जिस्म आणि इतर

लेखक: फारएन्ड जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हा सगळा रिव्यू फक्त 'जिस्म' या एकाच चित्रपटाचा नाही, 'जिस्म', 'रोग', 'क्रिमिनल' व इतर अनेक महेश भट किंवा विक्रम भट आणि इतर नेहमीचेच (अ)यशस्वी यांचे चित्रपट पाहिले आणि त्यात ज्या कायम दिसणार्‍या गोष्टी आहेत त्याबद्दल हे आहे. असे चित्रपट पाहताना सतत जो वैताग येत असतो त्याचे असंबद्ध वर्णन समजा:-) या सर्व चित्रपटांत सहसा ठोकळेबाज अभिनेते असतात, जॉन अब्राहम, अश्मित पटेल, डिनो मोरिया बरेचसे मुळचे मॉडेल्स. नायिकाही तशाच. यांना इतर कोणते रोल झेपणार नाहीत म्हणून शक्यतो कोरडा ठण्ण चेहरा करून वावरण्याचे रोल त्यांना देतात, म्हणजे फॅशन डिझाइनर, यशस्वी बॅचलर , बिझिनेसमन वगैरे. फॅशन ची थोडीफार जाण असलेल्या आणि कदाचित त्यामुळेच ही मॉडेल्स आवडणार्‍या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बहुधा हे चित्रपट काढण्यात येतात. यांच्या रिव्यू मधे सुद्धा कधी कधी असा सूर असतो की काहीतरी वेगळा चित्रपट काढत आहेत. आम्ही हिन्दी चित्रपटसृष्टीला काही वेगळे चित्रपट देतो, म्हणजे आम्ही जरा वेगळे हॉलीवूड चे चित्रपट ढापतो असा अर्थ घ्यायचा. हे चित्रपट नेहमी धूसर वातावरणात आणि अंधारात असतात. या पठडीतील चित्रपट म्हणजे लख्ख प्रकाश, कोणी कोणाकडे बघून प्रसन्न हसणे, आनंदी गाणी, एकही व्यसन नसलेला नायक किंवा नायिका (पूर्वी चित्रपटांत सद्गुणांचा पुतळा असलेल्या नायकांची चलती होती, मग human flaws दाखवायचे म्हणून काहीतरी वाईट सवयी दाखवू लागले, आता त्याचाही अतिरेक होतोय), नवरा बायकोचे एकमेकांशी(च) प्रेम वगैरे अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कायम उत्तर किंवा दक्षिण धृवावर हिवाळ्यात हे चित्रपट बहुधा चित्रीत होतात, कारण सतत संधिप्रकाश किंवा अंधार असतो. त्यात M M Kreem चे संगीत, ज्यातील गाणी कायम गूढ दबल्या आवाजात म्हंटलेली वाटतात. प्रत्येक शब्द उच्चारताना अनंत यातना होत असल्यासारखे चेहरे करून जशी गाणी म्हणतात आणि म्युझिक पीस चालू असताना डोळे बंद करून 'नाही नाही' सारखी मान हलवतात तशी. अरे एक दोनदा ठीक आहे, एकदा तरी 'बचना ऐ हसीनो' सारखे अगदी आर्डीच्या दणदणाटाच्या ही वर आवाज लावलेले आणि तरीही श्रवणीय झालेले गाणे करून दाखवा? ही गज़ल युक्त गाणी आणि कथेतील विवाह बाह्य संबंध यांचे इतके समीकरण आपल्या चित्रपट वाल्यांनी करून ठेवले आहे की यातील एक असले की दुसरे असलेच पाहिजे. 'जिस्म' यातलाच. नायक, नायिका सगळेच गूढ, कसलेतरी दु:ख घेउन वावरणारे, त्यामुळे दारू, सिगरेट ओघाने आलेच. जॉन अब्राहम कायम अर्धा उघडा. ठीक आहे, व्यायाम वगैरे केला असेल, म्हणून काट्याने फळाचा तुकडा उचलताना सुद्धा जिम मधे डंबेल उचलताना स्वत:च्या दंडाकडे बघतात तशी पोज? बिपाशा बासू संपूर्ण चित्रपटभर उसासे टाकत फिरते. तिची एन्ट्री थेट त्या बॉन्डपटातल्या नायिके सारखी समुद्राच्या लाटांतून एकदम उठून फ्रेमच्या खालच्या कोपर्‍यात नज़र लावत त्या सगळ्या किनार्‍यावर नायक एकटाच असला (भारतात! आणि बहुधा ती तशी रोज जाते हे जगजाहीर असूनही :-) ) तरी त्याला साधे 'हाय' न म्हणता त्याच्या शेजारून जाणारी. त्यानंतर ती त्याला कायम 'अचानक' दिसते. त्यामुळे जॉन अब्राहम चे पहिले १५-२० मिनिटे सोलो शॉट्स एवढेच आहेत की कोणतेतरी फॅशन वाले कपडे घालून चालायचे आणि अचानक एका बाजूला बघून चमकल्यासारखे करायचे. मग ही तेथे ते ग्लासला लिंबाची चकती वगैरे लावलेले ज्यूस किंवा इतर काय काय पीत बसलेली असणार. मग पुढचे शॉट साधारण पूर्वीचे हिन्दी भटकती आत्मापट जसे दाखवत - पांढरी साडीवाली दिवा घेऊन चाललेली आणि नायक खालच्या मजल्यावर असताना वरच्या मजल्यावर आणि तो वरती आला की आणखी तिसरीकडेच दिसणारी नायिका -तसे काही शॉट्स. त्यात ही कायम नवर्‍याकडून hurt असलेल्या अवस्थेतील हावभाव चेहर्‍यावर आणते. एखाद्या चित्रपटात कथेप्रेमाणे तसे प्रसंग समजू शकतो. पण या (बर्‍याचश्या भट गॅंग च्या) चित्रपटांमधे प्रसन्न लोक आणि दिलखुलास प्रसंग कधी दिसतच नाहीत. कायम रोगट हवामान. नेपथ्य ही ठरावीक्: दारू च्या वेगवेगळ्या बाटल्या, सिगरेट्स, सेन्सॉर चालवून घेईल इतपत उघडे लोक, भिंतींना निळे जांभळे रंग, Ikea, Scandinavian Designs पासून ते अगदी तुळशीबागेपर्यंत जिथुन तिथून शोधून आणलेली विचित्र आकाराची फर्निचर्स, जिथे तिथे लावलेल्या आणि मशाली सारख्या पेटलेल्या मेणबत्त्या, कोठेतरी पाण्यात फुलेच टाकलेली, उरलेल्या गोष्टी दिसतील न दिसतील एवढाच उजेड! सूर्योदयाच्या शॉटलाही संधिप्रकाश. आता नायकाच्या किंवा नायिकेच्या मनाची अवस्था दाखवताना मागे 'डार्क' वातावरण वगैरे कधीतरी ठीक आहे, इथे त्याचा एवढा अतिरेक होतो की उलटे त्या वातवरणानेच हे लोक असे वागतात असे वाटते :-) कथा म्हणजे कोणत्यातरी इंग्रजी चित्रपटावरून घेतली असावी (पण लेखक महेश भट). जॉन अब्राहम म्हणे वकील आहे. तो अमिताभचे शराबीचे पिण्याचे रेकॉर्ड पहिल्या १०-१५ मिनीटातच मोडतो. हा एका पकडलेल्या गुन्हेगाराला 'गुन्हा कर पण पकडला जाऊ नको' असे तत्त्वज्ञान ऐकवतो. वकिलाने भावी 'गिर्‍हाईकास' पकडले जाऊ नये म्हणून सल्ला देणे हे अफलातून मार्केटिंग आहे! पण त्याने तसे बरे काम केले आहे. बिपाशा गुलशन ग्रोवर ची बायको, गुलशन ग्रोव्हर श्रीमंत बिझिनेसमन म्हंटल्यावर पुढचे सांगायलाच नको. ही प्रचंड मोठ्या घरात एकटीच रहते, फारसे कोणी नोकर वगैरे नाहीत. आणि हे सर्व तिची सांगायची स्टाईल हॉरर पिक्चर मधे जिवंत असावी असे वाटणारी व्यक्ती पडक्या वाड्याबद्दल ज्या उत्साहाने माहिती देते तशी. आणि घर एव्हढे की नुसत्या मेणबत्त्यांचा मेन्टेनंस करायला एक पूर्णवेळ नोकर लागेल. आणि वेळ कशी घालवते तर म्हणे तिच्याकडे windchimes आहेत. एरव्ही सदैव अफेअर करण्याच्या तयारीत बारमधे किंवा रेस्टॉरंटमधे एकटीच बसलेली असते. जॉन अब्राहम व तिला एकदम साक्षात्कार होतो की 'यू छुप छुप कर कबतक...'. त्यामुळे ते तिच्या नवर्‍याला मारायचा बेत आखतात. त्याने म्हणे तिच्याकडून लिहून घेतलेले असते की जर त्याला तिने घटस्फोट दिला, तर तिला एकही पैसा मिळणार नाही. हे बरे आहे, म्हणजे एखाद्या गुंडा टोळीने त्यांच्या नवीन मेंबर कडून लिहून घेतले की 'टोळी सोडल्यावर सदरहू इसमास मारून टाकणेत येईल', तर ते कायद्याने मान्य झाले काय? मग अशा पद्धतीचे एकदम predictable शॉट्स. मी अधून मधून अंदाज लावत होतो पुढच्या डॉयलॉग बद्दल आणि ते अचूक ठरत होते. उदा: या विषयावर बोलताना ती एकदा म्हणते 'मुझे डर लगता है'. मग जॉन अब्राहम विचारतो 'किस से?' अशा कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्त्वांच्या संवादात तो डर कोणापासून असतो हे उघड असते, मी अन्दाज लावला आणि बरोबर निघाला: तो डर तिला 'अपने आपसे'च होता :-) आणि मुळात गुलशन ग्रोव्हर ला मारायचे कारण या दोघांना मुक्तपणे भेटता येत नाही म्हणून की त्याची इस्टेट हवी म्हणून की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते म्हणून तेच कळत नाही. आणि मग उरलेला अर्धा चित्रपट जॉन अब्राहम आपले प्रेमात पडल्याने कसे नुकसान झाले हे आळवत बसतो, प्रत्येक पोज थेट Sheraton, Hyatt च्या बीच हॉटेल्सच्या जाहिरातीसारखी, फक्त रडका चेहरा सोडून. रडण्याचा अभिनय ही थेट पूर्वी दिलीप कुमार ची स्टाईल मारणारे इतर नायक डोळे किलकिले करून ओठ थरथरवत रडायचे तशी. आणखी एक शॉट ही खूप विनोदी आहे, कारण डबिंग चुकलेले वाटते. बिपाशा फोनवर उत्तर देत नाही म्हणून हातातील दारूचा ग्लास तो खाली आपटतो. मग काहीतरी फुटल्याचा आवाज यायला पहिजे, पण प्रत्यक्षात तो ग्लास उसळत्या चेंडूसारखा परत वर उडतो आणि तो खाली पडत (फ्रेम मधे दिसत) असतानाच काच फुटल्याचा आवाज येतो. म्हणजे आपल्याला दिवाळीत लांबचा एखादा आकाशात उडालेला फटाका आधी फुटताना दिसतो आणि नंतर त्याचा आवाज येतो, हे त्याच्या उलटे.

चिरोटा यांनी 26/10/2010 - 11:12 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

हसून मरायची वेळ आली!!मस्तच .

परिकथेतील राजकुमार यांनी 26/10/2010 - 11:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ज ह ब र द स्त ! मस्त चिरफाड केली आहे हो मालक. मुळात हा चित्रपट ज्या बॉडी हिट वरुन तंतोतंत उचलला आहे तो इतका अप्रतिम आहे की काय सांगावे. प्रामाणिकपणे सांगायचे तर हा चित्रपट संपल्यावर लक्षात राहते ते फक्त एक गाणे 'आवारापन बंजारापन', बाकी काही म्हणता काही आठवतच नाही. कारण मेंदूने लक्षात ठेवावे असे ह्या चित्रपटात काही नाहीच. आणि सेलिना जेटली, कोयना मित्रा ह्यांच्यामुळे बिपाशा देखील आता अलका कुबल वाटु लागली आहे ते वेगळेच.

पंख यांनी 26/10/2010 - 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पण फारएंण्ड साहेबांच्या यापुर्वीच्या समीक्षा वाचल्यास हा लेख तुलनेने थोडासा फिका वाटतो... पण तरीही मस्त आह, एकदम "वाचनेबल"* (वाचनेबल या शब्दाची माझ्याकडून मराठी भाषेस देणगी )

sagarparadkar यांनी 26/10/2010 - 12:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

हे सर्व वर्णन वाचून मला ह्या पेज-३ संस्कृतीमधे वावरणार्‍या लोकांबद्दल एव्हढेच म्हणावेसे वाटते: आधीच मर्कट तशातच मद्य प्याला, झाला तदनंतर वृश्चिकदंश त्याला, आणी होतसे तयाला भूतबाधा, चेष्टा वदू किती मग त्या कपिच्या अगाधा ... एक तर पेज-३, त्यात परत भट कंपनी, म्हणजे फारसं सिरियसली घ्यायचंच नाही :)

स्वैर परी यांनी 26/10/2010 - 15:20 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एरव्ही सदैव अफेअर करण्याच्या तयारीत बारमधे किंवा रेस्टॉरंटमधे एकटीच बसलेली असते.
हिहिहि.. मस्त च!
मी अन्दाज लावला आणि बरोबर निघाला
:)
एकदा तरी 'बचना ऐ हसीनो' सारखे अगदी आर्डीच्या दणदणाटाच्या ही वर आवाज लावलेले आणि तरीही श्रवणीय झालेले गाणे करून दाखवा
+१

चिंतामणी यांनी 26/10/2010 - 17:15 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

या सर्व चित्रपटांत सहसा ठोकळेबाज अभिनेते असतात, जॉन अब्राहम, अश्मित पटेल, डिनो मोरिया बरेचसे मुळचे मॉडेल्स. ठोकळेबाज अभिनेत्यांचा सम्राट आणि म.भ.कॅम्पच्या लाडक्या इम्रान हश्मीला विसरलात की काय? :( बाकी परीक्षण छान.

श्रावण मोडक यांनी 26/10/2010 - 18:05 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

फारएन्ड म्हणून वाचला इतकंच. हा माणूस चांगलं लिहतो हा नियम असेल तर तो या अपवादाने सिद्ध होईल हे नक्की. :)

निखिल देशपांडे यांनी 26/10/2010 - 18:41 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मजा नाही आली.. फारएन्ड साहेबांनी अपेक्षा वाढवुन ठेवलेल्या आहेत.. जिस्म या पिक्चर बद्दल न बोललेलेच बरे

'फारएण्डी' मजा नाही आली! बाकी जॉनसाठी 'जिस्म'सुद्धा मी आख्खा पाहिला. आणि 'जिस्म'मधली गाणी मला आवडतात. 'आवारापन' आवडतंच, पण श्रेया घोषालनेही 'जादू है नशा है' आणि 'चलो तुम को लेकर चलें' ही दोन गाणी खूप छान गायली आहेत. तिरळ्या बिपाशाने पुढे त्याचा कचरा केला आहे ही गोष्ट वेगळी!

+१ मी अजूनतरी हा पिच्चर पाहिलेला नाही परंतु परा साहेबांच्या माहितीवरून वरीजीणल पिच्चर बघायचा प्रयत्न करेन..

मुक्तसुनीत यांनी 26/10/2010 - 18:57 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

लिखाण नेहमीप्रमाणे उत्तम ; परंतु अपुरे.

निशदे यांनी 26/10/2010 - 20:50 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

" मग ही तेथे ते ग्लासला लिंबाची चकती वगैरे लावलेले ज्यूस किंवा इतर काय काय पीत बसलेली असणार. " :D "वकिलाने भावी 'गिर्‍हाईकास' पकडले जाऊ नये म्हणून सल्ला देणे हे अफलातून मार्केटिंग आहे!" :D "घर एव्हढे की नुसत्या मेणबत्त्यांचा मेन्टेनंस करायला एक पूर्णवेळ नोकर लागेल. " :D खूपच भारी........ह ह पु वा

रेवती यांनी 26/10/2010 - 21:05 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

त्यांचे नायक तसेच असतात. त्यांनाही काम मिळतं कि नाही अशी शंका यावी. भट्टांचे सिनेमे हे एकच काम! हिरवीनी एकदा का फ्यॅशन डिझायनर दाखवल्या कि त्यांना कुठल्याही चिंध्या गुंडाळायला दिल्या कि काम संपले. सिनेमाच्या जाहिरातीत सांगायचं फक्त कि कपडेपटाचं बजेट मोठं होतं म्हणून!;)

प्राजु यांनी 26/10/2010 - 21:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भट्ट फॅमिली....! चालायचंच! एकच स्टोरी.. वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडात आणि त्याच त्या प्रेक्षकांच्या माथ्यावर मारायची त्यांची जुनी सवय आहे.. ;)

नगरीनिरंजन यांनी 26/10/2010 - 21:22 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भटकँपच्या चिंध्या उतरवायला ही भाषा थोडी अपुरी आणि गुळमुळीत वाटली. जरा दणदणाटी लिहून काढा त्यांची लक्तरं. :-)

बेसनलाडू यांनी 26/10/2010 - 22:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आणखी येऊद्यात! (वाचनोत्सुक)बेसनलाडू

प्रियाली यांनी 26/10/2010 - 22:38 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आवडला पण नेहमीसारखी फारएन्डी मजा नाही आली. पुढल्यावेळेस रामूचे चित्रपट. :)

वेताळ यांनी 27/10/2010 - 10:31 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मजा आली वाचुन. भट लोकाना राहुल रॉय,दिनो,जॉन असे ऑस्कर अभिनय विजेते नटच जास्त आवडतात.

छोटा डॉन यांनी 27/10/2010 - 10:53 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

"जिस्म" हा आमचा अत्यंत आवडता सिनेमा, मी थेट्रात ५ वेळा आणि कंप्युटरवर कित्ती तरी वेळा पाहिला असेल ह्याला लिमिट नाही. एक उत्तम आणि संयत कलाकृती असे मी ह्या सिनेमाचे वर्णन करेन. जॉन-बिप्स ह्या जोडीचे तर क्या केहने ! अप्रतिम केमेस्ट्री आणि नेमका अभिनय ह्यामुळे ह्या पिक्चरची मज्जा काही औरच. जॉनने दाखवलेला वकिल म्हणजे 'कास्टिंग हे किती स्कीलचे क्षेत्र आहे' हे पक्के जाणवुन देण्याचे उदाहरण. बिप्सचे घर, त्याची सजावट, लाईटिंग वगैरे मज्जा नाय महाराजा. गाण्याबद्दल वर कुणीतरी लिहले आहेच, हो हो गाणी नक्कीच चांगली आहेत. पण एवढ्या सुंदर सिनेमाला अशी गाणी न मिळाली तर नवलच आणि त्याच एवढे कौतुक ते काय ? असो, फारएन्ड साहेबांचे परिक्षण जरा पुर्वगृहदुषित वाटले, मी त्यांचा नेहमीच्या परिक्षणाचा फॅन आहे पण हे 'अप टु मार्क' नाही हे स्पष्ट सांगु इच्छितो. ;) छ्या, जिस्ममध्ये काही चुक नाहीच, मग त्याची कसली चिरफाड करता राव ? हे म्हणजे तुम्ही आग्र्याला ताजमहाल बघायला गेल्यावर त्याच्या बागेत लोकांनी भेळ खाऊन फेकलेले कागदाचे बोळे पाहुन येण्यासारखे आहे ;) असो, पुलेशु. - ( जिस्मप्रेमी ) छोटा डॉन

विसोबा खेचर यांनी 27/10/2010 - 12:21 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

जबरा रे.. :)

महानगरी यांनी 27/10/2010 - 15:03 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त लिहिले आहे.. या आधीची पण परिक्षणे वाचून काढली... फारच बेष्ट हो फारेंड... अजून खूप भारी भारी सिनेमे आहेत , त्यांवर कधी लिहिणार? उदा. फना, दस, टशन, गोलमाल... मोठी यादी आहे..

हेमंतकुमार यांनी 14/12/2021 - 18:15 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त लिहिले आहे..

Trump यांनी 14/12/2021 - 19:06 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

त्याने म्हणे तिच्याकडून लिहून घेतलेले असते की जर त्याला तिने घटस्फोट दिला, तर तिला एकही पैसा मिळणार नाही. हे बरे आहे, म्हणजे एखाद्या गुंडा टोळीने त्यांच्या नवीन मेंबर कडून लिहून घेतले की 'टोळी सोडल्यावर सदरहू इसमास मारून टाकणेत येईल', तर ते कायद्याने मान्य झाले काय?
चालते असे कायद्यानुसार. त्याला लग्नपुर्व करार (prenuptial agreement) असे म्हणतात.