"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-५ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-५
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
----------------------------------------------------
वरिष्ठ, कनिष्ठपदांवरील त्यांचे भाट, दृष्ट लागणे. ईर्षा वगैरे.....
स्तुतीमुळे एक तर्हेच्या सामाजिक गरजेचे समाधान होते. पण स्तुती करणार्या आणि स्तुती करून घेणार्या दोघांनाही 'हे काय चालले आहे' हे माहीत असते. कारण स्वतःची पदोन्नती/बढती आणि वैयक्तिक फायदा या ध्येयांवरच स्तुती करणार्याचे लक्ष केंद्रित असते. जो अशी मदत करू शकतो तो त्या कनिष्ठ स्तुतीपाठकाला महत्वाचा असतो पण हे त्याचे महात्म्य तात्पुरते, क्षणभंगुर असू शकते! स्तुती करणारा आपल्या परीने वरिष्ठाची प्रतिष्ठा आणि महत्व वाढवू शकतो, पण स्तुतिपाठक कायमचा नसतो व म्हणून बदलला जाऊ शकतो. हे दोघांनाही माहीत असते. त्यामुळे असे संबंध एकमेकांबद्दलच्या अविश्वासाच्या ’भक्कम पाया’वरच उभे असतात. पहिल्या भेटीतल्या वागणुकीवरून कुणालाच कांहीं ग्राह्य धरता येत नाहीं. कारण प्रत्येक व्यक्ती तशी संशयितात गणली जाते! एकाद्या व्यक्तीचे औदार्य, त्याची परोपकारी वृत्ती गृहीत धरता येत नाहीं कारण त्यामागचे हेतू शंका घेण्याजोगे असू शकतात. एकाद्या व्यक्तीचे बाह्यरूप जरी सदिच्छा दर्शविणारे असले तरी त्यामागे दगाफटका करण्याचा कट दडलेला असू शकतो. कनिष्ठ लोकांना वरिष्ठांबद्दल मत्सर वाटत असतो आणि त्यामुळे त्यांची वाईट नजर (दृष्ट लागणे) वरिष्ठाचे नुकसान करू शकते ही आज ग्राह्य समजूत झालेली आहे. आधी उधृत केलेल्या श्री श्रीनिवास यांच्या गांवकर्यांबद्दलच्या अभ्यासात त्यांनी ही गोष्ट ताबडतोब हेरली. ते म्हणतात कीं मत्सर ही नेहमीचीच परिचित गोष्ट आहे. सुखवस्तू माणसाला इतर लोक आपला हेवा करत असतील याची जाणीव (व कांहींशी भीतीही) असते. मत्सर पहाणार्याच्या नजरेत दिसतो आणि ही मत्सराची बाब गांवकर्यांच्या मनात अगदी भिनलेली होती. त्यामुळे नजीकच्या आणि बरोबरीच्या लोकांबरोबर दुटप्पीपणाने आणि सावधपणेच वर्तन करावे लागते. भारताच्या सार्या महामार्गांवरून धावणार्या ट्रक्सच्या मागे नेहमी दिसणारे अतोनात लोकप्रिय "बुरी नजरवाले तेरा मुह काला" हे बोधवाक्य याच अर्थाचे आहे. भारतातल्या चित्रवाणीसंच बनविणार्या एका सर्वात मोठ्या कंपनीने आपले संच विकण्यासाठी मत्सरावर आधारित "Owner's pride, neighbour's envy" हे वाक्य असलेली जाहिरात अतीशय यशस्वीपणे वापरली होती. आपले उभे आयुष्य भारताच्या सांस्कृतिक परंपरांच्या अभ्यासात व्यतीत केलेल्या कपिला वात्सायन यांनी एकदा मला (मूळ लेखकाला) अतीशय गंभीरपणे सांगितले होते कीं भारतीयांच्या भावनातील स्थायी भाव ’ईर्षा’ हाच आहे. अगदी सुशिक्षित उच्चभ्रू समाजातही "दृष्ट काढणे" हा विधी अतीशय श्रद्धापूर्ण विश्वासाने पाळला जातो. मूठभर मिरच्यांवर मीठ शिंपडून ती ज्याला तर्हे-तर्हेची ’दृष्ट’ लागलेली असण्याची भीती असते अशा व्यक्तीच्या चेहर्याभोवती ’इडा पिडा टळो’ असे पुटपुटत फिरविली जाते आणि हे सर्व मिश्रण आगीत टाकले जाते. मिरचीच्या खाटाने जर डोळ्यात पाणी आले किंवा कुणाला खोकला आला तर लागलेली दृष्ट जळून गेली असे म्हणत दृष्ट काढण्यामागच्या गरजेचे समर्थन केले जाते!
