Skip to main content

मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 03/01/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच समीरसूर याचा आयडियाची कल्पना - फिकी मिसळ हा लेख वाचला.. छान परिक्षण..! हे परिक्षण वाचून काही ढोबळ विचार मनात आले ते खाली उतरवत आहे.. सचिन, महेश कोठारेंबद्दल मला काही बोलायचे नाही..माझ्या मते ते दोघेही सामान्य किंवा अतिसामान्य कुवतीचे आहेत..सचिन स्वत:लाच महागुरू वगैरे म्हणवून घेतो याची मौज वाटते..! :) अशिक सराफ -मूळातला खूप गुणी. निर्विवादपणे एक समर्थ अभिनेता. परंतु तरुण वयातही तो बागेत नट्यांमागनं धावतांना कैच्याबैच दिसायचा... मराठी सिनेसृष्टीला या अभिनेत्याकडून खूप काही करून घेता आले असते..! लक्षा आवडायचा मला.. अतिशय गुणी. परंतु त्याच्याही कलेचे खरे चीज झाले नाही, निर्मात्या-दिग्दर्शकांना ते करून घेता आले नाही हे माझे व माझ्या गुरुजीचे - भाईकाकांचे मत...! अलिकडच्या काळातले अगदी म्हणावे तसे आणि किमान दोन-तीन वेळा पाहावे असे, लक्षात राहण्यासारखे माझे आवडते चित्रपट दोनच - १) ध्यासपर्व २) हरिश्चंद्राची फॅक्टरी. राजाभाऊ परांजपेंसारखी मंडळी कुठे गेली आता...? डॉ लागू, निळूभाऊ, जब्बार, यांचीही खूप उणीव भासते.. मराठी चित्रपटातले आजचे संगीत - मला विशेष आवडत नाही, भावत नाही किंवा समजत नाही असे मी म्हणेन..अर्थात, एखाद दोन काही मोजके अपवाद आहेत.. बाबूजी, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर या सर्वांची खूप म्हणजे खूपच उणीव भासते.. त्यातल्या त्यात आनंद मोडकांकडून अजून खूप काही आशा आहेत.. अजय-अतुल ही मुलं तशी गुणी आहेत.. परंतु त्यांनीही ग्लॅमरमध्ये हरवून न जाता जास्तीत जास्त चांगले काम करावे असे वाटते.. उगाच, 'पी हळद आणि हो गोरा..' असे त्यांचे होऊ नये, जे सध्या होऊ पाहात आहे असे वाटते..! असो.. हे काही फुटकळ विचार. मनात आले ते पटापट उतरवले.. इतरांनीही येथे आपापली, आजच्या व पूर्वीच्या मराठी चित्रपटांविषयी व त्यातल्या संगीताविषयी आपली एकंदरीत मते माडावीत व या धाग्यास एका साधकबाधक चर्चेचे मूर्त स्वरूप द्यावे, ही विनंती.. आपला, (मराठी चित्रपटप्रेमी) तात्या.

वाचने 36963
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by प्रियाली

सगळे मुद्दे पटेश अर्धवटराव

In reply to by प्रियाली

अगदी १००% सहमत. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा बघण्याची फार ईच्छा होती. पण तेव्हा जमलं नाही. आणि मग राहूनच गेलं. मागच्या महिन्यात राजश्री.कॉम वरून बघितला आणि पैसे वाचल्याचा आनंद झाला. सिनेमा प्रेसेंटेबल झालेला असला तरी हिंदीची कॉपी बनवण्याच्या नादात पार वाट लावली आहे. संदिप कुलकर्णी (हाच हिरो आहे ना?) मात्र एक चांगला अभिनेता आहे. अंकुश चौधरी तर मला वाटतं मराठी सिनेमातला एकमेव 'ग्लॅमरस' हिरो आहे. अवांतरः ह्या आणि आणखी कुठल्याशा एका मराठी सिनेमात मी हिंदीतली गाणी पाहिली. मात्र हिंदीत गाणी करण्याचं प्रयोजन काही लक्षात आलं नाही ?

In reply to by मराठे

ह्या आणि आणखी कुठल्याशा एका मराठी सिनेमात मी हिंदीतली गाणी पाहिली. मात्र हिंदीत गाणी करण्याचं प्रयोजन काही लक्षात आलं नाही ?
कारण मी तरी इतक्यात दुसरा कोणता मराठी सिनेमा पाहिला नाही. :( हा बघून पुढले चित्रपट बघण्याची इच्छा झाली नाही. भयंकर प्रकार आहे तो हिंदी-मराठी गाणी. विशेषतः तीन सराईत चोरांना/ खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टिम वर्षभर श्रीमंत उद्योगपती, त्याची पार्टनर, आई वगैरेंचे नाटक करते पाहून विशाद वाटला. असली नाटके करण्याची क्षमता असेल तर पोलिसांचे पगार वाढवा अशी मागणी करायला हवी. ;)

वरती बरीच चर्चा झाली आहे .. म्हणुन पुन्हा काही जास्त बोलत नाहि. अवांतर : वयक्तीक रीत्या , मला मराठी चित्रपट खुप आवडतात.. मी हमखास थेटर मध्ये जावुन बरेच मराठी पिक्चत बघितले आहे. खुप नितळ वाटतात ते मला.. मला हिंदी पिक्चर आवडत नाही असे नाही , मी बरेचस से ते ही खुप आवडिने पाहतो .. परंतु घरात झी टॉकीज ही बर्याचदा लावतोच .. मराठी पिक्चर मधील साधी माणसं खुप काही शिकवुन जातात .. संगीत आनि गाण्यात जे मोकळेपण असते ते खुप भावते ...

उत्तम प्रतिसाद, उत्तम संकलन.. आम्ही टाकलेला धागा सार्थकी लागला.. येऊ द्यात अजूनही.. (आनंदीत) तात्या.

मैत्र+इतर प्रतिसादक यांनी मराठी चित्रपटांची चांगली यादी दिलीय. त्यात भर घालण्यासारखा पतकन आठवलेला चित्रपटः 'नॉट ओन्ली मिसेस राऊत'!! बाकी,
'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.
या अनामिकांच्या वाक्याला हजारदा अनुमोदन. दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो.

In reply to by मस्त कलंदर

नॉट ओन्ली मिसेस राऊत ह्या सुचवणीबद्दल सहमत. त्या रात्री... जरा अतिरंजीत होता हेदेखील मान्य. अमृता सुभाष ह्या अभिनेत्रीच्या अभिनयाबद्दल फारसं बोलु नाही शकणार मी, पण, "दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो." ह्या वाक्यावर मात्र आवर्जुन असहमती नोंदवु इच्छितो. मला वाटतं, आपण त्या व्यक्तिरेखेचा मुळात विचारच करत नाहीये. जाणत्या-अजाणत्या वयाच्या सीमारेषेवर भावाशी, वडिलांशी ताटातूट झालेली असणं, आईचं त्रयस्थ पुरुषासोबत (भले पराकोटीच्या असमर्थतेतुन किंवा नाईलाजातून म्हणा, पण त्या वयाच्या मुलीसाठी ते किती वाईट असेल?) शय्यासोबतीला जाणं, पुढे अशा ताणांमधून व्यसनांच्या आहारी जाणं, आईबद्दलची कुजबुज आजुबाजूला ऐकुन तथाकथित सामाजिक बंधनांची चौकट उबग येऊन तोडण्याच्या रागातून शरीरसंबंधांबद्दल धाडसी होणं, ह्या सगळ्यातून गेलेली व्यक्तिरेखा रंगवताना कोणत्या प्रकारचा अभिनय अपेक्षित असु शकतो? 'लोक बायका ठेवतात, मी पुरुष ठेवते' अशी विधानं करणं...ह्याचाच एक प्रकार वाटतो. दारु/ड्रग्जच्या सेवनानंतर माणूस आपल्यावरचा ताबा ठेवु शकत नाही, त्यावेळी त्याच्या आतला दडलेला खरा माणुस बाहेर येतो ना? मग तो जर रागानं पिचलेला असेल, उद्वेगानं भरलेला असेल तर तो शांतपणॅ कसा व्यक्त होईल? ती व्यक्तिरेखा मुळातच सर्वसामान्य चौकटीत न जगलेली आहे. तिला शालीनतेचे, सभ्यतेचे सार्वत्रिक निकष कसे लावता येतील? दारुचे दोन ग्लास पोटात गेल्यावर तारस्वरात किंचाळत, अरेरावी करत बोलणारे पाहिले आहेत. कित्येक असतील..ते आपण वस्तुस्थिती म्हणुन स्विकारत असु तर पडद्यावर एक मुलगी/बाई अशाच नशेच्या आहारी जाऊन किंचाळली तर ते अति का वाटतं? असो! मात्र, 'त्या रात्री पाऊस होता' ची ३ बलस्थानं आहेत (असं मला वाटतं.) १. सोनाली कुलकर्णी (थोरली हो..धाकटीला आम्ही सोनाली नाही, बाहुली म्हणतो. ;) ) २. सयाजी शिंदे. ३. शिंद्यांनी साकारलेला आबा (आबाच ना? त्या वर्कशॉपवरच्या गड्याचं नक्की नाव आठवत नाहीये आता...) ह्या तिघांसाठी मी आवर्जुन पाहिला हा सिनेमा.

In reply to by धमाल मुलगा

वर्कशॉपवरच्या गड्याचं...
माझ्या मते ते तानाजी उमप!!! चित्रपटातलं त्यांचं नांव आठवत नाही आता..
अमृता सुभाष ह्या अभिनेत्रीच्या अभिनयाबद्दल फारसं बोलु नाही शकणार मी, पण, "दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो." ह्या वाक्यावर मात्र आवर्जुन असहमती नोंदवु इच्छितो.
अशा असहमतीची अपेक्षा होतीच. अर्थात जसं मला माझं मत असू शकतं तसंच ते इतरांना आहेच. असो. माझा मुद्दा असा, की अमृता सुभाषने साकारलेली मुलगी ही सर्वसाधारण व्यक्तिरेखा नाही. पण तेही राग, लोभ, मद, मोह मत्सर असलं जे जे काही असतं ते असणारं एक जिवंत माणूस आहे. हे सगळे इतर पैलू दिसण्यापेक्षा तिचं दारू पिणं आणि किंचाळणंच जास्त दिसतं.
ती व्यक्तिरेखा मुळातच सर्वसामान्य चौकटीत न जगलेली आहे. तिला शालीनतेचे, सभ्यतेचे सार्वत्रिक निकष कसे लावता येतील? दारुचे दोन ग्लास पोटात गेल्यावर तारस्वरात किंचाळत, अरेरावी करत बोलणारे पाहिले आहेत.
खरंय. पण अशा प्रकारचे पिक्चर पाहिल्यावर आपल्याला नक्की काय लक्षात रहावं अशी अपेक्षा असते, आणि हा सिनेमा पाहून काय लक्षात राहातं हाही मुद्दा आहेच. पूर्ण पिक्चरभर तसेच प्रसंग दाखवणं( उठसूट ती ड्रगची सुई हातात खुपसून घ्यायची, किंवा हा ढमका माझा ठोक्या आहे असं म्हणणं) यापेक्षा काही प्रसंग आक्रस्ताळेपणाचे आणि काही तिच्या मनाची संवेदनशीलता, तरलता दाखवणारे असतील, तर त्याची एकूणातली परिणामकारकता वाढते. थोडक्यात 'सटल्टी' नावांच्या प्रकरणाला थोडाफार थारा असावा, नाहीतर शेवटी 'नाना पाटेकर' होतो. याच चित्रपटातला एक प्रसंग, बहुधा शेवटचा प्रसंग आहे तो: 'सुबोध भावेला त्याची आई बेवारशासारखी त्याच्या ऑफिससमोर दोन दिवसांपासून मरून पडलेली आहे हे कळतं'. हा प्रसंग जसा चित्रित आणि अभिनित झालाय, तसे अमृताचे काही प्रसंग रंगवायला हवे होते. चाकोरीबाहेरचे चित्रपट मला आवडतात. हा आक्रस्ताळेपणा टाळला गेला असता तर कदाचित माझी दुसर्‍यांदा हा मूव्ही पाहण्याची हिंमत झाली असती.

In reply to by मस्त कलंदर

>>हे सगळे इतर पैलू दिसण्यापेक्षा तिचं दारू पिणं आणि किंचाळणंच जास्त दिसतं. मला असं वाटतं, की आपल्या चौकटी पक्क्या बांधिव असतात, त्याच्यात हे बसत नसल्यानं आपल्याला ते जास्त ढळढळीतपणे दिसत राहतं आणि तेच डोक्यात राहतं. तसं पाहता, तिचे बाबांसोबतच्या आठवणींचे हळवे क्षण भावाला सांगताना, किंवा आईची अवस्था सांगताना पिळवटून जाणं, आणि पुन्हा 'सेल्फ-मेड' असल्याचा झगा चढवल्यासारखं दुसर्‍या क्षणी तो दु:खी चेहरा लपवून कुर्रेबाजपणा दाखवणं हे ही अगदी नोटेबल आहेच. फक्त आपल्या चौकटीमुळं ते 'पांढर्‍याशेजारी काळा ठेवल्यावर काळा जास्त गडद दिसतो' असं दारु, ड्रग्ज आणि किंचाळणं आठवत राहतं असं मला वाटतं. >>माझ्या मते ते तानाजी उमप!!! येस! उमप..उमप. माय मिश्टेक.
काही प्रसंग आक्रस्ताळेपणाचे आणि काही तिच्या मनाची संवेदनशीलता, तरलता दाखवणारे असतील, तर त्याची एकूणातली परिणामकारकता वाढते
. ते तसे आहेतही. फक्त 'एम्बॉयसिंग'चा प्रश्न येतोय असं माझं मत. >> थोडक्यात 'सटल्टी' नावांच्या प्रकरणाला थोडाफार थारा असावा, सटल्टी? 'त्या रात्री..'मध्ये सगळंच जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न आहे असं जाणवतं. मग अशा व्यक्तीरेखेलाच का सटल्टीचा डिस्काउंट? मला ती शब्दशः वस्तुस्थिती वाटते, कारण अशा आक्रस्ताळेपणाचा बळी असलेल्या व्यक्तीसोबत काही काळ मित्र म्हणून घालवला आहे. काहीही वेगळं चित्र पाहतोय असं वाटलंच नाही. एखाद्या लहान वयात गुन्हेगारीत पडलेल्याशी गप्पा मारताना लक्षात येतं, की त्याच्या गप्पांचा ओघ फिरुन फिरुन 'मी ह्याला कसा बडवला/ मी त्याला कसा कापला' वगैरेवर येतो. एखाद्या विटलेल्या व्यक्तीशी बोलताना, 'माझ्याच नशीबात अशी दु:खं येतात..' वगैरे सूर असतो. तसंच ह्या रस्त्यानं जाणार्‍या मुलीच्या तोंडी सतत 'अमुक माझा ठोक्या आहे' वगैरे येणं फार वेगळं वाटत नाही. बाकी, नशेबाबत प्रत्येकाचे लिमिट्स, मापदंड वेगळे. मी चेनस्मोकर असेन तर सतत माझ्या तोंडात सिगारेट असेल, दारुड्या असेन तर सतत नशेत असेन,ऐपत असेल तर खिशात फ्लास्क घेऊन फिरेन. तसंच तिचे ड्रग्जचे इंजेक्शन्स घेण्याची वारंवारता! कुणाला आठवड्यातून एकदा पुरतं, कुणाला जरा चुणचुण कमी झाली की परत डोस हवा असतो. त्यामुळं ते अतिरेकी का दिसावं ते कळालं नाही. :) अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हे तर आहेच. म्हणुनच आपण बोलु शकतो. :)

