✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यू टू, क्रान्तिताई?

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 06/16/2011 - 06:06  ·  लेख
लेख
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे. पण त्या यादीत क्रान्ति हे नाव आलेलं दिसल्यावर मन दिग्मूढ का काय म्हणतात ते झालं. आपल्या मत्प्रिय भारतभूचं स्तन्य पिऊन वाढलेली हिंदू संस्कृती व तिने जन्म दिलेल्या पवित्र पूजनीय परंपरा. कोणाही हिंदूला त्या परंपरा प्राणप्रियच आहेत. त्यांची अशी घोर खिल्ली उडवणारं काव्य तुम्ही प्रसवावं? तुम्ही? आमचा भ्रमनिरास झाला. अहो, तुम्ही आत्तापर्यंत इतक्या समर्थ कविता लिहिल्या. आत्ताच ही थेरं का सुचली? बरं, लोकही या सडक्या काव्याला कचराकुंडीची योग्य जागा दाखवा म्हणण्याऐवजी टाळ्या पिटत आहेत हा दैवदुर्विलासच. हिंदू संस्कृतीत स्त्री ही मातेसमान असते. देवीसमान असते. सगळ्या बह्मांडाची जननी म्हणजे स्त्री. तिच्याशी असलेलं लग्नाचं बंधन हे अत्यंत पवित्र. प्रकृती आणि पुरुष यांच्या संगमाचं प्रतीकच. आणि त्या पवित्र बंधनाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा. तो तर परमपवित्र. आणि अशा परमपवित्र दिवशी होणारी ती पूजा म्हणजे तर परमपरमपवित्र. या परमपरम वरूनच परंपरा हा शब्द आलेला आहे हे कोणाही मूढाला कळावं. परात्परा हे देवाला म्हटलं जातं. आता परापेक्षा जो परा असेल तो देव, तर परमपेक्षा जे परा असेल ते सर्वश्रेष्ठच नाही का? वेगळी व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे फावड्याला फावडं न म्हणणंच ठरेल. अशा दैवतासमान पूजा-परंपरेची चेष्टा करण्याचा तुम्हाला काय अधिकार पोचतो? वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे? या कडव्यात तुम्ही वड जणू काही यमालाच उलट प्रश्न करतो असं दाखवलं आहे. यम म्हणजे प्रत्यक्ष धर्म. सर्वज्ञ. नचिकेताला (की उद्दालकाला... जे कोण असेल ते...) सर्व जन्म मृत्यूचं रहस्य सांगणारा. स्वतःदेखील पूजनीय असला म्हणून काय झालं, वड प्रत्यक्ष यमाला प्रतिप्रश्न करेल? शक्यच नाही. आपलं कर्म प्रत्येकाने करावं हे कर्मसिद्धांतात सांगितलं आहेच. मग ते कर्म न करता यमाला जाब विचारण्याचं धाडस वड करेल हे बुद्धीला पटत नाही, अंतःकरणाला तर नाहीच नाही. असं असताना तुम्ही त्याला आपल्या हातची कठपुतळी करून त्याच्या तोंडी हवे ते शब्द घालता. आणि वाचक वाचतात, केवळ क्रान्ति यांचं नाव आहे म्हणून ही कला आहे असं समजून वा वा म्हणतात. सगळंच अगम्य. कलियुग आहे दुसरं काय... पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा नवर्‍यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!" हिंदू संस्कृतीत पत्नीने पतीशी कसं वागावं याचे निश्चित नियम आहेत. स्त्रिया या देवीसमान वंदनीय असल्या तरी त्यांच्यासाठी त्यांचा पती हा देवाप्रमाणे वंदनीय असतो. एकच प्याला मधली सिंधू हा भारतीय स्त्रियांचा आदर्श आहे. असं असताना त्या नवऱ्याला दुरुत्तरं करतात, बावळा म्हणतात असं दर्शवणंसुद्धा या प्रतिमांना घातक आहे. असल्या लेखनामुळेच लोकांच्या मनात काहीबाही कल्पना निर्माण होतात. नाहीतर निरागस, देवीसदृश भारतीय स्त्री आपल्या पतीला असे अपशब्द बोलू धजेल काय? पण पाश्चात्यांच्या अंधानुकरणातून असं लेखन येतं. मग पायातली वहाण पायात न रहाता गालावर थपडा मारायला येते. स्वैराचार बोकाळतो. व त्याची अंततः परिणती वर्णसंकरात होते. इतक्या सुंदर, पवित्र व पूजनीय समाजव्यवस्थेची एखाद्या कवीच्या अधिकारांसाठी पायमल्ली झालेली कधीच योग्य नाही. कलाकारांनी आपल्या कलाकृतीचा समाजावर होणारे गंभीर परिणाम ध्यानी ठेवले पाहिजेत. आंबे, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे! आपल्या प्राचीन वैदिक संस्कृतीत पुरोहिताला हजारो वर्षांपासून उच्च स्थान दिलेलं आहे. आपल्या पितरांना व देवांना अग्निमार्फत अन्न, प्रसाद, शुभेच्छा वगैरे पाठवण्यासाठी आपले पूर्वज यज्ञ करत. या यज्ञाचं पौरोहित्य ब्राह्मण करत. म्हणजे अग्निमार्गे स्वर्गापर्यंत हवनात अर्पण केलेले पदार्थ पोचतील याची काळजी ते घेत. एका अर्थाने हविरूपी मेंढ्यांचं मेंढपाळत्वच पार पाडत असे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. असा ज्ञानी ब्राह्मण जेव्हा दक्षिणा स्वीकारतो ती यजमानावर कृपाभिलाषाच असते. दक्षिणा देताना कोण कोणाला नमस्कार करतो तेवढं फक्त सांगा. अशा दक्षिणेल तुम्ही लाच म्हणता? शब्द हे धारदार अस्त्र असतं. ते जपून वापरावं. विशेषतः समाजाच्या पूजास्थानांविरोधी ती भिरकावली जातात तेव्हा. वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!" ही तर सर्वात अश्लाघ्य पंक्ती आहे. आता अश्लाघ्य हा शब्द वर्तनाला लागू होतो, पंक्तीला लागू होतो की नाही असले पंक्तीप्रपंचाचे वाद विचारवंत करतीलच. आम्हाला तमा नाही. त्यांचे ते विचार देखील अश्लाघ्यच. लग्न झालेल्या पुरुष व स्त्रिया दोहोंनी वैविध्य अनुभवावं असं तुम्ही यातून सूचित करत आहात. पुरुषाने वैविध्याचा अनुभव घेण्यास शास्त्राची काहीच हरकत नाही. मात्र तोच न्याय तुम्ही स्त्रियांनादेखील लावू पहाता आहात! हे उघडउघड स्वैराचाराला आमंत्रण आहे. शांतं पापं शांतं पापं... तुम्ही अशा पंक्ती लिहून हिंदू रूढीरूपी स्त्रीच्या अंगावरचे आत्मसन्मानाचे कपडे ओरबाडून काढून त्यांना नागवं करत आहात. आणि तेदेखील बंधनमुक्त करण्याच्या, स्वातंत्र्य देण्याच्या कृतक अभिनिवेषाखाली. धिक् धिक् धिक्. अजूनही वेळ गेलेली नाही. झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही जाहीर क्षमा मागा. आणि यापुढे असले वादग्रस्त विषय हाताळणं सोडून द्या. इतर कवींकडे पहा की - ते कसे आपलं मन, भावना, पाऊस, मोहरून जाणं वगैरेवर कविता लिहितात. ते विषय तुम्हाला उपलब्ध नाहीत काय? त्यांवर हजारोंनी कविता झाल्या हे कारण पुरेसं नाही. अजून लाखो लिहिता येतील. जर तुम्हाला मदत हवी असल्यास हे,हे व हे पहा. ते झाल्यानंतर आजकालच्या पूज्य पुरोहितांना विचारून काय प्रकारची शांत करावी लागेल याचा सल्ला घ्या. देव सर्वकृपाळू असतो, त्यामुळे सर्व अपराधांतून योग्य ते प्रायश्चित्त घेतल्यावर मुक्त करतो. तसा तो तुम्हालाही दया दाखवेल अशी खात्री आहे. आणि हो, दक्षिणा दिल्यावर पुरोहिताच्या पाया पडायला विसरू नका.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कविता
विनोद
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
वाद
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13358 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

