Skip to main content

त्रिमिती: चित्रपट ते भ्रमणध्वनी

लेखक देवदत्त
Published on शुक्रवार, 12/11/2010
त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, 'छोटा चेतन' द्वारे. आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला 'शिवा का इन्साफ'. 'सामरी' सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :) त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली 'छोटा चेतन'ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन. चित्रपटगृहात तर नाही पहायला मिळाली, नंतर एका दूरदर्शन वाहिनीवरच पाहिली. २००३ मध्ये आलेला 'छोटा जादूगर' सिनेमा ही पुन्हा त्रिमितीच. खूप वर्षांनी म्हणजे साधारण १८ वर्षांनी पाहिलेला. एवढ्या काळात तो अनुभव थोडाफार विसरून गेलो होतो. पण ह्या चित्रपटाने पुन्हा मजा आली. माझ्या निरिक्षणशक्तीने त्यातील फरक ओळखायचा प्रयत्न केला होताच. आधीचे त्रिमिती चष्मे हे निळ्या आणि लाल काचांचे (प्लॅस्टिक) चे बनविलेले होते. पण हे पूर्ण राखाडी रंगाचे होते. चित्रातही बदल होताच. नेमका काय बदल झाला तो तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही, नंतर केला. पण ती माहिती मी येथे देत नाही. विकिपिडियावर फार चांगल्या रितीने दिले आहे ते. ;) थोडे शास्त्र आणि तांत्रिक बाजू पाहताना मी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी सांगतो. आपल्या दोन्ही डोळ्यांनी मिळून आपल्याला अंदाजे २०० अंशांपर्यंतचे दष्य दिसते आणि एका डोळ्याने फक्त १२० अंशांपर्यंत दिसते. अर्थात फक्त दृष्यविस्तार नव्हे तर दोन डोळ्यांमुळे त्रिमितीचा अनुभव ही येतो. एका डोळ्याने वस्तूची लांबी आणि रूंदी (किंवा उंची) दिसते तर दुसया डोळ्यामुळे त्या वस्तूची खोली किती आहे त्याचा अंदाज येतो. त्याचा फायदाच होतो. पण ह्यातच एक उलट गोष्ट आहे. सुईत दोरा टाकताना दोन डोळ्यांनी सुईतील छिद्राचा अंदाज येत नाही त्याकरिता आपल्याला एक डोळा बंद करून द्विमितीचा उपयोग करावा लागतो. असो, शास्त्र बाजूला ठेवून इतर भाग. त्रिमिती चित्रपटांप्रमाणेच आणखी एक प्रकार फार पहायला मिळतो, तो म्हणजे होलोग्राम. एखादे चिन्ह किंवा चित्र त्रिमितीचा आभास निर्माण करून दाखवले जाते. हा प्रकार लहानपणी वापरलेल्या पट्ट्य़ांमध्ये ही पहायला मिळाला होता. पण मुख्यत्वे, एखादी वस्तू ओरिजिनल किंवा अस्सल आहे हे ओळखण्याकरीता उत्पादक आपल्या उत्पादनावर आपले मानकचिन्ह होलोग्राममध्ये बनवून चिकटवितात. आता जर नकली उत्पादकानेही तसाच होलोग्राम बनविला असेल तर त्यामध्ये अस्सल कोणते आणि नकली कोणते हे ओळखण्यात काही वेळा गल्लत होऊ शकते असे मला वाटते. :) गेल्या वर्षी पुन्हा ३ त्रिमिती चित्रपट पाहिले. एक पूर्ण ऍनिमेशन (Ice Age 3), दुसरा मिश्र (G Force) आणि तिसरा संपूर्ण नेहमीसारखा (Final Destination 3D). ह्यातही दाखविले जाणारे चित्र तसेच चष्मा ह्यात बदल वाटला. तसेच भरपूर चित्रपट त्रिमितीमध्ये येत आहेत असे जाहिरातींत दिसले. एका मित्राने सांगितले की ते तंत्रज्ञान विकसित केल्याने त्रिमिती चित्रपट बनविणे थोडे सोपे झाले असल्याने धडाधड त्रिमित्री चित्रपट बनत आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच. त्यानंतर चर्चा वाढलीय त्रिमिती दूरदर्शन संचाची. एका संचासोबत १ ते २ त्रिमितीदर्शक चष्मे. कारण थेट त्रिमिती आभास तर मिळू शकत नाही. त्यामुळे चित्रपटगृहाचा अनुभव घरी एवढाच फरक असेल का? इतर देशांनंतर आपल्या देशात ह्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले असे वाटतेय. ह्या दिवाळीत तर काय त्रिमित्री दूरदर्शन संच आणि LED संचांची भलतीच जास्त जाहिरात होत होती. आमचा घरचा दूरदर्शन संच बिघडण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे एकाने सल्ला दिला, थोडे थांबून 3D संचच घे. पण मला तसे वाटत नाही. कारण एक तर त्याची किंमत भरपूर जास्त आहे. इतर देशांत तरी त्रिमिती वाहिन्या बनविणे चालू झाले आहे. पण भारतात तशा वाहिन्या बनण्याला बहुधा ३/४ वर्षे जातील असे मला वाटते. पण ज्याप्रकारे दूरदर्शन संच जरा जास्त वेगात भारतात आले त्याच वेगात वाहिन्याही आल्या तर काय सांगता येत नाही. असो. पण मी तरी सध्या त्रिमिती दूरदर्शन संचाच्या मागे नाही. आता गेल्या महिन्यापासून त्रिमिती भ्रमणध्वनीची ही जाहिरात येत आहे. त्यात वापरायचा पडदा तसेच व्हिडियो त्रिमितीमध्ये दिसेल असा त्यांचा दावा आहे. मी तरी अजून तो भ्रमणध्वनी पाहिला नाही आहे. पण त्यात बिना चष्म्याने त्रिमितीचा अनुभव मिळणे कितपत शक्य आहे अशी शंका वाटते. अर्थात होलोग्रामप्रमाणे तर असेलच किंवा त्याहीपेक्षा भरपूर जास्त. पण तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असेल तर चांगलेच आहे. असो, आता एवढे त्रिमितीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने दर्शक आणि ग्राहक ह्यांना फायदा आहेच. आणखी काय काय पुढे येते ते पाहूच.

याद्या 1784
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

त्रिमिती दूरदर्शन संचाची आनी त्रिमिती भ्रमणध्वनीची नवीनच माहिती मिळाली. अवांतरः 'छोटा चेतन' 'शिवा का इन्साफ'. 'सामरी' तीनही आले तेव्हाच पाहिलेत. आता फार फार कमी वेळा चित्रपट पहातो.

देवदत्ता, त्रिमिती दूरदर्शन संच घरात काही शोभणार नाही राव ! म्हणजे पाहुणे आले तर त्यांना त्रिमितीदर्शक चष्मे. (थ्रीडी म्हणा ना राव) द्यायचे मग आपण त्यांच्याबरोबर दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहात बसायचे, कै च्या कै वाटते. पण आपण म्हणता तसे आधुनिक तंत्रज्ञानातील ही त्रिमीती आपले खिशातले पैसे काढायला लावत आहेत तेव्हा उपयोग पाहून त्याचे आपण स्वागत केले पाहिजे आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. -दिलीप बिरुटे

हो . 3Dच लिहिणर होतो पण त्रिमिती हा शब्द आठवला आणि आधीपासूनच चांगला वाटतो :) आणि मी म्हटल्याप्रमाणे ते आता महागच आहेत. संचासोबत १ किंवा २ च चष्मे. आणि सर्वच काही 3D नसेल. तेव्हा थोडे दिवस वाट पहायची, इतरत्र अनुभव घ्यायचा आणि मगच काय ते करायचे :)

थ्रीडी संचाची एक गोम आहे. कुठलाही कार्यक्रम थ्रीडी दिसणार नाही. त्याचा पुरवठादार (सोर्स ) कार्यक्रम हा थ्रीडी हवा. म्हणजे जो पर्यंत बरेच चॅनल थ्रीडी होत नाहीत तो पर्यंत जास्त काही मजा नाही. बहुतेक त्या अगोदर ब्लु रे सारखे थ्रीडी प्लेयर घ्यावे लागतील. हे संच मला तरी खुप लवकर घराघरात येतील असे वाटत नाही. बाकी दुरदर्शन संच ज्या वेगाने बदलत आहेत तो वेग आश्चर्यचकीत करनारा आहे.

In reply to by सुक्या

कुठलाही कार्यक्रम थ्रीडी दिसणार नाही. हो, मलाही तेच म्हणायचे आहे. म्हणूनच आताच त्या टिव्हीचा फायदा होणार नाही. जेव्हा तशा वाहिन्या आपल्याकडे सुरू होतील तेव्हा विचार करू.