Skip to main content

पौर्णिमेचा चंद्रमा..

पौर्णिमेचा चंद्रमा..

Published on 13/08/2011 - 13:36 प्रकाशित मुखपृष्ठ
नोकरी मिळाल्यानंतर सुखाने राहणारा पुरुष जगाला बघवत नाही हेच खरं. आता हेच बघा ना! मला नोकरी लागली आणि आई-बाबांचा धोशा सुरु झाला, 'विद्याधर! आता वेळ घालवू नकोस. मनावर घे. आम्हाला लवकर सून बघायची आहे. तू फक्त हो म्हण. बाकी स्थळे बघण्याचा उपद्व्याप आम्ही आनंदाने करु.' मी हा हट्ट फारसा मनावर घेतला नाही. कारणे दोन. एक तर माझी भटकण्याची आवड आणि दुसरी माझी दिसेल त्या विषयावर वाद घालण्याची खोड. घरी वाद घालायला लागलो, की आई-बाबा कंटाळून म्हणायचे, 'ए बाबा! तू सारखा भटकत असतोस तेच परवडले. सॅक उचल आणि चालू लाग हवे तिथे.' मग पडत्या फळाची आज्ञा समजून मी घराबाहेर पडायचो. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आई काळजीने म्हणायची, ' लग्न झाल्यावर याच्या बायकोचे कसं होणार, ही काळजी मला आतापासूनच लागून राहिली आहे. हा सारखा कुठल्याही विषयावरुन तिच्याशी वाद घालत बसणार. पळून जाईल बिचारी.' आता बहुतेक वेळ घराबाहेर रमणारा आणि घरात असताना वाद घालत बसलेला नवरा कुठल्या मुलीला चालेल? म्हणून मी लग्नाचा विषय टाळायचो किंवा फार चर्चा सुरु झाली, की ती बंद करण्याचा हमखास उपाय म्हणजे वाद घालत बसायचो. अलंग-कुलंग-मलंग असे सगळे गड पालथे घालून झाल्यावर माझ्या मनाने अनवट पर्यटनस्थळे बघायचे वेड घेतले आणि असाच एकदा माझ्या चुलतमावशीच्या गावाला कुंडलपूरला गेलो. तर तीच कहाणी मी तुम्हाला सांगावी म्हणतो. मावशीने अगदी आग्रहाने कुंडलपूरला येण्याचे आमंत्रण दिले होते. जवळची कुंडला नदी आणि ऐतिहासिक मेरुगड या निसर्गरम्य परिसरात माझे मन रमेल, असे मावशीला वाटत होते. कुंडलपूर म्हणजे बर्‍यापैकी वसतीचे गाव. ना धड खेडे, ना धड शहर. पण मला पहिल्याच दिवशी आवडले. किती शांत परिसर आणि लोक पण शांत. जो तो आपल्या उद्योगात. निसर्गातील शांतता मला आवडते, पण लोक शांत असलेले मला बघवत नाहीत. माणसाने कसे थकेपर्यंत वाद घातले पाहिजेत. भांडणे हमरीतुमरीवर आली पाहिजेत. एकमेकांच्या जातीचा-धर्माचा-कुळाचा उद्धार झाला पाहिजे, हे माझे साधे-सरळ तत्त्वज्ञान. आमची श्यामल मावशी कुंडलपूरच्या बाहेरच्या भागात म्हणजे एका शांत कॉलनीत राहायला होती. आजूबाजूला सगळे बैठे बंगले. प्रगाढ शांतता. दोन दिवसांनी मीच कंटाळलो. त्यावर मावशी म्हणाली, 'का रे विद्याधर? माझ्याकडे मन रमत नाही का तुझं?' त्यावर मी म्हणालो, ' अगं मला इथे वाद घालायला कुणी भेटत नाही. ही शांतता मला असह्य होते. तुझी ती कुंडला नदी आणि मेरुगड मी एकाच दिवसात बघून आलो. आता अजून दोन दिवस करु काय? त्यापेक्षा मी आजच जातो घरी परत.' मावशीने क्षणभर माझ्याकडे रोखून बघितले आणि म्हणाली, 'अरे काळजी करु नकोस. चार बंगले पुढेच आमचे अण्णाशास्त्री पुराणिक राहतात. त्यांना अशीच जन्मभर वाद घालायची खोड.आहे. त्यांच्याकडे पुस्तकांचा खूप संग्रह आहे. जा त्यांच्याकडे.' 'कोण हे अण्णाशास्त्री? काय पंडित वगैरे आहेत का?' मी विचारले. ' हो. पंडितच आहेत आणि तुझ्यासारखेच विक्षिप्त पण. अतिशय वाचनप्रेमी माणूस. सरकारच्या ज्ञानकोश प्रकल्पात होते. बायको वारली अचानक. मग सगळे गुंडाळून इथे कुंडलपूरसारख्या शांत गावात आमच्या कॉलनीत बंगला बांधून राहिलेत. पुष्कळ उपद्व्याप करतात. याज्ञिकी करतात, भविष्य सांगतात, मुलांना शिकवतात. पण सगळ्यात आवडता छंद म्हणजे वाद घालणे. त्याला कंटाळून कुणी फार बोलत नाही त्यांच्याशी. गंमत म्हणजे त्यांची मुलगी पौर्णिमा मात्र वडिलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाची बघ. अगदी शांत आणि मितभाषी. तू अण्णाशास्त्रींकडे जा. तुमच्या दोघांची वाद घालायची खुमखुमी पूर्ण होईल.' मला काय तेच हवे होते. अण्णाशास्त्री ज्योतिषी काय! बघतोच बच्चंजी. माझा तर या कुडमुड्यांवर भलताच राग. खोटारडे कुठले? ज्योतिषाला शास्त्र म्हणतात लेकाचे आणि लोकांना फसवतात. मग एका रम्य दुपारी मी अण्णाशास्त्रींकडे गेलो. ते काहीतरी वाचत होते. मी माझी ओळख करुन दिली. काही प्राथमिक गप्पा झाल्यावर मी थेट विषयाला हात घातला, 'ज्योतिष हे शास्त्र नसताना तुम्ही लोकांची फसवणूक का करता?' त्यावर अण्णाशास्त्री म्हणाले, ' कशावरुन तुम्ही असे म्हणता?' मी म्हटलो, 'आता हेच बघा ना. तुमचे राहू आणि केतू हे ग्रह म्हणजे खरं तर क्रांतिवृत्तावरचे दोन काल्पनिक छेदनबिंदू असताना तुम्ही त्याला छायाग्रह मानता आणि लोकांची भविष्येही वर्तवता. याला काय शास्त्र म्हणायचे?' त्यावर अण्णाशास्त्री उसळून म्हणाले, ' असले प्रश्न विचारणारे बरेच बघितलेत मी. मला सांगा तुमचा साध्या पंचांगाचा तरी अभ्यास आहे का?' तिथी-वार-नक्षत्र-राशी-नाडी-योग-करण हे सगळे ठाऊक आहे का तुम्हाला?' त्यावर मग मी पेटलोच. आमचा घमासान वाद झाला. बाहेरुन बघणार्‍याला वाटले असते, की या घरात तुंबळ युद्धच चालू आहे. आमचे भांडण रंगात आले असताना अचानक बेल वाजली. अण्णाशास्त्रींनी दार उघडले आणि त्यांची मुलगी पौर्णिमा आत आली. तिला बघताच माझा श्वासच अडकला. काय झालं ते कळलंच नाही. मी एकदम स्तब्ध झालो. पौर्णिमेने एकंदर रागरंग पाहिला आणि चहा करायला किचनकडे वळली. ती जाताच अण्णाशास्त्री माझ्याकडे बघून म्हणाले, ' तर कुठपर्यंत आलो होतो आपण? हं तर अमावस्येचे तीन महत्त्वाचे प्रकार. दर्श, सिनिवाली आणि कुहू. तसे पौर्णिमेचे प्रकार नाहीत. वर्षातल्या सगळ्या पौर्णिमा महत्त्वाच्या. त्यातल्या काही चांगल्या तर काही वाईट. त्यांचे महत्त्व ग्रहांच्या अंशात्मक योगांवर ठरते.' 'मला तर पौर्णिमा कधीच वाईट दिसत नाही.' मी म्हटलो, 'खरं सांगू का? चंद्रमा मनसो जातः म्हणजे चंद्र हा मनाचा कारक असतो. म्हणूनच पौणिमा जवळ आली, की मनातल्या भावना उचंबळून येतात.' हे वाक्य म्हणायला आणि पौर्णिमा चहाचे कप घेऊन यायला एकच गाठ पडली. माझे शब्द ऐकताच तिने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि कप समोर ठेऊन गोरीमोरी होत ती अंतर्धान पावली. संध्याकाळी मी मावशीला विचारले, 'मावशी! अण्णाशास्त्रींची मुलगी काय करते गं? लग्न नाही का झाले तिचे?' त्यावर मावशी म्हणाली, ' का रे? आवडली काय तुला? अरे पण तिचे जमणे कठीण आहे. तिच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे म्हणे. स्वतः अण्णाशास्त्रींनीच मला सांगितले. मी एकदा पौर्णिमेच्या लग्नाबद्दल विचारले होते त्यांना, पण या कारणावरुन ते बघत नाहीयेत तिचे. पण मुलगी एकदम लाखमोलाची आहे हो. घरकामात एकदम प्रवीण. जाईल ते घर उजळवून सोडेल. बिच्चारीचे या पत्रिकेतल्या मंगळाने जमत नाही.' दुसर्‍या दिवशी मी घरी परत जायला निघालो. पोचवायला आलेल्या मावशीला एवढंच म्हणालो, 'मावशी! पौर्णिमा मला आवडली. अण्णाशास्त्रींना सांग तिच्या पत्रिकेतील कडक मंगळ मीच आहे. जामातो दशमो ग्रहः आणि तोच जास्त प्रबळ.' विचारुन कळव. आठ-दहा दिवसांत मावशीचे घरी पत्र आले. पुढं काय झालं हे ओळखायला तुम्ही लोक चाणाक्ष आहातच. तर सांगायचा मुद्दा हाच, की 'पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन'
लेखनप्रकार

याद्या 6440
प्रतिक्रिया 38

कथेच्या निमित्ताने ही ज्योतिषावर घसरण्याची संधी आपण सोडत नाहीत अस दिसत. बाकी पोर्णिमेच्या नशीबी अमावास्या आली हे मात्र खर.........................

In reply to by ईश आपटे

>>>> कथेच्या निमित्ताने ही ज्योतिषावर घसरण्याची संधी आपण सोडत नाहीत अस दिसत मलाही थोडं थोडं तस्सचं वाटतंय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.... पण त्या ज्योतिषावर असले मस्त घसरला आहात की प्रत्यक्ष त्याच्या व्यावसायिकांनीही आवडीने मान डोलावलीये. लई भारी गोष्ट. मला तर आवल्डीय. :-)

आपला तर पौर्णिमाच काय आमावस्येवरही विश्वास नाही. ज्या चंद्रामुळे हे आकाशनाट्य घडतं त्याची पृथ्वीला कधीच न दिसणारी बाजू फारच चप्पट आहे म्हणे! बाकी कथा छान जुळवलीय!

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

ज्या चंद्रामुळे हे आकाशनाट्य घडतं त्याची पृथ्वीला कधीच न दिसणारी बाजू फारच चप्पट आहे म्हणे!
तुम्ही आणि मी एकाच चंद्राबद्दल बोलत असू तर न दिसणारी बाजू चप्पट नाहीये. उलट पृथ्वीचं संरक्षण नसल्यामुळे त्या बाजूला फारच खड्डे आहेत आणि गुरूत्वाकर्षण कमी असल्यामुळे थोडी फुगीरही आहे. विकीपिडीयावरून घेतलेल्या या दोन चित्रांवरून हे थोडं समजेल.
डावीकडे चंद्राची आपल्या बाजूला असणारी बाजू आणि लांबची बाजू उजव्या बाजूला.

चुरचुरीत कथा एकदम आवडेश.

काय मस्त कथा आहे. यखांदा मराठी पिच्चर बी व्हईन याच्याव. बेळगावच्या ज्योतिषाचार्य सुंठणकरांनी विवाहमंगळाची अनावश्यकता हे पुस्तक अस खरमरीत लिहिलय. मंगळाची दहशत वाचा इथे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिहायला आलो होतो. बिकाने आधीच टंकला. आता बिका आमचे प्रतिसाद कसे काय चोरतो हे शोधण्यासाठी आमची कुंडली घाटपांडेकडे पाठवण्यात येत आहे.