खुप कश्ट घेतले आहेत. फुकट

नरेशकुमार
गुरुवार, 06/16/2011 - 06:26 नवीन
मनोरंजनका बाप ! खुप कश्ट घेतले आहेत. फुकट जान्याचि अनामिक भिति वाटते
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

मुक्तसुनीत
गुरुवार, 06/16/2011 - 06:44 नवीन
लई भारी ! ;-) - सत्यवान हुसैन !
  • Log in or register to post comments

हे अतिशयोक्त रसात उकळून वडाला

यकु
गुरुवार, 06/16/2011 - 07:23 नवीन
हे अतिशयोक्त रसात उकळून वडाला गुंडाळलेल्या दोर्याप्रमाणे घट्ट जुळून आलेले स्फूट वाचताना ह्सून हसून ह्रदयाच्या शीरा मोकळ्या झाल्या...!
  • Log in or register to post comments

केविल्वाणा लेख

आत्मशून्य
गुरुवार, 06/16/2011 - 07:43 नवीन
.
  • Log in or register to post comments

हाहाहा! मस्त!

प्राजु
गुरुवार, 06/16/2011 - 08:04 नवीन
हाहाहा! मस्त!
  • Log in or register to post comments

लै भारि आता बाबा रामदेवांनंतर

५० फक्त
गुरुवार, 06/16/2011 - 08:17 नवीन
लै भारि आता बाबा रामदेवांनंतर भारतीय सनसुक्रुति सांभाळायचे काम आपल्याकडे आलेले दिसतेय, त्याबरोबर त्या कुठल्या बेटाचा हिस्सा पण मिळाला असेलच, आमाला पण बोलवा तिथं ध्यान करायला.
  • Log in or register to post comments

__/\__

ऋषिकेश
गुरुवार, 06/16/2011 - 09:12 नवीन
__/\__ :))))
  • Log in or register to post comments

राजेश साहेब

रणजित चितळे
गुरुवार, 06/16/2011 - 09:27 नवीन
मला वाटते साहेब - क्रांतीताईंनी एक कविता लिहीली आहे ती मजा म्हणून वाचा. एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments

रणजीतसाहेब, अहो

पाषाणभेद
गुरुवार, 06/16/2011 - 09:33 नवीन
रणजीतसाहेब, अहो राजेशसाहेबांचे एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

नमस्कार

रणजित चितळे
गुरुवार, 06/16/2011 - 09:40 नवीन
पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

नै तर काय !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/16/2011 - 09:42 नवीन
साहेब - क्रांतीताईंनी एक कविता लिहीली आहे ती मजा म्हणून वाचा. एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे. नै तर काय...! क्रांती यांच्या कविता समाजातील पारंपरिक वृत्तीचा शोध घेणार्‍या डोळस अशा उच्च कविता आहेत. पारंपरिक विचारांना शब्दबद्ध करुन त्यांच्या कविता समाजातील अनिष्ट अशा प्रथांच्या डोळ्यात बोट घालतात असे आपल्या रसग्रहणावरुन आपल्याला वाट्त असेल तर आपला गैरसमज आहे. असो, बाकी आमचंही सिरियसली घेऊ नये याच्याशी सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

हे उ प हा सा त्म क ले ख न आ

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/16/2011 - 09:45 नवीन
हे उ प हा सा त्म क ले ख न आ हे.... असा डिस्क्लेमर टाकायची वेळ येणार नाही असे वाटले होते..... पण असो... उत्तम लेखन.. मजा आली
  • Log in or register to post comments

+१००००००००००००००००० (शून्ये कमी जास्त झाली असली तर समजून घेणे)

नितिन थत्ते
गुरुवार, 06/16/2011 - 09:49 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत आहे. आपल्या थोर्थोर परंपरांवर चिखलफेक करण्याची ही विचारजंती प्रवृत्ती मुळापासून नष्ट व्हायला हवी. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यांना काय समजावणार? आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....
  • Log in or register to post comments

असंच म्हणतो...

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/16/2011 - 20:49 नवीन
आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....
अगदी अगदी खरं. क्रान्ति यांनी ईद किंवा मोहरमची चेष्टा करणारी कविता लिहून दाखवावी व ती 'त्यांच्या' खिमापाव वगैरे संस्थळांवर टाकून दाखावी असं जाहीर आव्हान आहे. ती तशी त्यांनी आधीच टाकलेली असली तरी आम्ही फारतर, 'बरं बरं, त्यांनी तसं केलंय खरं, पण तरी आमचा मुद्दा बदलत नाही' असंही म्हणू. परंतु आपल्या धर्मावर अशी कविता पुन्हा आली तर हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले लोक पुन्हा त्या कवितेची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय? समभाव म्हणजे त्यांच्या व आपल्या सर्वच कवितांकडे केवळ कविता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असं हे मानतात. खरं तर ती कोणी लिहिली आहे त्याप्रमाणे आपली की त्यांची हे ठरवून त्याप्रमाणे अर्थ (किंवा अनर्थ) काढणे, हा खरा समभाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रतिसाद आवडला आणि लेखही.

नगरीनिरंजन
गुरुवार, 06/16/2011 - 21:35 नवीन
प्रतिसाद आवडला आणि लेखही. तुमचे म्हणणे मला अखेर पटले आहे. कला ही कला असते आणि तिला कोणतेही नियम लावू नयेत हे ही पटले. अशा काही मूठभर लोकांमुळेच दोन धर्मांमध्ये निरामय आणि सकस अशी सांस्कृतिक देवाणघेवाण होते आहे. उलट इतर धर्मीयांची संस्कृतीही एवढी संपन्न असताना हिंदू कलाकारांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आपल्या कलेत त्याचे काहीच प्रतिबिंब पडू दिले नाही हा त्यांचा संकुचितपणा की अज्ञान असा प्रश्न पडला (प्रतिबिंब पडले असणारच म्हणा, पण माझा एवढा अभ्यास नसल्याने मला माहित नाही एवढेच). उदाहरणार्थ एवढी युरोपियनांकडून वास्तवदर्शी कला आली पण रविवर्मा वगैरे लोक मात्र येऊनजाऊन स्वतःच्याच देवदेवता काढत बसले. खूप विचार केल्यावर मला हुसेन यांचे महत्त्व कळले. यापुढच्या काळात तरी हिंदू कलाकार आपल्या कक्षा रुंदावतील आणि इतर कलाकारांएवढे महान झाले नाही तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकतील अशी आशा आहे. उदा. "चेहर्‍यावर बुरखा घातलेली नग्न युवती" या कल्पनेतच किती थरार आहे! पण एकूणच हिंदू लोक फार रिअ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांनी प्रोअ‍ॅक्टिव्ह आणि बोल्ड व्हायची गरज आहे. या रिअ‍ॅक्टिव्हपणाची लागण मलाही झाली याबद्दल मला लाज वाटते. क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बरोब्बर उलटा निष्कर्ष

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/16/2011 - 22:25 नवीन
बरोब्बर उलटा निष्कर्ष काढून तुम्ही आमच्याशी सहमत असल्याचा कांगावा करत आहात असं वाटतं. आपणही त्यांच्यात जाऊन "चेहर्‍यावर बुरखा घातलेली नग्न युवती" वगैरे चित्रं काढावी म्हणता, मी तर असल्या अश्लाघ्य अभिव्यक्तीलाच बंदी घालावी असं म्हणतोय. त्यांचं याबाबतीत निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे. निदान असे विचार व्यक्त करताना ब धर्म, म धर्म वगैरे मुळमुळीत तरी लिहीत नाहीत. हे उदाहरण पहा. हिंदू स्त्रियांमध्ये तोकडे कपडे घालून आपल्या शरीराची उठवळ अभिव्यक्ती करण्याच्या पद्धतीवर कसे नावं घेऊन कोरडे ओढले आहेत. समान नागरी कायदा वगैरे ऐकायला छान वाटतं. पण त्याआधी विचारसरणीत समता नको का? अशी कट्टर विचारसरणी अवलंबून आपण त्यांच्या पातळीपर्यंत पोचू. संस्कृतीरक्षणासाठी तालिबानी फौजा काढू. खजुराहोतली अश्लील शिल्पं फोडून टाकू. कामसूत्र जाळून टाकू. मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन करू. मगच समान नागरी कायदा मागू. आधी समाज बदलू मग कायदे बदलू. आगरकरांनी दुसरं काय म्हटलं? ही अभिव्यक्ती फार माजलीये साली. गर्व से कहो हम ब है. (वरील वाक्य शिल्पा ब यांना उद्देशून नाही, कृपया गैरसमज नसावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

टाळ्या !!!!!! गली गली में

स्वानन्द
गुरुवार, 06/16/2011 - 23:01 नवीन
टाळ्या !!!!!! गली गली में नारा हय... राजेश घासकडवी 'ब' का नेता हय... जब तक सुरज चांद रहेगा... राजेश घासकडवी तेरा नाम रहेगा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुमचाच हा धागा आठवला

चेतन
Fri, 06/17/2011 - 00:01 नवीन
तुमचाच हा धागा आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

या प्रतिसादाला काय म्हणावं,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/17/2011 - 00:51 नवीन
या प्रतिसादाला काय म्हणावं, सडकं का विचारजंती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

श्रेय चिंतातूरजंतु

चेतन
Fri, 06/17/2011 - 01:13 नवीन
विचारता कशाला? तुम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात तुम्ही ते नक्कीच म्हणू शकता. हां, मात्र इथले काही सन्माननीय सदस्य त्यांना उद्देशून वापरलेल्या (विचारजंत) अशा शब्दांवरून जो थयथयाट करतात त्याची अपेक्षा मात्र तुम्ही आमच्यासारख्यांकडून करू नका, कारण आमच्या लेखी हे फारच फुटकळ आहे; त्यांच्या लेखी तो फार मोठा अपमान असावा असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो. हे अधिक माहितीसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सॉरी हां

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/17/2011 - 01:50 नवीन
अहो, तो प्रश्न तुम्हाला नव्हता. सॉरी हां, उगाच चोप्य-पस्ते करण्याचे कष्ट झाले तुम्हाला; मीच मेलीने नीट प्रतिसाद लिहीला नाही. तो प्रश्न चिंतातुर जंतू (चिंतातूरजंतु नव्हे!) यांना होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

प्रतिसादाचं मूल्यमापन

चिंतातुर जंतू
Fri, 06/17/2011 - 09:51 नवीन
या प्रतिसादाला काय म्हणावं, सडकं का विचारजंती?
भावना पुरेशा भडकलेल्या नाहीएत म्हणून 'सडका' रस कमी पडतोय. अर्थात, विचार पुरेसे 'जंती' नाहीत त्यामुळे तिथेही... बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खेळ सुरूच ठेवायचा असेल तर.....

नगरीनिरंजन
Fri, 06/17/2011 - 05:37 नवीन
तुम्ही दिलेल्या दुव्यात विशेष काय? आंतरजालावर शोधल्यास तुमच्या ब धर्मातले याहून वाईट वृत्तीचे अनेक धागे दिसतील. तुमच्यासारख्या तालिबानी वृत्तीच्या लोकांमुळेच आज भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या कित्येक वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत मग फरक राहिलाच कुठे? शिवाय महाशय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हेच तुम्हाला कधी कळणारच नाही. धर्म अस्तित्वातच नाही असे वागणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. ती अंगी बाळगायची सोडून तुम्ही धर्माला समभाव दाखवायला निघालात हे पाहून तुमची किती घनघोर दिशाभूल झाली आहे या विचाराने मी व्याकुळ होतो. उगाचच आगरकरांचे नाव घेऊन स्वतःच्या तालिबानी वृत्तीला उदात्त करायचा प्रयत्न करू नका. त्या आगरकरांनाही अपयशच आले हे जाता जाता नमूद करतो. असो. मानवी जीवनात कलेचे किती अपरंपार महत्व आहे हे तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? आज ही कविता नसती केली तर तुमच्या धर्मावर चढलेली पुटं कशी सुटली असती? वडाच्या झाडाचे आजवर कोणीही न ऐकलेले मनोगत आणि त्याच दुसरं 'अंग' आपल्याला कधीही पाहायला मिळाले नसते. असो. बाकीचे मुद्दे चर्चा पुढे जाईल तसे मांडीनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मेरी भावनाओंसे खिलवाड करोगे तो...

चिंतातुर जंतू
Fri, 06/17/2011 - 14:04 नवीन
तुम्ही मांडलेल्या मुद्द्यात विशेष काय? आंतरजालावर शोधल्यास कोणत्याही धर्मातले याहून सहिष्णू वृत्तीचे अनेक धागे दिसतील. तुमच्यासारख्या सडक्या सहिष्णू वृत्तीच्या लोकांमुळेच आज भारताचा सांस्कृतिक ठेवा अजिबात नसलेल्या कित्येक वास्तू उगाचच शिल्लक राहिलेल्या आहेत मग फरक राहिलाच कुठे? शिवाय महाशय, भावनातंतता म्हणजे काय हेच तुम्हाला कधी कळणारच नाही. फक्त भावनाच आणि त्याही फक्त आपल्याच भावना अस्तित्वात आहेत असे वागणे म्हणजे भावनातंतता. ती अंगी बाळगायची सोडून तुम्ही विचारांचा आदर करायला निघालात हे पाहून तुमची किती घनघोर दिशाभूल झाली आहे या विचाराने भावनेने मी व्याकुळ होतो. उगाचच कुण्या सडक्या विचारजंताचे नाव घेऊन स्वतःच्या भावनाहीन वृत्तीला उदात्त करायचा प्रयत्न करू नका. जगात सर्व विचारजंतांना अपयशच आले हे जाता जाता नमूद करतो. असो. मानवी जीवनात भावनेचे किती अपरंपार महत्व आहे हे तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? आज ही कविता नसती केली तर तुमच्या भावनांवर चढलेली विचारांची पुटं कशी सुटली असती? वडाच्या झाडाचे आजवर कोणीही न ऐकलेले मनोगत आणि त्याच दुसरं 'अंग' आपल्याला कधीही पाहायला मिळाले नसते. असो. बाकीच्या भावना चर्चा भडकेल तश्या मांडीनच. खुद के साथ बातां: हं, आले हे भावनातंत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

भावनातंतू ??

वाहीदा
Sun, 06/19/2011 - 07:22 नवीन
भावनातंतू ?? बाब्बो !! =)) =)) सगळ्याच भावना सध्या तंतूमय होत चालल्या आहेत ... डायटिंगचा परिणाम हो... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

हाहाहा!!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/16/2011 - 10:06 नवीन
हाहाहा!!!!
  • Log in or register to post comments

हम्म्म् ...

छोटा डॉन
गुरुवार, 06/16/2011 - 10:26 नवीन
काय हो गुर्जी, वेळ जाय नाहीये काय ? असो, मस्तच होता बॉ लेख. अंमळ करमणुक झाली सकाळी सकाळी. - छोटा डॉन लेखन-उपोषण हे वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याकरिता चांगले असते.
  • Log in or register to post comments

आजपासून

श्रावण मोडक
गुरुवार, 06/16/2011 - 10:27 नवीन
आजपासून आम्ही राजेश घासकडवी यांना विचारवंत म्हणणार! म्हणजे, ते आधीपासून विचारवंत आहेतच. आमच्या डोक्यात आज प्रकाश पडला. ;)
  • Log in or register to post comments

हास्यकवितेचा उपहासात्मक

दत्ता काळे
गुरुवार, 06/16/2011 - 10:57 नवीन
हास्यकवितेचा उपहासात्मक परामर्ष आवडला. बाकी, आजपासून आम्ही राजेश घासकडवी यांना विचारवंत म्हणणार! ह्याचा वैकल्पिक अर्थ इथेसुध्दा 'विचारजंत' असा असावा काय ?
  • Log in or register to post comments

ना

श्रावण मोडक
गुरुवार, 06/16/2011 - 11:08 नवीन
नाही. घासकडवी धर्मरक्षक आहेत. आज त्यांनी खरोखर पुण्यकर्म केले आहे. त्यांची आजवरची अनेक पापं या पुण्यानं धुवून निघाली आहेत. आता ते विचारवंतच आहेत. ;) गुर्जी आता छडी घेऊनच येणार मला हाणायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/16/2011 - 22:38 नवीन
श्रावण मोडकांशी सहमत आहे. (दुर्भाग्य श्रामोंचे) क्रांतीताई स्वत: किंवा त्यांची कविता अजूनही दुर्बोध वाटतात. मूळ कविताच (पाऊस, पाणी, ढग इत्यादींबद्दल) आकर्षक होत्या, आहेत व असणार. त्यांचे असे विस्कळीत स्वरुप ('परंपरा मोडणे'), आजच्या कवयित्रींना त्यामागच्या कारणांची सखोल माहिती नसणे हे त्याकाळच्या बुद्धीजीवी लोकांनी परंपरा खोडली असे म्हणावे की त्याकाळच्या मान्यताप्राप्त बहि:शाल शिक्षणाला फाट्यावर मारुन त्या काळच्या नवबुद्धीवाद्यांनी, साहित्यिकांनी खुली केलेली विचारपद्धती म्हणावे हेच मला अजून कळले नाही. क्रांतिताईंच्या वेगवेगळ्या कविता लिहीण्याची, त्यांची परंपरांत आधुनिकता बघण्याची, त्यांच्या सर्वसामान्यांना पटणार्‍या विचारांची, त्यांच्या शब्दसंपदेची, त्यांनी जाहीर व्यासपीठावर वापरलेल्या कल्पना, रूपकांची आणि ते एका जुनाट परंपरेबद्दल लिहीण्याची आणि त्याबद्दल सडक्या प्रतिक्रिया न येण्याचीच चर्चा जास्त झाली पण त्यांच्या कवितेतून त्या काय सांगू इच्छितात हे कोणीच समजवून सांगितलेले नाही. त्यांनी लिहीलेल्या कवितांमधील विचारांची कधीच चर्चा झाली नाही. त्या अजूनही आपल्या कविता लिहून, आपले विचार आपल्या देशबांधवांपर्यंत मांडू इच्छितात हे आम्ही त्यांच्या मित्रगणाकडूनही ऐकले कारण त्या तशा आमच्या फेसबुकावरच्या मैत्रीण आहेत. त्यांचे मराठीवरही नितांत प्रेम आहे. अन आपण सांस्कृतिक राजधानीपासून लांब रहात असलो तरी परंपरांवरच घाला घालणार्‍या कविता का केल्या आहेत हे मात्र समजू शकले नाही. एकेकाळी तुलनेने नवा आयडी असूनही आपल्या कवितांच्या आणि त्यांमधील विचारांच्या मार्गाने त्या प्रस्थापित झाल्या, पण अजूनही त्यांच्या विचारांबद्दल म्हणावी तशी चर्चा होत नाही याचे दु:ख आहे. (मी खरेतर हे सांगू इच्छित नव्हते पण आता रहावत नाही.) मुक्तसुनीतरावांनी ह्यावर सविस्तर लिहावेच. भले दोन-चार लेख झाले तरी चालतील. -- सडककथेतील भडककुमारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सडककथेतील भडककुमारी सडक आणि

Nile
Fri, 06/17/2011 - 15:36 नवीन
सडककथेतील भडककुमारी
सडक आणि प्रतिक्रीयांमधील सडकं यावर कोटी केली की काय असं क्षणभर वाटलं. ;-) -फडक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>सडककथेतील भडककुमारी म्हणजे

प्रभो
Fri, 06/17/2011 - 19:03 नवीन
>>सडककथेतील भडककुमारी म्हणजे पूजा भट का?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अग्याबोब्बो

आनंदयात्री
Fri, 06/17/2011 - 19:25 नवीन
अग्याबोब्बो =)) .. आता या नवअमरिक्कन प्रभ्याला जोजोकाकुंपासुन कोण वाचवणार ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

क्रम चुकला

प्रभो
Fri, 06/17/2011 - 19:48 नवीन
क्रम चुकला यात्रीमालक.. असं हवं.. आता या प्रभ्याला नवअमरिक्कन जोजोकाकुंपासुन कोण वाचवणार ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

????

अन्या दातार
गुरुवार, 06/16/2011 - 11:05 नवीन
म्हैला मुक्तीचा मोर्चा अजुन कसा बरे निघाला नाही??
  • Log in or register to post comments

कंपुतील मनुष्याला सावरुन

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/16/2011 - 11:11 नवीन
कंपुतील मनुष्याला सावरुन घेणारे कंपुबाज लेखन. असो...
  • Log in or register to post comments

घ्या घासुगुर्जी ही घ्या, आमची सडकी प्रतिक्रिया

चिंतातुर जंतू
गुरुवार, 06/16/2011 - 11:18 नवीन
सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं.
हे वाक्य वाचल्यावर खालचे वाचायचा मूडच गेला. कदाचित वटपौर्णिमा तुमच्यासाठी भारताची वंदनीय परंपरा असेलही पण म्हणुन सर्वांनी त्याच्याकडे तुमच्याच चष्म्यातुन पहावे का ? जर वटपौर्णिमेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली २१व्या शतकातील नवरे वडाची पूजा करू शकतात तर मिपावरील भारतीयांना ह्या परंपरेबद्दल आणि तोही त्याच्या विषय निघाल्यावर (मग भले तो त्या परंपरेच्या पालनाचा का असेना) स्वतःचे त्याच्या बद्दलचे परखड मत व्यक्त करायचा अधिकार नसावा ? बायाबाप्यांनी वडाभोवती दोरे गूंडाळले ते अभिव्यक्तीस्वातंत्र आणि मिपाकरांच्या प्रतिक्रिया मात्र घोर खिल्ली आणि थेरं ? कूर्माची गती सूक्ष्म असते असे म्हणतात ते खोटे नाही. वटपौर्णिमेच्या निमित्ताने २१व्या शतकात वड यमास काय म्हणेल असे लिहीलेल्या धाग्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याऐवजी तुम्ही त्रागा करताय हे जाहीर आहे. तो त्रागा नसता झाला तर विषय तिथेच संपला होता. वटपौर्णिमेप्रती श्रद्धेऐवजी काही प्रश्न उठवल्याने वटपौर्णिमेची तुमच्या लेखी असणारी महत्ता कमी होणार होती का? तर नाही. पण तरीही कोणाला तरी मिरच्या झोंबल्या. पण वटपौर्णिमेमुळे इतर कोणाला मिरच्या झोंबायचे स्वातंत्र्य मात्र नाही? ह्या धाग्याद्वारे श्री.घासू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्‍या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे. ज्या पध्दतीनं श्री. घासू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक धाग्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे. ज्या दिवशी हे असले अंधश्रद्धाग्रस्त सदस्य चचतील त्या दिवशी आम्ही फर्ग्युसन कॉलेजमागच्या वेताळ टेकडीवरच्या आग्या वेताळाला सडकं मांस आणि हातभट्टीची वाहून येऊ. क्रान्तिताई आगे बढो हम तुम्हारे साथ है! (श्रेयअव्हेरः किती किती नावं घेऊ? मिपावरचे काही सन्माननीय सडके सदस्य एवढेच म्हनतो आणि आमचं भाषण संपव्तो.)
  • Log in or register to post comments

आमच्या लेखी असल्या

चेतन
गुरुवार, 06/16/2011 - 12:19 नवीन
आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत; कुणाला फारच मिर्च्या झोंबलेल्या असाव्यात असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो. आम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपुर फायदा घ्यायचं ठरवल आहे. बा******* भा********** भिकार***** दळ्भद्री प्रतिक्रीया.... चेतन अवांतरः हा सडका प्रतिसाद फक्त वरच्या प्रतिसादाला पोच म्हणुन आहे. घासकडवी साहेब लेख आवडला हे.वे. न.सा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

हं...

चिंतातुर जंतू
गुरुवार, 06/16/2011 - 13:09 नवीन
आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो.
हं, आले हे विचारजंती. अवांतर: वरच्या प्रतिक्रियेला सडकी म्हणावी का? छे भट्टी काही जमलेली नाही ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

कविता, लेख आणि प्रतिसाद वाचुन

५० फक्त
गुरुवार, 06/16/2011 - 12:04 नवीन
कविता, लेख आणि प्रतिसाद वाचुन सावित्रीला वाटलं असेल, मेला होताच सत्यवान, नसता आणला परत तर बरं झालं असतं, उगा वाग्चातुर्य दाखवायला गेले यमाला अन अडचणीत पडले. या पेक्षा नव-यानंतर परहस्ते कारभार चालवलेला परवडला असता.
  • Log in or register to post comments

उपहासात्मक लेख आहे करमणूक

मेघवेडा
गुरुवार, 06/16/2011 - 13:44 नवीन
उपहासात्मक लेख आहे करमणूक झाली वगैरे सगळं ठीक आहे. मात्र तुमच्यासारख्या थोर विचारवंतानंही तेवढ्यात स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करून घेतलेली पाहून अंहझा. ;)
  • Log in or register to post comments

गुंग.....

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/16/2011 - 13:51 नवीन
अहा.. भारी भारी प्रतिक्रिया ... मजा येतेय... अवांतर : समजा एखादा नवीन मिपाकर परवाच आला असेल तर त्याचे मति की मती गुंग हो ऊन जाईल हे सारे वाचून आणि कोण कोणाला सपोर्ट करतो आहे, कोण कोणाची खिल्ली उडवतो आहे, कोण धर्मरक्षक आहे आणि कोण भक्षक आहे, कोणाचा कंपू कोणता हे अजिबात टाळक्यात शिरणार नाही.... मतिगुंग मास्तर
  • Log in or register to post comments

याचसाठी

श्रावण मोडक
गुरुवार, 06/16/2011 - 14:00 नवीन
मास्तर, याचसाठी केला होता अट्टाहास... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अगदी,

स्वाती दिनेश
गुरुवार, 06/16/2011 - 15:54 नवीन
मास्तरांशी सहमत! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अगदी अगदी

स्मिता.
गुरुवार, 06/16/2011 - 18:01 नवीन
नवीन येणारा हे वाचून मिपाकर बनून राहिल की नाही हीच शंका आहे. डोकं भंजाळून जाईल बिचार्‍या/रीचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

प्रत्येकाचे विचार वेगवेगळे

गणेशा
गुरुवार, 06/16/2011 - 14:02 नवीन
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात .. मग ती कविता असु द्या नाहितर लेख. परंतु या लेखाचे शिर्षक हे कोणाच्या नावावरुन नको होते. जेंव्हा आपण समस्त अभिव्यक्तीस्वातंत्र्य कलाकारांना उद्देशुन बोलत आहात, तेंव्हा उदाहरणाखातर असे लेखन दाखवु शकता. पण एकाच व्यक्तीला उद्देशुन आपण स्वतंत्र थ्रेड काढने तसे फारसे काही साध्य करु शकत नाहि. तुम्हाला वाईट जर संस्कृती..परंपरा याविरुद्ध लिहिले म्हणुन वाटले तर तुम्ही तसाच धागा काढा.. आणि तुम्हाला वाईट जर क्रांती यांनी असे लिहिले म्हणुन वाटले तर तुम्ही त्यांना व्यनी करा. असो माझा मुद्दा कळला असेन.. कवितेला आणि लेखाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हं...

चिंतातुर जंतू
गुरुवार, 06/16/2011 - 15:44 नवीन
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात .. मग ती कविता असु द्या नाहितर लेख.
हं, आले हे विचारजंती. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लिहिलेल्या रिप्लायमधुन

गणेशा
गुरुवार, 06/16/2011 - 16:36 नवीन
लिहिलेल्या रिप्लायमधुन तात्पर्य काय घ्यायचे .. कुठल्या वाक्यावर काय रिप्लाय द्यायचा हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्या उडानटप्पु उत्तरांना पाठिंबा देण्यासाठी कोणाला काही संबोधणे म्हणजे आपले विचार हे विचारपुर्वक न असता काहीही असतात असा तो पुरावाच आहे. कृपया वरील रिप्लाय मध्ये येव्हडेच आहे की.. तुम्हाला वयक्तीक कवयत्री ला काय बोलायचे असेन तर तीला जावुन बोला, आणि तुम्हाला सगळ्या समाजातील व्यक्तींना उद्देशुन लिहायचे आहे तर तसे बोला. थांबतो .. संयमीत बोलण्याला विचारजंतु म्हणणे योग्य नाही. तरीही आपला परिचय नसल्याने काही जास्त उलट बोललो असल्यास हलके घेणे.. प्रतिसाद हा रिप्लायाला आहे.. रिप्लाय देणार्या माणसास नाही. तरीही - संयम हा भेकड माणसाचे लक्षण नसतेच..उलट भेकडता लपवण्यासाठी बर्याचदा संयमाला टाळले जाते. - गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

गणेशा... हे

स्वानन्द
गुरुवार, 06/16/2011 - 18:26 नवीन
:D गणेशा... हे वाचा. http://www.misalpav.com/node/18283#comment-318004 काही लक्षात आलं का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा