✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

अ
अजातशत्रु यांनी
Fri, 04/15/2011 - 20:57  ·  लेख
लेख
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित.... तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30923 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

देवाच्या मंदिरात प्रवेशाबाबत

राजेश घासकडवी
Fri, 04/15/2011 - 21:25 नवीन
देवाच्या मंदिरात प्रवेशाबाबत कोणताही भेदभाव करणं हे देवाला लाजिरवाणंच आहे. त्यात देवीच्या दर्शनाला स्त्रियांना मागे ठेवणं हे आणखीनच विचित्र. ही प्रथा मोडून पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत याचा आनंद आहे. अशा चांगल्या गोष्टी करण्यात जर राजकारण्यांमध्ये चढाओढ झाली तर उत्तमच. मग ते राजकारण न रहाता लोककारण होईल.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/15/2011 - 23:10 नवीन
देवीच्या मंदीराच्या गाभार्‍यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली. तिथे, गाभार्‍यासारख्या पवित्र ठिकाणी देवी तरी का चालते असा प्रश्न उभा रहातो. देवीची इतर मर्त्य स्त्रियांशी नकळत तुलना करण्याचं घोर पातक माझ्या हातून घडतं आहे याची जाणीव मनात ठेवावी लागते. एकदा देवत्व बहाल केलं की मग स्त्री आहे का पुरूष याचा विचार करावा का न करावा? म्हणजे पुरूषांच्या राज्यात, जिथे स्त्रियांसाठी ३३%, ५०% असं आरक्षण ठेवावं लागतं, बालकांच्या तुलनेत बालिकांच्या घटत्या प्रमाणाची चिंता करावी लागते, तिथे देवत्व बहाल केलेल्या "व्यक्ती"चं लिंग तपासावं का? देवत्वामुळे ही सवलत मिळाली तर मग भक्ताच्या बाबतीत हाच न्याय लावावा का? अर्थात पुन्हा एकदा देवाची मर्त्य माणसांशी तुलना करण्याचं पातक घडत आहे. जिथे गुन्हेगार असला तरीही पुरूष आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रवेश आहे तिथे कितीही पापभीरू असली तरी स्त्री आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रवेश मिळणं कितपत न्याय्य आहे? देवावर विश्वास ठेवणार्‍यांना, गाभार्‍याची पवित्रता मानणार्‍यांना याचा विचार करावासा वाटत नाही का? महागड्या, श्रीमंती रेस्तराँ, क्लब्जमधे, इंग्रजांच्या काळात "भारतीय आणि कुत्र्यांना प्रवेश नाही" अशा पाट्या दिसायच्या, आजच्या काळात ड्रेसकोड असतो याची आठवण झाल्याशिवाय रहावत नाही. निदान या ठिकाणी मंदीर, गाभारा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पावित्र्य, शुचिता असे बोजड शब्द वापरून "अध्यात्मिक" उच्चपणाचा बेगडी अभिमान नसतो. अर्थात हे असं काही बोललं तर आपण विचारवंत आणि हिंदूद्वेष्टे ठरण्याची भीती असते. पण सामान्यतः सगळीकडे असतो तशा सुजाण/अजाणांचं मिश्रण असणार्‍या, समाजात झुंडशाही, दडपशाही, बहुमत इत्यादींना 'घाबरून' आपण आपले विचार मांडायचेच नाहीत का? का "आपल्याला काय फरक पडतो" असा बुरखा पांघरायचा? का उगाच चारचौघं म्हणतात तसंच आपणही म्हणायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

गणपा
Sat, 04/16/2011 - 00:27 नवीन
अदितीशी सहमत. देवीच्या देवळात बायकांनाच बंदी ही जाचक अट राहीलीच कशी इतकी वर्षे याचं आश्चर्य वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसरा असाच प्रकार

पंगा
Sat, 04/16/2011 - 03:14 नवीन
देवीच्या मंदीराच्या गाभार्‍यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली.
+१. दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा. (स्वामिनारायण मंदिरात हा प्रकार पाहिलेला आहे.) बरे, हे सेपरेशन इतके, की एकत्र आलेल्या कुटुंबातील स्त्रीने वेगळे बसायचे आणि पुरुषाने वेगळे बसायचे इतकेच नव्हे, तर लहान मुलाने आईबरोबर किंवा लहान मुलीने बापाबरोबर बसायचे नाही, बसल्यास त्याबद्दलही नम्र विनंती-कम-आक्षेपवजा सूचना दिली गेलेली अनुभवलेली आहे. (एकटा/टी पालक विरुद्धलिंगी अर्भकास घेऊन आल्यास काय करत असतील, तेच जाणोत.) बरे, 'याचे कारण काय' असे मंदिरास भेट देणार्‍या कोण्या अभारतवंशीयाने एकदा विचारले, तर तिला चक्क 'तुमच्या सुविधेकरिता' असे उत्तर दिले गेलेले ऐकलेले आहे. हा प्रकार काही कळलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसरा असाच प्रकार म्हणजे

विंजिनेर
Sat, 04/16/2011 - 06:19 नवीन
दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा.
या नियमाचा गाभार्‍यातील देवाशी संबंध नसतो तर ही सोय(!) रांग आणि गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाळण्यासाठी असतो :) त्यामुळे वेगळ्या रांगा योग्यच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

?

