालून मटण खाल तर त्याचं कौतुक कोणाला. म्हणजे आपण लई भारी दाखवण्यासाठी तुम्ही जानवं घालूनही तुम्ही मटण खाता तर पुढे मागे पैसे आले तर मावळ भूमीची लूट करायला तुम्हीही मागेपुढे पाहीले नसते. स्वार्थासाठी समाजनियम मोडणारे लोकच असे करू शकत असतात. पण मंदीरात गेल्यावर माझे हात आपोआप जुळले जातात. जर वरील गोष्टी करत असाल तर या हात जोडले जाण्याचं आम्हाला मुळीच कौतुक नाही. ढोंग म्हणू फारतर. एखाद्या म्हातारबाबांना रस्त्यात मदत करायला मी थांबतो, या धर्मभावना नाहीत का? माणूसकी म्हणता येईल. ती नसेल तर माणूस म्हणवण्याच्या लायकीचा मी स्वतःला समजणार नाही. का आपण धर्म, देव, उपास-तापास यांचं एवढं स्तोम माजवतो? हिंदूच धर्म असं नाही; सगळेच धर्म आपापल्या धार्मिकतेचं, कर्मकांडांचं इतकं पराकोटीचं स्तोम माजवतात की या माथेफिरूपणामुळेच जगात अशांतता नांदते आहे हे वारंवार सिद्ध होतं. स्तोम धर्म नाही माजवत, माणसं माजवतात. जसं तुम्ही जानव्याचं स्तोम माजवलं आहे. आणि अभिमानानं सांगता की जानवं घालून मटण खातो त्याच प्रकारचं. अजूनही आपण धर्माच्या आणि देवाच्या इतक्या खुळचट भावनांना इतक्या निगुतीने पोसत आहोत की भारत महासत्ता तर सोडाच पण पुन्हा पारतंत्र्यात तर जाणार नाही ना अशी भीती वाटण्यास वाव आहे. असे म्हणणार्‍यांना आम्ही खुळचट समजतो. शून्यातून स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवरायाना ज्याला तुम्ही खुळचट म्हणता अशा धर्माच्या, देवाच्या कल्पनांचाच उपयोग झाला होता. आजच्या घडीला तरी स्वतःच्या तथाकथित वैयक्तिक आवडीसाठी कोणतेही समाजनियम मोडण्याइतके स्वार्थी आपण नक्कीच झालो आहोत. मतांचं स्वार्थी राजकारण करायला भारतीयांपेक्षा मूर्ख माणसं कदाचित फक्त पाकिस्तानात सापडू शकतील. तिथलीही जनता अशीच आहे; भुकेले राहू, पोरा-बाळांना बॉम्बस्फोटात मरतांना पाहू पण धर्मांधतेचं विषारी फळ आवडीने खातच राहू. सहमत. बरं तिथे ही लोकसंख्या अफाटच! म्हणजे जिथे जाणार तिथं किड्या-मुंग्यांसारखी माणसंच माणसं!!! गर्दी, गोंगाट, रोजगार नाही म्हणून बेरोजगारी, दारिद्र्य, गुन्हे...झोपडपट्ट्या, गुंडगिरी...हे असंच चालू राहणार जोपर्यंत लोकसंख्या कमी होत नाही. तिसरं महायुद्ध सुरु करायचं का? पटापट लोकसंख्या कमी करण्याचा याहून चांगला उपाय आम्हाला दिसत नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>> असहमत. गल्ली चुकता आहात आपण. सदर प्रकरणाशी धर्माचा काहीही संबंध आहे असे वाटत नाही. गल्ली चुकतोय असं अजिबात वाटत नाही. लोकसंख्या अफाट म्हणून दारिद्र्यही अफाट; त्यात आपल्या कुचकामी आणि केव्हाही खळ्ळकन फुटू शकणार्‍या धार्मिक आणि सामाजिक भावना, त्यामुळे राजकारण्यांचे फावते. मग मुख्य प्रश्नांकडे सर्रास दुर्लक्ष करून धर्म, चित्रपट, साहित्य, नामांतर अशा कमी महत्वाच्या गोष्टींचं राजकारण करून राजकारणी आपलं पोट भरतात आणि मूर्ख जनता त्यांना असं करू देते. आपल्या राजकारणाशी आणि त्यातून निर्माण होणार्‍या असंख्य प्रश्नांशी धर्म आणि भावना सगळ्यात जास्त संबंघित आहेत. म्हणून मग 'आजा नचले' मधल्या फालतू गाण्यांवरून रण पेटतं, 'आरक्षण' सिनेमासारख्या क्षुल्लक मुद्द्यावरून वादळ उठतं...मूळ प्रश्न जागच्या जागीच राहतात कारण राजकारण्यांना ते तसेच ठेवणं, पेटवत ठेवणं सोयीचं असतं. >>> माझ्या मते नाही. धर्माशिवाय दुसरं वेगळं काही असूच शकत नाही. जमलंच तर एकदा मनुस्मृती वाचून बघा. धर्म किती खोलवर विचार करतो कोणत्या कोणत्या बाबींना स्पर्ष करतो ते कळेल. म्हणूनच ज्या मावळाचा उल्लेख करता आहात ते अवघं मावळ अफझलखानाच्या हल्ल्याच्या वेळेला शिवरायांकडे एकवटलं. धर्माची शिकवण आणि आता प्रत्यक्षात असलेलं लोकांचं धर्माचं आणि धार्मिक भावनांचं स्तोम यात जमीन-आसमानचा फरक आहे. जगात सगळेच धर्म चांगली शिकवण देतात म्हणून जगात शांतता राहिली का? आज सगळेच देश धुमसताहेत. माझा रोख या धर्मभावनेच्या अनाठायी अतिरेकीकरणाकडे होता. खोलवर विचार करायला मनुस्मृती वाचायची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ते आपल्यालाच कळायला हवं. माणूसकी हेच सार आहे सार्‍या धर्मग्रंथांचं, त्यासाठी अवजड भाषेतले ग्रंथ वाचण्याची काय गरज? अफजलखानाला जाऊन साडेतीनशेच्या वर वर्षे होऊन गेलीत. आता शिवराय होणंही अशक्य आणि तसंच कुणी धन्यासाठी जीव टाकणं ही तितकंच दुर्मिळ!! तो काळ गेला, तो काळ आता असता तर इतकी वाईट परिस्थिती उद्भवली असती का आता? >>> त्यात आम्हाला काही पराक्रम वाटत नाही. २ गोष्टी यातून दिसतात १ म्हणजे तुमचा तुमच्या जिभेवर कंट्रोल नाही. २.तुम्हाला हे माहीत आहे की ब्राम्हण शक्यतो शाकाहारी असतात कमीत कमी तशी परंपरा आहे. मग तुम्ही हुषारी मारायला जानवं घालून मटण खाल तर त्याचं कौतुक कोणाला. म्हणजे आपण लई भारी दाखवण्यासाठी तुम्ही जानवं घालूनही तुम्ही मटण खाता तर पुढे मागे पैसे आले तर मावळ भूमीची लूट करायला तुम्हीही मागेपुढे पाहीले नसते. स्वार्थासाठी समाजनियम मोडणारे लोकच असे करू शकत असतात. अतार्किक मत आहे हे त्यामुळे यावर न बोललेलंच बरं. :-) मटण खाण्यात मला पराक्रम वाटतो हे मला आजच कळलं. :-) मी 'लै भारी' दाखवण्यासाठी मटण खातो हे देखील आत्ताच कळलं. :-) >>> जर वरील गोष्टी करत असाल तर या हात जोडले जाण्याचं आम्हाला मुळीच कौतुक नाही. ढोंग म्हणू फारतर. म्हणजे मांसाहार करतात ते देवभक्त नाहीत आणि जे करत नाहीत ते अगदी भक्त प्रह्लादाचे अवतार असं काही आहे का? मिपावरचे किती सदस्य या विचाराशी सहमत आहेत? विचारांवर, मूळ आशयावर चर्चा न करता एखाद्या व्यक्तीला विनाकरण झोडपून काढणार्‍यांना काय म्हणतात हे पण सांगून टाका म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल. :-) >>> माणूसकी म्हणता येईल. ती नसेल तर माणूस म्हणवण्याच्या लायकीचा मी स्वतःला समजणार नाही. अजून काय पाहिजे माणसात? धर्म काय शिकवतो अजून? माफ करा माझं अज्ञान मी उघड करतोय त्याबद्दल....पण प्रत्येकात माणूसकी असेल तर ८०% झगडे संपतील असं वाटत नाही का तुम्हाला? 'माणूसकी' या एकाच शब्दात तमाम धर्मांचं सार आहे याला किती मिपाकर विरोध करतील? सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी त्यांचं मत सांगाव. >>> स्तोम धर्म नाही माजवत, माणसं माजवतात. जसं तुम्ही जानव्याचं स्तोम माजवलं आहे. आणि अभिमानानं सांगता की जानवं घालून मटण खातो त्याच प्रकारचं. माझा रोख माणसांकडेच होता. माझ्या लेखात मी 'आपल्या धार्मिक भावना' असं म्हटलंय म्हणजे माझा रोख माणसांकडेच होता हे समजून येते. >>> असे म्हणणार्‍यांना आम्ही खुळचट समजतो. शून्यातून स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवरायाना ज्याला तुम्ही खुळचट म्हणता अशा धर्माच्या, देवाच्या कल्पनांचाच उपयोग झाला होता. आजच्या घडीला तरी स्वतःच्या तथाकथित वैयक्तिक आवडीसाठी कोणतेही समाजनियम मोडण्याइतके स्वार्थी आपण नक्कीच झालो आहोत. झेपले नाही. क्षमस्व. तरी पुन्हा आठवण करून देतो, तो काळ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा होता. >>> तिसरं महायुद्ध सुरु करायचं का? पटापट लोकसंख्या कमी करण्याचा याहून चांगला उपाय आम्हाला दिसत नाही. नको, अजून चांगले आणि 'माणूसकी' जपणारे उपाय आहेत लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी. जनजागृती आहे, कायदे आहेत, नियम आहेत, ठराविक सोयी-सुविधांच्या वितरणाचे नियम आहेत, शिक्षण आहे, परिस्थितीचे आकलन करून देणार्‍या यंत्रणा आहेत...आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण्यांची शुद्ध इच्छाशक्ती हा सगळ्यात मोठा आणि प्रभावी उपाय आहे जो जनतेच्या भावना दुखावल्या जाण्याच्या भीतीने वापरला जात नाही. तो जर प्रभावीपणे वापरला तर मला वाटते तिसर्‍या महायुद्धाची गरज भासणार नाही. काय म्हणता? :-) --समीर

