Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्ञानेश... on Wed, 02/09/2011 - 10:24
सकाळचे साडेसात. तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस. ओठाच्या कोपर्‍यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच. गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय. गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा. तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला. तेही, मी ट्रेकवर आणि तू तुझ्या मैत्रीणीच्या गावाकडे गेलेला नसशील तर ! तीन वर्षे झालीत मला या रूमवर येऊन. माझ्या आधीपासून तू इथे राहतोस. माझ्या आधी जो इथे रहात होता, त्याच्याही आधीपासून तू इथेच आहेस असे कळले. या रूमच्या रंगहीन, जुनाट भिंतीइतकाच तूसुद्धा या रूमचा अविभाज्य भाग असावास, असे मला कायम वाटत आले आहे. घरमालकही तुझ्यावर कधी गुरकावतांना दिसत नाही. तुझ्या निर्ढावलेपणाला तोसुद्धा सरावला असावा. आज मात्र मला तुझी चीड येत नाहीये. मला आठवताहेत, ते या रूममधले माझे सुरूवातीचे दिवस. नव्या जॉबची नवलाई, नवी स्वप्ने घेऊन माझा या नव्या शहरातला पहिला प्रवेश. आणि एका दूssssरच्या नातेवाईकाने एका स्वस्तातल्या इस्टेट एजंटकरवी मला मिळवून दिलेली ही रूम. (मी त्याच्याकडे मुक्काम टाकेन की काय अशी भीती असावी बिचार्‍याला !) त्यादिवशीसुद्धा झालेले तुझे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. सावळा, लुकडा आणि सर्वसामान्य किंवा कुरूपात जमा होणारा आपला देह घेऊन दुपारी केव्हातरी अंघोळ करून तू आपल्या अडीच इंच व्यासाच्या आरशात बघत दाढी कोरत होतास. निव्वळ साबण चोपडलेले तुझे गालफड खर्र खर्र असा त्रासदायक आवाज करत होते. रूमभर एक कुबट वास भरून राहिलेला होता, आणि कचरासुद्धा. नंतर मला त्याची सवय झाली, हा भाग अलाहिदा ! तू शब्दश: नि:संग आहेस. तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे. अंघोळीचा साबण मात्र घेतोस विकत ! गोदरेज नंबर वन. तो बहुधा दाढीमुळे आवश्यक असावा. तुझी टूथपेस्ट ही द्रौपदीच्या थाळीसारखी असते. संपता संपत नाही. तुझे मोजून तीन ड्रेस दिसतात मला. आणि एक चौथा आहे, पण तो फक्त मैत्रिणीला भेटायला जातांना घालत असतोस. याशिवाय तुझ्याकडे एक चप्पल, एक ऍक्शनच्या स्पोर्ट शू ची पेअर, एक सोलापुरी चादर, एक ’रंग ओळखा’ टॉवेल, तेल, कंगवा, आणि एक पुस्तकांनी भरलेली ट्रंक एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यातली पुस्तके कोणीही पाहिलेली नाहीत. मीसुद्धा. एकंदर आर्थिकदृष्ट्या तुझे फारसे बरे चाललेले दिसत नाही. तुला चहाशिवाय अन्य जिन्नस हॉटेलात किंवा टपरीवर घेतांना कोणी पाहिलेले नाही. तू स्वत:बद्दल फार कमी बोलतोस. किंवा एकूणातच घुम्या आहेस. तुझे माझे फारसे जमणार नाही, असे मला आधी वाटले होते. दुर्दैवाने माझा हा तर्क पडताळून पाहण्याइतकाही आपला सहवास कधी घडला नाही. तीन वर्षात आपण फक्त तीन वेळा सोबत हॉटेलात जेवलो. (ते तीनही माझे वाढदिवस होते !) हॉटेलात माझ्या मित्रांशीही तू कामाशिवाय एक शब्द बोलला नाहीस. याशिवाय एक सिनेमा पाहिला, जो अति टुकार असल्याने आपण इंटरव्हलमधून बाहेर पडलो, आणि माझ्या बाईकवर शहरभर भटकत राहिलो. तुला त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचेच आनंदात पाहिले मी ! तुझ्या एरवीच्या निर्विकारशा सामान्य चेहर्‍यावर ’आनंद’ ही भावना मोठी देखणी दिसत होती. (आदल्या