पंचमSद्वे लग्नगतो, भौमेSरिष्टं करोति वै | धनहानिरर्द्वादशेSद्वे, धनस्थश्र्व महीसुतः ||१|| वाचला बिचारा जर शनि मंगळ युती द्वितीय स्थानात असती तर?
कुंडलीतील व्दितीयस्थान म्हणाजे धनस्थानांतील मंगळ हा “धनगे कदही” म्हणजे हलक्या अन्नाचा आहार करण्यचा त्या जातकास लावतो. अर्थात् त्यास दारिद्र्यांत ठेवतो, ह्या स्थानातील मंगळ हा त्या जातकाचे दांत फ़ार वाईट अवस्थेत असतात. हा जातक धातूंचा धंदा करणारा, कर्ज काढणारा, जुगार खेळणारा, सह्नशील, शेतकी करणारा व पराक्रम गाजविण्याची फ़ार आवड ठेवणारा असतो. मेषेत असेल तर रक्त वस्तूंपासून , वृषेभेत असेल तर सुवर्णापासून, मिथुनेत चांगल्य वर्णाच्या लोकांअकडून, कर्केत स्वधर्माच्या धंद्यात, सिहेत वाईट आचणाने, कन्येत कर्ज घेऊन, तुलेंत देशत्याग करुन म्हणजे परदेशांत गेल्याने, वृश्चिकेत मित्र व भागीदारांच्या साह्यांने, धनेत बंधुवर्गाच्या वचनापासून, मकरेत गुरुदेवतांच्या आराधनेने, कुंभेत हीन कर्माने व मीनेंत स्वजनाशी वैरभाव ठेवल्याने त्या जातकास धनप्राप्ती होत असते ह्या स्थानातील मंगळ उच्च किंवा स्वगृही असेल तर त्यास चांगला लाभ होतो तो निच असेल तर नुकसान मात्र फ़ार होते या मंगळामुळे त्यास निर्धनत्व दृष्टांचा आश्रयी दयाहीन व कृपण बनावे लागते जातक फ़ार वादशील असतो. धूत खेळणारा व कृशांग राहातो, जातकास मुखपीडा व नेत्रपीडा होत असतेबातील मंडळीकडून सुख-दु:ख विद्येत बक्षिसे, दातृत्व उदारपणा, बायोकांच्या कुंडलीत नव-य़ाचा मुत्यू विधुरावस्था, सौभाग्ययोग, भागीदार व शत्रू यांचा मृत्यू पूर्वर्जित धन गोधन्ब, मृत्युदायक प्रसंग ,भाऊ बंदकीचे वैर, पित्याची विद्या, डावा डोळा, सुवर्णरत्नदिकांची प्राप्ती, द्रव्यसंग्रह किंवा खार्चिक वाणीतील दोष तोतरेपणा वगैरे, आवाज मुलांच्या सासवा ( विहिणी ) संस्कार, शेअर्स गहाणखत, उन्नती किवा यांचा अमंल मान गळा यावर असतो. कुंडलीतील व्दितीय स्थानात कृत्तिका, रोहिणी मृग ही नक्षत्रे येतात त्या नक्षत्राचे अमंल ह्या मंगळ शनि युतीवर असते . कृतिकेचा मंगळ रोहिणीचा चंद्र, मृगशिर्षेचा मंगळ ह्याचा अंमल कालपुरुषाच्या कुंडलीत होत असतो नुसती युती असून जातकाचे भविष्य सांगता येत नाही ह्या साठी आपण जर जोतिषी असाल किंवा अधिका माहिती आपणास हवी असेल तर आपण रविवारी खालील पत्यावर येऊन प्रत्यक्ष भेटावे ही विनंती मिसळपाव सोबत एक कच्छी बिअर आण्यास विसरु नका..
    >

ही एक हलकीफुलकी विनोदी कथा असल्याने तिच्यातून बाकी अर्थ शोधत बसू नये, असा डिस्क्लेमर टाकायला हवा होता, असे क्षणभर वाटून गेले. मात्र इश आपटे यांची प्रतिक्रिया वगळता इतरांनी कथेतील गंमत एन्जॉय केल्याचे जाणवले. असो, सर्वांचे आभार. :) @ शुचिताई - आपल्याकडे लक्ष्मी अमावस्येला येते, असे मानले जाते. त्यामुळे दर्श, सिनिवाली व कुहू ही लक्ष्मीची नावे असली तरी तीच अमावस्यांना दिली असावीत, असे वाटते. पण अमावस्यांचे हे तीन प्रकार महत्त्वाचे मानले जातात, हे मी पूर्वी वाचले होते. कथेतील संवाद खुलवण्यासाठी तो संदर्भ वापरला आहे.

हलकीफुलकी विनोदी कथा सुंदर लिहिलित ... एकदम आवडली ..

योगप्रभू, या विश्वामित्राचा तपोभंग करणारी ही घटना सत्यकथा आहे का? अवांतर: या शास्त्रींचा पत्ता देता का जरा.... नाही म्हणजे आम्हालाही वाद घालायची सवय आहे, दुसरा भिडू हवा होता बाकी काही नाही.

