✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

व
विकास यांनी
Sun, 06/05/2011 - 21:02  ·  लेख
लेख
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे. बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्‍यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22999 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

निंद्य

तिमा
Sun, 06/05/2011 - 21:21 नवीन
बाबा रामदेवांचा मार्ग बरोबर की चूक, त्यांच्या मागण्या ह्या वास्तव की अवास्तव याविषयी वाद होऊ शकेल. पण अहिंसक जमावावर असा क्रूर हल्ला हा सर्वथा निंद्यच आहे. चांगली आंदोलने करायला गेले की त्यात संधिसाधू घुसतातच. पण हे प्रकरण सरकारने अतिशय गचाळपणे हाताळले आहे आणि त्याचा फटका काँग्रेसला भविष्यातल्या निवडणुकांमधे बसणारच आहे.
  • Log in or register to post comments

नेमकं काय चाललंय?

पैसा
Sun, 06/05/2011 - 21:53 नवीन
रामलीला मैदानात शांतपणे जमलेल्या लोकांवर लाठीचार्ज, रामदेवना अटक हे तर झालंच. पण सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री. अजूनपर्यंत तरी काँग्रेसतर्फे किंवा सरकारतर्फे कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने निवेदन दिलेलं पाहिलं नाही. कदाचित जे झालं ते फार महत्त्वाचं नाही असं दाखवायचा सरकारचा हेतू आहे का? पोलिसांनी जे निवेदन दिलं ते आणखीच हास्यास्पद आहे. म्हणे, रामदेव यांच्या जिवाला धोका आहे असं कळल्यामुळे पोलीस तिथे गेले. हे लोकांना इतके मूर्ख समजताहेत का? की आता शांततेने आंदोलन करणे आणि सरकारविरुद्ध निषेध व्यक्त करणे हेही आता गुन्हा या सदरात गणले जाते? एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की विरोधी पक्षांमधे फार दम नाही हे आताच्या सरकारला माहिती आहे, आणि सरकारच्या या कृतीविरोधात काही आंदोलन झालंच तर ते आपण मॅनेज करू शकतो असा आत्मविश्वास सरकारला आहे!
  • Log in or register to post comments

सहाय्य!

श्रावण मोडक
Sun, 06/05/2011 - 22:17 नवीन
सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री.
वेल... त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. कारण सुबोधकांत सहाय यांनी फक्त निवेदन दिलेले नाही. ते वाटाघाटींमध्येही होते. तेवढ्यासाठी अमेरिकेचा दौरा अर्ध्यावर सोडून आले आहेत. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत. सुबोधकांत सहाय अन्नप्रक्रिया मंत्री होते पूर्वी. तेव्हाच रामदेव यांच्या फुड पार्कना परवानग्या मिळाल्या आहेत. त्या काळात दोघं एकमेकांचे जणू मित्र झाले आहेत. इतके की, असं म्हटलं जातं की झारखंडमध्ये जातील तेव्हा रामदेव सहाय यांच्याच बंगल्यावर मुक्कामाला असतात. या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला. 'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अंशत: सहमत

विकास
Mon, 06/06/2011 - 04:19 नवीन
त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. मला वाटते कपील सिबल आणि सुबोधकांत सहाय हे सरकारकडून वाटाघाटी साठी नेमलेले होते (निगोशिएटर्स) आणि त्यात काही गैर नाही. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत......'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे. ही अवांतर माहिती म्हणून ठिक आहे, माझ्यासाठीपण नवीन आहे. योग्य ठिकाणी त्याचा रामदेवबाबांवर टिका करताना वापर केला तरी ते योग्यच ठरेल. पण आत्ता, त्याचा संबंध नकळत सरकारने आत्ता जे काही केले त्याचे "डायल्यूशन" / दुर्लक्ष करण्यात होत असेल तर मात्र ते आक्षेपार्ह आहे. कारण सरकारने कायदा अत्यंत गैरपद्धतीने हातात घेतला आहे. तसा कायदा जर एखाद्या दहशतवाद्याच्या अथवा नक्षलवाद्याच्या विरोधात घेतला असता तर आपण (म्हणजे कोणिही) कसा आवाज उठवला असता ह्याचा देखील विचार व्हावा. येथे तर सातत्याने रामदेवबाबा, मला अटक झाली तरी शांततेने आंदोलन पाळा असे सतत (हा प्रकार घडण्याआधी) सांगत होते आणि संपूर्ण आंदोलन शांतपणेच चाललेले होते. त्यामुळे जे काही झाले आहे ते लोकशाहीवरील हल्ला आहे आणि तितकेच या संदर्भात म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अवांतरच

श्रावण मोडक
Mon, 06/06/2011 - 09:01 नवीन
ती माहिती अवांतरच आहे. तिचा संदर्भ फक्त वाटाघाटींपुरता मर्यादित आहे, लाठीमाराशी नाही; म्हणूनच "या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला" असे वाक्य त्या परिच्छेदाच्या शेवटी लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लाठीहल्ला मलाही पटला नाही.

रेवती
Sun, 06/05/2011 - 23:44 नवीन
लाठीहल्ला मलाही पटला नाही.
  • Log in or register to post comments

याच धाग्यावर दुसर्या एका

अप्पा जोगळेकर
Mon, 06/06/2011 - 08:22 नवीन
याच धाग्यावर दुसर्या एका संस्थळावर प्रतिक्रिया देउन झाल्यामुळे आता इथे पुन्हा तेच टाईप करायचा कंटाळा आलाय. धागाकर्त्याशी सहमत आहे इतकंच म्हणेन.
  • Log in or register to post comments

गोंधळच घोंधळ

ऋषिकेश
Mon, 06/06/2011 - 09:14 नवीन
इतक्या प्रकारच्या बातम्यांचे मोहोळ उठले आहे की नक्की काय झाले हे समजायला थोडा अवधी जाऊ देणे योग्य आहे असे वाटते. यातील ऐकलेली एक सर्वात घातक शक्यता अशी (संदर्भ: रविवारची सीएन्एन् आयबीएन् वरील विषेश चर्चा) की रविवारी पहाटे अतिउजव्या गटाचा हा रामदेवबाबाचा तंबु पेटवून देण्याचा मानस होता व त्यायोगे पुन्हा देशभर दंगल / गोंधळ माजवून ध्रुवीकरण करायचे असा 'प्लान' होता. याला कोणताही पुरावा त्या सदर व्यक्तीकडे नव्हता. (मात्र जेव्हा पोलिस आले होते तेव्हा मंडपाला बारीकशी आग लागल्याचीहि बातमी आहे, जी लगेच विझवण्यात आली. शिवाय पोलिसांबरोबर अनेक अग्निशामकांचे जवान, गाड्या पाठवण्यात आहे होते असेही वृत्त आहे) यात सत्य किती, वावड्या किती हे सरकार, गृहखाते जाणे. मात्र जर असा काहि धोका सरकारला कळला होता तरी सरकारने, गृहखात्याने याची कल्पना बाबाला दिली होती का? वगैरे अनेक प्रश्न उठतातच. प्रथमदर्शनी आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्य्वस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते. सरकारपक्षाने अजूनही त्यांची अधिकृत भुमिका मांडलेली नाही. गृहमंत्रालयाकडून प्रतिक्रीया येईपर्यंत माझे मत (जरी कोणी विचारत नसले तरी ;) )राखून ठेवत आहे
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/06/2011 - 09:18 नवीन
आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्यवस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते. सहमत आहे........! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सहमतीबद्दल

प्यारे१
Mon, 06/06/2011 - 09:29 नवीन
सहमतीबद्दल सहमती....!!! अवांतर : दुर्दैवाने प्रसारमाध्यमांची विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाची भूमिका ही as usual अत्यंत उथळ (टीआरपीसाठी धावणे) वाटते. ( एक निवेदिका : क्या बाबा ने अपने बाल खुले छोडे थे? संबंध काय? अरे काय तुम्ही त्यांना न्हाऊ माखू घालणार आहात काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रामदेव बाबांवर झालेला हल्ला

मदनबाण
Mon, 06/06/2011 - 09:35 नवीन
रामदेव बाबांवर झालेली कारवाई हा दडपशाहीचा उत्तम नमुना मानायला हवा. शांतपणे उपोषण करणार्‍यांवर ही कारवाई अयोग्यच आहे,आणि हीच कॉग्रेस म्हणते त्यांचा आदर्श महात्मा गांधी आहेत. ! रामदेव बांबांवर आता सरकार आरोप करते आहे की ते भ्रष्टाचारी आहेत...पण मग हे जर त्यांना अगोदर माहित होत तर त्यांचे स्वागत करायला कॉग्रेसचे मंत्री संत्री का गेले ? त्यांच्या बरोबर बैठकी का झाल्या ? स्वामीजी भ्रष्टाचारी आहेत याचा साक्षातकार किंवा आत्मज्ञात कॉग्रेस पक्षास कसे झाले ? जर स्वामीजींच्या सारख्या माणसावर ही वेळ सरकारने आणली तर सामान्य जनतेचे काय ? सरकारच्या या कॄतीचा मी निषेध करतो.
  • Log in or register to post comments

संदेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/06/2011 - 10:08 नवीन
बाणा, दडपशाहीबरोबर सरकार वरील सर्व कृतीतून एक संदेश देत आहे की, आमच्यावर 'आंदोलनाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तर ते आंदोलन कसे मोडायचे हे आम्हाला माहित आहे. आंदोलनाच्या निमित्ताने आठ तारखेला उपोषणाला बसणार्‍या अण्णा हजारेंनाही हा इशारा आहे. आणि यापुढे कोणतेही आंदोलन करतांना जनतेच्या मनात भिती निर्माण होत राहील. बाकी, लोकशाहीला काळिमा वगैरे काही नसतं रे... हे केवळ शब्दाचे बुडबुडे आहेत असे वाटायला लागले आहे. झोपलेल्या लोकांवर लाठीहल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून रामलीला मैदानाच्या बाहेर उत्स्फूर्तपणे सरकारचा निषेध करायला लोकांनी यायला हवं होतं. (कमीतकमी दिल्लीच्या लोकांनी तरी) किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठीकाणी शांतपणे लोकांनी झाल्या घटनेचा निषेध व्यक्त करायला हवा होता असे वाटते. परंतु आपणही टीव्ही समोरदिग्विजयसिंग काय म्हणतात, सिब्बल काय म्हणतात, सरकार काय म्हणते, रामदेव बाबा काय म्हणतात, हे मन लावून ऐकत असतो. आणि झाल्या घटनेबद्दल आपण केवळ 'च्चच्च' करायचं यापेक्षा आपण काही करु शकत नाही. काय म्हणता ? (का लिहिता पंतप्रधानांना पत्र) ''काला धन भारतमे कैसे लायेंगे और उसको राष्ट्रीय संपत्ती बनाने के लिय क्या कदम उठायेंगे'' हा मुद्दा आता हवेत विरला असेल. -दिलीप बिरुटे (हतबल भारतीय नागरिक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अगदी..

गवि
Mon, 06/06/2011 - 10:12 नवीन
अगदी बरोबर. आणि काला धन कोणाकडे नाही ? कोण म्हणू शकतो छातीवर हात ठेवून की माझ्याकडे नाही काळा पैसा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि आश्चर्य वाटले हे वाचुन.

मृत्युन्जय
Mon, 06/06/2011 - 12:41 नवीन
गवि आश्चर्य वाटले हे वाचुन. अजुन या देशात प्रामाणिक लोक जिवंत आहेत. कमी असले तरी आहेत. आणि हो मी म्हणुन शकतो की माझ्याकडे काळा पैसा नाही. तुम्ही नाही म्हणु शकत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो.. पैसाच नाही म्हणून

गवि
Mon, 06/06/2011 - 12:51 नवीन
अहो.. पैसाच नाही म्हणून काळाही नाही हे वेगळं. पण बहुसंख्य लोक उदा. घर विकताना जी रक्कम सेलडीडवर असते तीच घेतात का? व्यवहारांत "कॅश"मधे काहीच घेत नाहीत का? कार्ड स्वाईप केल्यावर अमुक इतके जास्त द्यावे लागतील, किंवा बिल हवे असेल तर तमुक टक्के जास्त लागतील म्हटल्यावर, राहू दे बिल.. तेवढेच कमी पैसे गेले. असा विचार हे सर्व काळ्या पैशाचे जनक आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात हे छानच आहे. असेच रहा. पण कितीजण असेच असतात. तुम्ही मला भेटलेले पहिलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अहो,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/06/2011 - 12:50 नवीन
>>>>आणि काला धन कोणाकडे नाही ? अहो, सर्वांकडेच काळा पैसा नसतो राव.....! >>>कोण म्हणू शकतो छातीवर हात ठेवून की माझ्याकडे नाही काळा पैसा.. माझ्याकडे कोणताही काळा पैसा नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुमचे उदाहरण वेगळे

गवि
Mon, 06/06/2011 - 12:56 नवीन
तुमचे उदाहरण वेगळे असेल. जनरली नोकरदार वर्गाला कर कापूनच पगार हातात मिळतो म्हणून काळ्या धनाचा संचय करण्याचा संबंधच येत नाही. पण आपले इतर उत्पन्नाचे सोर्स असतील तर आपण त्यात किती पावत्या देतो, किती उत्पन्न मिळवतो आणि किती दाखवतो हे ठरवणे अवघड आहे. पण एकूण निरीक्षणाने हेच दिसतं की काळा पैसा हा फक्त करोडपतींकडेच असतो असं नाही. असो. पुढे येऊन कोणी मान्य करणे शक्यच नाही म्हणा. ;) त्यामुळे माझे विधान परसेप्शनवर अवलंबून आणि त्यामुळे मर्यादितच राहणार. ज्याने त्याने मनाशीच विचारण्याचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

स्मिता.
Mon, 06/06/2011 - 13:31 नवीन
बहुतांशी आपल्या(आमच्या)सारख्या नोकरदारांना हातात मिळणारा पगार सर्व कर, इ. कापूनच मिळतो आणि आपण कोणत्याही गैरमार्गाने पैसा कमवतही नाही त्यामुळे आपल्याजवळ काळा पैसा नाही असेच आपल्याला वाटते. परंतु, ५-१० रुपये वाचवण्यासाठी आपण जेव्हा पावतीशिवाय खरेदी करतो तेव्हा ती रक्कम काळा पैसाच असते. अवांतरः मी पाहिलेल्या मोठमोठ्या सोनारांच्या दुकानात कधीच, कुणालाही(माझ्यासमोर तरी) रितसर पावती देत नाहीत. कागदाच्या एका चिटोर्‍यावर दागिन्याचे वजन आणि त्या दिवशीचा सोन्याचा भाव यांचे गणित करून दिलेले असते. या कागदावर दुकानाचे नाव, विक्रेत्याची सही/शिक्का काहिही नसते. हेही काळे धनच आहे ना? तेथे पावती घेतल्यास सोन्याचा भाव जास्त लावतात का? कोणीही पावतीची मागणी का करत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मला हे माहित नाही

रणजित चितळे
Mon, 06/06/2011 - 13:39 नवीन
स्मिता - मला, आपल्या एवढी, सोनारांची माहिती नाही पण मी जेव्हा जेव्हा काही (सोन्याची) खरेदी केली तेव्हा तेव्हा रीतसर पावती मिळाली प्रिंटेड ज्याच्यात सगळे टिन क्र वगैरे असलेले. बाकी जाणकारांना जास्त माहीती असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

अनुभव

स्मिता.
Mon, 06/06/2011 - 14:12 नवीन
मला सोनारांची खूपच माहिती आहे अश्यातला भाग नाही. कळायला लागल्यापासून २-३ वेळा सोनाराच्या दुकानात जावून जरी आपल्याला आणि आजूबाजूंच्या ग्राहकांना पावती मिळताना दिसत नसल्यास एवढी माहिती आपोआपच मिळते. माझा अनुभव जळगावमधील दोन अतिशय सुप्रसिद्ध सोनारांकडचा आहे. इतर ठिकाणचे माहिती नाही. बाकी नक्षत्र, जिली, इ. 'ब्रँडेड' दुकानातून मात्र रितसर पावती मिळते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि

इरसाल
Mon, 06/06/2011 - 17:00 नवीन
जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि बाफना शिवाय आहे कोण. तिथे एस्टीमेट असे छोट्या अक्षरात छापलेल्या चिटोऱ्या व्यतिरिक्त काहीही देत नाहीत जरी लाख दोन लाखाचे सोने घेतले तरी. स्वानुभव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

एस्टीमेट

रणजित चितळे
Tue, 06/07/2011 - 13:14 नवीन
एस्टीमेट वेगळे व व्यवहार झाल्यावर पावती वेगळी. आपण ह्यावर प्रकाश टाकू शकाल का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

एस्टीमेट वेगळे व व्यवहार

गवि
Tue, 06/07/2011 - 13:36 नवीन
एस्टीमेट वेगळे व व्यवहार झाल्यावर पावती वेगळी नव्हेच.. फक्त एस्टिमेटच.. व्यवहाराची वेगळी पावती नाहीच.. असा त्याचा अर्थ आहे. हाच बेहिशेबी अर्थात काळा पैसा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

असेच

स्मिता.
Tue, 06/07/2011 - 14:23 नवीन
अगदी असेच असते. एका चिटोर्‍यावर फक्त एस्टिमेट मिळत असल्याने सगळा बेहिशेबी काळा पैसा असतो. पण या बाबतीत वर अप्पांनी म्हटलंय की हा दोष सिस्टीमचा आहे, यात तथ्य वाटतं. म्हणजे, आपल्यासारखे सुशिक्षीत लोक हा व्यवहार चालवून घेत असतील तर ती आपली चूक आहे हे मान्य. पण तिथे अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी, इ. लोकही आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडेफार सोने खरेदी करत असतात. रितसर पावती घेतलीच पाहिजे, तसे न करून आपण काळ्या पैश्यात भर घालतोय याची तर त्यांना जाणीवसुद्धा नसते. त्यामुळे असे वाटते की अगदी अडाणी ग्राहकाचे 'अवेअरनेस' वाढवणारी किंवा कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार मॉनिटर करणारी सिस्टीम सुधारायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी,

गवि
Tue, 06/07/2011 - 15:33 नवीन
अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी, तसे न करून आपण काळ्या पैश्यात भर घालतोय याची तर त्यांना जाणीवसुद्धा नसते. आणि समजा जाणीव झाली (अवेअरनेस प्रोग्रॅमने) तर त्यांना (कर बुडतोय. काळा पैसा तयार होतोय याची) पर्वा / फिकिर असणार आहे का?? उलट पावती न देण्याच्या युक्तीने स्वतःचे आणि आपलेही चार पैसे वाचवण्याची नामी युगत काढणर्‍या सराफाला दुवा देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

हो ते दोन्ही वेगवेगळे

इरसाल
Wed, 06/08/2011 - 14:18 नवीन
हो ते दोन्ही वेगवेगळे मिळतात. एस्टीमेट म्हणजे खरेदी केलेल्या मालाचा हिशोब चिटोर्यावर लिहून देतात. जसे ५ तोळे घेतले तर आजची तारीख, आजचा तोळ्याचा भाव आणि ५ तोळ्याचे किती हे क्यालक्यूलेशन बस. जर पक्की पावती मागितली कि मग VAT आणि इतर tax ची भरमार. कोण करतो इतके लफडे. लग्न सराईत आधीच गांजलेले लोक कुठून २/३ हजार उगाच वाढवून घेतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

अगदी अगदी..