पंगा
Sun, 04/17/2011 - 01:03 नवीन
एखादा लहान मुलगा आपल्या स्वतःच्या आईला किंवा एखादी लहान मुलगी आपल्या स्वतःच्या बापाला किळसवाणा स्पर्श करू शकते? तेही 'आपल्या संस्कृती'त? गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाकण्यासाठी वेगळ्या रांगांचे प्रयोजन अर्थातच समजू शकतो. मात्र देवळाच्या मुख्य खोलीत गाभारा वगळता जी सभागृहासारखी वापरता येण्याजोगी जागा असते, जिथे सणासुदीच्या दिवशी जमलेले दर्शनेच्छू बसू शकतात, क्वचित धार्मिक कार्यक्रम किंवा भजने किंवा तत्सम काही होऊ शकते, अशा ठिकाणी पुरुषांकरिता आणि स्त्रियांकरिता बसण्याकरिता वेगवेगळ्या जागा असता (हेही समजू शकलो नाही तरी एक वेळ दुर्लक्ष करू शकतो), तेथे एखादा लहान मुलगा (घटनासमयी वय वर्षे अंदाजे तीन ते चार) आपल्या आईबरोबर स्त्रियांच्या जागेत बसला असता त्याबद्दलही 'नम्र सूचना' मिळण्याचा स्वानुभव आहे. अर्थात, हा असा अनुभव सार्वत्रिक नाही हेही नमूद करतो. कदाचित हे विशिष्ट मंदिर ज्या समाजाचे किंवा पंथाचे आहे (स्वामिनारायण मंदिर) त्यातील रूढी याला कारणीभूत असू शकतील. आणि त्या समाजाच्या किंवा पंथाच्या रूढी काय असाव्यात हे मी ठरवू शकत नाही - त्या समाजाचा किंवा पंथाचा घटक असल्याखेरीज तो अधिकार मला आहे असे वाटत नाही. त्या मंदिरात गेलेच पाहिजे असे माझ्यावर कोणते बंधनही नाही, आणि माझी इच्छा नसल्यास तेथे जाणे मी टाळूही शकतो. (मंदिराशी संलग्न असलेल्या दुकानात चांगल्या प्रतीच्या मिठाया आणि फरसाण विकत मिळते, आणि निदान या कारणासाठी तरी अधूनमधून तेथे जावेसे वाटते.) मात्र, इतक्या टोकाचा भेदभाव (जेणेकरून एखादे बालक आपल्या विरुद्धलिंगी पालकाबरोबर विरुद्धलिंगी लोकांकरिता आयोजित केलेल्या जागेत बसू शकत नाही) का केला जात असावा, याबद्दल कुतूहल वाटते, आणि ते काही केल्या मरत नाही. दुसरी एक गोष्ट मला कळलेली नाही. वर उल्लेख केलेले मंदिर हे अमेरिकेत आहे. गर्दीतले स्त्रियांना होणारे घाणेरडे स्पर्श टाळण्यासाठी महिलांच्या वेगळ्या रांगांचे प्रयोजन जरी मान्य केले, तरी मग अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या धर्मांची वेगवेगळी धर्मस्थळे आहेत, तेथे अशा वेगळ्या रांगा करण्याची गरज भासताना का दिसत नाही? गर्दीत महिलांना किळसवाणे स्पर्श ही भारतीय उपखंडातून आलेल्या - आणि त्यातही विशेष करून हिंदू - पुरुषांची खासियत आहे काय? हेही काही केल्या मनाला पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

इथल्या स्वामीनारायण मंदीरात

पुष्करिणी
Sun, 04/17/2011 - 01:48 नवीन
इथल्या स्वामीनारायण मंदीरात अस नेहमीच बघीतलं आहे, एकदोनवेळेस तिथल्या लोकांकडून चारचौघांसमोर संस्कृती आणि धर्म यावर लेक्चर्सचा प्रसादही मिळाला आहे. मला हे मंदीर अतिशय आवडतं पण असे उपदेश ऐकायला नको वाटतं. गांधीनगरचं स्वामीनारायण मंदीर त्यामानानं बरच पुढारलेलं आहे. अजून एक मंदीर मी अलीकडेच पाहिलं, राधा-कृष्णाचं. मंदीरात प्रवेश केल्यावर २ वेगवेगळे हॉल..आत अगदी सगळं सेम टू सेम देवाच्या मूर्तीसुद्धा दोन्हीकडे वेगळ्या. मी इकडे बायकांच्या हॉलमधे कॄष्णाची मूर्ती कशी चालते असं विचारणार होते पण बरोबर असणार्‍या इतरांनी गप्प केलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

आमच्या इथल्या स्वामिनारायण

रेवती
Sun, 04/17/2011 - 07:20 नवीन
आमच्या इथल्या स्वामिनारायण मंदिरातही स्त्री आणि पुरुषांना वेगळाल्या जागा आहेत. दोन दरवाजे वगैरे. आरती झाल्यावर सगळ्या महिला साधा नमस्कार करतात तर पुरुष मंडळी अनेकवेळा साष्टांग नमस्कार करतात. हे असावे की नसावे यापेक्षा सोय अशी होते की गुढग्याचे त्रास असलेल्या ज्येष्ठ महिला, गरोदर महिला इ. ना खुर्च्या पुरत नसल्या तर त्या खाली बसतात व थोड्यावेळाने पाय परसता येतात. पाठीचे त्रास असणार्‍यांसाठी वेगळी आसने आहेत. आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना संकोच वाटेल हे नक्की. मंदीरात हे आरक्षण असू नये. त्यासाठी वेगळ्याल्या जागा असल्या तरी एकत्र बसणार्‍या कुटुंबासाठीही सोय असावी. अर्थात मी काही मंदीरात नेहमी जात नाही. एवढ्यात तीनवेळा जायचा योग आला म्हणून हे पाहण्यात आले. देवळात येणारे लोक घाणेरडे स्पर्श करायला कश्याला लाजतील (जे तसलेच आहेत त्यांच्याबद्दल म्हणतीये मी). तिथल्या चपला चोरी करणारेही आहेत तसे पाकिटमारही आहेतच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

मुख्य गाभार्‍यातील तेज

शाहरुख
Fri, 04/15/2011 - 21:44 नवीन
मुख्य गाभार्‍यातील तेज महिलांना सहन न होऊन त्यांना ओटीपोटीचे त्रास होऊ शकतात असे टीव्हीवरील कुठल्यातरी चर्चेत सनातन प्रभातचा एक माणूस सांगत होता :) कदाचित राजघराण्यातील आणि सेलिब्रिटी बायका पावरबाज असाव्यात. बाकी विषय एन्कॅश करायची राजकारणी पक्षांची धडपड पाहून मौज वाटली.
  • Log in or register to post comments

म्हंजे? झाल्या का बाया मुक्त?

नगरीनिरंजन
Fri, 04/15/2011 - 21:52 नवीन
म्हंजे? झाल्या का बाया मुक्त?
  • Log in or register to post comments

छान

आत्मशून्य
Fri, 04/15/2011 - 22:13 नवीन
जर काहीही कारण नसताना महालक्ष्मीच्या मंदीरात स्त्रीयांना प्रवेश मीळत नव्हता हे सत्य असेल तर या पेक्षा मोठा जोक फक्त मीपा वरतीच घडेल.
  • Log in or register to post comments

काहिहि असेल तरि धार्मिक

जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 04/15/2011 - 22:47 नवीन
काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही. उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?
  • Log in or register to post comments

हस्तावरोध

राजेश घासकडवी
Fri, 04/15/2011 - 23:23 नवीन
काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.
खरं तर धर्मच मानवी समानतेच्या बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करत असतो. तो नको तिथे घातलेला हात बाजूला ढकलून देणं हेच चालू आहे. फुले, कर्वे, आंबेडकर यांनी ते केलं. आजच्या काळात पुढचं पाऊल न टाकता स्वस्थ राहिलो तर त्यांचे कष्ट वाया नाही का जाणार?
उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?
निरर्थक प्रथा पाळून उगाच धार्मिकपणाचं अवसान आणण्यात तरी काय तथ्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

मुळात अनेक धार्मिक प्रथांमधेच

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/15/2011 - 23:27 नवीन
मुळात अनेक धार्मिक प्रथांमधेच तथ्य आहे का नाही याची शहानिशा करायची वेळ पुन्हा एकदा* आली आहे काय? * उदा: आद्य शंकराचार्यांनी ब्राह्मणांना शाकाहारी 'बनवलं', ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं तत्वज्ञान मराठीत, सामान्यांच्या भाषेत आणलं, इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

प्रथाच का?

