Skip to main content

असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 14/03/2011 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अ‍ॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या! असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं. तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील. o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे. o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे. o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये. o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी. o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24169
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! पुण्यनगरीचा रहिवासी या नात्याने आज मी तुम्हाला अलिकडचेच २ रंजक अनुभव सांगणार आहे. कृपया तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावेत, अशी नम्र विनंती... १) काही काळापूर्वी कांदा किलोला ७०-८० रुपयांपर्यंत भडकला होता तेव्हाची ही गोष्ट. तुम्हाला माहीत असेलच, की पुण्यात काही पाट्या कायमस्वरुपी लागलेल्या असतात (उदा : ही गप्पा मारायची जागा नव्हे. गेटसमोर गाडी लावल्यास हवा सोडली जाईल. बेसिनवर खाकरे, गुळण्या काढू नयेत, फक्त हात धुवावा. सुटे पैसे देणे, आमची टांकसाळ नाही. वगैरे वगैरे) काही पाट्या हंगामी असतात. त्यातील एक म्हणजे 'जादा कांदा मिळणार नाही. ग्राहकांनी मागू नये.' तर अशीच पाटी झळकणार्‍या पुण्यातील एका नामवंत मिसळ केंद्रात मी गेलो. मिसळीवर चमचाभर चिरलेला कांदा होता. मी मालकांना सांगितले, 'साहेब तुमची पाटी बघितली, पण चमचाभर कांदा आमच्या घशाखाली उतरत नाही. मी फुकट मागणार नाही. तुम्ही कितीही पैसे लावा, पण मला आणखी कांदा द्या.' त्यावर मालकही नम्रपणे म्हणाले, ' माझा नाईलाज आहे. मी कांदा देणार नाही. मी हात जोडतो तुम्हाला. कांदा मागूच नका.' मी नम्रपणे म्हणालो, 'साहेब. कांद्याचे रेशनिंग सुरु झालेले नाही. ८० रुपयात किलोभर कांदा मिळतोच आहे. त्यातला एक कांदा मला चिरुन हवा आहे. पुढच्या वेळेस मी घरुनच डब्यात चिरलेला कांदा घेऊन येईन. पण आता वाटीभर कांद्याचे अगदी दहा रुपये द्यायला मी तयार आहे. माझा मिसळीचा आनंद हिरावू नका.' त्यावर मालक म्हणाले, 'एक काम करा. मिसळ पार्सल घेऊन जा आणि घरी बसून त्यावर घरचा किलोभर कांदा चिरुन घाला आणि खा. तत्त्व म्हणजे तत्त्व. कांदा देणार नाही.' कांद्यापेक्षाही त्या महापुरुषाच्या तत्त्वनिष्ठेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. २) बागेत दहा राऊंड फिरल्यानंतर मी दमून बेंचवर शांतपणे विसावलो होतो. समोर चिमणी पाखरे खेळत होती. ते बघण्यात तल्लीन झालो होतो. तेवढ्यात माझ्या खांद्याला कुणी तरी स्पर्श केला. एक काटकुळे काका शेजारी बसले होते. त्यांनी विचारले, 'काय निवांत बसलाय?' मी म्हणालो, 'हो. छान वाटतंय.' मग काकांनी माझी चौकशी करणारे प्रश्न विचारायला सुरवात केली. मीही त्यांना सगळी उत्तरे दिली कारण त्या रिलॅक्सिंग स्टेटमध्ये मला चिडायचे नव्हतेच. काकांनी अर्धा तास खूप पिळले. मग आश्चर्यकारकरीत्या एक प्रश्न विचारला, 'काय हो! मी अर्ध्या तासापासून तुम्हाला भंडावतो आहे. तुमचे मन अस्वस्थ नाही का झाले?' त्यावर मी म्हटलो, 'नाही. मला शांततेचा आनंद घ्यायचा आहे.' त्यावर काका म्हणाले, 'इथेच चुकते तुमचे. मन शांत म्हणजे शरीर शांत. अशा शांत शरीरातच चरबी साठते आणि माणूस सुटत जातो. मी पहा कायम अस्वस्थ मनाने वावरतो. दिसेल त्याला पीडतो. कुणी अपमान केला तरी अंगाला लाऊन घेत नाही. म्हणूनच माझ्या अंगावर चरबी नाही. तुमचे शरीर सुटायला लागले आहे. म्हणून वाटले मुद्दाम तुम्हाला सांगावे.' त्या काकांच्या या परोपकारी वृत्तीबद्दल मी त्यांचे आभार मानले. उठताना काका पुन्हा म्हणाले, 'नुसते बेंचवर बसण्यापेक्षा चांगले पाच राऊंड फिरा. त्याचा फायदा होईल.' मी 'बरं' म्हणालो आणि सहज विचारले, 'तुम्ही जनगणना करण्याचे काम करता का? इतके सगळे तपशीलवार प्रश्न विचारलेत म्हणून?' त्यावर काका म्हणाले, 'नाही. प्रश्न तितके महत्त्वाचे नसतात. काल मी तुमच्यासारख्याच एकाशी (म्हणजे स्थूल) राजकारणावर वाद घातला.' त्या महात्म्याला मी नम्रपणे वंदन केले. पु. ल. किंवा व. पुं. ना ही व्यक्तीरेखा भेटायला पाहिजे होती, असे आवर्जून वाटले.

