कामाच्या व्यापात बर्याच गोष्टी करायचे राहून जाते. सकाळी निवांत बसून वर्तमानपत्र वाचणे असो किंवा सहजच मारलेला एखादा फेरफटका असो; मोठ्या आनंदाच्या मागे दमछाक करणारी दौड करतांना छोट्या-छोट्या गोष्टींमधून विनासायास मिळणार्या आनंदाचा आपण नेहमीच बळी देत असतो. नंतर 'माझ्याच वाट्याला का अशी पळापळ' असे गळा काढून ओरडण्यात ही आपण मागे हटत नाही. अशा मनाच्या विचित्र अवस्थेतून कशीबशी वाट वाट काढून रोजच्या लढाईला तोंड देता देता अचानक काहीतरी छोटेच पण खूप आनंद देणारे गवसते आणि मनाच्या रणांगणांवर प्रश्नांच्या आणि समस्यांच्या तलवारी घेऊन अथकपणे लढणार्या विचारांच्या मावळ्यांना निर्भेळ विसाव्याचे काही क्षण मिळतात. तसलेच काहीतरी आम्ही अनुभवले 'तार्यांचे बेट' हा चित्रपट पाहून! दिवसभराचा कामाचा शीण, दुसर्या दिवशीच्या कामांच्या यादीची जळमटे, अप्रॅजलचे टेंशन इत्यादी आधुनिक कवचकुंडले मिरवत मी संध्याकाळी सात वाजता घरी पोहोचलो. घरी आल्यावर सहजच 'तार्यांचे बेट' चित्रपटाच्या जाहिरातीकडे लक्ष गेले. रात्री आठ वाजताचा खेळ होता. मी लगेच बायकोला लवकर तयार व्हायला सांगीतले. बरोबर आठ वाजता 'तार्यांचे बेट' सुरु झाला. जेमतेम दीड तासाचा चित्रपट!
सुरुवातच कोकणातल्या एका रम्य गावाच्या दर्शनाने झाली. एक लहान गाव, त्यात राहणारे सुर्वे कुटुंब! नवरा-बायको, एक मुलगा-एक मुलगी आणि कुटुंबातली एक आजी असे पाच जणांचे एक टूमदार घर! बाहेर प्रशस्त अंगण, अंगणात एक जुनी होडी, एक झोका. भरपूर झाडी आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा हे तर कोकणाचे सगळ्यात मोलाचे अलंकार! मुलांची शाळेत जाण्याची गडबड सुरु आहे; आई तयारी करून देतेय; बाबा सायकल काढून मुलांना शाळेत सोडण्यासाठी तयार उभे आहेत...सायकलवर मुलांना बसवून सुर्वे साहेब निघतात. सायकलची चेन तुटल्यावर घामाघूम होत हाताने सायकल ओढून मुलांना शाळेत सोडल्यावर हा कोमलहृदयी बाप त्याच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पोहोचतो.
सुर्वे साहेब म्हणजे नाकाच्या सरळ रेषेत चालणारा पापभिरु माणूस. कष्ट करायचे, कुटुंबात रमायचे, आईचा आदर करायचा, संध्याकाळी गणपतीच्या देवळात भजनासाठी जायचे असा दिनक्रम असणारा हा एक अतिसामान्य माणूस. तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा ओढतांना होणारी दमणूक पोरांच्या आनंदाकडे बघत गोड मानून घ्यायची असा या घरचा शिरस्ता. मुलांची आई देखील काबाडकष्ट करणारी, पै न पै जपून खर्च करणारी, आणि नवर्याला सदोदित सततची 'खरी' साथ देणारी.
सुर्वे साहेबांच्या ग्रामपंचायतीची काही मंजूरीसंदर्भातली कामे मुंबईला निघतात आणि सुर्वे साहेबांच्या वरचेवर मुंबईला चकरा सुरु होतात. एक प्रामाणिक आणि स्वच्छ कर्मचारी म्हणून ग्रामपंचायतीत सुर्वे साहेबांचे कौतुक असते. असेच एके दिवशी काम लांबण्याची शक्यता असल्याने सुर्वे साहेब बायको-पोरांना घेऊन मुंबईच्या सफरीला निघतात. पोरांना दोन दिवस मुंबई दाखवावी आणि आपले काम ही करावे या हेतूने सुर्वे कुटुंब मुंबईमध्ये दाखल होते. आपल्या गावतली छोटी-छोटी कौलारू घरे, अगदी छोटे रस्ते, उंच-उंच झाडी, आणि पैशाची चणचण या पार्श्वभूमीवर ओंकारला म्हणजे सुर्वे साहेबांच्या मुलाला मुंबापुरीच्या श्रीमंती लखलखाटाची भुरळ न पडती तरच नवल! मुंबईच्या उंच इमारती, मोठाले रस्ते, त्यावरून सुसाट धावणार्या मोटारी, पंचतारांकित हॉटेले, खेळण्यांची अतिप्रचंड मोठी दुकाने...ओंकारच्या डोळ्यात मुंबईच्या श्रीमंतीच्या चांदण्या लकाकू लागतात. गेस्ट हाऊसच्या गचाळपणावर नाराज होऊन ओंकार हॉटेलात राहण्याच्या हट्ट धरतो. अर्थात सुर्वे कुटुंबाला हा खर्च स्वप्नातल्या स्वप्नातही परवडणारा नसतो. मग महाग तिकिट दरामुळे चित्रपट न बघता येणे, खेळणी विकत न घेता येणे, आलिशान हॉटेलात न जेवता येणे इत्यादी गोष्टींमुळे ओंकारचा हिरमोड होतो आणि मुंबई सहलीच्या त्याच्या दृष्टीने अजिबात चांगल्या नसणार्या आठवणी घेऊन ओंकार घरी परततो.
एका संध्याकाळी आई ओंकारला अभ्यासावरून रागावते. ओंकार तिचे म्हणणे धुडकावून लावतो. आणि त्याचवेळी सुर्वे साहेब ओंकारला आमिष दाखवतात. "तू जर येत्या परीक्षेत पहिला आलास तर तू जे मागशील ते देईन" असे आश्वासन सुर्वे साहेब देऊन बसतात. त्यांना ओंकारच्या महत्वाकांक्षी मनातल्या इच्छेची कल्पना नसते. कोकणातल्या खेड्यातले पोर मागून मागून काय मागणार या गाफीलपणात सुर्वे साहेब उत्तराची वाट बघत असतांनाच ओंकारचे डोळे चमकतात. "फाईव्ह ष्टार" असे शब्द त्याच्या तोंडून निघताच सुर्वे साहेब हबकतात पण आपले वाह्यात आणि वात्रट कार्टे काय पहिला नंबर काढणार या कल्पनेने सुखावतात आणि ओंकार पहिला आल्यास त्याला फाईव्ह स्टार हॉटेलात एक दिवस रहायला घेऊन जाण्याचे आश्वासन देतात. ओंकार शाळेत तसा व्रात्य मुलगा म्हणून प्रसिद्ध असतो. काही दिवसांनी तो हा सौदा विसरतो का? पुढे काय होते? नक्कीच बघा आणि आपल्या पोरा-बाळांनाही दाखवा 'तार्यांचे बेट'.
किरण यज्ञोपवित यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे निखळ आनंद देणारा आणि हलकेच चार गोष्टी सुनावणारा एक प्रसन्न अनुभव आहे. रोजच्या दगदगीत अर्थपूर्ण मनोरंजनाचा शिडकावा करून हा चित्रपट मनाच्या बेटात घर करून राहतो हे नक्की. पटकथा अगदीच छान आहे. कुठेच लक्ष विचलित होण्याची संधी मिळत नाही. भावनिक रडापडीचा गदारोळ टाळून हृदयस्पर्शी घटना मनावर ठसवण्यात दिग्दर्शक आणि पटकथालेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. संवादाची बाजू भक्कम आहे. संवादांना खास कोकणी चुरचुरीतपणाची फोडणी आहे. ओंकारचा मित्रांच्या कॉमेंट्स आणि त्यांचे सल्ले खरच अफलातून आहेत.
नरेंद्र भिड्यांचे पार्श्वसंगीत अगदी सुसंगत आहे. मुलीच्या तोंडी असलेले एक गाणे श्रवणीय तर आहेच पण कथेला खूप पुढे घेऊन जाते. गणपतीच्या मंदिराचा एक पात्र म्हणून केलेला उपयोग खूप सुंदर आहे. खुद्द गणराज काही प्रसंगात केवळ मूर्ती असून देखील एखाद्या बारीक लक्ष ठेवणार्या पोलिसासारखे भासतात.
एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल इतक्या सफाईदारपणे कॅमेरा सरसर फिरतो. कोकणाचे सौंदर्य, सुर्वे कुटुंबातला साधेपणा खूप चांगल्या पद्धतीने टिपला आहे. कलादिग्दर्शन सरस आहे. टॉकीजमध्ये बसल्या-बसल्या कोकणात जाऊन आल्याचा अनुभव देण्यात हा चित्रपट यशस्वी झालाय.
दुसर्या भागातला नाट्यमयतेचा अतिरेक थोडा टाळता आला असता तर अधिक बरे झाले असते असे वाटते. शिवाय मोठी स्वप्ने बघा पण ती पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवू नका असा काहीसा विचित्र मेसेज हा चित्रपट देतो की काय असे वाटले. मोठी स्वप्ने बघा, प्रामाणिकपणे खूप कष्ट करा, उंच भरारी मारा आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घाला असा एक चांगला मेसेज देता येऊ शकला असता. चित्रपटाचा अंत त्याचमुळे की काय थोडासा टिपीकल मराठी मनोवृत्तीचे समर्थन करणारा वाटला. पण एक नितांतसुंदर नवीन आणि मनाला ताजेपणाचा मस्त फील देणारा चित्रपट म्हणून सगळ्यांनी 'तार्यांचे बेट' अवश्य बघावा. काहीतरी नवीन चांगले, आश्वस्त करणारे बघितल्याचे समाधान हा चित्रपट नक्कीच देतो. गो फॉर इट!!
--समीर
वाचने
3333
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार सुरेख चित्रपट परीक्षण!
धन्यवाद ...
आत्ताच निघतोय ... चिंचवडात
परीक्षण छान आहे.
समीरसूर साहेब, माझ्यामते ते
मास्तरांनी रेकमेंड केला
चान चान.
छान! छान!
बघायला हवा हा सिनेमा! याची
चित्रपटाचा अंत त्याचमुळे की
मास्टर व्यणि करा
In reply to चित्रपटाचा अंत त्याचमुळे की by भडकमकर मास्तर
धन्यवाद!
छानच परिक्षण..!
मस्त सांगितले आहे.. मागच्या
मस्त समिक्षण!! नक्की बघेन.
परवाच हा चित्रपट पहिला ..