गवि
Mon, 06/06/2011 - 13:43 नवीन
अशीच असंख्य उदाहरणं आहेत. आपापल्या "औकात" प्रमाणे काळा पैसा प्रत्येकजण तयार करतो. काळा पैसा म्हणजे काय याविषयी कन्सेप्ट क्लियर नसल्याने आपण त्याला कारणीभूत नाही अशी समजूत करुन घेणे सोपे जाते. डॉक्टरच्या फीचे बिल (बडीबडी हॉस्पिटल्स वगळता), अगदी लाखांची विक्री असलेला हॉटेलवाला उडपी (आठवा त्याची चिठ्ठीवजा "पावती"), अगदी करपात्र रक्कम कमावणारा वडापाववाला किंवा अनेक मध्यम विक्रेते कधीच व्हॅलिड पावती देत नाहीत आणि आपणही घेत नाही. भाडेकरुकडून भाडे घेणारे कित्येकजण पावती कमीची करतात. आणि कायकाय सांगावे ? कोणी म्हणेल की हे सर्व लहान स्केलवर आहे. मी म्हणतो "थेंबे थेंबे तळे साचे" न्यायाने असा जनताजनार्दनात तयार होणारा काळा पैसा एका-दोघा उद्योगपतीच्या कोटींमधे असलेल्या स्विस बँकेतल्या काळ्या पैशापेक्षाही जास्त होत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

काळा पैसा म्हणजे काय याविषयी

अप्पा जोगळेकर
Mon, 06/06/2011 - 14:04 नवीन
काळा पैसा म्हणजे काय याविषयी कन्सेप्ट क्लियर नसल्याने आपण त्याला कारणीभूत नाही अशी समजूत करुन घेणे सोपे जाते. आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. एन्ड युजर हा नेहमी अडाणीच असतो. त्याला चुका करण्याची संधीच न देणे हे चांगल्या सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. हाच नियम इथेही लागू होऊ शकेल. म्हणून व्यवस्थेत बदल करणे हाच यावर उपाय आहे. अशा बदलाची मागणी जेंव्हा कोणी करते तेंव्हा त्याला विशिष्ट लोकांकडुनच विरोध होतो ही बाब सूचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आपल्या अज्ञानातून जर काळा

गवि
Mon, 06/06/2011 - 14:20 नवीन
आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. आपल्या अज्ञानातून काळा पैसा तयार होत नाही. उत्तम ज्ञानानेच आपण तो तयार करतो ..पण ही जे काही आपण केले त्यातून वाचलेला / तयार झालेला तोच तो प्रसिद्ध "काळा पैसा" आहे हे आपल्याला "वळत" नाही, जाणवत नाही. याला अज्ञान म्हणायचं किंवा काय ते तुम्हीच पहा. शिवाय रामदेव बाबा जे करत आहेत त्याला पाठिंबाच द्यायला हवा हे शंभर टक्के सत्य आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांनी सामान्यजनांतील काळा पैसा जर कमी झाला तर अधिकच उत्तम. कारण तो अधिक मुरलेला आणि "डिफ्यूज्ड" आहे. शोधून काढायला अशक्य. (नाना पाटेकरः चित्रपट प्रहार: दुश्मन दोनो बाजू में है. एक सरहद के उस पार एक इस पार. इस पारका दुश्मन ज्यादा खतरनाक है.. असा काहीसा डायलॉग आठवतो.) आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. एन्ड युजर हा नेहमी अडाणीच असतो. त्याला चुका करण्याची संधीच न देणे हे चांगल्या सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. इथे मी थोडे सुधारित उदाहरण देऊन स्पष्ट करतो. समजा एका सॉफ्टवेअरमधे युजरनेम पासवर्ड टाकण्याऐवजी कंट्रोल आणि एफ ५ दाबले तर थेट निनावी लॉगिन होते आणि बिनबोभाट चोरून माहिती काढता येते / काम करता येते असे कोणाच्या लक्षात आले. त्यानंतर ही गोष्ट सर्वत्रांत पसरुन विनालॉगिन गुपचुप काम करणार्‍यांचे प्रमाण वाढले तर हा दोष त्या सिस्टीमचा तर आहेच पण एन्ड युजर अडाणी आहे, त्याने नकळत चूक केली असं नाही म्हणता येत. त्याला या क्रियेचे फायदे नक्की माहीत होते आणि लॉगिन वापरायचा पर्याय त्याच्याकडे असूनही "जाणूनबुजून" त्याने हे केले. फक्त आपण जे करतोय त्याचा एकूण सिस्टीमवरचा इम्पॅक्ट त्याने समजून घेतला नाही/ त्याला पर्वा नव्हती.. तस्मात दोष त्याच्याकडेही जातो. (फक्त उदाहरण आहे. आय पी लेव्हलपर्यंत जाउ नका प्लीज ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/06/2011 - 16:30 नवीन
आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भार महान हा डायल्वॉक लई आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

साहेब थोडी सुधारणा हा यशवंत

इरसाल
Mon, 06/06/2011 - 17:05 नवीन
साहेब थोडी सुधारणा हा यशवंत मधला डायलॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आयला!

धमाल मुलगा
Mon, 06/06/2011 - 18:27 नवीन
माझ्या आठवणीत तर '१६ डिसेंबर' सिनेमातल्या डॅनी डॅन्झोपाच्या तोंडी असलेला हाच डायलॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न

अप्पा जोगळेकर
Tue, 06/07/2011 - 20:05 नवीन
प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न करता मुद्दामूनच चूक करतो आहे असे मी वादाकरता गॄहीत धरतो आहे (मान्य करत नाहीये). अशा परिस्थितीत सिस्टिम तशीच राहावी अशी त्याची इच्छा असली पाहिजे. प्रत्यक्षात अण्णा आणि रामदेव यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून सिस्टिम सुधारावी अशी एन्ड युजरची इच्छा आहे असे दिसते आहे आणि सरकार सिस्टिम सुधारण्याच्या दॄष्टीने पावले टाकण्याऐवजी मुद्दामहून वेळाकाढूपणा करत आहे असे दिसते. तर मग दोष कोणाचा आहे हे तुम्हीच ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आप्पा अहो इथेच असलेला

गवि
Wed, 06/08/2011 - 09:02 नवीन
आप्पा अहो इथेच असलेला विरोधाभास मी उघड करु इच्छितोय हो.एंड युजरला सिस्टीम सुधारायला हवीय ती कोटीवाली बडी धेंडे आणि नेत्यांबाबतीत. पण त्याचवेळी आपल्या पाठीशी काही जळते आहे हे लक्षात येत नाहीये. आपली चवन्नीअठन्नीची चलाखी हाही काळा पैसाच आहे हेच एंड युजर विसरतोय. आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

त्यांच्या अजेंड्यावर स्विस

नरेशकुमार
Wed, 06/08/2011 - 09:21 नवीन
त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..
आन्ना, बाबा मोठ्या माश्यांच्या मागं लागतील, त्यांचि भाजी करुन खातील. लहान माश्यांच तुमि घ्या मनावर. (हवं तर आमि येउ मदतीला). करा तुमि पन आन्दोलन, कोनी अडवलय का ? आना पकडुन लहान माश्यांना, एकत्र भाजी करुन खाऊ ? (वाटलं तर इथं रेसिपि पन टाकु फटुसकट) . हलकेच घ्या. बरंका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नकु..

गवि
Wed, 06/08/2011 - 10:27 नवीन
म्हणजे बाबा खाणार पांढर्‍या पाठीचे पापलेट आणि आपण खायची मांदेली. असंच ना? ;) असो.. अवांतर नको करायला जास्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा

नरेशकुमार
Wed, 06/08/2011 - 10:57 नवीन
गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा गमतिने म्हना कि उपासाहाने दिलेले होते असे म्हना. पन त्याचा अर्थ इतकच होता कि, भ्रश्टाचाराच्या समुद्रात लहान माश्याचे पुढे मोठे मासे होतात कि मोठ्या माश्यांमुळे लहान मासे सोकावतात ? सुरुवात कुठुन होते ? हे सगळे वादातीत प्रश्न आहेत. (खरेतर शब्दांचे बुडबुडे). हे माशे काढुन टाकायचे तर कोनितरी कुठुन तरी सुरुवात कराविच लागनार आहे. बाबा, अन्नांनि मोठ्यापासुन सुरुवात केली. जर आपल्याला जमत असेल तर, आपन देखिल मोठ्यांपासुन सुरुवात करा, अन्यथा लहान माश्यांपासुन सुरुवात करा. आपन पन आन्दोलन सुरु करा. आमि येतो आपल्या बरोबर साथिला. नुसते प्रेक्शकां सारखे बसुन आनि उपदेश देउन कसे चालेल ? आपन म्हनता .
आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.
मग घाला भर त्या सिस्टिम मधे, नाही घालता येत तर तुमिच एखादि गवि-सिस्टिम सुरु करा. कोनिहि अडवलेल नाही. जो कोनि काही करायचा प्रयत्न करतोय त्यात खोडा घालन्यापेक्शा त्यातिल उनिवा दुर करन्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते. असे दोन शब्द बोलुन मि माझे भाशन संपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे देवा..

गवि
Wed, 06/08/2011 - 11:08 नवीन
कोणाच्या सिस्टीममधे खोडा घालण्याची बात केली मी? हा तिरपा झालेला धागा सरळ वरपर्यंत वाचा. मी उलट आपल्या स्वतःची आणि स्वतःसारख्या सामान्यांची निर्भर्त्सना करत होतो. आपण स्वतःही हेच करतो ज्याला बाबा विरोध करताहेत हे मी पहिल्यापासून हायलाईट करतोय.. त्यांना विरोध करु नकाच उलट त्याउप्पर जाऊन आपली आणि आजूबाजूची ही चवल्यापावल्या वाचवण्याची आचमनं बंद करा असा त्याचा अर्थ आहे. बाबांच्या सिस्टीममधे या छोट्या माश्यावर उपाय नाही हे माझं वाक्य बाबांच्या आंदोलनाला किंवा पद्धतीला विरोध करण्यासाठी नसून, उलट एन्ड युजर (म्हणजे सामान्य लोक जे छोटा काळा पैसा निर्माण करतात, बिनपावतीचे व्यवहार करुन), त्यांचाच चळवळीला पाठिंबा कसा? अशा आप्पांच्या प्रतिसादातून उत्पन्न झालेल्या प्रश्नाला ते उत्तर होतं. म्हणजेच आंदोलन करणार्‍या लाखो लोकांचा रोखही बाबांप्रमाणेच स्विस बँकवाल्या बड्या धेंडांवर आहे. पण स्वतःच्या मागे सोडत असलेला प्रदूषणकारी धूर त्यांना जाणवतच नाही अशा अर्थाने म्हणत होतो. असे लोक तरीही पाठिंबा देतातच कारण त्यांना माहीत आहे की बाबांच्या मागण्या पूर्ण झाल्या तरी अशा छोट्या बिनपावतीच्या व्यवहारांवर काही परिणाम होणार नाही. किंबहुना अशा प्रकारच्या मायक्रो लेव्हलच्या काळ्या पैशाकडे आपण दुर्लक्षच करत आलो आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

गगनविहारी

रणजित चितळे
Wed, 06/08/2011 - 08:46 नवीन
आपले मत एकदम पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

काळा पैसा

स्वतन्त्र
Mon, 06/06/2011 - 12:53 नवीन
मी छातीवर हात ठेवून सांगतो "माझ्याकडे काळा पैसा नाहीये !!! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी म्हणू शकतो की माझ्याकडे

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/06/2011 - 16:09 नवीन
मी म्हणू शकतो की माझ्याकडे काळा पैसा नाही. अगदी छातीवर हात ठेऊन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आणि मी माझ्या खिश्यावर हात

इरसाल
Wed, 06/08/2011 - 14:25 नवीन
आणि मी माझ्या खिश्यावर हात ठेवून म्हणतो कि माझ्याकडे काळा पैसा नाहीये. असलाच तर पिवळा, लाल, आणि हिरवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तथाकथीत बुध्दीवादी

मराठी_माणूस
Mon, 06/06/2011 - 10:12 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3018780.cms ह्या लेखात बाबांना उपटसुंभ म्हटले आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणार्‍यासाठी खालील भाषा वापरली आहे . सरकार कमजोर असले की, रामदेवांसारख्या उपटसुभांचे फावते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, त्याची चिंता आहे. खर तर वरील म्हण राजकारण्यासाठी ज्यास्त चपखल आहे . ह्या राजकाण्याना वेळीच न ठेचल्याने ते सोकावले आहेत आणि वरील महाशय सरकारची बाजु घेत आहेत. ते लेखात असेही म्हणतात की परदेशातील काळी संपत्ती बाबांच्या उपोषणामुळे परत येणार नाही, सरकारलाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही, हे बाबांना कोण समजावून सांगणार? सरकारलाच प्रयत्न करावे लागतील .... पण जर सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय असेल तर काय करायचे.. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही...... अगदी बरोबर, भ्रष्टाचार करणे , काळा पैसा निर्माण करणे तो परदेशी बँकात जमा करणे हे तर त्याहुन सोपे आहे
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र टाईम्स ची बातमी.

स्वतन्त्र
Mon, 06/06/2011 - 12:50 नवीन
हि बातमी मी देखील सकाळी वाचून भडकलो होतो. असे लेख छापतात तरी कसे याचेच आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

?

छोटा डॉन
Mon, 06/06/2011 - 13:49 नवीन
उपरोक्त लेख वाचला. ह्या लेखात 'न पटण्यासारखे' काय आहे तेच मला समजेना, उलट परिस्थितीची योग्य माहिती घेऊन ऐकिव बडबडीवर विश्वास न ठेवता ह्या आंदोलनामागचा (मिडियाने झाकुन ठेवलेला) दुसरा पैलू त्यांनी परखडपणे मांडला असे वाटते. लेखाशी बहुतांशी सहमत आहे ... ह्या चर्चेत एका प्रतिसादात आलेले 'हजारोजणांवर लाठीचार्ज करावा लागला असता ते आता शेकड्यात भागले' हे वाक्यही अत्यंत पटले, आम्ही सहमत आहोत. बाकी 'बाबां'विषयी आमची मते आम्ही नंतर सविस्तरपणे मांडू असे सांगतो. बाकी तुर्तास सरकारने केले ते बहुदा सुयोग्य मार्गाने नसले तरी अत्यंत बरोबर केले आहे असे आमचे मत आहे :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

एकांगी लेख

मराठी_माणूस
Mon, 06/06/2011 - 14:10 नवीन
तो लेख बराचसा "पेड" वाटतो . बाबांना विरोध करताना , सरकार ला "क्लिन चिट" दिल्या साराखा कुठेही आंदोलनाच्या मुद्याला स्पर्श न करणारा. मुद्याला महत्व न देता , कोण करतोय , तो कसा आहे ह्याला महत्व देणारा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

'पेड' लेख ...

छोटा डॉन
Mon, 06/06/2011 - 14:21 नवीन
>>तो लेख बराचसा "पेड" वाटतो . हां, आता कसे बोललात. अहो लेख 'पेड' असल्याशिवाय चालतच नाही, इनफॅक्ट तसे 'पेड' लेख यावे लागतातच आणि ते तसे आले तरच 'आंदोलन' यशस्वी होते. अहो फौज असते असे लेख लिहणार्‍यांची. मिडिया मॅनेजर्सनी फक्त 'क्ल्यु' द्यायचा अवकाश, लेख लिहणारे व ते छापणारे लगेच तयार असतात. अहो हे लोक नसतील कोण कसले 'आंधी' आणि कोण कसला 'गांधी' होतोय ? असो. बाकी राहता राहिला प्रश्न सरकारला क्लिन चीट देण्याचा, तर मला असे वाटते की 'आंदोलकांवर (प्रथमदर्शनी दिसत असलेला) बेछुट लाठीमार' आणि 'उगाच आधी रामदेवबाबाला दिलेला भाव, नंतर ते डोक्यावर बसणे व त्यामुळेच शेवटचा उपाय म्हणुन केलेली कारवाई' इत्यादी दोष सरकारकडे जातात. मी तर म्हणेन की रामदेवबाबांना मैदानात पोहचण्याच्या आधीच त्यांची उचलबांगडी करुन त्यांना परतीचा रस्ता दाखवला जात असता तर बरे झाले असते, पण बाबांच्या भुलथापांना सरकार बळी पडले हा दोषही त्यांच्याकडेच जातो, मुळात त्यांना अजिबात एन्टरटेन न करता पहिल्यापासुनच कडक धोरण अवलंबले असते तर आज ही नामुष्कीची वेळ आली नसती, सरकार ह्यात फसलेच. इतके दोष सरकारकडे जात असताना 'क्लिन चीट' कसली ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सरकारचा दुटप्पीपणा

रणजित चितळे
Mon, 06/06/2011 - 12:42 नवीन
व्यक्तीशहा मला बाबा रामदेव जरा इममॅच्युअर वाटतात. पण त्यांनी भ्रष्टाचारा विरुद्ध मोहीम काढली हे चांगले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबा कोणताही धाकधपटशहा करत नव्हता. सरकारनेत्याच्या वर रात्री कारवाई करुन उधळून लावले हे दुटप्पी पणाचे खास उदाहरण झाले. अरुंधती रॉय व गिलानी सगळी कडे जाऊन कश्मिर हा भारताचा भाग का नाही होऊ शकत असे बोंबलत आहेत त्यांच्या विरुद्ध सरकार काही करत नाही. राहूल गांधी मायावतीवर का उखडले माहीत नाही त्यांच्या पक्षाने हेच केले की. ह्या गोष्टीवरुन काँग्रेसची मानसिकता कळते.
  • Log in or register to post comments

रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस

राही
Mon, 06/06/2011 - 12:44 नवीन
ज्या प्रकारे रामदेवांच्या उपोषणाची हवा निर्माण केली जात होती, ज्याप्रकारे हजारो माणसे अधिकृतरीत्या एकत्र येण्यासाठी क्लृप्त्या लढवल्या जात होत्या,(योगशिबिराच्य नावाखाली विशाल मैदान बुक करून ठेवणे, हजारो माणसे ए.सी. वगैरेसह आरामात राहू शकतील असे आलीशान तंबू उभारणे,) ज्याप्रकारे नको त्या व्यक्ती व्यासपीठावर अचानक प्रगटू लागल्या होत्या त्यावरून बाबरीविद्ध्वंसपूर्व वातावरणाकडेच जाणारी ही पावले आहेत अशी शंका मनात उद्भवू लागली होती. त्यावेळीही,असाच जमाव जमवला जात होता,अशीच आश्वासने (कोर्टासमक्ष) देऊन मोडली गेली होती,केंद्रसरकारला असाच कात्रजचा घाट दाखवला गेला होता.त्यावेळी केंद्र सरकार गाफील आणि निष्क्रिय राहिले. यावेळी मात्र त्वरित कृती केली गेली.रामदेवांना 'रॉ' च्या खास विमानात बसवून संभाव्य हिंसास्थानापासून दूर नेले गेले हे योग्यच झाले. काही हजारांवर लाठीमाराची पाळी येण्यापेक्षा काही शेकड्यांवर भागले ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.
  • Log in or register to post comments

व्वा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/06/2011 - 12:59 नवीन
काही हजारांवर लाठीमाराची पाळी येण्यापेक्षा काही शेकड्यांवर भागले ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. सुंदर...! याला म्हणतात दृष्टी. :) एक गोष्ट मान्य करु की, बाबांच्या काही मागण्या अवाजवी होत्या. सक्तीची शेती, काळापैसेवाल्यांना फाशी,सक्तीची हिंदी भाषा इत्यादि मुद्दे हे मूळ मुद्यापासून म्हणजे काळा पैसा भारतात आणने आणि काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करणे यापासून दूर जाणार्‍या होत्या. आंदोलनाच्या मुद्यांवर सहमती झाली नाही. किंवा बाबांना वाढता पाठिंबा मिळाला म्हणून बाबांचे मुद्दे वाढत गेले असेही म्हणू पण म्हणून उपाशी पोटी झोपलेल्या आंदोलकांवर विशेषतः महिलांवर लाठीमार करणे हे काही योग्य झाले नाही, त्यासाठीचे युक्तिवाद अपूरे पडतील असे मला वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा