✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महिमा अंगठीचा

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
Fri, 08/05/2011 - 11:11  ·  लेख
लेख
मला ओळखणार्‍या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय. त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय. त्यातही सुरूवातीला माझा शरीराला छेद पाडून वापरल्या जाणार्‍या दागिन्यांना जास्त विरोध होता; पण एका घटनेने माझा अंगठीच्या वापराला असलेला विरोध देखील तितकाच तीव्र झाला. १९९८ साली माझ्या एका शेजार्‍याला घेऊन मी इस्पितळात गेलो असता तिथे टेल्को चा एक अभियंता उपचाराकरिता आलेला मला दिसला. त्याच्या हाताच्या बोटांवर अवजड वस्तू पडून गंभीर दुखापत झाली होती. डॊक्टरांना पुढील उपचार / क्ष-किरण तपासणी या करिता त्याच्या बोटात असलेली अंगठी काढणे गरजेचे होते पण बोटात ज्या भागावर अंगठी होती त्याच्या पुढच्या भागावरच गंभीर जखम झाली होती. आता ती घट्ट बसलेली अंगठी (अंगठी सर्वसाधारणपणे घट्ट बसणारीच असते अन्यथा ती कधीही बोटातून निसटून पडू शकते) काढायची तर त्या दुखापत झालेल्या भागाला घासूनच काढावी लागणार म्हणजे पुन्हा असह्य वेदनांना सामोरे जाणे आले. शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, “तो क्या अब आप इनकी उंगली काट डालेंगे?” तेव्हा माझ्या कडे आश्चर्याने पाहत ती उत्तरली, “नही, उंगली नही, इनकी अंगुठी काट देंगे.” पण बोट कापणे ज्यांना शक्य आहे असे इस्पितळातले विशारदही अंगठी कापू शकत नाहीत, त्याकरिता मग दागिन्याच्या दुकानातून कारागिरास पाचारण करण्यात आले आणि त्या रूग्णाच्या पुढील उपचारांना अजूनच विलंब झाला. त्यानंतर माझ्या डोक्यात अंगठी चा वापर एकदम निषिद्ध हा विचार पक्का रूजला. मग आता लेखाचे शीर्षक अशा पद्धतीने देण्याचे मला कारण तरी काय असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल तर त्याचे स्पष्टीकरण असे की लेखाच्या शीर्षकात वापरलेला अंगठी हा शब्द प्रतीकात्मक आहे. आपल्या सर्वांना अल्लाउद्दीन आणि त्याच्या जादुई दिव्याची गोष्ट ठाऊक असेलच. या गोष्टीतील हा जादुई दिवा मूळात अल्लाउद्दीनच्या मालकीचा नसतो तर त्याचा काका म्हणवून घेणारा एक जण (जो या कथेचा खलनायक आहे) त्याला आपल्या सोबत घेऊन जातो आणि एका अंधार्‍या तळघरातून मोठा धोका पत्करून हा दिवा शोधून आणण्याचे काम अल्लाउद्दीनवर सोपवितो. अल्लाउद्दीनला या कार्यासाठी तळघरात पाठविण्यापुर्वी हा त्याचा तथाकथित काका त्याच्या बोटात एक अंगठी चढवतो. ह्या अंगठीत देखील दिव्याप्रमाणेच घासल्यावर आज्ञाधारक राक्षसाला प्रकट करण्याचा गुण असतो. फक्त दिव्याच्या तूलनेत या अंगठीच्या राक्षसाच्या काही मर्यादा असतात व क्षमता कमी असते. ही अंगठी अल्लाउद्दीनला तात्पुरत्या स्वरूपात तळघरातील मोहिमेत काही अडचण आल्यास मदतीकरिता दिली गेलेली असते. नंतर जेव्हा अल्लाउद्दीन दिवा मिळवितो तेव्हा हा काका म्हणविणारा इसम लबाड असल्याचे त्याला कळते व तो दिवा त्याला द्यायचे नाकारतो आणि स्वत:साठीच त्या दिव्याचा वापर करतो. मालकाच्या इच्छापूर्तीबाबत दिव्याच्या राक्षसाची क्षमता प्रचंड असल्यामुळे पुढे दिव्याचाच वापर मोठ्या प्रमाणात केला गेल्याचा कथेत उल्लेख येत राहतो. त्यासोबतच खलनायकाचे दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि नायकाने खलनायकापासून दिव्याची केलेली जपणूक या बाबीही कथानकाच्या प्रवासात पुढे वाचकांच्या समोर येत राहतात. पुढे एका प्रसंगी खलनायक अल्लाउद्दीनचा हा जादुई दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यात यशस्वी होतो. आता अल्लाउद्दीनचे कसे होणार या काळजीत पडलेला वाचकदेखील नायक व खलनायकासोबत एव्हाना अंगठीला विसरलेला असला तरी लेखक मात्र तिला ध्यानात ठेवून असतो आणि ही योग्य संधी साधून पुन्हा ती लोकांच्या नजरेत आणून देतो. त्याचे असे होते की, दिवा नाहीसा झाल्यामुळे हताश झालेला अल्लाउद्दीन हातावर हात चोळत बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडून नकळत बोटातील अंगठी घासली जाऊन त्यातून राक्षस प्रकट होतो. अल्लाउद्दीनला कळतच नाही की दिवा हरवला असला तरी आता राक्षस कुठून आला ते. मग राक्षस त्याला आपण अंगठीच्या मालकाचे गुलाम असल्याचे सांगतो. तेव्हा अल्लाउद्दीन त्याला प्रथम दिवा आणून देण्यास फर्मावतो. राक्षस त्याला दिव्याची ताकद अंगठीहून मोठी असल्याने तसे शक्य नसल्याचे समजावतो पण त्याचसोबत इतर लहान मोठी मदत करण्याचे आश्वासन देतो. पुढे ह्या अंगठीच्या राक्षसाचे मर्यादित सहकार्य आणि अल्लाउद्दीनचे बुद्धिचातुर्य ह्या दोहोंच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळून दिवा पुन्हा अल्लाउद्दीन च्या ताब्यात येतो. या कथेत अंगठी दिव्यापेक्षा कमी क्षमतेची असल्याचे दाखविली गेले असले तरी दिवा पुन्हा मिळविण्यासाठी या अंगठीची मदत मोलाची ठरल्याचे वाचकांच्या लक्षात येते. या गोष्टीत उल्लेख केलेल्या अंगठीसारखी किमान एक तरी अंगठी आपल्यापैकी प्रत्येकाकडे असते आणि ती म्हणजे आपल्यापाशी असलेले दुय्यम कौशल्य. एक मुख्य कौशल्य आपल्याकडे असते ज्याच्या बळावर आपण आपला चरितार्थ चालवित असतो जसे डॊक्टर, इंजिनीयर, वकील, इत्यादी. त्याशिवाय आपणापाशी अजुनही एखादे कौशल्य असू शकते की ज्याचा आपण व्यावसायिक वापर करीत नसलो तरी तो आपला छंद असू शकतो जसे गायन, वादन, लेखन, चित्ररेखाटन, इत्यादी. अल्लाउद्दीनचा दिवा त्याच्या ताब्यातून नाहीसा झाला तसे पुढे आयुष्यात काही कारणाने आपल्याला आपल्या मुख्य कौशल्यास बाजूला ठेवावे लागले (म्हणजे पगारदारांना सक्तीची/स्वेच्छा निवृत्ती आणि व्यावसायिकांना अपयश इत्यादींमुळे) तरी आपले हे दुय्यम कौशल्य अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील अंगठीप्रमाणे आपल्या मदतीला धावून येऊ शकते आणि उत्पन्नाचे साधन देखील ठरू शकते. क्वचित प्रसंगी आपल्या मूळ व्यावसायिक कौशल्यापेक्षा ह्या छंदामुळेच आपल्याला जास्त पैसा, प्रसिद्धी व समाधान मिळू शकते. देशातील सर्वात मोठे महाकाव्य समजले जाणार्‍या महाभारतात देखील पांडवांना जेव्हा बारा वर्षे वनवास व एक वर्ष विजनवास भोगावा लागला तेव्हा पांडवांनी आपल्या दुय्यम कौशल्यांच्या जोरावर ते एक वर्ष विराट राजाच्या पदरी व्यतीत केले. गदायुद्धात प्रवीण असलेला भीम त्याच्या भोजनप्रेमामुळेच चांगला आचारी देखील होता व बल्लवाच्या रूपात त्याने ते सिद्ध करून दाखविले तर सौंदर्यसम्राज्ञी द्रौपदी सौंदर्योपचारांविषयी ज्ञान असल्यामुळे त्या काळातील सुदेष्णा राणीची ब्युटीशिअन म्हणून सैरंध्री या नावाने यशस्वीपणे वावरली. भालाफेकीत कुशल असलेल्या युधिष्ठिराने आपण शकुनीच्या कपटामुळे हरलो असलो तरी द्युतातील कौशल्य अंगी असल्याचे दाखवून दिले आणि धनुर्धारी अर्जुनाने नृत्याच्या स्टेप्समध्येही आपला नेम चूकत नसल्याचेच राजकुमारी उत्तरेचा नृत्य शिक्षक म्हणून वावरताना बृहन्नडेच्या रूपात सिद्ध केले. पौराणिक कथांना बाजुला ठेवले तरी चालु काळातही मोहन आगाशे, गिरीश ओक व श्रीराम लागू यांच्यासारख्या लोकांनी वैद्यकीय व्यवसायापेक्षाही अभिनयातून नेत्रदीपक यश कमावल्याचे आपणांस दिसून येते. यापैकी श्रीराम लागू यांना तर ऎनासिनच्या जाहिरातीत काम केल्यामुळे वैद्यकीय व्यवसायापासून त्यांच्या संघटनेने वंचित केले आहे तरी त्यांच्या चरितार्थावर यामुळे फरक पडलाच नाही. सलील अंकोला ह्या क्रिकेटपटूला त्याच्या दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी त्याने अभिनयाद्वारे दूरदर्शनमालिकांमध्ये स्वत:चे बस्तान बसविले. बॆरिस्टर जीना व जवाहरलाल नेहरू हे राजकारणाइतकेच वकिलीत देखील यशस्वी ठरले. हल्लीचे अनेक राजकारणी सुद्धा वकिली व्यवसायातील पदवीधर असतात. कधी कधी तर एखाद्या व्यक्तिकडे इतकी कौशल्ये असतात आणि सगळीच इतकी महत्वाची असतात की कशाला दुय्यम म्हणावे हा प्रश्नच पडतो. गायक / अभिनेता म्हणून परिचित असलेले स्व. श्री. किशोरकुमार हे तितकेच उत्तम गीतकार, संगीतकार, लेखक व दिग्दर्शकही होते. अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ असलेले डॊ. ए.पी.जे अब्दुल कलाम जगभर ओळखले गेले ते भारताचे राष्ट्रपती झाल्यावर. त्या पदावरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी आपली ओळख एक विद्वान प्राध्यापकाच्या रूपात जगापुढे ठेवलीय. ह्या लोकांपाशी एकाहून अधिक अंगठ्या असल्यामुळे ह्यांना आयुष्यात कधीही ’पुढे काय?’ अशी विवंचना सतावणार नाही हे नक्की. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी ह्या प्रतीकात्मक अंगठीचा एवढा महिमा जाणून घेतल्यावर निदान एकतरी अंगठी बाळगायला (खरं म्हणजे ओळखायला कारण आपल्याकडे ती असतेच पण आपण तिच्याकडे लक्ष देत नाही) हवीच, कोणास ठाऊक दिवा कधी हातातून निसटेल तेव्हा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घट्ट बसलेली अंगठीच मदतीला धावून येईल ना?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
26173 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

शेवटी तिथली परिचारिका

५० फक्त
Fri, 08/05/2011 - 11:36 नवीन
शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, - मला वाट्लं तुम्ही म्हणालात, ' तो अब तक क्या पाळणेंमें झोपव्या था क्या पेशेंट को ? ''कोणास ठाऊक दिवा कधी हातातून निसटेल तेव्हा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घट्ट बसलेली अंगठीच मदतीला धावून येईल न'''' - हेच स्टेटमेंट् मराठी संस्थळं / डु आय्डि / उधारी खातं असणारे बार/ क्रेडिट कार्ड यांना सुद्धा किती फिट बसतं ना.
  • Log in or register to post comments

"पायातील पैंजण / जोडवे " या

वपाडाव
Fri, 08/05/2011 - 11:43 नवीन
"पायातील पैंजण / जोडवे " या विषयावर लेख पाडायला कुणी लेडी तयार हय का?
  • Log in or register to post comments

लेख आवडला. सुरुवातीला जरा

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 08/05/2011 - 11:47 नवीन
लेख आवडला. सुरुवातीला जरा मुद्दा कळत नव्हता, पण नंतर चा भाग आवडला.
  • Log in or register to post comments

प्रशंसायुक्त प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:49 नवीन
@ विश्वनाथ मेहेंदळे, << लेख आवडला. सुरुवातीला जरा मुद्दा कळत नव्हता, पण नंतर चा भाग आवडला. >> शीर्षकावरून किंवा सुरुवातीच्या परिच्छेदांवरून नेमका काय मुद्दा मांडायचा आहे याचा अंदाज येऊ शकणार नाही अशा पद्धतीचे लिखाण करायला मला विशेषत्वाने आवडते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तरीही

प्रदीप
Fri, 08/05/2011 - 19:41 नवीन
विश्वनाथ ह्यांच्याशी मीही सहमत आहे. सुरूवातीस लेख थोडा भरकटल्यासारखा वाटतो आहे (meandering). पण पुढे तो मुद्द्यावर आला आहे. विषय, भाषाशैली व मांडणी (सुरूवातीचा स्वतःविषयीचा भाग व एका रूग्णाईताच्या अंगठीचा भाग सोडल्यास) छान आहे., लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तशी गरज होती

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 20:13 नवीन
@ प्रदीप << सुरूवातीस लेख थोडा भरकटल्यासारखा वाटतो आहे (meandering). >> << सुरूवातीचा स्वतःविषयीचा भाग व एका रूग्णाईताच्या अंगठीचा भाग सोडल्यास >> सदर लेखन हे एका जाहीर सभेतील भाषणाच्या उद्दिष्टाने केले गेले होते. त्या ठिकाणी मला ओळखणारे अनेक जण होते. मी निरीश्वरवादी (या विषयावर त्यांच्यासमोर यापूर्वीच भाषणे केली असल्याने) असल्याचे त्यांना ठाऊक असल्याने इतक्या किमान प्रास्ताविकाची गरज होतीच. << विषय, भाषाशैली व मांडणी छान आहे., लेख आवडला >> धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

समजले

प्रदीप
Sat, 08/06/2011 - 07:26 नवीन
तुमचा संदर्भ आता लक्षात आला. तरीही इथे तो लेख प्रसिद्ध करतांना ते दोन्ही भाग काढले असते तर लेख अजून चांगला झाला असता असे मला वाटते. लेख व्यक्तिगत बाबींवर नसल्यास त्यात लेखकाने स्वतःविषयी कसलीही बरीवाईट टिपण्णी करणे मलातरी अनावश्यक वाटते. तसेच इस्पितळातील एका रूग्णाच्या अंगठीची कहाणी इथे सर्वस्वी distracting वाटली. स्वतःविषयीची टिपण्णी आल्याने अनेकांना तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचे आयते साधन मिळते. आणि त्या इस्पितळातील घटनेच्या उल्लेखाने तर इतके डिस्ट्रॅक्शन झाले आहे की अनेक प्रतिसाद त्यातच गुंतून पडले आहेत. शक्य आहे, तसे लिहीणार्‍यांनी लेखाचा पुढील व मुख्य, महत्वाचा भाग वाचलाच नसावा. असो, ही माझी मते झाली. तुमचे लेख ह्यापुढे आवर्जून वाचत राहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

त्यातही आनंदच आहे.

चेतन सुभाष गुगळे
Sat, 08/06/2011 - 08:19 नवीन
<< तुमचा संदर्भ आता लक्षात आला. तरीही इथे तो लेख प्रसिद्ध करतांना ते दोन्ही भाग काढले असते तर लेख अजून चांगला झाला असता असे मला वाटते. >> हा लेख अपूर्णावस्थेत प्रकाशित करावा असे मला तरी ठीक वाटले नाही. या शिवाय हा लेख यापूर्वीही इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आहेच. तिथे त्यात संपादकांनी देखील कुठली काटछाट केलेली नाहीय. हे पाहा. http://mfdiwaliank.blogspot.com/2010/10/mahima-angthicha.html << लेख व्यक्तिगत बाबींवर नसल्यास त्यात लेखकाने स्वतःविषयी कसलीही बरीवाईट टिपण्णी करणे मलातरी अनावश्यक वाटते. तसेच इस्पितळातील एका रूग्णाच्या अंगठीची कहाणी इथे सर्वस्वी distracting वाटली. >> बोटात अंगठी परिधान केल्यास आपत्तीच्या वेळी कुठल्या अडचणी येऊ शकतात हे देखील इथे मांडणे मला तरी गरजेचे वाटते. << स्वतःविषयीची टिपण्णी आल्याने अनेकांना तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचे आयते साधन मिळते. >> वैयक्तिक हल्ला करायची इच्छा असल्यास करणारे कुठल्याही कारणाने आणि कुठेही करू शकतात. हे पाहा इथे तर एकाने त्याकरिता स्वतंत्र धागा काढला आहे. http://www.misalpav.com/node/18720 त्यात त्यांना आनंद वाटत असल्यास तो आनंद त्यांच्यापासून हिरावून घेण्याची माझी इच्छा नाही. Let them enjoy. इथे थोडीच कुणा जाणकार समीक्षकांकडून माझ्या लेखनाची चिरफाड होतेय? कुणा काल्पनिक नाव धारण करणार्‍या व्यक्तिने माझ्या लेखनाची आणि अगदी वैयक्तिक माझी निंदा केली तरी त्याची फिकीर मी का करावी? त्यांच्या संकेतस्थळावरील ओळखीप्रमाणेच त्यांनी केलेली माझी निंदाही तितकीच काल्पनिक समजून सोडून द्यावी असे मला वाटते. अर्थात त्यातील मजकूर वाचून माझी बर्‍यापैकी करमणूक होते हा भाग निराळा. त्याकरिता त्यांचेही आभारच मानायला हवेत. << तुमचे लेख ह्यापुढे आवर्जून वाचत राहीन.>> धन्यवाद प्रदीप. माझे लेखन वाचून आपली निराशा होणार नाही याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

>>बोटात अंगठी परिधान केल्यास

अन्या दातार
Sat, 08/06/2011 - 10:56 नवीन
>>बोटात अंगठी परिधान केल्यास आपत्तीच्या वेळी कुठल्या अडचणी येऊ शकतात हे देखील इथे मांडणे मला तरी गरजेचे वाटते. मग रस्ता क्रॉस करताना, गाडी चालवताना तसेच मराठी संस्थळावर लेख वाचताना कुठल्या आपत्ती येऊ शकतात हे देखील मांडा की राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

इथे मिपावर देखील प्रसिद्ध करा

इंटरनेटस्नेही
Sat, 08/06/2011 - 12:20 नवीन
सदर लेखन हे एका जाहीर सभेतील भाषणाच्या उद्दिष्टाने केले गेले होते.
क्या बात क्या बात.. गुगळे साहेब मग ते भाषण सारांश रुपाने इथे मिपावर देखील प्रसिद्ध करा की राव.. तेवढाच आम्हा पामरांचा फायदा! - आपला कृपाभिलाषी, इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

इथे मिपावर देखील प्रसिद्ध करा

इंटरनेटस्नेही
Sat, 08/06/2011 - 12:21 नवीन
सदर लेखन हे एका जाहीर सभेतील भाषणाच्या उद्दिष्टाने केले गेले होते.
क्या बात क्या बात.. गुगळे साहेब मग ते भाषण सारांश रुपाने इथे मिपावर देखील प्रसिद्ध करा की राव.. तेवढाच आम्हा पामरांचा फायदा! - आपला कृपाभिलाषी, इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अप्रतिम .. मस्तच जमलाय

स्पा
Fri, 08/05/2011 - 11:47 नवीन
अप्रतिम .. मस्तच जमलाय ... पटापट लिहा हो तुम्ही २ ३ दिवस एवढा मोठा gap घेऊ नका शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, “तो क्या अब आप इनकी उंगली काट डालेंगे?” तेव्हा माझ्या कडे आश्चर्याने पाहत ती उत्तरली, “नही, उंगली नही, इनकी अंगुठी काट देंगे.” तुमची विनोद बुद्धी पाहून मौज वाटली,हे अतिशय विनम्रतेने नेमूद करू इच्छितो असो और आनेदो
  • Log in or register to post comments

>>>२ ३ दिवस एवढा मोठा gap घेऊ

प्यारे१
Fri, 08/05/2011 - 12:04 नवीन
>>>२ ३ दिवस एवढा मोठा gap घेऊ नका अरे स्पावड्या हा गॅप त्यांनी का घेतला ते लिहिलंय की! पण फक्त प्रसादसाठी हो...!!! आपण फक्त वाचायचं ;) http://www.misalpav.com/node/18666#comment-327912
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ती विनोदबुद्धी नव्हे

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 12:18 नवीन
@प्रसन्न आपटे, रोज अनेक कल्पना सूचत असल्या तरी कित्येक दिवसांत नव्याने लेखन केलेले नाहीय. हे जुनेच लेखन प्रसिद्ध करत आहे. प्रतिक्रिया वाचून त्यांना प्रत्युत्तरे देण्यात वेळ जात असल्याने लेखन प्रकाशित करण्यात वेळ लागत आहे. परिचारिकेशी बोलताना विनोदबुद्धीने बोललोच नाही. हाड, मांस, लोंबणारी कातडी आणि रक्ताने माखलेले ते बोट पाहून अतिशय यातना होत होत्या. अशावेळी विनोद सूचणे कसे काय शक्य आहे? मला खरंच असे वाटले की काही वेळात हे बोट निकामी झाले तर इथला जंतूसंसर्ग इतर भागात पसरू नये म्हणून हे बोट कापले जाईल की काय? बाकी लेख आपल्याला आवडल्याचे आपण नमूद केले, त्याबद्दल आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

या ..........अंगठीत लपलय काय?

पियुशा
Fri, 08/05/2011 - 11:48 नवीन
या ..........अंगठीत लपलय काय? ,लपलय काय? हे मराठी गाण आठवल, अन हसुन हसुन पुरेवाट झालिये ;) @ व .प्या. "पायातील पैंजण / जोडवे " या विषयावर लेख पाडायला कुणी लेडी तयार हय का? तु नेहमी दुसर्यानाच का बरे विडा ऊचलायला सान्गतोस? हा शिवधनुष्य तुच उचल की ;)
  • Log in or register to post comments

खुपच छान.......

वेताळ
Fri, 08/05/2011 - 11:59 नवीन
असेच एकदा हॉस्पिटलात माझ्या एका दोस्ताला अपघात झालेवर त्याची महागडी पँट फाडावी लागली पण मी अजुनही पँट वापरणे सोडले नाही.
  • Log in or register to post comments

मी हा प्रतिसाद वाचून गतप्राण

मी ऋचा
Fri, 08/05/2011 - 12:26 नवीन
मी हा प्रतिसाद वाचून गतप्राण झालेली आहे हे नम्रपणे नमूद करू ईच्छिते ;).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अर्र्र्र्र्र्र्र , माझी एक

५० फक्त
Fri, 08/05/2011 - 12:46 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र , माझी एक प्यार्टी गेली, तरी आता हेवनली बाव्डी झाल्याबद्दल अभिनंदन अवांतर - ७२.५६९८९६३३६५१%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

धन्यवाद! आणि अवांतरासाठी

मी ऋचा
Fri, 08/05/2011 - 14:31 नवीन
धन्यवाद! आणि अवांतरासाठी शाब्बास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

'वेताळा'च्या प्रतिसादाने

प्यारे१
Fri, 08/05/2011 - 12:50 नवीन
'वेताळा'च्या प्रतिसादाने ऑलरेडी गतप्राण झालेली ही प्रतिसाद खरडणारी ऋचा म्हणजे संत्राच्या झाडवाली 'हडळ' काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

आयला माझी "हिडन आय्डेंटीटी"

मी ऋचा
Fri, 08/05/2011 - 14:29 नवीन
आयला माझी "हिडन आय्डेंटीटी" उघड झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चांगला विषय मांडला

नितिन थत्ते
Fri, 08/05/2011 - 12:00 नवीन
चांगला विषय मांडला आहे. कौशल्ये अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात हे तर आहेच. त्याचबरोबर अशी काही कौशल्ये स्ट्रेस रिलीव्हर म्हणूनही कामास येतात. उदाहरणार्थ एखाद्याला चित्रकलेत गती असेल तर आत्यंतिक ताण आल्यावर चित्र काढण्यात मन रमवून तो ताण कमी करता येतो.
  • Log in or register to post comments

पूर्णत: सहमत.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 12:03 नवीन
<< त्याचबरोबर अशी काही कौशल्ये स्ट्रेस रिलीव्हर म्हणूनही कामास येतात. >> या विधानाशी पूर्णत: सहमत. धन्यवाद नितीन थत्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छान लेख

जाई.
Fri, 08/05/2011 - 13:45 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वा!

नगरीनिरंजन
Fri, 08/05/2011 - 12:19 नवीन
खूपच छान विचार आहेत. अडीअडचणीसाठी दुय्यम कौशल्य पाहिजेच! म्हणूनच मी नुकताच जिलब्या पाडायला शिकलो आहे... तुमचे लेखन ओघवते आणि सर्वस्पर्शी आहे हे नमूद केल्यावाचून राहवत नाही. वैचारिक लेखनाबरोबर थोडे करमणूकप्रधानही लिहावे ही विनंती. आता एक लेख महिमाची अंगठीवरही येऊ द्या.
  • Log in or register to post comments

साफ खपलोय.... =))=))=))=))

वपाडाव
Fri, 08/05/2011 - 12:51 नवीन
साफ खपलोय.... =))=))=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

करमणूकप्रधान लिखाण यापूर्वीच केले आहे.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:01 नवीन
@नगरीनिरंजन, << तुमचे लेखन ओघवते आणि सर्वस्पर्शी आहे >> या आपल्या प्रशंसोद्गाराबद्दल अत्यंत आभारी आहे. << वैचारिक लेखनाबरोबर थोडे करमणूकप्रधानही लिहावे >> तसे लिखाण मी यापूर्वीच केले आहे. आपण ते इथे वाचू शकता :- http://www.misalpav.com/node/18561 http://www.misalpav.com/node/18534 यापैकी चतुर्भुज या एकांकिकेचा दिनांक २७.०७.२०११ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग देखील झाला आहे. << आता एक लेख महिमाची अंगठीवरही येऊ द्या >> सदर लिंकद्वारे उघडणारे छायाचित्र छान आहे परंतू त्यासोबत दिलेली बातमी त्या अभिनेत्रीच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असल्याने त्यावर लेख लिहीणे मला ठीक वाटत नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>>तसे लिखाण मी यापूर्वीच

प्यारे१
Fri, 08/05/2011 - 13:23 नवीन
>>>तसे लिखाण मी यापूर्वीच केले आहे. आपण ते इथे वाचू शकता :-http://www.misalpav.com/node/18561 ही लिंक 'चेतनची शोकांतिका' या लेखावर उघडते. सदर लेख हा करमणूकप्रधान असल्याचा लेखकाच्या लिहिण्यातून आम्हाला समजले. आमची समज तोकडी पडली नव्हे तोकडीच असल्याचा आज आम्हाला साक्षात्कार झालेला आहे. हे भूमाते आम्हाला पोटात घे. >>>यापैकी चतुर्भुज या एकांकिकेचा दिनांक २७.०७.२०११ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग देखील झाला आहे. चतुर्भुज वाचायला सर्वसाधारण गतीने दहा मिनिटापेक्षा जास्त लागू नयेत. अभिनयासहित या सर्व सादरीकरणाच्या कृतीला २० मिनिटे लागतात असे समजू. प्रयोग कुठल्या कार्य्क्रमाच्या निमित्ताने झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

@ प्रशांत

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:35 नवीन
चेतनची शोकांतिका हा लेख "छोटा चेतन" या चित्रपटाशी संबंधित आहे. चित्रपटविषयक लेखन हे करमणूक प्रधानच मानले जाते. चतुर्भुज वाचण्यास १० मिनीटे लागतात या आपल्या विधानाशी सहमत नाही. साधारण ३५ मिनीटे लागतात असा आमचा अनुभव आहे. यावर वाद घालण्यात अर्थ नाही. सदर एकांकिकेचा प्रयोग "टाटा मोटर्स समाज कल्याण केंद्र - एकांकिका स्पर्धा" या अंतर्गत झाला. २७ जुलै रोजी आकुर्डी केंद्रातर्फे सहा कलाकारांमार्फत ही एकांकिका सादर करण्यात आली. या प्रयोगास ४५ मिनीटे एवढा वेळ लागला. याच दिवशी इतर तीन केंद्रांनीही त्यांच्या एकांकिका सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रम साडे तीन तासाचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

उत्तम आहे लेख. अवांतर: ह्या

किसन शिंदे
Fri, 08/05/2011 - 12:33 नवीन
उत्तम आहे लेख. अवांतर: ह्या लेखाची कल्पना तुम्हाला कुठे सुचली?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:16 नवीन
@किसन शिंदे, आपला आभारी आहे. एका दिवाळी अंकात मी लता मंगेशकरांची सविस्तर मुलाखत वाचली. त्यात त्यांना पानातून शेंदूर कालवून, जेवणात ब्लेडचे तुकडे घालून त्यांच्या स्वरयंत्राला इजा होईल असा डाव काहींनी रचल्याचा एक अनुभव त्यांनी नमूद केला होता. त्याच मुलाखतीतत पुढे त्या एक उत्तम छायाचित्रकार असल्याचाही उल्लेख होता व सोबत त्यांनी काढलेली काही छायाचित्रेही प्रकाशित केलेली होती. मुलाखत वाचल्यावर मी विचार केला की समजा लताजींच्या स्वरयंत्राला अपाय करण्यात त्यांचे हितशत्रू यशस्वी झाले असते तरीही लताजी व्यावसायिक आघाडीवर कोलमडून न पडता छायाचित्रकार म्हणूनही तितक्याच यशस्वी ठरल्या असत्या इतकी त्यांनी काढलेली छायाचित्रे अप्रतिम आहे. या उदाहरणावरून मला हा लेख लिहीण्याची कल्पना सूचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

जबरा...

किसन शिंदे
Fri, 08/05/2011 - 13:22 नवीन
अरे वा! तुम्ही पाहीलेली लताताईंची अशी छायाचित्रे आम्हालाही पहायला मिळू द्या की..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अंक माझ्याजवळ नाहीय.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:40 नवीन
टाटा मोटर्स समाज कल्याण केंद्र आकुर्डी येथे दरवर्षी ३५ रुपये वर्गणी काढून ५० दिवाळी अंकांची खरेदी केली जाते. प्रत्येक आठवड्याला एक या गतीने वर्षभरात हे अंक वाचले जातात. पुढे यापैकी प्रत्येक अंक एकेका वर्गणीदाराला भेट दिला जातो. संबंधित मुलाखत ज्या अंकात प्रसिद्ध झाली आहे तो अंक माझ्याजवळ नाहीय. कुठे आहे ते शोधून चित्रे प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

राजाध्यक्षांनीही कौतूक केलंय.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 14:38 नवीन
हा लेख वाचावा. http://www.mid-day.com/entertainment/2010/jun/190610-lata-mangeshkar-photography.htm इथे राजाध्यक्ष म्हणतात - "Shooting didi (Lata) is difficult even though she is easy in front of the camera," Rajadhyaksha said. "It's difficult because didi herself is a very good photographer. She is well versed with the nuances of photography." त्यांनी स्वतः काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन देखील भरवलं होतं. इथे तसा उल्लेख आहे. http://www.screenindia.com/old/nov12/cover.htm अजून काय हवं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मस्त जमला आहे लेख.

मृत्युन्जय
Fri, 08/05/2011 - 12:45 नवीन
मस्त जमला आहे लेख.
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:18 नवीन
@मृत्युंजय, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लेख आवडला

गणपा
Fri, 08/05/2011 - 13:38 नवीन
नमनालाच घडाभर तेल गेलं पण जो मुद्दा मांडायचा होता तो समजला. लेख आवडल्या गेला आहे. -(अंगठीच्या शोधात) गणा
  • Log in or register to post comments

आ भा र

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:46 नवीन
@ प्रतिक, << नमनालाच घडाभर तेल गेलं पण जो मुद्दा मांडायचा होता तो समजला. >> शीर्षकावरून किंवा सुरुवातीच्या परिच्छेदांवरून नेमका काय मुद्दा मांडायचा आहे याचा अंदाज येऊ शकणार नाही अशा पद्धतीचे लिखाण करायला मला विशेषत्वाने आवडते. << लेख आवडल्या गेला आहे.>> धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

नमनालाच घडाभर तेल गेलं पण जो मुद्दा मांडायचा होता तो समजला.

शाहिर
Fri, 08/05/2011 - 14:18 नवीन
+१ डोंगर पोखरुन उंदीर काढला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

नावातकायआहे
Fri, 08/05/2011 - 15:44 नवीन
+१ (बोटांच्या शोधात) -फणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मस्त

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/05/2011 - 14:44 नवीन
अतिशय सुरेख आणि कसदार लेखन पुन्हा एकदा.
गोष्टीत उल्लेख केलेल्या अंगठीसारखी किमान एक तरी अंगठी आपल्यापैकी प्रत्येकाकडे असते आणि ती म्हणजे आपल्यापाशी असलेले दुय्यम कौशल्य. एक मुख्य कौशल्य आपल्याकडे असते ज्याच्या बळावर आपण आपला चरितार्थ चालवित असतो जसे डॊक्टर, इंजिनीयर, वकील, इत्यादी. त्याशिवाय आपणापाशी अजुनही एखादे कौशल्य असू शकते की ज्याचा आपण व्यावसायिक वापर करीत नसलो तरी तो आपला छंद असू शकतो जसे गायन, वादन, लेखन, चित्ररेखाटन, इत्यादी. अल्लाउद्दीनचा दिवा त्याच्या ताब्यातून नाहीसा झाला तसे पुढे आयुष्यात काही कारणाने आपल्याला आपल्या मुख्य कौशल्यास बाजूला ठेवावे लागले (म्हणजे पगारदारांना सक्तीची/स्वेच्छा निवृत्ती आणि व्यावसायिकांना अपयश इत्यादींमुळे) तरी आपले हे दुय्यम कौशल्य अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील अंगठीप्रमाणे आपल्या मदतीला धावून येऊ शकते आणि उत्पन्नाचे साधन देखील ठरू शकते. क्वचित प्रसंगी आपल्या मूळ व्यावसायिक कौशल्यापेक्षा ह्या छंदामुळेच आपल्याला जास्त पैसा, प्रसिद्धी व समाधान मिळू शकते.
ह्या ओळी तर प्रत्येकानी आपल्या खरडवहीत डकवुन रोज वाचाव्यात अशाच आहेत. तुमच्या लेखणीला सलाम.
  • Log in or register to post comments

वाटच पाहत होतो.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 14:51 नवीन
धन्यवाद प्रसाद, आपल्या प्रतिसादाचीच वाट पाहत होतो. मिसळपाव वर हा लेख प्रसिद्ध केल्याचं चीज झालं असं आता खर्‍या अर्थाने वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आधी अवांतर - हे उत्तर नाही

५० फक्त
Fri, 08/05/2011 - 15:40 नवीन
आधी अवांतर - हे उत्तर नाही खरंतर प्रश्न आहे प्रा. परांना, तुम्ही माझ्या कोणत्याच धाग्यावर येउन त्याचं चीज सोडा पण खफपण केला नाही कधी, हा भेदभाव करणे योग्य नाही याची दखल घेण्यात यावी. आणि आता मुद्याचा भाग - मा. गुगळे, इथं काय किंवा एकुणच नेटावर येणारे त्यांचं युजर नेम काही विशिष्ट हेतुनं किंवा समजानं घेतात आणि तशी मोकळिक या संस्थळानं प्रत्येक सद्स्याला दिलेली आहे, तसेच प्रत्येकाचे खरे नाव व इतर माहिती ही प्रामुख्याने संस्थळाच्या माहितीकरिता मागितलेली असते., त्यातच एक उद्देश स्वताचे मुळ किंवा खरे नाव लपवणे हा असतो, त्यामुळे किमान इथं तरी प्रतिसाद लिहिताना तो त्या आयडीवं नाव वापरुनच द्यावा, इथं जर एखादा आयडी मुद्दाम घेतला असेल तर त्याला प्रतिसाद न देता त्या आयडिच्या मालकाच्या किंवा मालकिणीच्या ख-या नावाने आपण प्रतिसाद देता हे सर्वथा सुयोग्य वाटत नाही, तसेच माझ्या सृजनशील मनाला पटत नाही, असे करण्याने आपले खरे नाव हे शक्यतो गुपित रहावे किंवा काही विशिष्ट लोकांनाच माहित व्हावे हा उद्देश सफल होत नाही. अशा प्रकारे कोणाही आयडीच्या अतिशय खाजगी मालकीच्या वैयक्तिक गोष्टी उघड करण्याची आपणास गरज का पडावी असा एक निष्पाप प्रश्न मला पडतो आहे. किमान माझ्या बाबतीत तरी हे करु नये, बाकीच्या आयडिंच्या बाबतीत मी फक्त विनंती करु शकतो. . इतर मा. सद्स्यांनी याबाबत आपले प्रामाणिक मत द्यावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

माफी माफी

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/05/2011 - 15:45 नवीन
आधी अवांतर - हे उत्तर नाही खरंतर प्रश्न आहे प्रा. परांना, तुम्ही माझ्या कोणत्याच धाग्यावर येउन त्याचं चीज सोडा पण खफपण केला नाही कधी, हा भेदभाव करणे योग्य नाही याची दखल घेण्यात यावी.
मी तुमच्या पहिल्याच धाग्यावर प्रतिसाद दिला होता ; पण त्या प्रतिसादाबद्दल आमच्या सुहॄदांनी माझ्या अब्रुची लक्तरे काढली :( माझ्या प्रमाणीक प्रतिसादाला हिन लेखले :( मला काय काय ऐकुन घ्यावे लागले म्हणून सांगतो तुम्हाला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी तुमच्या पहिल्याच धाग्यावर

स्पा
Fri, 08/05/2011 - 15:54 नवीन
मी तुमच्या पहिल्याच धाग्यावर प्रतिसाद दिला होता ; पण त्या प्रतिसादाबद्दल आमच्या सुहॄदांनी माझ्या अब्रुची लक्तरे काढली,माझ्या प्रमाणीक प्रतिसादाला हिन लेखले , मला काय काय ऐकुन घ्यावे लागले म्हणून सांगतो तुम्हाला जाव द्या ना,झाले गेले गंगेला किंवा कावेरीला मिळाले .... :) परा सर तुम्ही नव्या जोमाने ५० फक्त यांच्या धाग्यावर प्रतिसाद देत जा , ओक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जाव द्या ना,झाले गेले गंगेला

मृत्युन्जय
Fri, 08/05/2011 - 17:43 नवीन
जाव द्या ना,झाले गेले गंगेला किंवा कावेरीला मिळाले .... तुझ्या पहिल्या भयकथेवरचा (असं जगण्यापेक्षा....) पराचा प्रतिसाद आठवतो का? (आणी माझा आठवतो का?) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्या भयकथेचा दुवा द्या हो

धन्या
Fri, 08/05/2011 - 21:14 नवीन
त्या भयकथेचा दुवा द्या हो कुणीतरी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भयकथा अल्लाला प्यारी झाली. पण

मृत्युन्जय
Fri, 08/05/2011 - 21:38 नवीन
भयकथा अल्लाला प्यारी झाली. पण आमची ३-४ दिवस करमणूक झाली होती. स्पावड्या अजुन आयमाय काढतो आठवले की. हो की नाही रे स्पावड्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@ ५० फक्त, तुमचे लिखाणच इतके

प्यारे१
Fri, 08/05/2011 - 16:01 नवीन
@ ५० फक्त, तुमचे लिखाणच इतके सपक आणि करमणूकहीन होते की परा यांनी प्रतिक्रिया न देऊन तुमच्यावर उपकारच केले आहेत. एवढेच काय तर बाकी कुणी मिसळपाव वर आजतागायत लिहिले नाहीये. लिहितात ते फक्त डॉ. चेतन गुगळेच. मिसळपाव म्हणजे त्यांचा ब्लॉगच जणू. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे इथे देखील गुडीगुडी प्रतिक्रियाच आम्ही लिहिणार आहोत. मिसळपाव वरचे रामदास, बिपीन कार्यकर्ते, विप्र, परा, डॉन, ब्रिटीश, पिडां, टारझन, प्राजु, गवि, घाडपांडे काका, सुधीर काळे, सुहास आणखी किती आयडी नुसते 'टॉम्बे आहेत टॉम्बे'... लिहीणं शिकावं ते गुगळे यांच्याकडूनच. तुम्ही अपेक्षा तरी कशी करता? छ्या... काय ते लिखाण, काय तो बाळबोध बावळटपणा, काय तो सातत्यानं 'संपर्क करा'चा घोशा. अरे जरा नीट लिहा आणि मग मागा प्रतिक्रिया. तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती ५० फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अगदी सहमत !

सोत्रि
Wed, 08/10/2011 - 11:34 नवीन
इथं काय किंवा एकुणच नेटावर येणारे त्यांचं युजर नेम काही विशिष्ट हेतुनं किंवा समजानं घेतात इथं जर एखादा आयडी मुद्दाम घेतला असेल तर त्याला प्रतिसाद न देता त्या आयडिच्या मालकाच्या किंवा मालकिणीच्या ख-या नावाने आपण प्रतिसाद देता हे सर्वथा सुयोग्य वाटत नाही
सहमत, इथे आयडेंटी लपवण्याचा मुद्दा नसुन जे टोपणनाव घेतले आहे त्यामागे एक निश्चित भुमिका असते आणि इथे मिपावर त्या टोपणनावानेच ओळखले जावे अशी इच्छा रास्त आहे.
किमान माझ्या बाबतीत तरी हे करु नये
अलबत, माझ्याही बाबतीत हे असे करू नये. केल्यास..... - ('टोपण' असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा