बाय बाय क्लिक क्लॅक डिंग!!!!
क्लिक क्लॅक डिंग!!!! एकेकाळचा अनेक ऑफीसातून येणारा सगळ्यात नेहमीचा आवाज. टाईपरायटरचा आवाज. टाईपरायटर तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. मीही लहानपणापासून पाहत आलो आहे. हा टाईपरायटर घरात कधी आला हे नक्की आठवत नाही मात्र तो घरी होता. तेव्हा आमचं दहिसर हे मुंबईचं एक उपनगर असलं तरी त्याला एक गावपण होतं. गावातून एक 'वाहती' नदी होती. (माझ्या कळत्या वयापर्यंत तिचं पाणी दुषित व्हायला लागत असलं तरी निदान वाहतं होतं.) गावठणाबाहेर असलेलं विठ्ठलाचं कौलारू मंदीर ही गावातली महत्त्वाची जागा होती. शाळा होती, टेकडी होती, टेकडीवर देऊळ होतं, तिथे चढून-दमून गेल्यावर हमखास मिळणारं खोबरं होतं, त्या उंचीवरून दिसणारी रेल्वेलाईन, आणि त्यावरून मधूनच जाणारी रेल्वे होती.
असो.. तर सांगायची गोष्ट अशी हा टाईपरायटर त्या काळापासून आमच्याकडे असावा. माझ्या लहानपणापासून त्याला मी माझ्या बाबांच्या समोर बघत होतो. रोज संध्याकाळी ५:४० ला चर्चगेटहून सुटणारी लोकल ६:४५ वाजता दहिसर गाठायची आणि बाबा ६:५० ला घरात हजर असायचे. घरी आले, चहा, दिवेलागण झाली की जेवणं होईपर्यंत आमच्याशी गप्पा मारणे- टाईमपास सुरू असायचा. त्यावेळचं आमचं घर बैठं, कौलारू होतं. दारं सतत उघडी. आमचं एकत्र कुटुंब आणि त्यात आजी आमची जगमैत्रिण, त्यामूळे सतत घरात कोणीतरी पाहुणा असेच. जेवणं झाली की आम्ही टिव्ही समोर आणि बाबा मात्र जो हा टाईपरायटर समोर घ्यायचे की त्याची 'टक् ट्क' आमचे डोळे मिटल्यानंतरही चालु असायची.
रोजची टाईपरायटरची टक् ट्क हा तेव्हा सवयीचा भाग होता. इतकंच नव्हे तर ती आमची ओळखही होती. त्यावेळी 'टायपिस्ट' असणे हे एक कसब असल्याने टायपिंग येणार्यांना नोकर्या तर मिळतच पण घरी टाईपरायटर असल्याने कामेही मिळत. त्यात त्या काळी अख्ख्या गावात जे मोजके टाईपरायटर होते त्यापैकी एक माझ्या बाबांचा होता. त्यात त्यांचे टायपिंग हे अतिशय वेगात आणि अचूक होते. टंकन होणार्या कागदाकडे न बघता आणि अनेक पानांमागे एकही शब्द चुकीचा टाईप न करता देण्यासाठी त्यांचा लौकिक होता. त्यामुळे सतत अनेक जणांचा राबता घरात असायचा.
ऑफिसमधून काम करून आल्यावर पुन्हा हे टायपिंग करणे हे किती कष्टाचं आहे हे तेव्हा कळत नसे. रात्री २-३ पर्यंत टायपिंग करून पुन्हा सकाळी ऑफिस गाठणे याला त्यांचा फिटनेस कारभूत आहे असे ते सांगतात. मात्र त्याला त्यांची कुटुंबासाठीची तळमळ कारभूत होती हे आता जाणवते. QWERTY कीबोर्ड, त्यावर न दिसता चालणारी बोटे, समोर कागदावर उमटणारी अक्षरे याचंच आम्हाला त्यावेळी अप्रुप होतं.
त्यात बाबांनी रिबिन बदलायला वगैरे टाईपरायटर उघडला की आम्हा पोरांची चंगळच. बटण दाबल्यावर वर येणार्या काड्या, त्यावरची उलट अक्षरे, ग्रीसचा डबा, त्याने अकारण माखवून घेतलेले हात वगैरेचा कोण आनंद होता. अख्खा मित्रांना गोळा करून आम्ही ते रिबीन बदलणे, काड्यांना ग्रीस लावणे बघायचो. त्यात बाबाही अजिबात न ओरडता विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्यायचेच वर मला सगळं झालं की एक पान टाईप करायला द्यायचे. ज्यात मला 'Q' ते '?' पर्यंत सगळी अक्षरांची टेस्टिंग करायची असे.
ह्या टंकनोद्योगात आम्हा मुलांसाठी सगळ्यात आवडता प्रसंग जर काहि असेल तर बाबांची टायपिंग मधे चुक होणे. जर मोठी चुक असेल तर कागद पूर्ण भरायच्या आत आम्हाला एक खटका दाबून अख्खा कागद खेचायला मिळे. असा कागद खेचण्याचा पराक्रम करण्यासाठी आम्ही वाट बघायचो. जर लहान चूक असेल तर बाबा एक बाटली काढायचे ज्यात स्पिरीटसारखा वास येणारं एक गुलाबी द्रावण असायचं ज्याने स्टेंन्सिलवर टंकन केलेले बदलता यायचं. त्याचा वास घेत घेत योग्य अक्षरावर ते लिक्विड लावणे हा ही क्षण आनंदाचा असे. त्यासाठी तर बाबांची चुक व्हावी म्हणून आम्ही तासन तास बसलेलं आठवतंय!
टायपिंग करताना केवळ डोळ्यांवरच नाही तर छातीवरही ताण येतो. तो ताण बाबांवर येऊ लागला. आणि तोपर्यंत घरची आर्थिक परिस्थितीही बरीच बरी झाली होती, तेव्हा हळूहळू बाबांचा टायपिंगचा जोडधंदा बंद झाला. मात्र ते घर सोडेपर्यंत घरावरचा 'टायपिस्ट' हा ओळख असलेला बोर्ड बाबांनी तसाच ठेवला होता. अडल्या-नडल्यासाठी रात्री अपरात्री कागद टाईप होण्याचे ते हक्काचे ठिकाण टिकून होते.
परवा डि.एन.ए. वाचत होतो त्यात ही बातमी बाचली आणि मन २०-२२ वर्षे मागे पळालं. त्या काळाशी जुळलेली एक नाळ तुटल्यासारखं वाटलं.. मी स्वतः आयुष्यात या ज्या काही ठिकाणावर आहे त्यामागे अनेक व्यक्तींप्रमाणेच अनेक वस्तुंचाही हातभार आहे. एके काळी आपल्या सार्या काड्यंनिशी आमच्या कुटुंबाच्या मागे उभ्या राहिलेल्या टाईपरायटरचे काळाच्या पडद्याआड जाणे अपेक्षित असले तरी मनात कुठेतरी दुखवून गेलेच!
याद्या
5276
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
छान लिहिलयस रे ऋ.
"एके काळी आपल्या सार्या
छान
काळाच्या पडद्याआड जाणारे यंत्र
एलक्यूपी
In reply to काळाच्या पडद्याआड जाणारे यंत्र by नितिन थत्ते
आठवणी छान आहेत. लेखन आवडले.
या बातमील वैयक्तिक
छान लिहिलायस लेख , मागे
मस्त रे ऋ. परवा ती बातमी
चान चान.
छान लिहलय रे.. वाचून लहान
आवडले.
मस्त लिहिलं आहेस रे, मला
सुरेख
गेल्या वर्षी
हळवे करणारि बातमी.
फार
लेख आवडला
मोठ्या प्रमाणात
In reply to लेख आवडला by राजेश घासकडवी
खरंतर मी इतक्या मागच्या(?)
सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल
छान..
मस्त लेख ऋषी..आवडला आणि २०
:-)
-
छान लिहले आहेस , आवडले .
लिखान आवडले .... असेच लिहित
आज वाचल अगदी निवांत बसुन. फार
दहिसर अस होत?
In reply to आज वाचल अगदी निवांत बसुन. फार by स्पंदना
मस्तच...
खुपच छान लिहिलं तुम्हि.