Skip to main content

चार आणे

ऋषिकेश यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
काही गोष्टी असतात छोट्या, त्यांच्या असण्याने किंवा असताना फारसा फरक पडलेला नसतो / पडत नाही. मात्र तरीही त्या गेल्या / नसल्या कि मात्र चुकल्यासारख होतं. मागे टाइपराइटरने शेवटचे कडकटट केले आणि आज 'चार आणे' बंद होत आहेत. माझ्या लहानपणी (म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी) ह्या चार आण्याला किंमत होती. माझ्या घरापासून शाळा चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी उशीर झाल्यावर बसने जाताना अर्धे तिकीट चार आण्याला मिळत असे; त्यामुळे 'अडीअडचणीला' असावेत म्हणून खिशात चार आणे नेहमी असायचे. शिवाय चार आण्यात दोन गोळ्या, WWFची कार्डे, पेप्सीकोला, शाळेच्या गेट बाहेरची बोरं, बडीशेपेच्या काड्या वगैरे अनेक मौल्यवान जिनसा मिळत असत. याशिवाय दारावर येणार्या नंदीबैलाला, आमावस्येच्या बाईला, वासुदेवाला हातावर देण्यासाठी आजीकडून 'चवली'च मिळे. थोडा मोठा होईपर्यंत चार आण्याची किंमत घसरल्यावर त्याचा उपयोग रेल्वेच्या रुळावर ठेऊन त्याची धारधार चपटी करणे (व ती पतंगाच्या मांज्याला बांधणे), देवळात पेटीत सहज टाकणे, सव्वा रुपयांची दक्षिण इतपतच सीमित झाला. आता तर चार आण्यांचा उपयोग केलाही जात नाही. पंचवीस पैशापेक्षा, 'चार आणे' हे चलनाप्रमाणेच भाषेतही रुळले होते. 'चार आणे हरवलेत का तुझे?', 'पावली कम', किंवा बातमीत म्हटल्याप्रमाणे "मी कुणाचं चार आण्याचं देणं लागत नाही" वगैरे वाक्प्रचार सहज वापरले जातात. जसे अनेक जुने म्हणी, वाक्प्रचार आम्हालाही कळत नाहीत कारण त्यात उल्लेखलेल्या वस्तू बघितलेल्या नसतात (जसं, पोतेरं, मातेरं यातील फरक काय सांगायचा?) तसंच पुढल्या पिढीला 'चवन्नी' हि फक्त वाक्प्रचारातच ऐकू येईल असं दिसतय. आर्थिक दृष्ट्या भारतातील महागाई आणि चलन फुगवटा यांचे प्रतिबिंब या 'चवली' च्या काळाच्या पडद्याआड जाण्याने पडलेले आहे. चार आणे बंद झाल्याचे दु:ख असे नाही. हे कधीतरी होणारच होते. मात्र त्याबरोबर एक आवडता, हवाहवासा, रम्य काळ फार मागे सरल्याची जाणीव हुरहूर लावून जाते. चार आण्याच्या नाण्यावर बंदी आजपासून सुरु होईल मात्र आठवणींच्या कप्प्यातल्या मळक्या चड्डीच्या खिशातून डोकावणारे, बोली भाषेत रुतलेले चार आणे मात्र काही पिढ्या सरेपर्यंत तरी रद्द करता येणार नाहीत. चार आण्याची वेगवेगळी नाणी: १९५२ चांदिचे नाणे: १९६५: १९८१ जागतिक अन्न दिवस: १९८२ एशियाड : १९८५ वन दिवस: १९८८ - २०११ :
सोत्रि

>> मात्र त्याबरोबर एक आवडता, हवाहवासा, रम्य काळ फार मागे सरल्याची जाणीव हुरहूर लावून जाते फ़ार छान! नकळत बालपणीच्या रम्य आठवणी चाळवल्या गेल्या. धन्यू.
30/06/2011 - 14:24 Permalink
सुनील

नावाजलेल्या व्यक्तींचे निधन झाल्यावर जसे वृत्तपत्रांतून मृत्यूलेख लिहून येतात तसेच ऋषिकेश हे बाद होणार्‍या विविध वस्तूंचे मृत्यूलेख लिहिण्यात पटाईत आहेत! अवांतर - आता सवा रुपया दक्षिणा ही संकल्पनादेखिल बाद झाली म्हणायची! लेख आवडला हेवेसांगनल.
30/06/2011 - 14:28 Permalink
मुलूखावेगळी

In reply to by सुनील

अवांतर - आता सवा रुपया दक्षिणा ही संकल्पनादेखिल बाद झाली म्हणायची!
पाँइन्ट्लातला मुद्दा हम्म पुण्य कमी झाले आता सव्वा देणार्‍यांचे
30/06/2011 - 15:11 Permalink
मी-सौरभ

In reply to by सुनील

कुठल्या जगात आहात आपण?? सव्वा रुपया दक्षिणा... एकावनच्या पेक्षा कमी चालत नाही आज काल :)
30/06/2011 - 20:05 Permalink
मुलूखावेगळी

In reply to by मी-सौरभ

कुठल्या जगात आहात आपण?? सव्वा रुपया दक्षिणा... एकावनच्या पेक्षा कमी चालत नाही आज काल
मला सव्व्वा रुपयाला असलेला मान आता राहिला नाही असे म्ह्नायचे होते. बरे झाले तुम्ही शेअर प्रमाने सध्याचे अपडेटेड दक्षिणा सांगितलीत. - टकाटकसौरभ
30/06/2011 - 20:45 Permalink
किसन शिंदे

ऋषिकेश, छान लेख आहे. वर सुनील यांनी सांगीतल्याप्रमाणे बाद झालेल्या वस्तुंचे लेख लिहण्यात तु पटाईत आहेस. आज सकाळीच मटामध्ये हि बातमी वाचता वाचता २०-२२ वर्षापुर्वीच्या आठवणी क्षणात डोळ्यासमोर आल्या. १९८२ पासुनचे २५ पैसे पाहीले आहेत पण त्याआधीचे कधी पहायला नाही मिळाले.
30/06/2011 - 15:27 Permalink
चिरोटा

In reply to by अमोल केळकर

आणि बारा आण्याच्या मसाल्यासाठी चार आणे सुटे लागणारच तेव्हा तो पण गेला. कोंबडी गेली मसाला गेला ,हाती आली महागाई. मस्त लेख र्‍हुषिकेश.
30/06/2011 - 18:34 Permalink
राही

चवली म्हणजे चार आणे नव्हेत. शतमानपद्ध्तीच्या आधी सोळा आण्यांचा रुपया असताना एक आणा दोन आणे चार आणे अशी नाणी असायची. पावली म्हणजे अर्थातच रुपयाचा म्हणजे सोळा आण्यांचा पाव हिस्सा म्हणजे चार आणे.आणि चवली म्हणजे दोन आणे. चवलीपावली असा जोडशब्दही पूर्वी प्रचारात होता. चवली चे चवन्नी ह्या हिंदी शब्दाशी साम्य असले तरी अर्थ समान नाही. हिंदीमध्ये चाराणे आठाणे असे न म्हणता चवन्नी अठन्नी म्हणत असत.
30/06/2011 - 15:55 Permalink
ऋषिकेश

In reply to by राही

खरं आहे. खुलासा: एक आणा म्हंजे ६ जुने पैसे. चाराणे म्हंजे २४ पैसे.. रुपया म्हंजे १६ आणे किंवा ९६ जुने पैसे.. मात्र नवा पैसा आल्यावर पंचवीस पैशापेक्षा लोक त्याला चवली / चाराणे म्हणणेच पसंत करत / करतात. तसेच हा ललित लेख असल्याने माहितीपेक्षा भावना, बोलीभाषा महत्त्वाची ठेवण्याचा उद्देश असल्याने लेखात तोच शब्द ठेवला आहे
30/06/2011 - 16:45 Permalink
गवि

फार छान रे.. नॉस्टाल्जिक.. अंडे किंवा बसचे तिकीट अशा जिनसा या एका नाण्यात घेतल्याचे आठवत आहे.
30/06/2011 - 16:24 Permalink
धमाल मुलगा

नॉस्टॅल्जिक का कायसं म्हणतात ते तसं झालं. चार आण्याचे पेरु, चार आण्याची बोरं, चार आण्याची चाकलिटं,चार आण्याचा पेप्सिकोला...... आणि कॉलेजात गेल्यावर वर्गात एखाद्या पोरीला किंवा पिडणार्‍या मास्तरला वैताग आणणारा चार आण्याचं चकचकीत नाणं वापरुन कवडसे पाडायचा खेळ... असो. पायली-शेर गेले, पैसा-आणा तर आम्ही पाहिलेलाही नाही..आता चार आणे गेले. स्थित्यंतर हा सृष्टीचा नियम आहे हे मान्य करायचं आणि बदल स्विकारुन पुढं जायचं. :)
30/06/2011 - 16:32 Permalink
अत्रुप्त आत्मा

