✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

ग
गंगाधर मुटे यांनी
Sat, 08/20/2011 - 09:44  ·  लेख
लेख
अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २                               भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते, असे जर कोणी सांगत असेल तर ती सुद्धा लबाडी आहे कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्य जातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्य जातीच्या जन्माच्या आधीपासूनच अस्तित्वात होता, याचे पुरावे आहेत. देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो, असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.
                         काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखवावा लागतो. त्यातल्या त्यात काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या "प्रसन्न किंवा मंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते "आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा." 
                             मात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे "ओंगळ किंवा अमंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. इथे याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी त्यांची पुजा करावीच लागते. दहीभात, मलिंदा, कोंबडी, बकरी यापैकी काहीना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो. कारण या ओंगळ देवतांचा जर क्रोध अनावर झाला आणि त्या कोपल्या तर घरातल्या व्यक्ती आजारी पडणे किंवा मरणे, नैसर्गिक प्रकोप होणे, रोगराई येणे अशा तर्‍हेची संकटे येतील, अशी भिती त्यांच्या मनात दबा धरून बसलेली असते. देव आहे की नाही, तो प्रसन्न होतो की नाही, असा हा मुद्दा नाही पण पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये अशाच तर्‍हेने समाजाची उत्क्रांती झाली असल्याने लाचखोरी आणि भ्रष्टाचार मनुष्यजातीच्या रक्तात पुरेपूर भिनलेला आहे, हे महत्त्वाचे आहे. 
                            निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काहीना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गूण किंवा अवयव दिले आहे की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघ-सिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्षांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडूनच स्वतःचे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरजच भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणीहत्या मानली जात नाही आणी त्यांना निसर्गानेच तशी मुभा दिली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही. म्हणूनच प्राण्यांना पाप-पुण्याच्या कसोट्याही लागू होत नाही. 
                       मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही की तो त्याच्या साहाय्याने स्वतःची शिकार स्वतःच मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यापैकी जरी काहीही दिले नसले तरी त्याऐवजी बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देऊन टाकले आहे आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहायस्वातंत्र्य हेच मानवजातीच्या संबंध वर्तनाचे आणि गैरवर्तनाचे कारण ठरले आहे. मनुष्याने बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर मनुष्याऐवजी निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करून त्याचा जाणीवपूर्वक अंगिकार करण्याची गरजच भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरजच भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीतच राहिले असते. 
                           माणसाच्या वर्तणुकीचे नियमन निसर्ग करत नसल्याने व आपापल्या बुद्धीचा वापर कसा करावा याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असल्याने मानवीजीवाच्या व्यक्तीगत हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मानवी जीवांच्या समुच्चयातूनच समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जीवाने व्यक्तीगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोहचेल अशी हालचाल करणे म्हणजेच अनैतिकता, अशी एक ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या असाव्यात. 
                            एखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजासाठी व एकंदरीत समाजाच्या उत्क्रांतीच्या दिशा ठरण्यासाठी अहितकारक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायीभाव असल्याने आणि मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे लपतछपत चौर्य कर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे, ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने अनावश्यक व अहितकारक व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. 
                          विविधता हा निसर्गाचा मुख्य गूण असल्याने जन्माला येणार्‍या व्यक्तीही जन्मताच नानाविध प्रवृत्तीच्या असतात. काही व्यक्ती निष्कलंक चारित्र्याच्या असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. काही व्यक्ती समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात, काही व्यक्तींच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणार्‍या असतात मात्र व्यक्तींचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. नानाविध कॢप्त्या लढवीत असतो, कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. 
                        मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचारधार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.
(क्रमशः)                                                                                                          गंगाधर मुटे -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक-१ प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
प्रेमकाव्य
अर्थकारण
राजकारण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3729 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

भष्टाचाराचा बळी.....

संजीव नाईक
Sat, 08/20/2011 - 11:32 नवीन
श्री. गंगाधर मुटे यास.. लेखा बद्दल धन्यवाद. खुपछान लेख लिहीलात आहे,
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

शुचि
Sat, 08/20/2011 - 15:49 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

खरतर ह्यावर प्रबोधन ठाकरेंचे एक पुस्तक आहे.

वेताळ
Sat, 08/20/2011 - 19:21 नवीन
त्याचे नाव आठवत नाही.
  • Log in or register to post comments

डेमी

विनायक प्रभू
Sat, 08/20/2011 - 19:37 नवीन
ओंगळ देवता= डेमी गॉड्स
  • Log in or register to post comments

काही प्रश्न

विकास
Sat, 08/20/2011 - 19:40 नवीन
देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो, असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.
  1. याचा अर्थ आपला देवावर विश्वास आहे असा घ्यावा का?
  2. इष्ट देवता प्रसन्न होते यावर आपला विश्वास आहे असे म्हणता येईल का?
  3. थोडक्यात देव हे आधी तयार झाले आणि त्याच्याकडून मानवनिर्मिती झाली असे म्हणायचे का माणसाने देव निर्माण केले असे म्हणायचे?
जर पहील्या दोन प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर मुद्दा वेगळा आहे. पण त्यांची उत्तरे जर नाही असतील तर देव मानवनिर्मित आहे असे म्हणावे लागेल. त्या संदर्भात आपले शिर्षक आणि विचार चुकीचे वाटले असे वाटते.
  • Log in or register to post comments

फक्त "आर्थिक भ्रष्टाचार"

गंगाधर मुटे
Sat, 08/20/2011 - 20:14 नवीन
सर्वच प्रतिसाद आवडलेत. :) माझा मुद्दा फक्त "आर्थिक भ्रष्टाचार" (आणि त्याचा उगम) एवढाच आहे. लेखात आलेले सर्व संदर्भ केवळ "आर्थिक भ्रष्टाचार" या विषयापुरतेच मर्यादीत आहे. हा स्वतंत्र लेख नसुन भाग - १ चा पुढील भाग आहे.
  • Log in or register to post comments

जम्या नहीं

आदिजोशी
Sat, 08/20/2011 - 20:43 नवीन
काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी द्यावा लागतो. त्यापैकी काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या "प्रसन्न देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते "आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा." हे सगळं मानवनिर्मीत असल्याने लेखाचा पहिला भाग फसल्यासारखा वाटतो. देवाने हे सगळं भक्तांना करायला सांगितलं हा तुमचा दावा आणि त्यावर आधारित भाग मुदलातच चुकलेले आहेत असं खेदाने नमूद करावेसे वाटते. भोंदू बाबा आणी स्वयंघोषीत स्वामी ह्यांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी देवाच्या नावावर चालवलेली ही लूटमार आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मला एकाही देवाने एकदाही येऊन काहीही मागितलेले अथवा करायला सांगितलेले नाही. ह्या जगात असा एक तरी माणूस तुमच्या तर्काचा पुरावा म्हणून दाखवा. एखादी गोष्ट हवी असल्यास ती मागणे (सहजपणे, कळवळून, हात जोडून, नमस्कार करून अथवा इतर प्रकारे) हा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. ह्या न्यायाने 'आई मला भूक लागली आहे, प्लीज जेवायला वाढ' हे वाक्यही भ्रष्टाचारात मोजले जाईल. निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. इतपासून पुढे लेख ठीक आहे.
  • Log in or register to post comments

देव आहे किंवा नाही, देवाने

गंगाधर मुटे
Sat, 08/20/2011 - 21:23 नवीन
देव आहे किंवा नाही, देवाने हे सगळं भक्तांना करायला सांगितलं की भक्तांनीच देव बनवला, याचा परामर्शे घेण्याचा लेखाचा उद्देशच नाही. फक्त जे आहे ते, जसे आहे तसे - एवढेच मी उदाहरणादाखल घेतले आहे ते केवळ आर्थिक भ्रष्टाचाराची नेमकी सुरुवात कुठून झाली असावी - याचा शोध घेण्याच्या उद्देशाने. माझा मुद्दा फक्त "आर्थिक भ्रष्टाचार" (आणि त्याचा उगम) एवढाच आहे. लेखात आलेले सर्व संदर्भ केवळ "आर्थिक भ्रष्टाचार" या विषयापुरतेच मर्यादीत आहे. ---------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

फक्त जे आहे ते, जसे आहे तसे -

आदिजोशी
Sat, 08/20/2011 - 23:47 नवीन
फक्त जे आहे ते, जसे आहे तसे - एवढेच मी उदाहरणादाखल घेतले आहे ते केवळ आर्थिक भ्रष्टाचाराची नेमकी सुरुवात कुठून झाली असावी - याचा शोध घेण्याच्या उद्देशाने. ते खरं आहे हो, पण सॄष्टीचा निर्माता देव असं एकवेळ धरलं तर त्याच्या आधी कुणीच नाही. मग सगळ्या भ्रष्टाचाराला तोच जबाबदार ठरतो ना. आणि हे चुकीचे आहे. कारण देवाने कधीच कुणाकडे काही मागत नाही. भक्तीच्या व्यापारीकरणापासून सुरुवात झाली असं म्हटलं असतंत तर मान्य केलं असतं. पण भ्रष्टाचाराच उगम देव हे कसं पटवून घ्याव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

भ्रष्टाचाराची सुरुवात

गंगाधर मुटे
Sun, 08/21/2011 - 07:45 नवीन
भ्रष्टाचाराची सुरुवात ब्रह्मदेव, विष्णू किंवा राम-ष्रीकृष्ण यांचेपासून झाली, असे मी म्हटलेले नाही. देव आणि मानव, यांच्या संबंधातील उदाहरणे मी घेतलेली आहेत. त्यामुळे सगळ्या भ्रष्टाचाराला देव जबाबदार आहे. असा अर्थ निघत नाही असे मला वाटते. (तुम्ही जे म्हणता, तेच मला म्हणायचे आहे. पण कदाचित शब्दात ते निट व्यक्त झाले नसावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

+

नितिन थत्ते
Sun, 08/21/2011 - 08:55 नवीन
लेखातल्या विचाराशी सहमत आहे. श्री. मुटे देवसुद्धा लाच घेतल्याशिवाय काम करत नाही असे म्हणतात तेव्हा "लाच घेतल्याशिवाय कोणीही काम करत नाही हीच भारतातली (काम करणार्‍या आणि ज्याचे काम आहे त्याच्या दृष्टीने) स्टॅण्डर्ड सिस्टिम आहे आणि तिचे रोपण देवावरही झाले आहे" असे त्यांना म्हणायचे आहे. देव खरोखर/प्रत्यक्षात कधी बक्षीस मागतो की नाही (किंवा देव असतो की नाही)अशी चर्चा येथे वायफळ आहे.
  • Log in or register to post comments

फरक

विकास
Sun, 08/21/2011 - 18:47 नवीन
"लाच घेतल्याशिवाय कोणीही काम करत नाही हीच भारतातली (काम करणार्‍या आणि ज्याचे काम आहे त्याच्या दृष्टीने) स्टॅण्डर्ड सिस्टिम आहे सहमत तिचे रोपण देवावरही झाले आहे" असे त्यांना म्हणायचे आहे. रोपण आणि उगम या दोन्ही शब्दांच्या अर्थात जमिन अस्मानाचा फरक आहे असे वाटते. देव खरोखर/प्रत्यक्षात कधी बक्षीस मागतो की नाही (किंवा देव असतो की नाही)अशी चर्चा येथे वायफळ आहे. चर्चा जर भ्रष्टाचाराच्या उगमावर असेल अथवा भारतातील भ्रष्ट्राचारी वृत्तीवर असेल तर त्याच्या शिर्षकात देव आणणे वायफळ आहे असे म्हणावे लागेल. (ज्यांना एखाद्या काव्यातील.लेखातील एक शब्द वायफळ वाटून चर्चा करता येते त्यांना हे समजायला कठीण जाऊ नये असे वाटते. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रोपण आणि उगम

गंगाधर मुटे
Sun, 08/21/2011 - 20:07 नवीन
रोपण आणि उगम या दोन्ही शब्दांच्या अर्थात जमिन अस्मानाचा फरक आहे असे वाटते. देवाधिकांच्या काळापासूनच किंवा त्याही आधीपासून किंवा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा पासूनच भ्रष्टाचार अस्तित्वात आहे असे मला म्हणायचे आहे. मला वाटते की, तोच अर्थ ठळकपणे लेखातून निघतो. इतर अर्थ जसे आणि जेवढे काढायचे तेवढे निघू शकतात. पण गरज नसेल तर विनाकारण काढायचे नसतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भ्रष्टाचाराच्या स्टॅण्डर्ड सिस्टिमचे रोपण माणसाने देवावर केले हे अगदी सत्य आहे. परंतू आर्थिक भ्रष्टाचाराच्या बाबतीत असे लिहिले की, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. मग लाचखोरीचे रोपण जनतेनेच शासकिय यंत्रणेवर किंवा भ्रष्टाचारी अधिकार्‍यावर केले असेही मान्य करावे लागेल. कारण जसा देव आपल्यामंदिरातच बसून असतो, तसाच लाचखोर अधिकारीही आपल्याच खुर्चीवर बसून असतो. जसा देव भक्ताला पुजा करायला सांगत नाही तसाच लाचखोर अधिकारीही मला लाच आणून द्या म्हणून दवंडी पिटत नाही. जसे भक्तच देवाकडे दान करण्यासाठी सोन्याचे दागीने घेऊन जातात तसेच लाच देणारे पैशाच्या पेट्या घेऊन लाचखोर अधिकार्‍याकडे जातात. वगैरे वगैरे. प्रसंग आणि कर्म करण्यामागचा उद्देश जर सारखाच असेल तर मग भ्रष्टाचार्‍याचे काही चुकते, असे कसे म्हणता येईल? मग लाच घेणारा निर्दोष आणि लाच देणाराच १०० टक्के दोषी असतो, ही थिअरी मान्य करावी लागेल. विशेष म्हणजे अशाच तर्‍हेची थिअरी, विचार आणि भूमिका जोपासणारा एक मोठा वर्ग भारतात अस्तित्वात आहे.
  • Log in or register to post comments

देव आणि भ्रष्टाचार

शेखर काळे
Mon, 08/22/2011 - 09:05 नवीन
भ्रष्टाचार आणि देवाला अर्चना यांत मुलभूत फरक असा आहे की (इतरांनी लिहिल्याप्रमाणे) देवाने स्वतःहून काहीही मागितलेले नाही. देवाला जे पुजारी, साधू, बाबा, जे कोणी असेल ते, त्याच्या सांगितल्याप्रमाणे सगळे दिले, तरी आपल्याला हवे तसे होईल याची काहीच खात्री नाही. याउलट भ्रष्टाचारी अधिकारी, मंत्री यांना हवे ते दिल्यास आपले काम तरी नीट होते. भ्रष्टाचाराचा ऊगमच बघायचा झाला तर तो या साध्या तत्वात आहे - माझे असे असे काम आहे, जो करून देईल, त्याला मी अमुक अमुक गोष्ट द्यायला तयार आहे. हे तत्व सगळ्याच सेवांना लागू होते. जर कोणी आपल्या सेवेसाठी अमुक एक मुल्य आकारीत असेल आणि ग्राहक जर ते मुल्य द्यायला तयार असेल, तर या व्यवहारात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. भ्रष्टाचार आपण कधी म्हणतो तर आपल्याला शक्य असलेल्या मुल्यापेक्षा किंवा समाजाने ठरविलेल्या मुल्यापेक्षा अधिकारी जेव्हा जास्त मुल्य आकारीत असेल तेव्हा. माझ्या मते भ्रष्टाचार हा सापेक्ष आहे. काहींना हे मुल्य देणे शक्य आहे .. व काहींना नाही. - शेखर काळे.
  • Log in or register to post comments

देवाने स्वतःहून काहीही

गंगाधर मुटे
Mon, 08/22/2011 - 10:39 नवीन
देवाने स्वतःहून काहीही मागितलेले नाही. भ्रष्टाचारी व्यक्ती सुद्धा स्वतःहून आपल्या तोंडाने काहीच मागत नाही. फक्त कामाचा खोळंबा करते. अडवणूकीचे धोरण अवलंबते. फाईलवर सहीच करत नाही. तांत्रिक बाबीचा आधार घेत विनाकारण नामंजूर करते. (हा त्याचा अधिकार आहे असे कायदाही मान्य करतो) मग गरजू व्यक्तीच स्वतःहून नवस कबूल करतो. :) मग अधिकारी प्रसन्न झाला की काम मार्गी लागते.(काम मार्गी लागणे हेही कायदेशीरच असते. कायद्याला मान्य असते) :)
  • Log in or register to post comments

लेख उगाच ओढून ताणून लिहिला

स्पा
Mon, 08/22/2011 - 10:42 नवीन
लेख उगाच ओढून ताणून लिहिला आहे असे वाटले... वर आदि जोशींना अनुमोदन
  • Log in or register to post comments

लेखात काही किरकोळ बदल आणि

गंगाधर मुटे
Sun, 08/28/2011 - 14:50 नवीन
लेखात काही किरकोळ बदल आणि विस्तार केला आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला असे लेख इथे फारसे

आशु जोग
Sun, 08/28/2011 - 15:04 नवीन
लेख आवडला असे लेख इथे फारसे पहायला मिळत नाहीत शेवटी जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा