Skip to main content

अण्णांचे आंदोलन - आत्मपरीक्षणाची संधी

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 25/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आपले पुढारी नेहमीच कुंपणावर बसून एखाद्या फांदीवरच्या बिलंदर माकडाप्रमाणे उड्या मारत असतात. जिकडे तुकडा दिसला तिकडे उडी टाकयची आणि तुकडा फस्त केला की तिथून सटकून पुन्हा फांदीवर (कुंपणावर) येऊन अधाशीपणे आपली शेपटी हलवत ठेवायची ही आपल्या पुढार्‍यांची खूप जुनी खोड आहे. बाळासाहेंबांनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' म्हटले होते. आता तमाम जनता, अगदी झाडून सगळे, म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, रिक्षावाले, सफाई कामगार, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, सिनेनट, वेश्या, रुग्णवाहिका चालक, नोकरदार, उच्चभ्रू, तृतीयपंथी, भाजीवाले, आयटी कामगार, असे सगळे अगदी मनापासून, कुठलाही भेदभाव न पाळता, कुठेही आंदोलनाला हिंसेचे गालबोट न लावता, जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन लाखोंच्या संख्येने या चळवळीला सक्रीय पाठिंबा देत आहेत म्हणून बाळासाहेबांच्या मनातली राजकीय आकडेमोड त्यांच्या पत्रातून बाहेर पडली असावी. अगदी ढोबळ का असेना, पण पाठिंबा देऊन, अण्णांच्या प्रकृतीची काळजी वाहून जर जनतेमध्ये भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा फुकटात पदरात पाडून घेता येत असेल तर ते शिवसेनेलाही हवे आहे आणि भाजपलादेखील! सध्या भाजप आणि शिवसेना हळू-हळू लपत-छपत आंदोलनाला क्षीण पाठिंबा देत आहेत कारण स्वच्छ आहे. थोडा तुकडा पदरात पाडून घ्यायचा! राष्ट्रवादी अगदी सावध आहे, नेहमीप्रमाणे! कुठल्याच बाबतीत हिरीरीने बाजू मांडून ठाम भूमिका घ्यायची नाही ही सीनीयर पवारांची खासियत. जिथे धूर्त राजकारणाची मेख दिसली तिथे कावेबाजपणे वार करून आपला फायदा करून घ्यायचा त्यांचा स्वभाव! अर्थात त्यांच्या या विश्वासघातकी स्वभावामुळे त्यांचे अपरिमित नुकसान झालेले आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि पुढेही कधी येणार नाही. मावळ गोळीबार असो, अण्णांचे आंदोलन असो किंवा अजून काही, सीनीयर पवार बिळात जाऊन बसतात. दिवसेंदिवस काहीच बोलत नाहीत. अगदी बोललेच तर ते इतके गुळमुळीत आणि निरर्थक असते की कुणालाच काहीच कळत नाही. ते ठामपणे भ्रष्टाचारावर कधी बोलत पण नाहीत. अर्थात त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाम भूमिका घेणे म्हणजे सूर्याने प्रकाशाच्या विरोधात आंदोलन करण्यासारखे आहे. राष्ट्रवादीमध्ये अजून कुणी फार महत्वाचं नाहीच आहे. ज्युनीयर पवार स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्यात पटाईत आहेत. 