In reply to by योगप्रभू

>> कांद्यापेक्षाही त्या महापुरुषाच्या तत्त्वनिष्ठेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आले माफ करा पण आपल्याला तत्व (तत्त्व नव्हे) नीटसे समजलेले दिसत नाही. आपल्याला जादा दर आकारून थोडा जादा कांदा दिलाही असता. पण मग ते पाहून इतरांना पण द्यावा लागला असता. आणि मग कांदा लवकर संपून गेल्यावर नंतर येणार्‍या ग्राहकाला बिना कांद्याची मिसळ द्यावी लागली असती, आणि ते ग्राहक दुखावले गेले असते. जे जगात कोणत्याच व्ययसायाच्या तत्वात बसत नाही ते आम्हा पुणेकरांकडून अपेक्षिताच कसे? एखाद्या 'स्टार बक्स' मधे जावून एकाच टॉल लॅटेमध्ये तेथे ठेवलेले मधाचे सगळेच 'सॅशे' रिकामे करता का? नसाल करत तर आता करून बघा. म्हणजे उपरोल्लेखित जागतिक तत्वाचा पुनर्परिचय कसा करून दिला जाईल ते अनुभवाला येईल :)

In reply to by sagarparadkar

आणि मग कांदा लवकर संपून गेल्यावर...
प्लानिंग का काय म्हणतात ते हवे की नको? कितीही चटणी मागा,उडपी देतो ना?

In reply to by चिरोटा

अहो सर, त्यांनी उपलब्ध पदार्थाचे आपत्कालीन परिस्थितीत, सर्वांसाठीच मर्यादित प्रमाणात वाटप करायचे ठरवले हे उत्तम नियोजनच (पक्षी प्लानिंग) नव्हे तर काय आहे? पण आपण तर त्या उत्तम नियोजनालाच नावे ठेवत नाही आहोत का? नारळ कोणत्याही कारणानी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असेल तरी उडपी जादा चटणी (ओल्या खोब्र्याची, इतर कुठली देउ शकेल.) देतो का? मला स्वतःला तरी तसा अनुभव नाही. उलट जादा चटणी किंवा सांबाराचे 'अ‍ॅडिशनल चार्जेस' पडतील म्हणून आधीच सांगतात.

In reply to by sagarparadkar

हे असले आपत्कालीन विचार सर्वांसाठी करत बसला तो तर तो कधीच मोठा होणार नाही.उडपी असता तर त्याने १० ऐवजी १५ रुपये लावले असते योगप्रभूंना , मिसळीत जरा जास्त तिखट घातले असते आणि वर २५ रुपयांची मस्तानी घशात उतरवली असती . योगप्रभू, मिसळ खाल्ल्यावर पियुष,मस्तानी पिता ना तुम्ही?

In reply to by sagarparadkar

सागरजी, गंमतीशीर अनुभवाची गंभीर चिरफाड करायचीच झाली तर.. मी पुण्यातीलच रहिवासी आणि व्यावसायिक आहे. व्यवसायाची तत्त्वे मलाही थोडीबहुत कळतात, असा माझा गैरसमज आहे. त्यानुसार कोणताही हुशार व्यावसायिक नंतरच्या चार ग्राहकांचा विचार करण्यापेक्षा सध्या समोर असलेला ग्राहक दुखावून जाऊ नये याचा जास्त विचार करेल (उडत्या ससाण्यापेक्षा हातातले कबूतर केव्हाही चांगले, असे चाणक्य म्हणतो.) त्यातून माझ्या ऑफरमध्ये त्याला फायदाच होता. कांदा बाजारात ८० रुपये किलोने असला तरी जेथे मोठ्या प्रमाणात कन्झ्युम होतो ते लोक घाऊक दराने मार्केटयार्डमधून पोते आणतात. इफेक्टिव्ह रेट किलोला ३५ ते ४० रुपये पडतो. एक किलो कांद्याच्या किती वाट्या होतात? (मिसळीबरोबर जी वाटी दिली जाते तिचा आकार लक्षात घ्या) त्यापैकी एका वाटीसाठी मी १० रुपये द्यायला तयार होतो. बरं कांदा बाजारात शिल्लक नाहीच, अशा स्थितीत त्याचा हेका समजू शकतो. असो. त्याचे तत्त्व मला खरोखर समजले नसावे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. धंदा हा फायदा मिळवण्यासाठीच करायचा असतो, हे आपले आमचे जुने तत्त्व आहे. (बरं झालं. यावरुन एक जुनी आठवण झाली. मागे एकदा मी हैदराबादला गेलो होतो. तेथे एका मारवाड्याच्या खानावळीत गेलो. मेनू कार्डवरच मूळ जेवणाची किंमत आणि जादा पदार्थांची किंमत लिहिली होती. एक चमचा साखर - ५० पैसे, एक वाटी दही -पाच रुपये असा तपशील होता. त्यामुळे फायदा असा झाला, की मला कुणाशी हुज्जत न घालता शांतपणे जेवता आले आणि जादा पदार्थांची किंमत चुकती करुन मी बाहेर पडलो.)

