Skip to main content

मागे ती लुगडी

मागे ती लुगडी

Published on 09/07/2011 - 12:09 प्रकाशित मुखपृष्ठ
मागे ती लुगडी एके काळी मराठी काव्य म्हणजे भक्ती काव्य व सोबतीला पंचपक्वांनांनी भरलेल्या ताटात थोडीशी झणझणित चटणी असावी तसे शाहीरांचे शृंगार काव्य. साहित्यात विनोद शोधावयास लागावयाचा. "विनोद आवडे टवाळा " ही समर्थांची उक्ती प्रातिनिधिक म्हणावयास हरकत नाही. तर अशा काळात अमृतराय या कवीची एक आल्हादकारक रचना मिळाली तेव्हा सगळ्या मित्रांना एक मेजवानीच मिळाली म्हणावयास पाहिजे. आणि हो, हा अमृतराय म्हणजे " अजी मी ब्रह्म पाहिले" या सुप्रसिद्ध रचनेचा कर्ता. अमृतराय (१६९८-१७५३) हा कटावाकरिता प्रसिद्ध. मराठीत त्यानेच तो सुरू केला म्हाणावयास हरकत नाही. तर असा हा कवी कटाव सोडून भक्तीमार्गाकडे का वळला असावा याची उत्सुकता लागली असेल तर त्याचे उत्तर पुढील कवितेत मिळेल. मागे ती लुगडी सकाम बुगडी आठा दिसा बांगडी घालिते फ़ुगडी कधी न रगडी, फ़ाडितसे आंगडी !! खैराची शगडी तशी धडधडी तोंडाळ मोठी खुडी सोन्याच्या लगडीस देखुनि रमे ऐशी महा धांगडी !! दारा देत कडी, सदा बडबडी बोले महा वाकडी दाणे चोरुन फ़ाकडी न कळता घेते मुळे काकडी !! खाते ती जशी माकडी वसवसी दांती दिसे खोकडी यालागी अमृतेश्वरासि रुचली गंगातिरी झोपडी !! बुगडी ----- कर्णभूषण शगडी ---- शेगडी असावयास पाहिजे खुडी --- कजाग,दुष्ट, दांडगी धांगडी --- उद्धट, आडदांड मुलगी [आणखी एक अर्थ - खोडकर घोडी ] फ़ाकडी --वितंडवादी, फ़ाटे फ़ोडणारी खोकड -- कोल्ह्याच्या जातीचे जनावर अमृतराय आपल्या बायकोचे वर्णन करत आहे. लुगडी, कर्णफुले व दर आठां दिशी नवीन बांगड्या तर मागतेच ; पण एखादे दिवशी" अंग रगडून दे " म्हटले तर थयथयाट करत कपडेच फाडून टाकत असे. आपणापैकी बर्‍याच जणांनी शेगडीच पाहिली नसेल तर त्यातील खैराची लाकडे कशी धडाधडा पेटत ते कसे क:ळणार म्हणा ! द्या सोडून. पण पुढे कवी त्राग्याने तिला माकडी, खोकडी म्हणतो त्याचे कारण त्याने मधेच अगदी थोडक्यात दिले आहे. 'दारा देत कडी ". तुम्ही जरा रंगात येता आहात असे पाहिल्यावर जरतुम्हाला बाहेर काढून, बायको दाराला आंतून कडी लावत असेल तर तुम्हीही म्हणाल की या संसारापेक्षा सर्व त्याग करून गंगेकाठी एखादी झोपडी बांधून त्यात ईश्वर भजनात वेळ घालवणेच बरे ! ( आता नवरोजीच्या या त्राग्याला बायको काय उत्तर देते तेही कळेलच लवकर !) शरद
लेखनप्रकार

याद्या 4324
प्रतिक्रिया 18

मस्तच. आता,
आता नवरोजीच्या या त्राग्याला बायको काय उत्तर देते तेही कळेलच लवकर
याची वाट पाहतो... फार प्रतीक्षा करायला लावू नका. :)

In reply to by सूड

फार प्रतीक्षा करायला लावू नका.
+२ मस्तच.

In reply to by श्रावण मोडक

अमृतरायाला झोपडी का प्यारी झाली प्रेषक चतुरंग (ह्याचे कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो! ;) माझा हा घरगडी धुवे न लुगडी आठी असे वाकडी फुंके ना शेगडी सदाच मुरडी, चर्या पहा बोकडी !! होता दोन घडी कशी कडमडे तोंडात ह्याच्या बिडी बाजूच्या गधडीस देखुनि रमे ऐसाच चालू गडी !! दारु घेत सडी, सदा बडबडी लोळे पहा वरकडी कामे टाळुन दे पडी न कळता लावून दारी कडी !! खातो हा जसा माकडी वसवशी उलटी असे खोपडी यालागी हकलून आज दिधले 'रंग्यास' त्या झोपडी!! चतुरंग

कविता व तिचा विषय छान मांडलाय..........पुढे पुढे येणारे प्रती-साद मजेशीर असणार असा---अंदाज---बांधायला हरकत नाही.

अमृतराय यांच्या रचनेच्या रसग्रहणाबद्दल धन्यु. थट्टेखोर, फटकळ अमृतराय पत्नीच्या कटकटीला वैतागून घरदार सोडून गेले पुढे मध्वमुनींची भेट झाली आणि त्यांनी त्यांना ईश्वरभक्तीकडे वळविले . (प्राचीन मराठी वाड;मय चाळतांनाची आठवण) मध्वमुनी आणि अमृतराय या पेशवेकाळातील गुरुशिष्याच्या जोडीचं खटकेबाज गीतलेखनाच्या बाबतीत मोठं नाव होतं म्हणे. (लेखन शोधलं पाहिजे) शरद साहेब, यातले मध्वमुनी आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेंदुरवादा (माझं आजोळ आणि मोठ्या गणपतीच्या मूर्तीचं गाव) गावी राहीले. विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापनाही त्यांनी केली. शेंदुरवाध्यातच मध्वमुनींची समाधीही आहे. असो, मध्वमुनींच्या लेखनाबद्दल जेव्हा पुढे लिहाल तेव्हा स्थळाबद्दलचे काही अद्यावत फोटो-बिटो डकविन म्हणतो. असो, अवांतराबद्दल क्षमस्व. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याकाळातील संतांव्यतिरीक्त केवळ मोरोपंत, अनंत फंदी आणि होनाजी यांच्याबद्दलच बहुतेककरून वाचनात येते. अन्य कवींबद्दल जाणकारांनी लिहिल्यास बरे होईल. अवांतर - हे अक्षर ड अधिक अर्धविराम असे लिहिण्याऐवजी Ga असे टंकावे!

In reply to by सुनील

संत कवींचे लेखन, पंडिती कवींचे लेखन आणि शाहीरांचे लेखन यावरील जाणकार म्हणून वयाने जेष्ठ आणि प्राचीन मराठी साहित्य आणि आधुनिक मराठी साहित्याची उत्तम जाण असलेले श्री शरद साहेबच अधिक लिहितील. आपण त्यांच्या लेखनाची वाट पाहू या....! >>>> अवांतर - ङ हे अक्षर ड अधिक अर्धविराम असे लिहिण्याऐवजी Ga असे टंकावे! हम्म, हे सोपे वाटते पण शब्द बरोबर आहे काय ? (सोबत ड चा पाय कसा मोडायचा) आपल्या म्हणण्याला दुजोरा मिळण्यासाठी शुद्धलेखनाचा एक जाणकार सुचक आणि एक अनुमोदक मिळाल्याशिवाय मी बॉ तसे लिहिणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुनिल यांच्या टंकसूचनेला अनुमोदन करत आहे. वाङ्मय = वाङ्‌मय "ङ"चा पाय मोडल्याची खूण 'ङ'च्या टिंबाखाली लिहिण्याची सुद्धा पद्धत आहे. हे खरे आहे. ZWNJ वापरलेल्या माझ्या वरील दुसर्‍या टंकनात टिंबाऐवजी मुख्य चिहाखाली पाय मोडल्याची खूण दिसत आहे. परंतु ही बाब युनिकोड संगणकाच्या पटलावर "रेंडर" कसे होते, त्यावर अवलंबून आहे. "वाङ्मय" असे लिहिले (गमभन मध्ये G वापरून) तर वेबपानाच्या आंतरिक "सोर्स" मध्ये "ङ" हे अक्षर राहील, आणि शोधयंत्रांत योग्य तो शब्द सापडेल. दृश्यसाम्यामुळे गमभनमधील Da; (दिसायला "ड;") असे लिहिले, तर वेबपानाच्या आंतरिक "सोर्स" मध्ये "ड" हे अक्षर राहील, "ङ" नव्हे. मग शोधयंत्रांमार्फत योग्य तो शब्द सापडणार नाही. (माझ्या मते या परिस्थितीत ZWNJ सुद्धा वापरू नये.)

In reply to by धनंजय

"वाङ्मय" असे लिहिले (गमभन मध्ये G वापरून) तर वेबपानाच्या आंतरिक "सोर्स" मध्ये "ङ" हे अक्षर राहील, आणि शोधयंत्रांत योग्य तो शब्द सापडेल. आणि टंकनात टिंबाऐवजी मुख्य चिहाखाली पाय मोडल्याची खूण ही बाब युनिकोड संगणकाच्या पटलावर "रेंडर" कसे होते, त्यावर अवलंबून आहे. ही पटणारी कारणं आहेत म्हणून शुद्ध शब्द 'वाङ्‌मय' असला तरी 'वाङ्मय' शब्दच वापरला पाहिजे याच्याशी सहमत आहे. आपले दोघांचेही मनःपूर्वक आभार......! -दिलीप बिरुटे

छान माहिती. अमृतरायबद्दल थोडी अधिक माहिती द्यावी. बायकोच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.

छान माहिती. अमृतरायबद्दल थोडी अधिक माहिती द्यावी. बायकोच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.

मूळ कविता, रसग्रहण आणि रंगाचं (अमृतरायच्या बायकोतर्फे दिलेलं) उत्तर सगळंच लै भारी!