राजेश घासकडवी
Sat, 04/16/2011 - 01:52 नवीन
प्रथाच का, मुळात धर्मामध्येच (कुठच्याही) काय तथ्य आहे? जगात इतकी दुःखं धर्मामुळे आलेली आहेत. मी तर म्हणतो धर्मांमधले सणवार, उत्सव वगैरे ठेवावे आणि बाकी सगळं सोडून द्यावं. कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत. धर्म ही संकल्पना एक

Nile
Sat, 04/16/2011 - 02:03 नवीन
सहमत. धर्म ही संकल्पना एक मूर्ख तर धार्मिक हे शतमूर्ख. ह्या प्रतिसादात असभ्य काहीही नाही, धार्मिक संपादकांनी लगेच संधीचा फायदा ऊठवू नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हम्म्म्म्...

पंगा
Sat, 04/16/2011 - 02:58 नवीन
कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सविस्तर प्रतिसादासाठी रूमाल

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/16/2011 - 08:37 नवीन
सविस्तर प्रतिसादासाठी रूमाल टाकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

(No subject)

इंटरनेटस्नेही
Sat, 04/16/2011 - 10:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बुच मारल्या गेले आहे. बाकी

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/16/2011 - 12:24 नवीन
बुच मारल्या गेले आहे. बाकी
मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित....
देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत :) मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात काय गरज होती? विषय काय आहे आणि नक्की चर्चा कशावर घडवुन आणायची इच्छा आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पराशी अगदी सहमत...