In reply to by समीरसूर

गल्ली चुकतोय असं अजिबात वाटत नाही. लोकसंख्या अफाट म्हणून दारिद्र्यही अफाट; त्यात आपल्या कुचकामी आणि केव्हाही खळ्ळकन फुटू शकणार्‍या धार्मिक आणि सामाजिक भावना, त्यामुळे राजकारण्यांचे फावते. मग मुख्य प्रश्नांकडे सर्रास दुर्लक्ष करून धर्म, चित्रपट, साहित्य, नामांतर अशा कमी महत्वाच्या गोष्टींचं राजकारण करून राजकारणी आपलं पोट भरतात आणि मूर्ख जनता त्यांना असं करू देते. आपल्या राजकारणाशी आणि त्यातून निर्माण होणार्‍या असंख्य प्रश्नांशी धर्म आणि भावना सगळ्यात जास्त संबंघित आहेत. म्हणून मग 'आजा नचले' मधल्या फालतू गाण्यांवरून रण पेटतं, 'आरक्षण' सिनेमासारख्या क्षुल्लक मुद्द्यावरून वादळ उठतं...मूळ प्रश्न जागच्या जागीच राहतात कारण राजकारण्यांना ते तसेच ठेवणं, पेटवत ठेवणं सोयीचं असतं. आम्हास तसे वाटते. पूर्वी महाराला महार म्हटल्याने रण पेटत नव्हतं ते आज पेटतं म्हणजे धार्मिक भावना आजच ठिसूळ झाल्या ना! पूर्वी महार, मराठे , ब्राम्हण सगळे लोक आपापले धर्म नीट पाळून होते तेव्हा आजच्या इतका नैतिकतेचा र्‍हास झालेला नव्हता. ज्याने त्याने आपली पायरी सोडली देश बिघडला. धर्माची शिकवण आणि आता प्रत्यक्षात असलेलं लोकांचं धर्माचं आणि धार्मिक भावनांचं स्तोम यात जमीन-आसमानचा फरक आहे. जगात सगळेच धर्म चांगली शिकवण देतात म्हणून जगात शांतता राहिली का? आज सगळेच देश धुमसताहेत. जगातल्या अशांततेला केवळ धर्मच कारणीभूत आहेत असे म्हणायचे असेल पहीले महायुद्ध कोणत्या धर्मामुळे पेटले हे सांगू शकाल का ? लंडनमधे झालेली दंगल कोणत्या धर्मामुळे झाली हे सांगू शकाल का आपण. बाकी विश्वाचा इतिहास संघर्षाचाच आहे. संपूर्ण शांतता कधीच प्रस्थापित होऊ शकत नाही. ती केवळ मनातच स्थापित होऊ शकते असे म्हणतात. माझा रोख या धर्मभावनेच्या अनाठायी अतिरेकीकरणाकडे होता. अनाठायी ठरवणार कोण स्वार्थासाठी धर्ममतं आणि समाजनियम फाट्यावर मारणारे? खोलवर विचार करायला मनुस्मृती वाचायची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ते आपल्यालाच कळायला हवं. माणूसकी हेच सार आहे सार्‍या धर्मग्रंथांचं, त्यासाठी अवजड भाषेतले ग्रंथ वाचण्याची काय गरज? प्रत्येक माणूस खोलवर विचार करण्यास सक्षम असता तर जगात कोणत्याच धर्माची , कायद्याची गरज पडली नसती. अफजलखानाला जाऊन साडेतीनशेच्या वर वर्षे होऊन गेलीत. आता शिवराय होणंही अशक्य आणि तसंच कुणी धन्यासाठी जीव टाकणं ही तितकंच दुर्मिळ!! तो काळ गेला, तो काळ आता असता तर इतकी वाईट परिस्थिती उद्भवली असती का आता? शिवराय आता होणार नाहीत कारण जनताच तशी नाही. तेव्हा जनता शिवरायाना साथ देणारी होती म्हणून शिवराय टिकले नाहीतर एकटे शिवराय काय करते? अतार्किक मत आहे हे त्यामुळे यावर न बोललेलंच बरं. Smile मटण खाण्यात मला पराक्रम वाटतो हे मला आजच कळलं. Smile मी 'लै भारी' दाखवण्यासाठी मटण खातो हे देखील आत्ताच कळलं. Smile तुमच्यासारखे केवळ उपदेशपांडे असलेले लोक मी आयुष्यात प्रथमच पहात नसल्याने तुम्ही त्याला तार्कीक म्हणा अथवा अतार्किक त्याने काहीच फरक पडत नाही. म्हणजे मांसाहार करतात ते देवभक्त नाहीत आणि जे करत नाहीत ते अगदी भक्त प्रह्लादाचे अवतार असं काही आहे का? सदर निष्कर्ष कसा काढलात हे जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रतिसादात तर आम्ही कुठेही तसे नमूद केले नाही. मिपावरचे किती सदस्य या विचाराशी सहमत आहेत? मिपासदस्य जर जगत्पालक असते तर आम्ही त्यांची या विषयावर सहमती जरूर विचारली असती. मिपाकरांच्या सहमत होण्या न होण्यानं त्यात काही फारक पडत नाही. विचारांवर, मूळ आशयावर चर्चा न करता एखाद्या व्यक्तीला विनाकरण झोडपून काढणार्‍यांना काय म्हणतात हे पण सांगून टाका म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल. मूळ विषय मावळचा. त्यात धर्म-बिर्म हे तुम्ही घुसडलंत. म्हणजे पहीले विषयांतर तुम्ही केलेत पण आरोप मात्र दुसर्‍यावर. छान. अन्यथा मावळच्या आंदोलनाचा आणि धर्माचा काय संबंध होता हे तुम्ही सांगू शकाल का? झेपले नाही. क्षमस्व. तरी पुन्हा आठवण करून देतो, तो काळ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा होता. काळ बदलला , समाजाचे बाह्य आचरण बदलले तरी मूळ मानवी स्वभाव बदलत नाही. शुद्ध इच्छाशक्ती ही काय भानगड असते बुवा? अशुद्ध इच्छाशक्ती काय असते?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

IIपुण्याचे पेशवेII साहेब, वैयक्तिक टीका मलाही करता येते; अकारण उपमर्द मलाही करता येतो. तुमच्यासारखे खाजवून खरूज काढणारे नामधारी पेशवे मी पण खूप पचवलेत. मतभेद असतील तर त्या मतांवर सभ्य भाषेत मत मांडणे ही मिपाची संस्कृती आहे. माझ्या आजवरच्या मिपावरच्या वाटचालीत मी कुणावरही वैयक्तिक चिखलफेक केलेली नाही. >>तुमच्यासारखे केवळ उपदेशपांडे असलेले लोक मी आयुष्यात प्रथमच पहात नसल्याने हे जरा जास्त होतंय असं वाटत नाहीये का तुम्हाला? तुम्हाला पटत नसेल तर वाचू नका पण असली फालतू भाषा वापरून कृपया वातावरण गढूळ करू नका. मी काही तुमचे 'अमूल्य' मत विचारले नव्हते की माझा लेख वाचा म्हणून तुम्हाला नारळ घेऊन आमंत्रण द्यायला आलो नव्हतो हे लक्षात ठेवा. आधीच्या प्रतिसादातही तुम्ही अशीच हिडीस भाषा वापरलेली आहे. मी हसून आणि अतिशय सौम्य भाषेत दुर्लक्ष केले. मला वाटले तुम्हाला आपली चूक उमगेल. पण माझी आशा व्यर्थ होती हेच खरे. वरच्या वाक्याने मला राग आलेला नाही. मला राग येण्याइतकं तुमचं मत महत्वाचं नक्कीच नाही. पण मिपाचा दर्जा घसरू नये असे वाटते म्हणून लिहितोय. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. अश्लाघ्य वाचाळपणा केला म्हणजे आपली मते श्रेष्ठ ठरतात हा गैरसमज काढून टाका डोक्यातून. अकारण वातावरण बिघडवून टाकणारा वाचाळपणा करायला फारशी अक्कल लागत नाही. मूळ मुद्द्याला बगल देऊन निरर्थक गोष्टींवर रान माजवणे ही खोडच असते काहींना. हिडीस भाषा वापरून वैयक्तिक टीका करणं म्हणजे पराक्रम वाटतो का तुम्हाला? त्यापेक्षा आमचे मटण खाण्याचे पराक्रम खूप चांगले म्हटले पाहिजेत. निदान त्यामुळे वातावरण तरी बिघडत नाही. मला अपेक्षा आहे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. धन्यवाद, समीर

In reply to by समीरसूर

समीरसूर साहेब, मुद्देसूद चर्चा तुम्ही करायला शिका. प्रथम विषयांतर आपण स्वतः केले होते. वैयक्तिक टीका मलाही करता येते; अकारण उपमर्द मलाही करता येतो. तुमच्यासारखे खाजवून खरूज काढणारे नामधारी पेशवे मी पण खूप पचवलेत. मतभेद असतील तर त्या मतांवर सभ्य भाषेत मत मांडणे ही मिपाची संस्कृती आहे. माझ्या आजवरच्या मिपावरच्या वाटचालीत मी कुणावरही वैयक्तिक चिखलफेक केलेली नाही. जर तुम्हाला विरोधी मतं नको होती तर लेख लिहायचा नव्हता. आपले मटण खाणे, जानवे घालणे अकारण आपण स्वतःच चर्चेत आणलेत त्यावर आम्ही आपण ते आणा असे सांगायला अक्षत घेऊन आलो नव्हतो. हे जरा जास्त होतंय असं वाटत नाहीये का तुम्हाला? तुम्हाला पटत नसेल तर वाचू नका पण असली फालतू भाषा वापरून कृपया वातावरण गढूळ करू नका. मी काही तुमचे 'अमूल्य' मत विचारले नव्हते की माझा लेख वाचा म्हणून तुम्हाला नारळ घेऊन आमंत्रण द्यायला आलो नव्हतो हे लक्षात ठेवा. आम्ही कुठेही फालतू भाषा वापरलेली नाही किंवा शिवीगाळही केलेली नाही. कदाचित आमचा वार नेमका बसला असेल म्हणून चिडला असाल आपण. आधीच्या प्रतिसादातही तुम्ही अशीच हिडीस भाषा वापरलेली आहे. मी हसून आणि अतिशय सौम्य भाषेत दुर्लक्ष केले. मला वाटले तुम्हाला आपली चूक उमगेल. पण माझी आशा व्यर्थ होती हेच खरे. वरच्या वाक्याने मला राग आलेला नाही. मला राग येण्याइतकं तुमचं मत महत्वाचं नक्कीच नाही. पण मिपाचा दर्जा घसरू नये असे वाटते म्हणून लिहितोय. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. अश्लाघ्य वाचाळपणा केला म्हणजे आपली मते श्रेष्ठ ठरतात हा गैरसमज काढून टाका डोक्यातून. अकारण वातावरण बिघडवून टाकणारा वाचाळपणा करायला फारशी अक्कल लागत नाही. मूळ मुद्द्याला बगल देऊन निरर्थक गोष्टींवर रान माजवणे ही खोडच असते काहींना. आपण मी वापरलेली हिडीस अथवा अश्लाघ्य भाषा दाखवून द्या. आम्ही जी टीका केली ती सरळ सऱळ केली आहे. पचनी पडली नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण एक लक्षात घ्या उठसूट उठून धर्मावर अंधपणे कोणी टीका करेल व ती चालून जाईल असे आपणास वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. वाहवा मिपाच्या दर्जाबद्दल आपणास असलेली काळजी पाहून ड्वॉले पानावले. \हिडीस भाषा वापरून वैयक्तिक टीका करणं म्हणजे पराक्रम वाटतो का तुम्हाला? त्यापेक्षा आमचे मटण खाण्याचे पराक्रम खूप चांगले म्हटले पाहिजेत. निदान त्यामुळे वातावरण तरी बिघडत नाही. आम्ही हिडीस भाषा कुठे वापरली ते दाखवा नाहीतर शब्द मागे घ्या. आम्ही केलेली टीका स्पष्ट आणि सुसंस्कृत शब्दात आहे. आम्ही तुम्हास विचारायला आलो नव्हतो तुम्ही वैयक्तीक जीवनात काय करता ते, तुम्ही स्वतःच ते आणले आहे चर्चेत. याला फारतर आ बैल मुझे मार अशी मनोवॄत्ती म्हणता येईल. असो बाकी जे काही वैयक्तीक टीकेसंदर्भात आहे ते सोडून आपण काही वाचलेत का प्रतिसादातले? विषेशतः स्वार्थासाठी समाजनियम मोडण्याबद्द्लचे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>मुद्देसूद चर्चा तुम्ही करायला शिका. प्रथम विषयांतर आपण स्वतः केले होते. सुदैवाने हे मला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही. तुमची मुद्देसूद चर्चेची पायरी दिसली इथे. समोरच्या व्यक्तीला चीड येईल अशी वैयक्तिक टीका करणारी भाषा आधी वापरायची; लेखातला रोख समजून घ्यायचा नाही; भावना समजून घ्यायच्या नाहीत आणि निष्कारण वितंडवाद घालत बसायचा याला मुद्देसूद चर्चा म्हणत नाहीत. आधी तुम्ही शिकून घ्या मग जगाला शिकवा. >>जर तुम्हाला विरोधी मतं नको होती तर लेख लिहायचा नव्हता. आपले मटण खाणे, जानवे घालणे अकारण आपण स्वतःच चर्चेत आणलेत त्यावर आम्ही आपण ते आणा असे सांगायला अक्षत घेऊन आलो नव्हतो. विरोधी मतांना विरोध नाहीये; वैयक्तिक टीका करतांना वापरलेल्या भाषेला विरोध आहे. जानवे, मटण इत्यादी वरून तुम्ही जी वाक्ये पहिल्या प्रतिसादात लिहिली आहेत ती वाचा पुन्हा एकदा. विरोध चांगल्या भाषेतही नोंदवता येतो हे माहित नाही वाटते तुम्हाला. जाऊ द्या, तुमचा तरी काय दोष? तुमच्या प्रतिसादातला विरोध मला दिसत होता; माझ्या विचारांना नाही. आणि लेख लिहायचा अथवा नाही हे तुम्हाला विचारायला तुम्ही काय खरेखुरे पेशवे समजता की काय स्वत:ला? जागे व्हा. स्वप्नात फार काळ रमणे बरे नव्हे. >>आम्ही कुठेही फालतू भाषा वापरलेली नाही किंवा शिवीगाळही केलेली नाही. कदाचित आमचा वार नेमका बसला असेल म्हणून चिडला असाल आपण. वार? कसला वार? आणि तुमची भाषा फालतू नाही? माझ्या मतांना विरोध 'मन१' यांनी देखील केला. त्यांचा प्रतिसाद बघा आणि तुमचा बघा. चिडला तुम्ही आहात पेशवेसाहेब, मी नव्हे. तुमच्या पोरकट विधानांनी चिडायला तुमच्या प्रतिसादांची किंमत ती काय? लहान मुले काहीही बरळतात त्याने कुणी चिडत थोडीच असतो. पण त्यांना समज तर द्यावीच लागते ना? >>आपण मी वापरलेली हिडीस अथवा अश्लाघ्य भाषा दाखवून द्या. आम्ही जी टीका केली ती सरळ सऱळ केली आहे. पचनी पडली नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण एक लक्षात घ्या उठसूट उठून धर्मावर अंधपणे कोणी टीका करेल व ती चालून जाईल असे आपणास वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. वाहवा मिपाच्या दर्जाबद्दल आपणास असलेली काळजी पाहून ड्वॉले पानावले. टीका सरळ-सरळ वैयक्तिक आहे हे खरे. धर्मावर टीका करायला मला तुमच्या परवानगीची गरज नाही. तुम्ही काही शंकराचार्य नाही आहात की तुमची परवानगी लागावी. तुमच्या असल्या निरर्थक बडबडीला घाबरून मी धर्मावर टीका करणार नाही असले हास्यास्पद विचार जर तुमचे विचार असतील तर उठा, जागे व्हा. तसलं काहीही होणार नाहीये. त्यामुळे पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या हाच विचार तुमच्यासाठी शहाणपणाचा ठरेल. >>आम्ही हिडीस भाषा कुठे वापरली ते दाखवा नाहीतर शब्द मागे घ्या. आम्ही केलेली टीका स्पष्ट आणि सुसंस्कृत शब्दात आहे. आम्ही तुम्हास विचारायला आलो नव्हतो तुम्ही वैयक्तीक जीवनात काय करता ते, तुम्ही स्वतःच ते आणले आहे चर्चेत. याला फारतर आ बैल मुझे मार अशी मनोवॄत्ती म्हणता येईल. कळला तुमचा सुसंस्कृतपणा. >>असो बाकी जे काही वैयक्तीक टीकेसंदर्भात आहे ते सोडून आपण काही वाचलेत का प्रतिसादातले? विषेशतः स्वार्थासाठी समाजनियम मोडण्याबद्द्लचे. म्हणजे अकारण वैयक्तिक टीका तुम्ही केलीत हे तुम्ही कबूल करता तर!!! बाकी तुमच्या प्रतिसादात काही विशेष वाचण्यासारखे आढळले नाही म्हणून सोडून दिले.

In reply to by समीरसूर

पुप्या सुधार सुधार रे.. एखाद्याला वाटेल तू खरंच हिंदू आहेस. समीरसूर.. लेख बर्‍यापैकी आवडला, सगळे मुद्दे पटले नाहीत पण तळमळ कळते आहे

In reply to by अर्धवट

पुप्या सुधार सुधार रे.. एखाद्याला वाटेल तू खरंच हिंदू आहेस. अर्ध्या आधी हे सांग की घरी गेलास का नाही महीन्याभरात ? ;) असो. जरा विषयांतर झालं का. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

किती धर्मांध होत चाललो आहोत आपण!!!! थोडं काही कुठे खुट्ट झालं की भडकल्या धार्मिक भावना!! असहमत. गल्ली चुकता आहात आपण. सदर प्रकरणाशी धर्माचा काहीही संबंध आहे असे वाटत नाही. +१ माझ्या मते नाही. धर्माशिवाय दुसरं वेगळं काही असूच शकत नाही. जमलंच तर एकदा मनुस्मृती वाचून बघा. धर्म किती खोलवर विचार करतो कोणत्या कोणत्या बाबींना स्पर्ष करतो ते कळेल. आधी मानव, मग नागर्-कृषी संस्कृती झाल्यात आणि मग धर्म. धर्म महत्वाचा असला तरीही त्याच्याही पूर्वी समाजरचना होतीच. असो. इथे अधिक टंकणं बरोबर नाही. कारण सदर प्रकरणाशी धर्माचा काहीही संबंध आहे असे वाटत नाही. ह्याच्याशी सहमत आहोत. म्हणूनच ज्या मावळाचा उल्लेख करता आहात ते अवघं मावळ अफझलखानाच्या हल्ल्याच्या वेळेला शिवरायांकडे एकवटलं. इथेही प्रतिसाद देणं गैरलागु होइल. त्यात आम्हाला काही पराक्रम वाटत नाही. २ गोष्टी यातून दिसतात १ म्हणजे तुमचा तुमच्या जिभेवर कंट्रोल नाही. नसेनाका. त्यातुन समाजाचं काही नुकसान होइलसं वाटात नाही. आपापल्या विशेष आवडीच्या गोष्टीत माणसाचा ताबा रहात नसतोच. कलाकाराला कलेची असीमित आवड असते. ती असली तर असु देत, इतरांचं काहीही न बिघडणं महत्वाचं. २.तुम्हाला हे माहीत आहे की ब्राम्हण शक्यतो शाकाहारी असतात कमीत कमी तशी परंपरा आहे. जातीचे वाढत चाललेले उल्लेख बघुन आश्चर्य वाटले. म्हणजे आपण लई भारी दाखवण्यासाठी तुम्ही जानवं घालूनही तुम्ही मटण खाता मटण खाणे ह्यात काहीही मिरवण्यासारखे नाही, तसेच लाज वाटण्यासारखे अजिबात काहीही नाही.(मी स्वतः शाकाहारी + दुग्धजन्याहारी आहे. ) तर पुढे मागे पैसे आले तर मावळ भूमीची लूट करायला तुम्हीही मागेपुढे पाहीले नसते. स्वार्थासाठी समाजनियम मोडणारे लोकच असे करू शकत असतात. माफ करा मालक. हे जरा जास्तच वाटतय. मच्छीखाउ मराठी माणसाची मुंबै घशात घालुन लाखो गिरनीकामगार आणि सामान्यांना देशोधडीला लावणारे सिंधी-मारवाडी-गुजराती-जैन ह्यांच्यातले भामटे हे समाजनियम पाळणारे शाकाहारीच होते. शाकाहारी-मांसाहारी हे नियम मोडणे आणि अनैतिक्/बेकायदेशीर आचरण ह्यांचा संबंध लावु नये ही कळकळीची विनंती.(समाजनियम दलिताच्या पोराला जवळ करणार्‍या एकनाथाने मोडला होता, अभक्ष्यभक्षण(आणि बहुदा अपेयपानही) करणार्‍या पहिल्या बाजीरावानेही मोडला होता. दोघेही आज आदरणीय्/वंद्य्/पूज्य ठरतात. इतरही शेकडो उदाहरणे विस्तारभयाने देत नाहीये. ) फक्त मटण खाल्ले म्हणुन आपले सूरसाहेब आख्ख्या मावळाच्या जीवावर उठलेले अफजलखान ठरतात काय? बरं तिथे ही लोकसंख्या अफाटच! म्हणजे जिथे जाणार तिथं किड्या-मुंग्यांसारखी माणसंच माणसं!!! गर्दी, गोंगाट, रोजगार नाही म्हणून बेरोजगारी, दारिद्र्य, गुन्हे...झोपडपट्ट्या, गुंडगिरी...हे असंच चालू राहणार जोपर्यंत लोकसंख्या कमी होत नाही. प्रचंड असहमत. लोकसंख्या ही समस्या नाही. लोकसंख्या नियोजन ही समस्या आहे. लोकसंख्या क्षीण होत गेल्याने काय अपरिमित नुकसान होते हे लवकरच येत्या तीनेक दशकात पाश्चात्त्य देशांच्या उदाहरणावरुन स्पष्ट होइल. देशच्या देश कोलमडतील, जे टिकतील त्यांचा लोकसंख्येचा तोल बिघडुन आख्खे युरोप थेट मध्य्-पूर्वेत गणले जाइल असे आत्ताच युरोपीय समाजशास्त्रज्ञ म्हणताहेत. युरोप-अमेरिका हे एका भयावह संक्रमणाच्या उंबरठ्यावर आहेत, केवळ तीनेक दशके दूर! लोकसंख्या ही सतत थोडीशी वाढत्या दिशेने असलेलीच चांगली. अगदि आशिर्वाद देतानाही आपण "आबादी आबाद हो जाओ" म्हणतो म्हणजे तुमची भरभराट होवो, "आबादी" वाढो हेच सांगतो. तेच शुभचिंतन आहे. लोकसंख्या घट ही एक भयावह घटना आहे. माझ्या देशात, माझ्या समाजात ती कधीही घडु नये असे वाटते.

In reply to by मन१

प्रिय मन१, आपल्या मुद्देसूद उत्तरांबद्दल धन्यवाद :-) विचारांवर चर्चा करता येते, मतभेदांवर चर्चा करता येते, शिव्या-शापांवर चर्चा करता येत नाही. आपल्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर मी मात्र असहमत आहे. अमूक एका क्षेत्रफळाच्या जागेवर किती लोकांनी रहावं याला मर्यादा असतात. ८०० स्क्वे.फू. फ्लॅटमध्ये ४ माणसे व्यवस्थित राहू शकतात. एकच माणूस राहू लागला तर कदाचित सुरक्षिततेच्या, एकटेपणाच्या, फ्लॅटच्या मेंटेनन्सच्या, त्यापायी होणार्‍या खर्चाच्या, सोसायटीतल्या इतर गोष्टी निस्तरण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात हे अगदी मान्य!! चार माणसे असतील तर चारही माणसे आरामात राहू शकतात. आता या फ्लॅटमध्ये संडास-बाथरूम किती आहेत यावरही तिथं राहणार्‍या लोकांच्या आरामात राहू शकण्याच्या शक्यता अवलंबून असतात. एकच संडास असेल तर सकाळी घाईच्या वेळी पंचाईत होऊ शकते. दोन माणसे लवकर उठतात, दोन उशीरा उठतात, एकच कामावर जातो किंवा दोन कामावर जातात अशा काही अ‍ॅडजस्ट्मेंट्स करून तरीही चार माणसे व्यवस्थित राहू शकतात. अगदीच मिळून-मिसळून आणि काँम्प्रोमाईज करून रहायचं म्हटलं तर फारतर ७-८ माणसे राहू शकतात. आता कल्पना करा एकच संडास असणार्‍या, पाण्याची टंचाई असणार्‍या अशा ८०० स्क्वे. फू. फ्लॅटमध्ये जर ४५ माणसे रहायला लागली तर काय अवस्था होईल. त्यात फ्लॅट स्वच्छ ठेवण्यासाठी कुणालाच वेळ नाहीये, पाणी जपून वापरण्याची कुणालाच सवय नाहीये, किराणासामान, भाज्या आणायला कुणालाच वेळ नाहीये, सगळे सतत घाईत आहेत अशी कल्पना करा. काय अवस्था होईल त्या फ्लॅटची? पाणी पुरेल का? मलनिसा:रण व्यवस्थित चालेल का? प्लंबिंग टिकेल का? घरातल्या वस्तू टिकतील का? सोसायटी इतक्या लोकांना राहू देईल का? शेजारीपाजारी गोंगाटाची, अस्वच्छतेची तक्रार करणार नाहीत का? त्या ४५ लोकांच्या राहण्याचा संपूर्ण सोसायटीला त्रास होणारच आहे. सामान्य लोकसंख्यावाढ ठीक आहे पण ती केव्हा? जेव्हा मुळात लोकसंख्या आवाक्यात असेल तर. मग जन्म-मृत्यूचे समीकरण व्यवस्थित राहू शकते आणि उपलब्ध साधन-सामुग्री कुठल्याही अनिर्बंध आणि अनैसर्गिक र्‍हसाविना सगळ्यांना नीट पुरू शकते. आज आपल्या इथे बांधकामासाठी वाळू शिल्लक नाही कारण आधीच नद्यांमधली वाळू उपसून संपवली गेली आहे. शेतजमीन दिवसेंदिवस कमी होत चाललीये, एवढ्या अवाढव्य लोकसंख्येला पोसणार कसं? विजेचा भयंकर तुटवडा आत्ताच जाणवतोय. गरज तर वाढतच जाणार आहे. एवढी वीज निर्माण करणार कशी? नद्यांमध्ये पाणी किती आहे? कोळसा किती शिल्लक आहे? त्यातून पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस जास्त जटिल बनताहेत. त्यांचं काय करायचं? शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा प्रकार आता सुरु झालेला आहे. आधीच पावसाचा लहरीपणा आणि त्यात पर्यावरणाच्या र्‍हासामुळे शेतीला सगळ्यात मोठा फटका बसू लागला आहे. बाकी आपले 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' या आशीर्वादाचे दिवस इतिहासजमा झालेत. आपण तसेही बर्‍याच गोष्टी इतिहासजमा केल्यातच की. आज कुणाला ७-८ पोरे परवडतील? त्याकाळी लोकसंख्या कमी होती शिवाय जास्तीत जास्त अपत्ये असणं भूषणावह समजले जाई. आयुष्याच्या कल्पना मर्यादित होत्या. शिक्षण नव्हते. शेतजमिनीच्या उत्पन्नावर सहज भागत असे. गरजा कमी होत्या. महत्वाकांक्षा अगदीच मर्यादित होत्या म्हणून 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' हा एक हवाहवासा आशीर्वाद वाटत असे. आजकाल कुणी असा आशीर्वाद देत नाही. अगदी ऐंशीच्या घरातली वृद्ध मंडळी देखील असा आशीर्वाद देत नाही कारण तो आशीर्वाद आता अगदी गैरलागू आणि अव्यवहार्य आहे हे सगळ्यांनाच समजले आहे. आधी आपल्या संस्कृतीत असा आशीर्वाद देण्याची पद्धत होती म्हणजे ती बरोबरच होती असे नव्हे. तसे तर मग सतीची पद्धतही बंद पडलीच की. कालानुरूप बदलणे आवश्यक असते आणि म्हणूनच हा आशीर्वाद कालबाह्य झाला. शासन देखील दोन अपत्ये असणार्‍यांनाच सोयी देऊ करते. निवडणूक लढवणे फक्त दोन अपत्ये असणार्‍यांनाच शक्य आहे असा काहीसा नियम आहे असे वाचनात आल्याचे स्मरते. म्हणजे सगळीकडेच वाढत्या लोकसंख्येची तलवार आपल्यासाठी किती घातक आहे हे समजल्याचे चित्र दिसते. असो. जसा अपत्यप्राप्तीचा धर्माशी संबंध आहे, तसाच राजकारणाचादेखील धर्माशी संबंध आहे हे मला म्हणायचे होते. आणि म्हणूनच राजकारण धीटपणे समाजाच्या हिताचे काही अत्यावश्यक निर्णय घेण्यास कचरते हा इतिहास आहे आपला. समीर