चित्र गेल्या ५-६ वर्षात बदलतंय. मराठी चित्रपटसृष्टीत येणं बंद झालेला पैसा परत येऊ लागलाय. त्या आधी ५ लाखात फिल्म करायची १६ मिमि वर, जत्रेत चालवायची, कोपर्‍यात रिलीज करायची आणि पुढच्या फिल्मसाठी १५ लाखाची सबसिडी घ्यायची. मग परत तेच चक्र असा प्रकार खूप जास्त चालत होता. गणितं बदललीयेत. ३५-४० लाखात फिल्म करून त्याची रिकव्हरी तर अगदी सोपी झालेली आहे. बरी गाणी, ठिकठाक स्टारकास्ट, ठिकठाक कथा आणि थोडा चकचकाट/ ग्लॅमर असेल तर १ कोटी पर्यंतची ही रिकव्हरी शक्य झालेली आहे. हे सगळे बदल अक्षरशः ५-६ वर्षात घडलेत. कुठलाही व्यवसाय आधी आर्थिकरित्या सबळ झाल्यावर मगच प्रयोगशील इत्यादी होतो ना. थोडा वेळ लागेल. पण सगळ्या पातळ्यांवर बदल होतोच आहे. हिंदी चित्रपटांशी तुलना करण्यात अर्थ नाही. कारण तिथलं गणित वेगळं आहे. मराठी व्ह्यूअरशिप १ असेल तर हिंदी १० आहे.. हा निव्वळ मराठी भाषिक + मराठी बघणारे आणि हिंदी भाषिक + हिंदी बघणारे यांच्या संख्येतला फरक आहे. तो रहाणारच आहे. तुलना करायचीच असेल तर प्रादेशिक चित्रपटसृष्टींशी करायला हवी. उदाहरणार्थ बंगाली किंवा मल्याळी. आणि ती तुलना करताना प्रेक्षक म्हणून आपलीही तुलना बंगाली वा मल्याळी प्रेक्षकांशी करून बघायला हरकत नाही. चित्रपटसाक्षर प्रेक्षकांमुळे त्या त्या चित्रपटसृष्टींची भरभराट होण्यासाठी मोठा हातभार लागलाय हे विसरून चालणार नाही. निर्मात्यांची/ दिग्दर्शकांची बाजू घेण्यासाठी हे लिहिलेले नाही. पण इथे लिहिणारे बरेचसे प्रेक्षकच आहेत तर त्यांनीही किंचित अंतर्मुख होऊन हा विचार करून पहायला काय हरकत आहे? असो..

In reply to by नीधप

".....चित्रपटसाक्षर प्रेक्षकांमुळे त्या त्या चित्रपटसृष्टींची भरभराट होण्यासाठी मोठा हातभार लागलाय हे विसरून चालणार नाही...." ~ या वाक्यात फार मोठा अर्थ आहे, जो सध्यातरी बंगाली आणि मल्याळी प्रेक्षकांनाच प्रामुख्याने लागू होतो. सत्यजीत रे तर राहू देत, पण ऋत्विक घटक, मृणाल सेन, बुद्धदेव दासगुप्ता, गौतम घोष, ऋतुपर्ण घोष हे बंगाली जादुगार आणि अदूर गोपालकृष्णन, शाजी करुण, जॉन अब्राहम, जी.अरविंदम या मल्याळींनी जी मोहिनी अखिल भारतीय चित्रपटप्रेमीवर घातली आहे, ती पाहता त्या दोन भाषा न कळतादेखील त्या त्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांची फ्रेम न् फ्रेम कशी जिवंत करता येते हे वेळोवेळी दाखविले आहे. आणि यांचे बजेट तर काय असते एका चित्रपटाचे? इंग्रजीत ज्याला "Shoe String" म्हणतात त्याच धर्तीचे....तरीही आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जागतिक पातळीवर (जे काही असेल थोडेफार ते) नाव आहे ते नि:संशय बंगाली आणि मल्याळी चित्रपटांमुळे. [मल्याळी दिग्दर्शक प्रियदर्शन यानी हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील अलिकडे जे स्पृहणीय यश मिळविले आहे तेदेखील लक्षात ठेवले पाहिजे.] कन्नडमधील गिरिश कासारवल्ली, शंकर नाग (फार अकाली गेली ही प्रतिभावंत व्यक्ती), गिरिश कर्नाड ही काही उल्लेखनीय नावे. अशावेळी मराठीकडे नजर टाकल्यास किती असे दिग्दर्शक नजरेसमोर येतील ज्याना संपूर्ण भारत ओळखू शकेल? ~ एकतरी ??? आणि असा दिग्दर्शक इथे नसेल तर त्याला तितकाच जबाबदार इथला प्रेक्षक वर्गदेखील असू शकतोच. तो खर्‍या अर्थाने "साक्षर" होणे गरजेचे आहे. इन्द्रा

In reply to by नीधप

आता गरज आहे ते चांगल्या प्रसिद्धीतंत्राची. हिंदी चित्रपट नुसत्या गाण्यांवर हिट होतात. मराठीत झीचे सोडले तर बाकी चित्रपटांमधील गाणी ऐकूही येत नाहीत. नंतर कुठेतरी सारेगमप किंवा तत्सम कार्यक्रमात ऐकल्यावर मग ही गाणी कळतात. हल्ली वृत्तवाहिन्या काही कार्यक्रमांमध्ये नवीन चित्रपट, मुलाखती वगैरे दाखवतात पण ते किती लोकांपर्यंत पोचतात कोणास ठावूक. नटरंग सारख्या सिनेमांनी प्रसिद्धी मिळाल्यावर चित्रपट चालतो हे दाखवून दिले आहेच. गाणी, प्रोमो या गोष्टींवर पैसे खर्च करण्याची तयारी निर्मात्यांनी दाखवली पाहिजे. - ओंकार.

In reply to by नीधप

. तुलना करायचीच असेल तर प्रादेशिक चित्रपटसृष्टींशी करायला हवी. उदाहरणार्थ बंगाली किंवा मल्याळी. का? तुलना तामिळ वा तेलगूशी का नको? ह्या भाषकांची संख्या साधारणतः मराठी भाषकांशी मिळतीजुळती आहे, तरीही त्यांना हिंदी व्ह्यूअरशिपची अडचण का येत नाही? कुठलाही व्यवसाय आधी आर्थिकरित्या सबळ झाल्यावर मगच प्रयोगशील इत्यादी होतो ना. अगदी! आधी तामिळ-तेलगूसारखा पैसा येऊदे मग बंगाली-मल्याळीची उंची गाठण्याचा विचार करता येईल.

In reply to by नीधप

शेवटी सगळा खेळ आहे तो पैशाच्या डोलार्‍यावर. पण मला एक प्रश्न पडतो, अजुन आपल्याकडं सस्पेन्स, थ्रिलर, अ‍ॅक्शन, कोर्टरुम ड्रामा असे प्रकार एकतर हाताळत नाहीत, किंवा खूपच ढिसाळपणे हाताळले जातात. तर असं का व्हावं? कोकणासारखं निसर्गसौंदर्य हाताशी आहे, त्याच कोकणाच्या पोटात भुताखेतांच्या गोष्टी आहेत..पण वापर मात्र परिणामकारकरित्या करुन घेणं नाही. असं का व्हावं हे मात्र कळत नाही.

२२ जून १८९७ हा एक उत्तम मराठी सिनेमा. १०० वर्षापूर्वीचे वातावरण, भाषा, वेषभूषा सगळे उत्तम. सिंहासन आणि सामना तर प्रश्नच नाही. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. जैत रे जैत: हृदयनाथांचे संगीत आणि मातब्बर गायक गायिकांचे आवाज आहेत. पण आदिवासी ठाकर असली भाषा बोलत नाहीत. ठाकरांची भाषा थोडेबहुत ऐकलेली असल्यामुळे मला हे कायम खटकते. ना.धो महानोरांची भाषा ह्या सिनेमाकरता अगदी चुकीची आहे. पाठलाग आणि पडछाया हे एक चांगले रहस्यपट होते. पण ही परंपरा खंडित होऊन एकाच छापाचे सिनेमे यायला सुरवात झाली. हा खेळ सावल्यांचा हाही एक चांगला भयपट.

In reply to by हुप्प्या

+१ २२ जून, सिंहासन, सामना, शामची आई या सिनेमांमधे ती कथा ज्या काळात ज्या ठिकाणी घडली असेल ते ठीकाण हुबेहुब उभे करण्याची सफाई जी दिसली ती तितकी इतर सिनेमात दिसली नाही. अपवाद अर्थातच आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"...२२ जून...." खरे तर घटना ज्या काळात घडली त्या काळातील वातावरण जसेच्या तसे उभे करणे हे पटवर्धन दांपत्यापुढील मोठे आव्हान होते. दोघेही आर्किटेक्ट असल्याने त्यांनी शूटिंगपूर्वी महिनोनमहिने "काळ उभारणी" साठी जी धडपड केली ती कशी सार्थकी लागली हे श्री.नचिकेत आणि सौ.जयू पटवर्धन यानी वेळोवेळी त्या संदर्भात केलेल्या लेखनामुळे तसेच व्याख्यानामुळे ऐकताना चित्रपटप्रेमी प्रभावित होतो. त्यातही १०० वर्षापूर्वीच्या "पुण्या"साठी "वाई" निवडून चापेकर वाडा असा [जशाचा तसा] काही उभा केला आहे त्याबद्दल त्याना वंदनच केले पाहिजे. अनेक स्त्री पात्रे आहेत चापेकरांचे घरचे वातावरण दाखविण्यासाठी....पण एकाही पात्राला एका ओळीचाही थेट संवाद नाही, हे एक दिग्दर्शकद्वयाचे नेमकेपणाचे वैशिष्ट्य....दामोदरपंतांना आरोपाखाली नेण्यासाठी इन्स्पेक्टर ब्रुईन (की ब्रेविन?) घरी येतो आणि त्याना घेऊन जाताना दामोदर चापेकरांची पत्नी पाण्याचा पेला देताना 'शेवटची' अशी एक नजर पतीकडे टाकते, ते अबोल दृश्य अंगावर शहारे निर्माण करणारेच आहे. सर्वच पात्रांची अचूक निवड हेदेखील २२ जूनची एक जादाची गुणवत्ता.... मुख्य तर राहू दे, पण अगदी 'हवालदार रामा पांडू' देखील. पुणे विद्यापीठ आणि गणेश खिंडीचीही बांधणी आणि चित्रीकरण पाहताना क्षणभरही कुठे जाणवत नाही की, चित्रपटाचे शूटिंग १९८० सालातील आहे. या चित्रपटाबद्दल पटवर्धन दांपत्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जी काही पारितोषिके मिळाली आहेत, तित 'आर्ट डायरेक्शन' चे जे एक आहे, त्याचा त्याना विशेष आनंद होत असेल. निर्माते आणि दिग्दर्शक 'कलादिग्दर्शना'कडे अशा गंभीरतेने लक्ष देतील तर मराठी भाषेतील अनेक कथारत्ने "२२ जून" च्या तोडीची होऊ शकतील....[अशी आशा वाटते] इन्द्रा

आज काळाचे छान मराठी चित्रपट आणि त्यांचे विषय हाताळणी उत्कृष्ट आहे. खालील काही चित्रपट जरूर पहा १) नटरंग २) झेंडा ३)त्या रात्री पाऊस होता ४) मुंबई पुणे मुंबई ५)जोगवा ६)ऑकसीजन ७)एक डाव धीबी पछाड तरी आपण वरील चित्रपट पाहून परत एकदा चर्चा करावी ............................................................................................... नसती उठाठेव ..............................................................................................

"""'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.""" त्या रात्री पाऊस होता मधील अमृता सुभाष चा अभिनय विषयाशी निगडीत असल्याने मला नाही वाटत त्यात काही गैर असेल असे वाटत नाही आणि हो drugs ,शारीरिक संबंध हे सगळे विषयाशी सलंग्न आहे .त्यामुळे ते योग्य आहे असे मला वाटते .................................................................... नसती उठाठेव ........................................................

त्या रात्री पाऊस होता मधील अमृता सुभाष चा अभिनय विषयाशी निगडीत असल्याने मला नाही वाटत त्यात काही गैर असेल असे वाटत नाही आणि हो drugs ,शारीरिक संबंध हे सगळे विषयाशी सलंग्न आहे .त्यामुळे ते योग्य आहे असे मला वाटते >> असेच म्हणतो !! नाहीतर अगंवर धड कपडे नसलेल्या हिन्दी अभिनेत्र्या !!

मराठी सिनेमानं चांगला व्यवसाय करावा की रसिकप्रिय व्हावं याविषयी अनेक प्रतिसादांमध्ये दोन वेगवेगळ्या टोकांची मतं दिसत आहेत. मुळात कोणत्याही स्थानिक किंवा जागतिक पातळीवरच्या चित्रपटसृष्टीत असे दोन प्रवाह दिसतातच. त्यामुळे ते मराठीतही असणं हे स्वाभाविक वाटतं. पण 'प्रभात'काळ सोडता दोन्ही बाबतींत मराठी सिनेमा नेहमीच इतरांहून मागे होता हे सत्य आहे. धंदा करण्याच्या बाबतीत दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाशी तुलना केली तर हे सहज लक्षात येईल. पण एक बाजारपेठ म्हणून मराठीच्या अंगभूत मर्यादा आहेत. त्या लक्षात घेता आशेची परिस्थिती वाटत नाही. शिवाय आहे त्या बाजारपेठेत बर्‍याचशा मराठी जनतेला आवडेल असा सिनेमा बनवणं आता अशक्यच वाटतं. शहरी/ग्रामीण, तरुण/मध्यमवयीन, मल्टिप्लेक्स-सिंगल पडदा-तंबू अशांत विभागल्या गेलेल्या आजच्या मराठी प्रेक्षकाच्या आवडीनिवडी खूपच भिन्न आहेत; म्हणून आहे ती बाजारपेठही विभागली जाते. खेडोपाडी तंबूत दाखवला जाणारा मराठी सिनेमा आता आपल्या मराठी वाहिन्यांवर आणि पुण्या-मुंबईतल्या चित्रपटगृहांत येऊ शकत नाही. त्याउलट पुण्या-मुंबईत प्रदर्शित होणारा सिनेमा तंबूत वा दुसर्‍या-तिसर्‍या फळीच्या शहरांत जात नाही. रसिकप्रियतेचे निकष पाहताही बंगाली/मल्याळी रसिकप्रिय चित्रपटांच्या तुलनेत आताआतापर्यंतचा मराठी सिनेमा मागेच पडत आला आहे. कदाचित 'डोंबिवली फास्ट' आणि 'श्वास'नंतरच्या वेगळ्या मराठी सिनेमाकडून (संदीप सावंत, निशिकांत कामत, परेश मोकाशी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, नंदू माधव वगैरे नवे दिग्दर्शक) काहीतरी अपेक्षा ठेवता येतील. अर्थात, त्यांनाही रसिकप्रिय हिंदी सिनेमाची भुरळ पडली नाही तरच ते शक्य आहे. थोडक्यात, मराठी सिनेमाला जागतिक किंवा भारतीय पातळीवर दखलपात्र करण्याची आशा/अपेक्षा ठेवायची झालीच तर त्यातल्या त्यात रसिकप्रिय सिनेमाकडूनच तशी ठेवता येईल असं वाटतं.

माझे काही अतिआवडते चित्रपट १) माहेरची साडी का आवडतो? यातली रडारड पाहून आपले फार चांगले चालले आहे असे वाटते. जेव्हा जेव्हा कधी दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा हा पहा..म्हणजे आपले दु:ख थोडे हलके होते. २) टारगेट संजय नार्वेकर, अंकूश चौधरी, सिद्धार्थ जाधव यांनाही पोटापाण्यासाठी असल्या चित्रपटात काम करावे लागते हे आपल्याला उमजून घेण्यासाठी. ३) सचिनचा आत्मविश्वास्, नवरी मिळे .. आणि बनवाबनवी सोडून कोठलाही चित्रपट..तसेच अशोक आणि लक्षाचे काही चित्रपट (चंगू मंगू वगैरे..) फु बाई फु बघताना हसू यावे यासाठी आधी असला एखादा सिनेमा पहावा..म्हणजे अति बोअर झाल्याने थोडेफार हसू देखील फु बाई फु बघताना येईल.. अजून यादी आहे. परत कधीतरी लिहीन...

In reply to by योगी९००

वरील प्रतिसाद वाचुन ठार झालेलो आहे याची नोंद घ्यावी मिस खादाड माउ !! माझे काही अतिआवडते चित्रपट १) माहेरची साडी का आवडतो? यातली रडारड पाहून आपले फार चांगले चालले आहे असे वाटते. जेव्हा जेव्हा कधी दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा हा पहा..म्हणजे आपले दु:ख थोडे हलके होते. अरारारारारारा !! _/\_ त्या मनोहरकांकाच्या डोक्यात तिडीक जाइल ना !! आत बाकीच जिवंत झाल्यावर........

बरीच नावे मिळाली. यात हे तीन घ्या. १. एक कप च्या (सुहास ने वरती दिला आहे हे आत्ता नंतर दिसले) २. वासुदेव बळवंत फडके ३. घराबाहेर (१९९९ मधे आलेला, मोहन जोशी, सोनाली कुलकर्णी, सुहास जोशी, सचिन खेडकर यांच्या भूमिका असलेला चित्रपट. एक मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव होतो आणि तेथील आमदार (की खासदार लक्षात नाही) आपल्या मुलीला उभी करून निवडून आणतो. मग ती केवळ कठपुतळी न राहता स्वतःचा प्रभाव कसा पाडते वगैरे). लालबाग-परळ सुद्धा चांगला आहे.

In reply to by फारएन्ड

घराबाहेर मध्ये प्रशांत दामलेंचे काम पहिले आणि वाटले की का हा माणूस स्वतःला विनोदी साच्यात अडकवून बसला आहे? सचिन खेडेकर त्याच्या कानाखाली मारतो त्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव तर मस्तच.

आतापर्यंत उल्लेखिलेल्या बहुतांश"चांगल्या मराठी" चित्रपटांचे विषय हे पिटातल्या पब्लिकच्या डोक्यावरुन जाणारे आहेत. अश्या चित्रपटांचा फक्त घरी पाहुनच आस्वाद घेता येऊ शकतो. आणि बर्याचदा अश्या चित्रपटात प्रतिकात्मकतेचा अट्टाहास (दिग्दर्शनाच्या नावाखाली) घातलेला दिसुन येतो. अशोक सराफचा "वजीर" असाच डोक्यात गेला होता. "नॉट ओन्ली मिसेस राऊत" मधला तुषार दळवी तर कुठल्याश्या कादंबरीतील वाक्य जशीच्या तशी बोलतोय का काय असे वाटले. दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ जसे लॉयल फॅन फॉलोइंग होते तसे सध्या कुठल्याही मराठी कलाकाराला नाही.त्यामुळे हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपट जसे केवळ कलाकाराच्या जोरावर चालु शकतात तसा प्रकार मराठीत सध्या तरी होताना दिसत नाही. "सामना" काही दिवसांपूर्वीच युट्युबवरुन पाहीला.आणि तरीदेखील चित्रपटाचा इम्पॅक्ट जाणवला.असे चित्रपट नेहेमी नेहेमी बनणे मुश्किलच.

१०० प्रतिक्रीया झाल्या आहेत. पण बहुतांशी प्रतिक्रीया या सिमीत (Limited) वाटल्या. एकतर निराशेचा सुर किंवा टिंगलीचा सूर. काहिंनी थोड्या मोजक्या सिनेमांची उदाहरणे दिली आहेत ती पुरेशी नाहीत. एक गोष्ट मान्य करावे लागेल मराठी सिनेमा तमाशापट, (टुकार) इनोदी सिनेमांच्या लाटे बाहेर आला आहे आणि नक्कीच वेगवेगळे विषय हाताळले जातात. मागील काळात सामना, उंबरठा, जैत रे जैत इत्यादी सिनेमे आले. पण त्यांची संख्या मोजकीच होती. आता एक नजर पुढील यादीवर टाकू. ध्यासपर्व, श्वास, वजीर, सरकारनामा, तू तिथे मी, बनगर वाडी, गोजिरी, सातच्या आत घरात, श्वास, नितळ, सनई चौघडे, विहीर, रीटा,गोष्ट छोटी डोंगराएवढी, कायद्याचे बोला, नटरंग, टिंग्या, जोगवा, डोम्बिवली फास्ट, वळू, वासुदेव बळवंत फडके, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई-पुणे-मुंबई, मी सिंधुताई सपकाळ, गाभ्रीचा पाउस, गैर, गोष्ट छोटी डोंगराएवढी, हरिश्चंद्राची फॅक्टरी इत्यादी हे अलिकडच्या काळातले काही चित्रपट. सगळे चित्रपट उत्तम आहेत असा दावा नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट वेगवेगळे विषय हाताळण्याचे धाडस निर्माते/ दिग्दर्शक दाखवत आहेत. दुर्दैवाने त्याबद्दल कोणिही लिहीलेले आढळेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल नक्कीच वेगळ्या वाटेवर चालली आहे आणि हे आशादायक चित्र आहे हे मान्य करायला हवे. (जाताजाता-शतकपुर्ती साठी धागाकर्त्याचे अभीनंदन)

In reply to by चिंतामणी

चांगला आढावा घेतला आहे. अजुन एक मी आधी विसरले होते. अनाहत - अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेला आणि सोनाली बेंद्रेचा पहीला मराठी चित्रपट. तिचा अभिनय ठिकठाक म्हणता येइल, पण ती दिसते चांगली यात आणि ते जुन्या काळचे वातावरण, राजे-रजवाडे दिग्दर्शकाने चांगले जमवुन आणले आहे.

In reply to by चिंतामणी

श्री.चिंतामणी... मीदेखील हे १००+ प्रतिसाद मनापासून वाचले आहेत, पण तुम्ही म्हणता तसा निराशेचा सूर असेल काही प्रतिसादात, पण त्याच्या तुलनेने टिंगलीची लहर प्रकर्षाने जाणवली नाही. हेही मान्य की तमाशा आणि टुकार विनोदी चित्रपटाच्या गर्तेतून मराठी चित्रपट बाहेर येऊन अगदी जागतिक पातळीपर्यंत पोहोचण्याची स्वप्ने पाहात आहे. पण खरी अडचण आहे व जी अद्यापि सुटू शकलेली नाही ती म्हणजे वितरणव्यवस्था. आज इंटरनेटमुळे सारे जग कीबोर्डच्या एका स्ट्रोकने जवळ आले आहे, मी अत्यंत दूर अशा खेडेगावात राहूनदेखील जगातील कित्येक देशातील नेटर्सबरोबर या विषयावर संवाद साधून त्याना 'मराठी चित्रपटाने मारलेली भरारी' बद्दल तासनतास सांगू शकतो, जेणेकरून त्यानाही इथल्या प्रगतीबाबत कुतहूल वाटेल....पण हे केव्हा घडेल?? तर मी स्वतः तुम्ही प्रतिसादात दिलेले चित्रपट पाहिले तर...! पाहिले आहेत का? तर उत्तर आहे...."नाही"....हे निराशजनक असेल (नव्हे आहेच...) तर याला जबाबदार परत त्या निर्मात्याचीच. कारण मी काही मुंबई-पुणे इथे येऊन तर मराठीने चित्रपट सादरीकरणात केलेली प्रगती पाहू शकत नाही. टीव्हीवर माझा विश्वास नाही. चित्रपट भावायचा असेल तर तो शांतपणे थिएटरमध्ये जाऊन पाहिला तरच ते शक्य आहे...अन्यथा ईडियट बॉक्सवर दर पाच मिनिटांनी धो-धो कोसळणारा तो जाहिरातींचा पूर पाहून डोळे आणि मन विटून जाते...कसा भावेल कितीही चांगला असला तरी तो चित्रपट !! मी चित्रपट प्रेमी आहे....अन् या विषयावर तासनतास लिहू बोलू शकतो, पण आता तुमच्या यादीतील शीर्षकांवर नजर टाकली असता मला जाणवले की, नियमित थिएटरमध्ये मी यातील 'नटरंग' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे दोनच चित्रपट पाहिले आणि तेही सार्‍या महाराष्ट्रात डंका मारला म्हणून इथे कोल्हापुरात प्रदर्शित झाले. बाकीपैकी 'श्वास' आणि 'विहीर' फिल्म क्लबतर्फे छोट्या थिएटरात ....आता राहिलेल्या यादीतील बाकीचे सर्व म्हणजे सुमारे ८०% चित्रपटांनी माझ्या शहराचा नाकाही पाहिला नाही. "फॅक्टरी..." फार बोलबाला झाला म्हणून अगदी नाईलजास्तव झी टॉकिजवर पाहात बसलो...पण मन रमले नाही...त्यामुळे त्याबाबत जे बोलले/लिहिले गेले त्यावरूनच त्याच्या दर्जाची अटकळ बांधणे क्रमप्राप्त आहे. असे जर असेल तर इथे संस्थळावर चर्चा करताना 'निराशेचा' जो सूर येत राहील त्याला जबाबदार निर्मातेच आहेत असे मी म्हणेन. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आता राहिलेल्या यादीतील बाकीचे सर्व म्हणजे सुमारे ८०% चित्रपटांनी माझ्या शहराचा नाकाही पाहिला नाही. अशी अवस्था असेल तर बोलणेच खुंटले. हे चित्रपट सर्वत्र पोहोचत नसतील तर दुर्दैव आहे. परंतु मी म्हणलो आहे की विषयात विविधता येउ लागली आहे हा मुद्दा बाद होत नाही. मी विविधतेबद्दल बोललो आहे. सगळेच चित्रपत उत्त्म आहेत असे नाही म्हणालो. मी आशा व्यक्त केली की मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या वाटेवर आहे आणि उत्तम होईल. अजून एक आशा व्यक्त करतो की हे सगळे चांगले चित्रपट मराठी सिनेमांचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरातसुध्दा प्रदर्शीत होतील.