Skip to main content

कुणाला कुणाचे कशाला हवे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 12/07/2011 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे
.
प्रिया बांध रे बंध नाजूकसे परी त्यात काचे कशाला हवे
.
मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे
.
धन्या फायद्याचे पहा नीटसे लळे चाकराचे कशाला हवे
- - -
लेखनविषय:

वाचने 4086
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

तिसरं कडवं (का शेर?) इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटलं. धन्या हा श्लेष आवडला. कविताही आवडली.

उ त्त म!!!!!!! रचना फारच आवडली! तिसरा आणि शेवट्चे दोन शेर अधिक आवडले. १. मनाला जनाचे कशाला हवे की जनाला मनाचे? यातून काय सुचवायचे आहे? की फक्त अनुप्रास साधला आहे? २. रचनेला गझल असे का वर्गीकृत केलेले नाही?

सुरेख गजल! धन्याशेठ, फारच छान! -रंगा

चांगली रचना, आवडली. पुन्हा-पुन्हा वाचावीशी. अवांतर: फुलटॉस आहे. तरीही रंगाशेठ फक्त 'सुरेख गझल'वर थांबले हे पाहून ड्वाले पाणावले... ;)

उत्तम अप्रतिम

गझल आवडली.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे . चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे
हे विशेष आवडले.
मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे
हा शेर - दिसावे मला रूप माझे खरे हसू आरशाचे कशाला हवे? असाही वाचला. 'धन्या'चा श्लेष थोडा घुसवल्यासारखा वाटला.

In reply to by विसुनाना

'धन्याचा श्लेष' याविषयी सहमत. सुचवणीही आवडली.

प्रत्येक शेर स्वतंत्र आणि सुंदर.

कविता, गझल वैग्रे प्रकार कळत नाहीत, पण हे जे काय आहे ते एकदम आवडले.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे
हे जबर्‍याच.

कविता स्फुराया कशाला हवे जनाला छळाया कशाला हवे कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कळाया हवे डुआयड्यांमध्येही मुखवटे बरे आयपी कळायला कशाला हवे जाउ द्या पुरे :-) नक्की काय म्हणायचे कळले नाही बहुदा गझल /सात लघुकविता आहेत बाकी आ.क.फा.का.क.ना. हे. मा.आ.

जगात कशाने कशाला काय फरक पडतो? विशेषतः जग काय करतं त्याने मला काय फरक पडतो. असा काहीसा तिरकस प्रश्न विचारत सुरू होते. इथे कोण कोणाचा आहे? असा ऱ्हेटॉरिकल प्रश्न विचारते. मनुष्य हे बेट आहे असं सांगते. नंतरचे शेर यापासून थोडी फारकत घेतात, पण कशाला हवे चं सूत्र कायम राहातं. गजलेच्या गुच्छातली फुलं एकाच छटेतली आहेत हे पाहून बरं वाटलं.

मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे

प्रत्येक दोन ओळीत स्वतंत्र कथानक आहे. सुंदर.......! -दिलीप बिरुटे

कविता आवडली. दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे . चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे.... हे सुन्दर. पण आशय मिश्र वाटला. काही कडवी उपहासिक आणि प्रहार करणारी पण काहि फक्त यमक जुळवणारी वाटली.