लेख तळमळीने लिहिलाय. पण मावळ रयतेचे नेतेच सत्तेवर आहेत ना अनेक वर्षे? ते कधीच का तोंड उघडत नाहीत? काँग्रेस्/राष्ट्रवादीच्या पाठिराख्यांनी विकास पाहिजे तर हे स्वीकारले पाहिजे असे गैरसमज वर्षानुवर्षे पसरवले.स्थानिक जनतेचे स्कील्,कुवत काहीही विचारात न घेता अनेक उद्योगधंदे मराठी राजकारण्यांनी स्वतःची तुंबडी भरण्यासाठी राज्यावर लादले. शहरांमध्ये त्याचे परिणाम वर दिलेले आहेतच. आता ईतर भाग पण बळी जात आहेत. लेखातून-
छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मनगटातल्या अफाट ताकदीचा भक्कम आधार देणारे मावळे आता स्वतःचा तोल सावरत लपून-छपून चालणार्‍या डान्स बारमधल्या छछोर बारबालांच्या केसांमध्ये इश्काचा आणि अय्याशीचा आधार शोधत आहेत
अधून मधून कुठल्यातरी ब्रिगेडमध्ये सामील होवून 'शिवशाही' आणण्याचा प्रयत्न करणारे 'पुरुषोत्तम' ह्याच एरियातले असतात का?

In reply to by चिरोटा

पूर्णपणे सहमत. पण असमतोल विकास होण्याचे कारण मला तरी अगदीच साधं वाटतंय ... जर सर्वत्र समतोल विकास होऊ लागला तर अर्धविकसित्/अविकसित भाग असा काही राहणारच नाही, मग पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर भागात बाहेरून लोक स्थलांतर करणार नाहीत. मग स्वतःच बिल्डर बनलेल्या राजकारण्यांच्या जमिनींना आणि स्कीम्सना भाव कसा येईल? परत त्या अर्धविकसित्/अविकसित भागातील राजकारण्यांचे पण पुण्या-मुंबईतील बिल्डर लॉबीत हितसंबंध निर्माण झालेलेच असणार. नाहीतर तेथील स्थानिक नेतृत्व त्या त्या भागात विकास का घडवणार नाही? सध्या परिस्थिती अशी आहे की नागपूर अमरावतीत खासगी कॉलेजेस तर बरीच आहेत पण तिथून शिक्षण घेतलेल्या स्थानिक तरूणांना तिथल्या तिथेच नोकर्‍याच मिळत नाहीत. कारण तिकडे त्या त्या क्षेत्राशी संबंधित रोजगार देणार्‍या कंपन्याच नाहीत. कारण पायाभूत सुविधाच नाहीत. मग सर्वांना पुण्या-मुंबईत यावं लागतं. आपसूकच पुण्या-मुंबईतल्या बिल्डर राजकारण्यांचं फावतं .... मला तर वाटतं की इकडचे राजकारणी त्या भागातील राजकारण्यांना तिथे विकास रोखून धरण्यासाठी काही प्रमाणात 'मानधन' देत असतील ... :)

In reply to by चिरोटा

ते द्वेषाची बीजे पेरणारे पुरुषोत्तम या भागातले नाहीत. ते चिखली-बुलढाणा भागातले! टगेगिरी करून समाजाची शांतता भंग करणारे हे ब्रिगेडवाले म्हणजे मोठा उपद्रव आहेत. हे सगळे 'पुरुषोत्तम' याच कॅटेगरीतले. बघा, नुसत्या 'ब्राह्मणद्वेष' या एका निरर्थक आणि समाजविघातकी भावनेवर आपलं अख्खं करीअर करणारे नेते आपल्याला चालतात यावरूनच आपल्या समाजाचे आणि जनतेचे दोष ठळकपणे समोर येतात. अजूनही शिवरायांच्या नावाचा वापर करून धूडगूस घालणारे गुंड कमी नाहीत. जशी प्रजा, तसा राजा हेच खरे!!

मूळ लेख आणि त्यावरील तुमचे विचार पटले नि आवडले. पंधरा वर्षांनी चित्र भयानक असेल असंच वाटतंय. पुण्याच्या रहदारीबद्दल सिग्नल यंत्रणेच्या जो़डीला असं काहीतरी केलं पाहिजे...

लेख तळमळीने लिहिलाय हे समजलं. पळायचं सगळ्यांनाच कळतं, थांबायचं कुठे, का आणि कधी हेही समजावं नाहीतर मॅरेथॉन चालू! राजकारण्यांना लोकसंख्येचा त्रास होत नाही असे मला तरी वाटते. उलट अफाट जनसमुदायातील वेगवेगळ्या थरातील लोकांना आवश्यकता असेल असे धंदे पोराबाळांना, नातेवाईकांना सुरु करून द्यायचे. रहायची जागा टिचभर असली तर गैरसोय तुमची होणार ना........त्यांचे आलिशान बंगले आधीच झालेत्.......नोकरचाकरही आहेत. प्रश्न तुम्हाला पडलाय ना, त्यांना नाही. स्कॉर्पियो आणि इनोव्हा (कि असच काहीतरी नाव आहे) या गाड्या त्यांच्याचसाठी बनवल्यात.पुण्याहून मुंबईच्या एयरपोर्टला जाताना गाडीचा ड्रायव्हर मावळातल्या जमीन संपादनाच्या कहाण्या सांगत होता. फार वाईट वाटलं. इंच इंच जागेवर कब्जा फक्त तेच करतात असे नाही तर पुण्यातील आमच्या बिल्डिंगमधल्या सर्वात वर, टेरेसजवळ राहणार्‍यांनी संपूर्ण जीना, टेरेस सगळे जाळी लावून त्यांच्या फ्लॅटला जोडून घेतले आहे. आता टेरेस कोणीही वापरू शकत नाही. तक्रार करायला लोक घरातच नसतात. जाऊ दे! म्हणण्याचा मानसिकतेमुळे सगळेच गप्प आहेत.

पुण्यात सिग्नलवर एक भयावह दृष्य दिसते. वाहनाना लेन असा काही प्रकार पाळायचा असतो याची जरादेखील पर्वा नसते. कोठुनही कसेहीकरून ओव्हरटेक करणे यात इती कर्तव्यता मानायची त्यामानाने मुम्बईत जरातरी शिस्त वाटते. म्हातारा माणूस आडवा आला तर वाहनचालक थोडा वेग कमी करतात . वहातुकीला नावे ठेवणारे पुणेकर एकदा स्वतः दुचाकीवर बसले की त्यांच्यातील पादचारी कुठेजातो कोण जाणे? पुण्यात सिग्नलवर पोलीस मात्र अभावानेच आढळतात. बस चाल देखील बिनधास्त सिग्नल चुकवून बस दामटत असतात. बस रस्त्यात मधोमधच थांबवतात.

In reply to by विजुभाऊ

पुण्यातली वाहतूक हा एक जागतिक संशोधनाचा विषय होऊ शकतो. इतकी भिकार वाहतूक अगदी अबोटाबादमध्ये देखील नसेल. पुण्यातल्या वाहतूकीला शिस्त आहे असे म्हणणे म्हणजे दीपिका पदुकोनचं वजन ९३ किलो आहे असं म्हणण्यासारखं आहे. सगळ्यात बेशिस्त वाहतूक पुरस्कार असेल तर तो पुण्यातल्या वाहतूकीला बिनदिक्कतपणे मिळावा असे मी जाहीर आव्हान करतो!

In reply to by विजुभाऊ

पुण्यातली वाहतूक हा एक जागतिक संशोधनाचा विषय होऊ शकतो. इतकी भिकार वाहतूक अगदी अबोटाबादमध्ये देखील नसेल. पुण्यातल्या वाहतूकीला शिस्त आहे असे म्हणणे म्हणजे दीपिका पदुकोनचं वजन ९३ किलो आहे असं म्हणण्यासारखं आहे. सगळ्यात बेशिस्त वाहतूक पुरस्कार असेल तर तो पुण्यातल्या वाहतूकीला बिनदिक्कतपणे मिळावा असे मी जाहीर आव्हान करतो!

पुण्यात सिग्नलवर एक भयावह दृष्य दिसते. वाहनाना लेन असा काही प्रकार पाळायचा असतो याची जरादेखील पर्वा नसते. कोठुनही कसेहीकरून ओव्हरटेक करणे यात इती कर्तव्यता मानायची त्यामानाने मुम्बईत जरातरी शिस्त वाटते. म्हातारा माणूस आडवा आला तर वाहनचालक थोडा वेग कमी करतात . वहातुकीला नावे ठेवणारे पुणेकर एकदा स्वतः दुचाकीवर बसले की त्यांच्यातील पादचारी कुठेजातो कोण जाणे? पुण्यात सिग्नलवर पोलीस मात्र अभावानेच आढळतात. बस चाल देखील बिनधास्त सिग्नल चुकवून बस दामटत असतात. बस रस्त्यात मधोमधच थांबवतात.

हो. काही साधे उपाय आहेत. मर्यादित प्रभावापुरते का असेना ते आहेत. मी राणीच्या देशात रहात होतो*. तेव्हा तिथली मार्गरचनाच अशी होती की आख्ख्या पाच्-सात महिन्यात अगदि म्हणजे अगदि क्वचितच आम्हा पादचार्‍यांचा रस्त्यावरील वाहतुकीशी संबंध यायचा. आम्ही गावभर पायी भटकलो पण कधीच वैताग आला नाही. कारण? अगदि सोप्पय. पायी जाणार्‍यांसाठी स्वतंत्र असे फूटपाथ सर्वत्र (चक्क मोकळे आणि अनतिक्रमित ) होते. शिवाय रस्त्याच्या या बाजुहुन त्या बाजुला जाण्यासाठी सब्-वेज आणि स्काय्-वॉक होते. हे सध्या पुण्यातही आहेत;पण अत्यंत अपुर्‍या संख्येने. एक सब्-वे आहे नळ स्टॉपकडुन म्हात्रे पुलाकडे जाताना, "स्वीकार" हॉटेलच्या समोर. श्री ना दा ठा ( मराठित SNDT) च्या जवळ एक दादरं किंवा स्काय वॉक आहे. त्यामुळे इथे रस्ता ओलांडताना वाहतुकीचा त्रास होत नाही. आता तुम्ही मांडलेल्या मूळ प्रश्नाचा(विकासवाद वगैरे) आवाका प्रचंड आहे; सामाजिक आणि राजकिय पैलु आहेत. त्याबद्दल अधिक काही लिहिणे म्हणजे घिसेपीटे वाटेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे "विकेंद्रित विकास" हाच देश/समाज वाचवायचा एकमेव मार्ग वाटतो. नीट राबवला गेल्यास त्यातुन बरेचसे सामाजिक आणि पर्यावरण विषयक प्रश्न टाळुनही प्रगती साधता येइल. अर्थव्यवस्था पुन्हा (पूर्वीसारखी) कृषीकेंद्रित करणे/होणे निव्वळ अशक्य वाटते. * इथे बाहेर जाउन स्वतः काही तीर मारला आहे असा दावा करण्याचा उद्देश नाही तर केवळ त्या स्कायवॉक कल्पनेचा श्रेया अव्हेर करणे इतकाच आहे.

In reply to by मन१

पदपथ बांधा किंवा आकाशमार्ग बांधा, अतिक्रमण होणारच. पुण्यात बाहेरून येणार्यांची संख्या भरपूर आहे. त्यांना गाड्या चालवणे म्हणजे विमान चालवण्यासारखं काही तरी वाटत असावं. पदपथावरून जाणार्‍या माझ्या मावसबहिणीच्या मृत्यूला जबाबदार असणारी माणसं ही जवळचा शेतीचा तुकडा विकून गाडी विकत घेतलेली होती. सरळ पदपथावर गाडी घालून तिच्या अंगावरून निघून गेली. किती हे क्रौर्य! बरं ज्या राजकारण्याला जमीन विकली होती तो मध्ये पडला आणि या लोकांवर काहीही कारवाई झाली नाही. विकासाच्या नावाखाली किती लोकांचे जीव जाणारेत कोणास ठावूक!

In reply to by रेवती

वाचुन वाइट वाटलं. अगदि १००% ह्याच पद्धतीने मी पुण्यात नवीनच आलेला असताना माझेही डोके स्वारगेटच्या पदपथावर जवळपास फुटलेच होते समोरुन(म्हणजे राँग साइड; तेही फुटपाथवरुन) सुसाट येणार्‍या वाहनाने. नशीब बरे होते, जीव वाचला पण जखमेचा व्रण आजही घेउन फिरतोय. बाकी ह्या घटनांत, त्यात शिक्षा होण्यात सामाजिक,राजकिय गुंता जगड्व्याळ आहे. भारतासाठी तरी हे नवीन नाही हे अत्यंत खेदाने म्हणावे लागते.

In reply to by मन१

अतिक्रमण हे आपल्या इथलं दाहक सत्य आहे आणि ते तितकंच अपरिहार्यदेखील आहे!! अतिक्रमणाशिवाय भारत तग धरूच शकत नाही. इतकी माणसं राहणार कुठे? करणार काय? खातील काय? म्हणूनच झोपडपट्ट्या वाढताहेत आणि फूटपाथ गच्च भरलेले आहेत. किंबहुना भारतात मंदीचा फारसा परिणाम जाणवत नाही याला कारणच हे आहे की भारतातला माणूस काहीतरी करतोच. चहाची टपरी लावतो, वडापावचं दुकान लावतो, चणे विकतो, पान-बिडी विकतो, प्लंबिंग करतो, गटारं साफ करतो, ज्युसची टपरी लावतो, अण्णाछाप टोपी विकतो, झेंडे विकतो...असं काहीबाही करत असतो. कारण सरळ आहे, इतक्या लोकांना शिक्षण देणं शक्य नाही, म्हणून रोजगार नाही. जमिन नाही म्हणून शेती नाही. मग यांनी करायचं तरी काय? मग कुठेतरी अतिक्रमण करायचं, पाणी चोरायचं, वीज चोरायची, कर चुकवायचे आणि मागणीनुसार एखादा धंदा सुरु करून आपलं बस्तान बसवायचं. मग हळू-हळू दोन पोरं ठेवायची, नंतर आणखी दोन ठेवायची, एखाद्या झोपडपट्टीत बेकायदा घर बांधायचं. मग ती अधिकृत झोपडपट्टी म्हणून घोषित होतेच. मग काय, सगळं सोप्पच की!!! पण या सगळ्या प्रोसेसमध्ये तो कष्टाने स्वत:चं, स्वत:च्या कुटुंबाचं पोट तर भरतोच पण शिवाय रोजगारनिर्मितीही करतो. या प्रोसेसमधल्या या भागाची महती आपल्याला मान्य करावीच लागेल. आपल्या देशाची अर्थव्यवस्था अशी कष्टकेंद्रित आहे. शिवाय आपल्याला चार पैसे वाचवायची सवय असतेच. त्यामुळे आपल्या मंदीची झळ इतक्या जास्त प्रमाणात जाणवली नाही जितक्या प्रमाणात ती अमेरिकेत किंवा युरोपात जाणवली. किंबहुना तिथली मंदी अजून हटलीच नाहीये; ती अजून तीव्र होत जातेय. हा एक सकारात्मक भाग नक्कीच म्हणावा लागेल. म्हणूनच अतिक्रमण अपरिहार्य आहे खरे!!!!

+१ सहमत आहे. विकासाच्या नावाखाली जी "सूज" आली आहे ती पाहता, भारत एक महासत्ता होईल की नाही ते माहित नाही, पण तो एक "गुंठामंत्री" देश होईल याची मात्र खात्री पटत चालली आहे... हीच जर विकासाची फळे असतील तर हा विकास नव्हेच, ते एक रोगट बाळसं आहे.

In reply to by बाळकराम

श्री. बाळकराम ह्यांच्याशी सहमत.
विकासाच्या नावाखाली जी "सूज" आली आहे ती पाहता, भारत एक महासत्ता होईल की नाही ते माहित नाही, पण तो एक "गुंठामंत्री" देश होईल याची मात्र खात्री पटत चालली आहे...
अतिशय चपलख शब्द. लेखा मागची तळमळ विचार करायला लावणारी.

तळमळीने लिहिलेला लेख. खरोखर हा एक मोठा प्रश्न आहे.. भीषण ट्रॅफिक, वेळोवेळी होणारे जीवघेणे अपघात, अवाच्या सवा बांधकामे, मोकळी हवा, रस्ते, बागा, मैदाने, शांतता ह्यांना श्रीमंती चोचले मानून, दुर्लक्षिले जाणारे शहराचे नियोजन ह्याने सामान्य माणसाच्या जगण्याचा दर्जा खालावतो आहे. एस एन डी टी च्या पुलावरुन आठवले. पादचार्‍यांकरता उड्डाण पूल बनवले आहेत खरे पण ते तीन चार मजली इमारती इतके उंच! पादचार्‍यांत एक मोठ गट म्हातारे, विकलांग लोक असतात ह्याचा विसर पडलेला आहे. धडधाकट तरूण लोक बहुतेक सगळे वाहने बाळगून असतात. पण असले जिने चढणे बहुतेक वृद्धांच्या आवाक्याबाहेरचे असते. म्हात्रे पुलाचा अंडरग्राऊंड पास, हा पावसाळ्यात इतका निसरडा होतो की पुन्हा म्हातार्‍या लोकांना जिवाचे संकट. घसरुन पडला आणि हाडे मोडली तर नवे दुखणे. ह्यावर काही उपाय होईल असे वाटत नाही. पण ह्या सुविधाही असले धोके बाळगून असतात. एकंदरीत भारतात म्हातारे होणेही कष्टाचे आहे.

वाचायला सुरूवात केल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय राहवले नाही. नळ स्टॉप वरच्या पॅरासारखे विचार नेहमी डोक्यात येत असतात. पादचार्‍यांसाठी ओव्हरब्रिज किंवा अंडरपास दोन्ही फारसे वापरले जात नाही असा (आता ऑब्व्हियस वाटणारा) निष्कर्ष पूर्वीच महापालिकेच्याच कोणीतरी काढल्याचे पेपरमधे वाचले होते. तरीही अजून ते बांधले जातात. जे लोक त्यावरून जाऊ शकतात ते बर्‍याच वेळा पळत जाऊन आणि डिव्हायडर वरून उड्या मारून रस्ते ओलांडतात. बाकीचे (वृद्ध, अपंग) अशा पुलांवरून जाऊ शकत नाही. त्यापेक्षा वाहनांसाठी ब्रिज आणि चालणार्‍यांना नेहमीच्याच लेव्हलवर रस्ता ओलांडण्याची सोय हेच चांगले.

वाचायला सुरूवात केल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय राहवले नाही. नळ स्टॉप वरच्या पॅरासारखे विचार नेहमी डोक्यात येत असतात. पादचार्‍यांसाठी ओव्हरब्रिज किंवा अंडरपास दोन्ही फारसे वापरले जात नाही असा (आता ऑब्व्हियस वाटणारा) निष्कर्ष पूर्वीच महापालिकेच्याच कोणीतरी काढल्याचे पेपरमधे वाचले होते. तरीही अजून ते बांधले जातात. जे लोक त्यावरून जाऊ शकतात ते बर्‍याच वेळा पळत जाऊन आणि डिव्हायडर वरून उड्या मारून रस्ते ओलांडतात. बाकीचे (वृद्ध, अपंग) अशा पुलांवरून जाऊ शकत नाहीत. त्यापेक्षा वाहनांसाठी ब्रिज आणि चालणार्‍यांना नेहमीच्याच लेव्हलवर रस्ता ओलांडण्याची सोय हेच चांगले.