दिवशी नक्कीच तुझ्या मैत्रिणीने काही आनंददायक सांगीतले असावे, असा तर्क मी केला.) त्या दिवशी रात्री दीड वाजता तुला कॉफी पिण्याची लहर आली चक्क ! मग आपण रेल्वे स्टेशनवरच्या ’कमसम’ मधे जाऊन बसलो, पहाटे चारपर्यंत. तिथे तू मला तुझ्या मैत्रीणीचे नाव सांगीतलेस. तिची आणि तुझी लव्ह स्टोरीसुद्धा थोडक्यात (दीड तासात) ऐकवलीस. मला झोप येत असल्याचे बघून तू आवरते घेतलेस. बिल देऊन मी बाईक काढली आणि आपण परतलो. अरे हो- तुला साधी बाईकसुद्धा चालवता येत नाही ! बस्स. तीन वर्षातल्या आपल्या दोघांच्या अशा एवढ्याच आठवणी. बाकी सगळी नुसती निरीक्षणे. त्या कॉफीवाल्या दिवसानंतर, खरं तर रात्रीनंतर तू पुन्हा आपल्या कोषात गेलास ते आजतागायत. नंतर आणखीही काही घडले असावे कारण एव्हाना तू अगदीच अबोल-- खरं तर मुका झाला आहेस. मी तुला कधी तुझ्या समस्यांबद्दल विचारले नाही, आणि तू स्वत:हून काही सांगायचा तर प्रश्नच नाही. मी विचारायला हवे होते का?? असे असूनही, आपले एक नाते तयार झाले. आपण मित्र आहोत का? बहुधा नाही. "रूममेट्स" हेच त्या नात्याचे नाव. आपण नकळत एकमेकांची काळजी घेतो. अगदी सहजच. आणि गरज नसेल तेव्हा दखलही घेत नाही एकमेकांच्या अस्तित्वाची. मला हे फार आवडते. तू, मी आणि ही टीचभर रूम मिळून एक स्वयंपूर्ण, एकजिनसी असे विश्व तयार झाले आहे- जे कुठल्याही बाह्य प्रेरणेशिवाय सुरळीत चालत असते. मानवी ह्रदयासारखे जणू. आपल्यात काही अलिखीत करार झाले आहेत. मला सकाळी घाई असते म्हणून तू बाथरूम मोकळे ठवतोस. मी गेल्यावर अंघोळ- तयारी करतोस. (यात बहुधा तुझीही सोय आहेच.) याबदल्यात मी रूम आवरून ठेवतो. माझा पेपर तुला दररोज वाचायला मिळतो. तुझा अडीच इंच व्यासाचा आरसा एव्हाना मीसुद्धा विनासायास वापरू लागलो आहे. मी कधी तुझ्या ट्रंकेतल्या पुस्तकांची, तुझ्या मैत्रिणीची, तुझ्या जॉबची चौकशी करत नाही. तूसुद्धा माझ्या दर रविवारच्या एकट्याने गड-किल्ले भटकण्यात कधी फारसा रस दाखवला नाहीस. माझ्या बाईककडे आणि कधीकधी दारात येणार्‍या शेळीकडे तू त्याच कोरड्या समभावाने बघतोस. तू चुकूनही माझ्या मोबाईलला हात लावला नाहीस. हल्ली हल्ली तू मला आवडू लागला आहेस ! तुझी आठवण नक्कीच येईल. हो, मी ही रूम सोडून जातो आहे. आठवडाभरापुर्वीच ठरले खरं तर. तुला सांगणारही होतो.. पण आपली भेट कुठे होते रे? एकाच छपराखाली राहणारे दोन अनोळखी जीव आहोत आपण. काल ड्यूटीवरून आल्यावर मी सामान पॅक करायला घेतले, तेव्हा विचारायला हवे होतेस तू. किंवा मी तरी सांगायला हवे होते. आज रविवार. त्यामुळे तुला वाटले असणार की मी नेहमीसारखी भटकण्याची तयारी करतो आहे. तू काहीच विचारले नाहीस ! आता सकाळी दहा अकरा वाजता उठशील तेव्हा तुला हे पत्र मिळेल. या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे. मला माहित आहे, ते तुला फार आवडते म्हणून. तुझ्या मैत्रिणीला भेटायला जातांना कायम मागुन घ्यायचास. तू माझ्याकडून- दिवसभरासाठी का होईना, पण हक्काने मागून घेतलेली अशी ही एकच वस्तू ! आपण दोघांनी शेअर केलेल्या अवकाशातल्या काही क्षणांची यानिमित्ताने तुला आठवण येईल, अशी एक (वेडी?) आशा ठेऊ का? मिस करेन तुला. फोन कर. पेपर नको असल्यास त्या पोर्‍याला सांग तसे. परत या शहरात आलो, तर नक्कीच भेटेन तुला. मला खात्री आहे, तू याच रूममधे असशील, तेव्हाही ! तुझाच- रूममेट.
  • Log in or register to post comments
  • 11744 views

