Skip to main content

गाजराचा हलवा

लेखक स्मिता. यांनी गुरुवार, 30/06/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केवळ 'गाजर हलवा' नाहीये तर रितसर गाजराचा हलवा आहे ;) लहानपणापासून मला गाजराचा हलवा फार आवडतो. आणि सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा! अश्या या सदाबहार हलव्याची पाकृ मात्र एकदम सोप्पी आहे. साहित्य: मध्यम आकाराचे ६ गाजर १ टेस्पून साजूक तूप १ वाटी साखर १ वाटी दूध चिमूटभर वेलची पूड सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे कृती: गाजर स्वच्छ धुवून कोरडे करून किसून घ्यावे. कढई किंवा पसरट भांड्यात मंद आचेवर तूप गरम करावे. त्यात गाजराचा किस घालून मध्यम आचेवर शिजवावे. गाजराचा जरा मऊ झाला की त्यात साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे. साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटते. त्यामुळे भांड्याला मिळणारी आच वाढवायला हरकत नाही. पण अधूनमधून हलवत राहून खालून जळणार नाही याची खबरदारी घ्यावी. मिश्रण कोरडे व्हायला लागले की आच पुन्हा मंद करून दूध घालावे. बरेच लोक आवडीप्रमाणे खवा/कन्डेन्स्ड मिल्क सुद्धा घालतात. हलवा आपल्याला हवा तसा ओलसर/कोरडा झाला की त्यात वेलची पूड मिक्स करून आचेवरून उतरवून घ्यावा. गरमागरम हलवा वाटीत काढून त्यावर सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे पेरावे आणि....... पुढचे सांगायची गरज नाही :)

वाचने 9482
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

छान. एक चमचा तूप पुरते का ? बर्‍याच घरी पाहुण्यांना सर्व केला जातो तो हलवा विस्कळीत असतो. लग्नात/ हॉटेलांमध्ये देतात तो एकसंध वाटतो.

In reply to by चिरोटा

चिरोटाराव, गाजराच्या हलव्यात साजूक तूप घालतात कारण सुरूवातीला आपण फक्त गाजराचा कीस शिजवतो तो गरम भाड्याला चिटकू नये आणि तूपाचा छान सुगंधा यावा. त्यामुळे १ मोठा चमचा (टेबल स्पून) तूप पुरेसे असते. हॉटेलांत देतात तो हलवा एकसंध/ओलसर असतो खरा. तो कसा याची काही कल्पना नाही. बहुदा साखर घातल्यावर सुटणारे पाणी पूर्ण आटवत नसावेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे वा!! काजू पेस्ट घालून गाजराचा हलवा... पण जरा जास्तच कॅलरीज नाही का रे होणार? मी आपलं कॅलरीचा फक्त विचार करते आणि चांगलं लागलं की सगळं खाते ;)

रेसिपी मस्त
सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा!
असेच फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर गुलकंदआइसक्रिम पन मिळते, ते पन... अहाहा अहाहा!!!!

In reply to by सानिकास्वप्निल

खवा किंवा कन्डेन्स्ड मिल्क घातल्यास मस्त होतो असा स्वानुभव आहे.

In reply to by सानिकास्वप्निल

सनिकाताई, खवा घालून हलवा रीच तर होतोच पण त्याने लगेच पोट भरते आणि मनसोक्त खाता येत नाही ;) माझी आई जर पाहुणे येणार असतील तरच खवा किंवा कन्डेस्ड मिल्क घालते, रिच वाटावा म्हणून :)

In reply to by स्मिता.

सनिकाताई, खवा घालून हलवा रीच तर होतोच पण त्याने लगेच पोट भरते आणि मनसोक्त खाता येत नाही Wink माझी आई जर पाहुणे येणार असतील तरच खवा किंवा कन्डेस्ड मिल्क घालते, रिच वाटावा म्हणून Smile
;) ह.घ्या.हे वे.सां.न ल.

मला खुप आवडतो रुतिका

गाजर हलवा आवडीचा! ही आमची गाजर हलवा पाकृ. स्वाती

In reply to by स्पा

मराठी लोकांना लहानपणापासून लाल गाजर बघायची सवय असल्याने आजकाल येणारे केशरी गाजर पहिल्यांदा बघून जरा वेगळे वाटते. पण आजकाल आपल्याकडेही केशरी गाजरे जास्त मिळायला लागली आहेत. मी पॅरिसमधे असल्याने येथे मिळालीत ती गाजरे वापरलेली आहेत.

सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि वाचकांचे आभार! बर्‍याच प्रतिक्रियांमधून खवा घालण्याचा उल्लेख आला आहे. खवा घालून हलवा छानच लागतो. पण तो ऑप्शनल आहे. खवा/कन्डेन्स्ड मिल्क/मिल्क पावडर घालून हलव्याला आणखी रीच बनवता येते.

In reply to by स्मिता.

जरा (म्हणजे बरीच) उशिराने प्रतिक्रिया देते आहे. हलवा आवडला. फोटू छान आलाय. तू आधीच आभार मानल्याने मी माझेच मानून घेते. काळजी नसावी.;)

माझाही आवडता !!!!!