मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-३ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

सुधीर काळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-३ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय" मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे © सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने) या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत. एकाद्या उद्दिष्टापर्यंत पोचणे जितके महत्वाचे असते तितकेच तिथे पोचण्यासाठी अवलंबलेला मार्गही महत्वाचा असतो या तत्वावर महात्मा गांधींचा दृढ विश्वास होता. पण ही महात्माजींची ही विचारधारा भारतीय रूढीशी विसंगत असल्यामुळे या तत्वप्रणालीला अनुयायी मिळवण्यात 'नेत्रदीपक' अपयश आले. २००० वर्षांपूर्वी कौटिल्याने लिहिलेल्या "अर्थशास्त्र" या मुत्सद्दीपणावरच्या 'कौटिल्यशास्त्रा'त सत्तेच्या नैतिक अधिष्ठानावर फारच थोडा वेळ खर्चला आहे. याउलट कुठल्याही भल्या-बुर्‍या मार्गाने सत्ता कशी प्राप्त करून घ्यावी याबद्दल रोखठोक शब्दात आणि सहज पटेल असे आग्रही मार्गदर्शन केलेले आहे. सत्ता मिळविणे किंवा असलेली सत्ता वाढविणे यासाठी साम, दाम, दंड आणि भेद असे चार प्रमुख उपाय चाणक्यनीती सुचविते. याखेरीज वेळप्रसंगी कुणाचीच बाजू न घेता कुंपणावर बसण्याचा उपायही चाणक्य सुचवितात. कौटिल्यशस्त्रानुसार देशाच्या राजकारणात आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी लागतील ती योग्य पावले झपाझप टाकणे हे परंपरागत नैतिकतेपेक्षा खूप जास्त महत्वाचे आहे आणि त्यांचे हे मत ते एकाद्या डॉक्टरप्रमाणे अगदी अलिप्तपणे मांडतात. हिंदू धर्मातील देवांमधील सर्वांचा लाडका असलेल्या श्रीकृष्णानेही येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी हजारो वर्षें घडलेल्या कौरव-पांडवांमधील महायुद्धात हाच उपदेश दिला होता. एका महायुद्धाची कथा सांगणार्‍या भारताच्या या अत्यंत श्रेष्ठ वाङ्मयात-महाभारतात-अंतिम परिणामांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा अनेक घटना आहेत. त्याकाळच्या योग्यायोग्यतेच्या निकषावर पाहिल्यास श्रीकृष्णाचे अनेक उपदेश नैतिकतेत नक्कीच कमी पडतात. या युद्धात श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूला होते आणि त्याला कर्णासारख्या पराक्रमी योद्ध्याला कौरवांपासून विभक्त करायचे होते. ते करताना श्रीकृष्णाने कर्णाच्या प्रामाणिकपणाला आवाहन केले नाहीं किंवा त्याला पांडवांचा दावा कसा योग्य आहे हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला नाहीं. त्याऐवजी त्याने कर्णाच्या वैयक्तिक आयुष्यातली एक महत्वाची माहिती वापरून कर्णाचा बालपणापासून मित्र असलेल्या व त्याचा उपकारकर्ता असलेल्या दुर्योधनाबरोबरच्या त्याच्या अतूट मैत्रीची शपथ मोडविली. कर्ण हा कुंतीचा ज्येष्ठ पुत्र होता. कुंतीच्या सूर्यदेवतेबरोबर झालेल्या विवाहाआधीच्या एका शरीरसंबंधातून तिने कर्णाला जन्म दिला होता. हे रहस्य श्रीकृष्णाला माहीत होते आणि त्याने योग्य क्षणी हे रहस्य कर्णाला सांगितले. या बातमीचा त्या तरुण योद्ध्यावर धक्कादायक परिणाम झाला व त्यामुळे कर्णाने नाइलाजास्तव कुंतीला दिलेल्या "केंव्हांही तुझे पाच पुत्र नक्की जगतील" या वराची पार्श्वभूमी तयार झाली. (यात तोही एक कुंतीचा पुत्र होताच!) युद्धादरम्यान पांडवांनी श्रीकृष्णाच्या सुस्पष्ट आणि सततच्या आग्रही उपदेशानुसार कौरवांच्या अनेक श्रेष्ठ योद्ध्यांना मारण्यात यश मिळविले. कौरवांचे गुरुवर्य आणि एक खंदे लढवय्ये असलेल्या द्रोणाचार्यांना धर्मराजाला खोटे बोलायला लावण्याचे कपट करून मारले. धर्मराज सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध होता. श्रीकृष्णाने खोटे बोलण्यासाठी त्याचे मन वळविले. द्रोणाचार्यांचे आपल्या मुलावर-अश्वत्थाम्यावर-अतोनात प्रेम होते. त्याच्या मृत्यूची बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर पडल्यास त्यांची लढण्याची इच्छाशक्तीच संपुष्टात येईल हे श्रीकृष्णाला माहीत होते. अश्वत्थामा नावाचा एक हत्ती युद्धात मारला गेला होता. पण युधिष्ठिराने द्रोणाचार्यांना ऐकू जाईल अशा तर्‍हेने अश्वत्थामा मेल्याचे अर्धसत्य सांगितले. धर्मराजाला आपण असत्य भाषण करत आहोत हे माहीत होते. धर्मराजाबरोबर बोलल्याबरोबर द्रोणाचार्यांनी शस्त्रे खाली ठेवली. अर्जुनाबरोबरच्या युद्धात कर्ण रथातून खाली उतरला व जमीनीत रुतलेले चाक काढण्याचा प्रयत्न करतांना मारला गेला. नि:शस्त्रावर वार करणे हे युद्धाच्या नियमात बसत नव्हते आणि कर्णाने अर्जुनाला हा नियम पाळण्याचे आवाहनही केले. पण तात्काळ मधे पडून श्रीकृष्णाने त्याला सांगितले कीं जे लोक अशा नियमांचे स्वत:च पालन करत नाहींत त्यांच्याविरुद्ध असले रास्त नियम युद्धात पाळून धर्मयुद्ध खेळायचे नसते. कर्ण रथारूढ व्हायच्या आत त्याला मार असा आग्रह श्रीकृष्णाने धरला आणि दुसर्‍या क्षणी कर्णाचे शीर धडापासून वेगळे झाल्याने तो धारातीर्थी पडला. सिंधू राज्याच्या राजाने-जयद्रथाने-अर्जुनाच्या मुलाला-अभिमन्यूला-मारले होते. अर्जुनाने आपल्या मुलाच्या वधाचा सूड म्हणून सूर्यास्त व्हायच्या आत जयद्रथाचा वध करण्याची अन्यथा स्वत:ला जिवंत जाळून घ्यायची शपथ घेतली होती. जयद्रथ दिवसभर लपून बसला होता पण सूर्यास्तानंतर तो विजयी झाल्याच्या डौलात बाहेर पडला. तो बाहेर येताच श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र बाजूला करून सूर्याचा प्रकाश भूमीवर पाडला आणि अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. दुर्योधनाचा वध भीमाबरोबरच्या गदेच्या द्वंद्वयुद्धात झाला. दुर्योधन जास्त चपळ आणि कुशल योद्धा होता. श्रीकृष्ण त्यांचे युद्ध बारकाईने न्याहाळत होता व त्याने अर्जुनाला विश्वासात घेऊन सांगितले कीं भीम असा नियमानुसार लढला तर विजयी होऊ शकणार नाहीं व दुर्योधनाला कपटानेच मारावे लागेल. मग श्रीकृष्णाने दुर्योधनाचा नाजुक भाग-त्याच्या मांड्या-भीमाच्या लक्षात आणून दिला. पण द्वंद्वयुद्धात कमरेखाली प्रहार किंवा वार करणे म्हणजे निषिद्ध होते. आपल्या मांडीवर वार होईल अशी दुर्योधनाला कल्पनाच नव्हती पण भीमाने श्रीकृष्णाच्या आग्रही आणि स्पष्ट सल्ल्यानुसार धर्मयुद्धाच्या नियमांचा भंग करून दुर्योधनाच्या मांडीवर वार केला. कृष्णाचे युद्धात असे अयोग्य मार्ग अवलंबण्याबाबतच्या आरोपासंबधांतले उत्तर फारच मनोरंजक आहे. सर्वप्रथम त्याने युद्धात अयोग्य मार्गाचा अवलंब केला होता हे त्याने मान्य केले. पराक्रमी कौरववीरांचा न्याय्य मार्गाने वध करणे अवघड होते. शत्रू जेंव्हां आपल्याहून बलिष्ट असतो तेंव्हा अशा शत्रूची फसवणूक करणे क्षम्य असते असे प्रतिपादन श्रीकृष्णाने केले. देवांनीसुद्धा असेच आचरण केले होते आणि आपण फक्त त्यांचे उदाहरणच समोर ठेवून पावले टाकत आहोत असा युक्तिवाद श्रीकृष्णाने केला. कौरव अधर्माचे मूर्तिमंत रूप होते व त्यासाठी त्यांचा पराजय करणे जरूरीचे होते. आणि सरळ मार्गाने असा विजय अपेक्षित नव्हता. अशा परिस्थितीत इच्छित परिणाम घडवून आणण्यासाठी सोवळेपणाने योग्य उपाय वापरता आले नसते. त्यावेळी द्वापारयुग नुकतेच संपून कलियुग सुरू झाले होते. कलियुगात शंभर टक्के नैतिकता अवलंबणे नुकसानीचे ठरले असते. "नियती आणि विधिलिखित यांच्या लपंडावात बरोबर काय आणि चूक काय हे इतके सुस्पष्टपणे सांगणे कठीण असते. "कालाय तस्मै नम:" हे वचन लक्षात ठेवून नियतीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नसतो. शेवटी नियती विजयी होते. नियतीसुद्धा गैरमार्गांचा उपयोग करते आणि स्वत:चे अनेक मार्गांनी समाधान करून घेते व त्यातले बरेचसे मार्ग अन्याय्य असतात." असाच सल्ला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. कांहीं वर्षांपूर्वी "महाभारत" चित्रवाणीवर मालिकेच्या स्वरूपात दाखविले गेले. ही मालिका अतीशय लोकप्रिय झाली आणि त्यातून परंपरा आणि पौराणिक कथांचा आपल्या समाजावर आजही किती पगडा आहे हेच दिसून आले. श्रीकृष्णाची भूमिका करणारा नट इतका लोकप्रिय झाला कीं तो लोकसभेवरही निवडून आला. खरे तर श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व इतके अष्टपैलू आहे कीं त्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन केवळ कौरव-पांडव महायुद्धातील त्याच्या संदिग्ध कामगिरीवर करणे चुकीचे ठरेल. त्याची खोडकर 'बालगोपाला'ची भूमिका आणि 'कान्हा' म्हणून सर्व गोपींना मोह पाडणार्‍या प्रियकराची भूमिका यामुळेही तो हिंदूंच्या देवांमधील सर्वात लोकप्रिय देव झाला आहे. पण पांडवांच्या विजयासाठी त्याने केलेल्या भल्या-बुर्‍या कारवाया 'अर्थशास्त्रा'तील चाणक्यनीतीचेच प्रतिबिंब आहेत. अर्थशास्त्र हा एकच असा ग्रंथ आहे असेही नाहीं. महाभारतातील 'शांतिपर्व' हे पर्व केवळ राज्यशकट हाकण्याच्या कौशल्याला विस्तृतपणे वाहिलेले असून त्यातील राजनीतीशास्त्राच्या कठोर व्यवहारीपणाच्या निकषावर फारच थोडे इतर ग्रंथ त्याच्याशी स्पर्धा करू शकतील. नैतिक सत्तेला निःसंदिग्ध सर्वश्रेष्ठता देणारी आणि कुठेही वापरता येईल अशी कुठलीही बंधनकारक आचरणसंहिता हिंदुधर्मात नाहीं. भारताचे स्वतःचे असे कुठलेच 'स्वदेशी' नीतिशास्त्र नाहीं[१]. भारतीय नीतिशास्त्राने चांगल्या किंवा वाईट कृत्यांमधील फरकापेक्षा चांगल्या-वाईटाच्या पलीकडील गूढ अशा अंतिम सत्याच्या आकलनावर भर दिला आहे. 'धर्म' हा ज्याची काटेकोरपणे व्याख्या करता येईल असा धर्म नसून तो एक क्षणभंगुर असे आदर्श उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट इतके तरल आणि सूक्ष्म आहे कीं त्या उद्दिष्टाला 'दगडावरली रेघ (पत्थरकी लकीर)' म्हणता येणार नाहीं. प्रामणिकपणाचे मूर्तिमंत प्रतीक असलेला युधिष्ठिरच महाभारतात एके ठिकाणी असे सांगतो. आपण रोजच्या जीवनात ज्याला 'योग्य आचरण' म्हणतो त्यात हिंदू धर्म लक्षणीय मोकळीक देतो. एकादी व्यक्ती जर स्वधर्मरक्षणासाठी, स्वजातीच्या किंवा स्वतःच्या समाजातील स्थानासाठी कांहीं करत असेल तर त्याने केलेली कृत्ये कधीच चुकीची मानली जात नाहींत! समाजातील स्वतःच्या स्थानाच्या रक्षणासाठी 'आश्रमधर्म' या नात्याने जी पावले तो टाकत असेल त्याबद्दल त्याला जबाबदार धरता येणार नाहीं, स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी-कुलधर्मासाठी-केलेल्या आचरणात त्याने मर्यादेचे उल्लंघन केलेले असले तरी त्याला शिक्षा करता येणार नाहीं आणि शेवटी आपत्तीत किंवा आणीबाणीच्या प्रसंगी त्याने केलेली कुठलीही कृत्ये त्याने 'आपत्धर्म' म्हणून संकटकाळी केलेली असल्याने हिंदुधर्म त्याचे समर्थनच करतो. हिंदू परंपरेने नैतिक अनिवार्यतेच्या संदर्भात सोयिस्करपणे विभागलेल्या प्रतिक्रिया देण्यास नेहमीच परवानगी दिलेली आहे हाच मूळ मुद्दा होय. त्यात बरोबर आणि चूक यांची काटेकोर सर्वमान्य व्याख्या कुठेच नाहीं. इष्ट अंतिम परिणाम हेच ध्येय नजरेसमोर असल्यामुळे नैतिकतेची कास सोडली नाहीं तरी तिचे व्यावहारिक दृष्टीकोनातून अवमूल्यन नक्कीच केले जाते. हिंदू आचारसंहितेत नियम असलेला 'धर्म' हा नमुना म्हणून सर्वांना दाखवायचा चेहरा आहे आणि व्यावहारिक नियमांचे एक खासगी शहाणपणही आहे. धर्माला हिंदू लोक 'अंगिकारण्याची तत्वे' म्हणून स्वीकारतात आणि तर व्यावहारिक नियमांना कांहींतरी मिळविण्यासाठी अवलंबतात. याचा परिणाम होतो हिंदूंच्या व्यवहारातील सापेक्षता, कुठल्याही गोष्टीकडे पहाण्यातील लवचिकता किंवा एकाद्या मोठ्या उद्देशासाठी कर्मठपणात जरूर ती काटछाट करण्याची तयारी! समाजातले आपले स्थान, आपली सत्ता आणि आपली श्रीमंती या निकषांवर मापलेले आपले यश हे सर्वात महत्वाचे! यश हे नैतिक चोखंदळपणापेक्षा