Skip to main content

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 26/08/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले. मोटरसायकल एमाडीसीतून गाडी त्रंबकेश्वराच्या दिशेने चालवायला सुरूवात केली. साधारण ४० कि.मी. स्पिड ठेवायचा असे मनात होते. सातपुरला काही ट्रॅफीक लागले. गियर खाली आणावे लागले. एकदा पाय टेकवून गाडी दोन सेकंदाकरता उभी करावी लागली. त्रंबकविद्यामंदीराच्या ३००/ ३५० मिटर पुढे गाडी बंद झाली. त्यावेळचे ओडोमिटरचे रिडींग ५३५ होते. हे झाले ९ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ९० कि.मी. एका लिटरला ९० कि.मी. म्हणजे फारच चांगले अ‍ॅव्हरेज आले. मला वेळ होताच. म्हणून अजून पुढे जावून अ‍ॅव्हरेज बघण्याचे ठरविले. पाऊस पडत नव्हताच. म्हणजे पडून गेलेला होता. कारण पावसाळा असून त्रंबकेश्वराला पाऊस नाही असे सहसा होत नाही. सगळीकडे हिरवळ होती. त्रंबकेश्वरचा रस्ता तसा शांत असतो. भाविक लोकांच्या गाड्यांची वर्दळ चालू होती. त्रंबकेश्वराला श्रावणात जाण्याचा हिरवळ, पाऊस हा मोठा फायदा असतो. परत कंटेनर उघडले अन त्यात टँकमधून १००ml पेट्रोल काढले. गाडी चालवायला सुरूवात केली. महिरावणीच्या थोडे पुढे कंटेनरमधले पेट्रोल संपले म्हणून गाडी बंद झाली. या वेळचे ओडोमिटरचे रिडींग ५४३ होते. म्हणजे ५३५-५४३=८ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ८० कि.मी. यावेळी रस्ता थोडा चढावाचा होता म्हणून मला गाडी थोडी रेस करावी लागली. यावेळी थोडा स्पिड ४० ते ५५ कि.मीच्या दरम्यान होता. आता मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेतली. पुन्हा टँकमधून १००ml पेट्रोल कंटेनरमध्ये काढले अन नाशिकच्या दिशेने माघारी वळालो. आता रस्ता उताराचा होता. त्याचा फायदा घेत मी उतारावर इंजीन बंद करून चालवत असे. यामुळे नक्कीच अ‍ॅव्हरेज वाढ होणार होती. अ‍ॅव्हरेज काढतांना इंजीन तर चालूच पाहीजे. पण नक्की किती अ‍ॅव्हरेज वाढतो ते काढण्यासाठी मी हा प्रयोग करून पाहीला. तसेच या तिसर्‍या वेळी स्पिड सतत ४० वरच ठेवला. त्रंबकविद्यामंदिराच्या थोडे पुढे मोटरसायकल बंद झाली. रिडींग आले: ५५३.३. म्हणजे ५४३-५५३=१०. म्हणजेच १ लिटरला १०० कि.मी. लागोपाठ तिन वेळा अ‍ॅव्हरेज काढला त्याचा मध्ये (mean) ९० कि.मी. येतो. (९०+८०+१००/३=९०) प्रत्येक १००ml पेट्रोल घेण्यात काही त्रूटी लक्षात घेवून, काही तांत्रीक बाबी, हवेचा वेग, मोटरसायकल चालवण्याची पद्धत आदी गोष्टी लक्षात घेवून आपण मिळालेला अ‍ॅव्हरेज आणखी कमी करू. ८५ किमी करू. ८० करू किंवा डोक्यावर पाणी गेले ७५ करू. म्हणजे एकुणच आताच्या घडीला मला चांगला अ‍ॅव्हरेज मिळाला होता.

वाचने 25557
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

अ‍ॅव्हरेज म्हणजे काय? एक प्रकारची सरासरी. त्यामुळे वाफ होऊन उडून जाणारे इंधन असो की भेसळयुक्त इंधन. तुम्ही रोजच्या आयुष्यात जशी गाडी वापरता (स्टँडर्ड ऑपरेटींग कंडीशन्स फॉर यू) तशीच वापरता काय सरासरी येईल ते काढा. ते सगळ्याच जास्त वास्तव आहे. समजा आयडिल कंडीशनमध्ये तुमची गाडी डब्बल अ‍ॅव्हरेज देत असेल, तरी त्याचा तुम्हाला काही उपयोग आहे का? तुम्ही काही आयडीयल कंडीशनमध्ये गाडी चालवत नाही.

In reply to by Nile

आयडीयल कंडीशनमधे गाडी चालवत नाही. नाईल ने आणखीन एक वैश्विक सत्य उजागर केले.

चार चाकी: ५ वेळा [ पूर्ण टाकी (नोंद) ते पूर्ण टाकी (नोंद) ] हे करून त्याची सरासरी काढल्यास वास्तव सरासरी धाव मिळते. पण ही तशी तडजोडच आहे. प्रत्येक वेळेस नवीन नोंद करत मागच्या सरासरीसोबत जुळवून एकूण सरासरी काढत राहिलं म्हणजे अधिक वास्तविक मिळते. पण वास्तव नि सत्य यात फरक राहतोच. दोन चाकी: ३ वेळा [ रिझर्व (नोंद) ते रिझर्व (नोंद) ] करून सरासरी काढली की वास्तव सरासरी धाव मिळते. हे साहजिकच चार चाकीपेक्षा अधिक सोपं नि नेमकं आहे. पण सत्य नि वास्तव यांतला फरक हा आहेच. सामान्य माणसाला सत्य काय करायचंय म्हणा? आपला सामना असतो वास्तवाशी (नि महागाईच्या विस्तवाशी). तेव्हा त्याच्याशीच जुळवून घ्यावं हेच सत्य!

In reply to by कौन्तेय

दोन चाकी:- [रिझर्व (नोंद) ते रिझर्व (नोंद)] हा अ‍ॅव्हरेज मोजतांना ज्या क्षणी वाहन रिझर्वला जाते त्याच क्षणी टाकीत नविन इंधन भरले गेले पाहीजे. त्यासाठी कॅनमध्ये/ बाटलीत टाकीत टाकण्यासाठी इंधन बरोबर असले पाहीजे. (असेच तुम्ही करता ना?)

In reply to by पाषाणभेद

सोबत बाटलीत इंधन बाळगण्याची गरज नाहीय (शिवाय पेट्रोल बाबत ते बेकायदेशीर कृत्य ठरते). फारच सोपी पद्धत आहे. समजा माझे वाहन १०८९७ वर रिजर्व ला आले आणि रिजर्व तील इंधनावर मी अजून काही किमी प्रवास करु शकत असेल तर तो करत राहावा. वाटेत समजा इंधन भरले तेव्हा १०९१८ असे रीडींग असेल तर त्याची नोंद करण्याचे कारण नाही. पुन्हा समजा वाहन १११९७ वर रिजर्वला आले आणि तुम्ही पुन्हा इंधन १११९९ वर भरले तर इंधन केव्हा भरले याची नोंद करू नकाच. त्याऐवजी वाहन जेव्हा रिजर्व ला आले अशा दोन नोंदींमधला फरक काढा आणि त्याला पहिल्या वेळी वाहन रिजर्वला आल्यावर तेव्हा भरलेल्या इंधनाच्या क्वांटीटीने भागा. हा आला तुमचा मायलेज.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पाषाणभेद, प्रथम मला जेव्हा ही पद्धत समजली तेव्हतुमच्यासारखाच मलाही हाच प्रश्न पडला. जे चेतनने इथे सांगितलंय ते मित्रांनी समजावूनही जाम पचेच ना. पण आधी अनुभवांती मग स्वस्थपणे विचार केल्यावर नि मग पुन्हा अनुभवान्ती ते पटलं. तुम्हालाही यथावकाश पटेल. एकच अडचण. गाडी चालवता चालवता कधीही `राखीव' वर येते. पण नेमक्या त्याच वेळेस सोबत वही पेन नसल्याने ते लिहून ठेवले जात नाही. मग नेमकेपणाचे वांदे होतात. मोटर-दुचाकींसाठी हे टिपणारं; किती पेट्रोल कधी भरलं गेलं हे नोंदवणारं नि त्यायोगे आपोआप सरासरी धाव देणारं एखादं ग्याजेट कुणी बाजारात आणलं तर तुफान खपेल. कुठलाही दुचाकी कंपनीवाला हे आपण होऊन देणारच नाही. हे कुणी तिर्हाईतानेच बाजारात आणले पाहिजे.

In reply to by कौन्तेय

एकच अडचण. गाडी चालवता चालवता कधीही `राखीव' वर येते. पण नेमक्या त्याच वेळेस सोबत वही पेन नसल्याने ते लिहून ठेवले जात नाही. >> मी लक्षात ठेवतो, नंतर लगेचच्या इंधनपंपावर जेव्हा इंधन भरतो तेव्हा बिल घेणे आणि बिलावर हा किमीचा आकडा लिहीणे (किंवा शक्यतो बिल लिहीणीर्‍यालाच तो लिहायला सांगणे) या गोष्टी आठवणीने करतोच करतो. मोटर-दुचाकींसाठी हे टिपणारं; किती पेट्रोल कधी भरलं गेलं हे नोंदवणारं नि त्यायोगे आपोआप सरासरी धाव देणारं एखादं ग्याजेट कुणी बाजारात आणलं तर तुफान खपेल. >> दुचाकीचं ठाऊक नाही, पण माझे मित्र श्री. रणजीत फरांदे यांनी फियाट पुंटो ही कार घेतली असून त्यात मायलेज थेट दिसते. त्यात अजुन एक सुविधा म्हणजे चालक बदलल्याची नोंद ही करता येत असून प्रत्येक चालकाने चालवल्यावर येणारं मायलेज वेगवेगळं मोजलं जाऊन या सर्वांची नोंद दिसते.

''मोटर-दुचाकींसाठी हे टिपणारं; किती पेट्रोल कधी भरलं गेलं हे नोंदवणारं नि त्यायोगे आपोआप सरासरी धाव देणारं एखादं ग्याजेट कुणी बाजारात आणलं तर तुफान खपेल';, वर चेतननं सांगितल्याप्रमाणे, आता नविन सगळ्या गाड्यांमध्ये एमायडि असतो, मल्टि इन्फो. डिस्ल्पे, त्यात असले बरेच हिशोब कळतात,

दफोराव जालावर वाचन करताना नविन माहिती मिळाली ! ती म्हणजे पेट्रोल मधे अगदी थोडेसे अ‍ॅसिटोन टाकले की,अ‍ॅव्हरेज आणि पावर वाढते म्हणे ! जालावर या विषयावर अनेक मते आहेत..म्हणजे फरक पडतो,नाही पडतो...इं अधिक माहिती इथे मिळेलः--- http://www.pureenergysystems.com/news/2005/03/17/6900069_Acetone/ जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा !