Skip to main content

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

लेखक अनिता यांनी सोमवार, 24/01/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे. तेव्हा या धाग्यावर पंडितजींना श्रद्धांजली वाहताना तुम्हाला आवडलेले त्यांचे गायन / गाणे इत्यादि आणि त्याबद्दल चार शब्द येऊ द्या. या निमित्ताने त्यांच्या गायनाद्वारे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. - मिसळपाव संपादक मंडळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18730
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ते इथून गेले, पण "God's Own Voice" कायम आपल्यात आहे आणि तो तसाच आपल्यात राहील. पुन्हा एकदा श्रद्धांजली.

In reply to by स्पा

:| खूप दिवसांपासून आजारी होते ते.... पुण्यात सह्याद्री'ला अ‍ॅडमिट होते.... काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.... पण बहुधा "दिवा विझायच्या आधी त्याची वात अंमळ मोठी आणि प्रखर होते"... असंच काहीसं होतं ते!... दुर्दैवाने.... पुण्यातील प्रतिष्ठेचा "सवाई-गन्धर्व महोत्सव" हा पंडित भीमसेन जोशींनी त्यांच्या गुरुंच्या-म्हणजे सवाई-गंधर्वांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू केला... बहुधा १९५२ साली! ________ पन्डित'जींना भावपूर्ण श्रद्धांजली.. *~*~* जुन्या पिढीतला अजून एक 'संगीत तारा' निखळला.... मिले सूर मेरा-तुम्हारा.... तो सूर बने हमारा!. . .

ज्या प्रभूतिंच्या आशिर्वादाने मिपा चालू झाले... त्यांच्यापैकी एक पंडीतजी होते. मिपाचे दैवत होते स्वरभास्कर. सवाई पोरका झाला... मिपाही पोरके झाले. अवघा महाराष्ट्र पोरका झाला.. ....

एक असामान्य गायक गेला. अभंगवाणी आता मुकीच झाली जणू. भारतरत्न भिमसेन जोशींना भावपुर्ण श्रध्दांजली

पु.लंच्या तोंडी असलेला हा एक सुंदर अभंग. कितीही वेळा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेवांचे कित्येक अभंग/ओव्या ह्या केवळ भीमसेन जोशींनी गायलेत म्हणून लोकांना शब्दन शब्द आठवतात. एक थोर गायक हरपला. माझी श्रद्धांजली.

स्वरभास्कर भीमसेनजींना भावपुर्ण श्रद्धांजली ! :( आपल्या जादुई स्वरांनी लाखो जणांचे जीवन समृद्ध करणार्‍या पंडितजींच्या आत्माला परमेश्वर चिरशांती देवो हीच प्रार्थना. - छोटा डॉन

बहुधा तुकारामानी अंभग अण्णांच्या साठीच लिहले होते.अंभग व अण्णा ह्याचे एक अतुट नाते तयार झाले आहे.

नि:शब्द! संगिताच्या तिर्थक्षेत्रातील विट्ठलच आज हरपला! पंडितजींचा दैवी स्वर्गिय स्वर जगात चिरंतन राहिल.

नि:शब्द! संगिताच्या तिर्थक्षेत्रातील विट्ठलच आज हरपला! पंडितजींचा दैवी स्वर्गिय स्वर जगात चिरंतन राहिल.

पंढरीच्या विठ्ठलाला आपल्या कमरेवरचे हात खाली आणायला लावेल असा आवाज होता त्यांचा, त्या स्वरभास्कराला माझा सादर प्रणाम व विनम्र आदरांजली. हर्षद.

बजे सरगम हर तरफसे गूंजे बनकर देस राग ..किंवा मिले सुर मेरा तुम्हारा.. यांच्या ओपनिंग लाईन्सच पं. भीमसेन जोशींच्या आवाजात सुरु झाल्या होत्या आणि त्या दमदार आवाजाने पुढच्या सर्व आवाजांना फिके पाडले. आजही मिले सुर मेरा तुम्हारा आठवलं की पंडितजींचा तो चेहरा आणि सळसळत वळणारा आवाज आठवतो. सूर पायांशी दास होऊन बसणे म्हणजे काय याची उदाहरणं खूप खूप थोडी असतात. पंडित भीमसेन जोशी हे त्यातले एक आणि अग्रणी. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना असे स्वर्गीय सूर ऐकवण्यासाठी ते नवा आवाज घेऊन परत येवोत. पुनर्जन्म ही कल्पना खरी असावी अशी इच्छा अशावेळी होते.

अभंग आणि 'मिले सूर' मुळे माझ्यासारख्या संगितातील काहीही समजत नसलेल्याच्या मनात पंडीतजींचा आवाज पक्का नोंदला गेला.

In reply to by सर्वसाक्षी

आत्ता स्वतःशी मिले सुर मेरा तुम्हारा गुणगुणून बघा. इतर कोणाचा टोन तुमच्या आवाजात येणार नाही. तुम्ही पंडितजींच्या हावभावाने ते म्हणाल आणि त्यांचाच गाणारा त्या सुराशी पूर्ण एकरूप झालेला चेहराच तुम्हाला दिसेल. त्याच व्हिडीओत पुढे असलेल्या असंख्य नटनट्या खेळाडूंपैकी कोणाचा नाही दिसणार. मिले सुर म्हणजे पंडित भीमसेन जोशीच..

सखी मंद झाल्या तारका हे बाबुजींच्या स्वरातील गाणे पंडितजींच्या आवाजात ऐका!
Get this widget | Track details | eSnips Social DNA

शेवटी देवालाही त्यांची अमृत वाणी ऐकण्याचा मोह आवरला नाहीच... त्या स्वरभास्करास आदरांजली. त्यांच्या अजरामर गाण्यांनी अण्णा सदैव आपल्यातच रहातील.

'भाग्यदा लक्ष्मी..' मधील सुरुवातीचा भाग्यदाचा 'आ' कार डोक्यात व्यापून राहिलाय..! तो कधीही जाणे नाही...........

भावपूर्ण श्रद्धांजली !!! स्वर्गीय आवाजाचा स्त्रोत काळाआड गेला... जाता पंढरीसी, ज्ञानियांचा राजा,आरंभी वंदीन्,जे का रंजले गांजले,काया ही पंढरी,माझे माहेर पंढरी,जो भजे हरी हरी को सदा... किती आणि काय ऐकावे. शब्दच नाहीत...

एक जीता जागता यमनअसंख्य श्रोत्यांच्या मनात एक आर्त विराणी मागे ठेऊन गेला. भागपूर्ण श्रद्धांजली

स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन. त्यांच्याबद्दल काय लिहू? त्यांना जवळून पाहण्याचे भाग्य लाभले होते. आता फक्त त्यांच्या आठवणी आणि त्यांचे स्वर बाकी आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ___/\___

घरातलंच कोणीतरी गेल्यासारखं वाटलं.... इंद्रायणी काठी, देवाची आळंदी। लागली समाधी ज्ञानेशाची॥

खूप आठवणी आहेत अण्णांच्या. त्यांचं गाणं, त्यांचा लाभलेला सहवास.. सर्व काही खूप सुख-समाधान देऊन गेलं. आता फक्त आठवणी आहेत.. पोरकेपण आलं एवढं मात्र निश्चित.. अजून बरंच काही लिहिण्यासारखं, परंतु या क्षणी शब्द नाहीत.. अण्णा, आठवण असू द्या आमची.. तुमचाच, तात्या.

भावपुर्ण श्रद्धांजली... आम्ही पामर त्या सूर-सूर्याबद्दल काय बोलणार.. अण्णा, या पुन्हा.. आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा अभंगाची गोडी आणि सुरांचे माधुर्य यावं म्हणून तरी, याच..

गदिमांचे शब्द, पुलंचं संगीत आणि स्वरभास्कराचे दिव्य स्वर असा त्रिवेणी संगम असलेला अभंग आज अमर झाला. त्या त्रिमूर्तीतली शेवटची मूर्ती अंतर्धान पावली आणि आपण पोरके झालो... (साश्रु)रंगा

पंडितजींचा जवळचा सहवास मला लाभला नाही, की त्यांच्या कारकीर्दीचा ऐन जवानीतला काळही पाहायला मिळाला नाही. ऐकल्या त्या फक्त तबकड्या आणि कॅसेट्स, आणि त्यांना पाहिलं ते फक्त शेवटची काही वर्षं सवाई गंधर्व महोत्सवात ते एखादा तासभर यायचे तेव्हा. आज मात्र माझ्यासाठी त्यांची माझ्या लहानपणी 'टीव्हीवर मिले सुर मेरा तुम्हारा गाणारे आजोबा' ते 'स्वरभास्कर' अशी बदलती ओळख मनात तरळून गेली. लक्षात आलं की या माणसानं आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समृद्ध केलं. वाटलं, विंदांना जसा त्यांच्या स्वरात ओंकार भेटला तशी एकतानता त्यांच्या सुराशी आपण साधू शकलो नाही हे आपलं दुर्दैव, पण तो सूर काळीज हलवून मात्र नक्की गेला. आजकाल मनाचा दगड व्हायला वेळ लागत नाही, पण तो तसा होऊ नये हे भान त्या धीरगंभीर षड्जानं सतत दिलं. सालं आपणही आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा त्या वादळी तानांनी आणि मेहनतीच्या, जिद्दीच्या, ध्यासाच्या कहाणीनं दिली. त्यांनी गुरुबद्दलची कृतज्ञता कशी असावी ते आपल्या गुरुचं नाव अजरामर करणारा महोत्सव चालवून शिकवलं. 'मैं तो तुम्हारो दास जनम जनम का' म्हणताना संगीताचे दास कसं राहावं ते सांगितलं. किती किती आणि किती सांगू? येणार्‍या अनेक पिढ्यांनी पुरेल एवढी शिदोरी ठेवून हा स्वरभास्कर निघून गेलाय. आता त्या शिदोरीतलं जमेल तेवढं उचलायचं आणि पचवायचा प्रयत्न करायचा एवढंच हाताशी उरलंय. आणि मनापासून सांगतो, एखादा जवळचाच माणूस असला, की आपण त्याला कधी औपचारिक 'धन्यवाद' म्हणत नाही. पण आज श्रद्धांजलीपेक्षा 'थँक यू अण्णा' असंच म्हणावसं खूप वाटतंय.