योगप्रभू
Sat, 04/16/2011 - 14:08 नवीन
जाणीवपूर्वक केलेला 'ब्राह्मण पुजारी' हा उल्लेख खटकला. चर्चा करताना मिपाकर मित्र-मैत्रिणींचे प्रतिसाद भरकटत गेल्याचे जाणवले. दूरचित्रवाणीवरील चर्चा मीही लक्षपूर्वक ऐकली. त्यात सहभागी झालेल्या पुजार्‍यांचे म्हणणे कुणीही नीटपणे ऐकून घेत नव्हते. स्त्रिया अपवित्र किंवा पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जाच्या म्हणून त्यांना गाभार्‍यात प्रवेश देणारच नाही, अशी हट्टी भूमिका पुजार्‍यांनी घेतलेली नव्हती. ते एवढेच म्हणत होते, की अशी प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत. प्रथा बदलायची असेल तर देवस्थान समितीचे विश्वस्त, शंकराचार्यांसारखे संत-महंत, पुजार्‍यांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सामूहिक निर्णय घ्यावा, आम्ही त्याचे पालन करु. दुसरे म्हणजे याच विषयावरील याचिका न्यायालयात गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. तिचा न्यायानुसार होणारा निर्णय आम्ही मान्य करु किंवा देवस्थान समिती ज्यांच्या अधिकारात येते त्या सरकारने तसा स्पष्ट आदेश द्यावा म्हणजे त्याची अंमलबजावणी करता येईल. पुजारी हे अंबाबाईचे सेवक (श्रीपूजक) असल्याने ते स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाहीत. आता सरकार आदेश काढत नाही, न्यायालय निर्णय देत नाही, धर्मपंडित पुढे येत नाहीत तर मग चेंडू पुजार्‍यांच्या हद्दीत ढकलून सगळे खापर ब्राह्मणांवर फोडण्याचे काय कारण आहे? हे म्हणजे आपल्याला सार्वजनिक बागेत जाहीर कार्यक्रम करायचा आहे तर महापालिका आणि पोलिस खात्याची रीतसर परवानगी घेण्याऐवजी बागेच्या दारावरील रक्षकाला दमदाट्या करुन त्याच्या नावाने बोंब मारण्यासारखे आहे. बरं घडलेल्या घटनांकडे आपण कसे बघितले पाहिजे. महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याबद्दल जनतेच्या भावना तीव्र आहेत, हे लक्षात आल्यावर देवस्थान समिती, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची तातडीने बैठक होऊन प्रवेश खुला झाला. 'ब्राह्मण पुजार्‍यांनी' लगेच नव्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली. याचे अभिनंदन आपण करणार आहोत, की नाही? मी या ब्राह्मण पुजार्‍यांचे अभिनंदन एका वेगळ्या अर्थाने करतो. मंदिर प्रवेशाबाबत झालेल्या आंदोलनांचा इतिहास तपासला तर असे दिसून येते, की त्यावेळी ब्राह्मण समाजातही जी धार्मिक कट्टरता होती, तिचा आता मागमूसही राहिलेला नाही. पूर्वीच्या काळात काय काय प्रकार झाले आहेत त्याची माहिती घ्या. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश खुला करावा म्हणून साने गुरुजींनी प्राण पणाला लावले होते. तिथे लोकशाही निर्णय घेतला गेल्यावर पंढरपुरातील सनातनी ब्राह्मणांचे पित्त खवळले. 'विठोबा बाटला' म्हणून अनेकजणांनी देवळात जाणे सोडले. याहीपेक्षा वाईट म्हणजे मंत्रशास्त्रात पारंगत काही विद्वानांनी मूर्तीतील दैवत्व काढून घेतले व ते पाण्यात उतरवून एका घरी 'घागर विठोबा'ची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी या ब्राह्मणांना केलेल्याचा पश्चाताप झाला. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पुजार्‍यांनीही डॉ. आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहात अशीच हटवादी भूमिका घेतली होती, ती आयुष्यभर बदलली नाही. या पुजार्‍याच्या नातवाने (सध्याचे महंत) दोन वर्षांपूर्वी आजोबांच्या दुराग्रहाबद्दल माफी मागितली. या तुलनेत कोल्हापूरचे आंदोलन झाल्यावर कुणाही पुजार्‍याने झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेतली नाही. रीतसर सरकारी निर्णय होताच पुढच्याच दिवसापासून सर्व महिलांना सकाळच्या अभिषेकासाठी गाभार्‍यात प्रवेश खुला केला आहे. ही सकारात्मक आणि बदललेल्या मनोवृत्तीचे द्योतक नाही का? असे प्रश्न चर्चेला येतात तेव्हा आपण त्यातील चांगली बाजू बघण्यापेक्षा पुन्हापुन्हा पुरुषांनी स्त्रियांवर केलेला अन्याय, ब्राह्मण समाज कसा दोषी आहे, हेच मुद्दे का चघळत बसतो? (अवांतर आणि विनोदी : रामकृष्ण मिशनच्या मंदिरांपैकी सारदामातांच्या मंदिरात फक्त स्त्रियांना पुढे प्रवेश देतात. तिथे पुरुषांनी मागे उभे राहायचे असते. याबद्दल पुरुष कुरकूर करत नाहीत. आम्ही गेलो असताना मला नम्रतेने मागे उभे राहायला सांगण्यात आले. मी पत्नीला चिमटा काढण्याच्या हेतूने म्हटले, 'बरंय बुवा. मजा आहे तुम्हा बायकांची. बघा सारदामातांना आपल्या मुलींचे जास्त कौतुक.' त्यावर शेजारच्या एका माणसाकडे निर्देश करत माझी पत्नी कानात कुजबुजली, 'ते बघ. या माणसाने देवळात येण्याआधी फूटपाथवर गुटखा थुंकला आणि त्याच तोंडाने मंदिरात आलाय. उग्र वासानेच मळमळतंय. असल्या लेकरांपेक्षा आईला प्रामाणिक लेकी कधीही चांगल्या.' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुंदर

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/16/2011 - 14:27 नवीन
अतिशय संयमित व अभ्यासु प्रतिसाद. धन्यवाद. खरेतर वरती मी देखील थोडी असभ्य भाषा वापरणारच नव्हतो, मात्र मिपावर सध्या वारंवार जे द्वेष करणारे आणी भडक प्रतिसाद येत आहेत ते बघता राहावले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

+१

मूकवाचक
Mon, 04/18/2011 - 17:44 नवीन
अतिशय संयमित व अभ्यासु प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद आवडला.

रेवती
Sat, 04/16/2011 - 19:41 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

प्रतिसाद

सखी
Sat, 04/16/2011 - 21:09 नवीन
प्रतिसाद आवडला, अतिशय संयमित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

एक नंबर प्रतिसाद आहे. सर्व

अप्पा जोगळेकर
Sun, 04/17/2011 - 15:16 नवीन
एक नंबर प्रतिसाद आहे. सर्व ब्राम्हण पुजारी आणि प्रथा बदलण्यासाठी ज्यानी हातभार लावला त्या सर्वांचेच अभिनंदन. पुरोगामी म्हणवणार्‍या अनेकांचे वरती जे प्रतिसाद वाचले त्यापेक्षा कित्येक पट चांगला प्रतिसाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

अतिशय उत्कॄष्ट, अभ्यासू आणि

मृत्युन्जय
Mon, 04/18/2011 - 14:02 नवीन
अतिशय उत्कॄष्ट, अभ्यासू आणि उत्कट प्रतिसाद. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन,

अप्पा जोगळेकर
Sun, 04/17/2011 - 15:08 नवीन
कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल. अजबच प्रकार म्हणायाचा. स्त्री-पुरुष समानता यावी म्हणून पुरुषांनी स्वतःला पुरुष म्हणवून घेउ नये असंही उद्या कोणी म्हणेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आवश्यकता नाही तिथे ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 04/17/2011 - 15:32 नवीन
जिथे आवश्यकता नाही तिथे पुरूषांनी स्वतःला पुरूष म्हणवून घेण्याची (आणि स्त्रियांनी स्त्रिया म्हणवून घेण्याची) गरज नाही; उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या देशातले राजदूत. राजदूताचं काम आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, सदर व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष याने काही फरक पडू नये. (धर्म असण्यानसण्याबद्दल वेळ मिळेल तसं लिहीण्याची इच्छा आहे. पण हा त्यासाठी टाकलेला रूमाल नव्हे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या

अप्पा जोगळेकर
Sun, 04/17/2011 - 15:46 नवीन
उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या देशातले राजदूत. राजदूताचं काम आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, सदर व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष याने काही फरक पडू नये. ठीक आहे. तर मग जिथे अनावश्यक आहे तिथे स्वतःला मी हिंदू धर्माचा आहे इत्यादीउल्लेख टाळावेत इतपत अपेक्षा ठेवणे रास्त आहे. त्याहीपुढे जाऊन धर्मच नष्ट करावेत किंवा कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

... कोणी स्वतःला

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 04/17/2011 - 16:42 नवीन
... कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?
एका शब्दात उत्तर... नाही. किंचित स्पष्टीकरणः हा आततायीपणा नाही असं मला वाटतं कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

कारण स्त्री आणि पुरूष हा भेद

अप्पा जोगळेकर
Mon, 04/18/2011 - 19:47 नवीन
कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे. ठीकाय. भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत. कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 04/18/2011 - 21:46 नवीन
भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत.
अर्थातच, या संकल्पना मानवनिर्मित आहेत.
कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.
संदर्भ पाहून हे ठरवता येतं. पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही. पण विविध भाषा बोलणार्‍या किंवा वेगवेगळ्या देशांतल्या व्यक्तींशी बोलून मला बरंच काही नवं शिकता येतं, तेव्हा मला अभारतीय आणि/किंवा अमराठी मित्रमंडळ असण्याचा आनंद होतो. भेदभाव करायचाच असेल तर तो कसाही करता येतो. अगदी मराठी लोकांमधेही पुणे-मुंबई भांडणं होऊ शकतात, मुंबई विरूद्ध ठाणे होऊ शकतात, ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम, काय वाट्टेल ते! पण त्यातून काय मिळतं, काय चांगलं घडतं? अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते. जसं व्यक्ती स्त्री किंवा पुरूष असते तसाच हा ही एक भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

पासपोर्ट पाहून किंवा एखादी

अप्पा जोगळेकर
Tue, 04/19/2011 - 19:29 नवीन
पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही. तर मग ते चांगलंच आहे. हाच न्याय धार्मिक बाबतीत अनुसरणेसुद्धा शक्य आहे. आणि अनेक माणसे तशा व्यवस्थित पद्धतीने वागतदेखील असतात. अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते. ठीकाय चालू द्या तर मग. भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/19/2011 - 23:44 नवीन
हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे लेबलं अनावश्यक आहेत, भाषा २० मैलांवर बदलते तेव्हा संपूर्ण जगाची/देशाची भाषा एकसारखी असणं शक्य नाही.
भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.
माझ्या व्यक्तीशः काय भावना आहेत त्याचा इथे काहीही संबंध नाही. मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलेलं नाही आणि ते समजावून देण्याइतका माझ्याकडे आत्ता वेळ नाही. कधी ना कधी जमेलच मला ते! विचार समजले तरी पटावेच असाही काही आग्रह नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव, नील आर्मस्ट्राँग, याचं एक वाक्य मला आवडतं, "That's one small step for [a] man, one giant leap for mankind." त्याला तेव्हा आपण अमेरिकन आहोत, इंग्लिश भाषा बोलतो वगैरे वगैरे नाही आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

थोडं स्पष्टिकरण

राजेश घासकडवी
Sun, 04/17/2011 - 20:48 नवीन
'कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये' हे मी धर्मच नसावेत या अर्थाने म्हटलं होतं. धर्म ठेवावे, पण लपवावे या अर्थाने नाही. प्रश्न उल्लेखाचा नाही. धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आत्याबाईला मिशा ....

अप्पा जोगळेकर
Mon, 04/18/2011 - 20:00 नवीन
या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या? धर्म ही एक मानवनिर्मित संज्ञा आहे आणि जवळपास सगळ्याच धर्मश्रद्धा हे मनाचे खेळ आहेत. त्यामुळे जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते. त्यामुळे जर धर्मच नसते तर अशा कल्पनाविलासाला काही अर्थ आहे काय ? जे अनिष्ट धार्मिक प्रकार आहेत तेवढेच काय ते थांबवण्याचा प्रयत्न करणे हा व्यवहारी शहाणपणा आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आत्याबाईची दाढी

राजेश घासकडवी
Mon, 04/18/2011 - 21:15 नवीन
जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते.
याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन :) हा तुमचा क्ष काय असेल, काही अंदाज? तुम्ही 'चांगलं व्हावं' या इच्छेला कल्पनाविलास म्हणताहात, उद्या तुम्ही ज्ञानेश्वरांनासुद्धा 'अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून? तेव्हा दुरितांचे तिमिर जावो या कल्पनाविलासाला काय अर्थ आहे?' असं म्हणाल. धर्मातल्या चांगल्या गोष्टी ठेवा (सणवार, उत्सव) हे मी आधीच म्हटलं होतं. पण त्यापलिकडे विश्वउत्पत्तीचं तत्त्वज्ञान, विचित्र कर्मकांडं, भेदभाव पाळण्याच्या पद्धती वगैरे सगळी अडगळ आहे. तसल्या अनिष्ट गोष्टी काढून टाकाव्यात असं तुम्हीसुद्धा म्हणता. मग नक्की या दोनमधलं काय आहे जे शिल्लक ठेवावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

याला मी आत्याबाईची भलीमोठी

अप्पा जोगळेकर
Tue, 04/19/2011 - 19:51 नवीन
याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन तुम्ही एक चुकीचा हायपोथिसिस मांडलात. म्हणून तो खोडून काढण्यासाठी एका बरोबर हायपोथिसिसचाच आधार घ्यावा लागला. त्यामुळे या दाढी-मिशांचे पातक माझ्या माथी कशाला मारता? अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून धर्म म्हणजे अंधार असे मी मानत नाही. त्यामुळे असा प्रश्न माझ्या डोक्यात येण्याची शक्यताच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

थोडीशी शंका

पंगा
Wed, 04/20/2011 - 00:16 नवीन
धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?
अधोरेखित बाब ही धर्माधिष्ठित भेदभावांमुळे घडली की वांशिक द्वेषामुळे (किंवा, यात धर्माधिष्ठित भेदभावांचा भाग असलाच, तर तो कितीश्या प्रमाणात) याबद्दल साशंक आहे. बाकी चालू द्या. (अवांतर: वेगवेगळे वंश असल्यामुळे वांशिक द्वेष निर्माण होतात. सबब, वंश त्याज्य आहेत, हे आर्ग्युमेंट कसे वाटते? हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे अप्रोच घेऊन यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत. जसे, 'वेगवेगळे वंश असणे हे निश्चितपणे वाईट नाही, पण ते एकत्र आले की गडबडी सुरू होतात. सबब, वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळेच राहू द्या, आणि वेगवेगळे राहून आपला विकास साधू द्या' हा एक अप्रोच. या प्रेमाइसवर पूर्वी दक्षिण आफ्रिकेत आणि काही अंशी दक्षिण र्‍होडेशियात महान प्रयोग झाले. दुर्दैवाने पुढे त्यांचा पाठपुरावा होऊ शकला नाही. 'मुळात वेगवेगळे वंश असणे हीच समस्या आहे' हा अप्रोच घेऊन समस्येचे निर्मूलन करण्याकरिता १९४०च्या दशकाच्या आसपास जर्मनीत काही निर्णायक पावले उचलण्याचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय विरोधामुळे (आणि काही अंशी अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे) त्या प्रयत्नांना यश आले नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जगात इतकी दुःखं धर्मामुळे

अप्पा जोगळेकर
Tue, 04/19/2011 - 19:43 नवीन
जगात इतकी दुःखं धर्मामुळे आलेली आहेत. धर्मामुळे बरीचशी सुखं आणि आनंदसुद्धा जगामध्ये आलेला आहे. याचा पुरावा म्हणजे तुमचंच हे वाक्य. मी तर म्हणतो धर्मांमधले सणवार, उत्सव वगैरे ठेवावे आणि बाकी सगळं सोडून द्याव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काहिहि असेल तरि धार्मिक

अप्पा जोगळेकर
Sun, 04/17/2011 - 15:03 नवीन
काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही. आमच्या नात्यात एक अत्यंत आगाउ पुरोहित आहे. आम्ही पालीला त्याच्या घरी गेलो होतो. तेंव्हा त्यांच्या घरी मोलकरणीचे काम करण्यासाठी येणार्या बाईला त्याने सगळी माणसे बसली असताना उघडपणे दरडावून विचारले होते,''काय ग आज कितवा दिवस आहे ?" तेंव्हा ती बाई घाबरत घाबरत म्हणाली,"तिसरा." "ठीकाय. जा अमुक अमुक खोलीतून. इकडे तिकडे शिवलीस तर याद राख." तो प्रकार बघून मला किळस आली. अशा प्रकारच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करु नये असे ज्यांचे मत असेल त्यांना काय बोलणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

सदर पुरोहित केवळ आगवु नसुन

इंटरनेटस्नेही
Sun, 04/17/2011 - 16:01 नवीन
सदर पुरोहित केवळ आगवु नसुन हलकट देखील आहे, असे निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सदर पुरोहित केवळ आगवु नसुन

अप्पा जोगळेकर
Tue, 04/19/2011 - 19:56 नवीन
सदर पुरोहित केवळ आगवु नसुन हलकट देखील आहे, असे निरीक्षण नोंदवतो. अगदी अगदी. आणि दुसर्‍याच एका कारणामुळे त्याला घरी आलेला असताना दारातूनच हाडतुड करत हाकलून देण्याचा आसुरी आनंदसुद्धा मी अनुभवलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

सहमत

स्मिता.
Tue, 04/19/2011 - 22:48 नवीन
त्या पुरोहिताला हलकट म्हणण्यात काहिही वावगे नाही. इंटरनेटस्नेहींच्या या प्रतिक्रियेला नकारत्मक मत मिळालेलं पाहून आश्चर्य वाटलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

एका स्त्री च्या मंदीरात

टारझन
Fri, 04/15/2011 - 23:39 नवीन
एका स्त्री च्या मंदीरात स्त्रीयांनाच बंदी ? कमालंच्चे .. मला हे आत्ता कळलं .. दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. कार्तिक स्वामी च्या मंदिरातही स्त्रीयांना प्रवेश द्या ;) - टार्तिक स्वामी सुंदर स्त्रियांचे आमच्या मठात स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

>>दोन पावलं पुढे जाऊन मी तर

सूड
Sat, 04/16/2011 - 09:33 नवीन
>>दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. कार्तिक स्वामी च्या मंदिरातही स्त्रीयांना प्रवेश द्या. टारुभौशी अगदी सहमत. हे पाऊल राजकीय पक्ष कधी उचलतायत हे तो कार्तिक स्वामीच जाणे. असो, महिलांना सरसकट प्रवेश नव्हता महालक्ष्मी मंदिरात हे मात्र खरं, त्यामुळे झालं हे योग्यच !! अवांतर: महालक्ष्मीच्या देवळात नवविवाहित जोडपी (सपत्नीक) गाभार्‍यात गेल्याचे एक दोनदा पाहिलं आहे, गेल्याच वर्षीच्या भेटीत एका दोन महिन्याच्या मुलीला देवीच्या पायावर ठेवून सुखरुप तिच्या आईकडे सुपूर्द केल्याचंही पाह्यलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी लहान असताना ऐकले होते कि

सांजसखी
Fri, 04/15/2011 - 23:42 नवीन
मी लहान असताना ऐकले होते कि एका पुजार्‍याकडे एक २ महिन्याची मुलगी देवीच्या पायावर ठेवायला दिली होती. तिथे स्त्रीयांना आत प्रवेश नसतो हे कदाचित त्या बालिकेच्या मातेला माहित नसावे. पुजारी बालिकेला देविच्या पायाशी बाळाचे डोके लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी. स्त्रीयांना प्रवेश नाही हे कबूल.. पण असा अमानुषपणा ?? जगदंब !! जगदंब !!!!
  • Log in or register to post comments

कल्पना नाही

प्रियाली
Fri, 04/15/2011 - 23:48 नवीन
लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी.
पुढे काय झाले? मुलीच्या आईने मुलीला सावरायला स्वतः गाभार्‍यात धाव घेतली? पुजार्‍याला खडसावले की आपली चूक झाली हे लक्षात आल्याने खजील होऊन मागे फिरले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसखी

२ महिन्याचा कोवळा जीव तो....

सांजसखी
Fri, 04/15/2011 - 23:53 नवीन
२ महिन्याचा कोवळा जीव तो.... बाप्पाघरी गेला :( ऐकीवात आहे कि कोर्ट कचेर्‍या झाल्या पण शेवट नाही माहीती...असो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा