Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रा on Mon, 01/10/2011 - 22:31
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली. स्त्रियांच्या मुक्ततेचा प्रश्न हा सर्व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या समाजाच्या दृष्टीने नेहमीच थोडा टिंगलीचा, थोडा टवाळीचा तर कधीकधी अतिशय गंभीर असा ठरला आहे. मुळात मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणण्याचे कारण असे की एका पीडीत अशा व्यक्तीची ती स्त्री आहे म्हणून पीडीत आहे, आणि म्हणून तिची सुटका करावी, हा विचार मध्यमवर्गियांनीच महत्त्वाचा समजला आहे/असावा. या प्रश्नांकडे अभ्यासक म्हणून बघण्याची गरज मध्यमवर्गानेच जाणली असावी, असा माझा समज आहे. तरी हे प्रश्न मात्र मध्यमवर्गाच्या पलिकडले, सगळ्याच समाजांना, समाजातील सगळ्याच स्तरांतील लोकांचे आहेत. मी ज्या गावात वाढले, तेथे कुणबी, ब्राह्मण, कायस्थ आणि मुसलमान अनेक वर्षे राहत होते. ब्राह्मण कनिष्ठ मध्यमवर्गीय अधिक होते, कायस्थ हे त्यामानाने सुखवस्तू, शिकलेले असत आणि मुसलमान कारागीर अधिक होते. याउलट कुणबी विशेष करून लोणावळ्याकडील भागातून वसतीला आले होते, आणि लहान लहान "बेडी" करून राहत असत. हे सांगण्याचे विशिष्ट कारण असे, की या जातींप्रमाणे आणि आर्थिक स्तराप्रमाणे स्त्रियांवरील बंधने कमी-जास्त होती. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. तसेही 'अर्थ' सारख्या चित्रपटांमधून कथेतील पुरुषाच्या आजूबाजूच्या सर्व स्तरातील निम्न, मध्यमवर्गीय आणि यापेक्षा उच्चस्तरीय आणि वरवर पाहता मध्यमवर्गीयांच्या सोवळ्या बंधनांमधून मुक्त स्त्रियांचेही प्रश्न असतात त्यांची झलक दिसलीच होती. त्यावेळी साम्य लक्षात आले नाही, पण जशी मी मोठी झाले तशी माझ्या आजूबाजूला असलेल्या घरांमधली स्त्रियांबद्दलची अ‍ॅपथी, थोडेसे दुर्लक्ष, थोडीशी हात झटकून टाकण्याची भावना दिसायला लागली. माझ्या माहेरी कामाला येणारी बाई लग्न होऊन आमच्या वाडीत आली, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या सत्यनारायणाला गेलो होतो ते आजही आठवते. तिची सासू वर्षानुवर्षे आमच्याकडे कामाला होती. तिच्या सुंदर आणि शालीन अशा त्या सुनेला लग्न करून आणल्यानंतर त्यांच्या घरी प्रसाद देताना पाहिल्याचे मला आजही जसेच्या तसे आठवते. पण नवरा व्यसनी झाला, लवकर गेला, त्याच्यामागे चार मुलांचा सांभाळ करण्यात तिचे आयुष्य कसे जाते आहे हे आम्ही पाहत होतो, पण थोडीफार पैशाची मदत आणि तिच्या मुलांच्या शिकवण्या याखेरीज आम्ही फार काही केले असे वाटत नाही. आता तिचे स्वतःचे घर आहे, मुले बर्‍यापैकी नीट शिकली, पण तिने खूप भोगले आहे/असावे. अजूनही चार घरची कामे सोडू शकत नाही, हेही तिचे वास्तव आहे. ज्या स्त्रिया तिच्याएवढ्याही नशीबवान नव्हत्या, त्यांना नवर्‍याच्या मृत्युनंतर घर सोडावे लागले, त्यांच्याबद्दल काहीबाही ऐकू येत असे. लहानपणची माझी खेळण्यातली मैत्रिण तिच्या बहिणीच्या बाळंतपणातल्या निधनानंतर सोळाव्या वर्षी लग्न होऊन तिच्याच मेव्हण्याला दिली गेली. माझ्या मुसलमान मैत्रिणीच्या घरातली अगदी थेट हीच कथा. तेव्हा आम्ही चौथीत असू. अकरावीतल्या तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीला अपघाती निधन झालेल्या बहिणीच्या पंचवीशीतल्या