केंव्हांही श्रेष्ठ! याविरुद्ध अपयश म्हणजे नैतिक विटंबना! कारण अपयश म्हणजे वाया गेलेले प्रयत्न, अक्षम्य वंध्यत्व, हुषारीचा आणि कल्पकतेचा अभाव आणि व्यावहारिक शहाणपणाची कमतरता! मला मी लहानपणी ऐकलेली एका राजाची आणि त्याच्या प्रधानाची लोकप्रिय गोष्ट आठवते. राजाला वांगी खायचा कंटाळा आला होता. एके दिवशी त्याने आपल्या प्रधानाला सांगितले कीं वांगे ही एक निरुपयोगी भाजी आहे. प्रधानाने ताबडतोब ते मान्य केले आणि त्याने बिचार्‍या वांग्यावर टीकेची अशी कांहीं झोड उडविली कीं राजाला वाटले कीं त्याचे मत खरोखरच बरोबर होते. कांहीं दिवसांनंतर राजवैद्यांनी राजापुढे वांग्यामुळे होणार्‍या वैद्यकीय सुपरिणामांचे वर्णन केले. झाले! राजेसाहेबांनी आपल्या प्रधानापुढे वांग्यांच्या गुणांचे कौतुक करून वांगी खाण्यास उत्तेजन द्यावे असे सांगितले. यालाही प्रधानाने संमती दिली आणि वांगे हे सर्व भाज्यांचा बादशहा असल्याचे त्याने जाहीर केले. प्रधान वांग्याची अशी स्तुती करत असताना अचानक राजाला प्रधानाने आधी केलेली वांग्यांची निंदा आठवली. त्याने रागावून प्रधानाला विचारले कीं तो अशी परस्परविरोधी विधाने कशी काय करू शकतो? प्रधानाने दिलेले उत्तर जणू पिढ्यान् पिढ्यांच्या ज्ञानाचा कोळून काढलेला अर्कच होते! ते म्हणाले. "महाराज, मी तुमचा नोकर आहे, वांग्याचा नव्हे. वांग्याच्या बाजूने आणि तुमच्याविरुद्ध बोलून मला काय फायदा होणार आहे?" कधी-कधी अशा लोककथा एकाद्या सुंदर भाषेत लिहिलेल्या सिद्धांतापेक्षा खूप सोप्या शब्दात सत्यतेचे स्पष्टीकरण देतात. राजाच्या होकारात होकार मिसळताना नैतिकदृष्ट्या आपले कांहीं चुकत आहे असे प्रधानाला कधीच वाटले नाहीं. कारण त्याचे हे अनैतिक मत त्याच्या व्यवहारी दृष्टिकोनावर आधारित होते कीं त्याला त्याच्या योग्यायोग्यतेवरील विश्वासापेक्षा त्याच्या स्थानमहात्म्यामुळे मिळणारी सत्ता जास्त महत्वाची वाटत होती. हा गोंधळरहित स्पष्टपणा सहज समजण्यासारखा आहे कारण बहुतेक सर्व भारतीय त्यांच्या खासगी श्रद्धा-समजुतींना त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आड येऊ देत नाहींत. हिंदू धर्मात अशा निरपवाद नैतिक आज्ञा (absolute moral commandments) नसल्यामुळे आकलनातील चूक, अविद्या, शिक्षापात्र असते. आणि या लोककथेतील राजासारख्या उघड-उघड दिसणार्‍या सत्तेच्या केंद्रबिंदूशी एकमत न होणे हा अविद्येचा कळसच समजला जाईल. टिपा: [१]India has no developed indigenous ethical system

वाचने 4431 वाचनखूण प्रतिक्रिया 11

रणजित चितळे 17/01/2011 - 10:00
काळे साहेब आपले विचार मला नेहमीच आवडतात. मग आपण भाषांतरीत केलेले हे पुस्तक वाचून आनंद झाला. मी हे पुस्तक वाचेन. पुस्तकाचे नाव वाचून मला मागे मी राष्ट्रव्रताची संकल्पना मांडली होती त्याची आठवण झाली. छान आढाव आहे व बंगळुरला (इंग्रजी असल्या मुळे) पुस्तक मिळेल व त्यामुळे वाचन होईल.

In reply to by रणजित चितळे

सुधीर काळे 17/01/2011 - 11:05
धन्यवाद, चितळे-जी! सवडीने तुमचे ब्लॉग्ज वाचेन व त्यावर तुम्हाला लिहीन.
सुधीर काका तुम्ही परिच्छेद वाढवा जमलं तर... वाचायला सोप्पा पडेल... प्रयत्न करतोय समजून घेण्याचा :) थोडं इंटरेस्टिंग वाटतंय

रणजित चितळे 17/01/2011 - 13:26
वांग्या वरुन काळे साहेबानी सांगीतलेली गोष्ट. तीच हिंदी मधून www.patrika.com वरुन अशी आहे. गोष्ट तीच पण हिंदी मधून. बैंगन व बेगुन ह्या वर मजेदार कोटी आहे बादशाह ने कभी बैंगन की सब्जी न खाई थी। उसने एक दिन बैंगन की सब्जी खाई। बैंगन तो फिर बैंगन था, पर खानसामे का हुनर था कि बादशाह को सब्जी बेहद पसंद आई और वह सब्जी के कई कटोरे सटासट सूत गया। बादशाह ने बीरबल के सामने बैंगन की तारीफ के पुल बांधे। बीरबल ने भी सुर में सुर मिलाते हुए कहा "हुजूर बैंगन तो बादशाह है सब्जियों का, जिसके सिर पर खुदा ने ताज रखा है। अहा! क्या चमकदार बैंगनी रंग होता है उसका। बैंगन का जादू देखिए कि कभी गोल तो कभी लंबा होता है।" बादशाह के हुक्म से रोज बैंगन पकने लगा और हमेशा राजा खाने लगा। रोज खाए जा रहे बेगुन ने बादशाह के पेट में अपना कमाल दिखाया और बादशाह का पेट दु:खने लगा। हकीम साहब को पता चला तो उन्होंने बैंगन के नाम हजार लानतें भेजते हुए बादशाह को बैंगन न खाने की सलाह दे डाली। बीरबल, जो वहीं मौजूद था, फौरन बोला कि "हुजूर बैंगन तो दुनिया की सबसे घटिया सब्जी है। इसीलिए बेगुन कहलाता है। ऎसी घटिया सब्जी जिसने हुजूर के लिए बनाई, उसका सिर कलम करवा दीजिए।" बादशाह हैरान होकर बोला, "मगर बीरबल उस दिन तो तुम बैंगन की शान में कसीदे काढ़ रहे थे।" बीरबल मुस्कराकर बोला, "बजा फरमाते हैं हूजूर। बंदा बैंगन का नहीं, आपका गुलाम है।"
हिंदू आचारसंहितेत नियम असलेला *धर्म* हा नमुना म्हणून सर्वांना दाखवायचा चेहरा आहे आणि व्यावहारिक नियमांचे एक खासगी शहाणपणही आहे.
:) पूढील भागाच्या प्रतीक्षेत.

शेखर काळे 18/01/2011 - 04:09
'हिंदू' किंवा 'सनातन' धर्मात (शब्दशः) दगडावर कोरलेले नियम नसल्यामुळे जेव्हा अब्राहामिक धर्मांशी तुलना होते, तेव्हा भारतिय धर्मांचा खुलेपणा ऊठून दिसतो. पण हाच खुलेपणाचा बाहेरून आलेल्या धर्मप्रचारकांनी फायदा ऊठवून लबाडीने स्वतःच्या धर्माचा प्रसार केला.

In reply to by शेखर काळे

सुधीर काळे 18/01/2011 - 07:35
अगदी खरे आहे. आपल्या धर्मातच नव्हे तर एकंदर भारतीय मानसिकतेच (psyche) "आ-बैल-मुझे-मार" प्रवृत्ती भरपूर प्रमाणात आहे!