प्रतिक्रिया

Submitted by उमराणी सरकार on Wed, 02/09/2011 - 10:38

Permalink

छान

बारकाव्यांनिशी लिहीलेला लेख. भट्टी मस्त जमली आहे. अशा अनेक रूममेट्स सोबत पुण्यात दिवस काढल्याने विषय जिव्हाळ्याचा वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on Wed, 02/09/2011 - 10:40

Permalink

खुप सुंदर!

ज्ञानेश राव, खुप सुंदर लिहिले आहे आपण! आजुबाजुला पाहिल्यास खरेच असे दिसुन येते, कि बरेच जण (बॅचलर्स ) फक्त झोपण्यापुरते 'रूम' वर येतात. बाकि वेळ, ते काय करतात, कुठे जातात, कुठे खातात, याचा काहिच पत्ता नसतो. किंबहुना, ते कळवणे देखिल ते महत्वाचे मानत नाहीत. भावना खरेच कोरड्या होत चालल्या आहेत! :(
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on Wed, 02/09/2011 - 10:47

Permalink

सुंदर लिखाण..

खुप मनापासुन लिहिलयस. आणि जसं मनात ये ईल तसा व्यक्त झाला आहेस्.त्यामुळे असं वाटुन गेल कि प्रत्यक्ष ऐकल्यासारखं वाटलं. छान.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 02/09/2011 - 10:48

Permalink

छान लिहिले आहे खरेच.

छान लिहिले आहे खरेच. सुरुवातीला बक्वास म्हणुन वाचत होतो. पुर्ण वाचल्यावर जाणवले की नाही खरेच काहीतरी चांगले लिहिले आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 02/09/2011 - 11:03

Permalink

वाह क्या बात हे.... लेख वाचून

वाह क्या बात हे.... लेख वाचून झाल्यावर उगाचच त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आला... त्याच्या भावना कधी कोणाला कळल्याच नाहीत ............. एक नंबरी लिखाण !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Wed, 02/09/2011 - 11:04

Permalink

.

एक नंबर :) मलाही माझ्या जुन्या दिवसांची आणि रात्र जागवून पहाटे मी झोपेत असताना आपापल्या घरी गेलेल्या मित्रांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 02/09/2011 - 11:15

In reply to . by आदिजोशी

Permalink

+१

हेच म्हणतो. एकदम मस्त लेख आहे, आवडला. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 02/09/2011 - 11:05

Permalink

छान निरिक्षण.... बर्‍याचदा हे

छान निरिक्षण.... बर्‍याचदा हे रुममेट्स आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी साठी म्हणून घरा/गावाबाहेर आलेले असतात. घरात होणारे लाड आणि त्यातून आलेला अहंकार हा इथे ही कायम असतो आणि त्यातून एकलकोंडेपणाची भावना वाढते. त्यातूनआर्थिक स्वायत्तता आल्यावर नाही म्हटले तरी कुणासाठी त्यातल्या त्यात अशा नाईलाजाने एकत्र राहाव्या लागणार्‍या व्यक्तिसाठी वेळ काढावा, काही तडजोडी कराव्या असे होत नाही. शाळा अथवा कॉलेजमध्ये जर वसतिगृहात राहणे झाले असेल, फुल्ल पब्लिक असणार्‍या सोसायटी,चाळी एकंदरीत सामाजिक वातावरणात वाढलेल्या, मित्रमंडळींमध्ये राह्यलेल्या लोकांना इतरांशी जुळ्वून घेणे अवघड जात नाही. अति काळजी केल्या/घेतल्या जाणार्‍या घरातली मुले/मुली बाहेर रहाव्या लागण्याच्या वेळी किमान सुरुवातीला तरी त्रास करुन घेतात नाहीतर दुसर्‍याला त्रास देतात. लेख उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Wed, 02/09/2011 - 11:09

Permalink

जबराट

विनोदी लेख असे वाटतानाच हळवा कधी झाला ते कळले नाही. - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 02/09/2011 - 12:32

In reply to जबराट by मी_ओंकार

Permalink

अगदी हेच म्हणतो.