In reply to by रमताराम

हेच म्हणतो, ररांना सोबत म्हणुन मी ही जातो त्यांच्याबरोबर. बाय द वे, (सत्य(जर असलीच तर))कथा आवडली :) - छोटा डॉन

In reply to by रमताराम

जगाच्या पाठीवर असे घडलेले असूही शकेल. पण ही आत्मकथा मात्र नाही रमताराम. आमच्या आयुष्यात प्रेम संध्याकाळच्या चोरपावलांनी आणि नाजूकसाजूक असं काही आलं नाही. उलट ते चांगलं वाजतगाजत आणि सध्याच्या मुलींना नावडणार्‍या (दाखवणे, चहापोहे, पत्रिका जुळवणे) अशा प्रथा मिरवत आलं. लोक प्रेमविवाह करतात. मी आधी विवाह केला आणि नंतर प्रेम. :)

In reply to by योगप्रभू

आमचा अपेक्षाभंगच केलात हो. अरेन्ज्ड म्यारेज म्हणजे अगदीच 'डाउनमार्केट' हो (बघा आम्ही सुद्धा ट्रेंडी शब्द वापरू शकतो, 'ओल्ड फ्याशन' न म्हणता डाउनमार्केट म्हटलं आम्ही.) जगाच्या पाठीवर असे घडलेले असूही शकेल. पण ही आत्मकथा मात्र नाही रमताराम. (स्वगतः अरे वा, म्हणजे अजून पौर्णिमा सिंगलच आहे तर.) पत्ता पाठवायचा विसरू नका बरं का.

In reply to by रमताराम

रमताराम, पौर्णिमा एकुलती एक मुलगी आहे बरं! नाही म्हणजे थोडं भान ठेवा, आजूबाजूच्या धाग्यांचं! ;-) मागच्या प्रतिसादात लिहायचं राहिलंच, योऽ योगप्रभू, कथा आवडली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्ही मॉडर्न (निर्लज्ज) म्हातारे असल्याने आपली घरजावई व्हायची तयारी आहे, स्वैपाक करायची पण. साला कमावत बसण्याची कटकट जात असेल तर आपली काSही हरकत नाही. वर चांगला निवांत ठिकाणी सासर्‍याचा बंगला, म्हातारपणी अजून काय हवे असते, सांगा बरं. फक्त त्या पौर्णिमेला अवघे पाउणशे वयमान असलेला आमच्यासारखा 'म्हातारा न इतुका' चालत असेल तर प्रश्न मिटला, क्काय? आणि हो, मंगळापेक्षा शनि स्ट्राँग असतो म्हणतात त्यामु़ळे त्या मंगळाबिंगळाची भीती आम्हाला नाही.

In reply to by रमताराम

योगप्रभूंची ही कथा सुरुवातीला मला पण आत्मकथाच वाटली होती. त्यांनी ज्या नाजूक सौंदर्याने कथा सजवली आहे त्याला हे श्रेय जात असावं. आजून सुंदर कथा येऊ द्यात.

In reply to by योगप्रभू

कथा आवडली. खरंतर कथा वाचून योगप्रभू, जे आम्हाला पूर्वी आजोबा असतील असे वाटत होते, तरूण आहेत हे कळून थोडं आनंदमिश्रित आश्चर्य झालं होतं ते या प्रतिसादाने अगदी आमावस्येच्या चंद्रासारखं नाहीसं झालं. ;-)

In reply to by Nile

निले आणि सर्व मिपाकरांनी मला योगप्रभू एकेरी नावाने संबोधावे, अशी णम्र विनंती. :) या नावाची फोड केली तर 'योग' आणि 'प्रभू' हे दोन्ही शब्द कायम एकेरीच उच्चारले जातात. तो योग, योगाचा वर्ग, योगी पावन मनाचा वगैरे आणि तो प्रभू, प्रभू तू दयाळू, प्रभु अजि गमला, ही प्रभूची दया वगैरे.

लै आवल्डी!! प्रभू, >>बाकी पोर्णिमेच्या नशीबी अमावास्या आली हे मात्र खर......................... या ईश आपटेंच्या प्रतिसादातली गमंत लक्षात आली नाही वाटतं?

In reply to by पैसा

माझा गैरसमज झाला असल्यास ईश आपटेंकडे दिलगिरी व्यक्त करतो. आपटेंनी त्यांच्या काशीयात्रेचा दुसरा भाग तातडीने लिहावा, अशी विनंती.. :)