✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यू टू, क्रान्तिताई?

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 06/16/2011 - 06:06  ·  लेख
लेख
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे. पण त्या यादीत क्रान्ति हे नाव आलेलं दिसल्यावर मन दिग्मूढ का काय म्हणतात ते झालं. आपल्या मत्प्रिय भारतभूचं स्तन्य पिऊन वाढलेली हिंदू संस्कृती व तिने जन्म दिलेल्या पवित्र पूजनीय परंपरा. कोणाही हिंदूला त्या परंपरा प्राणप्रियच आहेत. त्यांची अशी घोर खिल्ली उडवणारं काव्य तुम्ही प्रसवावं? तुम्ही? आमचा भ्रमनिरास झाला. अहो, तुम्ही आत्तापर्यंत इतक्या समर्थ कविता लिहिल्या. आत्ताच ही थेरं का सुचली? बरं, लोकही या सडक्या काव्याला कचराकुंडीची योग्य जागा दाखवा म्हणण्याऐवजी टाळ्या पिटत आहेत हा दैवदुर्विलासच. हिंदू संस्कृतीत स्त्री ही मातेसमान असते. देवीसमान असते. सगळ्या बह्मांडाची जननी म्हणजे स्त्री. तिच्याशी असलेलं लग्नाचं बंधन हे अत्यंत पवित्र. प्रकृती आणि पुरुष यांच्या संगमाचं प्रतीकच. आणि त्या पवित्र बंधनाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा. तो तर परमपवित्र. आणि अशा परमपवित्र दिवशी होणारी ती पूजा म्हणजे तर परमपरमपवित्र. या परमपरम वरूनच परंपरा हा शब्द आलेला आहे हे कोणाही मूढाला कळावं. परात्परा हे देवाला म्हटलं जातं. आता परापेक्षा जो परा असेल तो देव, तर परमपेक्षा जे परा असेल ते सर्वश्रेष्ठच नाही का? वेगळी व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे फावड्याला फावडं न म्हणणंच ठरेल. अशा दैवतासमान पूजा-परंपरेची चेष्टा करण्याचा तुम्हाला काय अधिकार पोचतो? वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे? या कडव्यात तुम्ही वड जणू काही यमालाच उलट प्रश्न करतो असं दाखवलं आहे. यम म्हणजे प्रत्यक्ष धर्म. सर्वज्ञ. नचिकेताला (की उद्दालकाला... जे कोण असेल ते...) सर्व जन्म मृत्यूचं रहस्य सांगणारा. स्वतःदेखील पूजनीय असला म्हणून काय झालं, वड प्रत्यक्ष यमाला प्रतिप्रश्न करेल? शक्यच नाही. आपलं कर्म प्रत्येकाने करावं हे कर्मसिद्धांतात सांगितलं आहेच. मग ते कर्म न करता यमाला जाब विचारण्याचं धाडस वड करेल हे बुद्धीला पटत नाही, अंतःकरणाला तर नाहीच नाही. असं असताना तुम्ही त्याला आपल्या हातची कठपुतळी करून त्याच्या तोंडी हवे ते शब्द घालता. आणि वाचक वाचतात, केवळ क्रान्ति यांचं नाव आहे म्हणून ही कला आहे असं समजून वा वा म्हणतात. सगळंच अगम्य. कलियुग आहे दुसरं काय... पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा नवर्‍यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!" हिंदू संस्कृतीत पत्नीने पतीशी कसं वागावं याचे निश्चित नियम आहेत. स्त्रिया या देवीसमान वंदनीय असल्या तरी त्यांच्यासाठी त्यांचा पती हा देवाप्रमाणे वंदनीय असतो. एकच प्याला मधली सिंधू हा भारतीय स्त्रियांचा आदर्श आहे. असं असताना त्या नवऱ्याला दुरुत्तरं करतात, बावळा म्हणतात असं दर्शवणंसुद्धा या प्रतिमांना घातक आहे. असल्या लेखनामुळेच लोकांच्या मनात काहीबाही कल्पना निर्माण होतात. नाहीतर निरागस, देवीसदृश भारतीय स्त्री आपल्या पतीला असे अपशब्द बोलू धजेल काय? पण पाश्चात्यांच्या अंधानुकरणातून असं लेखन येतं. मग पायातली वहाण पायात न रहाता गालावर थपडा मारायला येते. स्वैराचार बोकाळतो. व त्याची अंततः परिणती वर्णसंकरात होते. इतक्या सुंदर, पवित्र व पूजनीय समाजव्यवस्थेची एखाद्या कवीच्या अधिकारांसाठी पायमल्ली झालेली कधीच योग्य नाही. कलाकारांनी आपल्या कलाकृतीचा समाजावर होणारे गंभीर परिणाम ध्यानी ठेवले पाहिजेत. आंबे, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे! आपल्या प्राचीन वैदिक संस्कृतीत पुरोहिताला हजारो वर्षांपासून उच्च स्थान दिलेलं आहे. आपल्या पितरांना व देवांना अग्निमार्फत अन्न, प्रसाद, शुभेच्छा वगैरे पाठवण्यासाठी आपले पूर्वज यज्ञ करत. या यज्ञाचं पौरोहित्य ब्राह्मण करत. म्हणजे अग्निमार्गे स्वर्गापर्यंत हवनात अर्पण केलेले पदार्थ पोचतील याची काळजी ते घेत. एका अर्थाने हविरूपी मेंढ्यांचं मेंढपाळत्वच पार पाडत असे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. असा ज्ञानी ब्राह्मण जेव्हा दक्षिणा स्वीकारतो ती यजमानावर कृपाभिलाषाच असते. दक्षिणा देताना कोण कोणाला नमस्कार करतो तेवढं फक्त सांगा. अशा दक्षिणेल तुम्ही लाच म्हणता? शब्द हे धारदार अस्त्र असतं. ते जपून वापरावं. विशेषतः समाजाच्या पूजास्थानांविरोधी ती भिरकावली जातात तेव्हा. वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!" ही तर सर्वात अश्लाघ्य पंक्ती आहे. आता अश्लाघ्य हा शब्द वर्तनाला लागू होतो, पंक्तीला लागू होतो की नाही असले पंक्तीप्रपंचाचे वाद विचारवंत करतीलच. आम्हाला तमा नाही. त्यांचे ते विचार देखील अश्लाघ्यच. लग्न झालेल्या पुरुष व स्त्रिया दोहोंनी वैविध्य अनुभवावं असं तुम्ही यातून सूचित करत आहात. पुरुषाने वैविध्याचा अनुभव घेण्यास शास्त्राची काहीच हरकत नाही. मात्र तोच न्याय तुम्ही स्त्रियांनादेखील लावू पहाता आहात! हे उघडउघड स्वैराचाराला आमंत्रण आहे. शांतं पापं शांतं पापं... तुम्ही अशा पंक्ती लिहून हिंदू रूढीरूपी स्त्रीच्या अंगावरचे आत्मसन्मानाचे कपडे ओरबाडून काढून त्यांना नागवं करत आहात. आणि तेदेखील बंधनमुक्त करण्याच्या, स्वातंत्र्य देण्याच्या कृतक अभिनिवेषाखाली. धिक् धिक् धिक्. अजूनही वेळ गेलेली नाही. झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही जाहीर क्षमा मागा. आणि यापुढे असले वादग्रस्त विषय हाताळणं सोडून द्या. इतर कवींकडे पहा की - ते कसे आपलं मन, भावना, पाऊस, मोहरून जाणं वगैरेवर कविता लिहितात. ते विषय तुम्हाला उपलब्ध नाहीत काय? त्यांवर हजारोंनी कविता झाल्या हे कारण पुरेसं नाही. अजून लाखो लिहिता येतील. जर तुम्हाला मदत हवी असल्यास हे,हे व हे पहा. ते झाल्यानंतर आजकालच्या पूज्य पुरोहितांना विचारून काय प्रकारची शांत करावी लागेल याचा सल्ला घ्या. देव सर्वकृपाळू असतो, त्यामुळे सर्व अपराधांतून योग्य ते प्रायश्चित्त घेतल्यावर मुक्त करतो. तसा तो तुम्हालाही दया दाखवेल अशी खात्री आहे. आणि हो, दक्षिणा दिल्यावर पुरोहिताच्या पाया पडायला विसरू नका.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कविता
विनोद
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
वाद
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13368 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

माझ्या लक्षात कशासाठी आले

गणेशा
गुरुवार, 06/16/2011 - 18:40 नवीन
माझ्या लक्षात कशासाठी आले पाहिजे ? काहि कळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

स्वानंद भाऊ, तुम्हारा गल्ली

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 06/17/2011 - 14:45 नवीन
स्वानंद भाऊ, तुम्हारा गल्ली चुक्याच. असे दुवे द्यायचे नाही. जे जसे होते आहे ते चालू राहू द्यावे. साप बुलबुलाला खात असेल तर मध्ये पडतो का आपण? निसर्गनियम पाळावेत.... गणेशा, ते तुझ्या लक्षात आले पाहिजे अशी सक्ती नाही. खरे तर नाही आले तर धाग्याच्या दृष्टीने जास्त चांगले :-) गोंधळ अजून थोडा वाढला की हा धागा साधारण प्रियदर्शनच्या चित्रपटाच्या पटकथेसारखा वाटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

परापेक्षा परा असेल तो देव,

सूड
गुरुवार, 06/16/2011 - 14:04 नवीन
मग परा कोण ??
  • Log in or register to post comments

कुटं असत्यात

क्रान्ति
गुरुवार, 06/16/2011 - 16:34 नवीन
आजकालच्या पूज्य पुरोहितांना विचारून काय प्रकारची शांत करावी लागेल याचा सल्ला घ्या. देव सर्वकृपाळू असतो, त्यामुळे सर्व अपराधांतून योग्य ते प्रायश्चित्त घेतल्यावर मुक्त करतो. तसा तो तुम्हालाही दया दाखवेल अशी खात्री आहे. आणि हो, दक्षिणा दिल्यावर पुरोहिताच्या पाया पडायला विसरू नका. कुटं असत्यात म्हनायचं ह्ये पू. पु.? आनि शांत बिंत कराची म्हंजे लै मोटा कुटाना आस्तो म्हने. त्ये होम काय न हवन काय न बरच काय काय आस्त न्हव? आमी कंदी द्येवाधरमाचं काय बी न्हाय केल्याल, आमाला कुटं ह्ये सम्द जमनार हाय? त्यापरीस यकांदी डोस्क्याच्या चार फूट वरून जानारी जड कविता लिवली यमासाटनं तर चालनार न्हाई का? त्ये बी प्रायचित का काय मंत्यात, तसच व्हईल न्हव? ;) बाकी आपलं लिखान आमाला लै लै भावल बगा. यकदम कडक. आमचे चौत्या वर्गातले गुर्जी बोलायचे तस. [चौतीनंतर साळाच सोडली, म्हनुन त्येच आटवले.] ;)
  • Log in or register to post comments

आमचे चौत्या वर्गातले गुर्जी

सुहास..
गुरुवार, 06/16/2011 - 16:44 नवीन
आमचे चौत्या वर्गातले गुर्जी बोलायचे तस. [चौतीनंतर साळाच सोडली, म्हनुन त्येच आटवले.] >>> =)) =)) _/\_
  • Log in or register to post comments

लेख मांडणी उत्तम जमली

अभिज्ञ
गुरुवार, 06/16/2011 - 18:18 नवीन
लेख मांडणी उत्तम जमली आहे. परंतु हा "वैचारिक दहशतवाद" कशासाठी? असा एक प्रश्न पडून गेला. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

आणखी एक विचारजंती

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/16/2011 - 22:47 नवीन
आणखी एक विचारजंती प्रतिक्रिया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

हा हा हा हा! मस्तं!!

अनामिक
गुरुवार, 06/16/2011 - 18:27 नवीन
हा हा हा हा! मस्तं!!
  • Log in or register to post comments

हा हा हा हा! मस्तं!!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 06/16/2011 - 19:03 नवीन
हा हा हा हा! मस्तं!!
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
गुरुवार, 06/16/2011 - 19:11 नवीन
+१ वडाच्या पारंब्यांवर झोके घेण्याचे स्वातंत्र्य आहे, पण वडाला बांधलेल्या धाग्याच्या जवळ तुमच्या जोका गेल्या, त्या ठिकाणी तुमचे स्वातंत्र्य संपले.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 06/16/2011 - 19:13 नवीन
कवितेचं "रसग्रहण" आणि प्रतिक्रिया वाचून धम्माल आली! क्रान्ति, आता प्रायश्चित्त म्हणून "रेडा" म्हणे वडाला अशी कविता पाड!
  • Log in or register to post comments

हत्ती

तिमा
गुरुवार, 06/16/2011 - 20:58 नवीन
लेख खूपच आवडला. पण प्रतिक्रिया वाचून एक हत्ती व तीन आंधळे या गोष्टीची आठवण झाली. असो. प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणेच प्रतिक्रिया देणार!
  • Log in or register to post comments

लै भारी!

स्वाती२
Fri, 06/17/2011 - 02:46 नवीन
लै भारी! :D
  • Log in or register to post comments

मस्तच. पु ले शु...

डॉ.श्रीराम दिवटे
Fri, 06/17/2011 - 12:54 नवीन
मस्तच. पु ले शु...
  • Log in or register to post comments

भेजा फ्राय मराठीत आला

प्यारे१
Fri, 06/17/2011 - 16:05 नवीन
भेजा फ्राय मराठीत आला का? अर्थात मराठीत रुपांतरीत चित्रपट पाहणाराचा 'भेजा फ्राय' होणे निश्चित असते तसेच काहीतरी...
  • Log in or register to post comments

घासकडवी काकाने कामाला लावलंय

टारझन
Fri, 06/17/2011 - 17:12 नवीन
घासकडवी काकाने कामाला लावलंय सगळ्याला .. आणी सगळे बगळे बसलेत बोर्ड बडवत =)) काही काही प्रतिक्रीया चावुन करमणुक झाली. अर्थात कोणी कशी प्रतिक्रीया लिहावी हे सांगण्याचा हक्क मला नाही ,मी आपलं एक निरिक्षण णोंदवलं. - वडानाथ बाभळे
  • Log in or register to post comments

हं...

राजेश घासकडवी
Fri, 06/17/2011 - 19:23 नवीन
हं... हे आले आणखीन एक विचारजंती. वटपौर्णिमाद्वेष्टे. रूढीनिंदक. क्रान्तिंच्या वडावरच्या कवितेला दिलेला तुमचा प्रतिसाद बोलका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बेस्ट

सहज
Sun, 06/19/2011 - 15:14 नवीन
गुर्जी _/\_ लेख आवडला. क्रांतीताईंची कविताही छान. :-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा