Skip to main content

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

लेखक विकास यांनी रविवार, 05/06/2011 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे. बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्‍यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...

वाचने 23133
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

बाबा रामदेवांचा मार्ग बरोबर की चूक, त्यांच्या मागण्या ह्या वास्तव की अवास्तव याविषयी वाद होऊ शकेल. पण अहिंसक जमावावर असा क्रूर हल्ला हा सर्वथा निंद्यच आहे. चांगली आंदोलने करायला गेले की त्यात संधिसाधू घुसतातच. पण हे प्रकरण सरकारने अतिशय गचाळपणे हाताळले आहे आणि त्याचा फटका काँग्रेसला भविष्यातल्या निवडणुकांमधे बसणारच आहे.

रामलीला मैदानात शांतपणे जमलेल्या लोकांवर लाठीचार्ज, रामदेवना अटक हे तर झालंच. पण सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री. अजूनपर्यंत तरी काँग्रेसतर्फे किंवा सरकारतर्फे कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने निवेदन दिलेलं पाहिलं नाही. कदाचित जे झालं ते फार महत्त्वाचं नाही असं दाखवायचा सरकारचा हेतू आहे का? पोलिसांनी जे निवेदन दिलं ते आणखीच हास्यास्पद आहे. म्हणे, रामदेव यांच्या जिवाला धोका आहे असं कळल्यामुळे पोलीस तिथे गेले. हे लोकांना इतके मूर्ख समजताहेत का? की आता शांततेने आंदोलन करणे आणि सरकारविरुद्ध निषेध व्यक्त करणे हेही आता गुन्हा या सदरात गणले जाते? एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की विरोधी पक्षांमधे फार दम नाही हे आताच्या सरकारला माहिती आहे, आणि सरकारच्या या कृतीविरोधात काही आंदोलन झालंच तर ते आपण मॅनेज करू शकतो असा आत्मविश्वास सरकारला आहे!

In reply to by पैसा

सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री.
वेल... त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. कारण सुबोधकांत सहाय यांनी फक्त निवेदन दिलेले नाही. ते वाटाघाटींमध्येही होते. तेवढ्यासाठी अमेरिकेचा दौरा अर्ध्यावर सोडून आले आहेत. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत. सुबोधकांत सहाय अन्नप्रक्रिया मंत्री होते पूर्वी. तेव्हाच रामदेव यांच्या फुड पार्कना परवानग्या मिळाल्या आहेत. त्या काळात दोघं एकमेकांचे जणू मित्र झाले आहेत. इतके की, असं म्हटलं जातं की झारखंडमध्ये जातील तेव्हा रामदेव सहाय यांच्याच बंगल्यावर मुक्कामाला असतात. या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला. 'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे.

In reply to by श्रावण मोडक

त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. मला वाटते कपील सिबल आणि सुबोधकांत सहाय हे सरकारकडून वाटाघाटी साठी नेमलेले होते (निगोशिएटर्स) आणि त्यात काही गैर नाही. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत......'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे. ही अवांतर माहिती म्हणून ठिक आहे, माझ्यासाठीपण नवीन आहे. योग्य ठिकाणी त्याचा रामदेवबाबांवर टिका करताना वापर केला तरी ते योग्यच ठरेल. पण आत्ता, त्याचा संबंध नकळत सरकारने आत्ता जे काही केले त्याचे "डायल्यूशन" / दुर्लक्ष करण्यात होत असेल तर मात्र ते आक्षेपार्ह आहे. कारण सरकारने कायदा अत्यंत गैरपद्धतीने हातात घेतला आहे. तसा कायदा जर एखाद्या दहशतवाद्याच्या अथवा नक्षलवाद्याच्या विरोधात घेतला असता तर आपण (म्हणजे कोणिही) कसा आवाज उठवला असता ह्याचा देखील विचार व्हावा. येथे तर सातत्याने रामदेवबाबा, मला अटक झाली तरी शांततेने आंदोलन पाळा असे सतत (हा प्रकार घडण्याआधी) सांगत होते आणि संपूर्ण आंदोलन शांतपणेच चाललेले होते. त्यामुळे जे काही झाले आहे ते लोकशाहीवरील हल्ला आहे आणि तितकेच या संदर्भात म्हणावेसे वाटते.

In reply to by विकास

ती माहिती अवांतरच आहे. तिचा संदर्भ फक्त वाटाघाटींपुरता मर्यादित आहे, लाठीमाराशी नाही; म्हणूनच "या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला" असे वाक्य त्या परिच्छेदाच्या शेवटी लिहिले आहे. :)

याच धाग्यावर दुसर्या एका संस्थळावर प्रतिक्रिया देउन झाल्यामुळे आता इथे पुन्हा तेच टाईप करायचा कंटाळा आलाय. धागाकर्त्याशी सहमत आहे इतकंच म्हणेन.

इतक्या प्रकारच्या बातम्यांचे मोहोळ उठले आहे की नक्की काय झाले हे समजायला थोडा अवधी जाऊ देणे योग्य आहे असे वाटते. यातील ऐकलेली एक सर्वात घातक शक्यता अशी (संदर्भ: रविवारची सीएन्एन् आयबीएन् वरील विषेश चर्चा) की रविवारी पहाटे अतिउजव्या गटाचा हा रामदेवबाबाचा तंबु पेटवून देण्याचा मानस होता व त्यायोगे पुन्हा देशभर दंगल / गोंधळ माजवून ध्रुवीकरण करायचे असा 'प्लान' होता. याला कोणताही पुरावा त्या सदर व्यक्तीकडे नव्हता. (मात्र जेव्हा पोलिस आले होते तेव्हा मंडपाला बारीकशी आग लागल्याचीहि बातमी आहे, जी लगेच विझवण्यात आली. शिवाय पोलिसांबरोबर अनेक अग्निशामकांचे जवान, गाड्या पाठवण्यात आहे होते असेही वृत्त आहे) यात सत्य किती, वावड्या किती हे सरकार, गृहखाते जाणे. मात्र जर असा काहि धोका सरकारला कळला होता तरी सरकारने, गृहखात्याने याची कल्पना बाबाला दिली होती का? वगैरे अनेक प्रश्न उठतातच. प्रथमदर्शनी आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्य्वस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते. सरकारपक्षाने अजूनही त्यांची अधिकृत भुमिका मांडलेली नाही. गृहमंत्रालयाकडून प्रतिक्रीया येईपर्यंत माझे मत (जरी कोणी विचारत नसले तरी ;) )राखून ठेवत आहे

In reply to by ऋषिकेश

आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्यवस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते. सहमत आहे........! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमतीबद्दल सहमती....!!! अवांतर : दुर्दैवाने प्रसारमाध्यमांची विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाची भूमिका ही as usual अत्यंत उथळ (टीआरपीसाठी धावणे) वाटते. ( एक निवेदिका : क्या बाबा ने अपने बाल खुले छोडे थे? संबंध काय? अरे काय तुम्ही त्यांना न्हाऊ माखू घालणार आहात काय?)

रामदेव बाबांवर झालेली कारवाई हा दडपशाहीचा उत्तम नमुना मानायला हवा. शांतपणे उपोषण करणार्‍यांवर ही कारवाई अयोग्यच आहे,आणि हीच कॉग्रेस म्हणते त्यांचा आदर्श महात्मा गांधी आहेत. ! रामदेव बांबांवर आता सरकार आरोप करते आहे की ते भ्रष्टाचारी आहेत...पण मग हे जर त्यांना अगोदर माहित होत तर त्यांचे स्वागत करायला कॉग्रेसचे मंत्री संत्री का गेले ? त्यांच्या बरोबर बैठकी का झाल्या ? स्वामीजी भ्रष्टाचारी आहेत याचा साक्षातकार किंवा आत्मज्ञात कॉग्रेस पक्षास कसे झाले ? जर स्वामीजींच्या सारख्या माणसावर ही वेळ सरकारने आणली तर सामान्य जनतेचे काय ? सरकारच्या या कॄतीचा मी निषेध करतो.

In reply to by मदनबाण

बाणा, दडपशाहीबरोबर सरकार वरील सर्व कृतीतून एक संदेश देत आहे की, आमच्यावर 'आंदोलनाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तर ते आंदोलन कसे मोडायचे हे आम्हाला माहित आहे. आंदोलनाच्या निमित्ताने आठ तारखेला उपोषणाला बसणार्‍या अण्णा हजारेंनाही हा इशारा आहे. आणि यापुढे कोणतेही आंदोलन करतांना जनतेच्या मनात भिती निर्माण होत राहील. बाकी, लोकशाहीला काळिमा वगैरे काही नसतं रे... हे केवळ शब्दाचे बुडबुडे आहेत असे वाटायला लागले आहे. झोपलेल्या लोकांवर लाठीहल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून रामलीला मैदानाच्या बाहेर उत्स्फूर्तपणे सरकारचा निषेध करायला लोकांनी यायला हवं होतं. (कमीतकमी दिल्लीच्या लोकांनी तरी) किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठीकाणी शांतपणे लोकांनी झाल्या घटनेचा निषेध व्यक्त करायला हवा होता असे वाटते. परंतु आपणही टीव्ही समोरदिग्विजयसिंग काय म्हणतात, सिब्बल काय म्हणतात, सरकार काय म्हणते, रामदेव बाबा काय म्हणतात, हे मन लावून ऐकत असतो. आणि झाल्या घटनेबद्दल आपण केवळ 'च्चच्च' करायचं यापेक्षा आपण काही करु शकत नाही. काय म्हणता ? (का लिहिता पंतप्रधानांना पत्र) ''काला धन भारतमे कैसे लायेंगे और उसको राष्ट्रीय संपत्ती बनाने के लिय क्या कदम उठायेंगे'' हा मुद्दा आता हवेत विरला असेल. -दिलीप बिरुटे (हतबल भारतीय नागरिक)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी बरोबर. आणि काला धन कोणाकडे नाही ? कोण म्हणू शकतो छातीवर हात ठेवून की माझ्याकडे नाही काळा पैसा..

In reply to by गवि

गवि आश्चर्य वाटले हे वाचुन. अजुन या देशात प्रामाणिक लोक जिवंत आहेत. कमी असले तरी आहेत. आणि हो मी म्हणुन शकतो की माझ्याकडे काळा पैसा नाही. तुम्ही नाही म्हणु शकत?

In reply to by मृत्युन्जय

अहो.. पैसाच नाही म्हणून काळाही नाही हे वेगळं. पण बहुसंख्य लोक उदा. घर विकताना जी रक्कम सेलडीडवर असते तीच घेतात का? व्यवहारांत "कॅश"मधे काहीच घेत नाहीत का? कार्ड स्वाईप केल्यावर अमुक इतके जास्त द्यावे लागतील, किंवा बिल हवे असेल तर तमुक टक्के जास्त लागतील म्हटल्यावर, राहू दे बिल.. तेवढेच कमी पैसे गेले. असा विचार हे सर्व काळ्या पैशाचे जनक आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात हे छानच आहे. असेच रहा. पण कितीजण असेच असतात. तुम्ही मला भेटलेले पहिलेच.

In reply to by गवि

>>>>आणि काला धन कोणाकडे नाही ? अहो, सर्वांकडेच काळा पैसा नसतो राव.....! >>>कोण म्हणू शकतो छातीवर हात ठेवून की माझ्याकडे नाही काळा पैसा.. माझ्याकडे कोणताही काळा पैसा नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचे उदाहरण वेगळे असेल. जनरली नोकरदार वर्गाला कर कापूनच पगार हातात मिळतो म्हणून काळ्या धनाचा संचय करण्याचा संबंधच येत नाही. पण आपले इतर उत्पन्नाचे सोर्स असतील तर आपण त्यात किती पावत्या देतो, किती उत्पन्न मिळवतो आणि किती दाखवतो हे ठरवणे अवघड आहे. पण एकूण निरीक्षणाने हेच दिसतं की काळा पैसा हा फक्त करोडपतींकडेच असतो असं नाही. असो. पुढे येऊन कोणी मान्य करणे शक्यच नाही म्हणा. ;) त्यामुळे माझे विधान परसेप्शनवर अवलंबून आणि त्यामुळे मर्यादितच राहणार. ज्याने त्याने मनाशीच विचारण्याचा प्रश्न आहे.

In reply to by गवि

बहुतांशी आपल्या(आमच्या)सारख्या नोकरदारांना हातात मिळणारा पगार सर्व कर, इ. कापूनच मिळतो आणि आपण कोणत्याही गैरमार्गाने पैसा कमवतही नाही त्यामुळे आपल्याजवळ काळा पैसा नाही असेच आपल्याला वाटते. परंतु, ५-१० रुपये वाचवण्यासाठी आपण जेव्हा पावतीशिवाय खरेदी करतो तेव्हा ती रक्कम काळा पैसाच असते. अवांतरः मी पाहिलेल्या मोठमोठ्या सोनारांच्या दुकानात कधीच, कुणालाही(माझ्यासमोर तरी) रितसर पावती देत नाहीत. कागदाच्या एका चिटोर्‍यावर दागिन्याचे वजन आणि त्या दिवशीचा सोन्याचा भाव यांचे गणित करून दिलेले असते. या कागदावर दुकानाचे नाव, विक्रेत्याची सही/शिक्का काहिही नसते. हेही काळे धनच आहे ना? तेथे पावती घेतल्यास सोन्याचा भाव जास्त लावतात का? कोणीही पावतीची मागणी का करत नाही?

In reply to by स्मिता.

स्मिता - मला, आपल्या एवढी, सोनारांची माहिती नाही पण मी जेव्हा जेव्हा काही (सोन्याची) खरेदी केली तेव्हा तेव्हा रीतसर पावती मिळाली प्रिंटेड ज्याच्यात सगळे टिन क्र वगैरे असलेले. बाकी जाणकारांना जास्त माहीती असेल.

In reply to by रणजित चितळे

मला सोनारांची खूपच माहिती आहे अश्यातला भाग नाही. कळायला लागल्यापासून २-३ वेळा सोनाराच्या दुकानात जावून जरी आपल्याला आणि आजूबाजूंच्या ग्राहकांना पावती मिळताना दिसत नसल्यास एवढी माहिती आपोआपच मिळते. माझा अनुभव जळगावमधील दोन अतिशय सुप्रसिद्ध सोनारांकडचा आहे. इतर ठिकाणचे माहिती नाही. बाकी नक्षत्र, जिली, इ. 'ब्रँडेड' दुकानातून मात्र रितसर पावती मिळते असे वाटते.

In reply to by स्मिता.

जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि बाफना शिवाय आहे कोण. तिथे एस्टीमेट असे छोट्या अक्षरात छापलेल्या चिटोऱ्या व्यतिरिक्त काहीही देत नाहीत जरी लाख दोन लाखाचे सोने घेतले तरी. स्वानुभव.

In reply to by रणजित चितळे

एस्टीमेट वेगळे व व्यवहार झाल्यावर पावती वेगळी नव्हेच.. फक्त एस्टिमेटच.. व्यवहाराची वेगळी पावती नाहीच.. असा त्याचा अर्थ आहे. हाच बेहिशेबी अर्थात काळा पैसा..

In reply to by गवि

अगदी असेच असते. एका चिटोर्‍यावर फक्त एस्टिमेट मिळत असल्याने सगळा बेहिशेबी काळा पैसा असतो. पण या बाबतीत वर अप्पांनी म्हटलंय की हा दोष सिस्टीमचा आहे, यात तथ्य वाटतं. म्हणजे, आपल्यासारखे सुशिक्षीत लोक हा व्यवहार चालवून घेत असतील तर ती आपली चूक आहे हे मान्य. पण तिथे अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी, इ. लोकही आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडेफार सोने खरेदी करत असतात. रितसर पावती घेतलीच पाहिजे, तसे न करून आपण काळ्या पैश्यात भर घालतोय याची तर त्यांना जाणीवसुद्धा नसते. त्यामुळे असे वाटते की अगदी अडाणी ग्राहकाचे 'अवेअरनेस' वाढवणारी किंवा कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार मॉनिटर करणारी सिस्टीम सुधारायला हवी.

In reply to by स्मिता.

अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी, तसे न करून आपण काळ्या पैश्यात भर घालतोय याची तर त्यांना जाणीवसुद्धा नसते. आणि समजा जाणीव झाली (अवेअरनेस प्रोग्रॅमने) तर त्यांना (कर बुडतोय. काळा पैसा तयार होतोय याची) पर्वा / फिकिर असणार आहे का?? उलट पावती न देण्याच्या युक्तीने स्वतःचे आणि आपलेही चार पैसे वाचवण्याची नामी युगत काढणर्‍या सराफाला दुवा देतील.

In reply to by रणजित चितळे

हो ते दोन्ही वेगवेगळे मिळतात. एस्टीमेट म्हणजे खरेदी केलेल्या मालाचा हिशोब चिटोर्यावर लिहून देतात. जसे ५ तोळे घेतले तर आजची तारीख, आजचा तोळ्याचा भाव आणि ५ तोळ्याचे किती हे क्यालक्यूलेशन बस. जर पक्की पावती मागितली कि मग VAT आणि इतर tax ची भरमार. कोण करतो इतके लफडे. लग्न सराईत आधीच गांजलेले लोक कुठून २/३ हजार उगाच वाढवून घेतील.

In reply to by स्मिता.

अशीच असंख्य उदाहरणं आहेत. आपापल्या "औकात" प्रमाणे काळा पैसा प्रत्येकजण तयार करतो. काळा पैसा म्हणजे काय याविषयी कन्सेप्ट क्लियर नसल्याने आपण त्याला कारणीभूत नाही अशी समजूत करुन घेणे सोपे जाते. डॉक्टरच्या फीचे बिल (बडीबडी हॉस्पिटल्स वगळता), अगदी लाखांची विक्री असलेला हॉटेलवाला उडपी (आठवा त्याची चिठ्ठीवजा "पावती"), अगदी करपात्र रक्कम कमावणारा वडापाववाला किंवा अनेक मध्यम विक्रेते कधीच व्हॅलिड पावती देत नाहीत आणि आपणही घेत नाही. भाडेकरुकडून भाडे घेणारे कित्येकजण पावती कमीची करतात. आणि कायकाय सांगावे ? कोणी म्हणेल की हे सर्व लहान स्केलवर आहे. मी म्हणतो "थेंबे थेंबे तळे साचे" न्यायाने असा जनताजनार्दनात तयार होणारा काळा पैसा एका-दोघा उद्योगपतीच्या कोटींमधे असलेल्या स्विस बँकेतल्या काळ्या पैशापेक्षाही जास्त होत असेल.

In reply to by गवि

काळा पैसा म्हणजे काय याविषयी कन्सेप्ट क्लियर नसल्याने आपण त्याला कारणीभूत नाही अशी समजूत करुन घेणे सोपे जाते. आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. एन्ड युजर हा नेहमी अडाणीच असतो. त्याला चुका करण्याची संधीच न देणे हे चांगल्या सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. हाच नियम इथेही लागू होऊ शकेल. म्हणून व्यवस्थेत बदल करणे हाच यावर उपाय आहे. अशा बदलाची मागणी जेंव्हा कोणी करते तेंव्हा त्याला विशिष्ट लोकांकडुनच विरोध होतो ही बाब सूचक आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. आपल्या अज्ञानातून काळा पैसा तयार होत नाही. उत्तम ज्ञानानेच आपण तो तयार करतो ..पण ही जे काही आपण केले त्यातून वाचलेला / तयार झालेला तोच तो प्रसिद्ध "काळा पैसा" आहे हे आपल्याला "वळत" नाही, जाणवत नाही. याला अज्ञान म्हणायचं किंवा काय ते तुम्हीच पहा. शिवाय रामदेव बाबा जे करत आहेत त्याला पाठिंबाच द्यायला हवा हे शंभर टक्के सत्य आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांनी सामान्यजनांतील काळा पैसा जर कमी झाला तर अधिकच उत्तम. कारण तो अधिक मुरलेला आणि "डिफ्यूज्ड" आहे. शोधून काढायला अशक्य. (नाना पाटेकरः चित्रपट प्रहार: दुश्मन दोनो बाजू में है. एक सरहद के उस पार एक इस पार. इस पारका दुश्मन ज्यादा खतरनाक है.. असा काहीसा डायलॉग आठवतो.) आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. एन्ड युजर हा नेहमी अडाणीच असतो. त्याला चुका करण्याची संधीच न देणे हे चांगल्या सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. इथे मी थोडे सुधारित उदाहरण देऊन स्पष्ट करतो. समजा एका सॉफ्टवेअरमधे युजरनेम पासवर्ड टाकण्याऐवजी कंट्रोल आणि एफ ५ दाबले तर थेट निनावी लॉगिन होते आणि बिनबोभाट चोरून माहिती काढता येते / काम करता येते असे कोणाच्या लक्षात आले. त्यानंतर ही गोष्ट सर्वत्रांत पसरुन विनालॉगिन गुपचुप काम करणार्‍यांचे प्रमाण वाढले तर हा दोष त्या सिस्टीमचा तर आहेच पण एन्ड युजर अडाणी आहे, त्याने नकळत चूक केली असं नाही म्हणता येत. त्याला या क्रियेचे फायदे नक्की माहीत होते आणि लॉगिन वापरायचा पर्याय त्याच्याकडे असूनही "जाणूनबुजून" त्याने हे केले. फक्त आपण जे करतोय त्याचा एकूण सिस्टीमवरचा इम्पॅक्ट त्याने समजून घेतला नाही/ त्याला पर्वा नव्हती.. तस्मात दोष त्याच्याकडेही जातो. (फक्त उदाहरण आहे. आय पी लेव्हलपर्यंत जाउ नका प्लीज ;) )

In reply to by गवि

आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भार महान हा डायल्वॉक लई आवडतो.

In reply to by गवि

प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न करता मुद्दामूनच चूक करतो आहे असे मी वादाकरता गॄहीत धरतो आहे (मान्य करत नाहीये). अशा परिस्थितीत सिस्टिम तशीच राहावी अशी त्याची इच्छा असली पाहिजे. प्रत्यक्षात अण्णा आणि रामदेव यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून सिस्टिम सुधारावी अशी एन्ड युजरची इच्छा आहे असे दिसते आहे आणि सरकार सिस्टिम सुधारण्याच्या दॄष्टीने पावले टाकण्याऐवजी मुद्दामहून वेळाकाढूपणा करत आहे असे दिसते. तर मग दोष कोणाचा आहे हे तुम्हीच ठरवा.

In reply to by अप्पा जोगळेकर

आप्पा अहो इथेच असलेला विरोधाभास मी उघड करु इच्छितोय हो.एंड युजरला सिस्टीम सुधारायला हवीय ती कोटीवाली बडी धेंडे आणि नेत्यांबाबतीत. पण त्याचवेळी आपल्या पाठीशी काही जळते आहे हे लक्षात येत नाहीये. आपली चवन्नीअठन्नीची चलाखी हाही काळा पैसाच आहे हेच एंड युजर विसरतोय. आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..

In reply to by गवि

त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..
आन्ना, बाबा मोठ्या माश्यांच्या मागं लागतील, त्यांचि भाजी करुन खातील. लहान माश्यांच तुमि घ्या मनावर. (हवं तर आमि येउ मदतीला). करा तुमि पन आन्दोलन, कोनी अडवलय का ? आना पकडुन लहान माश्यांना, एकत्र भाजी करुन खाऊ ? (वाटलं तर इथं रेसिपि पन टाकु फटुसकट) . हलकेच घ्या. बरंका !

In reply to by गवि

गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा गमतिने म्हना कि उपासाहाने दिलेले होते असे म्हना. पन त्याचा अर्थ इतकच होता कि, भ्रश्टाचाराच्या समुद्रात लहान माश्याचे पुढे मोठे मासे होतात कि मोठ्या माश्यांमुळे लहान मासे सोकावतात ? सुरुवात कुठुन होते ? हे सगळे वादातीत प्रश्न आहेत. (खरेतर शब्दांचे बुडबुडे). हे माशे काढुन टाकायचे तर कोनितरी कुठुन तरी सुरुवात कराविच लागनार आहे. बाबा, अन्नांनि मोठ्यापासुन सुरुवात केली. जर आपल्याला जमत असेल तर, आपन देखिल मोठ्यांपासुन सुरुवात करा, अन्यथा लहान माश्यांपासुन सुरुवात करा. आपन पन आन्दोलन सुरु करा. आमि येतो आपल्या बरोबर साथिला. नुसते प्रेक्शकां सारखे बसुन आनि उपदेश देउन कसे चालेल ? आपन म्हनता .
आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.
मग घाला भर त्या सिस्टिम मधे, नाही घालता येत तर तुमिच एखादि गवि-सिस्टिम सुरु करा. कोनिहि अडवलेल नाही. जो कोनि काही करायचा प्रयत्न करतोय त्यात खोडा घालन्यापेक्शा त्यातिल उनिवा दुर करन्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते. असे दोन शब्द बोलुन मि माझे भाशन संपवतो.

In reply to by नरेशकुमार

कोणाच्या सिस्टीममधे खोडा घालण्याची बात केली मी? हा तिरपा झालेला धागा सरळ वरपर्यंत वाचा. मी उलट आपल्या स्वतःची आणि स्वतःसारख्या सामान्यांची निर्भर्त्सना करत होतो. आपण स्वतःही हेच करतो ज्याला बाबा विरोध करताहेत हे मी पहिल्यापासून हायलाईट करतोय.. त्यांना विरोध करु नकाच उलट त्याउप्पर जाऊन आपली आणि आजूबाजूची ही चवल्यापावल्या वाचवण्याची आचमनं बंद करा असा त्याचा अर्थ आहे. बाबांच्या सिस्टीममधे या छोट्या माश्यावर उपाय नाही हे माझं वाक्य बाबांच्या आंदोलनाला किंवा पद्धतीला विरोध करण्यासाठी नसून, उलट एन्ड युजर (म्हणजे सामान्य लोक जे छोटा काळा पैसा निर्माण करतात, बिनपावतीचे व्यवहार करुन), त्यांचाच चळवळीला पाठिंबा कसा? अशा आप्पांच्या प्रतिसादातून उत्पन्न झालेल्या प्रश्नाला ते उत्तर होतं. म्हणजेच आंदोलन करणार्‍या लाखो लोकांचा रोखही बाबांप्रमाणेच स्विस बँकवाल्या बड्या धेंडांवर आहे. पण स्वतःच्या मागे सोडत असलेला प्रदूषणकारी धूर त्यांना जाणवतच नाही अशा अर्थाने म्हणत होतो. असे लोक तरीही पाठिंबा देतातच कारण त्यांना माहीत आहे की बाबांच्या मागण्या पूर्ण झाल्या तरी अशा छोट्या बिनपावतीच्या व्यवहारांवर काही परिणाम होणार नाही. किंबहुना अशा प्रकारच्या मायक्रो लेव्हलच्या काळ्या पैशाकडे आपण दुर्लक्षच करत आलो आहोत.

In reply to by गवि

मी छातीवर हात ठेवून सांगतो "माझ्याकडे काळा पैसा नाहीये !!! "

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आणि मी माझ्या खिश्यावर हात ठेवून म्हणतो कि माझ्याकडे काळा पैसा नाहीये. असलाच तर पिवळा, लाल, आणि हिरवा आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3018780.cms ह्या लेखात बाबांना उपटसुंभ म्हटले आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणार्‍यासाठी खालील भाषा वापरली आहे . सरकार कमजोर असले की, रामदेवांसारख्या उपटसुभांचे फावते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, त्याची चिंता आहे. खर तर वरील म्हण राजकारण्यासाठी ज्यास्त चपखल आहे . ह्या राजकाण्याना वेळीच न ठेचल्याने ते सोकावले आहेत आणि वरील महाशय सरकारची बाजु घेत आहेत. ते लेखात असेही म्हणतात की परदेशातील काळी संपत्ती बाबांच्या उपोषणामुळे परत येणार नाही, सरकारलाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही, हे बाबांना कोण समजावून सांगणार? सरकारलाच प्रयत्न करावे लागतील .... पण जर सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय असेल तर काय करायचे.. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही...... अगदी बरोबर, भ्रष्टाचार करणे , काळा पैसा निर्माण करणे तो परदेशी बँकात जमा करणे हे तर त्याहुन सोपे आहे

In reply to by मराठी_माणूस

उपरोक्त लेख वाचला. ह्या लेखात 'न पटण्यासारखे' काय आहे तेच मला समजेना, उलट परिस्थितीची योग्य माहिती घेऊन ऐकिव बडबडीवर विश्वास न ठेवता ह्या आंदोलनामागचा (मिडियाने झाकुन ठेवलेला) दुसरा पैलू त्यांनी परखडपणे मांडला असे वाटते. लेखाशी बहुतांशी सहमत आहे ... ह्या चर्चेत एका प्रतिसादात आलेले 'हजारोजणांवर लाठीचार्ज करावा लागला असता ते आता शेकड्यात भागले' हे वाक्यही अत्यंत पटले, आम्ही सहमत आहोत. बाकी 'बाबां'विषयी आमची मते आम्ही नंतर सविस्तरपणे मांडू असे सांगतो. बाकी तुर्तास सरकारने केले ते बहुदा सुयोग्य मार्गाने नसले तरी अत्यंत बरोबर केले आहे असे आमचे मत आहे :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

तो लेख बराचसा "पेड" वाटतो . बाबांना विरोध करताना , सरकार ला "क्लिन चिट" दिल्या साराखा कुठेही आंदोलनाच्या मुद्याला स्पर्श न करणारा. मुद्याला महत्व न देता , कोण करतोय , तो कसा आहे ह्याला महत्व देणारा .

In reply to by मराठी_माणूस

>>तो लेख बराचसा "पेड" वाटतो . हां, आता कसे बोललात. अहो लेख 'पेड' असल्याशिवाय चालतच नाही, इनफॅक्ट तसे 'पेड' लेख यावे लागतातच आणि ते तसे आले तरच 'आंदोलन' यशस्वी होते. अहो फौज असते असे लेख लिहणार्‍यांची. मिडिया मॅनेजर्सनी फक्त 'क्ल्यु' द्यायचा अवकाश, लेख लिहणारे व ते छापणारे लगेच तयार असतात. अहो हे लोक नसतील कोण कसले 'आंधी' आणि कोण कसला 'गांधी' होतोय ? असो. बाकी राहता राहिला प्रश्न सरकारला क्लिन चीट देण्याचा, तर मला असे वाटते की 'आंदोलकांवर (प्रथमदर्शनी दिसत असलेला) बेछुट लाठीमार' आणि 'उगाच आधी रामदेवबाबाला दिलेला भाव, नंतर ते डोक्यावर बसणे व त्यामुळेच शेवटचा उपाय म्हणुन केलेली कारवाई' इत्यादी दोष सरकारकडे जातात. मी तर म्हणेन की रामदेवबाबांना मैदानात पोहचण्याच्या आधीच त्यांची उचलबांगडी करुन त्यांना परतीचा रस्ता दाखवला जात असता तर बरे झाले असते, पण बाबांच्या भुलथापांना सरकार बळी पडले हा दोषही त्यांच्याकडेच जातो, मुळात त्यांना अजिबात एन्टरटेन न करता पहिल्यापासुनच कडक धोरण अवलंबले असते तर आज ही नामुष्कीची वेळ आली नसती, सरकार ह्यात फसलेच. इतके दोष सरकारकडे जात असताना 'क्लिन चीट' कसली ? - छोटा डॉन

व्यक्तीशहा मला बाबा रामदेव जरा इममॅच्युअर वाटतात. पण त्यांनी भ्रष्टाचारा विरुद्ध मोहीम काढली हे चांगले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबा कोणताही धाकधपटशहा करत नव्हता. सरकारनेत्याच्या वर रात्री कारवाई करुन उधळून लावले हे दुटप्पी पणाचे खास उदाहरण झाले. अरुंधती रॉय व गिलानी सगळी कडे जाऊन कश्मिर हा भारताचा भाग का नाही होऊ शकत असे बोंबलत आहेत त्यांच्या विरुद्ध सरकार काही करत नाही. राहूल गांधी मायावतीवर का उखडले माहीत नाही त्यांच्या पक्षाने हेच केले की. ह्या गोष्टीवरुन काँग्रेसची मानसिकता कळते.

ज्या प्रकारे रामदेवांच्या उपोषणाची हवा निर्माण केली जात होती, ज्याप्रकारे हजारो माणसे अधिकृतरीत्या एकत्र येण्यासाठी क्लृप्त्या लढवल्या जात होत्या,(योगशिबिराच्य नावाखाली विशाल मैदान बुक करून ठेवणे, हजारो माणसे ए.सी. वगैरेसह आरामात राहू शकतील असे आलीशान तंबू उभारणे,) ज्याप्रकारे नको त्या व्यक्ती व्यासपीठावर अचानक प्रगटू लागल्या होत्या त्यावरून बाबरीविद्ध्वंसपूर्व वातावरणाकडेच जाणारी ही पावले आहेत अशी शंका मनात उद्भवू लागली होती. त्यावेळीही,असाच जमाव जमवला जात होता,अशीच आश्वासने (कोर्टासमक्ष) देऊन मोडली गेली होती,केंद्रसरकारला असाच कात्रजचा घाट दाखवला गेला होता.त्यावेळी केंद्र सरकार गाफील आणि निष्क्रिय राहिले. यावेळी मात्र त्वरित कृती केली गेली.रामदेवांना 'रॉ' च्या खास विमानात बसवून संभाव्य हिंसास्थानापासून दूर नेले गेले हे योग्यच झाले. काही हजारांवर लाठीमाराची पाळी येण्यापेक्षा काही शेकड्यांवर भागले ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.

In reply to by राही

काही हजारांवर लाठीमाराची पाळी येण्यापेक्षा काही शेकड्यांवर भागले ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. सुंदर...! याला म्हणतात दृष्टी. :) एक गोष्ट मान्य करु की, बाबांच्या काही मागण्या अवाजवी होत्या. सक्तीची शेती, काळापैसेवाल्यांना फाशी,सक्तीची हिंदी भाषा इत्यादि मुद्दे हे मूळ मुद्यापासून म्हणजे काळा पैसा भारतात आणने आणि काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करणे यापासून दूर जाणार्‍या होत्या. आंदोलनाच्या मुद्यांवर सहमती झाली नाही. किंवा बाबांना वाढता पाठिंबा मिळाला म्हणून बाबांचे मुद्दे वाढत गेले असेही म्हणू पण म्हणून उपाशी पोटी झोपलेल्या आंदोलकांवर विशेषतः महिलांवर लाठीमार करणे हे काही योग्य झाले नाही, त्यासाठीचे युक्तिवाद अपूरे पडतील असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपाशी पोटी झोपलेल्या आंदोलकांवर विशेषतः महिलांवर लाठीमार करणे हे काही योग्य झाले नाही, पुरुषांना कमी लागते असा एक सामान्य समज आहे त्याची गंमत वाटते. लाठीमार अत्यंत लज्जास्पद आणि निर्घृण होता. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. पण उपाशीपोटी झोपणे आणि महिला असणे यांचा लाठीमार देण्यातल्या अमानुषतेच्या पातळीतल्या ग्रेडशी संबंध पटला नाही. अमानुष ते अमानुषच. बादवे.. अपघात झाला तरी मृतांत अमुक इतक्या स्त्रियांचा समावेश होता असं वेगळं सांगतात.. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'सुन्दर...! याला म्हणतात दृष्टी.' आपला उपरोध समजला. पण जेव्हा मोठी हानी होण्याची शक्यता असते आणि अजिबात हानी न होण्याचे पर्याय उपलब्ध नसतात तेव्हा कमीतकमी हानीचा पर्याय स्वीकारणे शहाणपणाचे ठरते.(सर्वनाशे समुत्पन्ने वगैरे) रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.ते एक योगशिक्षक,योगगुरू आहेत. त्यांचा locus standi काय, असा प्रश्न विचारता येऊ शकेल .त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे.(ती असू नये असेही नाही पण..) आपल्या महाराष्ट्रात योग आणि स्वास्थ्यप्रसाराचे काम निकम गुरुजी,अय्यंगार गुरुजी,व्यवहारे,निंबाळकर आणि इतर अनेकांनी शांतपणे केलेले आहे. त्यांच्यापेक्षा रामदेवबाबांचे ज्ञान आणि अनुभव अधिक असेल असे नाही.त्यांचा तिथे जमलेला शिष्यवर्गही साधूप्रवृत्तीचा होता असेही नाही.एकाच विचाराने भारलेले,भारावलेले केडरबेस्ड लोक काय करू शकतात ते शिवाजीपार्कच्या सभेनंतर सामान्य सैनिकांकडून घडणार्‍या वर्तनातून पूर्वी दिसून येत असे. ज्याअर्थी रॉ ला यात पडावे लागले,त्याअर्थी मामला गंभीर असणार आणि इरादे नेक नसणार असे मानायला मी तयार आहे.

In reply to by राही

सहमती ... तुमच्या मतांशी आणि तुम्ही देत असलेल्या स्पष्टीकरणाशी सहमत आहे, आधीच्या वाक्याशीही सहमत होतो. रामदेवबाबाहे हे प्रचंड राजकिय महत्वाकांक्षा ( इनफॅक्ट सर्वसत्ताधीश होण्याची इच्छा बाळगुन ) असलेला इसम वाटतात. त्यांचे 'योग आणि तत्सम' क्षेत्रात कार्य मोठ्ठे आहे म्हणुन त्यांनी देशाच्या कारभारात केलेली ढवळाढवळ आणि व्यवस्थेला वेठीस धरुन केलेली आंदोलने जस्टिफाईड होत नाहीत. ' माझा २० वर्षाचा राजकिय अनुभव आहे, आण्णांना येऊन केवळ २ वर्षे झाली आहेत' असे गंमतशीर विधान करुन त्यानंतर त्याहुन गंमतशीर पद्धतीने हासणार्‍या रामदेवबाबांकडुन आम्हाला निदान राजकिय आणि सरकारी व्यवस्था ह्या क्षेत्रात कसल्याही अपेक्षा नाहीत. त्यांनी 'योग'दान करावे, त्यात ते महान आहेत आणि असतील. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

राहि व डॉन्याशी सहमत! रामदेवबाबांचे हे आंदोलन सुरवातीपासूनच 'राजकीय' वाटत होते. आणि यात जनाआंदोलनापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा भाग जास्त होता. त्यात रामदेवबाबांची (बालिश) राजकीय समज त्या जनसमुदायाला व इतर जनतेलाही फक्त गोंधळात टाकत होती.

In reply to by ऋषिकेश

रामदेवबाबांचे हे आंदोलन सुरवातीपासूनच 'राजकीय' वाटत होते. या संदर्भात आत्ताच एक मजेदार ट्वीट पाहीली: Forget Anna Hazare and Baba Ramdev, I think Manmohan Singh should enter politics :-) बाकी ह्या कशामुळे ही दडपशाहीचे समर्थन होत नाही हा भाग आहेच... बाबा जर राजकारणात आले तर कपालभाती होईल का कपाळ्मोक्ष हे ठरवायला मतदार समर्थ आहेतच. शिवाय जर तसे ते येणार असतील तर त्यांना पाठींबा देणार्‍या भाजपाला थोडेच चालतील? कारण असे वाटते की, मते विभागली जातील ती भाजपाचीच...

In reply to by विकास

बाबा जर राजकारणात आले तर कपालभाती होईल का कपाळ्मोक्ष हे ठरवायला मतदार समर्थ आहेतच.
सहमत आहे.
Forget Anna Hazare and Baba Ramdev, I think Manmohan Singh should enter politics
हा हा हा.. :)) डॉक्टर राजाबद्दलचा उद्वेग मी ह्या विडंबनातून व्यक्त केला आहे

In reply to by विकास

सहमत. बाबा रामदेव यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असेलही आणि त्यात गैर काही नाही. लोकशाहीत हे पुर्णपणे समर्थनीय आहे. भारतिय संविधान सुद्धा याला नाकारत नाही. कोणीही व्यक्ती राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवू शकतो आणि ती पुर्ण करण्या करीता प्रयत्न करू शकतो. कॉंग्रेस सरकारचं जर हे म्हणणे असेल की बाबा रामदेव यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्या करीता या प्रकारची दडपशाही करण्यात आली आहे तर हा सरकारचा मुजोरपणा आहे आणि लोकशाही धो़क्यात आणणारा प्रकार आहे. आज बाबा रामदेव यांच्या विरूद्ध, उद्या अण्णा हजारेंच्या विरूद्ध, परवा आणखी कोणा व्यक्ती विरूद्ध जर हे सरकार या पद्धतीने वागायला लागलं तर चीन मधील हुकुमशाही सरकार, लिबिया मधील गद्दाफि चं सरकार, इजिप्त मधिल मुबारक चं सरकार, सौदी मधील किंग अब्दुल्ल्लाचं सरकार, अफगान मधील पुर्वाश्रमीचं तालिबान सरकार आणी भारतातील काँग्रेस सरकार यात फरक काय?

In reply to by छोटा डॉन

' माझा २० वर्षाचा राजकिय अनुभव आहे, आण्णांना येऊन केवळ २ वर्षे झाली आहेत' असे गंमतशीर विधान करुन हे कुठे वाचलेत? कारण फारच "इंटरेस्टींग विधान" आहे! पण मला गुगलून कुठल्याही बातमीत दिसले नाही. म्हणून खात्री करून घेत आहे.

In reply to by राही

रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.................... रामदेव ही नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नसेल, असे गृहित धरु. रामदेव बाबांनी योगासनेच करावीत, सामाजिक कार्य आणि व्यवस्था बदलण्याच्या भानगडीत पडू नये. इ. इ. समाजात व्यवस्थेविरुद्ध कोणी बोलू लागला की, बोलणा-यकडेच संशयाने पाहण्याची वृत्ती काही नवी नाही, अशात तर तिच्यात वाढ होतांनाच दिसत आहे. बोलणा-याचीच उलट तपासणी होऊ लागते. उलट तपासणीत काही गैर नाही. आंदोलनाच्या निमित्ताने दिग्विजयसिंगांनी ते काम सुरु केलेच होते. मला असं म्हणायचं आहे काळ्यापैशाची समस्या आणि भ्रष्टाचाराबाबत लोकजागृती होऊन शासन निर्णय घेत नसेल, विरोधी पक्षाला कोणी मोजतच नसेल अशावेळी सरकारावर दडपण आणून त्याबाबत कायदे करुन असलेल्या समस्यांवर तोडगा निघत असेल, कायद्यात उत्तम तरतुदी होत असेल तर अशा वेळी लढणा-याच्या बाजूने राहीले पाहिजे की त्याला विरोध केला पाहिजे ! उद्या कितीही नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती जरी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बोलू लागली तरी आपण त्याच्याकडेही उलटतपासणीच्या चष्म्यातूनच पाहात राहणार आहोत, हेही मला माहित आहे. बरं....! कोणी काही करत नसते तेव्हा आपण आपल्याच समाजाला संवेदना हरवलेला समाज, स्वार्थी समाज, आपल्यापूरतेच पाहणारा समाज अशा शेलापागोट्यांनी वर निर्भत्सनाही करत असतो. अशा दुटप्पी समाजामुळे आणि शासनाच्या दडपशाहीमुळे आपल्या कोणत्याही सामाजिक चळवळी आहेत तिथेच थांबतील आणि संपतील असेही वाटते. बाकी, अजून आमच्या काही भावना धमाल मुलगा यांच्या हम्म शिर्षकाच्या प्रतिसादात आल्याच आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by राही

ज्याअर्थी रॉ ला यात पडावे लागले,त्याअर्थी मामला गंभीर असणार आणि इरादे नेक नसणार असे मानायला मी तयार आहे. नक्की असे कुठे वाचले की रॉ मधे पडले म्हणून? बाकी रॉ म्हणजे तीच संघटना का जी ची स्थापना अमेरीकन सीआयएच्या धर्तीवर देशाच्या बाहेरील देशविघातक घटनांना आणि व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासाठी केली गेली आणि जे केवळ त्या संघटनेचे काम आहे? ६२ चे चीन युद्ध आणि ६५ चे पाकीस्तानचे युद्ध यातून शिकून पुढे जाण्यासाठी म्हणून दूरदृष्टी असलेल्या बाईंनी ती संस्था स्थापली होती. त्याचा काहीप्रमाणात बांग्लादेश मुक्तीसंग्रामात उपयोग ही झाला पण नंतर आणिबाणीच्या काळात बाईंची आणि त्यांच्या लाडक्या मुलाची कटपुतळी म्हणूण हेटाळणी देखील झाली... म्हणजे या रॉ चे घटने/काय्द्याप्रमाणे काम हे २६/११ चा सुत्रधार अतिरेकी इल्यास काश्मिरी आणि तत्सम अतिरेक्यांना पकडून नायनाट करणे असे असले पाहीजे. कदाचीत आपण ते काम अमेरीकेस आउटसोअर्स केले असावे. तसे असेल तर मग ठीक आहे,नुसतेच बेंचवर बसवून ठेवण्याऐवजी आपल्याच (म्हणजे भारतीय नागरीकांच्या) मागे त्यांना सोडले तरी हरकत नसावे.

In reply to by विकास

हेडिंगमधे एकदम 'रॉ म्हणजे विकास' असे वाचले गेल्याने क्षणभर गोंधळ उडाला. बाकी चालू द्या.

In reply to by राही

रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.................... ह्या वाक्याबद्दल कोणीकाही पुरावे देऊ शकेल काय? अन्यथा सदर वक्तव्य करणार्‍या व्यक्ती या देखील तशाच उथळ आहेत असे आम्ही सोयिस्कररित्या समजू. वरील प्रतिसादात सर्व विधाने जर तर, असतील-नसतील अशा मोघम स्वरूपाची आहेत. ज्याअर्थी रॉ ला यात पडावे लागले,त्याअर्थी मामला गंभीर असणार आणि इरादे नेक नसणार असे मानायला मी तयार आहे. CBI ला सार्थपणे Congress Invistigatino Bureau असे म्हटले जाते. सरकारी यंत्रणेचा वापर स्वार्थासाठी करणे ही काँग्रेसची निती नवीन नाही त्यामुळे रॉ ला यात पडावे लागले असली विधाने राजकीयदॄष्ट्या अपरिपक्व वाटतात. आणि अगदी रॉला यामधे पडायचेच होते तर सकाळपासून रॉ काय माशा मारत बसले होते का? येवढी मोठी रिस्क जर असेल तर रॉ ने इतका वेळ काढला यातूनच सरकारचे (काँग्रेसचे) इरादे नेक नव्हते हे स्पष्ट होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>>>रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.................... >>ह्या वाक्याबद्दल कोणीकाही पुरावे देऊ शकेल काय? पेशव्यांशी सहमत आहे. हेच रामदेवबाबा काँग्रेस प्रो असले असते तर काय झाले असते असाही विचार येतो (अर्थात सरकार त्यांचे असल्याने त्याची सुतरामही शक्यता नाहीच पण प्रतिसादात बरेच फरक दिसले असते.) उगाच रामदेवबाबा योगगुरु आहेत म्हणुन त्यांना राजकारण/समाजकारंण करण्याची संधी नाही असे गळे काढणार्‍यांना तुम्ही कारकुंडे आहात तुम्हाला सद्यस्थितीवर मत प्रदर्शित करण्याची संधी नाही असे म्हणावे वाटते. आणि, जर अयोध्येसारखी घटना होणार असा कयास जे लोक लावतायेत त्यांनी या वेळेस टारगेट काय होते हे सांगावे. रामदेवबाबा जमाव जमा करुन स्विस बँक तर लुटायला जाणार नव्हते ?

In reply to by आनंदयात्री

हेच रामदेवबाबा काँग्रेस प्रो असले असते तर काय झाले असते असाही विचार येतो तसे असते तर थत्ते काका वेगवेगळ्या संस्थळांवर त्यांच्या बाजूने मनापासून लढले असते असा विचार येतो.

In reply to by राही

अरुंधती रॉय व गिलानी सगळीकडे जाऊन कश्मिर हा भारताचा भाग का नाही होऊ शकत असे बोंबलत आहेत त्यांच्या विरुद्ध सरकार काही करत नाही. बाबरी विध्वंस बद्दल बोलायचे तर माझे विचार येथे व्यक्त आहेत. http://rashtravrat.blogspot.com/2010_09_01_archive.html

In reply to by राही

बाबरीचा आणि आताचा मुद्दा , ह्यात फरक आहे . बाबरीचा मुद्दा हा बराचसा नकरात्मक आणि राजकीय होता. आताचा मुद्दा प्रत्येकाच्या (धर्म , जात विरहीत) जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे , ह्यात सरकारने केलेल्या कारवाईचे कसले समधान ?

गडबड आहे खरी. परंतू, मला गंमत वाटतेय ती दुसर्‍याच गोष्टीची. जो माणूस, काहीतरी विधायक कार्य करायचा प्रयत्न करतोय, (मग भले त्यात त्याचा हिडन अजेंडा का असेना) तर त्या कामात बिब्बा घातलाच पाहिजे. राजकारण्यांची रखेल बनलेली प्रसारमाध्यमं जे ओकतील त्यावर निर्बुध्दपणे माना डोलावल्याच पाहिजेत, अडचणीत येणार्‍या भ्रष्टाचारी सरकार आणि त्याच्या नोकरशाहीच्या दडपशाही आणि अंदाधुंद कारभाराला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत केलीच पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं काही विधायक काम करण्याची काहीशी का होईना इच्छा असलेला मनुष्य प्रयत्न करु लागला रे लागला, की ताबडतोब त्याचं खच्चीकरण केलंच पाहिजे ह्या हस्तीदंती मनोर्‍यातील विचारांना कुरवाळणार्‍या 'मला काय त्याचं?' ह्या नवउच्चमध्यमवर्गिय मानसिकतेचं जे जाहीर प्रदर्शन दिसतंय त्याचं काय? हे सगळेच तर उभा देश मातीत घालायला निघालेत की. *(हिडन अजेंड्याबद्दलचं वैयक्तिक मतः आजच्या घडीला कोण माईचा लाल आहे उभ्या १००कोटीच्या ह्या देशात, की जो स्वत:च्या हिडन अजेंड्याविना काम करतोय? मग त्यातल्या त्यात जरा बरं असलेलं जरी दिसलं तरी त्याची बाजू काळीकुट्ट ठरवण्यातून लोकांना काय आसूरी आनंद मिळतो कोण जाणे. )

In reply to by धमाल मुलगा

ओके, तुमच्या मताचा आदर ठेऊन असे सांगतो की मला ( काही पक्षी आम्हाला ) १०० भ्रष्टाचारी राजकारणी परवडले पण उगाच असले अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन स्वतःच्या विचित्र आणि अचाट संकल्पनांपायी (टोटल विदेशी बंदी) देशाच्या प्रगतीत बिब्बा घालणारे व काही अंशी देशाला पुन्हा अ-विकसित अवस्थेकडे न्हेणारे बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो. हे लोक तर नकोच नको पण ह्यांची उगाच मिडिया मॅनेज करुन चमकोगिरी करणारी आंदोलने नको असेही सांगतो. सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्‍या महाभागांच्या नाकदुर्‍या काढत हिंडावे ? - छोटा डॉन