Skip to main content

झेब्र्याने गिळले उंटाला !!!

झेब्र्याने गिळले उंटाला !!!

Published on गुरुवार, 30/06/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
जून महिना तेच छान पावसाचे दिवस आणि शाळेची खरेदी. दरवर्षीची जून महिन्याची अगदी ठरलेली सुरुवात आहे. अगदी आपल्या लहान पणा पासून. गणवेश, वह्या, पुस्तकं, बूट मोजे , कंपास पेटी या सगळ्या ठरलेल्या पदार्थांची खरेदी. कधी कधी याच सामना बरोबर रंग पेटी सुद्धा- बाबांचे बजेट असेल तर नाई तर सप्टेंबर चे आश्वासन घेऊन शांत व्हायचे. रंग पेटी वा अन्य एखाद्या मागणीवर शांत करायला आणखी छान उपाय वापरला जायचा तो कंपास पेटीच्या brand चा. कॅम्लिन ची कंपास पेटी घेऊ या. असे म्हणता क्षणी बाकीच्या मागण्या विरघळून जायच्या. कॅम्लिन ची पेटी तुलनेने इतर पेट्यापेक्षा महाग असायची, त्यामुळे सुरुवात दुस-या कोणत्यातरी पेटीच्या खरेदीने व्हायची. पण कॅम्लिन ची कंपास पेटी हे एक पदक असायचे . त्यामुळे शाळेत ती एक पदक म्हणूनच मिरावायचो. कॅम्लिनचा शालेय जीवना पासुनच मनावर एक खोलवर एक ठसा उमटुन गेलाय. तो कॅम्लिनच्याच खोडरबरने अशात:ही न पुसला जाण्यासारखा आहे. आता बाप झाल्यावर मुलांच्या शाळेच्या चर्चा करताना , त्यांच्या शालेय सामानाची खरेदी करताना साहजिकच पिवळ्या रंगावर केशरी पट्टा असलेल्या आणि उंटाचे चिन्ह असणाऱ्या कंपास पेटी कडेच वळायला होतं. आणखी एका कारणांनी कॅम्लिन हे पदक गेल्या काही वर्षापासू वाटायला लागलं होतं. कॅम्लिन उद्योग समूह म्हणून. एक उद्योजक म्हणुन मला स्वत:ला कॅम्लिन कडे बघताना अभिमान वाटायचा. अभिमान विशेषत: याचा की कॅम्लिन हा एक मराठी उद्योग समूह आहे . सुरुवातीच्या कालावधी मध्येच नव्हे तर स्थिरस्थावर झाल्यावरही मलाच काय सगळ्याच उद्योजकांना काही ना काही समर प्रसंगाना सामोरं जावं लागतं. या प्रसंगातून फक्त आणि फक्त स्वत:लाच मार्ग काढावा लागतो. अशावेळी काही उद्योगांचा जवळून केलेला अभ्यास उपयोगी पडतो. त्यामुळे case studies म्हणुन अभ्यास्याला कॅम्लिन वा किर्लोस्कर यांच्या सारखे उद्योग समूह अधिक जवळचे - मराठी म्हणुन. काकासाहेब दांडेकरांनी पोटापाण्यासाठी १९३१ साली सुमारे ऐशी वर्ष पुर्वी गिरगावातल्या एका चाळीत शाई बनवून विकण्याचा उद्योग चालू केला. त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ नानासाहेब दांडेकर ही होते. कॅम्लिन हा ब्रांड जन्माला आला १९९४५ साली. त्या नंतर हा व्यवसाय सतत वाढत गेला. दांडेकरांच्या तीन पिढ्यांनी या व्यवसायाचा भार बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलला होता. देशभरातल्या सहा कारखान्यांमार्फत त्यांची आगे कूच चालु होती. पण आता कॅम्लिनला जागतिकीकरणाच्या रेट्यात होणारे सोस कदाचित झेपत नसतील. विशेषत: मला कॅम्लिनची संशोधनाची बाजु कमकुवत वाटते. आज स्पर्धा जीवघेणी आहे. वर्षानुवर्षे संशोधन करून बाजारात आणलेल्या उत्पादनाचे बाजारातले आयुष्य एखादे वर्ष किंवा अगदी काही महिनेच असू शकते. त्यामुळे उद्योग जिवंत ठेवण्यासाठी अन्य उत्पादने वा बाजारातून नामशेष होणाऱ्या उत्पादनाची पुढची आवृत्ती लगेच वाजत गाजत उतरवावी लागते. किंबहुना आपले आजचेच उत्पादन उद्या आपल्या एका सुधारीत उत्पादनाने नामशेष करावे लागते. आपल्याकडून जर ही खबरदारी घेतली गेली नाही तर स्पर्धक त्याच्या खेळीनी आपले उत्पादन मारायला तयार असतोच. जशी ही प्रत्यक्ष्य स्पर्धेची तलवार सतत उत्पादकांच्या मानेवर असते तशी एक आणखी भीषण स्पर्धा हल्ली उत्पादकांना सतावत असते. ही स्पर्धा म्हणजे अंधारातली लढाई असते. समोर कोण असेल कशामुळे आणि कुठून घाव बसेल हे सांगताही येत नाही. उदाहरणार्थ सकाळी आपल्याला उठवणाऱ्या गजराची घड्याळे घ्या. एका घड्याळे बनविणाऱ्या 'अ' उत्पादकाने घड्याळेच बनविणाऱ्या "ब" उत्पादकाच्या घड्याळाहून वरचढ गुणवत्तेची घड्याळे सतत बाजारात आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले , पैसा खर्च केला तर "अ" घड्याळे ज्यास्त विकली जातील ही साधीसरळ प्रत्यक्ष स्पर्धा झाली. आता भीती अशा प्रत्यक्ष स्पर्धेची नाही. आज गजर लावायला घड्याळाकडे जातो कोण? आपण गजर mobile वर लावतो ना! आपल्याला स्पर्धक म्हणुन बाजारात mobile फोन वापरले जातील याची कल्पनाही घड्याळ उत्पादकांना आली नसेल. कॅमेराचे ही तसेच. जगात सगळ्यात ज्यास्त कॅमेरे mobile उत्पादक बनवितात !!!! लिखाणाच्या , स्टेशनरीच्या बाजारात अशीच भीषण स्पर्धा आहे आणि आता ती जागतिक स्तरावर आहे. या स्पर्धेमध्ये टिकाव लागण्यासाठी प्रचंड भांडवलाची ही आवश्यकता असते आणि त्याही पेक्ष्या अधिक प्रमाणात लागते ती टिकून राहण्याची विजीगिषु वृत्ती आणि प्रचंड हिम्मत. या तीनही बाबतीत कॅम्लिनने हार मानली हे मराठी उद्योगाचे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या कॅम्लिनचा बळी गेला असेल. कॅम्लिन ही कंपनी जपानच्या कोकुयो कंपनीला मे महिन्याच्या अखेरीस विकली गेली. एक सामान्य मराठी नागरिक म्हणुन ही बाब धक्कादायक आहे आणि एक उद्योजक म्हणुन मला खंतावणारी आहे. युरोप, अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या शंभर वर्षे जुनी कंपनी, दीडशे वर्षे जुनी कंपनी अशी बिरुदावली छातीवर मिरवतात. आणि हजारो, लाखो कोटींची उलाढाल करतात. मोटारींपासून कोक पर्यंत अगदी जॉकीची अंतर्वस्त्रे बनविणाऱ्या कंपनी पर्यंत कित्येक उद्योग शंभराहून अधिक वर्षे जुने आहेत. उलाढालीमध्ये जरी नसेल पण वय आणि ब्रांड या दोनहीच्या स्पर्धेत कॅम्लिनसारखी एखादी जुनी कंपनी मराठी झेंडा हातात घेवून उभी असावी असे मनोमन वाटत असताना मध्येच त्यांनी आपले हात पाय गाळुन बसावे हे क्लेशदाईच आहे. पण कॅम्लिनवाले म्हणतील की कंपनी आमची, उत्पादने आमची आम्ही काय करायचे ते आमचे आम्ही ठरवू ना! बाकीच्यांनी वैयक्तिक मामल्यात लुडबुड करायचे काही कारण नाही. हेही खरच म्हणा. कायद्याने आम्हाला त्यांच्या निर्णयावर भाष्य करण्याचाअधिकार नाही .पण माणसाच्या आयुष्यात फक्त कायदाच नसतो ना. बालपणीच ज्या ज्या म्हणून कशात आपण गुंततो , ते सगळेच आयुष्य भर आपल्याबरोबर राहते, एक उबदार आठवण म्हणून. आणि प्रचंड भावनिक गुंतवणूक झालेली बाब विरळ वा अदृश्य होणे असह्य होते. जरा संतापजनक बाब आहे ती अशी की एका बाजूला स्वदेशीची कास धरत कॅम्लिन हा उद्योग एका परदेशी कंपनीच्या घशात घातला गेलाय. ज्या जपानी कंपनीला कॅम्लिन शरण गेली ती १०५ वर्षे वयाची जुनी कंपनी आहे. म्हणजे कॅम्लिन पेक्षा सुमारे पंचवीस वर्षे च जुनी. आदरणीय काकासाहेब दांडेकरांनी चाळीमध्ये शाई बनविण्याचा उद्योग सुरु केला तसाच कोकुयो कंपनीचे संस्थापक कुरोडा यांनी अगदी छोट्या स्तरावर त्यांच्या घरामध्ये फाईली बनवायला चालु केल्या होत्या. कॅम्लिन ची उलाढाल आज सुमारे साडेतीनशे कोटी रुपये असेल तर जपानी कोकुयो कंपनीची वार्षिक उलाढाल पंधराशे कोटी रुपये आहे. आज दांडेकर कुटुंबीय जरी चेअरमन आमचाच असेल असे सांगून भारतीयांचे सांत्वन करीत असले तरी त्यांचा वाटा अल्प आहे आणि चेयरमनची अवस्था ही लगान चित्रपटा मध्ये कुलभूषण खरवंदा यांनी रंगविलेल्या "राजा" सारखी असणार का अशी शंका आहे. एका वृत्तपत्राने स्पष्ट लिहिल्याप्रमाणे कोकुयो कंपनी त्यांचा झेब्रा ब्रांड बाजारात आणेल आणि कॅम्लिनचा उंट हळूहळू गायब होईल. काकासाहेबांनी आधी त्यांचे चिन्ह घोडा ठरविले होते असे म्हणत्तात. पण उंट जसा पाणी धरून ठेवतो तशी फौंटन पेन शाई धरून ठेवतो म्हणून कॅमेल ब्रांड हा पुढे आला. त्या पुढे Camel आणि Ink हे शब्द मिसळून त्यांनी Camlin हा ब्रांड तयार झाला. पण आता आगामी पिढ्या या समृद्ध आणि उद्योग समूहाची चर्चा करतील ती फक्त त्या उंटाच्या जीवाश्माच्या…आधारे, कारण काळाच्या ओघात कॅम्लिनचा उंट कदाचित विस्मृतीत गेला असेल. sudhirmutalik@gmail.com
लेखनप्रकार

याद्या 5079
प्रतिक्रिया 27

ही बातमी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा एक मराठी कंपनी गेली ह्याची खंत वाटली. विल्सन आणि कॅम्लिन, दोन्ही आमच्या उपनगरातले ब्रॅन्ड. विल्सन बहुदा नामशेष झाले असावेत. आता हे. छान माहिती.

अगदी मनातल्या आठवणी जाग्या केल्यात!! अजूनही ती जुनी कॅमल ची कंपास बॉक्स घरात जपून ठेवली आहे :) तो उंट आणि त्याच्या पुढच्या पायाने बनवलेला 4 हा आकडा.... आता त्याच्या ऐवजी झेब्रा येणार तर.... हूं :-|

शाळेत बक्षिसम्हणून मिळालेली कॅम्लिनची कंपासपेटी अगदी कॉलेजपर्यंत जपून ठेवली होती. ती असली की परिक्षेत चांगले मार्क मिळणारच असा (अंध) विश्वास वाटायचा. ह्म्म.. कालाय तस्मै नमः ।

भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला हा लेख ठीक आहे. आपल्या लहानपणच्या आठवणी मनाचा एक कोपरा अडवून ठेवतो तो कायमचा. मला असे आढ्ळून आलेले आहे की हा प्रकार मराठी माणसाच्या बाबतीत जरा जास्तच आहे. जून्या जागेतून नवीन जागेत जाताना, स्वतःचे गाव सोडून जाताना दूसर्‍या गावी जाताना, शाळेतून कॉलेजमधे, कॉलेज मधून नोकरी...एवढेच काय मराठी माणूस चांगल्या पगारावर नोकरी सोडून जाताना सुद्धा हळवा होतो. :-) हा आपला स्वभाव आहे. हे असे होते कारण आपण आपल्या मित्रांना, सगेसोयर्‍यांना जास्त महत्व देतो.त्यांच्यातली आपली भावनीक गुंतणूक ही पराकोटीची असते. आपण ना धंद्यात रोखठोक होतो ना नाते संबंधात. लेखकाने जपानी कंपनीने कॅमलीन घशात घातली इ. लिहीले आहे. मला तरी तसे वाटत नाही कारण तशी काही आक्रमक भागभांडवलाची खरेदी मी तरी बघितली नाही.त्यामुळे दंडेकरांनी ही कंपनी स्वखुषीनेच विकली असे म्हणावे लागेल. या व्यवहारात त्यांना बराच फायदा झाला असणार त्यामुळे त्यांनी ती विकली हे बरेच झाले.आता कोणी म्हणेल त्यांनी विकण्याऐवजी त्यांना भागभांडवल द्यायचे. पण ते काही खरे नाही. उदा. म्हणून मी एका कंपनीची case study सांगतो. माझ्या एका मित्राची कंपनी अशीच चांगली चाललेली. एका जर्मन कंपनीने ऑफर दिली म्हणून ५१ % भागभांडवल त्यांना दिले. पुढे विस्तीरीकरणाच्या वेळी यांच्या कडे ते घालतील तेवढे पैसे नसल्यामुळे त्यांना त्यांचे भागभांडवल कमी कमी करत आणावे लागले. एम डी तोच आहे पण शेवटी नोकरीच. हेच जर त्याने पहिल्यादाच सगळे विकून टाकले असते तर त्या पैशात दुसरे काहितरी करता आले असते किंवा विकले नसती तरीही त्याला मार्केटमधे तग धरून रहाता आले असते, किंवा त्याच्या जागेची तरी आत्ताची किंमत मिळाली असती. अर्थात दांडेकरांनी हा सगळा विचार करूनच घवघवीत फायदा करून ही कंपनी विकली असणार यात मला तरी शंका नाही. सोबत कॅमलीनचा शेअरच्या भावाचा तक्ता जोडला आहे. ऑ. २००८ पासून....त्यावरून आपल्याला असे दिसते आहे की कंपनीच्या शेअरचा भाव सतत चढतच होता. म्हणजे कंपनी चांगलीच चाललेली असणार. त्यामुळे त्यांनी विकली हे मला वाटते अगदी योग्य निर्णय असावा. दुसरे, बहुतेक मराठी माणसे धंदा हा मुर्ख साहेबाच्या हाताखाली काम करायला नको म्हणून चालू करतात. त्यामुळे त्याला नोकरीपेक्षा चारपट पाचपट पैसे मिळाले की त्याच्या दृष्टीने त्याचा धंदा संपतो. तो काही खरा धंदा नाही. पण दांडेकरांचे तसे नसावे म्हणून त्यांच्या या पिढीने हा अत्यंत व्यवाहारिक निर्णय घेतला असावा. अर्थात हे माझे मत ! :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

भावनेच्या आधारावर मूळ लेख आवडला, आणि तुमचा प्रतिसाद बुद्धीला पटला. मस्त !!! अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

भावनेच्या आधारावर मूळ लेख आवडला, आणि तुमचा प्रतिसाद बुद्धीला पटला. मस्त !!! काय बोल्लात.. अगदी सहमत...

In reply to by सहज

असेच म्हणायचे आहे. स्वाती

In reply to by जयंत कुलकर्णी

सहमत! आपला उद्योग कधी विकावा हे चतुर उद्योजकाने काळाची पावले ओळखून आधीच ठरवावे. भावनेच्या आधारावर निर्णय घेता येत नाहीत आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, आपला उद्योग विक्रीनंतर/आपल्या पश्चात योग्य व्यक्तींच्या हातात जाणं! (कर्मचा-यांच्या/उद्योगाच्या कल्याणासाठी) अर्थात दांडेकरांनी निर्णय घेण्यासाठी विचार केलेल्या सगळ्या बाबी जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत तोपर्यंततरी काही वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. आशा करूया की, ते (किंवा इतर मराठीजन) नवीन उद्योग उभारतील/उभारण्यास हातभार लावतील, आणि पुन्हा एकदा मराठी नाव आंतराष्ट्रीय स्तरावर येखाद्या "ब्रांड" च्यारूपात झळकेल . असं असलं तरी लेखकाच्या भावना पोहोचतायत, थोडंस हळवं झाल्यासारखं मलाही वाटलं होतं, काही आठवड्यापूर्वी बातमी कळल्यावर!

In reply to by जयंत कुलकर्णी

मुळ लेख हा भावनिक गुंतागुंतीची बाजू मांडतो तर तुमचा प्रतिसाद व्यवहाराची बाजू माडतो... दोन्ही उत्तम आहेत !!!

सुंदर लेख.. जुन्या आठवणी जाग्या झाला. कॅम्लिनची कंपास.. त्याच्या व्यवस्थीत रचनेत ठेवलेला खोडरबर अआणि इतर साहित्य. आणि त्याच बरोबर आधी एरिमल आणि मग हिरोचा शाईपेन.. शाई भरण्याच्यावेळेस विनाकारण झालेले निळे हात.. कागदाचे निळे बोळे.. आनि निळे फडके .. बॉलपेन ने अक्षराला वळण नसल्याने एरिमल चा प्रवेश हलकाच झालेला त्यात हिरोची शायनिंग कॅम्लिन मध्येच जास्त असायची. कधी कधीच हाती येणारी एखादी १०-२० ची नोट ही त्याच कंपास मध्ये असायची .. गेले ते दिवस ..

In reply to by गणेशा

आजचा दिवस जुन्या आठवणींचा दिसतोय. सकाळपासून चार आण्यांच्या आठवणीत होते तर आता हा कॅम्लिनचा लेख वाचला. कॅम्लिनचा कंपासपेटी म्हणजे शाळेत अभिमानाचा एक भाग होती. त्यात असणारे ते प्रत्येक वस्तूकरताचे रकाने, त्यात बसवलेले कर्कटक, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आणि पट्टी, त्यातच बळंच बसवलेला कॅम्लिनचाच शाईपेन! (हिरोचा पेन मला ८वी मध्ये पहिल्यांदा मिळाला, त्याआधी कॅम्लिनचा) वर म्हटलंय तसं सगळीच मुलं कधीतरी हाताला लागणारी १०-२० ची नोट त्या कंपासपेटीच्या कागदाखाली ठेवायची :)

झाकणात असलेल्या कागदावर बारीक अक्षरातल्या कॉप्या, त्याच्या आत मुलींची नावे, मारामारीचा कर्कटक इ. विसरलात की काय .....:-)

श्री ठाणेदारांच्या "केमीर" नंतर अजुन एका मराठी माणसाला कंपनी विकावी लागली.

सुंदर लेख मुतालीक साहेब.शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या,पण अर्थकारण हे भावने वर चालत नसते त्या जगाचे वेगळे नियम आहेत.या "> लेखा मध्ये तर दांडेकरांच्या धोरणीपणाचे कौतुक करण्यात आले आहे. उलट ८० वर्षे जुनी असणारी आणि ३६० कोटी रुपयांचा व्यवसाय असणारी कॅम्लिन या व्यवहारा मुळे १००० कोटीं चा टप्पा ओलांडेल असा आशावाद व्यक्त केला आहे..तेव्हा बाहेरच्या देशातल्या कंपनी च्या नावाने खडे फोडण्या पेक्षा आणि कॅम्लिन च्या नावाने गळे काढण्यापेक्षा या व्यवहारा चे स्वागत केले तर सामान्य मराठी नागरिक म्हणून मला जास्त आनंद होईल.

छान लेख आणि मस्त प्रतिसाद. भावना आणि व्यवहार एकत्र कसे जावेत याचं उत्तम उदाहरण. मस्त कोवळ्या काकडीच्या कोशिंबिरीला झणझणीत फोड्णी दिल्यावर ती जास्त चांगली लागते तसं झालंय. सगळ्यांनाच धन्यवाद.

छान लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मूळ लेख छान व कुलकर्णींचा प्रतिसादही छान. विजीगिषुवृत्तीचा उल्लेख पाहून Jamie Dimon या द्रष्ट्याची आठवण झाली. सिटीग्रुप सारख्या ठीकाणाहून हाकलला गेल्यानंतरही बँक वन सारख्या बँकेचा सीईओ बनून त्यायोगे जे पी मॉर्गन बँकवन मर्जर घडवून आणून जेपी मॉर्गन ग्रुपचा सीईओ बनण्याची करामत केली. इतकेच नव्हे तर २००७ मध्यातच सीडीओ मधली गुंतवणूक पूर्णतः काढून पुढे होऊ घातलेल्या विनाशापासून जेपी मॉर्गन सुरक्षित ठेवली.

कॅम्लिनच्या मुद्यावर येण्यापूर्वी याच क्षेत्रातील प्रवर्तक अशा दोन मराठी उद्योगांच्या विलयाला नीट समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील पहिला शिसपेन्सिलचा कारखाना २ बुद्धिमान मराठी तंत्रज्ञांनी पुण्यात १९४५ साली सुरु केला आणि तो फायद्यात येण्यास १९४९ साल उजाडले. परंतु नंतरच्या काळात शिसपेन्सिलींच्या निर्मितीत खूपच स्पर्धा वाढली. केवळ एकाच उत्पादनावर उद्योगाचा व्याप रेटता येत नाही. निरंतर संशोधन व विकास आणि बदलत्या काळाची चाहूल असणे, हे कोणत्याही उद्योजकासाठी महत्त्वाचे असते. आज या मराठी माणसाच्या कारखान्याचे नावही कुणाला ठाऊक नसेल. भारतातील फाऊंटनपेनचा पहिला कारखाना एका मराठी माणसानेच उभारला. त्याने बाजारात आणलेली फाऊंटन पेन टिकाऊ, अव्वल दर्जाची आणि परदेशी पेनांनाही मागे टाकणारी होती. कारखाना फायद्यात चालतोय म्हटल्यावर मराठी कामगारांचा लोभ जागॄत झाला. त्यांनी अवास्तव पगारवाढ मागून संप/असहकार या मार्गाने त्रास देणे सुरु केले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गाववाल्यांना ज्याने आपली माणसे म्हणून रोजगार दिला त्यांनीच या उद्योजकाच्या हाताचा कडकडून चावा घेतला आणि विरक्ती येऊन या मराठी उद्योजकाने हा कारखाना बंदच करुन टाकला. कॅम्लिन उद्योगाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर (दि. प. दांडेकर) यांचे 'उंटावरचा प्रवास' हे आत्मचरित्र, तसेच पुढच्या पिढीतील शरद दांडेकर यांचे 'भावगंध' हे आत्मचरित्र वाचले, की या उद्योगाने प्रगतिपथावर केलेल्या वाटचालीला वंदन करावेसे वाटते. आपला उद्योग/आपला ब्रँड याबाबत कितीही आत्मीयता असली तरी उद्योग भावनेपेक्षा व्यवहारावर चालतो. जे उद्योजक काळाची पावले ओळखतात तेच यशस्वी ठरतात. दांडेकरांनी योग्य तो निर्णय घेतला आहे. फक्त कॅम्लिनने अलिकडच्या काळात काही परदेशी छोट्या कंपन्यांचे संपादन केले असते तर या ब्रँडचे मूल्य त्यांना सध्यापेक्षा खूप अधिक मिळाले असते. भारतीयांच्या मानसिकतेबद्दल इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती एका मुलाखतीत म्हणाले, की आपल्याकडे एखाद्याने त्याचा धंदा फायद्यात विकला तरी त्याच्यावर टीका होते. काहीवेळा अपयश येत आहे, हे वेळीच ओळखून धंद्यातून बाहेर पडणार्‍याच्या समयसूचकतेचे कौतुक न करता लोक 'त्याला धंदा करणे जमले नाही' असा नकारार्थी सूर लावतात. अमेरिकेत वेगळा प्रकार आहे. तेथे मालिका उद्योजक (सीरीयल आंत्रप्रेन्युअर) निर्माण होता. उद्योग स्थापन करणे/ड्बघाईला आलेले उद्योग विकत घेणे आणि ब्रँड यशस्वी करुन बक्कळ फायदा घेऊन विकणे, हेच या लोकांचे काम असते. दीर्घकाळ रिस्क वागवावी लागत नसल्याने असे मालिका उद्योजक अब्जाधिशांच्या यादीत लवकर मजल मारतात. थम्स अप ब्रँड कोकाकोलाला विकताना रमेश चौहान यांनी भावनाशील विचार केला असता तर एक वेळ अशी आली असती, की त्यांच्या उद्योगाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असता. दांडेकर यांनी नक्कीच असा काही व्यावहारिक विचार केला असणार.

In reply to by योगप्रभू

@योगप्रभू - नेहेमीप्रमाणेच अतिशय संतुलित प्रतिसाद. वेगळी बाजू मांडणारा. @सुधीर मुतालीक - लेख मस्त आहे. पण माझ्या मते थोडी गल्लत झाली आहे. कॅम्लिनचा ग्राहक वा मराठी माणुस म्हणुन घेतलेला (भावनीक) आढावा छान आहे. पण ह्या व्यवहाराबद्दल बोलतांना फक्त मराठी उद्योग्/उद्योजक म्हणुन विश्लेषण केल्याने काहि गोष्टी अतिरंजित वाटल्या...
१...या स्पर्धेमध्ये टिकाव लागण्यासाठी प्रचंड भांडवलाची ही आवश्यकता असते आणि त्याही पेक्ष्या अधिक प्रमाणात लागते ती टिकून राहण्याची विजीगिषु वृत्ती आणि प्रचंड हिम्मत. या तीनही बाबतीत कॅम्लिनने हार मानली हे मराठी उद्योगाचे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या कॅम्लिनचा बळी गेला असेल...
योगप्रभूंनी म्हटल्या प्रमाणे कधीकधी वेळीच धंद्याच्या बाहेर पडणे हे पण शहाणपणाचे ठरु शकते. दोन पावले मागे पुढे गेले तर हरकत नसावी. दांडेकर पुढे काय करु इच्छितात हे बघुयात!
२. ...युरोप, अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या शंभर वर्षे जुनी कंपनी, दीडशे वर्षे जुनी कंपनी अशी बिरुदावली छातीवर मिरवतात. आणि हजारो, लाखो कोटींची उलाढाल करतात...
जे टिकुन राहतात ते दिसतात. पण तिथेही असे उद्योग/उद्योजक असतील जे काळाच्या ओघात वाहुन गेले अथवा ज्यांनी दिशा बदलली असेल. जे आत्ता दिसते त्याच्यावरुन सरसकट अनुमान काढणे योग्य वाटत नाही.
३. ...मध्येच त्यांनी आपले हात पाय गाळुन बसावे हे क्लेशदाईच आहे...
हातपाय गाळलेत हे कशावरुन? ह्या पैशाचा (सद)उपयोग करुन ते दुसरा एखादा जास्त फायदेशीर धंदा सुरु करणार नाहित हे कशावरुन? तेव्हा थोडी वाट बघुयात पुढे काय होते याची!
४. ...जरा संतापजनक बाब आहे ती अशी की एका बाजूला स्वदेशीची कास धरत कॅम्लिन हा उद्योग एका परदेशी कंपनीच्या घशात घातला गेलाय. ज्या जपानी कंपनीला कॅम्लिन शरण गेली...
ज्यानी योग्य किंमत दिली त्याला विकली. जर कोणती स्वदेशी कंपनी पुढे आली नसेल तर काय करणार? बाय द वे... "शरण गेली" हे जरा जास्तच होतंय, नाहिका? असो. वर म्हटल्याप्रमाणे लेख छान आहे त्याबद्दल धन्यवाद पण थोडे अतिरंजन टाळता आले असते. असो!