'आव्हा'न करणारा नेता सवंग आहे. आबा अगदीच बापुडवाणे आहेत. परवाच्या सर्वपक्षीय बैठकीत शहाजोगपणे 'संसद सर्वश्रेष्ठ' चे पालुपद आळवतांना बिस्किटे, सुकामेवा तोंडात टाकतांना मी जेंव्हा पुढार्‍यांना पाहिले तेव्हा मला त्यांच्या अप्पलपोटेपणाचा आणि स्वार्थीपणाचा किळसवाणा प्रकार बघून फांदीवरच्या माकडाची आठवण झाली. राम मंदिराचे, हिंदुत्वाचे, काळ्या धनाचे तुकडे असले की भाजपमधली स्वार्थी परंतु नाकर्ती माकडे गोळा होतात; जातपात, ब्राह्मणद्वेष, सवंग लोकप्रियता हे तुकडे असले की राष्ट्रवादीची कुटील, गुंडप्रवृत्तीची आणि परमस्वार्थी माकडे गोळा होतात. यांच्यातल्या मुंबईतल्या एका भरगच्च मिशी असलेल्या माकडाची शेपटी आणि जीभ जास्तच लांब आहेत. मागे लक्ष्मण माने काही पत्रके फेकत असतांना चिथावणीखोरपणे हे माकड त्यांना 'आगे बढो' ची एनर्जी देत होते. मागासवर्गीयांच्या भावनेला हीनपणे हात घालून राजकारण करणारे हे विध्वंसक प्रवृत्तीचे आणि सतत नकारात्मक 'आव्हा'न करणारे माकड नेस्तनाबूत होणे ही आजच्या काळाची गरज आहे. असो. कोट्यवधी रुपयांचे तुकडे दिसल्यावर काँग्रेसची माकडे गोळा होतात. असा हा सगळा माकडांचा खेळ आहे. दुर्दैवाने त्यांना ताब्यात ठेवणारा मदारी अजूनतरी आपल्या देशात पैदा झालेला नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून असा मदारी अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सगळ्याच माकडांच्या शेपटांना आग लागली आहे. अरुंधती रॉय, काही पुढारी आणि अजून काही दीडशहाणी मंडळी 'संसद सर्वोच्च' 'संसद सर्वश्रेष्ठ' वगैरे असली कुचकामी, तद्दन भंपक आणि निरर्थक हाकाटी पिटून चालत्या गाडीला खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि 'आपण काहीतरी वेगळे' म्हणून लोकप्रियता मिळवण्याच्या फालतू प्रकारात स्वत:चे महत्व वाढवण्याचा निरुद्योग करीत आहेत. कसली डोंबलाची संसद श्रेष्ट? कसली लोकशाही? जिथे सगळी भ्रष्टाचारी नेतेमंडळी एकत्र येऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारतात ती संसद श्रेष्ट? ती संसद पवित्र? जिथे पैसे घेऊन-देऊन चर्चा घडवल्या जातात ती संसद पवित्र? एवढाच यांना संसदेच्या पावित्र्याचा पुळका आहे तर हे स्वत:हून काही ठोस पावले का नाही उचलत? स्वतःहून भ्रष्टाचार का नाही थांबवत? आणि जनतेने निवडून दिलेली नेतेमंडळी आहे म्हणून यांना जनतेला वाट्टेल तसे लुटण्याचा, नागविण्याचा अधिकारही याच 'पवित्र' संसदेने दिला ना? मग संसद सर्वश्रेष्ठ असूच शकत नाही. संसद आहे एक अशी इमारत जी मूकपणे या माकडांचे चाळे सहन करते; जी लाचार आहे; जिचे मूक आक्रंदन कुणालाच कळत नाही. जिथे नानाविध युक्त्या-क्लृप्त्या करून, कोलांट्याउड्या मारून सत्तेवर आणि जनतेच्या पैशांवर राजरोसपणे बलात्कार करण्याचा अधिकार ही हलकट नेतेमंडळी स्वत:च्या पदरात पाडून घेतात ती संसद श्रेष्ट कशी असू शकते? पवित्र कशी असू शकते? आज मी मतदानाला गेल्यावर मला काय दिसते? एक चोर आहे; दुसरा दरोडेखोर आहे; तिसरा लँडमाफिया आहे; चौथा वाळूमाफिया आहे. मी कुणाला मतदान करू जेणेकरून संसदेचे किंवा विधानसभेचे किंवा महापालिकेचे पावित्र्य जपले जाईल? यातले कुठलेही माकड कोणत्याही गृहात गेले तरी तिथे अधाशीपणे चरणारच आहे. मग कुठले गृह पवित्र? आणि आता अशा अटीतटीच्या वेळीच या चोरांना संसदेचे पावित्र्य, संविधान या गोष्टींचा पुळका कसा येतो? इतर वेळेस लाज सोडून पैसे खातांना आणि देश विकायला काढतांना यांच्यातली सदसद्विवेकबुद्धी शेण खायला जाते का? लालूप्रसाद यादवसारखा नेता आयुष्यभर बिहारला अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आणि दरिद्री ठेवून स्वतःच्या तुंबड्या भरत राहतो आणि हा परमभ्रष्ट नेता संसदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष? स्थायी समितीचा दुसरा सदस्य म्हणजे भ्रष्टाचाराचा डेपो असणारा अमर सिंग? असे जनतेच्या हिताच्या विरोधातले सोयीस्कर निर्णय घेऊ शकणारी ही संसद पवित्र? हा भारतातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विनोद आहे. शेतकर्‍यांवर गोळीबार करून नामानिराळा राहणार्‍या पक्षाच्या त्यावर चकार शब्द न बोलणार्‍या एका मुरब्बी नेत्याला आश्रय देणारी संसद श्रेष्ठ? कॉमनवेल्थचा घोटाळा करून, बीआरटीमध्ये पैसे खाऊन गब्बर होणार्‍या कलमाडीला निवांतपणे बूड टेकवू देणारी संसद पवित्र? आज कलमाडीच्या आणि इतर कित्येक लँडमाफियांच्या भ्रष्ट वागण्याने आणि धोरणांमुळे पुण्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे हे या अरुंधती रॉयसारख्या निरुद्योगी आणि बिनडोक लोकांना दिसत नाही? अर्थात हा सगळा नेत्यांचा दोष नाहीये. आपल्यासारख्या सामान्य लोकांचा दोष देखील आहे. आपण भारतीय मूलतः अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी असतो. इतरांच्या सुख-दःखाशी आपल्याला काहीही देणे-घेणे नसते. शिस्त पाळणे, प्रामाणिकपणे काम करणे आपल्याला जमतच नाही. बसमधला कंडक्टर सुटे पैसे कधी स्वतःहून देत नाही. पैसे देऊन लोकांची मुजोरी आपल्या इथे सहन करावी लागते. रिक्षावाले तर असहाय लोकांना लुटायला टपलेलेच असतात. म्हणूनच किल्लारी किंवा कच्छ मधल्या भूकंपात आपल्या भारतीय बांधवांनी लुटालुटीचा नंगा नाच घातला. अक्षरशः मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणीच काय लोणचे पण आपण भारतीयांनी सोडले नाही यातच आपल्या लोकांची मानसिकता दिसून येते. अशा लोकांना पुढारी कसे मिळणार? आपल्यासारखेच भ्रष्ट आणि मुजोर, गुंडप्रवृत्तीचे! आपल्याला तक्रार करायला तशी फारशी जागा नाहीये. अण्णांच्या या 'न भूतो न भविष्यति' आंदोलनामुळे या वागणूकीला मनातून, कुठूनतरी आतून आव्हान केले जाईल ही अपेक्षा आहे. सगळी जनता या आंदोलनातून काहीतरी शिकेल अशी आशा आहे. त्याचबरोबर पुढार्‍यांच्या बेताल वागणूकीला चाप बसेल अशीही एक भाबडी आशा आहे. चौर्‍याहत्तर वर्षांचा एक म्हातारा; कुटुंब नसणारा, कुठलेच पाश, कुठल्याच वासना नसणारा, कुठलीच स्वार्थी महत्वाकांक्षा नसणारा, एक असा माणूस जो दहा दिवस अन्नाशिवाय तग धरून आहे, कशासाठी? नोकरीसाठी? अनुदानासाठी? कर्जमाफीसाठी? आरक्षणासाठी? नाही, एकशेवीस कोटी जनतेच्या भल्यासाठी! ही साधी गोष्ट नाही. कुठलाच भेद-भाव न ठेवता लाखो लोकांना इतके परिणामकारक आंदोलन करायला भाग पाडणे, त्यांना जागे करणे, त्यांच्या मनातल्या माणसाला जागवणे ही गोष्ट एक खूप महान घटना आहे. भारतात कित्येक दशकांत अशी घटना कधी घडलेली नाही. हे एक खूप मोठे स्थित्यंतर आहे. त्याचा फायदा करून घेणे आपल्या हातात आहे. ते खरे आपले प्रत्येकाचे मोलाचे योगदान ठरेल!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3682
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

लेख भिडला (अवांतर:ते ठामपणे भ्रष्टाचारावर कधी बोलत पण नाहीत . हे म्हणजे अट्टल दारुड्या कडुन "मद्यपानाचे दुष्परीणाम" ह्या विषयावर प्रवचन ऐकण्या सारखे आहे)

सामान्य भारतियाच्या मनातल्या भावना अगदि नेमक्या शब्दात उतरवल्यात तुम्ही.मनात खदख्रदणारा संताप शब्दा-शब्दात दिसतोय.

जळजळीत लेख फक्त लेखात "माकडान ऐवजी", "डुक्कर" हा शब्दप्रयोग योग्य ठरला असता

जळजळीत लेख. लेखाचे इंग्रजी भाषांतर करुन फेसबुकवर टाकता आले तर पाहा. इतर भाषिकांकडेसुध्दा हा लेख पोहचायला हवा.

लेख आवडला. आपण भारतीय मूलतः अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी असतो. ह्याच बरोबर कायद्यातली क्लिष्टता हि देखील कारणीभूत आहे. अगदी छोटी गोष्ट. उदा. उद्योगधंद्यातले एखादे सरकारी परवाना मिळविणे. तो घेण्याकरता कायद्याप्रमाणे इतक्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते कि, तो उद्योजक वैतागून जातो. पैसे टाकले कि काम पटकन होते, कारण तिथे सरकारी अधिकारी त्याला असलेल्या discretionary power वापर करतो. त्यासाठी तो लाच घेतो. बरं, हे लाच न देता करायचे ठरले तर त्याचा उद्योग ठराविक मुदतीत उभा राहणे अशक्य. न लाच देता जर परवाना मिळाला तर सरकारी नोंदीत ( फाईलमध्ये ) अश्या मेखा मारुन ठेवलेल्या असतात कि, भविष्यात उद्योजकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

लेख खूप छान शब्दबद्ध केला आहे.

अगदी छोटी गोष्ट. उदा. उद्योगधंद्यातले एखादे सरकारी परवाना मिळविणे. तो घेण्याकरता कायद्याप्रमाणे इतक्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते कि, तो उद्योजक वैतागून जातो. पैसे टाकले कि काम पटकन होते...
कायदा पाळण्याची किंमत त्या घडीला कायदा न पाळण्याच्या किंमतीपेक्षा अधिक असते आणि मग स्वस्ताकडे माणूस जातो. हे कुठंही लागू होतं. रस्त्यावर पोलीस घेत असलेल्या चिरीमिरीपासून ते राजा, बलवा यांच्यापर्यंत. :)

अप्रतिम लेख ... एकदम मनातले रोखठोक विचार.. भिडले... बाकी मला एक आणखिन मुद्दा मांडायचा आहे.. की भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पोलिसांचा पगार वाढवावा..कारण आरोप सिद्ध करण्यासाठी असणारी पहिली पायरी येथुनच सुरु होते. आज अण्णांनी तशी मागणी केली तर बघा सगळे पोलिस त्यांच्या मागे जर उभे राहिले .. तर नक्कीच सामान्य दैंनदिन पाहण्यातला छोटासा पण मोठ्याकडे झुकणारा भ्रष्टाचार्त आपोआप संपिष्टात येइल... अरे सरकारी चपराश्याला पण यांच्यापेक्षा जास्त पगार असतो, आणि कमी तासाची नोकरी असते... त्यामुळे रस्त्यावर होणार्‍या या भ्रष्टाचाराला मी पाठिंबा देत नसलो तरी कीव येवुन पाहत असतो ...

In reply to by गणेशा

एक प्रसंग आठवला. डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट नावाचा अप्रतिम कार्यक्रम सीएनएन-आयबीएन वर लागतो (की लागायचा??) त्यात तत्कालीन क्रीडामंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलाखत चालू होती. आयपीएलमधील शशी थरूर यांच्या सहभागाबद्दल वाद तापला होता. या पार्श्वभूमीवर सूत्रसंचालक करण थापर यांनी एक प्रश्न केला क.था: डू यु थिंक दॅट शशी थरूर इज करप्ट? फा.अ.: नो. आय डोंट थिंक हि नीड्स टू बी करप्ट. ताबडतोब दुसरा प्रश्न क.था.: सो इज करप्शन डन बाय नीड? फा.अ.: ........................ पोलिसांचे पगार वाढवले पाहिजेत हे मान्य. पण वरचा किस्साही लक्षात घेतला पाहिजे. :) करण थापरचा फॅण अन्या

In reply to by अन्या दातार

भ्रष्टाचार हे एक व्यसन आहे; धुंदी आहे; नशा आहे; स्वार्थीपणाचा कळस आहे आणि स्वतःच्या भौतिक सुखाला परमोच्च स्थान देणारी एक विकृती आहे. मी कितीतरी श्रीमंत, अगदी धनाढ्य लोकांना पाच-दहा रुपयांसाठी रडतांना किंवा लोकांना फसवतांना पाहिलं आहे. एकावेळी भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा २-३% मासिक व्याजाने देऊन देखील समोरच्या गरीब टपरीवाल्या माणसाला दोन-पाच रुपयांसाठी फसवणारी माणसे कमी नाहीत. फुकटच्या पैशाची नशा ही सगळ्यात जास्त धोकादायक असते. मग गरज नसतांना हजार-पाचशे रुपये मिळाल्याशिवाय चैनच पडत नाही. मी एका कंपनीत काम करत असतांना आमच्या एका सीनीयर अधिकार्‍यासोबत तत्कालीन मराविमच्या एकलहरे (नाशिक) विद्युतनिर्माण केंद्रात गेलो होतो. आमची कंपनी त्यांना काही उपकरणे पुरवित असे. काय सांगू? अगदी गेट उघडणार्‍या माणसापासून तर मुख्य अभियंत्यापर्यंत सगळ्यांचे दर ठरलेले होते. दहा रुपये टेकवल्याशिवाय गेट उघडले जात नसे. मुख्य लोकांना जाडजूड पाकिटे, पार्ट्या, दारू, बाई, सगळं पुरवावं लागे. मग गरज नसतांना वीस-पंचवीस लाखाच्या ऑर्डर निघत. बँक गॅरंटीच्या व्यवहारात हात ओले करावे लागत. कारकून दणकून पैसे खात असत; अगदी भीक मागितल्याप्रमाणे अधाशी कुत्र्याप्रमाणे शेपटी हलवत उभे राहत. या सगळ्यांकडे मुबलक पैसा असायचा पण कष्टाशिवाय इतके पैसे मिळताहेत पाहिल्यावर कुणी आपला स्वार्थ दडपून ठेवू शकत नसत. अर्थात काही चांगले प्रामाणिक अधिकारीही होते हे मान्य करावेच लागेल. पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच!! भ्रष्टाचार ही विकृती आहे. पैसे खाणे आणि उडविणे हा एक छंद असतो. तो जोपासल्याशिवाय भ्रष्ट लोकांना चैनच पडत नाही. स्वतःच्या पानात गुलाबजाम असतांनादेखील दुसर्‍याच्या पानातली भाकरी ओरबाडून खाणे ही विकृती आहे; दुसरे काहीच नाही. --समीर

अर्थात हा सगळा नेत्यांचा दोष नाहीये. आपल्यासारख्या सामान्य लोकांचा दोष देखील आहे. आपण भारतीय मूलतः अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी असतो. इतरांच्या सुख-दःखाशी आपल्याला काहीही देणे-घेणे नसते. शिस्त पाळणे, प्रामाणिकपणे काम करणे आपल्याला जमतच नाही. बसमधला कंडक्टर सुटे पैसे कधी स्वतःहून देत नाही. पैसे देऊन लोकांची मुजोरी आपल्या इथे सहन करावी लागते. रिक्षावाले तर असहाय लोकांना लुटायला टपलेलेच असतात. म्हणूनच किल्लारी किंवा कच्छ मधल्या भूकंपात आपल्या भारतीय बांधवांनी लुटालुटीचा नंगा नाच घातला. अक्षरशः मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणीच काय लोणचे पण आपण भारतीयांनी सोडले नाही यातच आपल्या लोकांची मानसिकता दिसून येते. अशा लोकांना पुढारी कसे मिळणार? आपल्यासारखेच भ्रष्ट आणि मुजोर, गुंडप्रवृत्तीचे! आपल्याला तक्रार करायला तशी फारशी जागा नाहीये. मस्तं. हेच सत्य आहे. घाशीराम कोतवाल नाटकातल्या अतिरेकी ब्राम्हणविरोधी विधांनाकडे दुर्लक्ष केले तर याचा मतितार्थ असाच आहे की नुसती सत्ता भ्रष्ट नसते, जनता भ्रष्ट असते तेव्हाच भ्रष्ट सत्ता उभी राहू शकते. आता देखील आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी रॅल्या निघतात त्यात उत्साही तरून ३-३ जण मोटारसायकलीवरून जात असतात. एखादा मागच्या सीटवर झेंडा घेऊन उभा राहतो. हा देखील भ्रष्टाचार आहे असे मला वाटते यातही नियम मोडून वागणेच आले ना!

अतिशय छान. सर्वसामन्यांचे विचार डोकावलेत. एकदम रोख ठोक विचार आणि टू द प्वॉईट. राजा परांजपे एका मुलाखतीत: हे म्हणजे केशराच्या शेतात गाढवे चरत आहेत. (तुम्ही दिलेली उपमाही छानच आहे )

हा कायदा जर अस्तिवात आला तर, सर्वच राजकिय पक्ष, संघटना, संस्था आणि कार्यकर्ते यांचे अर्थकारण बिघडणार आहे. मला असे वाटते अण्णा हा एकच मर्द निघाला, ज्यांनी सर्व मरतुकड्यांच्या शेपटावर पाय दिला आहे. अजातशत्रुला (अण्णांना) आणि त्यांच्या सर्व साथीदारांना अशी वेळ मिळाली की, मम्मी नाही त्यामुळे पदराआड सुद्धा लपता येत नाही. येईपर्यंत वेळ सुद्धा लांबवता येत नाही.

अण्णांच्या या 'न भूतो न भविष्यति' आंदोलनामुळे या वागणूकीला मनातून, कुठूनतरी आतून आव्हान केले जाईल ही अपेक्षा आहे.
मला हे आंदोलन आव्हानापेक्षा जनमानसाचा उच्चार वाटतो. 'हे जे चाललंय ते थांबलं पाहिजे. निदान आटोक्यात तरी आलं पाहिजे' असा संदेश खणखणीत आवाजात पोहोचतो आहे.
हे एक खूप मोठे स्थित्यंतर आहे. त्याचा फायदा करून घेणे आपल्या हातात आहे. ते खरे आपले प्रत्येकाचे मोलाचे योगदान ठरेल!
या आंदोलनानंतर कदाचित पुढच्या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून अधिक स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे केले जातील अशी आशा आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त भ्रष्टाचार करणाऱ्या खुर्च्या गेल्या तर समाजाला लांबवरचा फायदा होईल.

>>अर्थात त्यांच्या या विश्वासघातकी स्वभावामुळे त्यांचे अपरिमित नुकसान झालेले आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि पुढेही कधी येणार नाही खूप छान, चांगले निरीक्षण आहे

आसूडाचे फटके मारावेत तसा झाला आहे लेख. प्रचंड आवडला. अर्थात हा सगळा नेत्यांचा दोष नाहीये. आपल्यासारख्या सामान्य लोकांचा दोष देखील आहे. आपण भारतीय मूलतः अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी असतो. इतरांच्या सुख-दःखाशी आपल्याला काहीही देणे-घेणे नसते. शिस्त पाळणे, प्रामाणिकपणे काम करणे आपल्याला जमतच नाही. बसमधला कंडक्टर सुटे पैसे कधी स्वतःहून देत नाही. पैसे देऊन लोकांची मुजोरी आपल्या इथे सहन करावी लागते. रिक्षावाले तर असहाय लोकांना लुटायला टपलेलेच असतात. म्हणूनच किल्लारी किंवा कच्छ मधल्या भूकंपात आपल्या भारतीय बांधवांनी लुटालुटीचा नंगा नाच घातला. अक्षरशः मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणीच काय लोणचे पण आपण भारतीयांनी सोडले नाही यातच आपल्या लोकांची मानसिकता दिसून येते. अशा लोकांना पुढारी कसे मिळणार? आपल्यासारखेच भ्रष्ट आणि मुजोर, गुंडप्रवृत्तीचे! आपल्याला तक्रार करायला तशी फारशी जागा नाहीये. १००% खरंय. सुरूवात स्वतःपासूनच करायला हवीये.

अर्थात हा सगळा नेत्यांचा दोष नाहीये. आपल्यासारख्या सामान्य लोकांचा दोष देखील आहे. आपण भारतीय मूलतः अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी असतो. इतरांच्या सुख-दःखाशी आपल्याला काहीही देणे-घेणे नसते. शिस्त पाळणे, प्रामाणिकपणे काम करणे आपल्याला जमतच नाही. बसमधला कंडक्टर सुटे पैसे कधी स्वतःहून देत नाही. पैसे देऊन लोकांची मुजोरी आपल्या इथे सहन करावी लागते. रिक्षावाले तर असहाय लोकांना लुटायला टपलेलेच असतात. म्हणूनच किल्लारी किंवा कच्छ मधल्या भूकंपात आपल्या भारतीय बांधवांनी लुटालुटीचा नंगा नाच घातला. अक्षरशः मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणीच काय लोणचे पण आपण भारतीयांनी सोडले नाही यातच आपल्या लोकांची मानसिकता दिसून येते. अशा लोकांना पुढारी कसे मिळणार? आपल्यासारखेच भ्रष्ट आणि मुजोर, गुंडप्रवृत्तीचे! आपल्याला तक्रार करायला तशी फारशी जागा नाहीये. हे माझ्या चेपु वरील नोट्स मध्ये काही दिवसांपूर्वीच वेगळ्या शब्दांत मांडले होते.

अतिशय नेमक्या शब्दांमधे सणसणीत लिहिले आहे.

एका अतिशय उत्तम लेखाबद्दल आभार... अनेकांच्या मनातला असंतोष इतक्या नेमक्या शब्दात मांडला आहे की असं वाटलं की हेच ते... हेच म्हणायचं होतं... इतक्या नेमक्या आणि जबरदस्त शब्द रचनेसाठी +१०००००००००००००००००००० सर्वपक्षीय माकडांचं वर्णन तर एकदम तंतोतंत... वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे यातून थोडा जरी बदल झाला तर इतक्या मोठ्या प्रमाणावर गेल्या ६४ वर्षात प्रथमच (जयप्रकाश आणि आणिबाणी) वगळून झालेल्या आंदोलनाचा आणि एका म्हातार्‍या माणसाच्या तळमळीचा काहीतरी उपयोग भारताच्या भवितव्यासाठी होईल... समीरसूर ... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.. हा लेख खरंच सर्वत्र जावा... आणि लाखो मराठीजनांनी वाचावा असा आहे..