+१ रूममेट बद्दल सहानुभुती निर्माण झाली. असाच अनुभव देणारे संदीप खरेचे एक मुक्तक वाचल्यासारखे वाटतेय.पण आठवत नाही कुठले ते!
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Wed, 02/09/2011 - 13:59

In reply to अगदी हेच म्हणतो. by कानडाऊ योगेशु

Permalink

बॅचलर

संदीप खरेचे एक मुक्तक बॅचलर या नावाने आहे. - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 02/09/2011 - 15:47

In reply to बॅचलर by मी_ओंकार

Permalink

करेक्ट. बॅचलरच. मी ब्रम्हचारी

करेक्ट. बॅचलरच. मी ब्रम्हचारी म्हणुन सर्च मारला.बॅचलर काही केल्या आठवलेच नाही. धन्यु ओंकार!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 02/09/2011 - 11:10

Permalink

:-)

छान.
  • Log in or register to post comments

Submitted by बद्दु on Wed, 02/09/2011 - 11:10

Permalink

आवडले..

जमलंय..ओघवती भाषा..जिव्हाळ्याचा विषय..बरेचसे सत्य अनुभव- प्रत्येकाच्या वाट्याला येणारे..भट्टी खरंच छान फुलली..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 02/09/2011 - 11:13

Permalink

वा! आगळ वेगळ नात म्हणाव लागेल

वा! आगळ वेगळ नात म्हणाव लागेल नाही याला? खुप वेगळा विषय अन न गुंतता ही गुंतल्याची खुण. आवडल भाय, आवडल.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 02/09/2011 - 11:21

Permalink

एकंच नंबर रे ज्ञान्या ...

एकंच नंबर रे ज्ञान्या ... च्यायला .. आमचं दळभद्री रुममेट तर ह्याच्या पेक्षा १० पट भिकारचोट होतं :) लै बोलबच्चन द्यायचं :) आणि भिकारीपणा करायचं ;) मागे कधीतरी ल्ह्यायची इच्छा झालेली पण तेंव्हा गावकुसाबाहेर काढ्ल्यामुळे ते तसंच राहुन गेलं .. बघु कधी तरी .. लेखन छाण !! - (मुंबैच्या म्हाडाच्या २ बीएचके मधे अनेक रुममेट्स चा अनुभव घेतलेला ) टारेश..
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Wed, 02/09/2011 - 11:23

Permalink

मस्तच

मस्त लिहलय! आवडल! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 02/09/2011 - 11:25

Permalink

ज्ञानेश, खुप छान लिहिलं आहेस,

ज्ञानेश, खुप छान लिहिलं आहेस, आत्तापर्यंतच्या आयुष्यात फक्त ६ महिने, रुममेट बरोबर या स्थितीत काढले आहेत, त्यामुळे खुप जास्त लिहिणे शक्य नाही, पण जे तु लिहिलं आहेस, ते खुपच छान आहे. या वर्षीच्या मिपावरच्या चांगल्या लिखाणात आणखी भर घातली आहेस, त्याबद्दल धन्यवाद. हर्षद.
  • Log in or register to post comments

Submitted by आळश्यांचा राजा on Wed, 02/09/2011 - 11:32

Permalink

क्लास!

सुंदर लिहिले आहे. कुणीही रिलेट करु शकेल असंच लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Wed, 02/09/2011 - 11:47

Permalink

ज्ञानेश, अतिशय छान आनि सुंदर

ज्ञानेश, अतिशय छान आनि सुंदर लिहिलेस तु. १०० पैकि १०० मार्क्स तुला. सध्या मी पन ३.५ वर्षे असे राहत आहे.तेव्हा पहिल्या दिवसा पासुनच्या पुर्ण आठवणी डोळ्यांसमोर आल्या. आधी मला वाटल कि तुझा सुर तक्रारीचा आहे.पन नंतर तुझे जुळलेले सुर दिसले. घरुन आल्यावर इथे सगळेच अस्वच्छ वाटत होते.पन मी आता बदलल्ले नि मी स्वच्छतेचा अतिरेक अनि ती कोनाकडुन एक्सपेक्ट पन करत नाही.
तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.
ह्यात नवीन काही नाहीये हो ;) तुझ्या सारखाच माझे ही झाले आहे. ज्या मुली आवडत नव्हत्या त्या पन नंतर आवडाय लागल्या. माझी १ आठवण मी पन सांगते इथे. माझी पहिली रुममेट वयानी अगदीच लहान कॉलेज गोइन्ग .अतिशय अल्लड अनि जिद्दि, हटवादी. आज माझी सगळ्यात चांगली मैत्रीन कम लहान बहीण.ती कशासाठी पन माझा सल्ला मागते. आमचे भांडन झाले तेव्हा तीच मला आधी बोल्ली होती. जेव्हा कि ती इतकी इगोइस्टीक आहे कि तिने भांडन करुन तिच्या मावशीचे घर सोडलेले.तेव्हा मला इतके फील झाले कि तिनी तिचा इगो फक्त माझ्यासाठी दूर ठेवलेला. आज तिचे सगळे फ्रेंड्स मला ओळखतात आनि आता ती लांब राहते . एवढी भेटत पण नाही.पन तिचे २रे फ्रेंड्स मात्र मला पन भेटतात. खट्टे-मीठे अनुभव पन आले.बाकि प्रत्येकी सोबतचे अलिखित नियम पन वेगवेगळे असायचे
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 02/09/2011 - 12:24

Permalink

खतरनाक

जमलय
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 02/09/2011 - 12:30

Permalink

छान..

लेख आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by वारकरि रशियात on Wed, 02/09/2011 - 12:34

Permalink

छान जमून आलाय !

छान जमून आलाय !
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 02/09/2011 - 12:37

Permalink

एकदम मस्त! खूप आवडले प्रकटन.

एकदम मस्त! खूप आवडले प्रकटन.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/09/2011 - 12:42

Permalink

मस्त लिखाण ज्ञानेश शेठ अगदी

मस्त लिखाण ज्ञानेश शेठ :) अगदी सुंदर व्यक्तिचित्र उभे केले आहेत. हॉस्टेल, रुममेटसचा वगैरे काहीही अनुभव नाही, तरी लिखाण वाचताना तसे कुठेच वाटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 02/09/2011 - 13:20

Permalink

छान झालाय लेख. रूममेट्स हा

छान झालाय लेख. रूममेट्स हा प्रकार परदेशात गेल्यावर पहिल्यांदा अनुभवला. त्या आठवणी जाग्या झाल्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by ashvinibapat on Wed, 02/09/2011 - 13:30

Permalink

अप्रतिम.

खुपच सुंदर लिहिलय , १च कारण असु शकते कि तु जिवना वर मनापासुन प्रेम करत असणार .............
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Wed, 02/09/2011 - 13:51

Permalink

धन्यवाद !

अनपेक्षीत प्रतिसादामुळे सुखावलो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 02/09/2011 - 14:03

Permalink

छान

खूप चांगलं लिहिण्याची ताकद दिसली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 02/09/2011 - 15:15

In reply to छान by श्रावण मोडक

Permalink

+१

असेच म्हणतो
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 02/09/2011 - 15:57

In reply to +१ by अवलिया

Permalink

+२

सहमत, लेख आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 02/10/2011 - 21:11

In reply to +२ by नंदन

Permalink

असेच

म्हणतो. लिखाणाची शैली आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 02/20/2011 - 17:41

In reply to असेच by प्रदीप

Permalink

सहमत

या चौघांशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 02/09/2011 - 14:05

Permalink

अव्वल....

अव्वल.... इतकंच म्हणू शकतो या लिखाणाला... वाचता वाचता गहिवरून आलंय मला...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद्_पुणे on Wed, 02/09/2011 - 14:20

Permalink

मस्त

छान लिहिले आहे.. मुंबइतल्या रूममेटची आठवण झाली..
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 02/09/2011 - 15:14

Permalink

छान लिहिले आहे. जुन्या

छान लिहिले आहे. जुन्या रूममेट्स पैकी काही पटकन डोळ्यांपुढे आले. बऱ्याच दिवसांनी काही चांगले वाचायला मिळाले. धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Wed, 02/09/2011 - 15:28

Permalink

बाकि रुममेट्स बद्दल १ सत्य मी

बाकि रुममेट्स बद्दल १ सत्य मी ऑबसर्व केलेले - जे पहिल्यांदा बघुन/भेटुन चांगले वाटतात. ते शक्यतो नंतर चांगले निघत नाहीत आनि व्हाइसवर्सा
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Wed, 02/09/2011 - 15:43

Permalink

आपला माणूस...!!

"....या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे...." ~ हे सगळ्यात जास्त आवडले. जरी रूममेट असला तरी लेखकाच्या मनात त्याच्याविषयी 'मैत्री' ची भावना कशी सातत्याने जागृत होती हेच वरील घड्याळाचा प्रसंग सुचवितो. पु.ल.देशपांडे यांच्यासमवेत पत्रात भरपूर वाद घालून, त्याना बोल लावून, शेवटी त्या पत्र लिहिणार्‍याने "....तरीही तुमचाच" असे लिहून सही केली होती. त्याला उत्तर देताना बेहद्द खूश झालेले पुलं म्हणाले, "अहो, हेच खरे तर आपले अस्सल मराठी मन.....दोष दाखवायचे तर आहेतच, पण शेवटी तो 'आपला' आहे हेही मनी असतेच, तेच महत्वाचे." श्री.ज्ञानेश यानी रूममेटसाठी घड्याळ ठेवणे हीच भावना दर्शविते. आमचाही एक अशाच मुशीतील मित्र होता....त्याची आठवण मात्र आहे ती त्याच्यातील एकमेव गुणाची. ती म्हणजे स्थानिक पातळीवर झालेल्या एखाद्या अपघाताची बातमी पेपरमध्ये वाचली की चटकन तो, ओळख असो वा नसो...ते इस्पितळ शोधून तिथे जर पेशंटला मॅच होत असेल तर 'रक्तदान' करून यायचा. तसे करून आल्यानंतर आम्ही बाकीचे तिघे त्याच्यासाठी स्पेशल डिश करून ठेवत असू. छान आणि भावुक लेख. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 02/09/2011 - 15:58

Permalink

आवडेश!!!!

आवडेश!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 02/09/2011 - 16:01

Permalink

ह्या लेखाच्या खाली क्रमश:

ह्या लेखाच्या खाली क्रमश: असायला हवे होते असे राहुन राहुन वाटले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Wed, 02/09/2011 - 16:21

Permalink

ज्ञानेशशेठ.. सुंदर प्रकटन.

ज्ञानेशशेठ.. सुंदर प्रकटन. दोन्हीही व्यक्तिरेखा जगून झालेल्या असल्याने लेखातील भावनांशी जवळीक साधता आली! :) खूप छान! :)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Wed, 02/09/2011 - 16:22

Permalink

नितांत सुंदर लेख , माझे सर्व

नितांत सुंदर लेख , माझे सर्व रूममेट आठवले , खूप गाहीवरुन आल , लवकरच ह्या विषयावर काहीतरी लिहिल पाहिजे यार ! मार डाला !
  • Log in or register to post comments

Submitted by निवांत पोपट on Wed, 02/09/2011 - 16:37

Permalink

मस्त लिहिले आहे. ‘रूममेट’ नाव

मस्त लिहिले आहे. ‘रूममेट’ नाव वाचून विलास सारंग ह्यांच्या ह्याच नावाच्या अप्रतिम कथेची आठवण झाली.तुम्ही पण छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 02/09/2011 - 19:15

Permalink

लेखन आवडले.

लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 02/09/2011 - 21:11

Permalink

खूप आवडले.

खूप आवडले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 02/09/2011 - 21:29

Permalink

सुरेख

उत्तम लिखाण !
  • Log in or register to post comments

Submitted by दैत्य on Wed, 02/09/2011 - 22:17

Permalink

एकदम भारी!!

ज्ञानेशभौ, एकदम भारी!! माझ्या सगळ्या रुममेट्स ची आठवण आली!! प्रत्येकाची काहीतरी खासियत असते, ठराविक ठिकाणी वस्तू ठेवण्याची पद्धत, बोलण्याची स्टाईल...!! रूममेट्स ची मैत्री हा अजब प्रकार आहे!.... मला माझे रुममेट्स अमेरिकेत भेटले, पण ह्या लेखावरुन वाटलं की, पुणे असो किंवा अमेरिका, रूममेट म्हणून राहणार्या लोकांच्या परस्पर-संबंधात फारसा फरक नसतो ! ज्ञानेशभौ, तुम्हाला 'ब्रोमान्स' (कोणताही विपरीत अर्थ अपेक्षित नाही!!) झाला आहे, कदाचित!!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 02/09/2011 - 22:51

Permalink

या कथेतल्या लेखकाला गहिवरून

या कथेतल्या लेखकाला गहिवरून यायला, डोळे पाणावायला स्कोप असतानाही ती संधी न घेता; कथा / लेख शक्य तितका साधा आणि नैसर्गिक ठेवल्याबद्दल फुल्ल मार्क्स.... वरील कारणासाठी लेखन फार आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/11/2011 - 13:13

In reply to या कथेतल्या लेखकाला गहिवरून by भडकमकर मास्तर

Permalink

+१

लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 02/11/2011 - 18:04

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+२

लेख आवडला..
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com