नवर्‍याच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिली तेव्हा वाटलेले आश्चर्य अजून आठवते. आमच्या घरी शिक्षण होते, घरदार व्यवस्थित होते. तरी कुठे फारशी स्त्री मुक्त होती? अर्थात पुरुषही मुक्त नव्हते. नोकरीला बांधलेले होते. पण घरातल्या स्त्रियांचा दिवस हा पहाटे चारला सुरु होई आणि रात्री अकराला मावळे. चार वाजता उठून करायचे काय तर आंघोळी करून सर्वांचे डबे, मुलींच्या वेण्या, आणि तयारी. दहाला परत थोडी सुटका झाली, तरी बारापर्यंत सकाळी शाळेत गेलेली मुले घरी येण्याची वेळ व्हायची, मग त्यांची जेवणे, अडीच तीनच्या सुमाराला दुपारची थोडी झोप आणि परत चार वाजल्यापासून संध्याकाळची तयारी. उन्हाळ्यात उन्हाळ्यातली कामे - वाळवणे घालणे, वर्षभराच्या तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवायचा (हा काय प्रकार होता, तो जे केले आहे त्यांनाच कळेल. तांदूळ दोन हातांमध्ये घ्यायचा आणि पांढर्‍या पावडरने भरलेले हात घासून ती त्या तांदळाला चोळायची. असा वर्षभराचा तेरा-चौदा माणसांना लागेल एवढा तांदूळ आमच्या घरी उन्हाळ्यात यायचा), डाळींना उन्हे द्यायची, पापड, लोणची, मिरगुंडे, बटाट्याचा वर्षभरच्या उपासांना पुरेल एवढा कीस घालायचा, चिकवड्या-कुरड्या इ. इ. दहा कामे असत. ही कामे करण्यासाठी आम्ही मदत करत असू, पण मुख्य काम बायकांचेच. ती झाली की महिनाभर विश्रांती, माहेरी जाण्याची चंगळ असे. तेवढे झाले की परत जूनच्या पहिल्या आठवड्यात घरी. शिवाय एकत्र कुटुंबांमधील रुसवे-फुगवेही असत. या सगळ्या धबडग्यात नवर्‍याबरोबर चित्रपटाला जाण्यासारखी हौस तरी भागवायला वेळ कुठे होता? पुढे मी जेव्हा नवर्‍याकडून सासू-सासरे एकत्र चित्रपटांना जायचे हे ऐकले तेव्हा आठवले की आईबाबा दोघेच मिळून एकत्र चित्रपटाला गेले आहेत असा केवळ एक दिवस मला आठवतो. तेव्हा आईला झालेला आनंद आठवतो. माझ्या घरातल्या इतर स्त्रियांचीही कथा याहून काही फार वेगळी नव्हती. असे वाटते की या बायकांनी आपल्या जाणत्या आयुष्यातील खूप वेळ हा आपल्याला दिला, घरच्यांच्या सन्मानासाठी, पाहुणे-रावळ्यांसाठी दिला. आता तिला माणसांची ऊठबस करण्याचा फार कंटाळा येतो, इतका की कधीकधी मला तिच्या कंटाळ्याचा कंटाळा येतो. पण कधीतरी विचार करताना असे वाटते की तो कंटाळा येण्याचा तिला हक्क आहे. तो तिच्या वेळेवरचा तिचा अधिकार आहे. तो कसाही, तिला हवा तसा घालवण्याचा अधिकार तिला आहे. मुळात स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, की त्यावर वेगळे काय बोलणार असे कधीतरी वाटते. कधी वाटते की आपली एवढी पात्रता नाही. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्‍याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. स्त्री-मुक्ती चळवळीची उपेक्षा होते, त्यांचा अजेंडा कसा चुकीचा, एकांगी आहे हे खरेखोटे दळण आपण नेहमीच दळत असतो. मराठी लेखक आणि लेखिकाही एकेरी, कंटाळवाण्या कथा लिहून समाजातील विसंगती दाखवत राहतात. पण हे असे सतत कंटाळवाणे काहीतरी कथा-कादंबर्‍या-लेखांमधून दाखवणारे भले मूर्ख, एकांगी असतील, पण आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?
  • Log in or register to post comments
  • 29803 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Tue, 01/11/2011 - 22:47

In reply to शत्रू by नितिन थत्ते

Permalink

पॉवर पॉलिटिक्स

मुक्ती म्हणजे स्त्री-पुरूष यांच्यात लिंगसापेक्ष भेद नसणे या अर्थी समता असणे असे मानून, स्त्रीच स्त्रीची शत्रू यातील वैमनस्यभाव खोडून काढताना कुटुंबातले पॉवर पॉलिटिक्स हे मान्य केले, तर त्या कुटुंबातील संदर्भचौकटीत स्त्रीमुक्तीची गरज संपत तर नाही? कारण असा सत्तासंघर्ष करू शकणारी स्त्री सक्षम आहे, असेही म्हटले जाऊ शकेल. रादर, अनेकदा आदिवासी समाजाची उदाहरणे भोळसटपणे देताना असे दाखले येतातही. मुळात, 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' यातील शत्रू हा शब्द रूढ अर्थाने (वैमनस्यभावी) वापरलेला आहे का? की तो एक प्रकारे रुपकाच्या स्वरूपात योजला आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 01/11/2011 - 23:05

In reply to पॉवर पॉलिटिक्स by श्रावण मोडक

Permalink

संघर्ष

>>सत्तासंघर्ष करू शकणारी स्त्री सक्षम आहे, असेही म्हटले जाऊ शकेल. ती सत्तासंघर्ष करीत नसून सत्तेला आवडणारे वर्तन करत असल्याचे दर्शवून सत्तेशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 01/12/2011 - 00:25

In reply to शत्रू by नितिन थत्ते

Permalink

<<<लग्न करायच्या वेळी "नोकरी

<<<लग्न करायच्या वेळी "नोकरी करणार का?" या प्रश्नाचे अनेक मुलींनी "तुम्ही म्हणाल तसे" असे उत्तर दिल्याचे आठवते. हे नेमकं कशासाठी हे समजलेले नाही...कदाचित चांगला कमावणारा वगैरे मुलगा हातचा जाऊ नये म्हणून असेल... पण जर लग्नाआधीच कोणी असे बंधन घालायला बघत असेल तर लग्नानंतर काय परिस्थिती होईल याचा विचार लोक करत नाहीत....मुलीच्या समाधानासाठी तिने नोकरी केली तर काय हरकत आहे? पण ...मुलाची आई / वडील वगैरे लोक तसेच मुलीकडचे लोक ते सांगतील तसं करचा दबाव आणत असतात...विशेष करून उच्चशिक्षण नसलेल्या मुलीवर...कारण काय? एकतर मुलीला शिकवायला नाही म्हणायचे आणि वर मग शिक्षण कमी म्हणून वाट्टेल ती तडजोड कर म्हणून सांगायचे... सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Wed, 01/12/2011 - 03:49

In reply to <<<लग्न करायच्या वेळी "नोकरी by शिल्पा ब

Permalink

दाद!

सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.
हे आवडले! (तूर्तास एवढेच.)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 01/12/2011 - 02:52

Permalink

समारोप

धन्यवाद, या चर्चेत आपले व्यक्तिगत अनुभव सांगितल्याबद्दल, चर्चा योग्य तर्‍हेने पुढे नेल्याबद्दल सर्वांचे आभार. एकमेकांच्या या बर्‍यावाईट अनुभवांमधूनही आपण बरेच काही शिकत असतो, याबद्दल शंकाच नाही. यशोधरा म्हणते तसा मुक्तता ह्या शब्दावरून माझ्याही मनात काही वर्षे गोंधळ होता. (जन्मतः मुक्त असलेल्या व्यक्तीलाच कसे अजून मुक्त करणार?) पण १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण गुलामीची भावना होऊन ते स्वातंत्र्य मिळवायला वेळ लागलाच. हेच लहान प्रमाणांवर मागासलेल्या जातींचे, समाजांचे आणि त्यातील घटकांचे होत असावे. तेव्हा तुम्ही मुक्ती हा शब्द वापरा, अगर वापरू नका, दुर्बळ घटकांचे सक्षमीकरण ही कल्पना हवे तर म्हणा. अर्थ तोच आहे. समाजापासून (पुरुष, मुले, नातेवाईक, मित्र) मुक्ती, फटकून वागता येणे हा अर्थ नव्हता, असू नये. पण सक्षम होण्याची इच्छा, संधी, आणि त्यासाठी पोषक साधने ही मात्र सर्वांना मिळावी. नगरीनिरंजन म्हणतात ते या दृष्टीने अगदी पटते की "स्त्रीमुक्तीवर चर्चा करणार्‍या स्त्रियांपैकी एकीलाही आपण मुक्त नसल्याचा न्यूनगंड नसेल तर ती स्त्रियांना बळ देण्याच्या गप्पा न करता कोणत्याही दुर्बळ अन्यायग्रस्ताला बळ देण्याचीच भाषा करेल". मी यात फक्त एवढेच म्हणेन की सुरुवात ही ज्याबद्दल प्रीती आहे, मनापासून चीड आहे, अशा गोष्टींपासून झाली तर ती झेपत असावी/पेलता येत असावी. समारोपादाखल - अजूनही समानतेजवळ आपण पोचलो नाही, याबद्दल बहुतेकांना संशय नसावा. केवळ हर्षद यांनी या चर्चेत भाग घेतलेल्या व्यक्तींपेक्षा फारच वेगळे विचार मांडले आहेत असे वाटले. त्यांच्याही आजूबाजूच्या निरीक्षणांबद्दल मला संशय घ्यायचा नाही, पण असे नक्की वाटते की त्यातून चुकीचे निष्कर्ष काढले जात आहेत. काही स्त्रियांच्या वर्तनामुळे किंवा काही विवक्षित प्रकारच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे या चळवळीकडे बघण्याचा दॄष्टीकोन डागाळला, तरी त्यासाठी अशा विचारांनाच चुकीचे किंवा झाले तेवढे परिणाम पुरे असे म्हणणे हे योग्य ठरणार नाही. प्रियालीने मांडलेला विचार - स्त्रीने कुठच्याही वाईट परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याची गरज आहे - महत्त्वाचा आहे. पण हे सर्व करीत असताना आपण जो चाकोरीतला विचार करत असतो तो कधीतरी सोडावा लागेल, त्याचीही तयारी ठेवावी लागेल. कुटुंबसंस्थेचाही विचार नव्याने, वेगळा करावा लागेल. या चर्चेत काहीजण (आणि काही विचार) सहभागी झाले नाहीत याची जाणीव आहे. चर्चा एकाच अंगाने जाते आहे असे काहींना वाटलेही आहे/असावे. अशांनीही आपली मते मांडायला काहीच हरकत नाही/नव्हती.. आता या चर्चेत बरेच प्रतिसाद झाल्याने कोणाला वेगळा काही विचार मांडण्यासाठी नवीन चर्चा सुरू करायची असली तर तीही करावी. परत एकदा सगळ्या प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 01/12/2011 - 09:48

Permalink

हम्म

या संदर्भात एक बाजू मांडणारा वाचनीय लेख येथे http://www.martynemko.com/articles/men-as-be%E2%80%8Basts-burden_id1228
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 01/12/2011 - 10:59

Permalink

चित्राताई फारच संयमित संतुलीत

चित्राताई फारच संयमित संतुलीत लेख. तुमची जशी परिस्थिती होती तशीच माझ्या आईची होती. ऑर्थोडॉक्स एकत्र कुटुंबातून नन्तर विभक्त झाल्यावर आईने शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. माझा एक चुलत भाऊ आणि माझी आई हे एकाच वर्षी बी ए ची परीक्षा देत होते. चुलत भाऊ नापास झाला त्याच्या त्या गोष्टीचे घरातल्या सर्वानी चुलत भावाला दुकानात काम असते म्हणून अभ्यास करता आला नाही हे समर्थन दिले माझ्या आईला काय फक्त घरकामच करायचे होते असे म्हणायचे. माझ्या वडीलानी जमेल तसे आईला प्रोत्साहन दिले. माझ्या पत्नीला मी लग्नानन्तर पोस्ट ग्रॅज्युएट कर म्हणून बरेचदा सांगून पाहिले. तुझा शिक्षणाचा उपयोग कर. पण ती देखील ऑर्थोडॉक्स गुजराती कुटुंबात वाढलेली आहे. तीला स्त्रीने घर संभाळले पाहिजे हे बाळकडू पाजण्यात आलेले आहे. ती स्वतःच त्या कोषातून बाहेर येण्यास तयार नाही. पण माझे नातेवाईक , मित्र वगैरे कोणी घरी आले तर ती त्यांचे आदराअतिथ्य खूप आनन्दाने करते. घरकाम करणे हे कमीपणाचे नाही पण स्वतःच्या हुशारीचा उपयोग न करणे हे योग्य नव्हे. कोणीतरी वर मुलीने केलेल्या जोड आडनावाच्या सहीचे उदाहरण दिले आहे. त्या मुलीने स्वतःची सही बदलायची नाही असे ठरवले असते तर तीचा नवरा फार कुरकुरण्याव्यतीरीक्त फारसे काही करु शकला नसता. पण तीने ठाम नाही संगितले असते तर फारसे काही बिघडले नसते. तिच्या नावाचा निर्णय नवर्‍याला करायला तीनेच परवानगी दिली. आणि स्वतः जोपासलेल्या प्रतिमेला तडा दिला. मुली लग्नानन्तर त्यांचे नाव बदलण्यास का परवानगी देतात? तसे करून त्या स्वतःची ओळख स्वतःच पुसून टाकतात. याबात कस्तुरबा गांधींचे उदाहरण फार बोलके आहे. मिस्टर गांधीनी त्याना मांसाहार करावयास सांगितला त्यानी त्यास ठाम नकार दिली. मिस्टर गांधी फारसे काही करू शकले नाहीत. हे एक साधे उदाहरण. म.गांधी नी त्यावरून एक शिकवण घेतली तुमच्या परवानगीशिवाय तुमचा आत्मसन्मान कोणीच हिरावून घेउ शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Wed, 01/12/2011 - 13:59