प्रतिष्ठा आणि वैमनस्य यांची जोडी.....
भारतीयांभोवतीच्या सामाजिक वातावरणात उपजत संशयाची प्रवृत्ती सगळीकडे पसरलेली असते. महाभारत हे अतीशय गुंतागुंतीयुक्त महाकाव्य कपट आणि विश्वासघात या मानवी दुर्गुणांनी भरलेले तर आहेच, पण रामायण हे दुसरे महाकाव्य जरी "चांगल्याचा वाईटावर विजय" या सोप्या आणि सरळसोट विषयावर असले तरी तेसुद्धा संशय आणि शंका यांनी भरलेले आहे. प्रत्येक पात्राची आणि त्यांच्या प्रत्येक गुणाची शंकेच्या मुशीत वारंवार परिक्षा घेतली जाते आणि यातून सीतेचे पावित्र्य आणि लक्ष्मणाची निष्ठाही सुटत नाहीं. स्वतःच्या लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे केल्या जाणार्या समाजसेवेबद्दल कायमच दाट संशय असतो. या अविश्वासाच्या वातावरणामुळे दोन परस्परविरोधी पण एकत्र नांदणारी विश्वे जन्म घेतात, एक आदराचे/प्रतिष्ठेचे तर दुसरे वैमनस्याचे. जेंव्हां वरिष्ठांच्या शक्तीचे ’गुरुत्वाकर्षण’ जोरदार असते तेंव्हा आदराची/प्रतिष्ठेची भावना उघडपणे दिसते पण जेंव्हां वरिष्ठांची शक्ती कमी होते तेंव्हां वैमनस्याची भावना उघड होते आणि परिस्थिती समतोल असते तेंव्हां आदर आणि वैमनस्य या दोन्ही भावना एकत्र आणि समान दिसतात.
प्रतिष्ठेचा आणि वैमनस्याचा तर्कशास्त्रानुसार अभ्यास केल्यास एकाद्या कर्तबगार माणसाची शक्ती आणि सत्ता वाढत असते तेंव्हां त्याला सलाम करणारे असंख्य भारतीय असतात हे अगदी स्पष्ट होते. या उलट ज्या माणसाला वाईट दिवस आलेले असतात त्याची कांस त्याचा आधी उदो-उदो करणारे लोक सोडून देतात. इतर समाजांत अशी मनोवृत्ती नसते असे नाहीं, पण भारतीयांत ती जास्त भडक आणि पराकोटीची वाटते. उगवत्या तार्याचे कौतुक प्रमाणाबहेर व अतीशय प्रशंसेने होते तर पडलेल्या तार्याची निर्भत्सना अगदी असमर्थनीय भडकपणाने केली जाते. या स्वभाववैशिष्ट्याबद्दलचा उल्लेख जेंव्हां मी (मूळ लेखक) एका वयस्क माणसाशी बोलताना केला तेंव्हां त्यांनी "चढते सूरजको सब सलाम करते हैं" असे निर्विकारपणे उत्तर दिले. एकाद्या संघटनेतील पदक्रम जर सुरक्षित असेल आणि त्याला कुणी दुसरा आव्हान देत नसेल तर त्या संघटनेच्या शिखरावर विराजमान असलेल्या अधिकार्यांना आणि त्याच्या कृपाछत्राखालील कनिष्ठ अधिकार्यांना निर्विवाद आणि वादातीत निष्ठा प्राप्त होते. "समरथ कर नहीं दोष गुसाईं, रवि पावक सुरसरत की नहीं (समर्थ लोक कधीच चुका करत नाहींत, ते सूर्य, अग्नी आणि सुरसरिता (गंगा) यांच्यासारखे सदैव पावन असतात)" असे सांगत तुलसीदासांनी अगदी वर्मावर बोट ठेवले आहे. पण जेंव्हां पदक्रम भंग पावतो, उकलू लागतो तेंव्हा उच्च स्थानावरून घसरलेल्या पूर्वीच्या वरिष्ठांच्या दारुण परिस्थ्तीकडे पाहून कनिष्ठांना इतका आनंद झालेला असतो कीं तो लपवता येत नाहीं. राजकीय नेत्यांना याची चांगली जाणीव असते कारण त्यांच्या बाबतीत या आनंदाचे प्रदर्शन कनिष्ठ लोक अजीबात दोषी वाटून न घेता आणि अजीबात अवघड वाटून न घेता करतात. पूर्वी प्रदर्शित केलेली प्रतिष्ठा इतकी लगेच विसरली जाते कीं जणू कनिष्ठाला स्मृतिभ्रंशच झाला आहे असे वाटावे. पण भारतीय समाज असल्या वागणूकीला सामाजिक मान्यता देतो. भविष्याबद्दल अटकळी बांधल्या जातात व नवीन वरिष्ठ कोण असेल याचे आडाखे बांधले जाऊन ताबडतोब परिस्थिती सजीव होते व सार्या हालचाली नव्याने पुन्हा सुरू होतात! यालासुद्धा समाजाची मान्यता आहे. राजीव गांधी जेंव्हां ८४ साली एका ऐतिहासिक विक्रमी बहुमताने सत्तेवर आले तेंव्हां त्यांनाही जनतेला त्यांच्याबद्दल वाटणार्या या खळबळजनक कौतुकाबद्दल आश्चर्याचा धक्काच बसला असेल कारण राजकारणाला ते नवखेच होते. त्यांनी कांहींही केले तरी ते चूक समजले जात नसे. त्यांची सत्तेवरची पकड जोपर्यंत पक्की होती तोपर्यंत शंकेचे, संशयाचे ढग कुठल्याही क्षितिजावर कुठेही दिसत नव्हते.
चढत्या काळात सारे "आलबेल"
राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या आणि राजीवजींच्या ’आतल्या’ वर्तुळातल्या लोकांना राजीव गांधींची (आणि त्यांच्याबरोबर आपली) सत्ता त्रिकालाबाधित असल्याची कल्पना झाली असल्यास त्यांना एक वेळ नवखेपणाचा फायदा घेऊन माफ करता येईल. पण जसजशी परिस्थिती बिघडू लागली आणि त्यांच्यावर टीका करणार्यांची संख्या ज्या वेगाने वाढू लागली त्याबाबत राजीवजींना आणि त्यांच्या सहकार्यांना आश्चर्याचा धक्काच बसला असेल. आता त्यांनी टाकलेले प्रत्येक पाऊल चुकीचे ठरू लागले. खरे तर भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान आणि त्यांच्या मातोश्री असलेल्या इंदिराजींनी (त्यांच्याच वधामुळे राजीव अचानक पंतप्रधानपदी आरुढ झाले होते) राजीवजींना जनतेच्या वागणुकीच्या अशा अपरिहार्यतेबद्दल स्वानुभवावरून सावध करायला हवे होते. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या नरसिंहरावांनीही त्यांना सावध करायला हवे होते, पण इतिहासाची पुनरावृत्ती पहायला राजीवजी जिवंतच नव्हते! भारतात लोकमताचा लंबक पाळीपाळीने ’कौतुक’ आणि ’नापसंती’ अशा दोन अतीशय विरुद्ध टोकांना स्पर्श करत असतो. आणि या दोन टोकांमधील जागा गटबाजी, कारस्थानें आणि दुफळी यांनी भरलेली असते.