In reply to by योगप्रभू

>> मी पुण्यातीलच रहिवासी आणि व्यावसायिक आहे. बास , बास यातच सर्व काही आले :) :) :) अहो साहेब हे आधीच सांगितले असतेत तर मी पण तुमचे किस्से ऐकून 'एन्जॉय' केले असते . पुण्यातील रहिवासी आहात हे वाचले होते, पण मूळ रहिवासी की काही काळापूर्वीच स्थलांतरीत ह्याबद्दल थोडा संभ्रम वाटत होता :) :) पण कोणी परनगरी (परदेशी प्रमाणे) स्थित नागरीक ह्या पुण्यनगरीच्या पुण्यप्रद नागरीकांची टवाळी करू लागले की मग आम्हा सामान्य पुणेकरांची 'अस्मिता' उफाळून येते ... असो.

In reply to by sagarparadkar

थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय आहे या पेक्षा कुणी मांडला हे महत्त्वाचे. सदर प्रतिसादक पुणेकर आहे हे कळल्यावर "उत्तम नियोजन", "सर्वांसाठीच मर्यादित प्रमाणात वाटप करण्याची निरपेक्ष वृत्ती" वगैरे वगैरे गेले का तेल लावत ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात ते बहुतेक वेळेस 'अभिजननिवासक्षेत्रवंचित' असतात (म्हणजे काय ते आपल्या लक्षात नक्कीच आले असणार, म्हणून अधिक स्पष्टीकरण देणे न लगे :) ). म्हणून मग ते पण आम्हा भूमिपुत्र पुणेकरांवर खार खात, जमेल तिथे जमेल तेव्हा वार करायची संधी शोधत असतात. सदरहू प्रतिसादक त्यांपैकी असावा अशी शंका आल्याने तसा प्रतिसाद टाकावा लागला.

In reply to by sagarparadkar

जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात ते बहुतेक वेळेस 'अभिजननिवासक्षेत्रवंचित' असतात (म्हणजे काय ते आपल्या लक्षात नक्कीच आले असणार, म्हणून अधिक स्पष्टीकरण देणे न लगे ). म्हणून मग ते पण आम्हा भूमिपुत्र पुणेकरांवर खार खात, जमेल तिथे जमेल तेव्हा वार करायची संधी शोधत असतात.
अगदी अगदी. मात्र प्रभु पुण्याचे आहेत हे माहित असल्याने गप्प होतो ;) बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.
हो, आणि आपणच कसे अलिकडच्या बाजूचे हे सांगण्यासाठी पुण्यात जागतिक महायुद्ध घडतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटात एक दृश्य आहे. एक जमाव बेफाम होऊन मारायला धावत असतो. एक हातगाडीवाला गाडा ओढत चाललेला असतो. त्याला विचारतात, 'बोल तू हिंदू है या मुसलमान' त्यावर तो म्हणतो, 'अगर आप हिंदू हो तो मुसलमान समझकर मुझे काट डालो और अगर मुसलमान हो तो हिंदू समझकर मारो.' त्याप्रमाणे पुण्यावर चवताळून असणार्‍यांसाठी मी पुणेकर आहे आणि पुण्याचा अभिमान मिरवणार्‍यांसाठी मी 'नदीपल्याड'चा मानूस हाय. :)

In reply to by योगप्रभू

कृपया तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावेत, अशी नम्र विनंती...
मी खूप प्रयत्न केला हे अनुभव शांतचित्ताने ऐकून घेण्याचा, पण दुर्दैवाने हे जमलं नाही याची आधीच कबुली देते. तुमचे हे दोन अनुभव वाचून साक्षात पराब्रह्म मिळण्याचा आनंद झाला. माझ्या अनुभवामुळे मला 'आज फिर जीने की तमन्ना है' गाणं आठवलं तर तुमच्या अनुभव वाचनामुळे मला 'कभी कभी अदिती जिंदगी मे..' हे गाणं आठवलं. अशी महान सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि अनुभविक परंपरा असणार्‍या शहरात मला काही काळासाठी का होईना नोकरी मिळाली, नोकरीच्या निमित्ताने मला स्कूटरवर प्रवास करण्याची संधी मिळाली, प्रवास करताना अनेक ठिकाणी गर्दी झाल्यामुळे मानवी भावनांचे कंगोरे अनुभवता आले आणि माझं अनुभवविश्व फारच समृद्ध आणि प्रगल्भ झालं याचा विचार करून, माझ्या अंतःकरणात विविध कृतज्ञ भावनांचा कल्लोळ उठून अतिशय हृद्य वाटलं हे मी मुद्दाम नमूद करू इच्छिते. योगप्रभू, तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे विशेष आभार.

पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये १) तुमच्या अंगातला माजोरीपणा घालवून तुमच्या अंगी नम्रपणा आणण्यात मदत करणे. (कोण रे तो म्हणाला की पुण्यात कमीत कमे शब्दात अपमान करून मिळतो म्हणून...) २) अगदी अपवादात्मक पहायला मिळणार्‍या छोट्याशा का होईना पण पुण्यात अनुभवलेल्या चांगल्या प्रसंगाचे कौतूक करण्याची संधी मिळते. ३) पौड रस्त्यावर एकाच वेळेस आगबोट ,सायकल ,विमान चालवण्याचा अनुभव मिळ॑तो. ( औंध च्या रहिवाशाना हे सूख मिळत नाही) ४) तुम्ही गाडी चालवताना अत्यंत चौकस रहायची प्रॅक्टीस घेतली जाते. ५) गाडी चालवताना / पीएम टीत बसताना "एक ना एक दिवस सर्वानाच जायचे आहे" हा अनुभ्व प्रत्यक्षात मिळून घाऊक प्रमाणात विरक्तता अंगी बानवली जाते.

In reply to by विजुभाऊ

गाडी चालवताना / पीएम टीत बसताना "एक ना एक दिवस सर्वानाच जायचे आहे" हा अनुभ्व प्रत्यक्षात मिळून घाऊक प्रमाणात विरक्तता अंगी बानवली जाते >>> ही पंचलाईन तर सगळ्यात बेस्ट.. लैच भारी ऊत्तर आहे विजुभाऊ :)

बाकी कायबी म्हणा... पन फुडच्या येळी सिनेमाला कदी अन कुटं जाणार हा त्ये मातर सांगा. ह्या टैमाला झाली गल्ती परिक आता न्हाइ व्हउ देणार...

हे प्रकरण पुणेरी पुण्यात, मुंबेरी पुण्यात कि नागपुरी पुण्यात घडले? एक धडक धडक भाबडा प्रश्न ?????????????

एकही चांगला अनुभव कोणी सांगितला नाही हे पाहून वाईट वाटलं. 'तुमची गाडी चोरीला गेली नाही म्हणजे ती भंगार असणार' वगैरेसारखे प्रतिसाद बघून तर फारच वाईट वाटलं. पुण्यातल्या लोकांच्या चांगुलपणाविषयी इतकी खात्री? मिपावर सगळे पुणेद्वेष्टेच भरलेले आहेत का? मी मला आलेला एक चांगला अनुभव सांगतो. तोही पुण्यातल्या रिक्षावाल्याकडून. एकदा मी रिक्षा पकडली तेव्हा तो रिक्षावाला त्याच्या मीटरशी काहीतरी खाटखूट करत होता. ते पाहून मला संशय आला. वाकडेवाडीहून आयडीयल कॉलनीमध्ये जाण्यासाठी रिक्षाचे ५२ - ५६ रुपये होत असत. दर वेळी रिक्षावाले आपल्याला मीटर कळतच नाही अशा थाटात ६०, ६५ असे काहीही आकडे सांगत. मग त्यांच्यासमोर गणित करून दाखवायचं आणि मोजके पैसे द्यायचे अशी माझी पद्धत होती. आता या माणसाशी काय वाद घालायचा हेच मी पोचेपर्यंत मनाशी ठरवत होतो. उतरण्याची वेळ आली तेव्हा त्याने मीटरकडे बघून सांगितलं. '३२ रुपये झाले'. ते ऐकून मी उडालोच. त्याच्या मीटरमध्ये खरोखरच खूपच कमी आकडा होता. मग मी त्याला म्हटलं 'अहो, तुमचं मीटर स्लो आहे, नेहेमी पन्नासपेक्षा थोडे जास्त होतात' असं म्हणून मी त्याला खिशात मोजून ठेवलेले ५४ रुपये दिले. पण आपलं मीटर बिघडलेलं असलं तरी प्रामाणिकपणे मीटरबरहुकुम इतके कमी पैसे मागितले याचं मला बरं वाटलं. आत्तापर्यंत मला दुसऱ्या कुठच्या शहरात इतका चांगला अनुभव आलेला नाही.

In reply to by रेवती

थत्तेकाका व रेवतीकाकूंसारख्या मान्यवर आयडींकडून अशी विधानं आल्याने काळजाला घरं पडली. एक वाईट अनुभव सांगितला तर लोक पुणेद्वेष्टा म्हणतात. दुसरा चांगला अनुभव सांगितला तर त्याला 'उतारा' म्हणतात... पण मूळ प्रश्न शिल्लक रहातोच. मिपावरच्या पुणेप्रेमी मंडळींना एकही चांगला अनुभव असू नये, किंवा असला तरी 'आम्ही लिहिणारच नाही, जा!' असा हटवादीपणा करावा, किंवा तो लिहायला वेळ मिळून नये असं का? कुठे गेला पुण्याचा जाज्वल्य अभिमान वगैरे?

In reply to by राजेश घासकडवी

मिपावरच्या पुणेप्रेमी मंडळींना एकही चांगला अनुभव असू नये, किंवा असला तरी 'आम्ही लिहिणारच नाही, जा!' असा हटवादीपणा करावा, किंवा तो लिहायला वेळ मिळून नये असं का? कुठे गेला पुण्याचा जाज्वल्य अभिमान वगैरे?
तो 'आमची कोठेंही शाखा नाही (अगदी मिपावरही)' छाप माज असेल. थोडक्यात, पुण्यात या मग दाखवतो ;-)

In reply to by चिंतातुर जंतू

अरेरे, हा अभिमान मिपावर का मग एवढा ओसंडून वहातो?

In reply to by राजेश घासकडवी

>>पण मूळ प्रश्न शिल्लक रहातोच. उत्तर सोपे आहे. १) पुण्याबाहेरील लोकांना पुण्यात चांगले अनुभव येत नाहीत (असेत ते म्हणतात). खरे तर ते चांगल्या अनुभवांकडे लक्ष देत नाहीत. पुण्याला चांगले म्हणायचे म्हणून पोटशूळ उठल्याने लिहित नाही लेकाचे. एक तर त्यांना कुठे जाऊन काय मागायचे याची अक्कल नसते, मग अपमान होतो, मग उठतात आणि गळे काढतात. असो, नॉन-पुणेकर ही एक अत्यंत हलकट जमत आहे. त्यांना फाट्यावर मारलेले बरे. २) पुण्यातील लोकांना पुण्यात सर्व अनुभव चांगले येतात, नेहमी, १००% वेळा. तुमची ती probability का काय म्हणता न तुम्ही, ती १ असते. उगीच अपूर्णांकात जात नाही ती. तुम्हाला "मांजरीची नखे/दात..." सिद्धांत माहित दिसत नाही. माहित करून घ्यायचा असेल तर कुठे विचारायचे आहे ते माहित असेलच. नसेल तर सांगा, लगेच त्या आयडी चा मोबाईल क्रमांक व्यनिने पाठवतो ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काही नॉन-पुणेकर हलकट असतात ह्याच्याशी सहमत आहे. पण बर्‍याचदा त्यांना हलकटपणा करणे देखील जमत नाही, आव आणण्यात देखील अयशस्वी. अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by राजेश घासकडवी

राजेशजी, प्रथम मला काकू म्हटल्याबद्दल तुमचा निशेध! तुमची पावाची रेशिपी वाचनखुणेतून काढून टाकणार आता. थत्ते साहेब मान्यवर असतील, मी अजून त्या पदाला पोहोचले नाहिये.;) माझ्यासारखे क्षुद्र लोक 'लेख' म्हणता येइल असे पुण्यासारख्या (अपुणेकरांनी भरलेल्या) शहराबद्दल काय लिहिणार?;)

हे हे हे... आपले लेखन हे एका जुन्या लेखाची आठवण करून देते.;) आपण आत्ता आत्तापर्यंत हिरव्या देशात होता आणि एकदम मातृभुमीला पोहोचलात हे सांगण्यासाठी लेखन केल्याचे बघून ड्वले पाणावले.;) एकाच शहरावर इतक्या विविध प्रकारे लेखन होऊ शकते आणि त्यावर आमचे ड्वले ढवळे होतील इतुके प्रतिसादही मिळू शकतात हे पाहून निर्मळ आनंदाची अनुभूती मिळाली. तरीही शंका आहे कि नक्की पुण्यातच होता काय आपण?

In reply to by रेवती

हो गं, नक्की पुण्यातच होते. हवंतर त्या पार्किंगची पावती दाखवते. तू असा संशय नको गं व्यक्त करूस, मग कोणा gamjya-tamjya ना वाटतं आपलं भांडण आहे असं!

दुर्बिण आणि शिनेमा !!! अन तो पण थेटरात ... शिव शिव शिव. जमणा बदळ रहा है.

In reply to by आनंदयात्री

आंद्या असं नाही हां बोलायचं! आपण जुन्या मिपावरचे जुने मित्र ना ... मग, एवढं टाकून, घालून-पाडून नाही बोलायचं!

मी आजी/माजी/भावी पुणेकर नाही, त्यामुळे पुणेकरांबद्दल अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण अपवादाने नियम सिद्ध होतो असं म्हणतात.

एकदा मी पुण्यात गेलो होतो. पण मला टिपीकल पुणेरी म्हणावा असा काहीच नुभव आला नाही. बब, असा नुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो, असे म्हणायला हीही रकत नाही. ( :) / ;) ) -सूर्यपुत्र.

केवळ पुण्यातच असं घडु शकत असे ज्यांना वाटते त्यांनी हा ही अनुभव वाचुन पहावा.
असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात.
अगदी सहमत.(शेवटची ओळ मुद्दामच काढली आहे.)

अकारण तोंडाला बांधलेली फडकी, गॉगल आणि फालतू गोष्टींचा अभिमान याव्यतिरिक्त उल्लेख करावा अस काहीच पुण्यामध्ये सापडत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

+100000000

In reply to by अप्पा जोगळेकर

अकारण तोंडाला बांधलेली फडकी, गॉगल म्हणजे त्यामागील कारण कळालेच नाही म्हणता तुम्हाला?? अधीक माहीतीसाठी ओव्हर टु टारझन..

आणि अस्सल पुणेरी असणार.. त्याने विचार केला कि समजा मी गाडी चोरली तर या बाई घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या मिपा वर "पुण्यातल्या ताज्या अनुभवावर" लेख लिहिणार. मग मिपावर सगळे नामांकित येउन आपल्या पुण्याला शिव्या घालणार (आयतं कोलीत, दुसरं काय?). नकोच ते. हि गाडी सोडून देउ. दुसर्या बर्याच चांगल्या मिळतील. शिवाय चोरांच थोडं वाघा-सिंहा सारखं असेल. आयती शिकार (चावी लावून ठेवलेली) का खावी? कशावरून ही स्कुटर म्हणजे "हाकेचं बकरं " नसेल. मचाणावर लेखिकेने लेख लिहूनपण ठेवला असेल. आपण हात मारायचा अवकाश त्या तिकडे "सबमिट" चं बटण लगेच दाबतील. प्रतिसादाचं वजन हलकं आहे. तो तेव्ढ्याच मापात घेणे.. -एक पुणेकर.

त्या पोरगीनं गाडी लावली आणि किल्ली न घेता गेली .म्हटलं की आता पंधरा दिवस रोज दारु - चिकन .दारु - चिकन.दारु - चिकन. कोण न्हाई ते बघुन गेलो , किल्ली फिरवाय गेलो तर शीटवर बोका. गाडीला हात बी लावू दिला नाही . वस्सकन अंगावर यायचा. गाडी हालवून , वाकडी करुन बघितली , कुत्र्यागत भुकून बी बघितलं . हालना बी झाल्तं. लै बाराचं बेनं. जाऊ दे च्यायला. सायकल तर सायकल .पलिकडं आणि एक यडं सायकल गेल्तं सोडून .किल्लीसकट.

In reply to by अडगळ

मी तर त्याही पुढं जाऊन बोक्याच्या पाठीत काठी घातली, तरी हालेना. मग त्याला घेऊनच निघाले.......ट्रॅफिकमधून वाट काढता येइना.....मग पोलिसमामा दिसले.....माझी चूक कबूल करून गाडी पुन्हा शिनेमा संपायच्या आत जाग्यावर नेवून लावली. मामानं पोलिस ठेसनात नेऊ नै म्हणून त्याना एक शिनेमाचं तिकिट काढून दिलं नी पुन्हा म्हणून चोरी करायची नै असं ठरवलं. बरेच पैशे अक्कलखाती टाकून घरी परत्....तेही रिक्षानं.;)

In reply to by अडगळ

...काही नाही. जाऊ द्या. (पुण्यात सायकल चालवून बरीच वर्षे झाली. त्यामुळे, सायकलचे कुलूप उघडल्यावर त्यात किल्ली तशीच अडकून बसते की बाहेर निघते हे या क्षणी नक्की आठवत नाही. बाहेर निघत असावी या धारणेखाली प्रतिसाद लिहिला, त्यामुळे '(एकदा कुलूप उघडल्यावर) सायकलला किल्ली कोण लावून ठेवतो, रादर कशाला लावून ठेवावी लागते' असे विचारणार होतो. पण आता विचार केला तर कदाचित माझेच चुकलेले असू शकेल असे वाटते. चूभूद्याघ्या.)

In reply to by पंगा

काही कुलपं तशी असतात. कुलुप लॉक होताना एक खटका होउ कीली आपोआप (ऑलमोस्ट) फिरुन निघत असे. पण साधी खटका नसलेली कुलुपंही मिळतात.

In reply to by Nile

तुम्हाला बरीच माहिती कुलुपान्बद्दल...आधी काय कुलूपतोडे होता का? ;) नाही पांढर्‍या शाईत लिहिलंय म्हणुन विचारलं!! ;)

In reply to by Nile

हल्लीच माझी सायकल चोरीला गेली. आणि नंतर एकदा रात्री पाणवठ्यावरुन परतत असताना सोसायटीत आलो (तेव्हा साधारण २.३० ए एम वाजले होते) बघतो तर काय, एक माणुस अगदी निर्धास्तपणे आमच्या इमारतीच्या लॉबीमध्ये झोपला होता.. सरळ १०० ला फोन केला.. आणी त्याची अशी काही तक्रार केली केली पोलिस साधारण १० मिनिटांत आले त्यांच्या क्वालिस मधुन आणि त्याची बॅग उघडुन बघितली त्यांनी.. बघतात तर काय, त्यात त्यांना एक स्क्रुड्रायव्हर मिळाला.. (माझ्या महिती प्रमाणे एनी इम्प्लीमेंट ऑफ हाउसब्रेकिंग, विदाऊट ए लॉफुल एक्सयुझ सोबत बाळगल्यास, आणि पोलिस अधिकार्‍यांना संशयास्पद वाटल्यास ते सदर व्यक्तीस वॉरंट शिवाय अटक करु शकतात पहा: क्रि.प्रो.कोड) पोलिसांणी लै दणादण तुडवला त्याला, काठी आणि हातांनी, लै विव्हळत होता (लोकांच्या सायकली चोरताना काही वाटत नाही!) १ सहायक आयुक्त, १ पोलिस निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि ३ पोलिस हवालदार एवढी मोठी ७ जणांची पोलिस टीम आली होती.. या सर्वांनी मिळुन त्याला ५० तरी फटके लगवाले असतील.. नंतर त्याला ते घेऊन गेले. बहुतेक अजुन चोप देण्यासाठी! लै मज्जा आली.. साला, माझी सायकल यानेच चोरली असणार.. चांगली अद्दल घडली!

In reply to by इंटरनेटस्नेही

इंट्या, अरे नीट पाह्यलंस ना. कदाचित ते Nile निघायचे. असं का मार देतं कुणी आपल्या जालमित्राला. ह. घ्या.

In reply to by वपाडाव

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

शतकाबद्दल (मिपास्टाईलने) हबीणंदन यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही. बाकी , आम्ही मल्टीप्लेक्सात जावुन ईंग्रजी चित्रपट वगैरै पहातो हे दाखविण्याचा क्षीण प्रयत्न मला वाटत तुमची काहीतरी चूक होत असावी. पेट्रोल चेक केल होत का??? किल्ली विसरणारी व्यक्ती नंबर मात्र लक्षात ठेवेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. चोरांचेही काही उसूल असणारच. आपण आत्ता आत्तापर्यंत हिरव्या देशात होता आणि एकदम मातृभुमीला पोहोचलात हे सांगण्यासाठी लेखन केल्याचे बघून ड्वले पाणावले. या सारख्या वैयक्तीक शेरेबाजी बरोबरच पुणे आणि पुणेकरद्वेष्ट्यांना धैर्याने तोंड देत केलेल्या शतकाबद्दल अभीनंदन.

In reply to by चिंतामणी

या सारख्या वैयक्तीक शेरेबाजी बरोबरच पुणे आणि पुणेकरद्वेष्ट्यांना धैर्याने तोंड देत केलेल्या शतकाबद्दल अभीनंदन. असेच म्हणते. :) पुण्यातले अनुभव चांगले असे सांगायचे तर आठवावे लागते बुवा. पुण्याची नशा थोडी हळू हळू चढते असे वाटते. मागे एक चांगला रिक्षावालाही भेटला होता, नवसह्याद्रीच्या भागात जाताना, रिक्षा लकडीपुलावरून घेऊ का मधून कुठूनतरी (मला वाटते पत्रकार भवन (का जे काही आहे ते?). असा प्रश्न विचारला की अनेकदा आपण फसले जाण्याच्या मार्गाला लागणार असे नक्की होऊ लागते (आपण शहरात नवीन आहोत असे दिसले की कुठच्याही रस्त्यांमधून गरागरा मीटर वाढवत फिरवणे सोपे जाते), असा प्रश्न न विचारता त्याने रिक्षा व्यवस्थित चालवली. एवढीच अपेक्षा असते ती त्याने पूर्ण केली, तेव्हा हा अनुभव चांगलाच म्हणायला पाहिजे.

काय जमल नाय बा,कायतरी नवीन शोधा पुन्याच्या बढाया मारायला, मी दोन वर्षे राहीलो पुन्यात,नंतर गुजरातमधे व आता मुंबईत्,त्यात सुरत बेस्ट हाय.

बहुतेक वेळेस पुण्यातल्या ५-६ रिक्षेवाल्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर सातवा थांबून विचारतो आणि नववा येयला तयार होतो. पण तो दिवस वेगळाच होता... मी आमच्या घराच्या जवळील चौकात गेलो काय आणि एक रिक्षेवाला आपणहून थांबला आणि म्हणाला ,"साहेब कुठे जायच्यं?". म्हणलं "रिक्षा खाली आहे का?" तो हसत म्हणाला, "अहो म्हणूनच तर विचारतोय ना!" मी गोंधळलो, म्हणलं "जाऊंदेत कदाचीत ते तुझ्या एरीयाच्या बाहेरचे असेल". तो उत्तरला, "अहो आम्हाला परवाना मिळतो, तेंव्हा आम्ही हे मान्यच केलेले असते की कुठेही जावे लागेल. आम्ही प्रवाशांसाठी आहोत, प्रवासी आमच्यासाठी नाही!" माझ्या (कृतज्ञतेने) ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत मी म्हणले, "मला औंधला जायचे आहे" तो: "मग चला की" आणि मिटर पाडला.., "साहेब कुठच्या बाजूने नेऊ? 'इकडून' का 'तिकडून' " माझ्यातला अनुभवी जागा झाला, मनात म्हणलं आता कुठूनही म्हणले तर समजेल की आपल्याला माहीत नाही. म्हणल, "इथून ने". "अहो साहेब, तो रस्ता लांबचा हाय. मी तिथून नेतो, तिथे सिग्नल्स पण कमी असतात आणि रस्ता पण शॉर्ट हाय. फक्त जरा दोनचार खड्डे लागतील तेव्हढे सांभाळून घ्या" मला वास्तवीक अर्धातास लागेल असे सांगण्यात आले होते पण या पठ्ठ्याने २० मिनीटात पोचवले! मिटर बघितला, तेव्हढ्यात त्याने कार्ड काढून सांगितले, "८८.५० झाले" मी शंभराची नोट हातात ठेवत म्हणालो की काय पाच-दहा परत केलेस तरी चालतील... "नाही साहेब, तसे नाही, हे घ्या साडे अकरा रुपये". "अरे दोन-चार रुपये ठेव तुझ्याकडे" असे माझ्या तोंडातून आपसूक पडले... "नाही साहेब, ते माझ्या तत्वात बसत नाही!" मनात म्हणलं, चला! किमान अशा तत्वामुळे का होईना हा पुणेकर आहे याची खात्री पटली! तेव्हढ्यात "धन्यवाद" म्हणत, त्याने रिक्षा परत चालू केली होती आणि डोळ्यासमोर निघूनही गेला. त्या रिक्षेच्या मागून येणार्‍या धुराकडे बघत माझे विचारही हवेत तरंगत होते आणि कधी एकदा हे घरच्यांना सांगतो की सगळेच काही "तसे" नसतात, असे झाले होते. तितक्यात, "विकास, ए विकास" ऐकायला आले. म्हणून उत्साहाने बायकोस सांगायला गेलो, पण तितक्यात तिच्याकडूनच ऐकावे लागले, "उठ, आपल्याला नऊ पर्यंत औंधला पोचायचे आहे. रिक्षा मिळायला किमान अर्धा तास तरी लागतो हे लक्षात असुंदेत!" :( असाही अनुभव पुण्यात येऊ शकतो!

In reply to by विकास

मला असलं स्वप्न पडलं असतं तर दचकून जाग आली असती.;) एखादा खरच चांगला रिक्षावाला भेटला तरी अविश्वासानं त्याला चार शिव्या घालून "कसले नाटकी असतात मेले!" म्हणून आम्ही घरी येतो. तुम्हाला इतकी सकारात्मक स्वप्नं पडतात म्हणजे तुम्ही मुळचे पुणेकर नसणार असे वाटते. आपल्या पत्नी तरी पुणेकर आहेत काय? असतील तर त्यांना विचारा सग्गळं सांगतील.;)

मागे एकदा पुण्यात आलो होतो तेव्हा स्टेशन वरून चिंतामणी ह्यांना फोन केला व'' रिक्षावाल्याला किती पैसे .. अनु का द्यायचे'' हे रिक्षावाल्या समोर विचारले . आता अस्सल पुणेकराकडून मी हा सल्ला घेतला . आणी त्यांच्याच घरी चाललो आहे .असे समजून रिक्षावाल्याने माझ्या कडून मी देईन तेवढेच म्हणजे आधी ठरले तेवढे पैसे पेठेत जाण्यासाठी घेतले . व त्याचं संध्याकाळी घरी जातांना पुणेकरांनी आपल्या गाडीतून मला मुंबईची बस पकडण्या साठी इच्छित स्थळी सोडले . .इतके नव्हे तर बस सुटली पाहून तिचा आम्ही पाठलाग गेला व तिला थांबवून मला बस मध्ये चढवले . थोडक्यात पुणेकरांचा इतक्याच आलेला हा चांगला अनुभव येथे नमूद करत आहे . ((भविष्यात युरो च्या जीवावर पुण्यनगरीत घरकुल एक गुंतवणूक म्हणून घेण्याच्या विचारात असलेला भविष्यातील नव अनिवासी पुणेकर मुक्काम पोस्ट........ )

आदितीतै, यापुढे गाडीवर पत्ता लिहून ठेवत चला,म्हणजे गाडि थेट घरच्या पत्त्यावरच पोहोचवलि जाईल. :) (पुणेकर) अभिज्ञ.