वषाट
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला.
कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं.
परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता. सर्वांगावर पिठ माखल्यामुळे तो पांढर्या अस्वलासारखा दिसत होता. तात्याची गावात एकमेव पिठाची चक्की आहे. त्याचे नाव लक्ष्मण महादु आहे पण घरी दारी सर्वांचा तो तात्या आहे. तात्या एक नंबरचा महाबिलंदर माणुस, सगळ्या गावावरुन ओवाळून टाकलेला. नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणारा माणुस म्हणजे तात्या. बोलुन चालुन अघळपघळ असलेला तात्या बोलता बोलता कधी कुणाला डाव टाकील ते समोरच्याला चितपट झाल्याशिवाय कळायचे देखील नाही. बायांच्या बाबतीत जरा सैल असलेल्या तात्याचा बुक्यावाल्या बायांवर विशेष लोभ आहे. गावात अशा काही ठराविक ठिकाणी तात्याचे खटके आहेत. तात्याचे तिथे राजरोस येणे जाणे चालु असते. जसा सणाच्या दिवशी देवांअगोदर दैत्याला नैवेद्याचा पहिला माण असतो तसे लग्न जमवाजमवीची, जमीन वाटपाची अथवा कुणाची भांडणं-मारामार्या/वादावादीच्या बैठकीत तात्याला अग्रपुजेचा मान असतो. कोणात भांडणं लावुन दे, मारामार्या घडव असे त्याचा नित्याचा उद्योग. हे सर्व घडलेच तर कोर्टकचेर्या-वकिल या गोष्टींनाही त्याचा पुढाकार. नेहमीच अशील पुरवत असल्याकारणाने तात्याच्या तालुक्याला मोठमोठ्या वकिलांच्या चांगल्याच ओळखी आहेत. तसा तो 'झाडाखालचा वकिल' म्हणुन उभ्या गावात सुपरीचीत आहे. एकुनच गाव तात्याला वचकुन आहे.
धावपळ करीत परशा घरी येईपर्यंत त्याला दम लागला होता. दम टाकीत तो तात्यासमोर उभा राहीला. तात्याने त्याच्याकडे पाहीले न पाहीले करुन बिडीचा लांबलचक झुरका मारला नि नाकातुन धुराच्या नळकांड्या काढीत बोलला.
"कारे, आज लै येरवाळीच आला?"
"..........."
"आजुन दिवस कासराभर वरे न तु घरी आलाय. काय भानगडे?"
"तात्या, आज चुकुन याक बकरु आलय आपल्या खांडात."... परश्या.
तात्याने सावरुन बसत विचारले. "कॉन्चं?".
"हिवर्याचं." परश्या.
"हिवर्याचं, कॉन्चं?". ..तात्या.
"तो बुटनेर नाहीका?".... परश्या.
"कोन्तारे?"... तात्या.
"ते... इजदर्याच्यावर वावरं नाही का? शिवंच्या तिकुन...... परश्या.
" हां.... हां. त्या बुटनेरचय का?"... तात्याच्या डोळ्यात चमक आली.
झटदिशी तात्याने विचारले. " काये?.. पाठे का बोकड?"..
" बोकडे "... परश्या.
एवढे बोलणे झाले. क्षणभर तात्याने आभाळाकडे पाहीले आणि झटकन बिडी भुईत मुरगाळली. त्याचे डोळे लकाकले. डोक्यात विज चमकून गडप झाली. तसा तो परश्याला म्हणाला.
"परश्या.. गड्या एक काम कर आता....."
"काय?". परश्या.
" पटकण जा. जिजाबाला सांग, आज आमच्या घरी रातच्याला वषाट हाये म्हणुन. जेवायला ये म्हणावा. तसाच पुढं जाय आन भाऊदुकानदाराला सांग. मंग सावकाराच्या घरुन तसाच खालच्या आळीला जाय. बाळू वाण्याला, सुका म्हाळूला, द्त्तूबाला सांग राच्च जेवायला या म्हणावा. काय? "
हा म्हणुन परश्या निघाला तितक्यात घाईघाईने, तात्या म्हणला..
"अरे ये बांबलीच्या. थांब निट ऐकुन घे. लई बोभाटा नको करु. सगळ्यांना बईतवार सांग. निरोप देवुन लगेच घरी ये. नाहीतर बसशील तिकडच खेळंत ".... आन येता येता सेल्समन्लाबी बोलावल्य म्हणुन सांग......
हां हां म्हणत निरोप द्यायला परश्या धुमाट पळत सुटला.... आणि तात्याही उठला. अजुन बरेच कामे करायची होती.
तात्याने हातपाय धुतले. तोपर्यंत चांगलच अंधारुन आलं होतं. कपडे घालुन तो सरुबाईच्या अड्डयावरुन खंबा आणायला निघाला होता पण परश्याला एक महत्वाचे काम सांगायचे राहीले होते. म्हणुन तो परश्याची वाट पहात बसुन राहीला. सरुबाई ही एक रांडाव बाई होती आणि तीची गावातच बाजुला हाडकीत हातभट्टी होती. सरुबाई तात्याची खास होती नि तात्या सरुबाईचा पेश्शल होता.
तितक्यात परश्या सगळ्यांना आवातनं देवुन धापा टाकीत घरी आला. तात्याने परशाला घरात बोलावले आणि खाजगी आवाजात विचारले.
"आला का? सगळ्यांला आवातनं देवुन?" .. तात्या.
"हां."
"मंग आता एक काम कर. जाफरभाईच्या घरी जाय आण परस्पर सल्याला घेवुन जाय वाडग्यात. आन् ते हिवर्याच बकरु कापुन आन घरी.सल्ल्याला सांगु नको ते चुकारीचं बकरु आहे म्हणुन. काय?" तात्या. आपल्याच घरात इकडे तिकडे पहात घोगर्या आवाजात पुढे बोलला.
"सुमडीत काम झाल पाहीजे. वाडग्याच्या आजुबाजुला घरं हायेत. कोन्ला बकराचा आवाज नाही आला पाहीजे."
आता हे ऐकल्यावर परश्या गडबडला. कारण बकरु कापायच म्हणजे ते ओरडनारच. पण तात्याला अशा फालतु शंकांमधे बिलकुल रस नसतो. उलट एखादी शिवी बसेल म्हणुन परश्याने काहीही न बोलता जाफरभाईच्या घराचा रस्ता धरला. आता सगळीकडे अंधारगुडुप झाला होता. सलीम्/सल्ल्या हा जाफरभाईचा छोकरा. परश्याचा समवयस्क.
परश्याने सल्ल्याबरोबर जावुन वेळेत बकरु कापून आणले. तात्यानेही सरुबाईच्या अड्डयावरुन खंबा आणला. सर्व आमंत्रित मेजवानीला उपस्थीत होते. गप्पा, हसण्याखिदळण्याचा महापूर आला होता. सर्वांनी मदिरा आणि मटनावर तडाखा उठ्वला होता. आमंत्रित वरवर तात्याचे गुणगान गात होते नि तात्याला धन्यवाद देत होते पण कापल्या करंगळीवर न मुतनारा तात्या आज एवढा कसा फळला? म्हणुन मनातल्या मनात अचंबीत होत होते. अर्ध्यारात्रीपर्यंत तात्याची प्यार्टी चालली होती. गाव सामसुम होते. ठरल्याबरहुकुम सर्व गोष्टी घडत होत्या. आणि तेही खिशास काहीही तोषीस न पडता. त्यामुळे तात्या एकदम खुशीत होता.
***********************************************
दुसर्या दिवशी सकाळी.
सकाळी सकाळी वेशीतल्या वडाखालच्या पारावर नेहमीचे म्हातारे आपापले उदयोग करत बसले होते. गंगाबाबा आपल्या सफेद भरघोस मिशाशी चाळा करण्याचा आपला लाडका उदयोग करत होता. काशाबाबा घोंगडीच्या दशा हातावर वळीत होता. मधुनच मोठ्याने अभंगाची एखादी ओळ गुणगुनत होता. दादापहिलवान जाड काचेच्या चष्म्यातुन, दंतविहीन बोळके उघडे ठेवुन उगीच इकडे तिकडे बघत होता. संपतगुर्जी खाली पहात कान कोरण्यात गुंग झाले होते. दाजी हवालदार आपला अगडबंब देह घेवुन नुसताच मोठमोठ्याने श्वास सोडत बसला होता.
तेवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ती व्यक्ती चढ चढून, स्मशानभूमीला वळसा घेणार्या रस्त्याने थेट वेशीत पाराजवळ आली. त्याच्या चेहर्यावर, मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या. हाश्शहुश्श करत त्याने वर हात करुन सगाळ्यांना रामराम ठोकला आणि उपरण्याने घाम पुसत पारावर टेकला. तो हिवर्याचा बुटनेर होता. पारावरील सर्वांनी आपापले उदयोग थांबवुन रामराम म्हटले.
"लक्षीमन महादुचं घर कुडशिक आलं?." बुटनेर घाईला आला होता. पारावरील सगळे एकमेकाकडे पाहू लागले.
"हे काय इथच. मारुतीच्या देवळाच्या त्याआंगुन. चक्कीच्या शेजारचं त्याचच. " मिशीवरचा हात देवळाकडे करुन गंगाबाबा बोलला.
" का? काय झालं?".. दाजीने सुस्कारा टाकीत विचारले.
" काही नाही. आमचं बकरु आलय काल त्याच्या खांडात." बुटनेर चुळबुळ करीत बोलला.
"म्हंजी?". दादा पहिलवानाच्या बोळक्यातुन आवाज घुमला.
"ते... काल मेळा झाल्ताना. वढ्यावं. तव्हा फाफलून आलय ते लक्षीमनच्या खांडात." बुटनेर.
"अरारारा मंग कालच यायचंना बकरु न्ह्यायला.".. संपतगुर्जी हळहळले. पारावर क्षणभर वातावरण गंभीर झाले.
" अवो. काल कसं येनार. पोरानी मला पार राती सांगितलं. म्हणलं जावु सकाळीच. " बुटनेर.
"मंग आता भेटंल बकरु तुम्हाला." असे म्हणुन गंगाबाबा अस्सा फिस्सकन हसला की पारावर सगळेच खिदळायला लागले. दादा पहिलवान घश्यातुन खीखी करुन आपले थुलथुलीत पोट हलवत हसला. दाजी नुसताच सुसु करत अंग गदागदा हलवत हसला. संपतगुर्जीने एकदा आभाळाकडे एकदा बुटनेरकडे पाहुन घेतले नि परत त्यांनी भुईवर नजर भिडवली. काशाबाबा मात्र नुसताच एकदा बुटनेरकडे एकदा सगळ्यांकडे पाहुन हसत होता कधी गंभीर होत होता. ही काळी एक मधली चर्चा त्या काळी पाचवाल्या काशाबाबाच्या नुसतीच कानावरुन जात होती. कारण तो ठार बहिरा होता.
हा सगळा रागरंग पाहुन बुटनेर मात्र गोंधळला. झटकन उठून तो तरातरा चालत देवळाची, चक्कीची खुण लक्षात ठेवुन तात्याच्या घरी आला. तात्या नुकताच झोपेतुन उठला होता. परशा भाकर बांधून वाडग्याकडे निघायच्या तयारीतच होता. रामराम शामशाम झाला. तात्याने पाहुण्याला येण्याचे प्रयोजन विचारले. चुकारीच्या बकराबाबद मात्र त्याने कानावर हात ठेवले. वरुन परशाचा हवाला दिला. खात्रीसाठी परश्याबरोबर जावुन वाडग्यात जावुन बघुन घे असे सांगायलाही विसरला नाही. तात्याने बायकोला पाहुण्यासाठी चहा टाकायला सांगितला.
बुटनेरला मात्र चहा प्यायचाही धीर नव्हता. तो परश्याला घेवुन तडक वाडग्याकडे निघाला. रस्त्यात बुटनेरने परश्याला खोदुन्खोदुन बकराबद्दल विचारले पण परश्याने ताकास तुर लागून दिला नाही की तो बधला नाही. सावाप्रमाणे बुटनेरबरोबर चालत राहीला.
दोघेजण वाडग्यात आले. परश्याने झोपाटा उघडला तर कालचे चुकारीचे बकरु शांतपणे वाडग्याच्या एका कोपर्यात बसले होते. बुटनेरने त्याचे बकरु बरोबर ओळखले. पटकन खिशातून दावे काढुन ते बकराच्या गळ्यात बांधले नि तो हिवर्याच्या दिशेने निघाला.
एवढा प्रकार होईपर्यंत काल रात्री काय घोळ झाला याची पुरेपूर खात्री परश्याला झाली आणि तो तसाच वर हात करुन जोरजोरात ओरडत घराकडे पळत सुटला.
समाप्त.
प्रतिक्रिया
आयला, मुक्त आहात म्हणजे
छान सुरवात
कथा आवडली.
अरे त्तिच्या......
आवतान तर लै झ्याक दिलंय, वातड
फुडं काय व्हनार?
द मा मिरासदारांचा नाना चेंगटच
मला पण मिरासदारांची आठवण
खुप छान. पुढे लवकर लवकर
पुढचा
झाक लिवलय, पुढच येउ दे बिगी
झ्याक...
क्लास सुरुवात !!
छान सुरूवात
तात्याचे वर्णन तर सुरेखच !!!
पुढाल्ली गोस्ट कदी?
नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणारा
असेच म्हणेन...पण एखादा
हा हा हा !!
काय हो!
+१
अप्रतिम....
चांगलीच भट्टी जमलीन काय. पण
अतिशय सुंदर जमली आहे कथा.
जबरा.
काही शंका....!!
छान निरीक्षण...चांगल्या सूचना
आजकालचे रंग....!!
<<दिवसभराच्या कामाधंद्यातून
हा प्रतिसाद खूप आवडला.
नक्की?
सुशेगात...!!
तसं नव्हे
आयात...!!
इंन्द्राजी वेळ काढून सविस्तर
लई झ्याक! आनखी केव्हा लिवणार?
जे वर इंद्रान म्हंटल आहे तेच
लै भारी रं गड्या!!
मस्त कथा. भाषा शैली
मस्त गोष्ट....!!!
मस्त
छान
लेख संपादन सुविधा....!!
असहमत.
लेख....!
संपादन
छान लिहिलय पु.ले.शु
क्रमशः इथे मला कुठेच दिसले
शेवट छान झाला
मस्त !!
Pagination