भारतीय आणि गटबाजी
भारतीय लोक गटबाजीत अगदी रुळलेले असतात. दोन भारतीय एकत्र आले तर दोन पक्ष स्थापन होतील हे ’घिसे-पिटे’ वचन मुळीच चुकीचे नाहीं. तीन भारतीय पाच मिनिटे एकत्र काम करू शकत नाहींत असे उद्गार एकदा स्वामी विवेकानंदांनीसुद्धा काढले होते. प्रत्येक जण सत्तास्थानासाठी झगडतो आणि अशा झगड्यांमुळे त्यांची संघटनाच शेवटी खिळखिळी होऊन तिची दुःखद परिस्थिती होते. जर केंद्रस्थान बळकट असेल तर ते गटबाजीला चांगला आवर घालू शकते. पण तेही कांहीं काळच. परस्परांबद्दलच्या सततच्या संशयी वातावरणामुळे लोक कायम नवी-नवी समीकरणे शोधून सत्तेच्या जवळात जवळ जाऊ पहात असतात, कारण निष्ठेच्या क्षणभंगुरतेची कल्पना सर्वांनाच असते. विश्वासघात, दगाफटका, फंदफितूरीच्या अशा (दु)र्गुणांच्या गोष्टी ऐकायला नेहमीच सहजासहजी फसणारा श्रोतृवर्ग लाभलेला आहे. त्यांना विश्वास असतो कीं दुसरा पक्षच तत्वशून्य असून त्यानेच विश्वासघात केलेला आहे. अशा तर्हेच्या खात्रीमुळे ते स्वतः अशीच तत्वशून्य कृती प्रतिसाद म्हणून करतात. अर्थशास्त्रात सांगितलेच आहे कीं विश्वासघातावर आधारलेल्या क्रांतीचा उपयोग करून सत्ता उलथून पाडल्यास त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. त्यामुळे राजाला नेहमी गुप्तहेर नेमून त्यांच्याकरवी मंत्र्यांची आणि उच्चपदस्थ अधिकार्यांची निष्ठा वेळोवेळी तपासून घ्यावी लागते. एकाद्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाबद्दल, नैतिकतेबद्दल फाजील विश्वास ठेवू नये तसेच एकाद्या व्यक्तीच्या लुच्चेगिरीबद्दल फाजील गाफीलपणाही दाखवू नये.
भारतीयांना असलेली एकाकीपणाची नावड!
सततपणे आपल्याला समर्थन देणारे नवे मित्र शोधणे हा भारतीयांना एकाकीपणावरचा एक रामबाण उपाय वाटतो. भारतीयांना एकाकीपणाचे किंवा एकांतवासाचे फारच वावडे असते. बालपणापासूनच भारतीय लोक एकाद्या गटात, जातीत, उपजातीत नातेवाइकांत किंवा मोठ्या कुटुंबात वाढलेले असतात. त्यामुळे स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आपल्याशी शतृत्व करणार्याबरोबर दोन हात करण्यासाठी त्यांना विश्वासू लोकांचा एक चांगला आधार लागतो. त्यामुळे सगळ्याच मित्र संघटनांकडे तो अनेक गटापासून बनलेल्या आणि आपापसात कायमचे वैमनस्य असणार्या संघटना म्हणूनच पहातो. एक तत्व म्हणून एकीच्या भावनेला महत्व असते पण अशी एकी ही तात्पुरती, क्षणभंगुर आणि दूर कुठेतरी असते असाही विश्वास असतो. हे विश्व म्हणजे एक जोड नसलेली अखंडता आहे, पूर्णत्व हे अविभाज्य आहे, सारी मानवजात म्हणजे एक "वसुधैव कुटुंबकम्" स्वरूपाचे विशाल कुटुंब आहे अशा तर्हेच्या सैद्धांतिक कल्पना भारतीयांना आकर्षित करतात कारण त्या प्रत्यक्ष जीवनाशी अजीबात साम्य नसलेल्या असतात. प्रत्यक्ष जीवनातील वातावरण फुटीरपणाचे असते हे सर्व भारतीयांना माहीत असते व ते त्यांना पटलेलेही असते. शरीरातील पेशीप्रमाणे प्रत्येक गटाचे हितसंबंध सातत्याने विभागले जात असतात, पुन्हा एकजीव होतात आणि पुन्हा तितक्याच सहजतेने पुन्हा विभक्त होतात. सामाजिक संबंधांत वस्तुनिष्ठपणाची कल्पना भारतीयांना परकीच आहे. कुणीही त्याच्या आसपासच्या समाजावरील निष्ठांच्या पलीकडे जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीं. त्यामुळे आपल्या सामाजिक वातावरणाच्या बाहेर असलेल्या परकीयांबद्दलची त्यांची मते कायम धरसोड वृत्तीची लंबकासारखी सतत मागे-पुढे होणारी असतात: परकीय असल्यामुळे व त्यामुळे आपल्या समाजाच्या बाहेरचे असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा अखंड अविश्वास एका बाजूला असतो तर ते आपल्या सामाजिक वातावरणाच्या बाहेरचे असल्यामुळे अशा वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाहीं म्हणून त्यांच्याबद्दल असलेली गूढ तर्हेची निष्ठा दुसर्या बाजूला असते! बहुतांशी फसव्या शांततेच्या आवरणाखाली अनेक स्तरात विभागलेल्या आपल्या समाजात अथक शक्तीनिशी भारतीय पद्धतीने गटबाजी चालते आणि त्या गटबाजीला अदृश्य वैयक्तिक वैराचे आणि मत्सराचे खतपाणीही लाभते.
सत्तेच्या समीकरणानुसार बदलणारे भारतीयांचे वर्तन
जेंव्हां आपले महत्व केवळ आपल्या गुणांवर अवलंबून न रहाता सत्तेच्या सतत बदलत्या समीकरणावर अवलंबून असू लागते तेंव्हां इतरांनी दिलेल्या प्रतिष्ठेतील फरक हा एक गंभीर चिंतेचा विषय होतो. भारतीय लोकांकडे अदृश्य अशी अँटेना असते आणि ती सत्तेच्या समीकरणामधील फरक लगेच ओळखू शकते. आपण आधी चर्चिल्याप्रमाणे कुठलाही माणूस पदक्रमाच्या शिडीवर कुठे उभा आहे हे ओळखण्याची विद्या भारतीयांना चांगलीच अवगत असते आणि शक्तीच्या नव्या समीकरणाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांची वागणूकही लगोलग बदलते. त्यामुळे भारतीय लोक त्यांना मिळणार्या प्रतिष्ठेच्या प्रदर्शानाबाबतीत फारच संवेदनशील असतात. जर त्यांना दाखविलेली प्रतिष्ठा कमी झालेली दिसली तर ते त्यांच्या स्थानमहात्म्याच्या मानहानीचे द्योतक होते. जर प्रतिष्ठेचे प्रदर्शन "जैसे थे" राहिले तर त्याचा अर्थ आपले स्थान सुरक्षित आहे असे ते समजतात आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन उंचावले तर त्या व्यक्तीची पदोन्नती होण्याची शक्यता दिसून येते. ही प्रतिष्ठा कशी दिली जाते किंवा नाकारली जाते ती एक खास भाषाच आहे व ती भाषा एकाद्या व्यक्तीचे सत्तेच्या समीकरणातील स्थान अतीशय अचूकपणे आणि नेमकेपणाने सांगू शकते. स्वतःच्या लायकीनुसार जर प्रतिष्ठेचे प्रदर्शन झाले नाहीं तर भारतीयांना तो एक अपमान वाटतो. इतरांनी दर्शविलेली प्रतिष्ठा जर कमी असेल तर भारतीय माणूस डिवचला जातो आणि त्याच्या हातून त्याच्या मानहानीच्या मानाने खूप जास्त मोठा प्रमाद होऊ शकतो. भारतीयांच्या ’देशी’ मानसशास्त्रानुसार तीन तर्हेच्या अनुभवांकडे खास लक्ष द्यावे लागते. ते अनुभव आहेत मान, अपमान आणि अभिमान! भारतीयांच्या परस्पर संबंधांत योग्य आदर देण्याबद्दल आणि मिळण्याबद्दल फारच पराकोटीची संवेदनाशीलता असते हे उघड दिसते.
वैयक्तिक हितसंबंध सगळ्यात श्रेष्ठ
यात विरोधाभासाचा भाग असा आहे कीं स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची ही अतिशयोक्तीपूर्ण जाणीव जितक्या सहजपणे जारी केली जाते तितक्याचच सहजपणे तिचा त्यागही करता येतो. आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागलेले सहन करणार नाहीं असे जो शपथेवार सांगत असतो तो दुसर्याच दिवशी खात्रीच्या वैयक्तिक फायद्यासाठी तडजोड करायला तयार होतो. त्याच्या या दोन पवित्र्यांमधील विरोधाभास उघड असतो पण तो त्याला शेवटी नगण्य, गैरलागू वाटतो. जे लोक दांभिकतेवर प्रखर टीका करत असतात तेच खासगीत बोलताना व्यवहारीपणाचे महत्व समजल्याचे मान्य करतात. स्वाभिमानाचा त्याग करणे लाभदायक असेल आणि त्यामुळे जास्त उच्च दर्जाची सत्ता आणि स्थान मिळत असेल-तीही अतीशय थोड्या काळासाठी-तर झालेला विश्वासघात विसरला जातो. पण भारतीयाचे उत्कर्षाचे दिवस उतरणीला लागले कीं प्रतिष्ठा न मिळाल्याची भावना उफाळून येते. १९७० सालच्या दशकातील एका काँग्रेसच्या नेत्याने केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळात आणि एका महत्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. त्याने जाहीरपणे सांगितले कीं ते त्यांची चामडी त्याकाळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या चपलांसाठी द्यायला तयार आहेत. त्याकाळी इंदिरा गांधींची सत्ता अजिंक्य, अभेद्य वाटायची. ते त्यांच्या कनिष्ठांकडून तसेच त्यांच्या बरोबरीच्या लोकांकडून ज्या मानमरातबाची, ज्या प्रतिष्ठेची आग्रही मागणी करत असत त्याच्या तूलनेत त्यांनी स्वतःचे स्वतःच केलेचे अवमूल्यन, मानहानी त्यातील विरोधाभासामुळे फारच भडक दिसली होती. अशा तर्हेने एका बाजूला प्रतिष्ठा असणे अगदी जरूरीचे मानणे आणि दुसर्या बाजूला स्वतःच्या मोठ्या हितसंबंधांसाठी तिला सहजपणे तिलांजली देणे हे भारतीयांच्या जीवनात अगदी रोजचे होते! असे करण्यामागचा मूळ हेतू भारतीयांना शंभर टक्के समजत असल्यामुळे अशा परस्परविरोधी वागण्यावर क्वचितच टिप्पणी होते. या संदर्भात श्री वर्मा यांना न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावरील एक घटना आठवते. एका मंत्र्यांच्या सौभाग्यवती तिथे उतरल्या आणि त्या मंत्र्यांच्या स्वीय सचीवांना तिला उतरवून घेण्यासाठी येताना केवळ पाच मिनिटे उशीर झाला. झाले! बाई संतापल्या आणि भडकल्या आणि तो सचीव समोर येताच, "उल्लूके पठ्ठे, ये टाईम आनेका?" या शब्दांत किंचाळल्या. स्वतः एक ज्येष्ठ सनदी नोकर असलेल्या त्या स्वीय सचीवाने हा अपमान मुकाट्याने गिळला आणि 'मंत्र्यांचा स्वीय सचीव' या पदावर चिकटून राहिला!
Book traversal links for "भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-५ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नेहेमी प्रमाणेच मस्त. भारतीयांच्या वर्मावर बोट ठेवणारा लेख.
जास्तीत जास्त 'मिपा'कर या लेखमालिकेतील लेख वाचतील अशी आशा आहे
हमाम !!
+१
'दर्पणदर्शन'
ह्म्म हे आसूड सहन होत नाहीत
प्र.का.टा.आ.
श्री वर्मांनी लिहिलेले कांहीं माननीय अपवाद सोडल्यास बरेचसे बरोबर
हे वाक्य
मूळ टंकलिखितात तसा बदल केला आहे.
लेखातील विचारांशी बर्याच
तुमची प्रतिक्रिया काय?
हा मनुष्यस्वभाव आहे व तो सार्या देशांतील लोकांना लागू आहे
स्वीय साहाय्यक....!!
इन्द्रा तुझ्या ज्ञानाला
या जगात असे
मूळ पुस्तकातले 'ते' वाक्य खाली कॉपी-पेस्ट केले आहे
खुलासा...!!
धन्यवाद
अनुवाद कसा करावा?
मस्त जोरदार
असे का ?
मूळ मनुष्य स्वभावाला कुठेलाही धर्म, कुठलाही नियम बदलू शकत नाहीं!
पुर्वी च्या लिन्क......
आतापर्यंतच्या सर्व लेखांचे दुवे खाली दिले आहेत