ब्रेक के बाद - एक डोके उठवणारी ब्याद
काल मोठ्या उत्साहाने 'ब्रेक के बाद' हा अत्युच्च दर्जाचा सिनेमा बघण्याचा योग जुळून आला. संध्याकाळी साडेसहाचा 'लक्ष्मीनारायण'चा खेळ होता. दिवसभर थकवा आल्याने थोडा हलका-फुलका चित्रपट बघावा म्हणून आम्ही (म्हणजे मी आणि माझ्या बायकोने) 'ब्रेक के बाद' या सिनेमाची निवड केली. चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याने मल्टीप्लेक्सनामक नोटा खाणार्या राक्षसाकडे न जाता आम्ही लक्ष्मीनारायणच्या मॅजेस्टी वर्गाचे तिकीट काढून सिनेमा सुरु होण्याची वाट बघत बसलो. कमी गर्दी, पार्किंगचे पाच रुपये, आणि मॅजेस्टीचे ऐंशी रुपयांचे तिकीट असे खर्चाचे योग्य माप निवडल्यामुळे मी खुशीत होतो. ऐश करण्याचा 'फील' यावा म्हणून फारतर मध्यंतरात दोघात मिळून एक पॉपकॉर्न घेऊन टाकू असा व्यवहारी विचार मी केला...अर्थात ते ही वीस रुपयांना होते ही गोष्ट वेगळी.
इम्रान खान ('जो जीता वही सिकंदर' मधला बाल आमिर) आणि दीपिका पदुकोन हे अनुक्रमे नायक आणि नायिकेच्या भूमिकेत होते. आधी इम्रान खानचा 'जाने तू या जाने ना' हा सिनेमा पाहिला होता आणि तो छान करमणूक करणारा वाटला होता. तशीच थोडी चुरचुरीत कथा आणि खुमासदार पटकथा असणारा हा चित्रपट असेल अशी अटकळ बांधून आम्ही आमच्या मॅजेस्टी वर्गाच्या आसनावर स्थिरावलो. नायक आणि नायिका लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि दोघांना सिनेमाचे खूप वेड असते. त्यांच्या सिनेमा बघण्याच्या दृष्यांवरून चित्रपट सुरु होतो. श्रेयनामावली देखील थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. सिनेमा आणि तो ही चित्रपटगृहात बघायचा म्हणजे मी माझी दुनिया, माझे दर्द-ओ-गम विसरून जातो आणि चित्रपटगृहातल्या त्या जादुई अंधारात माझे भान हरपून जाते. बाहेर पडून खायला दोन घास नसतील तरी त्याची चिंता मी दरवाज्याबाहेर ठेवून चित्रपट एंजॉय करू शकतो. असो. नावे संपली. मी एकाग्र चित्ताने पडद्याकडे बघू लागलो. एवढ्या एकाग्रतेने मी कधी अभ्यास देखील केला नव्हता.
नायकाच्या बहीणीचं लग्न असतं. दीपिका आपली कंबर मागच्या बाजूने साधारणतः मॅक्सिमम ५% झाकू शकेल असा ड्रेस घालून उभी असते. समोरच्या बाजूने प्रेक्षक भक्तीभावाने पोट, बेंबी, दंड, गळा वगैरे अवयवांचं दर्शन घेण्यासाठीच आलेले आहेत अशी ठाम समजूत झाल्याने दीपिका या सगळ्या अवयवांचं मनसोक्त दर्शन देत शरीराला असंख्य आचके देत इम्रानशी अगम्य भाषेत बोलत असते आणि खळखळून हसत असते. नायिका सुंदर, तरूण, अवखळ, अल्लड, निरागस (अनुक्रमे खूबसूरत, जवान, अल्हड, मासूम, किसी झरने जैसी हँसती-खेलती वगैरे वगैरे) अशी असल्याने दीपिका दर वाक्यागणिक एका अल्हड झरन्यासारखी सगळे दात दाखवत हसत असते. इम्रान एखाद्या किल्ली दिलेल्या खेळण्यासारखा बडबड करत असतो.... दीपिकाचा अर्थातच लग्न वगैरे गोष्टींवर विश्वास नसतो. ती नव्या युगाची, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची महत्वाकांक्षा बाळगणारी नायिका असते. त्यामुळे ती नायकाला त्याच्या आडनावाने हाक मारत असते.
'गुलाटी, चलो मेरे साथ...' असे म्हणून ती नायकाला कुत्र्यासारखं फिरवत असते. ती तिच्या आईला देखील नावाने हाक मारत असते. आपल्या आईचा 'आयेशा' असा एकेरी उल्लेख करून तिचा मॉडर्नपणा वारंवार सिद्ध करत असते. बरं नायिकेला नेमकं काय करायचं आहे हे देखील कळत नाही. अशा या नायिकेचे नाव 'आलिया' तर नायकाचे नाव 'अभय' असते. आलियाची थेरं बघता-बघता आपल्याला 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणण्यावाचून गत्यंतर राहत नाही.
आलिया आणि अभय दिवसातले २०-२२ तास सोबत असतात. इकडे-तिकडे भटकणे, मनसोक्त बीअर पिणे, सिगार ओढणे या खेरीज हे दोघे काहीच (?) करत नाहीत. आपली फक्त मैत्री आहे की प्रेम आहे हे यांना कळत नाही. दिवसभर सोबत राहणे, नॉन-स्टॉप बडबड करून प्रेक्षकांना वात आणणे याखेरीज हे दोघे पहिल्या एक तासात काहीच करत नाहीत. मग अचानक आलियाला ऑस्ट्रेलियाच्या कुठल्यातरी मोठ्या विद्यापीठातून मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी प्रेमाचे आणि आग्रहाचे आमंत्रण येते. ही अभ्यास कधी करते, फॉर्म कधी भरते हे आपल्या सारख्या तुच्छ लोकांना कळत नाही. मग आलिया हा गौप्यस्फोट अभय पुरुषांच्या स्वच्छतागृहात असतांना धाडकन दरवाजा उघडून करते. बघा, आहे की नाही मॉडर्न? तिथे यांचे भांडण होते. अभय एक सरळ साधा नायक असतो. पण आलियाला मॅनेजमेंट करायचेच असते कारण तिला तिचे आयुष्य 'घडवायचे' असते. मग तात्पुरता ब्रेकप करून आलिया ऑस्ट्रेलियाला निघून जाते. आलियाचा बाप मेलेला असतो की कुठे दुसरीकडे असतो हे मला कळले नाही कारण मी त्यावेळेस मोबाईलवर गेम खेळत होतो. आलियाची आई शर्मिला टागोर दाखवलेली आहे. प्रतापगडाच्या एखाद्या कातळासारखा कोरा करकरीत चेहरा घेऊन ही आई गाडगी-मडकी रंगवण्याचा काहीतरी उच्चभ्रू व्यवसाय करत असते. असल्या सिनेमात श्रीमंत बायका मडकी, मेणबत्त्या बनवणे, चित्रे काढणे (आठवा 'दिल चाहता हैं' मधली डिंपल), हाय-फाय रेस्तराँ चालवणे (जया बच्चन 'कल हो ना हो') असल्या फालतू व्यवसायात असतात. आपण काहीतरी उच्च दर्जाचे काम करत आहोत असा भाव चेहर्यावर घेऊन या रंग उडालेल्या बायका आपला क्लास दाखवत असतात. असो. आलिया एकदम ऑस्ट्रेलियातल्या विमानतळावर दात काढत उतरते. मग 'जिंदगी में कुछ कर दिखाना हैं' छाप भाव घेऊन कमालीच्या आत्मविश्वासाने आलिया तिच्या कुठल्यातरी मावशीकडे येते. मावशीच्या घरी गप-गुमानं राहून कोर्स पूर्ण करावा ना? पण नाही, आलिया म्हणजे एक नमुना असते. जणू आलियाच मावशीकडे राहून मावशीवरच अनंत उपकार करतेय अशा पद्धतीने ती तिथे राहत असते. एके दिवशी आलिया रात्री उशीरा घरी आली म्हणून मावशी रागावते. माझी मावशी असती तर कानफटीत दिली असती आणि मी मुकाट खाल्ली असती; शेवटी गरज माझी असली असती. पण आलिया म्हणजे काय समजलात काय तुम्ही? ती तडक सामान घेऊन फूटपाथवर झोपते. "लडकी खुली तिजोरी की तरह होती हैं..." वगैरे फिल्मी डायलॉग तिला अजिबात आठवत नाहीत. मावशी आपुलकीने मदत करतेय हे तिच्या गावीही नसते. मग आलिया एका शॅकवर राहते. ते ही तिला १-२ मिनिटात मिळून जाते. समुद्रकिनार्यावरचे शॅक आणि ते ही ऑस्ट्रेलियातले म्हटल्यावर आलिया चेकाळते.
आलियासोबत तिथे अजून एक भारतीय मुलगी आणि भारतीय मुलगा राहत असतात. शॅक त्या मुलीच्या मालकीचे असते. तिचं नाव असतं...काय असतं बरं.....जाऊ द्या, आपण सुशीला समजू. ही सुशीला (शहाना गोस्वामी) कपड्यांच्या बाबतीत अगदीच कंजूष असते. कमरेपासून फारतर ४-५ इंच खाली येणारी अर्धी चड्डी आणि खांद्यांवरून बेंबीपर्यंत जोमाने जाऊ पाहणारा टॉप अशी वेशभूषा करून ही सुशीला वावरत असते. मग रीतसर खाली वाकणे, व्यायामाच्या नावाखाली आजूबाजूला वाकणे असे उद्योग करून ही सुशीला प्रेक्षकांना गांधीजींच्या कमी कपडे घालण्याच्या तत्वांचे महत्व पटवून देत असते. आलिया मागे थोडीच राहणार. मग अभयला 'अपना प्यार जीतने के लिए' ऑस्ट्रेलियाला यावेच लागते. तो आलियाच्या शॅकलाच येऊन राहतो. मग बीअर ढोसणे आणि एकमेकांच्या मांड्यांवर माना टाकून झोपणे याशिवाय हे चौघे काहीच करत नाहीत. आश्चर्य म्हणजे आलियाला अभयचे येणे अजिबात आवडलेले नसते. ती त्याच्यावर खफा असते पण मांड्यांवर माना टाकणे, तासातून किमान पाच वेळा आपल्या सगळ्या अवयवांना त्याच्या सगळ्या अवयांवर घासणे हे प्रकार सर्रास चालू असतात. मॉडर्न हेट्रेड, दुसरे काय?
मग आलिया कॉलेजमध्ये एका नाटकात भाग घेते. तिथे नेमका ऑस्ट्रेलियाचा एक नामवंत चित्रपट दिग्दर्शक कडमडतो आणि आलियाला दोन मिनिटात नायिकेचा रोल बहाल करून निघून जातो. अब समझा आलिया किस चिडिया का नाम हैं? नाद नाय करायचा, बाद करून टाकीन असा आलियाचा खाक्या असतो ते उगीच नाही. अभय एक छोटे हॉटेल सुरु करतो आणि यशस्वी होतो. दोघांचं भांडण सुरुच असतं. दरम्यान दोघे २-३ वेळा पौड फाट्यावरून नळ स्टॉपला जावे इतक्या सहजतेने इंडियाला जाऊन येतात. त्यांच्या-त्यांच्या आया त्यांना लग्नाचे धडे देतात.
शेवटी आलियाला आपली चूक उमगते आणि ती अभयशी लग्न करते. दी एंड! हुश्श!
कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गाणी अशा सगळ्याच आघाड्यांवर 'ब्रेक के बाद' एक उच्च दर्जाचा सिनेमा आहे यात शंकाच नाही. पहिल्याच प्रसंगात अभय साधारण पाच मिनिटे स्वगत बोलतो. प्रेक्षकांना ते कळत नाही आणि कंटाळवाणे वाटते हा प्रेक्षकांच्या अभिरुचीहीन मानसिकतेचा दोष आहे असे म्हणायला वाव आहे. नंतर अभय आणि आलिया अशक्य बडबड करतात, हसतात आणि बीअर पितात. मध्येच आलिया बीअर पिऊन बेशुध्द होते आणि अभय तिला घरी आणून सोडतो. पलंगावर तिला झोपवल्यावर निघून जातांना त्याचा हात तिने धरून ठेवला आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग त्याचे डोळे भरून येतात. कुणी आपला हात धरला असल्यास असं शेवटी लक्षात येईल? पण सिनेमात ते शेवटी लक्षात येते. मग तो तिथेच झोपतो आणि दुर्दैवाने कधी नव्हे ते आम्हाला सेन्सॉर बोर्ड नामक संस्थेचा संताप येतो.
'ब्रेक के बाद' गुळगुळीत एक्स्प्रेशन्सने ठासून भरलेला सिनेमा आहे. दारू पिऊन पडणार्या कुठल्या प्रेयसीकडे माझ्यासारखा प्रियकर "गुणाची हो प्रेयसी माझी, किती निरागस आहे...बिचारीला दु:खांचा डोंगर पेलावा लागतोय..." असे पुटपुटत भरल्या डोळ्यांनी बघेल? पण अभय बघतो. मग दर पाच मिनिटांनी अभय, आलिया, आयेशा असे सगळे एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी बघतात. मग हळूच भरल्या डोळ्यांनी मान हलवण्याचा प्रकार तर डोक्यात जातो.
साला आम्हाला शिक्षणानंतर खायचे वांधे होते; अभय आणि आलियाच्या आयुष्यात एकमेकांसोबत टाईमपास करून देखील आपले प्रेम आहे का हे ठरवण्याचे वांधे! आणि त्यांच्या या फालतूपणाचा त्रास आम्हाला! हा कुठला न्याय?
आयेशा (शर्मिला) सिनेमाभर फोनवर दिसते. अभय आणि आलिया फोनवर सहनशीलतेच्या पलिकडे जाणारी बडबड करतात. शॅकवर अभय आणि तो दुसरा पंटर हे फुल्ल पँट घालून वावरत असतात आणि आलिया आणि सुशीला मात्र जेमतेम काहीतरी घातलं आहे असा सुस्कारा सोडण्याइतपतच काहीतरी घालतात. अभय आणि तो दुसरा पूर्ण शर्ट घालतात आणि आलिया आणि सुशीला एलिजिबिलिटी असून या परीक्षेत चक्क नापास होतात. भर लग्नातून ताडताड चालत आलिया सिगारेटच्या टपरीवरून सिगारेट विकत घेते, वधूच्या खोलीत खुशाल सिगार ओढते, अभयची आई आलियाला प्रेमाने 'चुडैल' म्हणते, कधीच कॉलेजला न जाता (दिवसरात्र बडबड करून आणि बीअर ढोसून) आलियाचे कॉन्वोकेशन झोकात होते, एका क्षणात तिला चित्रपटसृष्टीचे दरवाजे सताड उघडे करून मिळतात आणि ती एक मान्यताप्राप्त अभिनेत्री बनते देखील....'ब्रेक के बाद' असल्या निरर्थक, कंटाळवाण्या, अशक्य कोटीतल्या घटनांनी भरलेला 'बिग बॉस'चा एखादा रटाळ आणि डोके उठवणारा शो वाटतो.
अभिनयात सगळ्यांनीच सुमार कामगिरीचा विडा उचलला होता. अर्थात पटकथा आणि कथाच भंकस असल्यावर कलाकर तरी काय करणार म्हणा? सुमार कामगिरीच्या शर्यतीत पहिला क्रमांक नि:संशयपणे दीपिका पदुकोनने पटकाविला आहे. ओवरअॅक्टींग म्हणजे काय याचा चालता-बोलता कोर्स म्हणजे दीपिकाचे 'ब्रेक के बाद' मधले काम!! अभिनय कसा करू नये हे धडे मिळवण्यासाठी होतकरू अभिनेत्यांनी हा चित्रपट आणि त्यातही दीपिकाचा अभिनय नक्की पहावा.
दिग्दर्शन इतके घाणेरडे आहे की 'मेला' चे किंवा 'हां मैने भी प्यार किया हैं' चे दिग्दर्शन त्यापुढे उच्चदर्जाचे वाटावे. 'खयालों में बारीश..' वगैरे सारखी रटाळ आणि तोचतोचपणाचा फील देणारी तथाकथित तरल गाणी आहेत. ठणाणा बोंबलणारे गायक आणि कानठळ्या बसवणारे संगीत चित्रपटातला नसलेला प्राण यमराजासारखा हिरावून नेतात....
असा हा 'ब्रेक के बाद' एका वेगळ्या अनुभवासाठी जरूर बघा...
वर्गीकरण
कहर
In reply to कहर by स्पा
+१ सहमत, पण ...
खी: खी: खी:
बापरे! मी या सिनेमाच्या
फ़ाडु परिक्षण...
हा हा हा
पिक्चर ला ठेचुन ठेचुन मारलाय
+१०००
बघितलाच पायजे
स्टार कास्ट बघूनच तो काही फार
एकतर इतका रटाळ चित्रपट पाहिला
In reply to एकतर इतका रटाळ चित्रपट पाहिला by आमोद शिंदे
बिचारे इतकी लोकसेवा करताहेत
In reply to बिचारे इतकी लोकसेवा करताहेत by शिल्पा ब
ओम शांती ओम
In reply to एकतर इतका रटाळ चित्रपट पाहिला by आमोद शिंदे
खिल्ली
वा.....
मित्रा..
सुंदर चित्रपट .... उद्याची
आलियाचा बाप मेलेला असतो की
दोघांचं भांडण सुरुच असतं.
ब्ये क्का र...
In reply to ब्ये क्का र... by चिगो
अनस्टॉपेबल बघा.
In reply to अनस्टॉपेबल बघा. by समीरसूर
अरे वा !! माझेही काही आवडते
हा हा हा आजच पहावा म्हणतो हा
जबरी परिक्षण !!! बेफाम केलंय.
फाडू परीक्षण. पैसे वाचले.
अफलातुन परिक्षण..ह.ह.पु.वा
In reply to अफलातुन परिक्षण..ह.ह.पु.वा by अविनाशकुलकर्णी
अफलातून परीक्षण !
भन्नाट..
भारीच लिहिलेय परीक्षण.. तसंही
मस्त!
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!
आलिया होय...
सहीच
काय तेज्यायला धुतलाय..
In reply to काय तेज्यायला धुतलाय.. by मेघवेडा
जरा थांब रे