In reply to चित्राताई फारच संयमित संतुलीत by विजुभाऊ

Permalink

>>त्या मुलीने स्वतःची सही

>>त्या मुलीने स्वतःची सही बदलायची नाही असे ठरवले असते तर तीचा नवरा फार कुरकुरण्याव्यतीरीक्त फारसे काही करु शकला नसता. थोडीफार कुरबूर हि सभ्य सुसंकृत घरात होत असावी. पण अशी कितीतरी घरे असतील, आहेत (सुशिक्षितांची ही) जिथे विरोध केला की त्या स्त्रीविरुध्द बळाचा वापर होतो. काही उदाहरणे तर जवळच्या माहितीतील आहेत. अशावेळी स्त्रीलाच पडते घ्यावे लागते. निमूटपणे मारहाण सहन करणे हे अयोग्यच आहे पण पोलिसात तक्रार करणे , घटस्फोट मागणे, माहेरी निघून जाणे हे ही प्रत्येक वेळी त्या स्त्रीला करणे शक्य होत नाही. ..विशेषतः मुलांची जबाबदारी अंगावर असताना. घरातले वातावरण चांगले रहावे , मुलांसमोर तमाशा नको , म्हणून नवर्‍यांचे राग सहन करणार्‍या स्त्रिया पाहिल्या आहेत. अशावेळी आर्थिक स्वातंत्र्य ही स्त्री मुक्तिची पहिली पायरी ठरावी. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या पायावर उभे रहाणे. सर्व सामन्य पुरूष जशी या बाबतीत तडजोड करीत नाहीत (जसे की आजारी आईवडीलांची काळजी घ्यायची म्हणून पुरषाने नोकरी सोडली) तशीच स्त्रीने देखील करु नये. तसे झाले तरच इतर समस्यां सोडवण्याचे मार्ग आपोआप खुले होतील. किंबहूना तशी व्यवस्था समाजात आपोआप निर्माण होईल.. जसे की डे केअर सेंटर वगैरे. चित्राताई , लेख छानच झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Wed, 01/12/2011 - 17:12

Permalink

संतुलीत लेख व त्यावर झालेली

संतुलीत लेख व त्यावर झालेली चर्चा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Fri, 01/21/2011 - 06:13

Permalink

एकांगी लेख. सोयीस्कर

एकांगी लेख. सोयीस्कर अपवादांचा उल्लेख केला गेला आहे. तसे उलटे अपवादही देता येतील. आदिजोशी यांनी म्हटल्याप्रमाणे "टिपीकल" नवरा हवा असतो पण टिपीकल बायको व्हायची तयारी नसते. तसेच काहींचा स्त्रियांना फक्त काही हॉटेलामध्ये एकटे गेले असता न्याहाळण्यात येते असा गैरसमज झाला आहे. मूळात लोकांनी बघावे यासाठीच फॅशन, नट्टापट्टा, ब्युटीपार्लरच्या वार्‍या केल्या जातात तेव्हा अशी तक्रार करणेच गैर आहे. जर ते खरोखरच इतके नावडते असेल तर आजपर्यंत आलेल्या एकाही लेखातील/ प्रतिसादातील तशा उल्लेखाचा/ कॄत्यांचा कधीही निषेध का नाही केला?
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 01/21/2011 - 10:24

In reply to एकांगी लेख. सोयीस्कर by Pain

Permalink

"टिपीकल" नवरा हवा असतो पण

"टिपीकल" नवरा हवा असतो पण टिपीकल बायको व्हायची तयारी नसते. टिपीकल बायको होण्याची तयारी नसते असं म्हणण्यापेक्षा तसं होणं शक्यं नसतं असं म्हणणं जास्त संयुक्तीक ठरेल. आजकालच्या नवर्‍यांनाच टिपीकल बायको नको असते.. म्हणजे बायकोने घरातली सर्व कर्तव्य करावीतच ( सासू सासर्‍यांची , पतीची सेवा, मुलांचे संगोपन, नातेवाईक, पाहूणे इ. इ. ) पण त्या बरोबर समाजात त्याच्या बरोबरीने सगळीकडे जायला हवे, एखादी कला असेल तर उत्तमच, आणि अर्थार्जनही करावे .. पण तरीही महत्वाच्या सर्व निर्णयांचे सर्वाधिकार पतिकडेच द्यावेत अशा अपेक्षा असतात... त्या पूर्ण न झाल्यास संघर्ष होतो आणि बहूतेक वेळा स्त्रीलाच दोष दिला जातो. तसेच काहींचा स्त्रियांना फक्त काही हॉटेलामध्ये एकटे गेले असता न्याहाळण्यात येते असा गैरसमज झाला आहे. हा गैरसमज नाही .. आणि मुद्दा कोणी कोणाला न्याहळते हा नसून, आजकालच्या सो कॉल्ड मॉडर्न समाजात सुद्धा एकट्या स्त्रीला समाजात वावरताना अनेक बंधने येतात, हा आहे
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com