मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेला मैदा

खादाड अमिता · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'आईईई.... प्लीईज्ज्ज... पिझ्झा कर न...किंवा नूडल्स .. पास्ता? तो पण नाही? मग नुसतं sandwich तरी कर न मग? असं काय? आम्ही काही पण करायला सांगितलं की तू नाहीच म्हणते! maggi पण नाही खाऊ देत. पिंकी ची आई तिला दररोज maggi किंवा ब्रेड बटर देते.' आमची आई: काय ते सगळे नुसते मेले मैदे खायचे असतात तुम्हाला! दूध पोळी खा पाहू मुकाट्याने! हा आमच्या लहानपणचा कायमचा संवाद. आमच्या आई ला हे माहित होतं की मैदा खाल्लेला चांगला नाही, त्यात काहीच जीवन सत्व नसतात असं ती आम्हाला सांगायची. पण जीवन सत्व म्हणजे काय? मैद्यात ती नसतात तर त्यात एवढा काय बिघडलं? किंवा मैद्यात ती का नसतात? अश्या प्रश्नांचं कधी फारसं समाधानकारक उत्तर आम्हाला (मला आणि माझ्या बहिणीला - त्यात 'पण का?' हा प्रश्न विचारण्यात मी पटाईत) मिळालं नाही. असो. गव्हाच्या पिठात, गव्हाच्या सालात आणि wheat germ म्हणजे गव्हाच्या सगळ्यात आतला भाग ह्यात असलेले, विटामिन (जीवनसत्व), मिनरल आणि फायबर असतात. म्हणूनच साध्या गव्हाच्या पिठाला होल मील फ्लोर पण म्हणतात. मैदा हे प्रोसेस केलेलं गव्हाचा पीठ असतं. प्रोसेसिंग मध्ये त्यातलं wheat bran आणि wheat germ काढून टाकतात. त्यामुळे मैद्यात फक्त स्टार्च असतो. परदेशात गेले काही वर्ष ऑल पर्पज फ्लोर म्हणजे मैदा केमिकल विटामिन आणि मिनरल fortified मिळतो. पण हे केमिकल जीवनसत्व आपल्या शरीरात खूप कमी प्रमाणात शोषले जातात. गेल्या ५० वर्षात पूर्ण विश्वभरात आलेला मेदोवृध्धी चा पूर ह्याला मैद्याचे आहारात वाढलेले प्रमाण आणि घरी स्वयंपाक न करण्याची वाढलेली प्रथा (आशिया खंडात तरी बऱयाच प्रमाणात घरी स्वयंपाक करतात) , पुष्कळ प्रमाणात कारणीभूत आहे. पण मग प्रश्न असं पडतो की जर खरंच मैद्यात nutrients नसतात (स्टार्च सोडून) तर मग त्याला प्रोसेस तरी कशाला करतात? कारण wheat germ मधे असलेल्या ओईल मुळे, त्याची शेल्फ लाईफ खूप कमी असते. गिरणीतून आणलेले पीठ जर प्रोसेस न करता ठेवले तर ते ३०-४० दिवसात खराब व्हायला सुरुवात होते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे कि industrial production मधे शेतातून शेल्फापर्यंत गहू packaged पिठाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचायला कमीत कमी २ महिने लागतात. तुलनेत प्रोसेस केलेल्या मैद्याची शेल्फ लाईफ पण जास्त असते. तर मग साहजिकच फूड इंडस्ट्री मधे मैदा जास्त वापरला जाऊन त्याचेच प्रोडक्ट ते आपल्या समोर आणणार. आपल्या लहानपणी, हल्ली असतात तसे, हेल्थ फूड चे पर्याय पण नव्हते. आता हे so called 'हेल्थ फूड्स' पण कितपत खरंच आरोग्यवर्धक असतात हे पुन्हा कधीतरी! तर, मैदा आपल्या आहारातून अगदी बाद करायची आवश्यकता नाही पण शक्यतो आठोड्यातून एकदाच मैद्या चा किंवा मैदा असलेला पदार्थ करावा किंवा खावा.

वाचने 3210 वाचनखूण प्रतिक्रिया 11

कच्ची कैरी Sat, 02/05/2011 - 16:27
धन्यवाद अमिता ह्या उपयुक्त माहितीबद्दल्,तुझ्या ज्ञानाचा आम्हालाही असाच उपयोग होउ दे पुन्हा धन्यवाद

५० फक्त Sat, 02/05/2011 - 17:17
अमिता अतिशय धन्यवाद, हि लिंक माझ्या बायकोला पाठवलेलि आहे आणि वाचुन तिच्यात फरक पडेल असे वाटते. बाकी, काही वर्षांपुर्वी मार्मिक कि इतर कोणत्या तरी साप्ताहिकात स्वयंपाकघरातील विज्ञान अशी एक लेखमाला येत होती त्याची आठवण झाली. शनिवारच्या लोकसत्ताच्या पुरवणीत पण स्वयंपाक व विज्ञान वर एक लेखमाला येत असते ति सुद्धा खुप छान असते. हर्षद.

पंगा Sat, 02/05/2011 - 21:25
आपल्या लहानपणी, हल्ली असतात तसे, हेल्थ फूड चे पर्याय पण नव्हते.
"पर्याय नव्हते" असे म्हणता येईलच की नाही, कल्पना नाही. कदाचित 'हेल्थ फूड' या नावाने ते मार्केट केले जात नसावेत, इतकेच असावे. तसेही आपल्या लहानपणी 'प्रोसेस्ड फूड' ही संकल्पना (निदान भारतात तरी) कितीशा प्रमाणात असावी? (किंवा कदाचित थोड्याफार प्रमाणात असली, तरी कितीसे लोक आणि किती वेळा अशी उत्पादने विकत आणत असावेत?*) बाजारात जाऊन तयार पिठाचे पॅक किती टक्के जण आणत असावेत? वाण्याकडून गहू विकत आणायचे आणि गिरणीतून दळून आणायचे हाच तर बहुतांशी नॉर्म असावा, असे वाटते. शिवाय मैद्याचा वापर सणासुदीला काही खास पदार्थांसाठी याव्यतिरिक्त (निदान महाराष्ट्रात तरी) कितीसा असावा? तत्कालीन सामान्य वापरातील* बहुतांश पदार्थ हे बाय डीफॉल्ट हेल्थ फूड असताना, वेगळे 'हेल्थ फूड' पर्याय मार्केट करण्याची गरज अशी ती काय असावी? सांगण्याचा हेतू, आपल्या लहानपणी** 'हेल्थ फूड' - आणि 'जंक फूड' सुद्धा - असे दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत. फक्त त्या नावांनी बाजारात*** दिसत नसावेत, इतकेच. अवांतर: बाकी, लेखातील मुद्दे बहुतांशी पटले. लेख आवडला. (नेव्हर माइंड माय इंपर्टिनन्स.)
तळटीपा: * बहुतांशी पिनकोड ४११०३०मध्ये व्यतीत झालेल्या लहानपणाच्या आधारावर ही निरीक्षणे नोंदवलेली आहेत. ("कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?" किंवा, "करा लेको, चैन करा. रोज शिक्रण खा. मटारउसळ खा." संदर्भ (दोन्ही): पु.ल. (अर्थातच प्रस्थापित प्रथेस अनुसरून.)) त्यामुळे व्यापक प्रमाणात ही निरीक्षणे तथ्याशी मिळतीजुळती न निघाल्यास चूभूद्याघ्या. (तसेही इनमिन साडेतीन टक्क्यांच्या जीवनशैलीवरून व्यापक समाजातील उरलेल्या साडेशहाण्णव टक्क्यांबाबत काही अनुमाने काढणे - किंवा अटकळी बांधणेसुद्धा - धाडसाचेच आहे म्हणा!) ** या निमित्ताने, 'आपल्या लहानपणी' हा शब्दप्रयोग सर्वसमावेशक नसावा, याची जाणीव लेखिकेस करून देण्याचे पातक पत्करण्याचा प्रमाद करू काय? लेखिकेचा वयोगट काय असावा याची कल्पना नाही (जाणून घेण्याची इच्छाही नाही), परंतु लेखिकेच्या लहानपणीचा काळ आणि या मंचावरील नवतरुणांच्या लहानपणीचा काळ (किंवा फॉर द्याट म्याटर या मंचावरील पुरातनवयोवृद्धांच्याही लहानपणीचा काळ) हा एकच असावा (आणि तत्कालीन परिस्थितीही डिट्टो सेम-टू-सेम असावी), हे (अव्यक्त) गृहीतक जरा धाडसाचे वाटते. त्याऐवजी 'आमच्या लहानपणी' असा पर्याय सुचवू काय? *** या शब्दाचा एक अर्थ 'मासळी', 'मत्स्याहार' किंवा 'समुद्राहार' असाही होतो, याची नोंद या निमित्ताने (उगीचच) करावीशी वाटते. उदाहरणार्थः "आज बाजार काय चांगला गावला नाय." किंवा, "बाजाराची आमटी" यांसारखे शब्दप्रयोगही कधी ऐकल्याचे आठवते. "बाजारात तुरी, आणि भट भटणीला मारी" ही म्हणही याच पठडीतली असावी काय, याबाबत मात्र साशंक आहे.

चिगो Sat, 02/05/2011 - 21:24
गेल्या ५० वर्षात पूर्ण विश्वभरात आलेला मेदोवृध्धी चा पूर ह्याला मैद्याचे आहारात वाढलेले प्रमाण आणि घरी स्वयंपाक न करण्याची वाढलेली प्रथा (आशिया खंडात तरी बऱयाच प्रमाणात घरी स्वयंपाक करतात) , पुष्कळ प्रमाणात कारणीभूत आहे. मैद्याचा मेदाशी डायरेक्ट संबंध आहे होय ? (ब्राऊन ब्रेड प्रेमी) चिगो..

In reply to by चिगो

तिमा Sun, 02/06/2011 - 10:38
चिगोराव, तुम्ही ब्राऊनब्रेडप्रेमी असं लिहिलाय म्हणून सांगतो. तर हा ब्राऊन ब्रेड बनवण्याच्या पध्दतीत पण भेसळ शिरलीये. मैद्याचाच ब्राऊन ब्रेड करुन त्यात ब्राऊन कलर यावा म्हणून कॅरामेल घालतात असे नुकतेच लोकसत्तेमधे छापून आले होते.