ते एशियाडच चिन्ह बघुन फार बर वाटल...एशियाड च्या एका सिंबॉलवर तेंव्हा काय काय चालायच?आठवतय?पहिली एस टी ची एशियाड सेवा आठवेल...(काळ्या/पिवळ्या टेक्सीचा उरला सुरला धंदा हीनीच खाल्ला...आमच्या आईच्या भाषेत..''आवदसा मेली'').नंतर निळ्या रंगाचे हाफ किंवा फुल स्पोर्ट शर्ट्स त्याच्या पाठीवर हा लोगो असायचा...चार अण्यावर तर असायचाच,पण १रुपायावर फार मुष्कीलीनी दिसायचा,मग तसल्या रुपायाला लई भाव चढला होता...(आमी बी तवा धंदा केला...ह्ही ह्ही)...हे सगळ आठवल..बर वाटल...त्यामुळे लेखकाचे अभिनंदन
30/06/2011 - 16:42 Permalink
गवि

नाण्यावर कागद ठेवून, वरून पेन्सिल घासून "छाप" काढण्याचा उद्योग केल्याचे आठवते का? किंवा रेल्वे गावातून जात असल्यास रुळावर नाणे चिकटवून ते चप्पटपत्रा करण्याचा निरुद्योग?
30/06/2011 - 16:45 Permalink
स्वाती दिनेश

ऋ, लेख आवडलाच, थोडा हळवा करुन गेला.. १,२, ५, १० आणि २० पैसे कधीच बाद झालेत.. आज चार आणेही चालले.. २० पैशाचं षटकोनी नाणं येण्याआधी पिवळं गोलं जड नाणं होतं,(आमच्या लहानपणी) ते मला भारी आवडायचं आणि चार आण्याचं नाणं त्याहून लहान! त्यामुळे त्याच्या ऐवजी २० पैशाचं ते जड पितळी नाणं हवं असायचं.. स्वाती
30/06/2011 - 18:00 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>चार आण्याच्या नाण्यावर बंदी आजपासून सुरु होईल मात्र आठवणींच्या कप्प्यातल्या मळक्या चड्डीच्या खिशातून डोकावणारे, बोली भाषेत रुतलेले चार आणे मात्र काही पिढ्या सरेपर्यंत तरी रद्द करता येणार नाहीत. :( -दिलीप बिरुटे
30/06/2011 - 18:07 Permalink
अनामिक

सुंदर लेख. ५, १०, २० पैसे केव्हाच बाद झालेत. आता चार आणे बाद होतायत. एक काळ संपला म्हणायचं! ही सगळी नाणी साठवून ठेवायला हवीत... किमान आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी तरी.
30/06/2011 - 18:30 Permalink
विकास

लेख एकदम आवडला. आता अशी नाणी (१, ५, १०, २०, २५) ऐतिहासीक म्हणून जपून ठेवायला हवीत.
30/06/2011 - 18:40 Permalink
स्मिता.

लेख आवडला. नॉस्टॅल्जिक करून गेला. मला वाटतं इथे मिपावर असलेल्या सर्वांनीच, कमीतकमी बालपणी तरी, चार आणे हाताळले/व्यवहारात वापरले आहेत. खरंच त्या वेळी किती किंमत होती त्या चार आण्यांनाही! आज ते बाद झाल्याचे वाजून जरा हुरहुर वाटली. लहानपनी तेच एक नाणे असे होते की जे आम्हाला हक्काने जवळ ठेवता यायचे आणि त्यात पेप्सी कोला, बोरं अश्या वस्तू मिळायच्या. पेन्सिलीचा छापा पण चार आणे किंवा २० पैश्यांचाच छान उमटायचा. लहानपणी जेव्हा माझी आजी १/२ पैसा, १ पैसा याबद्दल सांगायची तेव्हा भारी गंमत वाटायची की इतके कमी किमतीचेही नाणे होते. (त्यावेळी सर्वात कमी किमतीचे चलनी नाणे ५ पैश्याचे होते.) आता तशीच गंमत आपल्या पुढच्या पिढीला चार आणे आणि आठ आण्यांबद्दल वाटेल.
30/06/2011 - 19:27 Permalink
पैसा

एकेक जुन्या वस्तू सगळ्या बाद होतायत, आम्ही पण हळूहळू असेच बाद होऊ. ....... :(
30/06/2011 - 19:46 Permalink
राजेश घासकडवी

In reply to by पैसा

पैसा केव्हाच गेला. म्हणजे एक पैशाचं नाणं. आता पैसे-रुपये या अर्थानेसुद्धा ते हळूहळू जातच आहेत. सगळं क्रेडिट कार्डावर पडणार. बाकी लेख मस्तच. चार आण्याची किंमत दोन कारणांमुळे कमी झाली - एक म्हणजे अर्थातच महागाई. दुसरं म्हणजे लहान असताना अगदी थोड्या पैशांचंदेखील मोल असतं. पोट मोठं झाल्यानंतर भूक वाढते आणि चार आण्यांच्या बोरांतून पूर्वीइतकी मजाही येत नाही. ती मजा हरवण्याचं दुःख जास्त त्रासदायक. ही आठवण करून देणारा लेख.
30/06/2011 - 20:47 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by राजेश घासकडवी

आता पैसे-रुपये या अर्थानेसुद्धा ते हळूहळू जातच आहेत. सगळं क्रेडिट कार्डावर पडणार.
निदान नोटा, नाणी रहावीत, नॉस्टाल्जियाचा त्रास म्हातार्‍या पिढीला फार होऊ नये म्हणूनतरी कागदी/धातूचं चलन रहावं. भले त्यामुळे थोडाबहुत भ्रष्टाचार, काळाबाज राहिला तरी चालेल. वय झाल्यानंतर भूक मंदावते, दात नसले तर आता नवेही मिळतात, तरीही ते दु:ख का होतं?
30/06/2011 - 21:01 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

गेले बरेच महिने माझ्याकडे चाराण्याचं एक नाणं आहे. काही महिने मी ते नाणं खर्च करण्याचा प्रयत्न केला, जमेना, म्हणून सोडून दिलं. नाणं तसंच वॉलेटमधे राहिलं. काल ही बातमी वाचली आणि ते खर्च न झाल्याचा आनंद झाला. काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी, "माझ्याकडे आहे नवीनतम चार आण्याचं नाणं!" असं म्हणून कूल पॉईंट्स मिळवता येतील.
30/06/2011 - 20:55 Permalink
Nile

चार आणे दूकानदारांनी घेणं केव्हाच बंद झालं होतं, ते जाणार याची चिन्हं तेवहच दिसली होती. असो. मला तर सर्वात मोठा प्रॉब्लेम वाटतोय म्हणजे; आता पूढच्या पिढीला 'चार आण्याचे तीन आणले..' गाणं समजावून सांगताना चार आणे म्हणजे काय हे सूद्धा समजावून सांगावे लागणार!! ;-) बाकी लेख ऋ-स्टाईलच!
30/06/2011 - 22:31 Permalink
अनिवासि

किवा रेल्वे गावातुन जात असताना -------- हा उद्योग शिवाजीनगर स्टेशनवर गाड्या बघण्यात वेळ घालवताना केल्याचे आठवते. पण चार आणे नाहीत- एक पैसा! कोणी पै चा उलैख केला नाही-- फारच जुनी गोष्ट आहे!
30/06/2011 - 22:32 Permalink
५० फक्त

अतिशय मस्त लेख आणि छान प्रतिसाद. माझ्या आई बाबांच्यामुळे माझ्याकडं अजुन एक दोन पैसा, चार आण्याचे बरेच व्हर्ज्ञन आहेत. सोलापुरातली २२ नंबर बस, सावरकर मैदान ते सात रस्ता, पैलवानचं पानाचं दुकान , काश्मिरी सुपारी, त्यातले स्टिकर, हिमॅन वैग्रे, आता या सगळ्यावर लिहावं लागेल. डोळे भरुन येतात म्हणुन टाळत होतो पण आता लिहावंच लागेल.
01/07/2011 - 07:40 Permalink
धनंजय

छान स्मृती. माझ्या संगणकावर काही चित्रे (क्रमांक २, ३, ४, ६) उभ्यात ताणलेली दिसत आहेत. ती ठीक करता येतील काय? (दोन वेगवेगळ्या संगणकांवर बघितली - विंडो/उबुंटु तरी हा दोष दिसत आहे.) चित्र क्रमांक ५ (हरिण आणि वृक्षाचा छाप): या चित्रामधली प्रकाशयोजना आश्चर्यकारक आणि गमतीदार आहे. क्षणभर मला असा दृष्टिभ्रम झाला, की हरिणाचे चित्र प्रतलापासून खोलगट आहे! (वस्तुतः खोलगत नसून चित्राला प्रतलापासून उठाव आहे.)
02/07/2011 - 02:53 Permalink